यहोवाच्या साक्षीदारांचे पोलंडमधील अधिवेशन
● चार शहरात चार अधिवेशने
● १६ देशातून आलेले प्रतिनिधि
● एकूण उपस्थिती ९४,१३४
● बाप्तिस्मा झालेल्यांची एकूण संख्या—३,१४०
ते हजारोंच्या संख्येने आले. मोटारी, बसगाड्या, खास आगगाड्या आणि विमानमार्गाने ते ऑगस्ट १९८५ मध्ये वरसॉ, पोझनन, कॅटोवाइस् आणि रोक्लॉ येथे आले. या चार शहरी यहोवाच्या साक्षीदारांचे “सचोटी राखणारे” अधिवेशन भरविण्यात आले होते.
हे प्रतिनिधि आल्यावर त्यांचे पोलंडच्या साक्षीदारांनी भव्य स्वागत केले. वरसॉ येथील विमानतळावर पश्चिम युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि इतर ठिकाणांहून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत झाले. स्मितहास्य, हस्तांदोलन यांनी भेटीगाठी झाल्या. माहिती प्रसारणासाठी अनुवादकांची सोय करण्यात आली होती, पण उबदार स्वागताने भाषांच्या अडखळणावर मात केली. स्त्रियांच्या हाती पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिवादन करण्यात आले तर काही छोटी मुले पोलिश भाषेत “हॅलो” म्हणत धावत आली.
अशाप्रकारचे हे उत्साही व आनंदी अभिवादन कित्येक आठवड्यांच्या परिश्रमाचा कळस ठरले. पोलिश अधिकाऱ्यांनी अधिवेशन भरविण्याची परवानगी दिल्यावर त्यांच्या तयारीसाठी प्रयत्नांचा पूर सुरु झाला.
अधिवेशनाआधीची कामे
हजारो प्रतिनिधींसाठी राहण्याच्या जागेची व्यवस्था करायची होती. केवळ वरसॉ येथे ११,००० राहण्याच्या जागेविषयीचे विनंति अर्ज आले होते. याशिवाय अधिवेशने घेण्यासाठी मोठी स्टेडियम शोधणे होते. त्याप्रमाणे ती मिळाली. वरसॉ आणि रोक्लॉ येथे ऑगस्ट १६-१८ तर पोझनन व कॅटोवाइस् (चोरझो) ऑगस्ट २३-२५ साठी स्टेडियम मिळाले. तथापि, स्टेडियम शोधणे हा कामाचा नुसता एक भाग होता. स्टेडियमची जागा अधिवेशनास उपयुक्त करण्यासाठी साक्षीदारांनी जे परिश्रम घेतले त्याविषयी वर्तमानपत्रात चांगली प्रसिध्दी मिळाली. एका अहवालाने म्हटलेः
“(चोरझो, कॅटोवाइस् विभागात असणाऱ्या) स्लॅस्की स्टेडियमवर तयारी व दुरुस्तीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी पाच आठवडे मोठ्या परिश्रमाने काम केले. स्टेडियममधून व त्याच्या परिसरातून कित्येक टन कचरा ट्रकने बाहेर हलविण्यात आला तर याच्या दुपटीने तो तेथेच जाळण्यात आला. वाढलेले गवत छाटण्यात आले व स्टेडियमभोवती हिरवळीचे आच्छादन पसरविले गेले. तळघरात कचरा भरला होता तो काढून टाकण्यात आला. ३५ किलोमीटरच्या बैठकीच्या रांगा दुरुस्त करण्यात आल्या व त्या पाण्याने धुतल्या गेल्या. ७८,००० बैठका रंगविल्या गेल्या. . . . सात स्वच्छतागृहे मोडकळलेल्या स्थितीत होती, खिडक्यांच्या काचा तुटल्या होत्या, दारेही मोडली होती. नळकोंडाळी शुष्क झाली होती, आणि मोऱ्या तुंबल्या होत्या. . . . असे म्हणता येईल की स्लास्की स्टेडियमच्या व्यवस्थापनाला यहोवाचे साक्षीदार स्वर्गातून आलेले वरदानच ठरले कारण याच स्टेडियमवर सप्टेंबर महिन्यात पोलंड विरुध्द बेल्जियम यात फुटबॉलचा सामना होणार होता.”
