देवाच्या कळपाचे प्रीतीने पालन करणे
“तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा.”—१ पेत्र ५:२.
१, २. यहोवाचा प्रमुख गुण कोणता आहे व तो कसा प्रदर्शित होतो?
प्रीती हा देवाचा प्रमुख गुण, म्हणून संपूर्ण पवित्र शास्रवचनात स्पष्ट करण्यात आला आहे. “देव प्रीति आहे,” असे १ योहान ४:८ सांगते. त्याची प्रीती कार्यात व्यक्त होत असल्यामुळे, १ पेत्र ५:७ म्हणते की, देव “तुमची काळजी घेतो.” बायबलमध्ये यहोवा जशी त्याच्या लोकांची काळजी घेतो त्याची तुलना एक प्रेमळ मेंढपाळ आपल्या मेंढरांची प्रेमळपणे काळजी घेतो त्यासोबत केली आहे: ‘पाहा! प्रभु परमेश्वर [यहोवा, NW] . . . मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेंत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्यांस संभाळून नेईल.’ (यशया ४०:१०, ११) “परमेश्वर [यहोवा, NW] माझा मेंढपाळ आहे,” हे म्हटल्यावर दाविदाला किती सांत्वन मिळाले होते.—स्तोत्र २३:१.
२ देवाची कृपा असलेल्या लोकांना बायबल मेंढरांची उपमा देते ते योग्यच आहे, कारण मेंढरे शांतीप्रिय असतात आणि त्यांची काळजी घेणाऱ्या मेंढपाळाच्या अधीन व आज्ञांकित असतात. प्रेमळ मेंढपाळ या नात्याने यहोवा त्याच्या मेंढरासमान लोकांची अतिशय काळजी घेतो. त्यांचे भौतिक व आध्यात्मिकरित्या पोषण आणि त्यांना ‘या दुष्ट जगातील शेवटल्या काळात’ आपल्या आगामी धार्मिक नव्या जगाकडे मार्गदर्शित करण्याद्वारे तो हे दाखवतो.—२ तीमथ्य ३:१-५, १३; मत्तय ६:३१-३४; १०:२८-३१; २ पेत्र ३:१३.
३. यहोवा त्याच्या मेंढरांची ज्याप्रकारे काळजी घेतो त्याविषयीचे वर्णन स्तोत्रकर्ता कसे करतो?
३ यहोवा आपल्या मेंढरांसाठी बाळगत असलेल्या प्रेमळ काळजीकडे लक्ष द्या: “परमेश्वराचे [यहोवा, NW] नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. . . . नीतिमान धावा करितात, तो ऐकून परमेश्वर [यहोवा] त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करितो. परमेश्वर [यहोवा] भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो. नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर [यहोवा] त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” (स्तोत्र ३४:१५-१९) सार्वभौम मेंढपाळ त्याच्या मेंढरासमान लोकांना किती अधिक सांत्वन पुरवितो!
उत्तम मेंढपाळाचे उदाहरण
४. देवाच्या कळपाची काळजी घेण्यात येशूची भूमिका कोणती आहे?
४ देवाचा पुत्र येशू, त्याच्या पित्याकडून चांगल्याप्रकारे शिकला; कारण बायबल येशूला “उत्तम मेंढपाळ” असे संबोधते. (योहान १०:११-१६) देवाच्या कळपासाठी त्याच्या महत्त्वपूर्ण सेवेबद्दल प्रकटीकरणातील ७ व्या अध्यायात नमूद केले आहे. ९ व्या वचनात आमच्या दिवसातील देवाच्या सेवकांना ‘सर्व राष्ट्रे, वंश लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारा . . . मोठा लोकसमुदाय’ असे म्हटले आहे. मग १७ वे वचन सांगते: “कोकरा [येशू] त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” येशू देवाच्या मेंढरांना सार्वकालिक जीवनाकडे निरविणाऱ्या सत्याच्या पाण्याकडे मार्गदर्शित करतो. (योहान १७:३) हे लक्षात घ्या की, येशूला “कोकरा” म्हटले आहे. तो देवाला अधीनता दाखविण्यात प्रमुख उदाहरण असल्यामुळे हे त्याच्या मेंढरासमान गुणांना सूचित करते.
५. येशूला लोकांबद्दल काय वाटले?
५ पृथ्वीवर येशू मानवांमध्ये वावरला व त्याने त्यांच्या करुणामय परिस्थितींना पाहिले. त्यांच्या या अवस्थेबद्दल त्याने कसा प्रतिसाद दाखविला? “तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) काळजी न घेणारा मेंढपाळ असल्यावर मेंढरांना ज्याप्रमाणे त्रास होतो तशाचप्रकारे मेंढपाळ नसल्यावर लुटारुंकडून मेंढरांना अतिशय त्रास होतो. परंतु येशूने अधिक काळजी घेतली कारण त्याने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवांस विसावा मिळेल; कारण माझे जूं सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.
६. येशूने त्रस्त असलेल्या लोकांबद्दल काळजी कशी दाखवली?
६ येशू लोकांसोबत प्रेमळपणे वागेल असे बायबलच्या भविष्यवाणीने भाकीत केले होते: “परमेश्वराने [यहोवा, NW] मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांस पट्टी बांधावी, . . . सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे.” (यशया ६१:१, २; लूक ४:१७-२१) येशूने गरीब व दुर्दैवी जनांकडे तुच्छतेने कधीही पाहिले नाही. उलटपक्षी, त्याने यशया ४२:३ ची पूर्णता केली: “चेपलेला बोरू तो मोडणार नाही मिणमिणती वात तो विझविणार नाही.” (पडताळा मत्तय १२:१७-२१.) पीडित जन चेपलेल्या बोरूप्रमाणे होते, तेल नसल्यामुळे मालवण्याच्या बेताला आलेल्या वातीसारखे होते. येशूने त्यांची दयनीय अवस्था ओळखून त्यांना दया दाखवली व बळ आणि आशा प्रदान करून आध्यात्मिक व शारीरिकरित्या त्यांना बरे केले.—मत्तय ४:२३.
७. येशूने त्याला प्रतिसाद दाखवत असलेल्या लोकांना कोठे मार्गदर्शित केले?
७ मेंढरासमान लोकांनी मोठ्या संख्येने येशूला प्रतिसाद दिला. त्याची शिकवण इतकी प्रभावी होती की, त्याला धरण्यासाठी पाठविलेल्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” (योहान ७:४६) इतकेच नव्हे, तर दांभिक धार्मिक नेत्यांनी देखील तक्रार केली: “जग त्याच्यामागे चालले आहे”! (योहान १२:१९) परंतु येशूला स्वतःसाठी आदर व महिमा नको होती. त्याने लोकांना त्याच्या पित्याकडे निर्देशिले. प्रेमापोटी यहोवाच्या प्रशंसनीय गुणांबद्दल त्याची सेवा करावी असे त्याने त्यांना शिकवले: “तू आपला देव परमेश्वर [यहोवा, NW] ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीति कर.”—लूक १०:२७, २८.
८. देवाचे लोक त्याला दाखवत असलेला आज्ञांकितपणा इतर लोक जगीक नेत्यांना दाखवत असलेल्या आज्ञांकितपणापेक्षा वेगळा कसा आहे?
८ यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाला त्याच्या मेंढरासमान लोकांनी प्रेमापोटी पाठबळ दिल्यामुळे त्याची महिमा होते. त्याच्या प्रेमळ गुणांचे ज्ञान असल्यामुळे ते स्वेच्छेने त्याची सेवा करण्याची निवड करतात. ही गोष्ट या जगातील अधिकाऱ्यांपेक्षा किती वेगळी आहे, कारण त्यांची प्रजा केवळ भीतीपोटी नाखुशीने किंवा त्यांच्या काही अंतस्थ हेतूमुळे त्यांचे आज्ञापालन करीत असतात! रोमन कॅथलिक चर्चच्या पोपविषयी जे म्हटले आहे ते यहोवा किंवा येशूबद्दल कधीही म्हणता येणार नाही की, “अनेकांनी पोपची प्रशंसा केली, सर्वांनी त्याचे भय बाळगले, पण कोणालाही त्याच्याबद्दल प्रेम वाटले नाही.”—ख्रिस्ताचे व्हिकार्स—पोपच्या अधिकाराचे किळसवाणे पैलू, पीटर दी रोसा.
इस्राएलात क्रूर मेंढपाळ
९, १०. प्राचीन इस्राएलातील व पहिल्या शतकातील नेत्यांचे वर्णन करा.
९ येशूच्या दिवसात इस्राएलातील धार्मिक नेते त्याच्याप्रमाणे नसून आपल्या मेंढरांबद्दल त्यांना कसलेही प्रेम नव्हते. ते इस्राएलातील आधीच्या शासकांप्रमाणे होते, ज्यांच्याविषयी यहोवाने असे म्हटले: “जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांस धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही? . . . निर्बलांस बलवान् करीत नाही, रोग्यांस बरे करीत नाही, घायाळांचे घाय बांधीत नाही, घालवून दिलेल्यांस परत आणीत नाही, हरवलेल्यांस शोधीत नाही; तर तुम्ही त्यांजवर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता.”—यहेज्केल ३४:२-४.
१० पहिल्या शतकातील यहूदी धार्मिक नेते त्या राजकीय मेंढपाळांप्रमाणे कठोर अंतःकरणाचे होते. (लूक ११:४७-५२) याचे स्पष्टीकरण देण्यासाठी लुटलेल्या, मारलेल्या, व अर्धमेला करुन रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या एका यहुद्याबद्दल येशूने सांगितले. एक इस्राएल याजक त्याच वाटेने आला; पण यहुद्याला पाहून तो दुसऱ्या बाजूने चालता झाला. एका लेव्याने देखील तसेच केले. मग एक गैर-इस्राएली, तुच्छ शोमरोनी त्या वाटेने आला आणि त्याला त्याचा कळवळा आला. त्याने त्याच्या जखमा बांधल्या, जनावरावर बसवून त्याला उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. उतारशाळेच्या रक्षकाला पैसे देऊन म्हटले, जो काही अधिक खर्च होईल तो मी परत आल्यावर त्यांस देईल.—लूक १०:३०-३७.
११, १२. (अ) येशूच्या दिवसात धार्मिक नेत्यांची दुष्टता कळसास कशी पोहंचली? (ब) रोमी लोकांनी सरतेशेवटी धार्मिक नेत्यांना काय केले?
११ येशूच्या दिवसातील धार्मिक नेते इतके भ्रष्ट होते की, जेव्हा येशूने लाजारचे मेलेल्यातून पुनरूत्थान केले तेव्हा, मुख्य याजक व परुश्यांनी सन्हेद्रीन भरवून म्हटले: “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य [येशू] तर पुष्कळ चिन्हे करतो; आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रहि हिरावून घेतील.” (योहान ११:४७, ४८) मृत मनुष्यासाठी येशूने जे चांगले केले याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांना आपल्या स्थानांची काळजी वाटत होती. यास्तव, “त्या दिवसापासून त्यांनी त्याला [येशूला] जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला.”—योहान ११:५३.
१२ त्यांच्या दुष्टतेत अधिक भर घालून, मुख्य याजकांनी “लाजारालाहि जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवीत होते.” (योहान १२:१०, ११) त्यांच्या स्थानांचे संरक्षण करण्याचा त्यांचा स्वार्थी प्रयत्न व्यर्थ ठरला, कारण येशूने त्यांना म्हटले: “तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्तय २३:३८) या शब्दांच्या पूर्णतेत, त्या पिढीत रोमी लोकांनी येऊन ‘त्यांचे स्थान व त्यांचे राष्ट्र’ तसेच त्यांचे जीव देखील घेतले.
ख्रिस्ती मंडळीत प्रेमळ मेंढपाळ
१३. यहोवाने त्याच्या कळपाचे पालन करण्यासाठी कोणाला पाठविण्याचे अभिवचन दिले?
१३ यहोवाने त्याच्या कळपाची काळजी घेण्यासाठी क्रूर व स्वार्थी मेंढपाळांऐवजी येशूला उत्तम मेंढपाळ असे नेमले. तसेच मेंढरांची काळजी घेण्यासाठी त्याने प्रेमळ सह मेंढपाळांना नेमण्याचे अभिवचन देखील दिले: “मी त्यांजवर मेंढपाळ नेमीन, ते त्यांस चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत.” (यिर्मया २३:४) अशाप्रकारे, पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांप्रमाणेच आजही, ‘प्रत्येक नगरात वडिलांची नेमणूक’ केली जाते. (तीतास १:५) शास्त्रवचनात दिलेल्या योग्यता पूर्ण करीत असलेल्या आध्यात्मिक वडिलांनी “देवाच्या कळपाचे पालन” करावयाचे आहे.—१ पेत्र ५:२; १ तीमथ्य ३:१-७; तीतास १:७-९.
१४, १५. (अ) शिष्यांना कोणती मनोवृत्ती विकसित करण्याचे कठीण वाटले? (ब) वडिलांनी लीन सेवक असावे हे दाखवण्यासाठी येशूने काय केले?
१४ मेंढरांची काळजी घेताना, त्यांच्याबद्दल वडिलांना ‘मुख्यतः एकनिष्ठ प्रीती’ असली पाहिजे. (१ पेत्र ४:८) परंतु येशूच्या शिष्यांना प्रतिष्ठा व स्थानाची अतिशय काळजी वाटत असल्यामुळे त्यांना हे शिकावे लागले. यास्तव, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा,” असे दोन शिष्यांच्या आईने येशूला म्हटले तेव्हा इतर शिष्यांना राग आला. येशूने त्यांना म्हटले: “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकहि अधिकार करितात, हे तुम्हांस ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही; तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.”—मत्तय २०:२०-२८.
१५ दुसऱ्या एका प्रसंगी, “सर्वात मोठा कोण” याविषयी त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर, येशूने त्यांना म्हटले: “जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” (मार्क ९:३४, ३५) मनाची दीनता व सेवा करण्याची स्वेच्छा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होण्याची आवश्यकता होती. तरीही, शिष्यांना त्या कल्पनेबद्दल कठीण वाटतच होते, कारण येशूच्या मृत्यूच्या शेवटल्या सांज भोजनाच्या आदल्या रात्रीच, त्यांच्यामध्ये कोण मोठा मानला जात आहे ह्याविषयी “वाद” झाला होता! वडिलाने कळपाची सेवा कशी करावी हे, स्वतःला लीन करुन त्यांचे पाय धुण्याकरवी येशूने त्यांना दाखवले असताना देखील त्यांच्यामध्ये ही गोष्ट घडली. त्याने म्हटले: “म्हणून मी प्रभु व गुरू असूनहि जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—लूक २२:२४; योहान १३:१४, १५.
१६. १८९९ मध्ये वडिलांच्या अधिक महत्त्वाच्या गुणांबद्दल वॉचटावर नियतकालिकाने कोणते विवेचन मांडले?
१६ वडिलांनी असे असले पाहिजे ही गोष्ट यहोवाच्या साक्षीदारांना नेहमीच शिकवली आहे. जवळजवळ एका शतकाआधी, एप्रिल १, १८९९ च्या वॉचटावर नियतकालिकाने १ करिंथकर १३:१-८ मधील पौलाचे शब्द उद्धृत केले व मग म्हटले: “प्रेषिताने स्पष्टपणे दाखविले की, ज्ञान व वक्तृत्वपूर्ण भाषण या अधिक महत्त्वाच्या परीक्षा नाहीत, पण अंतःकरणात शिरणारी व जीवनाच्या सर्व मार्गाक्रमणात दिसणारी व आपल्या मर्त्य शरीराला प्रवृत्त करणारी व चालवणारी प्रीती हीच एक खरी परीक्षा—आमच्या ईश्वरी नातेसंबंधाचा खरा पुरावा आहे. . . . पवित्र गोष्टींची सेवा करण्यासाठी चर्चचा सेवक म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या प्रत्येकात प्रथम प्रीतीचा आत्मा हा प्रमुख गुण पाहिला गेला पाहिजे.” ज्या व्यक्ती प्रेमापोटी सेवा करणार नाहीत, “त्या असुरक्षित शिक्षक आहेत, व त्यांची चांगले करण्याऐवजी नुकसान करण्याचीच शक्यता जास्त असते,” असे उद्धृत केले.—१ करिंथकर ८:१.
१७. वडिलांजवळ जे गुण असले पाहिजेत यावर बायबल कसा जोर देते?
१७ याप्रकारे, वडिलांनी मेंढरांवर “धनीपण करणारे” असू नये. (१ पेत्र ५:३) त्याऐवजी, त्यांनी “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू” होण्यात पुढाकार घेतला पाहिजे. (इफिसकर ४:३२) पौलाने जोर देऊन म्हटले: “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. . . . पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१२-१४.
१८. (अ) मेंढरांसोबत वागताना पौलाने कोणते उत्तम उदाहरण मांडले? (ब) वडिलांनी मेंढरांच्या गरजांकडे दुर्लक्ष का करु नये?
१८ पौल हे करण्याचे शिकला, तो म्हणतो: “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:७, ८) याच्या एकवाक्यतेत त्याने म्हटले: “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१४) मेंढरांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची समस्या आणली, तरी वडिलांनी नीतीसूत्रे २१:१३ ची आठवण ठेवावी: “गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालितो तोहि आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.”
१९. प्रेमळ वडील आशीर्वाद का आहेत व अशा प्रीतीला मेंढरे प्रतिसाद कसा देतात?
१९ कळपाचे पालन प्रेमाने करणारे वडील, मेंढरांसाठी आशीर्वाद असे ठरतात. यशया ३२:२ मध्ये भाकीत केले होते: “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.” आमचे अनेक वडील या तजेला देणाऱ्या सुंदर वर्णनाप्रमाणेच आहेत हे जाणणे आनंदाचे आहे. खालील तत्त्वाचा अवलंब करण्यास ते शिकले आहेत: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) वडील जेव्हा अशाप्रकारची प्रीती व लीनता दाखवतात, तेव्हा मेंढरे त्यांना “त्यांच्या कामामुळे प्रीतीने अत्यंत मान” देतात.—१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३.
स्वेच्छेच्या वापरासाठी आदर दाखवा
२०. वडिलांनी स्वेच्छेचा आदर का केला पाहिजे?
२० मानव स्वतःचे निर्णय घेऊ शकतील अशा रीतीने यहोवाने त्यांची निर्मिती केली. वडील सल्ला व वाग्दंड देखील देत असले, तरी त्यांना इतरांच्या जीवनावर किंवा विश्वासावर सत्ता गाजवायची नाही. पौलाने म्हटले: “आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिति आहे ती विश्वासाने आहे.” (२ करिंथकर १:२४) होय, “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) यहोवाने त्याच्या नियमांच्या व तत्त्वांच्या मर्यादेत आपल्याला अधिक स्वातंत्र्य दिले आहे. यास्तव, शास्त्रवचनीय तत्त्वांचे उल्लंघन होत नाही तेथे वडिलांनी नियम बनविण्याचे टाळले पाहिजे. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कल्पनांना एक मतप्रणाली समजून प्रस्तुत करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोध केला पाहिजे किंवा अशा दृष्टिकोनांशी कोणी सहमत नसल्यास स्वतःच्या अहंकारी वृत्तीमुळे अडथळा आणू देऊ नये.—२ करिंथकर ३:१७; १ पेत्र २:१६.
२१. पौलाच्या फिलेमोनासाठी असलेल्या मनोवृत्तीवरुन काय शिकले जाऊ शकते?
२१ पौल रोममध्ये तुरुंगात असताना, आशिया मायनरच्या कलस्सैमधील एका ख्रिस्ती दासाचा स्वामी, फिलेमोन याबरोबर कसा वागला हे लक्षात घ्या. फिलेमोनचा दास अनेसिम रोमला पळून गेला, ख्रिस्ती बनला व तो पौलाला मदत करीत होता. पौलाने फिलेमोनाला लिहिले: “सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते; तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.” (फिलेमोन १३, १४) पौलाने अनेसिमला पाठविले व त्याला एका ख्रिस्ती बांधवासारखी वागणूक देण्यास फिलेमोनाला सांगितले. हा कळप त्याचा नव्हे तर देवाचा आहे, हे पौलाला माहीत होते. तो त्याचा धनी नव्हे तर त्याचा सेवक होता. पौलाने फिलेमोनाला हुकूम दिला नाही; त्याने त्याच्या स्वेच्छेचा आदर केला.
२२. (अ) वडिलांनी त्यांच्या स्थानाविषयी काय समजले पाहिजे? (ब) यहोवा कोणत्या प्रकारची संघटना विकसित करीत आहे?
२२ देवाची संघटना जसजशी वाढते तसे अधिक वडिलांना नियुक्त केले जाते. त्यांनी तसेच अधिक अनुभवी वडिलांनी, त्यांचे स्थान नम्र सेवेचे असल्याचे ओळखले पाहिजे. अशाप्रकारे, देव त्याच्या संघटनेला नवीन जगाकडे निरवतो तसे—सुसंघटित पण परिणामकारकतेसाठी प्रीती व दया या गुणांवर पाणी न सोडता तो त्याच्या इच्छेप्रमाणे तिला वाढवित राहतो. यास्तव, त्याची संघटना मेंढरासमान लोकांसाठी अधिक आकर्षक होत राहील व ते “देवावर प्रीति करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात” याचा पुरावा पाहतील. प्रीतीवर आधारित असलेल्या संघटनेकडून ही अपेक्षा केली जाऊ शकते, कारण “प्रीति कधी अंतर देत नाही.”—रोमकर ८:२८; १ करिंथकर १३:८.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ यहोवाची त्याच्या मेंढराबद्दलची काळजी याचे वर्णन बायबल कसे करते?
▫ देवाच्या कळपाची काळजी घेण्यात येशू कोणती भूमिका पूर्ण करतो?
▫ वडिलांजवळ कोणता प्रमुख गुण असला पाहिजे?
▫ वडिलांनी मेंढरांच्या स्वेच्छेचा विचार का केला पाहिजे?
[चित्र]
“उत्तम मेंढपाळ,” येशूने दया दाखवली
[चित्रं]
भ्रष्ट धार्मिक नेत्यांनी येशूला ठार मारण्याचा कट रचला