आवश्यक असणारा आधार
“मला मृत्यूच्या भयाला व खिन्नतेच्या काळाला तोंड द्यावे लागले,” असे आर्जेंटिनामधील वर्जीनिया नावाची एक यहोवाची साक्षीदार सांगते. स्तनाच्या कर्काशी झगडत असताना तिला रॅडिकल मॅसेक्टॉमी करावी लागली व दोन्ही अंडाशये काढून टाकावी लागली.a
खरोखरच, स्तनाच्या कर्काचा परिणाम म्हणून मृत्युची भीती ही सार्वत्रिक आहे. या भीतीसोबत दुर्बळतेची भीती व स्त्रीत्व आणि पालनपोषण करण्याच्या क्षमतेशी संबंधित असलेला तोटा, यामुळे एखाद्या स्त्रीच्या जीवनाचा भावनात्मकपणे चुराडा होऊ शकतो. एकटेपणाच्या भारावून टाकणाऱ्या भावनांमुळे ती असाहाय्यतेच्या खाईत जाते. अशा भावनात्मक तडाख्यातून ती कशी वाचू शकते?
आधाराची गरज
अमेरिकेतील जोन म्हणते, “तिला आधाराची गरज आहे!” तिची स्वतःची आई व आजी या दोघी स्तनाच्या कर्काच्या बळी ठरल्या होत्या. आता तिला देखील त्यालाच लढा द्यावा लागत आहे. निष्ठावान कौटुंबिक सदस्यांनी किंवा मित्रांनी सांत्वनपर आधार व मदत देण्याची ही वेळ आहे. जोनचा पती, टेरी तिच्यासाठी भक्कम, निश्चित समर्थन करणारा असा ठरला. टेरी स्पष्टीकरण देतो: “माझ्या दृष्टिकोनातून, माझी स्थिती एक स्थिर प्रभाव पाडणारी असावयास हवी होती. जोनला आशा सोडून देण्यास नव्हे तर, लढा देण्यास आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणाऱ्या उपचारांबद्दल निर्णय घेण्यास मला तिची मदत करण्याची गरज होती. तिची कर्करोगाची शस्त्रक्रिया ही अशी गोष्ट होती, ज्यासोबत आम्हाला झुंज करावी लागली. डॉक्टरांशी चर्चा करताना तिचे प्रश्न व भय यांबद्दल उल्लेख केला जात होता, याची खात्री करून घेण्याचा मी प्रयत्न केला.” टेरी पुढे म्हणतो: “आमच्या कुटुंबांसाठी व ज्यांना कौटुंबिक आधार नाही अशा सह-ख्रिश्चनांसाठी आम्ही हे करू शकतो. वैद्यकीय कर्मचाऱ्यांपुढे आम्ही त्यांचे डोळे, कान व आवाज बनू शकतो.”
एकटे किंवा विधवा असणाऱ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाची डायना आम्हास सांगते: “माझे पती पाच वर्षांआधी कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर वारले. परंतु, माझ्या मुलांनी ती जागा भरून काढली. ते प्रेमळ होते परंतु भावनात्मक नव्हते. त्यामुळे मला बळकटी मिळाली. सर्व गोष्टींना लवकर व शांतपणे हाताळले गेले.”
स्तनाच्या कर्काचा सबंध कुटुंबावर भावनात्मक परिणाम होतो. यासाठीच त्या सर्वांना इतरांकडून (ते यहोवाचे साक्षीदार असले तर, विशेषतः त्यांच्या आध्यात्मिक बंधू व बहिणींकडून) प्रेमळ काळजी व आधाराची गरज असते.
अमेरिकेतील, रिबेकाच्या आईने स्तनाच्या कर्काचा सामना केला होता. ती सांगते: “मंडळी तुमच्या कुटुंबाचा एक विस्तारित भाग आहे. त्यांच्या कृतींचा तुमच्या भावनांवर खूप मोठा परिणाम होतो. माझ्या आईने निवडलेल्या वैकल्पिक उपचारासोबत पुष्कळ जण व्यक्तिगतपणे सहमत नव्हते. तरीसुद्धा, त्यांनी फोन करून व भेटी देऊन आम्हाला भावनात्मकरित्या आधार दिला. काहींनी तिचे खास जेवण तयार करण्यात देखील मदत दिली. आमच्या सभा कधीच चुकणार नाहीत, यासाठी मंडळीच्या वडिलांनी राज्य सभागृहातील ध्वनिक्षेपणाच्या साधनांना आमच्या टेलिफोनशी जोडण्याची व्यवस्था केली. मंडळीने पैशांचे बक्षीस असणारे कार्ड देखील दिले.”
जोन कबूल करते: “आजसुद्धा, माझ्या आध्यात्मिक बंधू व बहिणींनी जे प्रेम प्रदर्शित केले त्याबद्दल मी विचार केला तर, माझ्या अंगावर शहारा उठतो! सात आठवड्यांसाठी, माझ्या प्रिय बहिणींनी पाळीपाळीने आठवड्यातील पाच दिवस मला हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले व आणले. ते जाण्या-येण्याचे संपूर्ण अंतर १५० किलोमीटर ऐवढे होते! ख्रिस्ती बंधुत्वाच्या या समृद्ध आशीर्वादासाठी मी यहोवाची खूप आभारी आहे!”
आपल्या उभारणीकारक विवेचनांद्वारे आपण सर्वजण उत्तेजनदायक व आधार देणारे होऊ शकतो. सहजगत्या दुर्लक्ष करून आम्ही नकारात्मक गोष्टींवरच बोलत राहात नाही, याबाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेतील जून अशी म्हणते: “कर्करोग नसणारी व्यक्ती अगदी योग्य गोष्ट बोलेल याची अपेक्षा आपण करू शकत नाही. माझ्या बाबतीत पाहता, इतरांनी कर्करोगाचा, जोपर्यंत ते त्याबाबतीत सकारात्मक असे काही बोलत नाहीत तोपर्यंत उल्लेख करू नये हेच चांगले होते.” जपानची नोरीको कबूल करते: “कोणी बरा झाला व त्याला पुन्हा कर्करोग झाला नाही अशा कोणाबद्दल मला इतरांनी सांगितले तर, कदाचित माझे देखील त्यांच्यासारखेच होईल अशी मला आशा मिळते.”
लक्षात ठेवा, की काही स्त्रियांच्या बाबतीत, त्यांच्या आरोग्याबद्दल दरवेळी न बोललेले त्यांना आवडेल. तरीपण, इतरांच्या बाबतीत पाहता, त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी स्तनाच्या कर्काच्या अनुभवाबद्दल बोलावे असे त्यांना वाटते. ते देखील, विशेषतः त्यांच्या जवळच्या व्यक्तींसोबत बोलावेसे त्यांना वाटते. सर्वात मदतदायी गोष्ट कोणती असेल ते एखाद्याला कसे कळेल? अमेरिकेतील हेलन सुचवते: “त्या व्यक्तीला त्याबद्दल बोलावयास आवडेल का ते विचारा. तिलाच सर्व बोलणी करू द्या.” होय, “ऐकण्यास तयार असा,” असे डेन्मार्कची इंग्लीस म्हणते. “तिला केवळ आधार द्या की जेणेकरून, तिला तिच्या दुःखी विचारांसोबत एकटेच सोडून दिले आहे असे वाटणार नाही.”
सकारात्मक दृष्टिकोनासाठी कार्य करणे
स्तनाच्या कर्काचा उपचार एखाद्या रुग्णाला आठवड्यांसाठी, महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी दमलेला व थकलेला असा बनवू शकतो. स्तनाचा कर्क असणाऱ्या स्त्रीला ती सुरवातीसारखे आता करू शकत नाही ही वास्तविकता कळाल्यावर तिच्यासाठी ती सर्वात मोठी परीक्षा असते. तिच्या शरीराच्या मर्यादा कबूल करणे याचाच अर्थ, तिला कमी हालचाल करावी लागेल व दिवसा आराम घ्यावा लागेल.
खिन्नता झाली की, सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्यासाठी लवकर पावले उचलण्याची गरज आहे. नोरीको तिच्या अनुभवाचे कथन करते: “प्रवर्तकांच्या उपचारामुळे मी खिन्न झाले. अशा स्थितीत मला कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी मी करू शकत नव्हते. त्यामुळे यहोवासाठी व ख्रिस्ती मंडळीसाठी मी निरुपयोगी आहे असे मला वाटायला लागले. माझे विचार नकारात्मक होत गेले तसे, माझ्या कुटुंबात कर्करोगाने मरण पावलेल्यांच्या शेवटल्या यातनांबद्दल मी विचार करायचे. मी भीतीने ग्रासून जायचे व आश्चर्य करायचे की, ‘त्यांनी केले त्याप्रमाणे मला देखील यातना सहन करता येईल का?’”
नोरीको पुढे म्हणते: “त्यावेळी, यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांचा उपयोग करून मी माझ्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न केला. यहोवा आमच्या अस्तित्वाबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगतो याचा मी स्वतःला विचार करण्यास लावला. मी हे शिकले की, ईश्वरी भक्ती, किती कार्य केले त्यावरून नव्हे तर, ते कोणत्या हेतूने केले त्यावरून प्रदर्शित केली जाते. यहोवाने माझ्या हृदयाच्या स्थितीमुळे आणि विचारामुळे प्रसन्न व्हावे असे मला वाटत होते. त्यामुळे, मी निश्चय केला की मला ख्रिस्ती सेवेत थोडेच करता आले तरी, मी आनंदाने व पूर्ण-मनाने त्याची सेवा केलीच पाहिजे.”
स्तनाच्या कर्काशी लढा देणाऱ्या स्त्रियांच्या दीर्घ-कालीन अनिश्चिततेमुळे, सकारात्मक दृष्टिकोन लोप पावण्याची शक्यता आहे. यहोवाने दिलेल्या सुंदर गोष्टींनी म्हणजेच, “माझे कुटुंब, मित्र, मधुर संगीत, विशाल सागर व सुंदर सूर्योदय,” याने स्वतःचे हृदय भरल्यामुळे डायनाला मदत मिळाली असे ती स्पष्ट म्हणते. ती विशेषकरून उत्तेजन देते: “इतरांना देवराज्याबद्दल सांगा. जेथे कोणताही आजार नसेल अशा पृथ्वीवर त्या राज्याखाली जी परिस्थिती असेल त्यासाठी एक तीव्र इच्छा उत्पन्न करा!”—मत्तय ६:९, १०.
वर्जीनियाला देखील जीवनातील तिच्या उद्देशावर विचार केल्यावर खिन्नतेला लढा देण्यासाठी सामर्थ्य मिळते: “माझ्याकडे एवढे मौल्यवान काम आहे तेव्हा मला खरेच जगावेसे वाटते.” कठीण क्षण येतात व भीती भरून येते त्या वेळेबद्दल ती म्हणते: “मी माझा सर्व भरवसा यहोवावर टाकते. तो मला कधीच त्यागणार नाही हे मला ठाऊक आहे. स्तोत्रसंहिता ११६:९ मधील वचनाबद्दल मी विचार करते. ते मला आत्मविश्वास देते की, ‘जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर [यहोवा, NW] चालेन.’”
या सर्व स्त्रियांनी त्यांची आशा, पवित्र शास्त्राचा देव यहोवा यावर केंद्रित केली आहे. पवित्र शास्त्रातील २ करिंथकराचे पुस्तक अध्याय १ वचने ३ व ४ मध्ये यहोवाबद्दल, “सर्व सांत्वनदाता देव . . . तो आमच्यावरील संकटात आमचे सांत्वन करितो,” असे म्हणते. सांत्वनाची गरज असणाऱ्यांना आधार देण्यासाठी यहोवा आपला हात पुढे करतो का?
जपानमधील मीको म्हणते: “मला खात्री पटली आहे की, यहोवाच्या सेवेत राहिल्याने, मला त्याचे दृढ सांत्वन व मदत मिळते.” योशिको देखील आम्हाला सांगते: “लोकांना माझे दुःख कळणार नाही, पण यहोवाला सर्व माहीत आहे. मला याची खात्री पटली आहे की, त्याने माझ्या गरजांनुरुप माझी मदत केली आहे.”
जोन म्हणते: “तुम्हाला खिन्नतेमधून उचलून, पुन्हा पूर्वस्थितीवर आणण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत आहे. येशूने पृथ्वीवर असताना जे बरे करण्याचे महान काम केले व नवीन जगात जे संपूर्ण बरे करण्याचे काम करणार आहे त्याबद्दल मी विचार केला तर, ते शब्द मला किती सांत्वन देतात!”—मत्तय ४:२३, ३४; ११:५; १५:३०, ३१.
तुम्ही स्तनाचा कर्क नसणारे जग असेल अशी कल्पना करू शकता का? खरे म्हणजे, कोणतेही आजार नसलेल्या जगाची तुम्ही कल्पना करू शकता का? सर्व सांत्वनदाता देव, यहोवा याने हेच अभिवचन दिले आहे. यशया ३३:२४ अशा वेळेविषयी बोलते जेव्हा पृथ्वीवरील कोणतीही व्यक्ती, तो किंवा ती रोगी आहे असे म्हणणार नाही. लवकरच, देवाचे राज्य त्याचा पुत्र, ख्रिस्त येशूद्वारे, त्याची संपूर्ण सत्ता या पृथ्वीवर गाजवेल व आजार, दुःख व मृत्यूच्या सर्व कारणांना काढून टाकील तेव्हा ती आशा जाणवली जाईल! या सुंदर आशेबद्दल प्रकटीकरण २१:३ ते ५ मध्ये का वाचू नये बरे? खरे सांत्वन देणाऱ्या आधाराने, भविष्याचा सामना करण्यास धीट व्हा. (g94 4/8)
[तळटीपा]
a रजोनिवृत्तिकालाच्या आधीच्या स्त्रियांमध्ये अंडाशये ही स्त्रीमदजनाचा मोठा उगम आहेत.