देवाचे राज्य—तुम्हाला त्याचा अर्थबोध होत आहे का?
“चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो.”—मत्तय १३:२३.
१. ‘स्वर्गाच्या राज्याविषयी’ कोणते सामान्य विश्वास आहेत?
देवाचे राज्य काय आहे हे तुम्हाला ‘समजले आहे का?’ ‘स्वर्गाच्या राज्याच्या’ कल्पनांबद्दल अनेक शतकांपासून वेगवेगळे विचार आहेत. आज, चर्चच्या सदस्यांमध्ये असा सामान्य विश्वास ठेवला जातो, की देवाचे राज्य हे काहीतरी आहे जे परिवर्तनाच्या वेळी देव एखाद्याच्या अंतःकरणात घालतो. दुसऱ्यांना वाटते, की ते एक असे ठिकाण आहे जेथे चांगले लोक मृत्यूनंतर शाश्वत सुख उपभोगण्यासाठी जातात. आणखी इतर असा दावा करतात, की देवाने सामाजिक आणि सरकारी बाबींमध्ये ख्रिस्ती शिकवणी आणि रीती बिंबवण्याच्या कार्याद्वारे पृथ्वीवर देवाचे राज्य आणण्याचे मानवांवर सोपवले आहे.
२. बायबल देवाच्या राज्याचे स्पष्टीकरण कसे देते आणि ते काय साध्य करील?
२ परंतु, देवाचे राज्य पृथ्वीवरील कोणतीही संघटना नाही हे बायबल स्पष्टपणे दाखवते. ते अंतःकरणाची स्थिती किंवा मानवी समाजाला ख्रिस्ती बनवणे देखील नाही. हे खरे, की हे राज्य काय आहे याची अचूक समज, त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणते. पण ते देव राज्य ईश्वर स्थापित स्वर्गीय सरकार आहे जे पाप आणि मृत्यूच्या परिणामांचा उच्छेद व पृथ्वीवर धार्मिक परिस्थिती पुनःस्थापित करून देवाची इच्छा पूर्ण करते. या राज्याने आधीच स्वर्गामध्ये सत्ता हाती घेतली आहे आणि लवकरच “सर्व [मानवी] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४; प्रकटीकरण ११:१५; १२:१०.
३. येशूने त्याच्या सेवेची सुरवात केली तेव्हा मानवांसाठी काय खुले झाले?
३ इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी लिहिले: “स्वर्गाच्या राज्याची ही शिकवण, जी येशूची मुख्य शिकवण होती आणि जी ख्रिस्ती पंथात अतिशय लहानशी भूमिका निभावते ती सर्वात क्रांतीकारी शिकवणींपैकी एक आहे तसेच जिने मानवी विचारांत खळबळ माजवली व त्यात बदल केला.” सुरवातीपासूनच येशूच्या सेवेचा विषय: “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,” हा होता. (मत्तय ४:१७) तो ह्या पृथ्वीवर अभिषिक्त राजा होता, आणि सर्व आनंदातील मोठा आनंद म्हणजे मानवांसाठी त्या राज्याचे आशीर्वाद उपभोगण्याचा मार्ग, एवढेच नव्हे तर त्या राज्यामध्ये येशूबरोबर सहराजे आणि सहयाजक या नात्याने कार्य करण्याचा मार्ग देखील खुला झाला होता.—लूक २२:२८-३०; प्रकटीकरण १:६; ५:१०.
४. पहिल्या शतकात, लोकसमुदायाने ‘राज्याच्या सुवार्तेला’ प्रतिसाद कसा दिला व त्यामुळे कोणता न्याय करण्यात आला?
४ जेव्हा समुदायाने रोमांचक “सुवार्तेची घोषणा” ऐकली तेव्हा अल्प जणांनी त्यावर विश्वास ठेवला. धार्मिक नेत्यांनी ‘लोकांकरता स्वर्गाचे राज्य बंद केले’ त्यामुळे असे झाले. खोट्या शिकवणींद्वारे ते ‘ज्ञानाची किल्ली घेऊन गेले.’ बहुतेक लोकांनी येशूला मशीहा आणि देवाच्या राज्याचा नियुक्त राजा म्हणून स्वीकारले नाही त्यामुळे येशू त्यांना म्हणाला: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.”—मत्तय ४:२३; २१:४३; २३:१३; लूक ११:५२.
५. येशूचे दाखले ऐकणाऱ्या बहुतेकांनी ते समजबुद्धीने ऐकले नाहीत हे त्याने कसे दाखवले?
५ येशू एका मोठ्या लोकसमुहाला शिकवत असताना, त्याने समुहाची परीक्षा घेण्यासाठी आणि देव राज्यामध्ये ज्यांना वरकरणी आस्था होती अशा लोकांना वेगळे करण्यासाठी त्याच्या रीतीनुसार दाखल्यांच्या शृंखलेचा उपयोग केला. पहिल्या दाखल्यात, एका पेरणाऱ्याबद्दल सांगितले होते ज्याने चार प्रकारच्या जमिनीत बी पेरले. पहिल्या तीन जमिनी रोपट्यांसाठी अनुकूल नव्हत्या, परंतु शेवटली जमीन ‘चांगली’ होती ज्यामध्ये उत्तम पीक आले. हा लहानसा दाखला या आर्जवाने समाप्त झाला: “ज्याला कान आहेत तो ऐको.” (मत्तय १३:१-९) तेथे उपस्थित असलेल्या बहुतेकांनी तो जे बोलत होता ते ऐकले परंतु ‘लक्षपूर्वक ऐकले’ नाही. त्यांच्यामध्ये प्रेरणा नव्हती, स्वर्गाचे देव राज्य विविध परिस्थितींमध्ये बी पेरण्याप्रमाणे कसे होते हे जाणून घेण्यात त्यांना रस नव्हता. येशूने दिलेले दाखले काही विशेष नसून केवळ नैतिक विषय असलेल्या चांगल्या कथा होत्या असा बहुधा विचार करून ते त्यांच्या दिनचर्येकडे वळाले. त्यांची अंतःकरणे अप्रतिसादात्मक असल्यामुळे त्यांनी बुद्धीची केवढी समृद्धता आणि किती महान विशेषाधिकार व संधी गमावल्या!
६. “राज्याची रहस्ये” यांची समज केवळ येशूच्या शिष्यांसाठीच का मान्य करण्यात आली होती?
६ येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.” यशयाचा उल्लेख करत त्याने पुढे म्हटले: “तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पहाल तर खरे, परंतु तुम्हालाच दिसणारच नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय १३:१०-१६; मार्क ४:११-१३.
देव राज्याचा अर्थ ‘समजून’ घेणे
७. देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेणे’ महत्त्वाचे का आहे?
७ येशूने एका समस्येकडे अंगुली दर्शवली. तिचा संबंध देव राज्याच्या संदेशाचा अर्थ ‘समजून’ घेण्याशी होता. तो त्याच्या शिष्यांना खासगीत म्हणाला: “तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो.” त्याने पुढे म्हटले की चार प्रकारच्या जमिनी अंतःकरणाच्या विविध अवस्थेला चित्रित करतात ज्यामध्ये “राज्याचे वचन” पेरले जाईल. (तिरपे वळण आमचे.)—मत्तय १३:१८-२३; लूक ८:९-१५.
८. पहिल्या तीन प्रकारच्या जमिनींमध्ये कशामुळे ‘बीज’ फळ उत्पन्न करू शकले नाही?
८ प्रत्येक बाबतीत “बी” उत्तम प्रतीचे होते, परंतु जमिनीच्या अवस्थेवर त्याचे फळ अवलंबून होते. अंतःकरणाची जमीन, व्यस्त, नेहमीच गजबजलेल्या रस्त्याप्रमाणे, आध्यात्मिक नसलेल्या अनेक कार्यांनी निबर झालेली असेल तर देव राज्याचा संदेश ऐकणाऱ्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही अशी सबब सांगण्यास अतिशय सोपे जाते. मूळ धरण्याआधीच ते बी सहजगत्या हिरावून घेतले जाऊ शकते. परंतु खडकाळ जमिनीसारख्या अंतःकरणात बी पेरले असल्यास काय? त्याला अंकुर फुटेल परंतु पौष्टिकता आणि स्थिरता मिळण्यासाठी त्याला आपली मूळे खोलवर रुजवण्यास जड जाईल. देवाचा आज्ञाधारक सेवक होण्याची आशा, विशेषकरून छळाची लाट उसळते तेव्हा, एक मोठे आव्हान पुढे येते आणि ती व्यक्ती अडखळू शकते. तसेच, जर अंतःकरणाची जमीन काट्यासारख्या चिंतांनी किंवा धनासाठी भौतिक इच्छांनी इतकी भरलेली असेल तर देव राज्याचे चिमुकले रोपटे दबले जाईल. जीवनातील या तीन नमुनेदार परिस्थितींमध्ये कोणतेही राज्य फळ उत्पन्न होणार नाही.
९. चांगल्या जमिनीत पेरलेले ते ‘बीज’ उत्तम फळ का उत्पन्न करू शकले?
९ परंतु, उत्तम जमिनीत पेरलेल्या देव राज्याच्या बीजाबद्दल काय? येशू उत्तरतो: “चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १३:२३) राज्याचा ‘अर्थ समजून’ घेतल्यावर ते त्यांच्या परिस्थितीनुसार चांगले फळ उत्पन्न करतील.
समजण्यासोबत जबाबदारी येते
१०. (अ) देव राज्याचा अर्थ ‘समजून घेतल्याने’ आशीर्वाद आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी येतात हे येशूने कसे दाखवले? (ब) जाऊन शिष्य करा ही येशूची आज्ञा केवळ पहिल्या शतकातील शिष्यांनाच लागू होती का?
१० देव राज्याच्या विविध पैलूंचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणखी सहा दाखले दिल्यानंतर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले: “तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” त्यांनी “हो” असे उत्तर दिले तेव्हा तो म्हणाला: “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारांतून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे.” येशूने दिलेल्या शिकवणी आणि प्रशिक्षण त्याच्या शिष्यांना असे प्रौढ ख्रिस्ती बनवणार होते जे आपल्या “भांडारांतून” पौष्टिक आध्यात्मिक अन्नाचा अमर्याद साठा आणू शकत होते. यातील बहुतेक गोष्टी देवाच्या राज्याशी संबंधित होत्या. देव राज्याचा ‘अर्थ समजून’ घेतल्याने केवळ आशीर्वादच नव्हे तर जबाबदारी देखील येते हे येशूने स्पष्ट केले. त्याने आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा. आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय १३:५१, ५२; २८:१९, २०.
११. सन १९१४ आले तेव्हा देव राज्य संबंधित कोणत्या घटना घडल्या?
११ अभिवचनाप्रमाणे, येशू इतक्या शतकांपासून आजपर्यंत त्याच्या खऱ्या शिष्यांबरोबर आहे. या शेवटल्या दिवसांमध्ये त्याने प्रगतिशीलपणे त्यांना समजबुद्धी दिली आहे तसेच सत्याच्या वाढत्या प्रकाशाच्या उपयोगाबद्दल देखील त्याने त्यांना जबाबदार धरले आहे. (लूक १९:११-१५, २६) सन १९१४ मध्ये राज्य घटना त्वरित आणि नाट्यमयरीत्या उलघडू लागल्या. त्या वर्षी, अनेक दिवसांपासून आशा असलेल्या राज्याचा केवळ ‘जन्मच’ झाला नाही तर ‘व्यवस्थीकरणाच्या समाप्तीची’ सुरवात झाली. (प्रकटीकरण ११:१५; १२:५, १०; दानीएल ७:१३, १४, २७) चालू घटनांचा अर्थ समजून खऱ्या ख्रिश्चनांनी, संपूर्ण इतिहासात राज्य-प्रचाराची आणि शिकवण्याची सर्वात मोठी मोहीम हाती घेतली आहे. येशूने असे म्हणून हे भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल”—मत्तय २४:१४.
१२. (अ) विस्तृत राज्याच्या साक्षीचा काय परिणाम झाला आहे? (ब) या शंकेखोर जगामध्ये ख्रिश्चनांसाठी कोणता धोका आहे?
१२ ही विस्तृत राज्याची साक्ष २३० पेक्षा अधिक राष्ट्रांपर्यंत पोहंचली आहे. ५० लाखाहून अधिक खरे शिष्य आधीच या कार्यात भाग घेत आहेत आणि आणखी पुष्कळांना एकत्र केले जात आहे. परंतु जर आपण पृथ्वीच्या ५६० कोटी रहिवाशांसोबत शिष्यांच्या संख्येची तुलना केली तर येशूच्या दिवसांप्रमाणे मानवजातीच्या बहुतांश लोकांना देव राज्याचा अर्थ समजत नाही हे स्पष्ट आहे. आधी भाकीत केल्याप्रमाणे पुष्कळजण थट्टा करून म्हणतात: “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे?” (२ पेत्र ३:३, ४) ख्रिस्ती या नात्याने, त्या लोकांचा आत्मसंतुष्ट, शंकेखोर, भौतिक दृष्टिकोन देवाच्या राज्याच्या विशेषाधिकारांच्या आपल्या दृष्टिकोनावर हळूहळू प्रभाव होण्याचा धोका आहे. जगिक लोकांमध्ये राहत असल्यामुळे आपण सहजपणे त्यांची मनोवृत्ती आणि त्यांचे रीतीरीवाज आपल्यामध्ये घेऊ शकतो. तेव्हा देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेऊन’ त्याजशी जडून राहणे किती महत्त्वपूर्ण आहे बरे!
देव राज्याच्या संबंधाने स्वतःचे परीक्षण करणे
१३. देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करा या आज्ञेच्या अनुषंगाने आपण समजबुद्धीने ‘ऐकत’ आहोत याचे आपण कसे परीक्षण करू शकतो?
१३ आपण ज्या कापणीच्या काळात जगत आहोत त्याबद्दल येशू म्हणाला: “मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा [करतील] . . . तेव्हा नीतिमान् आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको.” (मत्तय १३:४१, ४३) देव राज्याचा प्रचार करा आणि शिष्य बनवा ही आज्ञा तुम्ही आज्ञाधारक प्रतिसादाने सतत ‘ऐकत’ आहात का? आठवण करा, ‘चांगल्या जमिनीत पेरलेला याने वचन ऐकले आणि त्याचा अर्थ समजून घेतला’ आणि चांगले फळ उत्पन्न केले.—मत्तय १३:२३.
१४. सूचना दिल्या जातात तेव्हा दिलेल्या सल्ल्याचा आपल्याला ‘अर्थ समजत’ आहे हे आपण कसे दाखवतो?
१४ व्यक्तिगत अभ्यास करताना आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहते वेळी आपण आपले ‘अंतःकरण सुज्ञानाकडे लावले’ पाहिजे. (नीतिसूत्रे २:१-४) वर्तन, पेहराव, संगीत आणि करमणूक याविषयी सल्ला दिला जातो तेव्हा, आपण तो सल्ला आपल्या अंतःकरणात खोलवर उतरवला पाहिजे व आवश्यक ती सुधारणा करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे. केव्हाही वादविवाद करू नका, सबबी सांगू नका, किंवा त्याला प्रतिसाद देण्यास दुर्लक्ष करू नका. देवाचे राज्य आपल्या जीवनात वास्तविक असल्यास आपण त्याच्या दर्जांनुरुप जीवन व्यतीत करू व इतरांना त्याची घोषणा आवेशाने करू. येशू म्हणाला: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.”—मत्तय ७:२१-२३.
१५. ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटणे’ महत्त्वपूर्ण का आहे?
१५ आवश्यक असणारे अन्न, वस्त्र आणि निवारा याविषयी चिंता करण्याची मानवी प्रवृत्तीच आहे, पण येशू म्हणाला: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३, ३४) प्राथमिक गोष्टींना मांडताना तुमच्या जीवनात देव राज्याला प्रथम स्थानी ठेवा. आवश्यकतांमध्ये समाधानी राहून आपले जीवन सरळ ठेवा. अनावश्यक कार्ये व संपादणुकी वाईट नसल्यामुळे त्या स्वीकारयोग्य आहेत, कदाचित असा वाद करून आपले जीवन त्यांनी गजबजून टाकणे मूर्खपणाचे असेल. हे जरी खरे असले तरी, अशा अनावश्यक गोष्टी मिळवणे व त्यांचा वापर केल्याने आपल्या व्यक्तिगत अभ्यासाचा आराखडा बनवणे, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि प्रचार कार्यात सहभाग घेणे यावर काय परिणाम होईल? येशू म्हणाला, की देवाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे; “त्याला एक अति मोलवान् मोती आढळले [आणि] मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.” (मत्तय १३:४५, ४६) आपल्यालाही देवाच्या राज्याबद्दल असेच वाटले पाहिजे. देमासला “ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे” त्याने सेवेचा त्याग केला तर, आपण त्याचे अनुकरण न करता पौलाचे अनुकरण केले पाहिजे.—२ तीमथ्य ४:१०, १८; मत्तय १९:२३, २४; फिलिप्पैकर ३:७, ८, १३, १४; १ तीमथ्य ६:९, १०, १७-१९.
“अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही”
१६. देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेतल्याने’ गैरवर्तन टाळण्यास आपल्याला कशी मदत होईल?
१६ करिंथमधील मंडळी अनैतिकतेला मोकळीक देत होती तेव्हा पौलाने उघडपणे म्हटले: “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) आपण देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेतला’ तर, आपण जोपर्यंत ख्रिस्ती सेवेत व्यग्र असलेले यहोवा पाहतो तोपर्यंत तो अनैतिकतेचा एखादा प्रकार सहन करील असा विचार करून आपण स्वतःची फसवणूक करणार नाही. अशुद्धपणाचे आपल्यामध्ये नावसुद्धा निघू नये. (इफिसकर ५:३-५) या जगाच्या दूषित विचारसरणीचा किंवा चालचालणुकीचा काही अंश आपल्या जीवनात हळूवारपणे शिरकाव करत असल्याचे तुम्हाला आढळून येते का? त्यांना लगेचच तुमच्या जीवनातून काढून टाका! देवाचे राज्य इतके मौल्यवान आहे ज्याला अशा गोष्टींपायी गमावता येणार नाही!—मार्क ९:४७.
१७. देवाच्या राज्याची गुणग्राहकता कशाप्रकारे नम्र होण्यास व अडखळण्याची कारणे टाळण्यास प्रवृत्त करील?
१७ येशूच्या शिष्यांनी विचारले: “स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण?” येशूने त्यांच्यामध्ये एका बाळकाला उभे करून असे उत्तर दिले: “मी तुम्हास सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करितो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.” (मत्तय १८:१-६) गर्विष्ठ, अवास्तव अपेक्षा करणारे, निष्काळजी व अधार्मिक देवाच्या राज्यात जाणार नाहीत किंवा त्या राज्याची प्रजा होणार नाहीत. तुमच्या बांधवांबद्दलची तुमची प्रीती, तुमचा नम्रपणा, तुमचे ईश्वरी भय तुमच्या वर्तनाने इतरांना अडखळण होण्याचे टाळण्यास तुम्हाला प्रवृत्त करते का? किंवा मग तुमच्या या मनोवृत्तीचा आणि वर्तनाचा प्रभाव इतरांवर कसा होईल याची पर्वा न करता तुम्ही तुमच्या “हक्कांवर” जोर देतच राहता का?—रोमकर १४:१३, १७.
१८. देवाचे राज्य “स्वर्गात तसे पृथ्वीवरहि” त्याची इच्छा पूर्ण करील तेव्हा आज्ञाधारक मानवजातीवर कोणता परिणाम होईल?
१८ आपला स्वर्गीय पिता यहोवा लवकरच, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” या कळकळीने केलेल्या प्रार्थनेचे पूर्णपणे उत्तर देईल. फार लवकर राज्य करणारा राजा, येशू ख्रिस्त न्याय करण्यासाठी “शेरडांपासून मेंढरे” वेगळे करण्याकरता त्याच्या सिंहासनावर बसेल या अर्थाने तो येईल. त्या नियुक्त वेळी “राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.’” शेरडे “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील; आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.” (मत्तय ६:१०; २५:३१-३४, ४६) ‘मोठे संकट’ जुन्या व्यवस्थीकरणाला तसेच देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेण्यास’ नकार देणाऱ्यांना पूर्णपणे पुसून टाकील. परंतु “मोठ्या संकटातून” बचावलेले लाखो आणि पुनरुत्थान होईल असे कोट्यावधी, पुनःस्थापित पार्थिव परादीसमध्ये अनंतकाळासाठी राज्याच्या आशीर्वादांचा वारसा प्राप्त करतील. (प्रकटीकरण ७:१४) देवाचे राज्य हे स्वर्गातून शासन करणारे पृथ्वीवरचे नवे सरकार आहे. ते सरकार, पृथ्वी आणि मानवजातीसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्णत्वाला नेईल आणि हे सर्व काही त्याच्या सर्वात पवित्र नामाच्या पवित्रीकरणासाठी केले जाईल. तेव्हा हा वारसा, कार्य करण्यास, त्याग करण्यास व थांबून राहण्यास योग्य नाही का? देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेण्याचा’ आमच्यासाठी हाच अर्थ असला पाहिजे!
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ देवाचे राज्य काय आहे?
◻ येशूचे ऐकणाऱ्या बहुतेकांना देवाच्या राज्याचा ‘अर्थ का समजला’ नाही?
◻ कशाप्रकारे देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजून घेतल्याने’ आशीर्वाद आणि जबाबदारी येते?
◻ प्रचार करण्याच्या बाबतीत आपल्याला देव राज्याचा ‘अर्थ समजला’ आहे हे काय सूचित करते?
◻ दिलेल्या सल्ल्याचा ‘अर्थ’ आपल्याला समजला आहे हे आपण आपल्या वर्तनाने कसे दाखवतो?
[१७ पानांवरील चित्रं]
येशूच्या शिष्यांना देवाच्या राज्याचा ‘अर्थ समजला’ आणि त्यांनी चांगली फळे उत्पन्न केली