वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१ पृ. १५-२०
  • आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणारे तरुण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणारे तरुण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • तुमच्या नजरेत देव किती वास्तविक आहे?
  • स्मरणे याचा अर्थ
  • उद्देशपूर्ण शिक्षण
  • पैशांचे डोळसपणे संयोजन का करावे?
  • अनुकरणीय तरुण
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१ पृ. १५-२०

आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणारे तरुण

“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उपदेशक १२:१.

१. एका ११ वर्षीय मुलाचे कोणते उद्‌गार दाखवतात की आपला निर्माणकर्ता त्याच्या नजरेत वास्तविक आहे?

तरुण मुले, यहोवा देवास एक वास्तविक व्यक्‍ती म्हणून पाहतात, त्याचा आदर करतात व त्यास हर्षवू इच्छितात असे जेव्हा आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून दाखवून देतात तेव्हा ते केवढे प्रशंसनीय असते! ११ वर्षांचा एक मुलगा म्हणतो: “मी एकटा असतो तेव्हा खिडकीतून डोकावून, यहोवाची निर्मिती किती अद्‌भुत आहे ते पाहतो. मग, भविष्यातलं परादीस किती सुंदर असेल, आणि तेव्हा मी प्राण्यांना कसा स्पर्श करू शकेन याची कल्पना करतो.” (यशया ११:६-९) तो पुढे म्हणतो: “मी एकटा असतो तेव्हा, यहोवाला प्रार्थना करतो. मला चांगलं ठाऊक आहे, की त्याच्याशी सारखं बोलत राहिल्यामुळे तो माझ्यावर अजिबात रागावणार नाही. मला ठाऊक आहे, तो सतत मला पाहात असतो.” आपला निर्माणकर्ता या मुलाच्या नजरेत जितका वास्तविक आहे, तितकाच तुमच्याही नजरेत आहे का?

तुमच्या नजरेत देव किती वास्तविक आहे?

२. (अ) तुमचा निर्माणकर्ता तुमच्या नजरेत कशाप्रकारे वास्तविक बनू शकतो? (ब) देव एक वास्तविक व्यक्‍ती आहे हे समजून घेण्यास मुलांना मदत करण्यात पालक कोणती भूमिका पार पाडू शकतात?

२ यहोवा व त्याची अभिवचने तुमच्या नजरेत वास्तविक असावीत म्हणून पहिल्यांदा तुम्ही त्याच्याबद्दल आणि बायबलमध्ये वर्णन केलेल्या नीतिमान नवीन जगात तो तुम्हाला जे अद्‌भुत भवितव्य देऊ करतो त्याबद्दल शिकून घेतले पाहिजे. (प्रकटीकरण २१:३, ४) या गोष्टींबद्दल तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवले असल्यास यासाठी तुम्ही त्यांचे उपकार मानले पाहिजेत, कारण यामुळे “आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,” या प्रेरित आज्ञेचे पालन करणे तुम्हाला शक्य होते. (तिरपे वळण आमचे.) (उपदेशक १२:१) एका युवतीने, तिच्या पालकांनी तिला अगदी लहानपणापासून लावलेल्या वळणाविषयी म्हटले: “जीवनातली अशी एकही गोष्ट नव्हती ज्यात यहोवा गोवलेला नव्हता. माझ्या निर्माणकर्त्याला स्मरण्याची माझ्याबाबतीत तरी हीच गुरुकिल्ली होती.” दुसऱ्‍या एक तरुणीने सांगितले: “यहोवा एक वास्तविक व्यक्‍ती आहे हे शिकवल्याबद्दल मी माझ्या आईवडिलांचे आजन्म उपकार मानेल. त्यांनी मला त्याच्यावर प्रेम करण्यास शिकवलं आणि त्याची पूर्ण वेळ सेवा केल्याने केवढा आनंद लाभतो हेही मला सांगितलं.”

३, ४. यहोवाविषयी एक वास्तविक व्यक्‍ती म्हणून विचार करण्यास तुम्हाला कशाची मदत मिळू शकते?

३ तथापि, देव एक वास्तविक व्यक्‍ती असून त्याला आपल्याविषयी स्वारस्य आहे हा विचार ग्रहण करण्यास काहींना थोडे जड जाते. तुम्हाला देखील जड जाते का? टेहळणी बुरूज मध्ये, “शरीरमानाने यहोवा देव किती मोठा आहे, हे आपल्याला माहीत नाही,” हे विधान वाचल्यावर एका युवकाला देवाविषयी तो एक व्यक्‍ती आहे अशा दृष्टिकोनातून विचार करण्यास मदत मिळाली. अर्थात, देवाचे मोठेपण त्याच्या आकारमानात नव्हे तर त्या टेहळणी बुरूज ने पुढील वाक्यातच स्पष्ट केले त्याप्रमाणे: “त्याची खरी थोरवी, तो कशा व्यक्‍तिमत्त्वाचा देव आहे यात दडलेली आहे,” अर्थात तो एक विश्‍वासू, कनवाळू, प्रेमळ व क्षमाशील देव आहे.a (निर्गम ३४:६; अनुवाद ३२:४; स्तोत्र ८६:५; याकोब ५:११) तुम्ही यहोवाला अशा प्रकारची व्यक्‍ती अर्थात ज्याच्यासोबत तुम्ही एक अनमोल नातेसंबंध ठेवू शकता असा एक जिवाभावाचा मित्र म्हणून पाहू लागला आहात का?—यशया ४१:८; याकोब २:२३.

४ येशूने आपल्या आरंभीच्या अनुयायांना देवासोबत एका व्यक्‍तिगत नातेसंबंधाचा आनंद उपभोगण्यास साहाय्य केले. यामुळे, प्रेषित योहानाने तो अपेक्षित असलेल्या स्वर्गीय जीवनाविषयी लिहिले तेव्हा तो म्हणाला: “आपण [देवासारखे] होऊ . . . कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.” (१ योहान ३:२; १ करिंथकर १५:४४) आजच्या काळातील तरुणांनाही देवाला एक वास्तविक व्यक्‍ती म्हणून पाहण्यास साहाय्य करता येईल, एक अशी व्यक्‍ती जिला प्रत्यक्ष पाहता येत नसले तरी तिला उत्तमरित्या ओळखता येणे शक्य आहे. एक तरुण म्हणाला: “माझ्या आईवडिलांनी अनेक प्रश्‍न विचारण्याद्वारे यहोवाला स्मरण्यास मला साहाय्य केलं, उदाहरणार्थ, ‘यहोवानं याविषयी काय म्हटलं असतं? ते तू स्वतःच्या शब्दांत सांगू शकतोस का? मग, याचा काय अर्थ होतो?’” अशा प्रकारचे प्रश्‍न आपल्याला देवासोबतच्या आपल्या व्यक्‍तिगत नातेसंबंधाविषयी विचार करण्यास भाग पाडत नाहीत का?

स्मरणे याचा अर्थ

५. एखाद्याला स्मरण्यात त्याचे नाव आठवण्यापेक्षा अधिक काही गोवलेले आहे, हे बायबलच्या कोणत्या उदाहरणांवरून स्पष्ट होते?

५ “आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,” या आदेशाचे पालन करण्यात यहोवाविषयी केवळ विचार करण्यापेक्षा अधिक काही गोवलेले आहे. त्यात कृती, अर्थात त्याला हर्षविणाऱ्‍या गोष्टी करणे समाविष्ट आहे. “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा” [स्मरण करा] (तिरपे वळण आमचे.) असे एका गुन्हेगाराने येशूला विनवले, तेव्हा येशूने केवळ त्याचे नाव लक्षात ठेवावे एवढीच त्याची इच्छा नव्हती. येशूने कृती करावी, त्याला पुनरुत्थित करावे अशी त्याची इच्छा होती. (लूक २३:४२) याच धर्तीवर, तुरुंगात असणाऱ्‍या योसेफाने फारोच्या प्यालेबरदाराला आपले स्मरण फारोला करून देण्याची विनंती केली तेव्हा त्याने त्या प्यालेबरदाराकडून काही कृती करण्याची अपेक्षा केली. शिवाय, ईयोबाने देवाला ‘माझी आठवण कर’ असे म्हणून प्रार्थना केली तेव्हा ईयोब देखील विनंती करत होता, की देवाने भविष्यात कधीतरी त्याला पुनरुत्थित करण्यासाठी कृती करावी.—ईयोब १४:१३; उत्पत्ति ४०:१४, २३.

६. ‘स्मरण’ या अर्थाच्या हिब्रू शब्दातून स्मरलेल्या वस्तूबद्दल किंवा व्यक्‍तीबद्दल स्नेहाचा अर्थ कशाप्रकारे ध्वनित होतो?

६ एक अधिकार सूत्र माहिती देते की, “आठवण” अर्थात ‘स्मरण’ असा अनुवाद केलेला इब्री शब्द सहसा, “मनातील स्नेहाचा व स्मरणासोबत घडणाऱ्‍या कृतीचा” अर्थ ध्वनित करतो. “मिसर देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण आम्हाला येते,” (तिरपे वळण आमचे.) असे अरण्यात ‘मिश्र समुदायाने,’ जे उद्‌गार काढले त्यावरून ‘स्मरण’ या शब्दातील “स्नेहाचा” ध्वनितार्थ स्पष्ट होतो. ईयोबाने ज्याप्रकारे देवाने हितावहपणे स्मरण करावे अशी प्रार्थना केली, त्याचप्रकारे हिज्कीया, नहेम्या, दावीद व एका निनावी स्तोत्रकर्त्याने देखील त्यांच्या विश्‍वासूपणाला मान्यता देऊन यहोवाने त्यांचे स्नेहाने स्मरण करावे अशी याचना केली.—गणना ११:४, ५; २ राजे २०:३; नहेम्या ५:१९; १३:३१; स्तोत्र २५:७; १०६:४.

७. आपण देवाला स्नेहाने स्मरल्यास, याचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होईल?

७ यास्तव आपण विचारू शकतो, ‘आपण आपल्या निर्माणकर्त्याचे स्नेहाने स्मरण करून त्याला दुःख व वेदना होतील असे काहीही करण्याचे टाळतो का?’ एका युवतीने असे निरिक्षिले: “यहोवाला भावना आहेत हे स्पष्टपणे समजून घेण्यास आईने मला मदत केली आणि लहान वयापासूनच मला याची जाणीव होती, की माझ्या कृत्यांचा त्याच्यावर परिणाम होतो.” (स्तोत्र ७८:४०-४२) आणखी एकीने स्पष्ट केले: “यहोवाला सैतानाने केलेल्या आव्हानास उत्तर देण्यास माझी कृत्ये एकतर हातभार लावतील किंवा त्यात बाधा आणतील हे मला चांगलं ठाऊक होतं. मला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं, यामुळेच मला मदत मिळाली व आजही मिळतेय.”—नीतिसूत्रे २७:११.

८. (अ) आपण यहोवाला स्नेहाने स्मरतो हे कोणत्या ध्येयाचा पाठलाग केल्याने दिसून येईल? (ब) तरुण सुज्ञपणे कोणकोणत्या प्रश्‍नांवर विचार करतील?

८ या दुष्ट जगात, यहोवाला हर्षविणाऱ्‍या कार्यांत पूर्णपणे सहभाग घेण्याद्वारे त्याला स्मरणे नेहमीच म्हणावे तितके सोपे नसते हे मान्य आहे. तथापि, पहिल्या शतकातील तरुण तीमथ्याच्या आणि आजच्या काळातील हजारो देवभीरू तरुणांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्हीही एक पायनियर सेवक या नात्याने पूर्ण वेळेच्या ख्रिस्ती सेवेचे ध्येय ठेवून त्याचा पाठलाग केल्यास ते केवढे उत्तम ठरेल! (प्रेषितांची कृत्ये १६:१-३; १ थेस्सलनीकाकर ३:२) तथापि, पायनियर सेवा करताना तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल का?, असा प्रश्‍न उद्‌भवेल. शिवाय पुढे तुमचे लग्न झाल्यास, तुमच्या कौटुंबिक सदस्यांचे पालनपोषण करण्यासाठी तुमच्या हातात पुरेसे हुनर असतील का? (१ तीमथ्य ५:८) हे महत्त्वपूर्ण प्रश्‍न आहेत व तुम्ही त्यांच्याविषयी गांभीर्याने विचार करणे अगत्याचे आहे.

उद्देशपूर्ण शिक्षण

९. लौकिक शिक्षणाच्या संबंधाने तरुणांना कोणता निर्णय घ्यावयाचा आहे?

९ मानवी समाज अधिकाधिक संमिश्र बनतो तसतशी, पायनियर कार्य करताना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सुयोग्य रोजगार मिळवण्याकरता कदाचित अधिक शालेय शिक्षणाची आवश्‍यकता भासेल. आजच्या काळातील नियोक्त्यांना मोलाचे वाटणारे हुनर संपादण्यासाठी विद्यापीठ स्तरावर शिक्षण घेतलेल्यांपैकी काहींना अतिरिक्‍त शिक्षण घ्यावे लागल्याचे कदाचित तुमच्या पाहण्यात आले असावे. तर मग, देवाला हर्षवू इच्छिणारी तुम्ही तरुण मुले किती शालेय शिक्षण मिळवण्याचा प्रयास कराल? “आपल्या निर्माणकर्त्याला स्मर” ही प्रेरित आज्ञा मनात बाळगूनच उचितपणे निर्णय घेण्यात यावा.

१०. कोणते शिक्षण आपल्याकरता सर्वोत्तम आहे?

१० अनेक लौकिक अधिकारी देखील ज्यास सर्वोत्तम शिक्षण असल्याची मान्यता देतात ते शिक्षण घेण्याची, अर्थात देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याद्वारे प्राप्त होणारे शिक्षण घेण्याची तुम्हाला निश्‍चितच इच्छा असेल. जर्मन लेखक योहान वॉल्फगँग वॉन गोएथ यांच्या मतानुसार: “एखाद्या लोकसमुहाचा जितका अधिक तार्किक विकास होईल, तितक्या अधिक पूर्णपणे, शिक्षणाचा आधार व साधन म्हणून बायबलचा उपयोग करणे शक्य होईल.” खरोखर, इतर कोणत्याही शिक्षणाच्या तुलनेत बायबलचा अभ्यास तुम्हाला जीवनाला सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम बनवील!—नीतिसूत्रे २:६-१७; २ तीमथ्य ३:१४-१७.

११. (अ) आपण कोणते सर्वात महत्त्वाचे कार्य करू शकतो? (ब) एका युवतीने काही प्रमाणावर शिक्षण घेण्याचे का पसंत केले?

