वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१ पृ. १०-१५
  • पालकांनो, आपल्या मुलांत संतोष मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पालकांनो, आपल्या मुलांत संतोष मिळवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • यहोवाने सांगितलेल्या गोष्टींवर भर
  • बालपणापासून वळण लावणे
  • नियमित “पाणी” घालणे
  • लहान मुलांना संरक्षण देणे
  • प्रेमपूर्ण शिस्त लावणे
  • श्रमांना साजेसे प्रतिफळ
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१ पृ. १०-१५

पालकांनो, आपल्या मुलांत संतोष मिळवा

“तुझी मातापितरे आनंद पावोत.”—नीतिसूत्रे २३:२५.

१. पालकांना कशामुळे त्यांच्या मुलांत संतोष प्राप्त होऊ शकेल?

लहानशा रोपट्याची वाढ होऊन, त्याठिकाणी सुंदर देखावा व सावली देणारा एक डौलदार वृक्ष उभा होताना पाहणे केवढे आल्हाददायक असते—विशेषतः, तुम्ही स्वतः ते रोपटे लावून त्याची निगा घेतलेली असल्यास! काहीशा त्याच प्रकारे, मुले मोठी होऊन परिपक्व होतात व देवाची सेवा हाती घेतात, तेव्हा त्यांची निगा घेतलेल्या पालकांना त्यांच्याकरवी मोठा संतोष प्राप्त होतो; याच धर्तीवर बायबलमधील एक नीतिसूत्र म्हणते: “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.”—नीतिसूत्रे २३:२४, २५.

२, ३. (अ) पालक कशाप्रकारे दुःख व क्लेश टाळू शकतात? (ब) आनंद देणारे बनण्याकरता रोपटी व मुले या दोन्हींना कशाची आवश्‍यकता असते?

२ तथापि, एखादे मूल आपोआप ‘धार्मिक’ व “सुज्ञ” बनत नाही. जसे एखाद्या रोपट्याचे डौलदार वृक्षात रूपांतर होण्यासाठी कष्ट करावे लागतात तसेच लहान मुले “दुःख” व “क्लेश” देणारी बनू नयेत म्हणून कठोर परिश्रमाची आवश्‍यकता असते. (नीतिसूत्रे १७:२१, २५) उदाहरणार्थ, आधारासाठी लावलेले टेकू, कोवळे रोप सरळ व मजबूत होईल अशाप्रकारे त्यास वळण देऊ शकतात. नियमित पाणी पुरवठा आवश्‍यक असतो, शिवाय रोपट्याला कीड लागू नये याचीही खबरदारी घ्यावी लागते. शेवटी, छाटणी केल्यामुळे एक देखणा वृक्ष तयार होतो.

३ देवाचे वचन दाखवून देते, की मुलांना ईश्‍वरी वळण, बायबल सत्यरूपी पाण्याचा पुरेपूर पुरवठा, नैतिक गैरव्यवहारांपासून संरक्षण व त्यांचे अवगुण छाटून टाकण्याकरता प्रेमपूर्ण शिस्त देणे अत्यावश्‍यक आहे. या आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” मुलांना वाढवा असा विशेषकरून पित्यांना आर्जव करण्यात आला आहे. (इफिसकर ६:४) यात काय गोवलेले आहे?

यहोवाने सांगितलेल्या गोष्टींवर भर

४. पालकांची आपल्या मुलांसंबंधी कोणती जबाबदारी आहे व ती पूर्ण करण्याआधी काय अपेक्षिले जाते?

४ ‘यहोवाचे शिक्षण’ यातून, आपली विचारसरणी यहोवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत येईल अशाप्रकारे तिला निर्देशित करणे असा अर्थबोध होतो. यास्तव, पालकांनी आपल्या लहान मुलांच्या मनांवर विविध प्रश्‍नांसंबंधी यहोवाची विचारसरणी बिंबवावी. तसेच, अनुग्रही शिस्त अर्थात सुधारणुकीसाठी वळण लावण्यासंबंधी त्यांनी देवाचे उदाहरण देखील अनुसरावे. (स्तोत्र १०३:१०, ११; नीतिसूत्रे ३:११, १२) तथापि असे करण्याअगोदर, यहोवाने सांगितलेल्या गोष्टी पालकांनी स्वतः आत्मसात कराव्यात, ज्याप्रकारे देवाचा संदेष्टा मोशे याने प्राचीन इस्राएली लोकांना ताकीद दिली होती: “[यहोवाकडील] ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव.” (तिरपे वळण आमचे.)—अनुवाद ६:६.

५. इस्राएली पालकांना आपल्या मुलांना केव्हा व कशाप्रकारे शिक्षण द्यावयाचे होते व ‘बिंबवणे’ याचा काय अर्थ होतो?

५ बायबलचा नियमित अभ्यास, मनन व प्रार्थना यांकरवी पालकांना मोशेच्या पुढील आज्ञेचे पालन करण्यास मदत मिळू शकते: “तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर [यहोवाने सांगितलेल्या गोष्टी] बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” (तिरपे वळण आमचे.) “बिंबव” असे भाषांतर केलेल्या मूळ इब्री शब्दाचा अर्थ, “पुनरुक्‍ती करणे” “वारंवार म्हणणे” “स्पष्टपणे समजावून मनावर ठसवणे” असा होतो. यहोवाच्या गोष्टींना नेहमी अग्रस्थान देण्याच्या आवश्‍यकतेवर मोशेने कशाप्रकारे आणखी भर दिला याकडे लक्ष द्या: “या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्‍यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही.” यहोवा, पालकांकडून त्यांच्या मुलांना सातत्यपूर्ण, प्रेमळ लक्ष पुरवावे अशी अपेक्षा करतो याविषयी कोणतेच दुमत नाही!—अनुवाद ६:७-९.

६. पालकांनी आपल्या मुलांच्या मनात काय बिंबवायचे होते व कोणत्या लाभासह?

६ यहोवाने सांगितलेल्या “या गोष्टी” ज्या पालकांनी आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबवायच्या होत्या, त्या कोणत्या आहेत? सामान्यपणे दहा आज्ञा म्हटलेल्या आज्ञांचा मोशेने नुकताच पुनरुच्चार केला होता; यात खून न करण्याविषयी, व्यभिचार न करण्याविषयी, चोरी न करण्याविषयी, खोटी साक्ष न देण्याविषयी व लोभ न धरण्याविषयी आज्ञा होत्या. इस्राएली पालकांनी आपल्या लहान मुलांच्या मनावर बिंबवावयाच्या गोष्टींमध्ये अशा नैतिक अपेक्षा व त्यांसोबत “आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति” करण्याची आज्ञा समाविष्ट होती. (अनुवाद ५:६-२१; ६:१-५) विद्यमान काळात मुलांना अशाच प्रकारच्या शिक्षणाची आवश्‍यकता आहे याजशी तुम्ही सहमत नाही का?

७. (अ) बायबलमध्ये मुलांची तुलना कशासोबत करण्यात आली होती? (ब) आता आपण काय पडताळून पाहणार आहोत?

७ इस्राएली पित्याला सांगण्यात आले होते: “तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील.” (स्तोत्र १२८:३) तथापि, पालकांना आपल्या या ‘रोपट्यांकरवी’ दुःख अनुभवायचे नसून, उलटपक्षी संतोष मिळवावयाचा असल्यास त्यांनी आपल्या मुलाबाळांत वैयक्‍तिक, दैनंदिन स्वरूपाची आस्था बाळगण्यास हवी. (नीतिसूत्रे १०:१; १३:२४; २९:१५, १७) आपल्या मुलांकरवी खरा संतोष मिळावा या दृष्टीने पालक त्यांना कशाप्रकारे वळण लावू शकतात, आध्यात्मिक अर्थाने त्यांना पाणी घालू शकतात, तसेच संरक्षण व प्रेमपूर्वक शिस्त लावू शकतात, हे आपण आता पडताळून पाहू.

बालपणापासून वळण लावणे

८. (अ) तीमथ्याच्या बाबतीत, वळविणाऱ्‍या टेकूंची भूमिका कोणी पार पाडली? (ब) त्याला केव्हापासून वळण लावण्यात आले व यामुळे कोणता परिणाम घडून आला?

८ तीमथ्याचा विचार करा; रोपट्यास वळण देणाऱ्‍या दोन मजबूत टेकूंप्रमाणे—त्याची आई व त्याची आजी यांकडून त्यास आधार मिळाला. तीमथ्याचे वडील हेल्लेणी व साहजिकच सत्य न मानणारे असल्यामुळे, त्याची यहुदी आई, युनीके व तिची आई लोईस यांनीच या लहान मुलास, ‘बालपणापासून पवित्र शास्त्राचे’ वळण लावले. (२ तीमथ्य १:५; ३:१५; प्रेषितांची कृत्ये १६:१) तीमथ्याला, तो बाळ असतानाच ‘यहोवाने केलेल्या अद्‌भुत कृत्यांविषयी’ शिक्षण देण्यात त्यांनी खर्ची घातलेल्या श्रमाचे खरोखर सार्थक झाले. (स्तोत्र ७८:१, ३, ४) तीमथ्य मिशनरी या नात्याने दूरवरच्या देशांत सेवा करू लागला तेव्हा तो कदाचित किशोरवयातच असावा, तसेच प्रारंभिक ख्रिस्ती मंडळ्यांना बळकट करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.—प्रेषितांची कृत्ये १६:२-५; १ करिंथकर ४:१७; फिलिप्पैकर २:१९-२३.

९. लहान मुले भौतिकवादाचा पाश टाळण्याचे कशाप्रकारे शिकू शकतात?

९ पालकांनो, वळण देणारे टेकू म्हणून तुम्ही कितपत यशस्वी ठरला आहात? उदाहरणार्थ, भौतिक वस्तूंविषयी तुमच्या मुलांनी एक समतोल दृष्टिकोन विकसित करावा असे तुम्ही इच्छिता का? तर मग, प्रत्येक अत्याधुनिक साधनाच्या किंवा वास्तविक पाहता तुम्हाला आवश्‍यक नसणाऱ्‍या इतर वस्तूंच्या नादी न लागण्याद्वारे तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर एक योग्य उदाहरण ठेवावे. तुम्ही भौतिक फायद्यांच्या नादी लागण्याचे निवडल्यास तुमची मुले तुमच्या पावलावर पाऊल ठेवतात, तेव्हा मात्र नवल वाटून घेऊ नका. (मत्तय ६:२४; १ तीमथ्य ६:९, १०) साहजिकच, जर वळण देणारे टेकू सरळ नसतील, तर रोपटे वळणदार कसे होऊ शकेल?

१०. पालकांनी मार्गदर्शनाकरता नेहमी कोणाकडे विनंती करावी व त्यांनी कोणती मनोवृत्ती बाळगावी?

१० जे पालक आपल्या मुलांत संतोष मिळवू इच्छितात ते त्यांच्या मुलांच्या आध्यात्मिक कल्याणाच्या दृष्टीने सर्वोत्तम काय हे विचारात घेऊन, त्यांना वळण लावण्याकरता सातत्याने देवाकडून मदत मागतील. चार मुलांचे संगोपन करणाऱ्‍या एका आईने सांगितले: “आमच्या मुलांचा जन्म होण्यापूर्वीच, आम्ही उत्तम पालक होण्यासाठी, यहोवाच्या वचनाद्वारे मार्गदर्शित होऊन ते आमच्या जीवनात लागू करण्यासाठी यहोवाकडे नियमितपणे मदतीची याचना करत असू.” ती पुढे म्हणते, “‘प्रथम स्थान यहोवाला,’ हा केवळ एक सामान्य वाक्प्रचार नव्हता, उलट त्यावरच आमची संपूर्ण जीवनशैली आधारली होती.”—शास्ते १३:८.

नियमित “पाणी” घालणे

११. रोपटी व मुले या दोन्हींच्या वाढीसाठी कशाची आवश्‍यकता असते?

११ रोपट्यांची एक विशेष आवश्‍यकता म्हणजे नियमित पाणी पुरवठा; नदीकाठी असलेल्या वृक्षवल्लींच्या भरभराटीवरून हे दिसून येते. (पडताळा प्रकटीकरण २२:१, २.) बालकांना बायबल सत्यरूपी पाण्याचा नियमित पुरवठा लाभल्यास त्यांची देखील आध्यात्मिक भरभराट होईल. तथापि, पालकांनी आपल्या मुलांच्या एकाग्रतेची कालमर्यादा विचारात घेण्यास हवी. वारंवार घेतलेले मार्गदर्शनाचे अल्पकालीन सत्र, कदाचित, क्वचित घेतलेल्या लांबलचक सत्रांपेक्षा अधिक परिणामकारक ठरतील. अशा प्रकारच्या कमी कालावधीच्या सत्रांना कमी महत्त्वाचे समजू नका. परस्परांच्या सान्‍निध्यात काही क्षण घालवणे पालक व मुलांमध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी अत्यावश्‍यक आहे, अशी जवळीक जी शास्त्रवचनांमध्ये वारंवार प्रोत्साहित करण्यात आलेली आहे.—अनुवाद ६:६-९; ११:१८-२१; नीतिसूत्रे २२:६.

१२. लहान मुलांसोबत प्रार्थना करणे इतके महत्त्वाचे का आहे?

१२ लहान मुलांसोबत अशा प्रकारचे एक सत्र दिवसाच्या शेवटास घेता येईल. एक तरुणी आठवून सांगते: “आईबाबा दररोज रात्री आमच्या अंथरुणाच्या कोपऱ्‍यावर बसून आमची प्रार्थना ऐकायचे.” असे करणे किती महत्त्वपूर्ण आहे याविषयी सांगताना आणखी एक तरुणी म्हणाली: “यामुळे मला दररोज रात्री झोपी जाण्याआधी यहोवाला प्रार्थना करण्याची सवय लागली.” मुले जेव्हा दररोज आपल्या पालकांच्या तोंडून यहोवाबद्दलचे उद्‌गार व त्याला केलेल्या प्रार्थना ऐकतात तेव्हा तो त्यांच्या नजरेत एक वास्तविक व्यक्‍ती बनतो. एक युवक म्हणाला: “यहोवाला प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटल्यावर मला एक खरीखुरी आजोबांसारखी व्यक्‍ती दिसायची. आपल्या प्रत्येक कृतीत व शब्दात यहोवाला विचारात घेणं अगत्याचं आहे हे समजून घेण्यास मला माझ्या आईवडिलांनी मदत केली.”

१३. नियमित मार्गदर्शन कालावधींत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल?

१३ बायबल सत्यरूपी पाणी शोषून घेण्यास लहान मुलांना मदत करण्यासाठी, पालकांना त्यांच्या नियमित मार्गदर्शन कालावधींत अनेक व्यावहारिक उपक्रम समाविष्ट करता येतील. अद्याप किशोरावस्थेत पदार्पण न केलेल्या दोन मुलांचे आईवडील म्हणाले: “आमच्या दोन्ही मुलांना आम्ही त्यांच्या जन्मानंतर काही सप्ताह उलटताच, राज्य सभागृहात शांत बसावं म्हणून वळण लावण्याचे सुरू केले.” एका पित्याने त्यांच्या कुटुंबात काय केले जात असे ते सांगितले: “आम्ही लहान लहान कार्डांवर बायबलच्या सर्व पुस्तकांची नावं लिहिली व आळीपाळीने ती कार्डे क्रमवार लावण्याचा प्रयत्न करत असू. आमची मुलं या खेळाची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असत.” अनेक कुटुंबे जेवणाआधी किंवा त्यानंतर एक आटोपशीर मार्गदर्शन सत्र घेतात. एका पित्याने सांगितले: “दैनिक बायबल वचनावरील चर्चेसाठी संध्याकाळच्या जेवणाची वेळ, आमच्याकरता उत्तम ठरली आहे.”

१४. (अ) लहान मुलांसोबत आध्यात्मिकरित्या फलदायी असणाऱ्‍या कोणत्या कार्यांत सहभाग घेता येईल? (ब) मुलांमध्ये शिकून घेण्याची कशाप्रकारची क्षमता असते?

१४ बायबल कथांचं माझं पुस्तकa (इंग्रजी) यातील बायबलचे सचित्र वृत्तान्तही लहान मुले आवडीने ऐकतात. एका जोडप्याने सांगितले, की “मुलं लहान होती तेव्हा, बायबल कथांचं पुस्तक यातून आम्ही एक धडा विचारात घ्यायचो व यानंतर मुलं त्यातील वेगवेगळ्या पात्रांसारखे पेहराव करून एक लहानसे नाटक करायची. त्यांना हे अत्यंत आवडायचं, अनेकदा तर ती एका अभ्यासातच आणखी गोष्टी घेण्याचा हट्ट करायची.” तुमच्या मुलांच्या शिकून घेण्याच्या क्षमतेला अजिबात कमी लेखू नका! काही चार-वर्षीय मुलांनी बायबल कथांचं पुस्तक यातील धडेच्या धडे पाठ केले आहेत, एवढेच काय तर ती बायबल वाचण्यासही शिकली आहेत! एक युवती, ती साधारण साडेतीन वर्षांची होती तेव्हाची आठवण सांगते; ती इंग्रजीतील “ज्युडिशियल डिसीशन्स” या शब्दांचा वारंवार चुकीचा उच्चार करीत असे, पण तिच्या वडिलांनी तिला प्रयत्न करत राहण्याचे प्रोत्साहन दिले.

१५. मुलांसोबतच्या चर्चांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल, व अशा प्रकारच्या चर्चा महत्त्वपूर्ण असतात हे कशावरून शाबीत होते?

१५ तुमच्या लहान मुलांसोबत घेतल्या जाणाऱ्‍या अभ्यास सत्रांचा सदुपयोग करून त्यांत, सभांमध्ये विवेचने मांडण्यासारख्या इतर मार्गांनी त्यांनी दुसऱ्‍यांनाही सत्यरूपी पाणी द्यावे, म्हणून तुम्ही त्यांची तयारी करून घेऊ शकता. (इब्री लोकांस १०:२४, २५) एक युवती आठवणींना उजाळा देऊन सांगते, “आमच्या सराव सत्रांदरम्यान, मला स्वतःच्या शब्दांत विवेचन द्यावे लागत असे. मजकुराचा अर्थ समजून न घेता नुसतंच वाचून दाखवण्याची परवानगी नव्हती.” या व्यतिरिक्‍त, मुलांना क्षेत्र सेवेतही अर्थपूर्ण सहभाग घेण्याच्या उद्देशाने वळण लावता येते. देवभीरू पालकांचे संस्कार झालेली एक स्त्री स्पष्ट करते: “आम्ही आईबाबांसोबत त्यांच्या कार्यात त्यांच्या मागेमागे फक्‍त शेपटासारखे कधीच जात नव्हतो. दारावरची बेल वाजवून केवळ एक हस्तपत्रिका देण्यासारखा लहानसा का होईना, पण त्यात आमचाही सहभाग आहे, हे आम्हाला चांगलं ठाऊक होतं. प्रत्येक सप्ताहांताच्या कार्याची आधीपासूनच लक्षपूर्वक तयारी केल्यामुळं, काय बोलायचं ते आम्हाला माहीत असायचं. शनिवारी सकाळी उठून, आज सेवेला जायचं आहे का असं आम्ही एकदाही विचारल्याचं मला आठवत नाही. जायचं आहे हे आम्हाला ठाऊकच होतं.”

१६. मुलांसोबत कौटुंबिक अभ्यास चालवताना नियमितपणा का महत्त्वपूर्ण आहे?

१६ लहान मुलांना बायबल सत्यरूपी पाणी सातत्याने पुरवण्याच्या महत्त्वावर कितीही भर दिला तरी तो कमीच आहे, याचाच अर्थ असा, की दर आठवडी कौटुंबिक बायबल अभ्यास घेणे अत्यावश्‍यक आहे. दोन अपत्यांचे वडील असे म्हणतात की “मुले चिरडीस येतात याचे एक प्रमुख कारण म्हणजे असंबद्धता.” (इफिसकर ६:४) ते म्हणाले: “मी व माझ्या पत्नीने एक विशिष्ट दिवस व वेळ निवडली व ठरलेल्या वेळेवर आम्ही विश्‍वासूपणे कौटुंबिक अभ्यास घेत असू. काही दिवसांनी मुलं स्वतःच त्यावेळेस त्याची अपेक्षा करू लागले.” ‘कोवळया रोपट्याला जसे वळवाल तसाच आकार वृक्ष घेईल,’ हा सिद्धान्त लक्षात घेता, बालपणापासून अशा प्रकारे वळण लावणे अत्यावश्‍यक आहे.

१७. लहान मुलांना बायबल सत्यांचा पुरवठा देण्याइतकेच आणखी काय महत्त्वपूर्ण आहे?

१७ लहान मुलांना बायबल सत्यांचा पुरवठा करणे तर अत्यावश्‍यक आहेच पण त्यासोबत पालकांचा आदर्श देखील तितकाच आवश्‍यक आहे. तुमच्या मुलांना तुम्ही अभ्यास करताना, नियमितपणे सभांना उपस्थित राहताना, क्षेत्र सेवेत सहभाग घेताना, अर्थात आनंदाने यहोवाची इच्छा पूर्ण करताना दिसता का? (स्तोत्र ४०:८) त्यांनी तुम्हाला हे सर्व करताना पाहावे हे अगत्याचे आहे. पतीचा विरोध सहन करत असतानाही सहा मुलांचे संगोपन करून त्यांना विश्‍वासू साक्षीदार बनविणाऱ्‍या आपल्या आईबद्दल एका मुलीने मनोवेधक उद्‌गार काढले: “आमच्यावर सर्वाधिक परिणाम झाला तो स्वतः आईच्या आदर्शाचा—तिच्या शब्दांपेक्षा तिच्या आदर्शातून मिळालेला उपदेश अधिक श्रेष्ठ होता.”

लहान मुलांना संरक्षण देणे

१८. (अ) मुलांना आवश्‍यक असलेले संरक्षण पालक कशाप्रकारे पुरवू शकतात? (ब) इस्राएलातील लहान मुलांना शरीराच्या प्रजोत्पादक अंगांविषयी कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन दिले जाई?

१८ धोकेदायक किड्यांपासून जसे रोपट्यांना अनेकदा संरक्षण देणे आवश्‍यक असते तशाच प्रकारे, या दुष्ट व्यवस्थीकरणात लहान मुलांनाही ‘दुष्ट माणसांपासून’ संरक्षणाची गरज आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) आईवडील हे संरक्षण कशाप्रकारे देऊ शकतात? त्यांना ईश्‍वरी सुज्ञान संपादन करण्यास साहाय्य करण्याद्वारे! (उपदेशक ७:१२) यहोवाने इस्राएली लोकांना—तसेच त्यांच्या ‘बालकांनाही,’ नियमशास्त्राचे पठन होत असताना त्याकडे कान देण्याची आज्ञा दिली होती व त्यात योग्य आणि अयोग्य लैंगिक वर्तन ओळखण्याविषयी माहिती समाविष्ट होती. (अनुवाद ३१:१२; लेवीय १८:६-२४) “अंड” व “जननेंद्रिय” यांसहित शरीराच्या प्रजोत्पादक अंगांविषयी वारंवार उल्लेख आहेत. (लेवीय १५:१-३, १६; २१:२०; २२:२४; गणना २५:८; अनुवाद २३:१०, NW) आजच्या जगातील भयंकर नीतिभ्रष्टतेमुळे, देवाने “फार चांगले” म्हटलेल्या निर्मितीत समाविष्ट असणाऱ्‍या या विशिष्ट शारीरिक अवयवांच्या योग्य व अयोग्य उपयोगासंबंधाने लहान मुलांना माहिती असणे आवश्‍यक आहे.—उत्पत्ति १:३१; १ करिंथकर १२:२१-२४.

१९. मुलांना त्यांच्या गुप्तांगांविषयी कशाप्रकारचे मार्गदर्शन देणे उचित आहे?

१९ आदर्शाप्रमाणे आई व वडील या दोघांनी मिळून किंवा प्रत्येक प्रौढ पालकाने, आपल्या पाल्यास त्याच्या गुप्तांगांची ओळख करून द्यावी. यानंतर त्यांनी समजावून सांगावे, की इतर कोणालाही या अंगांना स्पर्श करू देऊ नये. मुलांसोबत लैंगिक दुर्व्यवहार करणारे सहसा, आपल्या अप्रत्यक्ष लैंगिक हालचालींना लहान मुले कसा प्रतिसाद देतात हे आधी अजमावून पाहात असल्यामुळे, मुलांना खंबीरपणे प्रतिकार करून, “मी तुझं नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही!” असे म्हणण्यास शिकवले पाहिजे. तुमच्या लहान मुलांना शिकवा, की कोणी विचित्र वाटणाऱ्‍या पद्धतीने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यास, कितीही भयानक धाक दाखविला गेला तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्याची तक्रार केलीच पाहिजे.

प्रेमपूर्ण शिस्त लावणे

२०. (अ) शिस्त ही कशाप्रकारे झाडांची छाटणी करण्याप्रमाणे आहे? (ब) शिस्तीचा सुरवातीला कसा परिणाम होतो पण नंतर मात्र कोणता परिणाम घडून येतो?

२० झाडाची छाटणी करणे त्यासाठी जसे फायदेकारक असते त्याप्रमाणेच प्रेमपूर्ण शिस्त ही लहान मुलांना फायदेकारक ठरते. (नीतिसूत्रे १:८, ९; ४:१३; १३:१) खराब फांद्या छाटून टाकल्या जातात तेव्हा इतर फांद्यांच्या वाढीला चालना मिळते. यास्तव, जर तुमची मुले भौतिक संपत्तीवर लक्ष केंद्रित करताहेत किंवा वाईट संगती अथवा अहितकारक करमणुकीकडे झुकताहेत, तर मग या अनुचित प्रवृत्त्या अशा फांद्यासारख्या आहेत ज्यांना छाटून टाकणे आवश्‍यक आहे. यांना काढून टाकल्याने तुमच्या मुलांना आध्यात्मिक दिशेने प्रगती करण्यास मदत मिळेल. छाटणी केल्यामुळे झाडाला थोडाफार धक्का लागू शकतो त्याचप्रमाणे, सुरवातीला अशा प्रकारची शिस्तही कदाचित सुखकर वाटणार नाही. तथापि, शिस्तीच्या उत्तम परिणामस्वरूपात, तुमचे मूल तुम्हाला हव्या असलेल्या दिशेने नव्याने विकास करू शकते.—इब्री लोकांस १२:५-११.

२१, २२. (अ) शिस्त देण्याचा अथवा प्राप्त करण्याचा अनुभव सुखावह नसतो हे कशावरून सूचित होते? (ब) पालकांनी शिस्त दिल्याशिवाय का राहू नये?

२१ शिस्त देण्याचा किंवा प्राप्त करण्याचा अनुभव सुखावह नसतो हे तर कोणीही मान्य करील. एक पिता म्हणाले, “माझा मुलगा एका मुलासोबत खूप जवळीक करत होता, पण या मुलाबद्दल मंडळीतील वडिलांनी मला बजावले होते, की तो संगती करण्यालायक नाही. मी पाऊल उचलले पण ते कितीतरी आधी करावयास हवे होते. माझा मुलगा कोणत्याही ठळक अपराधात जरी गोवला गेला नसला, तरीसुद्धा त्याची विचारसरणी पूर्ववत करण्यास वेळ लागला.” या मुलाने सांगितले, “माझ्या जिवलग मित्रापासून माझी ताटातूट झाली तेव्हा मी पार खचून गेलो.” पण तो पुढे असेही म्हणतो, की “हा एक चांगला निर्णय होता कारण त्यानंतर काही काळातच माझ्या त्या मित्राला बहिष्कृत करण्यात आलं.”

२२ देवाचे वचन म्हणते, “बोधाचा [शिस्तीचा, NW] वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे.” यास्तव, शिस्त देणे कितीही जड जात असले तरीसुद्धा ती तुमच्या मुलांना दिल्याशिवाय राहू नका. (नीतिसूत्रे ६:२३; २३:१३; २९:१७) कालांतराने, तुम्ही त्यांना सुधारल्याबद्दल ते तुमचे उपकार मानतील. एक युवक आठवून सांगतो, “मला शिक्षा व्हायची तेव्हा मी माझ्या आईबाबांचा खूप खूप राग करायचो. पण तेव्हा ती शिक्षा त्यांनी मला दिली नसती तर आता मी त्यांचा आणखीनच राग केला असता.”

श्रमांना साजेसे प्रतिफळ

२३. लहान मुलांकरता खर्ची घातलेली सर्व प्रेमपूर्ण काळजी व्यर्थ जात नाही असे का म्हणता येईल?

२३ पालकांनाच नव्हे तर इतरांनाही ज्यांच्यामुळे संतोष मिळतो अशी मुले, दररोज प्रेमळपणे खूप लक्ष पुरवल्यावरच तयार होतात याविषयी कोणतेच दुमत नाही. तथापि, शारीरिक मुले असोत किंवा आध्यात्मिक, त्यांच्याकरवी मिळणारे प्रतिफळ हे खर्ची घातलेल्या श्रमांना नक्कीच साजेसे असते. वयोवृद्ध प्रेषित योहानाने पुढीलप्रमाणे लिहून हे दाखवून दिले, “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.”—३ योहान ४.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

◻ प्रशंसेस पात्र बनण्याकरता रोपटी व मुले या दोन्हींना कशाची आवश्‍यकता असते?

◻ पालक, खऱ्‍या अर्थाने परिणामकारक वळविणाऱ्‍या टेकूंची भूमिका कशाप्रकारे पार पाडू शकतात?

◻ लहान मुलांसोबतच्या मार्गदर्शन सत्रांत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल व त्यांना कशाचा प्रतिकार करण्यास शिकवले पाहिजे?

◻ छाटणी करणे झाडाकरता लाभप्रद ठरते तशाचप्रकारे, शिस्त मुलांसाठी कशाप्रकारे लाभप्रद ठरते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा