राज्य घोषकांचा वृत्तान्त
शाळेत दृढ भूमिका घेणे प्रतिफलदायी ठरते
“तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल,” असे बायबल भाकीत करते. (यशया ५४:१३) एका विस्तृत रितीने, “तुझी सर्व मुले” ही संज्ञा पृथ्वीवरील देवाच्या सेवकांच्या संपूर्ण वर्गाला, अगदी लहान मुलांना देखील लागू होऊ शकते. आज, ख्रिस्ती पालक, आपल्या मुलांना घरामध्ये आणि ख्रिस्ती सभांमध्ये “परमेश्वरापासून शिक्षण” मिळत असल्याची खात्री करतात.
परंतु, तरुण ख्रिश्चनांना शाळेत कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागते. बहुतेकवेळा त्यांना, बायबलमधून त्यांनी जे काही शिक्षण प्राप्त केले आहे त्यावर आधारित दृढ भूमिका घेण्याची गरज भासते. ते असे करतात तेव्हा त्यांना मिळणारे प्रतिफळ विद्यार्थी तसेच शिक्षक दोघांना सारख्याच प्रमाणात लाभदायक ठरू शकते. मायक्रोनेशियातून आलेला पुढील अनुभव हेच दाखवून देतो.
चूक बेटावरील टोल या लहानशा पश्चिमी पॅसिफिक बेटावर, स्थानिक शाळांमधील शिक्षकांनी शाळेत साजरा होणाऱ्या हॅलोवीन सणाची तयारी करण्यास व त्यामध्ये सहभाग घेण्यास सर्व मुलांना सांगितले. साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्यांना ठाऊक होते, की या सणासाठी भूतविद्येच्या परंपरेशी निगडित असलेले भूत, वेताळ आणि चेटकीणींना चित्रित करणारी सजावट व पोशाख तयार करावा लागेल. ही मुले यामध्ये जाणूनबुजून भाग घेऊ शकत नव्हती.a
घरामध्ये आणि ख्रिस्ती मंडळीमध्ये मिळालेल्या बायबल आधारित प्रशिक्षणाद्वारे त्यांना माहीत होते, की असे रितीरिवाज केवळ मनोरंजनासाठी पाळले तरी देव नाखुश होतो. या मुलांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करण्यास मदत मिळावी म्हणून आपल्या शिक्षकांसोबत बोलण्यासाठी बेटावर असलेल्या बारक नावाच्या एका साक्षीदार मिशनऱ्याला आमंत्रण दिले.
स्पष्टीकरण ऐकल्यानंतर, संपूर्ण शाळेतील विद्याशाखेसमोर बारकने बोलावे म्हणून शिक्षकांनी दुसऱ्या एका सभेची व्यवस्था केली. या सभेमध्ये बारकने हॅलोवीनचा खरा स्वभाव दाखवणाऱ्या वस्तुस्थिती सादर केल्या. त्याने अनेक वॉच टावर प्रकाशनांमधून तसेच इतर उगमांतून माहिती मिळवली होती. शिक्षक आणि व्यवस्थापकांना त्या सणाचा उगम, इतिहास, आणि धार्मिक स्वरूपाविषयीची माहिती समजल्यामुळे चकीत झाले. या परिस्थितीचे निरसन कसे करावे हे ठरवण्यासाठी त्यांनी कर्मचारी वर्गाची एक सभा बोलवण्याचे ठरवले.
काही दिवसांनंतर, एक अनपेक्षित निर्णय जाहीर करण्यात आला. हॅलोवीन सणाची सर्व तयारी रद्द करण्यात आली होती. त्या वर्षी शाळा तो सण साजरा करणार नव्हती. शाळेत योग्य ते करण्याचा निर्धार केलेल्या या तरुण साक्षीदारांमुळे किती चांगला परिणाम घडला! तरुणांनी बायबल सत्यासाठी दृढ भूमिका घेण्यासाठी केव्हाही घाबरू नये किंवा त्यांना त्याची लाजही वाटू नये.
संपूर्ण जगभरात, यहोवाचे साक्षीदार आपल्या मुलांना शाळेत चांगला अभ्यास करण्यास शिकवतात. तरुण साक्षीदारांना देखील बायबल तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करण्याचे व संधी मिळेल तेव्हा आपली आशा आणि विश्वास यांबद्दल इतर विद्यार्थ्यांना सांगण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या बाबतीत अनुकूल परिणाम जसे त्वरित घडत गेले तसे प्रत्येक वेळी घडत नसतात तेव्हा सुद्धा, तरुणांना योग्य ते केल्यामुळे आत्मविश्वास व समाधान मिळू शकेल. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा स्वर्गीय पिता त्यांच्याबाबतीत खूष आहे व तो त्यांच्या विश्वासू आज्ञाधारकतेमुळे त्यांना आशीर्वादित करील याची ते खात्री बाळगू शकतात.
[तळटीपा]
a हॅलोवीन आणि त्याच्या भूतविद्येच्या उगमाच्या सविस्तर माहितीकरता, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकाचा नोव्हेंबर २२, १९९३ अंक पहा.