खरे म्हणजे या सर्व कामाची काळजी १०,५०० साक्षीदार स्वयंसेवकांनी घेतली. त्यांनी कठडे व कुंपण देखील रंगविले, सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ करुन त्यांना रंग दिला आणि १३२ मुताऱ्या बांधल्या. यामुळे रांग लावायचीही गरज राहिली नाही, स्त्रियांसाठी सुध्दा! कॅटोवाइस् येथे हेच काम झाले त्याविषयी वर्तमानपत्रातील अहवालाने म्हटलेः “या सर्व कामाला १ कोटी २० लाख झ्लोट्स् [८०,००० अमेरिकन डॉलर्स] इतका खर्च आला असता असा अंदाज करण्यात आला.” अशाच प्रकारची दुरुस्तीची कामे इतर तीन स्टेडियमवरही झाली.
पाहणारे स्तंभित झाले
साक्षीदारांविषयी पुष्कळ निरिक्षकांनी आपले अभिप्राय दिले. एका सरकारी अधिकाऱ्याने म्हटलेः “तुम्ही तर मोठ्या संघटितपणे हे काम उरकले. हे करायचे शिक्षण तुम्हाला कोठून मिळाले?” एका स्टेडियमच्या व्यवस्थापकाने म्हटलेः “मी येथे आता २५ वर्षे काम करतोय पण अशा प्रकारातील सुव्यवस्था मी कधीही पाहिली नाही.” दुसऱ्या एका स्टेडियमच्या व्यवस्थापकांनी म्हटलेः “तुम्ही लोक इतके जीव लावून काम का करता? आम्हाला अशाच प्रकारचे कर्मचारी हवेत!” तसेच आणखी एका स्टेडियमवर तेथील व्यवस्थापकांनी म्हटलेः “हे स्टेडियम सुव्यवस्थित होईल असे मला वाटलेच नव्हते, पण तुम्ही ते करुन दाखविले आहे.” एका स्तंभित झालेल्या निरिक्षकाने म्हटलेः “काहीतरी विलक्षण गोष्टीमुळे तुम्हाला ही चालना मिळत आहे!”
वरसॉ स्टेडियमवरील अधिवेशन संपल्यावर प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास गेलेल्या एका युवकांच्या गटास यात्रा मार्गदर्शक म्हणालाः “आज बऱ्याच काळापासून हे स्टेडियम उपेक्षिलेले व घाण स्थितीत होते. आता अलिकडेच यहोवाच्या साक्षीदारांनी ते आपल्या धार्मिक अधिवेशनासाठी भाड्याने घेतले होते. पण पहा त्यांनी याचा कसा कायापालट केला! आता सगळेच बदलल्यासारखे दिसते. ते स्वेच्छेने काम करतात, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ ते मोफत काम करतात!”
जगभरात एकच कार्यक्रम
अधिवेशनाचा कार्यक्रम जगभरात जसा प्रदर्शित झाला तसाच येथेही प्रसारीत करण्यात आला. मात्र येथील अधिवेशने साडेतीन दिवसांच्या ऐवजी अडीच दिवसांची होती म्हणून काही कार्यक्रम संक्षिप्त करण्यात आला. येथील चार अधिवेशनात यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातील चार सदस्यांची—ए. डी. श्रोडर, एम. जी. हेन्श्चेल, टी. जॅराक्स् आणि डी. सिडलिक यांची भाषणे झाली. त्यांची भाषणे पोलिश भाषेत अनुवादित झाली. विविध देशातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या शुभेच्छा व संदेश कळविला, जो इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि स्विडीश भाषेतून पोलिश भाषेत अनुवादित झाला. याचा सर्वांना खूप आनंद वाटला.
डेन्मार्कमधून आलेल्या एका प्रतिनिधीने म्हटले की पोलिश भाषेत भाषणे देणारे वक्ते किती कुशल आहेत आणि त्याने इयोबाच्या नाटकाचा खास उल्लेख केलाः “आम्हाला भाषा कळली नाही तरी इयोबाच्या नाटकाने आम्हावर खूपच प्रभाव पाडला. ते फारच सुंदर रितीने सादर करण्यात आले. आम्हाला पात्रांची हालचाल कळत होती त्यामुळे काय चालले आहे ते कळू शकले, केवळ इयोबाच्या तीन ‘मित्रा’तील चर्चा भाषेमुळे समजली नाही. तथापि, आम्ही नाटकात सादर करण्यात आलेल्या वातावरणाशी व भावनेशी पूर्णपणे समग्र होऊ शकलो. इयोब हा खराच आजारी आहे, तो त्रासलेला व यातना भोगीत आहे हे आम्ही पाहू व ऐकू शकलो व शिवाय त्याचे तीन तथाकथित मित्र केवढे त्रासदायक होते हे पाहू शकलो. स्टेडियमवरील कित्येकांना आपले अश्रु आवरता आले नाहीत.”
प्रत्येक अधिवेशनात ठिकठिकाणाहून आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांचे शुभेच्छा संदेश वाचले गेले आणि त्याला टाळ्यांच्या मोठ्या कडकडाटीचा प्रतिसाद मिळाला.
प्रेक्षणीय स्थळे
इतर देशातून आलेल्या प्रतिनिधींनी पोलंडमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची संधी साधून घेतली. काहींनी वरसॉ येथील फ्रेड्रिक चॉपीन व मारी क्युरी यांच्या जन्मस्थळाला भेटी दिल्या. इतरांनी झाकोपेन या प्रवासी शहराला भेट देऊन पहाडी झोपड्या, बाजार पाहिला आणि खुर्चीत बसून एका डोंगरापासून दुसऱ्या डोंगरापर्यंतचा प्रवास अवकाशातून केला. या शहराकडे रस्त्याने येताना प्रतिनिधींनी पोलंडच्या गावातील बहरलेली कुरणे व त्यात काम करीत असणारी कुटुंबे—तरुण, वृध्द, पुरुष, स्त्रिया—सर्वांना पाहिले.
ओस्वेसिम (ऑस्वीच) येथे नाझीच्या काळी असणारी राजकीय बंद्यांची छावणी हे एक प्रेक्षणीय ठिकाण होते. साक्षीदारांच्या एका गटाला ऑस्वीचचा पूर्वीचा सोबती जोसेफ मार्गदर्शन करीत होता. साधारणपणे हा मोठा धक्कादायक व खिन्नतादायक पाहणी फेरा ठरला. आत कित्येक कोठड्या होत्या ज्याच्या भींतींना विरुध्द दिशेला उभे राहण्यास सांगून कित्येक कैद्यांना गोळ्या झाडण्यात आल्या, अग्निदहनाची स्थळे होती, कित्येक फोटो होते—हे सर्व बघून असे खरेच घडले असावे का हा प्रश्न मनाला सतत भेडसावत राहतो. त्यात काही संशय असावा अशी आशंका नसली तरी त्यामागील भीतीग्रस्तता अंगावर शहारे उभे करते. कैदी कोणकोणत्या प्रकारात मोडत हे दाखविण्यासाठी विविध रंगाचे त्रिकोण होते—यातला एक प्रकार धार्मिक कारणासोबत संबंधित होता. पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना (यहोवाचे साक्षीदार) फिकट जांभळ्या रंगाचा त्रिकोण घालण्यासाठी देत असत.
तरीपण जोसेफ जे मार्गदर्शन देत होता त्यामुळे ही पाहणी उभारणीकारक अनुभव ठरला. त्याने एक गोष्ट सांगितली. तो राजकारणात होता पण त्याचे आई व वडील साक्षीदार बनले. जेव्हा त्याचे वडील वारले आणि साक्षीदारांकरवी मयतविधि करण्यात आला तेव्हा साक्षीदारांतील प्रेम बघून जोसेफ खूपच भारावला. त्याने आपली राजकीय उलाढाल सोडून दिली पण तो साक्षीदार झाला नाही. काही काळातच जोसेफ, त्याची आई आणि बहीण यांना ऑस्वीच येथे पाठविण्यात आले. त्याच्या आईला अग्निदहन स्थळी पाठविण्यात आले, बहीण ढासळत्या प्रकृतीनेच त्या छावणीबाहेर पडली. त्याला मात्र जर्मनी येथील छावणीत पाठविण्यात आले. येथे एक साक्षीदार त्याला भेटला व या उभयतांची बोलणी झाली. येथे तो यहोवाचा साक्षीदार बनला. खरे म्हणजे तो कुविख्यात मृत्युच्या रांगेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये एक होता. (याविषयीची सविस्तर माहिती “राजकीय बंद्यांच्या छावणीत सचोटी जिवंत राहते” या वॉचटावर च्या सप्टेंबर १, १९४५ च्या अंकातील लेखात दिलेली आहे.)
ऑस्वीच येथील फेरीत जोसेफने तो ज्या खोलीत कैदेत होता, त्याची आई कोठे होती त्या खोल्या व आईला कोठे जिवंत दहन करण्यात आले ती खोली दाखवली. पण त्याने राखलेली प्रवृत्ती वाखाणण्याजोगी होती. त्यात कटुत्व नव्हते. याच स्थळी देवास राखलेल्या सचोटीचा विजय झाला होता. येथेच कित्येक साक्षीदार यहोवास विश्वासू राहून मृत्युवश झाले. जोसेफसोबत ही पाहणी करताना कठीण क्षेत्रात आवेशी साक्षीदारासोबत आहोत असे वाटत होते. याचवेळी गटातील एका साक्षीदाराने एका महिला विक्रेत्याकडून प्रेक्षणीय स्थळाची पोस्टकार्डे विकत आणली. जोसेफने विचारलेः “त्या स्त्रीला तुम्ही साक्षीकार्य केले का?” “नाही.” लगेच तो तेथे गेला व त्याने तिला साक्ष देण्यास सुरुवात केली. खरेच, ऑस्वीच येथील राजकीय बंद्यांच्या छावणीला भेट देऊन तेथे घडलेल्या क्रुर हिंसाचाराची माहिती मिळविताना मोठे दुःख वाटले तरीपण ही पाहणी जोसेफसोबत केल्यामुळे ती यात्रा मोठी प्रेरणादायक ठरली.
कृतज्ञता व्यक्त करण्यात आली
पोलंडमध्ये अशी अधिवेशने भरविण्यात यहोवाच्या साक्षीदारांना मोठी धन्यता वाटली. पोलंडचा अधिकारी वर्ग आणि स्टेडियमचे व्यवस्थापन यांनी संमेलन प्रतिनिधींना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले. यामुळेच तो प्रसंग यशस्वीपणे व आनंदाने पार पडला. याशिवाय अधिवेशनाच्या प्रत्येक शहरी मोठ्या वर्तमानपत्रांनी चांगला अहवाल दिला आणि रेडिओ व टेलिव्हिजनद्वारे देखील चांगले प्रसारण झाले.
पण, अधिवेशनाहून परतलेल्या प्रतिनिधींनी आपणासोबत नेलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पोलिश बांधवांनी त्यांच्यासंबंधी जो पाहुणचार व्यक्त केला त्याची उबदार भावना. त्यांची आनंदी वृत्ति व उत्साह यांनी अधिवेशनावर वर्चस्व केले. त्यांनी आपले जेवण भेट देणाऱ्या प्रतिनिधींसोबत एकत्र केले, यांना आपल्या घरी बोलावून त्यांचा पाहुणचारही केला. त्यांचे उबदार स्मितहास्य आणि स्नेहपूर्णतेने दिलेला निरोप इतर देशातून आलेल्या प्रतिनिधींच्या स्मरणात दिर्घकाळ राहील.
पोलिश साक्षीदारांना आपल्या बांधवांविषयी ज्या प्रेमळ भावना वाटत होत्या त्या कॅटोवाइस् आणि वरसॉ येथील अधिवेशनाच्या समाप्तीच्या भाषणानंतर जे काव्य वाचून दाखविण्यात आले त्यातून ओसंडत असल्याच्या दिसल्या. हे काव्य इंग्रजी व जर्मन भाषेत अनुवादित करण्यात आले व त्याला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
जगातील १६ राष्ट्रातून आलेल्या आमच्या प्रेमळ बंधु भगिनींनो!
आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही कित्येक अडचणींना तोंड दिले व खूप त्याग दाखविला. केवळ खरे मित्रच असे करू शकतात.
तुम्हातील बहुतेकांना येथील भाषा कळाली नाही तरीही अधिवेशनाच्या आत्म्याने तुम्ही नक्की भारावून गेला आहात ही खात्री आम्हाला वाटते.
आम्ही आमचा थोर देव यहोवा याच्या उपासनेत आणि त्याच्या तसेच एकमेकांवरील प्रेमात ऐक्याने आहोत.
आपण सर्वजण एकाच प्रकारचा संदेश देत आहोत व तो आहे राज्याची ही सुवार्ता. कृपया आमच्या तेथील इतर बांधवांना कळवा की जगातील सर्व बंधुवर्गावर आमची प्रीती आहे आणि शेवटपर्यंत यहोवा देवास आपली सचोटी टिकविण्याचा आमचा निर्धार आहे.
समारोपाच्या भाषणात वक्त्याने सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या देशातील आमच्या बांधवांना आमचे प्रेम जरुर कळवाल याचा आम्हाला आनंद वाटतो.
आम्ही जागतिक बंधुवर्गात तुम्हासोबत सचोटी राखण्यात ऐक्याने आहोत याची आम्हाला कृतज्ञता व धन्यता वाटते.
आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
रविवारी, सप्टेंबर २९ रोजी एका पोलिश राष्ट्रीय रेडिओने अधिवेशनाचा कार्यक्रम विदित करणारा ३० मिनिटांचा कार्यक्रम प्रसारीत केला व त्यात “यहोवाचे सैन्य पहा” हे मोठ्या उत्स्फुर्ततेने गायिलेले गीतही समाविष्ट करण्यात आले होते. पोलंडमध्ये झालेल्या या अधिवेशन मालिकेने, उत्पत्ती १८:१४ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे जोरदार उत्तर दिलेः “यहोवाला काही असाध्य आहे काय?” (g86 1/22)
[पानांवरील चौकट]
वरसॉ अधिवेशन, ऑगस्ट १६-१८
उपस्थितांचा उच्चांक २७,२७१
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या ८७९
रोक्लॉ अधिवेशन, ऑगस्ट १६-१८
उपस्थितांचा उच्चांक १६,००३
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या ५४५
पोझनन अधिवेशन, ऑगस्ट २३-२५
उपस्थितांचा उच्चांक १९,३०५
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या ७१५
कॅटोवाइस् अधिवेशन, ऑगस्ट २३-२५
उपस्थितांचा उच्चांक ३१,५५५
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या १,००१
चार अधिवेशनांची एकूण बेरीज
उपस्थितांचा उच्चांक ९४,१३४
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या ३,१४०
[पानांवरील चौकट]
आम्ही विसरणारच नाही
आमच्या अनेक देशातील बंधुभगिनींनो,
तुमची ही पोलंडची भेट आम्ही विसरो असे कधीही न घडो
ओतप्रोत वाहणारे मुबलक यहोवाचे मेज
व तेथे असणारे आमुच्या आनंदी लोकांचे ऐक्य
आम्ही विसरणारच नाही.
भाषेचे अडखळण होते जरी
प्रेमबंधनाने म्हटले तरी
“आमुची आहे तुम्हावर प्रीती खरी.”
ती आम्ही विसरणारच नाही.
नवीन जगातील एके दिनी
आम्हास आठवेल साश्रुपूर्ण नयनी
किती प्रेममय घडला आपुला सहवास आधी
होय बांधवहो, तो आम्ही विसरणारच नाही.
—एका पोलिश साक्षीदाराने रचलेले.
[पानांवरील चित्र]
पोझनन येथे स्टेडियमची जमीन स्वच्छ करणे
[पानांवरील चित्रं]
१९८५ च्या वरसॉ येथील अधिवेशनाच्या स्थळाचा विस्तृत देखावा
वरसॉ अधिवेशनातील बाप्तिस्मा विधि
[पानांवरील चित्रं]
अधिवेशनाला उपस्थित राहिलेले काही जपानी व इतर प्रतिनिधि
पोलंडमधील पोझनन येथील के एस वार्टा स्टेडियमवर अल्बर्ट श्रोडर १८,२०० च्या उपस्थितांमध्ये भाषण देत आहेत