११ देवाचे ज्ञान जीवनदायी असल्यामुळे, ते ज्ञान इतरांना देण्यापेक्षा आजच्या काळात आणखी महत्त्वाचे कार्य कोणते असू शकेल? (नीतिसूत्रे ३:१३-१८; योहान ४:३४; १७:३) तथापि, हे परिणामकारकतेने करावयाचे असल्यास तुम्ही मूलभूत बाबतीत सुशिक्षित असणे आवश्‍यक आहे. तुम्हाला स्पष्टपणे विचार करता येणे, तर्कशुद्धपणे बोलता येणे तसेच उत्तमरित्या लिहिता वाचता येणे आवश्‍यक आहे; ही अशी कौशल्ये आहेत जी शाळेत शिकवली जातात. यास्तव, तुमच्या शाळेतील अभ्यासक्रमांकडे गंभीर लक्ष पुरवा; फ्लोरिडा, अमेरिका येथे उच्च माध्यमिक शाळेतून विशेष प्राविण्य पदवी मिळवून उत्तीर्ण झालेल्या ट्रेसी नामक युवतीने असेच केले. ती आपली आशा व्यक्‍त करताना म्हणाली: “माझा देव यहोवा याची पूर्ण वेळेची सेविका व्हावं हेच नेहमी माझं ध्येय होतं आणि आजही आहे व माझ्या शिक्षणामुळे हे ध्येय गाठण्यास मला मदत मिळेल अशी मी आशा करते.”

१२. अतिरिक्‍त लौकिक शिक्षण घेण्याचे निवडल्यास, त्यामुळे कोणता हेतू साध्य करण्यास मदत मिळेल?

१२ तुम्ही शाळेला का जाता याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्यामुळे तुम्ही यहोवाचे प्रभावी सेवक बनण्यास सक्षम व्हावे, हे त्याचे मूळ कारण आहे का? असल्यास, तुमचे शिक्षण हा हेतू कितपत साध्य करतो याकडे तुम्हाला गंभीर लक्ष पुरवावे लागेल. तुमच्या पालकांशी विचारविनिमय केल्यावर, कायद्याने आवश्‍यक ठरवलेल्या किमान शालेय शिक्षणापलीकडे तुम्ही आणखी शिक्षण घ्यावे असा निर्णय घेता येईल. असे अतिरिक्‍त शिक्षण तुम्हाला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि शिवाय तुमच्याजवळ राज्याच्या कार्यात पूर्ण सहभाग घेण्याकरता वेळ व शक्‍ती शिल्लक राहील या दृष्टीने तुम्हाला सहायक ठरेल.—मत्तय ६:३३.

१३. पूरक शिक्षण घेतलेल्या दोन रशियन ख्रिश्‍चनांनी आपल्या जीवनातील उद्देश कशाप्रकारे प्रदर्शित केला आहे?

१३ पूरक शिक्षण मिळवण्याचा प्रयास करीत असलेले काहीजण पुढील शिक्षण घेत असतानाही पूर्ण वेळेच्या सेवेत सहभागी होतात. मॉस्को, रशिया येथील दोन किशोरवयीन मुली, नादिया व मर्यीना यांचेच पाहा. दोघींचा १९९४ साली एप्रिलमध्ये बाप्तिस्मा झाला व त्या सहायक पायनियर सेविका म्हणून कार्य करू लागल्या. यानंतर काही काळातच त्या उच्च माध्यमिक शाळेतून उत्तीर्ण झाल्या आणि त्यांनी दोन वर्षांच्या एका लेखाशास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मे १९९५ पासून त्यांनी नियमित पायनियर म्हणून कार्य सुरू केले, मात्र त्यांनी आपल्या लेखाशास्त्राच्या शिकवण्यांमध्ये ‘ए’ ग्रेडचा दर्जा कायम राखला. शिवाय, शाळा करत असतानाही त्या दोघींना मिळून दर आठवड्याला साधारण १४ बायबल अभ्यास चालवणेही शक्य झाले. या मुलींना आशा आहे, की त्यांच्या लेखाशास्त्राच्या शिक्षणामुळे त्यांना पुरेसा रोजगार मिळण्यास मदत मिळेल जेणेकरून त्या पूर्ण वेळेची सेवा करताना स्वतःचा उदरनिर्वाह चालवू शकतील.

१४. आपण कितीही लौकिक शिक्षण घेतले तरीसुद्धा, आपल्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट कोणती असावयास हवी?

१४ कायद्याने आवश्‍यक ठरवलेल्या शिक्षणापलीकडे तुम्ही अतिरिक्‍त लौकिक शिक्षण घेण्याचे ठरवल्यास, असे करण्यामागचा तुमचा हेतू सुज्ञपणे पडताळून पाहा. तुम्ही नावलौकिक आणि भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी ते घेत आहात का? (यिर्मया ४५:५; १ तीमथ्य ६:१७) की उलटपक्षी यहोवाच्या सेवेत अधिक पूर्णपणे सहभाग घेण्यासाठी पूरक शिक्षणाचा उपयोग करावा हे तुमचे ध्येय आहे? लिडिया नामक एका युवतीने अतिरिक्‍त शिक्षण घेण्याचे निवडले; आध्यात्मिक बाबींवर एक निसंदिग्ध दृष्टिकोन व्यक्‍त करीत तिने स्पष्ट केले की, “इतरजण उच्च शिक्षण घेण्याचं ठरवतात, भौतिकवादाला बळी पडतात आणि देवाला पार विसरून जातात. माझ्या स्वतःबद्दल विचाराल तर, देवासोबत माझं नातं माझ्यासाठी आणखी कशाहीपेक्षा अधिक मोलाचं आहे.” ही कौतुकास्पद मनोवृत्ती आपल्या सर्वांसाठी खरोखर किती अनुकरणीय आहे!

१५. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांमध्ये कोणकोणत्या वैविध्यपूर्ण शैक्षणिक पार्श्‍वभूमी होत्या?

१५ उल्लेखनीय बाब म्हणजे, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या अतिशय वैविध्यपूर्ण शैक्षणिक पार्श्‍वभूमी होत्या. पेत्र व योहान या प्रेषितांना “निरक्षर व अज्ञानी” समजले जात असे, कारण त्यांना रब्बींच्या शाळांमधून प्रशिक्षण मिळालेले नव्हते. (प्रेषितांची कृत्ये ४:१३) उलटपक्षी, प्रेषित पौलाला मिळालेल्या शिक्षणाची आजच्या विद्यापीठ शिक्षणाशी तुलना करता येईल. तरीसुद्धा, पौलाने स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्यासाठी या शिक्षणाचा उपयोग केला नाही; उलट समाजातील वेगवेगळ्या थरांतील लोकांना प्रचार करत असताना त्याचे शिक्षण त्याला उपयुक्‍त ठरले. (प्रेषितांची कृत्ये २२:३; १ करिंथकर ९:१९-२३; फिलिप्पैकर १:७) तसेच, “मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला [शिकला, NW] होता” तो मनाएन, ॲन्टियोक मंडळीत नेतृत्त्व करणाऱ्‍यांपैकी एक होता.—प्रेषितांची कृत्ये १३:१.

पैशांचे डोळसपणे संयोजन का करावे?

१६. (अ) आपण कर्जात बुडालेलो असल्यास आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणे आपल्याला जड का जाऊ शकते? (ब) खर्च करण्यापूर्वी विचार करण्याच्या महत्त्वावर येशूचा एक दाखला कशाप्रकारे भर देतो?

१६ तुम्ही तुमच्या पैशांचे डोळसपणे संयोजन न केल्यास, तुमच्या निर्माणकर्त्याला हर्षविणारी कार्ये करण्याद्वारे त्याला स्मरणे कदाचित तुम्हाला अतिशय जड जाईल. कारण कर्जात बुडाल्यास, तुम्ही आणखी एका धन्याचे दास झाला आहात असे म्हणता येईल. बायबल स्पष्ट करते की, “ऋणको धनकोचा दास होतो.” (नीतिसूत्रे २२:७) खर्च करण्यापूर्वी विचार करण्याच्या महत्त्वावर येशूचा एक दाखला भर देतो. येशूने म्हटले, ‘तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर, कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करतील.’—लूक १४:२८, २९.

१७. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे सहसा जड का जाते?

१७ यास्तव डोळसपणे, “एकमेकांवर प्रीती करणे ह्‍याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका,” या शास्त्रवचनीय तत्त्वाच्या एकवाक्यतेत जगण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. (रोमकर १३:८) पण हे म्हणावे तितके सोपे नाही; विशेषतः जाहिरातदार, खरोखरच आवश्‍यक असल्याचे भासवतात अशा नवनवीन उत्पादनांचा आपल्यावर सतत भडिमार होत असताना असे करणे जड जाते. एक पिता, ज्यांनी आपल्या मुलांना दक्षता बाळगण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला आहे ते सांगतात की, “गरज म्हणजे काय आणि इच्छा म्हणजे काय यावर आम्ही अनेक वेळा चर्चा केलीय.” अशा बाबतीत शिक्षण देण्यात शाळा सहसा अपेशी ठरल्या आहेत; त्या जबाबदारीने पैसा हाताळण्याविषयी क्वचितच मार्गदर्शन देतात. एका समाज सेविकेच्या निरीक्षणानुसार, “आपण उच्च माध्यमिक शाळेतून उत्तीर्ण होतो तेव्हा समद्विभुज त्रिकोणाविषयी आपल्याला ज्ञान असते पण बचत करण्याविषयी मात्र फारशी माहिती आपल्याला नसते.” अशा परिस्थितीत, डोळसपणे पैसा खर्च करण्यास तुम्हाला कशामुळे मदत मिळू शकते?

१८. पैशांच्या डोळस संयोजनासाठी कोणती गुरुकिल्ली आहे व का?

१८ “आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,” या उपदेशाचे पालन करणेच मुळात पैशांच्या डोळस संयोजनाची गुरुकिल्ली आहे. कारण, तुम्ही हा आदेश पाळता तेव्हा यहोवाला हर्षविणे हे तुमचे सर्वप्रथम ध्येय बनते आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्नेहामुळे तुम्ही तुमचा पैसा कशाप्रकारे खर्च करता यावर परिणाम होतो. तदनुषंगाने, देवाला मनःपूर्वक उपासना देण्यात तुम्ही आपल्या वैयक्‍तिक इच्छांना ढवळाढवळ करू देणार नाही. (मत्तय १६:२४-२६) तुम्ही तुमचा डोळा, “निर्दोष,” अर्थात देवाच्या राज्यावर व त्याची इच्छा पूर्ण करण्यावर पूर्णपणे केंद्रित ठेवाल. (मत्तय ६:२२-२४) असे केल्यामुळे, ‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करण्याच्या’ ईश्‍वरी आज्ञेकडे तुम्ही एक आनंददायी सुहक्क असल्याच्या दृष्टिकोनातून पाहू लागाल.—नीतिसूत्रे ३:९.

अनुकरणीय तरुण

१९. गतकाळातील तरुणांनी आपल्या निर्माणकर्त्याला कशाप्रकारे स्मरले आहे?

१९ गतकाळात व आजही अनेक तरुणांनी आपल्या निर्माणकर्त्याला स्मरले, ही आनंदाची बाब आहे. लहानगा शमुवेल आपल्या सहसेवकांच्या अनैतिक प्रभावाला बळी न पडता प्रार्थनामंडपाच्या सेवेत अढळ राहिला. (१ शमुवेल २:१२-२६) पोटिफराची बायको एक भुरळ घालणारी लावण्यवती असूनही, ती योसेफास आपल्या मोहजाळात अडकवून जारकर्म करावयास भाग पाडण्यात यशस्वी झाली नाही. (उत्पत्ति ३९:१-१२) यिर्मया “केवळ बाळ” असला तरीसुद्धा, त्याने भयंकर विरोध असतानाही धैर्याने प्रचार केला. (यिर्मया १:६-८) एका लहानशा इस्राएली मुलीने निर्भयपणे एका सामर्थ्यवान अरामी सेनापतीला इस्राएलात जाऊन मदत घेण्यास प्रवृत्त केले, जेथे त्याला यहोवाविषयी शिकावयास मिळाले. (२ राजे ५:१-४) तरुण दानीएल व त्याच्या सोबत्यांनी, देवाच्या आहारविषयक नियमांच्या संबंधाने परीक्षेत पडलेले असता अतूट विश्‍वास दाखवला. शद्रख, मेशख व अबेद्‌नगो यांनी देखील एका मूर्तीपुढे दंडवत घालून देवाप्रती आपल्या निष्ठेसंबंधी हातमिळवणी करण्याऐवजी एका धगधगीत अग्नीच्या भट्टीत फेकले जाणे अधिक पसंत केले.—दानीएल १:८, १७; ३:१६-१८; निर्गम २०:५.

२०. आज अनेक तरुणांनी आपल्या निर्माणकर्त्याला कशाप्रकारे स्मरले आहे?

२० आज, १९ ते २५ या वयोगटातील २,००० तरुण अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टेट येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍व मुख्यालयात सेवा करतात. ते तर सबंध जगभर आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणाऱ्‍या सहस्त्रावधी तरुण लोकांपैकी एक लहानसा भाग आहेत. प्राचीन काळातील योसेफाप्रमाणे, ते देखील आपल्या नैतिक शुद्धतेविषयी तडजोड करण्यास तयार झाले नाहीत. कोणाची सेवा करणार याविषयी निवड करण्यास भाग पाडण्यात आले तेव्हा अनेकांनी माणसांपेक्षा देवाच्या आज्ञेत राहण्याचे पसंत केले. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) पोलंड येथे १९४६ साली, १५ वर्षीय हेन्रीका झुर, हिने धार्मिक मूर्तिपूजा करण्यास नकार दिला तेव्हा तिला यातना देण्यात आल्या. तिला यातना देणाऱ्‍यांपैकी एकाने सुचविले, “तुझा विश्‍वास तुझ्याकडेच ठेव, फक्‍त कॅथलिक क्रूसाचं चिन्ह कर.” तिने यास नकार दिल्यामुळे, जंगलात फरफटत नेऊन तिला गोळी घालून ठार करण्यात आले; सार्वकालिक जीवनाच्या तिच्या दृढ आशेला मात्र धक्का लागला नाही!b

२१. कोणता आर्जव स्वीकारणे सुज्ञपणाचे ठरेल व त्याचा परिणाम काय होईल?

२१ यहोवाचे हृदय शतकानुशतके त्याला स्मरणाऱ्‍या तरुण मुलामुलींना पाहून आनंदाने केवढे भरून येत असेल! “आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,” या त्याच्या आर्जवास तुम्ही प्रतिसाद देणार का? तो निश्‍चितच स्मरण्यास योग्य आहे! त्याने तुमच्यासाठी आजवर जे केले आहे व भविष्यातही जे करील त्याविषयी दररोज मनन करा आणि त्याच्या या आर्जवाचा स्वीकार करा: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीतिसूत्रे २७:११.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज, (इंग्रजी) डिसेंबर १५, १९५३, पृष्ठ ७५०.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, १९९४ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक अहवाल पुस्तक (इंग्रजी) पृष्ठे २१७-१८ पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ देवाला एक वास्तविक व्यक्‍ती म्हणून पाहण्यास तरुणांना कशाप्रकारे मदत देता येऊ शकते?

◻ तुमच्या निर्माणकर्त्याला स्मरणे यात काय गोवलेले आहे?

◻ आपल्या शिक्षणाकरवी कोणता हेतू साध्य होण्यास हवा?

◻ आपल्या पैशांचे डोळसपणे संयोजन करणे अत्यावश्‍यक का आहे?

◻ तुम्ही अनुकरण करावे यासाठी कोणते तरुण योग्य आहेत?

[१७ पानांवरील चित्रं]

तुम्ही शाळेला का जाता याचा कधी विचार केला आहे का?

[१८ पानांवरील चित्रं]

तुम्ही पैशांचे डोळसपणे संयोजन करावयास शिकत आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा