१०१ वा गिलियड वर्ग चांगल्या कामांत तत्पर
आपला निर्माणकर्ता यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त देखील, चांगल्या कामांसाठी तत्पर आहेत. आपला आदर्श या नात्याने येशूने, देवाने त्याला दिलेली नेमणूक पार पाडण्याकरवी तत्परता दाखवली, अर्थात, “त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की, . . . चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.” (तीत २:१४) वॉचटावर गिलियड बायबल प्रशालेच्या १०१ व्या वर्गातील ४८ सदस्यांनी चांगल्या कामांसाठी असलेली तत्परता निश्चितच प्रदर्शित केली आहे. या मिशनऱ्यांचा पदवीदान समारंभ सप्टेंबर ७, १९९६ रोजी न्यूयॉर्क, पॅटर्सन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रात पार पाडण्यात आला.
तत्पर राहण्यासाठी व्यवहार्य मार्गदर्शन
या पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी, ७० पेक्षा अधिक वर्षांपासून पूर्णवेळेच्या सेवेत असलेले, नियमन मंडळाचे सदस्य कॅरी बार्बर हे होते. बंधू बार्बर यांनी सुरवातीला, “जगाचा प्रकाश” असणाऱ्या येशूच्या प्रचार व शिक्षण देण्याच्या कार्यावर प्रकाश टाकला. (योहान ८:१२) त्यांनी स्पष्ट केले, की ही महत्त्वपूर्ण भूमिका येशूने स्वतःपुरतीच मर्यादित ठेवली नाही तर उलटपक्षी त्याने त्याच्या शिष्यांनाही आपला प्रकाश पडू देण्याविषयी आवर्जून सांगितले. (मत्तय ५:१४-१६) सेवेच्या या सुहक्कामुळे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाला अर्थ लाभतो आणि जे कोणी ‘प्रकाशाच्या प्रजेसारखे चालतात,’ त्या सर्वांच्या खांद्यावर एक भारी जबाबदारी येते.—इफिसकर ५:८.
या प्रास्ताविक विवेचनांनंतर, ब्रुकलिन मुख्यालयातील एग्सेक्युटिव्ह कार्यालयांचे डॉन ॲडम्स यांना व्यासपिठावर बोलावण्यात आले. “मागे न वळता सतत पुढे वाटचाल करणे” या विषयावर त्यांनी भाषण केले. बंधू ॲडम्स यांनी खुद्द गिलियड प्रशाला व परदेशांत सुवार्तेच्या प्रचाराचा फैलाव करण्याच्या या प्रशालेच्या उद्देशाकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित केले. सबंध जगभरात ३०० पेक्षा अधिक भाषांतून बायबलचे साहित्य प्रकाशित करणारी देवाची संघटना कशी आगेकूच करीत आहे याविषयी ते बोलले. १९९५ साली प्रकाशित झालेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक, १११ भाषांत उपलब्ध झालेले असून ते आणखी काही भाषांतून मुद्रित करण्याची योजना आहे. येशूच्या नवीन शिष्यांना काही महिन्यांच्या काळातच समर्पण व बाप्तिस्म्यापर्यंत नेण्यासाठी मदत पुरवण्यात हे पुस्तक सहायक ठरलेलं आहे. यामुळे आता या नवीन मिशनऱ्यांजवळ त्यांच्या कार्यासाठी बायबल अभ्यासाची अगदी अद्ययावत साधने असतील.
यानंतर, नियमन मंडळाचे सदस्य, लायमॅन स्विंगल हे, “देवाला आपली पवित्र सेवा सादर करत राहा,” या प्रकटीकरण ७:१५ वर आधारित असलेल्या विषयावर बोलले. यहोवा स्वतः एक आनंदी परमेश्वर असल्यामुळे, त्याची निरंतर सेवा केल्याने एखाद्याला आनंद लाभू शकतो. (१ तीमथ्य १:११) या आनंदप्रद सेवेमुळे सबंध जगातील लोकांचा एक मोठा लोकसमुदाय त्याची उपासना करण्यासाठी एकत्रित झाला आहे. वर्षानुवर्षे गिलियड प्रशालेत प्रशिक्षित झालेल्यांनी यांपैकी कित्येकांना सत्याचे अचूक ज्ञान मिळवण्यास साहाय्य करण्यात सहभाग घेतला आहे. यामुळे, सतत वाढत जाणाऱ्या या मोठ्या लोकसमुदायात आणखी सदस्यांना एकत्रित करण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या या सेवकांवरही यहोवा आशीर्वादांचा वर्षाव करील असे आपण खात्रीने म्हणू शकतो.
“यहोवाचा आनंद प्रतिबिंबित करणे” या विषयावर डॅनियल सिड्लिक यांनी प्रकाश टाकला; ते देखील नियमन मंडळाचे सदस्य आहेत. लोकांना सार्वकालिक जीवन मिळवण्याच्या आणि आजही खऱ्या अर्थाने जीवन जगण्याच्या मार्गाविषयी शिकवण्याचा या नवीन मिशनऱ्यांसहित देवाच्या सर्व सेवकांना सुहक्क आहे हे त्यांनी स्पष्ट केले. बंधू सिड्लिक यांच्या शब्दांत बोलायचे झाल्यास “शिकवण्याचे काम स्वतःच एक प्रतिफळ आहे; आणि हे शिकवणाऱ्यांच्याच नव्हे तर शिकून घेणाऱ्यांच्याही चेहऱ्यांवर प्रतिबिंबित होते.” (स्तोत्र १६:८-११) त्यांनी एस्टोनिया येथील एका मिशनऱ्याचे शब्द उद्धृत केले, जे पुढीलप्रमाणे आहेत: “जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही असा सर्वश्रेष्ठ संदेश आपल्याजवळ आहे, आणि आपण हे आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित करतो.” आपल्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच कदाचित अनेकजण आपले ऐकून घेण्यास प्रवृत्त होतील आणि त्यांची आस्था देखील जागृत होऊ शकते. यहोवाचे सेवक इतके आनंदी का असतात याविषयी अनेक लोकांना कुतूहल आहे. “म्हणूनच आपल्या चेहऱ्याबद्दल जागरुक राहा,” असा बंधू सिड्लिक यांनी सल्ला दिला. “आनंदी लोकांना पाहून लोकांनाही आनंद होतो.”
युलिसिस ग्लॅस यांनी १९४९ वर्षी संपन्न झालेल्या १२ व्या वर्गापासून गिलियड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात सहभाग घेतला आहे, त्यांनी “धीर धरा व आपल्या जिवांचे रक्षण करा,” हा विषय घेऊन श्रोत्यांना संबोधित केले. धीर म्हणजे नेमके काय? त्याकरवी, एखाद्या गोष्टीसाठी शांतपणे थांबून राहणे, तणावाखाली असताना किंवा चिरडीस आणले जाते तेव्हा सहनशक्ती प्रदर्शित करणे असा अर्थबोध होतो. धीर धरणारा शांत राहतो, उलटपक्षी, उतावीळ असणारा, अधीर होऊन चिडचिड करतो. बंधू ग्लॅस यांनी म्हटल्याप्रमाणे, “धीर धरणे हे अशक्तपणाचे किंवा निर्णय घेण्याची क्षमता नसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे, असा अनेकांचा ग्रह असला तरीसुद्धा, यहोवाच्या दृष्टीने मात्र ते खंबीरपणाचे आणि उद्देशपूर्णतेचे द्योतक आहे.” (नीतिसूत्रे १६:३२) धीर धरल्यामुळे कोणते फायदे आपल्या पदरी पडतील? एका चिनी सुभाषिताप्रमाणे, “रागाच्या क्षणी धीर धरल्यास दुःखाने भरलेले शंभर दिवस तुम्ही टाळता.” बंधू ग्लॅस यांनी म्हटले, “धीरामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आणखीन आकर्षक बनते. खरे तर, तो तुमच्या इतर गुणांना कायम राखण्यासाठी जणू त्यांवर लावलेल्या व्हॉर्निशसारखा आहे. तो विश्वासाला वांच्छनीय, शांतीला अविनाशी आणि प्रीतीला अढळ रूप देतो.”
मार्क न्यूमार यांनी केनिया येथे ११ वर्षे मिशनरी म्हणून कार्य केले होते, व आता ते गिलियड मार्गदर्शक आहेत; त्यांनी म्हटले, “यहोवा देवाकडून त्याच्या संघटनेमार्फत नेमणूक मिळणे हा एक विशेषाधिकार आहे.” “विश्वासाविना तुम्ही फारकाळ टिकणार नाही,” या विषयावर प्रकाश टाकताना त्यांनी यहूदाचा राजा आहाज याच्या उदाहरणाकडे लक्ष आकर्षित केले. यशयाने आहाजाला खात्री करून दिली होती, की यहोवा त्याच्या नेमणुकीत त्याच्या पाठीशी राहील पण तरीसुद्धा आहाजाने विश्वास धरला नाही. (यशया ७:२-९) मग बंधू न्यूमार यांनी स्पष्ट केले की मिशनऱ्यांना—आणि खरे तर, आपल्या सर्वांनाच—आपापल्या ईश्वरशासित नेमणुकांमध्ये दीर्घकाळ टिकून राहावयाचे असल्यास यहोवावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. विशेषतः, मिशनरी नेमणुकीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अढळ विश्वास असणे अगत्याचे आहे. बंधू न्यूमार म्हणाले, “सद्य व्यवस्थीकरणात सर्वच दृष्टीने अनुकूल अशी परिस्थिती सापडणे शक्य नाही, याचा कधीही विसर पडू देऊ नका.”
तत्परतेने कार्य करण्याची प्रेरणा देणारे अनुभव
प्रशिक्षणाच्या काळात दर आठवड्याच्या शेवटी गिलियड विद्यार्थ्यांनी जाहीर प्रचार कार्याला काही वेळ दिला, शेवटी याच कार्याला त्यांच्या मिशनरी नेमणुकीत महत्त्वाचे स्थान राहणार आहे. गिलियड विभागाचे सदस्य वॉलस लिव्हरन्स यांनी, आपापल्या अनुभवांचे कथन करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर सेवा विभाग समितीचे लीऑन वीवर आणि बेथेल कार्य समितीचे लॉन शिल्लिंग यांनी आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या शाखा समितीच्या सदस्यांच्या मुलाखती घेतल्या ज्यांमधून पदवीधर होत असलेल्या मिशनऱ्यांना मोलाचा सल्ला लाभला. सिएरा लिओन येथे १९९५ सालादरम्यान बाप्तिस्मा झालेल्यांपैकी जवळजवळ ९० टक्के लोकांना मिशनऱ्यांनीच मदत केलेली होती याकडे लक्ष वेधण्यात आले. तत्परतेने कार्य करण्याचा केवढा उल्लेखनीय विक्रम!
सरतेशेवटी, संस्थेचे अध्यक्ष मिल्टन हेन्शेल यांनी “यहोवाची दृष्य संघटना अतुलनीय आहे” या विषयावर २,७३४ श्रोत्यांना संबोधित केले. देवाच्या संघटनेत असे काय विशेष आहे की ज्यामुळे तिला तोड नाही? ही विशेषता तिच्या व्यापकतेमुळे किंवा तिच्या सत्तेमुळे नव्हे तर तिला यहोवाच्या नीतिमान नियमांचे आणि न्यायपूर्ण निर्णयांचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे आहे. प्राचीन काळी यहोवाच्या लोकांना अर्थात इस्राएल राष्ट्राला देवाची पवित्र वचने सोपवण्यात आल्यामुळेच हे राष्ट्र अतुलनीय बनले होते. (रोमकर ३:१, २) आज, यहोवाची संघटना येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असल्यामुळे तिच्यात ऐक्य पाहायला मिळते. (मत्तय २८:१९, २०) तिची भरभराट होतेय, ती निरंतर वाढते आहे. जगाच्या पाठीवर आणखी कोणत्या संघटनेचे नियमन मंडळ महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी देवाच्या वचनाचा अर्थात बायबलचा सल्ला घेते? या आणि आणखी इतर कारणांमुळेही यहोवाची दृष्य संघटना खरोखरच अतुलनीय आहे.
या आनंददायक कार्यक्रमाच्या समारोपास विद्यार्थ्यांना पदव्या बहाल करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांतर्फे, या विशेष प्रशिक्षणासाठी कृतज्ञता व्यक्त करणारे एक पत्र देखील वाचून दाखवण्यात आले.
[२२ पानांवरील तक्ता]
वर्ग आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ९
नेमलेले देश: १२
एकूण विद्यार्थी: ४८
सरासरी वय: ३१.७
सत्यात सरासरी वर्षे: १३.८
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: ९.८
[२३ पानांवरील चित्रं]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १०१ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहे.
(१) स्विंट, एच.; झझिन्स्की, ए.; हायफील्ड, एल.; मेरकॉडो, एस.; डील, ए.; शावेज, व्ही.; स्मिथ, जे.; सलीनियस, एस. (२) कूट्र्स, डी.; क्लार्क, सी.; लीसबोर्न, जे.; मोरटेनसन, डब्ल्यू.; ब्रॉमली, ए.; टोइकॉ, एल.; मार्टन, ए.; स्मिथ, डी. (३) झझिन्स्की, डी.; ब्येरगोर, एल.; गारॉफलो, बी.; कॅलडॅल, एल.; शावेज, ई.; फ्रहडिंग, एस.; कॉन, आर.; सलीनियस, आर. (४) स्विंट, बी.; ब्येरगोर, एम.; गारॉफलो, पी.; होमब्लॉड, एल.; कायसर, एम.; फ्रहडिंग, टी.; पोलफ्रीमन, जे.; पोलफ्रीमन, डी. (५) मिंग्वेज, एल.; लीसबोर्न, एम.; मेरकॉडो, एम.; कूट्र्स, एम.; डील, एच.; टोइकॉ, जे.; क्लार्क, एस.; कॉन, ए. (६) मिंग्वेज, एफ.; मार्टन, बी.; हायफील्ड, एल.; होमब्लॉड, बी.; ब्रॉमली, के.; कॅलडॅल, एच.; मोरटेनसन, पी.; कायसर, आर.