एक नापीक जमीन सुपीक होते
आर्थर मलीनद्वारे कथित
तो निरभ्र दिवस, १९३० मधील वसंत ऋतूचा होता व मी ब्रिटिश कोलंबिया येथील प्रिन्स रूपर्ट या शहराच्या गोदीवर उभा होतो. मी विश्रांती घेत असताना खाली समुद्रावरील बोटीकडे पाहून विचार केला की ‘सर्व पाणी गेले कोठे?’ कॅनडातील पश्चिम किनाऱ्याच्या पॅसिफिक महासागरावरील समुद्राची भरती व ओहोटी पाहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. तेथे समुद्राची पातळी केवळ सहा तासांमध्येच २४ फुटापेक्षाही कमी होऊ शकते. परंतु प्रेअरी भागातील शेतामध्ये काम करणारा मुलगा पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर कसा आला?
शॉरमॅनच्या गटाबरोबर मिळून यहोवासाठी पूर्णवेळेच्या सेवेची सुसंधी वाढविण्याचे आमंत्रण मला मिळाले होते. आमची नेमणूक, व्हॉनकोवर ते अलास्कापर्यंतच्या दूरवरील पश्चिम किनाऱ्यावर प्रचारकार्य वाढविणे ही होती. या विस्तारीत क्षेत्रातील पुष्कळ मैलांचा भाग ब्रिटिश कोलंबियाच्या किनारपट्टीचा आहे व तेथे यहोवाचे गौरव करणाऱ्या लोकांची उणीव होती. प्रिन्स रूपर्ट या शहरामध्ये राज्य घोषकांचा एक लहान गट हाच फक्त याचा अपवाद होता.
प्रचाराचे कार्य सुरू करण्यास मी फार-आतुर होतो, म्हणून रेल्वेमधून उतरल्यावर मी लगेच गोदीकडे शॉरमॅन बोट पाहण्यास आणि तिच्यातील ऑर्नी व ख्रिस्टीना ब्रॉरर्स्टड यांना भेटण्यास चालू लागलो. त्या बोटीमध्ये कोणीही नव्हते म्हणून मी तेथून निघून गेलो. मी परतल्यावर, त्याच दिवशी नंतर मला धक्काच बसला. महासागर जणू आटत चालला आहे असे दिसत होते.
परंतु ह्या नेमणुकीत माझ्यामध्ये आवड कशाने निर्माण केली?
एक आध्यात्मिक वारसा
अल्बर्टा कॅनडा या मैदानी प्रदेशातील घरात माझ्यामध्ये आध्यात्मिक गोष्टींबद्दल रसिकता वाढू लागली. माझ्या वडिलांना झायन्स् वॉचटावर ट्रॅक्ट संस्थेचे चार्ल्स टेझ रसेल यांनी लिहिलेली पत्रिका मिळाली होती जिने त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये बदल केला. कलमॉर अल्बर्टा येथील शेतीच्या कामात अधिक वेळ लागत असतानाही वडिलांनी शेजाऱ्यांना प्रचार करण्यास सुरवात केली. ते शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १८९० च्या दशकाच्या आरंभाला होते.
फेब्रुवारी २०, १९०५ मध्ये या देवभिरु कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझा आठवा क्रमांक होता व सरतेशेवटी आम्ही दहा बहीण भाऊ झालो. वडील व या स्वीडीश समाजातील इतरजण आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांच्या बरोबर सलंग्न झाले. कालांतराने, एकत्र मिळण्यास एक सभागृह उभारले, ज्याला नंतर राज्य सभागृह असे संबोधण्यात आले. कॅनडातील सभागृहांपैकी ते पहिले होते.
शेतीमुळे ख्रिस्ती सभेला उपस्थित राहण्यापासून आम्ही कधीही परावृत्त झालो नाही. त्यामध्ये वॉचटावर संस्थेने भेटी देण्यास पाठवलेल्या वक्त्यांद्वारे देण्यात येणारी भाषणे सादर केली जात होती. ह्या भाषणांनी आमच्यामध्ये प्रचाराच्या कार्यात भाग घेण्याची प्रामाणिक इच्छा निर्माण केली. त्याचा परिणाम असा झाला की, आमच्या कुटुंबातील सर्वजण बायबलच्या निश्चल अशा सत्याच्या प्रकाशात चालले आहेत.
प्रचार कार्यात सहभाग घेणे
१९२० च्या दशकात मला साक्षकार्याची पहिली नेमणूक देण्यात आली. मला एडमोंटन या शहरामध्ये दारोदारी जाहीर भाषणाची आमंत्रण पत्रिका वितरीत करायची होती. त्या दिवशी मी एकटाच तेथे उभा असताना, यहोवावर भाव ठेवा हा मोलवान धडा अनुभवाद्वारे शिकलो. (नीतीसूत्रे ३:५, ६) यहोवाच्या मदतीने ती पहिली नेमणूक पूर्ण करण्यास मी किती आनंदी होतो!
यहोवाच्या सत्य वचनाची अधिक समज पुरविल्याने, त्याची दृश्य संस्था तसेच विश्वासू व बुध्दिमान दास वर्ग यांच्यावरील माझा आत्मविश्वास वाढत राहिला. ख्रिस्ती धर्मातील, नाताळ तसेच वाढदिवस या विधिंसारख्या जुळवलेल्या पुष्कळ पद्धती व चालीरिती सोडून दिल्या होत्या. व्यक्तिगत तारण ही चिंतेची बाब राहिली नव्हती, उलट राज्य प्रचाराला योग्य महत्त्व दिले जात होते. या सर्व गोष्टींचा माझ्या जीवनावर बराच खोलवर परिणाम झाला. म्हणून एप्रिल २३, १९२३ मध्ये माझ्या समर्पणानंतर काही काळातच मी पूर्णवेळेच्या सेवेला माझे ध्येय बनविले.
आम्ही शून्य फॅरन्हाइट पेक्षा कमी तापमानाच्या प्रेअरीमधील हिवाळ्यात टांग्याच्या साहाय्याने ग्रामीण क्षेत्रांमध्ये साक्षकार्य केले. मी एका गटाबरोबर हाऊस कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाडीमध्ये दोन आठवडे घालविले. अशाप्रकारच्या खास कार कॅनडीयन प्रेअरी येथील पूर्णपणे मोकळ्या अशा क्षेत्रांमध्ये प्रचार करण्यास व्यवहारी ठरल्या. १९३० च्या त्या संस्मरणीय दिवशी मला पॅसिफिकच्या पश्चिम किनाऱ्यावर सेवा करण्याचे आमंत्रण मिळेपर्यंत आर्थिक समस्या, प्रखर हवामान व दूरदूरचा प्रवास यांचा सामना करावा लागत असतानाही मी अल्बर्टा येथे तीन वर्षांसाठी अधूनमधून पायनियर सेवा करू शकलो. मला समुद्राबद्दल व बोटींबद्दल काहीच माहीत नव्हते म्हणून त्या नित्रणामुळे मी गोंधळात पडलो.
लवकरच प्रिन्स रुपर्ट येथे पोहंचल्यावर बोटीवरील माझ्या नवीन सहकामगारांबरोबर मला बरे वाटले. बंधू ब्रॉर्स्टाड हे एक अनुभवी खलाशी होते व ते अनेक वर्षांपासून मासेमारीच्या व्यापारात गुंतलेले होते. पुढील सहा वर्षांचा काळ पुष्कळ प्रचार करण्याचा होता, ब्रिटिश कोलंबियाच्या किनारपट्टीवर वॉनकावर ते अलास्कापर्यंत आम्ही प्रवास केला. शिकायला मिळालेला दुसरा धडा असा होता: यहोवाकडून आलेली नेमणूक नेहमी स्वीकारा व ती स्वीकारण्यास कधीही कचरू नका.
समुद्रापाशी बी पेरणे
१९३० च्या वसंत ऋतुत आम्ही सर्वात प्रथम, केचीकन अलास्का या बंदरात थांबलो व तेथे आम्ही बायबलवर आधारित प्रकाशनांची ६० कार्टन भरले. अनेक आठवड्यांसाठी आम्ही केचीकन, रँगेल, पीटर्सबर्ग, जुन्यू, स्कागवे, हॅन्झ, सिटकॉ, व विखुरलेल्या लहान गावांमधील सर्व घरांना भेटी दिल्या. नतंर, उन्हाळा संपण्यापूर्वी आम्ही ब्रिटिश कोलंबियाच्या संपूर्ण किनाऱ्यावर प्रचार केला. दूरवर वसलेल्या छावण्या, मासळी-प्रक्रिया कारखाने, अमेरिकन इंडियन गावे, लहान गावे, एकाकी वसाहतीवाले व फासेपारधी यांनाही भेटी दिल्या गेल्या. दिपगृहाचे रक्षक कोणा ना कोणाला चर्चा करण्यास बोलवत असल्यामुळे त्यांना चुकवून जाणे कधी कधी कठीण होते.
कालांतराने, संस्थेने आम्हाला पोर्टेबल ग्रामोफोन व बायबलवर आधारित काही मुद्रित केलेली भाषणे पुरविली. पुस्तके, बायबल व नियतकालिकांसोबत आम्ही ते नेत होतो. किनारपट्टीच्या खडकांवर धडपडत चालतानाही आम्हासोबत ते न्यावे लागत होते. शांत ओहोटीच्या वेळी आम्हाला डळमळीत शिडीचा आधार घेऊन या सामानाला वर टाकावे लागत होते. तरुणपणी प्रेअरी शेतावर काम करून मला जे शारीरिक प्रशिक्षण मिळाले त्याबद्दल मी आनंदी आहे.
आमच्या बोटीवर लावलेली जाहीर भाषणाची व्यवस्था राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात एक शक्तिशाली साधन ठरले आहे. मुद्रित केलेली व्याख्याने पाण्यावरून प्रतिध्वनीत होत असल्याने पुष्कळ मैल दूर असलेल्या लोकांना ती ऐकू येत होती. वॉनकावरच्या बेटावरील एकांती सुरक्षित जागेत थांबलो असताना आम्ही यापैकीचे मुद्रित केलेले बायबल व्याख्यान ऐकवले. दुसऱ्या दिवशी समुद्रापासून दूर राहणाऱ्या लोकांनी आनंदाने आम्हास सांगितले: “काल आम्ही थेट स्वर्गातून प्रवचन ऐकले!”
दुसऱ्या प्रसंगी एका विवाहित जोडप्याने म्हटले की, त्यांना धुराड्यातून संगीताचा आवाज ऐकू आला; परंतु ते बाहेर गेल्यावर त्यांना काहीच ऐकू आले नाही. घरात गेल्यावर त्यांनी एक आवाज ऐकला. हे असे का होते? ते बाहेर असताना आम्ही रेकॉर्ड बदलत होतो. प्रथम लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी आम्ही संगीत व नंतर बायबलचे मुद्रित केलेले व्याखान लावत होतो.
आणखी दुसऱ्या प्रसंगी, आम्ही अमेरिकन इंडियन बेटावर थांबलो असताना, गावातील दोन तरुण मुले आवाज कोठून येत आहे हे पाहण्यास बोटीने तेथे आली. बेटावरील काहींना वाटले की, जिवंत झालेल्या त्यांच्या मृत व्यक्तींचाच तो आवज आहे.!
मासळीचे डब्बाबंदीकरण करणाऱ्या दूर दूरच्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांमध्ये एका दिवसात शंभर पुस्तकांचे वाटप करणे असामान्य नव्हते. कमी विचलित करणाऱ्या गोष्टींमुळे त्यांना आध्यात्मिक गोष्टींचा विचार करण्यास वेळ होता. सरतेशेवटी, या एकाकी लोकांपैकी पुष्कळजण साक्षीदार झाले. पुढील फेऱ्यामध्ये “उत्तेजनाची देवाणघेवाण व्हावी” यासाठी आम्ही त्यांना भेटण्याची वाट पाहत होतो.—रोमकर १:१२, NW.
विवाहीत सोबत्यासोबत चालू ठेवलेली सेवा
१९३१ मध्ये ख्रिस्टीना ब्रॉर्स्टाडची लहान बहीण ॲना हिच्याशी मी विवाह केला. नतंर आम्ही एकत्र मिळून बोटीने पायनियरींग कार्य करत राहिलो व त्या वर्षांमध्ये आम्ही पुष्कळ फलदायक अनुभवांचा आनंद लुटला. ऐश्वर्यशाली डोंगर, एकांतवास खाडी, उपसागर आणि जंगलातील पाइन वृक्ष, मोठी उंच हिरवीगार झाडी या पाश्वभूमीत समुद्रचर प्राणी, मोठे सील, लहान सील हे आमचे सोबती होते. पुष्कळ वेळा दमलेली हरिण व तिचे पाडस हे हल्लेखोर प्राण्यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून पलिकडे पोहून जाण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांची मदत केली.
एके दुपारी, आम्ही घार पाण्याच्या वर उडत असताना पाहिली. तिच्या पायात तिने सालमन मासा घट्टपणे पकडला होता. पाण्यातून पूर्णपणे वर काढण्यास हा मासा खूपच मोठा होता म्हणून ती घार त्या सालमन माश्याला किनाऱ्याकडे ओढून नेत होती. आमच्या गटातील फ्रॉक फ्रान्स्क् यांनी गरज ओळखून दमलेल्या घारीला गाठण्यासाठी किनाऱ्याच्या बाजूने धावत गेले व त्यांनी तिला आपली पकड सोडून देण्यास भाग पाडले. त्या सायंकाळी आमच्या पायनियर गटाला मासळीचे स्वादिष्ट असे जेवण मिळाले व नाखूश होऊन ह्या घारीने वाटून घेण्याचे शिकून घेतले.
वॉनकावरच्या बेटाच्या उत्तरेकडील एका लहान बेटावरील थिऑट नावाच्या एका जोडप्याने बायबलचे सत्य स्वीकारले. पती हा साधारण ९० धीच्या मध्यात, अशिक्षित, दृढ इच्छाशक्ती असलेला, स्वयंभू व्यक्ती होता व पत्नी ही साधारण ८० शीच्या मध्यात होती. तथापि, त्याला सत्याबद्दल इतकी आस्था होती की, त्याने स्वत:ला नम्र केले व त्याला वाचायला शिकविण्यास स्वतःच्या पत्नीला अनुमती दिली. लवकरच त्याला बायबलचा व संस्थेच्या प्रकाशनांचा अभ्यास स्वतः करता येऊ लागला. तीन वर्षांच्या आतच, आमच्या बोटीचा बाप्तिस्म्याची टाकी म्हणून वापर करून त्या दोघांनाही त्याच्या एकाकी बेटावरील घराजवळ बाप्तिस्मा देण्याचा आनंद मला मिळाला.
पॉवेल रिव्हर गावातील सॅलीस कुटुंब देखील राज्य संदेशास प्रतिसाद देत असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला. वॉल्टर यांनी युद्ध की शांती—कोणते? (इंग्रजी) ही पुस्तिका वाचली व त्यातील मजकूर हा सत्य आहे हे ताबडतोब ओळखले. त्यानंतर लवकरच संपूर्ण कुटुंब वॉल्टरसोबत वॉनकावर येथे पायनियर या नात्याने कार्य करु लागले. तो खूपच आवेशी होता व त्या वर्षांमध्ये वॉनकावर क्षेत्रातील सर्व बांधवांना प्रिय असा झाला. १९७६ मध्ये त्याने आपले पृथ्वीवरील जीवन संपविले व साक्षीदारांचे मोठे कुटुंब त्याच्या मागे राहिले.
विरोधावर मात करणे
अमेरिकन इंडियन गावातील धर्मपुढाऱ्यांना आमचे काम आवडत नव्हते. आम्ही त्यांच्या आध्यात्मिक साम्राज्यावर अतिक्रमण करत आहोत असा त्यांनी विचार केला. पोर्ट सिम्सन येथे गावाच्या अधिकाऱ्याने आम्हाला घरोघरी जाण्यास मनाई करावी अशी स्थानिक धर्मपुढाऱ्यांनी मागणी केली. आम्ही गावाच्या अधिकाऱ्याला भेटलो आणि त्याला विचारले की, त्याचे लोक स्वनिर्णय घेण्यास इतके अज्ञानी असल्याचे धर्मपुढाऱ्यांनी योग्यपणे ठरवावे असे त्याला वाटते का. आम्ही सुचविले की, त्याच्या लोकांना देववचनाची चर्चा ऐकण्यास व त्यांना ज्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याचा स्वतः निर्णय घेण्यास त्यांना संधी द्यावी. त्याचा परिणाम त्याने आम्हाला त्या गावात प्रचार करण्यास परवानगी दिली.
आणखी एका गावाच्या अधिकाऱ्याने पुष्कळ दशकांसाठी आपल्या लोकांशी साक्षीदारांनी संपर्क साधू नये म्हणून अडखळण आणणारे परिषद सदस्य आणि धार्मिक गट यांचे सर्व प्रयत्न उधळून लावले. त्याने म्हटले: “मी मुख्य अधिकारी आहे तोपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांचे येथे स्वागत केले जाईल.” हे खरे की, आमचे नेहमीच सर्व ठिकाणी स्वागत केले जात नव्हते; पण विरोध असतानाही आम्हाला क्षेत्र सोडण्यास बळजबरी केली नाही. तर आम्ही थांबलो त्या प्रत्येक वेळी आमची सेवा पूर्ण करू शकलो.
समुद्रावरील समस्येत असताना टिकून राहणे
या वर्षांमध्ये आम्ही वादळ, भरती व ओहोटी, नकाशात न दाखवलेले खडक तसेच काही वेळेस इंजिनचा बिघाड यासर्वांना तोंड दिले. आम्ही एकदा भटकत लॉस्केटी बेटाजवळ पोहंचलो जे वॉनकावरच्या उत्तरेपासून शंभर मैल दूर आहे. आम्हाला खडकाच्या रांगात उशीर झाला, भरती आणि ओहोटीच्या वेळी आम्ही तेथेच अडकून पडलो व आमचे संरक्षण हवामानावर अवलंबून होते. हवामान बिघडले असते, तर बोटीचा खडकावर आदळून चुराडा झाला असता. आम्ही सर्वजण कसेबसे खडकावर चढलो व वाईट परिस्थितीतही आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही जेवलो, काही अभ्यास करण्यात वेळ घालवला व ओहोटी पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत राहिलो.
अशाप्रकारच्या धोक्यात व गैरसोयीत देखील, ते एक आरोग्यदायक व आनंदी जीवन होते. तथापि, आमच्या दोन मुलांच्या जन्मामुळे मोठा बदल झाला. आम्ही त्या बोटीवरच राहत होतो; परंतु जेव्हा आम्ही पश्चिमकडील ऊना नदीपर्यंत प्रवास करत होतो तेव्हा, ॲना व मुले तिच्या पालकांकडे राहत होती आणि आम्ही इतरजण पश्चिमेपासून आणखी पुढे जात होतो. मग आम्ही दक्षिणेला परतल्यावर ॲना व मुले पुन्हा आम्हाला येऊन मिळत होते.
मुले कधी तक्रार करत असल्याचे किंवा आजारी पडल्याचे मला आठवत नाही. ते नेहमी संरक्षण पट्टे घालत होते आम्ही काही वेळेस त्यांच्याभोवती रश्शीदेखील बांधत होतो. होय, काही तणावपूर्ण घटना देखील होत्या.
आणखी सुधारणा
१९३६ मध्ये आम्हाला शॉरमॅन सोडावे लागले व मी ऐहिक नोकरी मिळविली. काही काळाने आम्हाला तिसरा मुलगा झाला. कालांतराने मी मासेमारीसाठी नाव विकत घेतली जिच्यामुळे आमची उपजीविकाच नव्हे; तर किनाऱ्याजवळ आमचे प्रचाराचे कार्य देखील चालू ठेवण्यास मदत मिळाली.
आम्ही प्रिन्स रुपर्टच्या पलिकडील उपसागरावर डिगबी ह्या बेटावर एक घर बांधले व तेथे लवकरच एका लहान मंडळीची स्थापना झाली. कॅनडा येथे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर बंदी होती तेव्हा आम्ही मध्यरात्रीनंतर बोटीने प्रिन्स रुपर्टमध्ये जाऊन तेथील प्रत्येक घरांमध्ये प्रकाशने सोडून जणू काही विजवेगी हल्ला करत होतो. बंदी घातलेल्या साहित्याचे वितरण करण्यासाठी आम्ही प्रवास करत होतो हे कोणालाही कळाले नाही.
जमीन सुपीक झाली आहे
हळूवारपणे लोक यहोवाच्या साक्षीदारांबरोबर अधिकाधिक सहवास ठेवू लागले व १९४८ मध्ये प्रिन्स रुपर्ट येथे राज्य सभागृहाची गरज स्पष्ट दिसून आली. बंदराच्या पलिकडे असणारी एक लष्करी इमारत विकत घेतल्यावर, आम्ही ती मोडून काढली व तिचे भाग तरफाच्या साहाय्याने पलिकडे आणून मग ते ट्रकने इमारतीच्या जागी आणले. यहोवाने आमच्या परिश्रमांना आशीर्वादीत केले व आम्हाला आमचे राज्य सभागृह प्राप्त झाले.
मी १९५६ मध्ये पुन्हा पायनियरच्या कार्यात उतरलो व १९६५ मध्ये ॲना मला सामील झाली. पॅसिफिक किनाऱ्याजवळ आम्ही पुन्हा बोटीने कार्य केले. काही काळासाठी आम्ही विभागीय पर्यवेक्षक या नात्याने कार्य केले. क्वीन शॉर्लेट बेटावरील मंडळ्यांपासून पूर्वेकडील पर्वतांच्या पलिकडे, फ्रेझर लेकपर्यंत आणि प्रिन्स जॉर्ज व मॅकेन्झी येथे देखील भेटी दिल्या. वर्षामध्ये आम्ही पॅसिफिकच्या संपूर्ण वायव्यमध्ये कार, बोटीने व विमानाने हजारो मैलांचा प्रवास केला.
प्रिन्स रुपर्ट येथे आमच्या सेवाकार्यात आम्ही अनेक अनुभवांचा आनंद लुटत आलो आहोत. आम्ही दोघांनी अशा व्यक्तींबरोबर अभ्यास केला जे नंतर वॉचटावर गिलियड प्रशालेला उपस्थित राहिले व त्यानंतर मिशनरी या नात्याने परदेशात कार्य केले. दूरच्या देशांमध्ये आमच्या आध्यात्मिक मुलांना बहुमोल राज्य संदेश नेताना पाहणे किती आनंदाचे आहे!
आता आम्ही दोघांनी वयाची ८० वर्षे ओलांडली आहेत व ढासळत्या आरोग्याला तोंड देत आहोत, तरी देखील यहोवाच्या सेवेत आम्ही अजूनही आनंदी आहोत. अलास्का व ब्रिटिश कोलंबिया येथील नैसर्गिक देखाव्यामुळे साठवलेल्या आठवणी येतात. तरी देखील, या विस्तृत भागाचा एके काळी नापीक असलेला आध्यात्मिक वन्य प्रदेश यहोवाची स्तुती करणाऱ्या मंडळ्यांनी बहरलेला असल्यामुळे अधिक आनंद प्राप्त होतो.
खासपणे, आमची स्वतःची मुले त्याचप्रमाणे आध्यात्मिक मुले वाढत जाऊन यहोवाची स्तुती करतात हे पाहिल्यामुळे आमच्या अंतःकरणाला किती आनंद प्राप्त झाला. पृथ्वीच्या या भागामध्ये आध्यात्मिक वाढीच्या कार्यात आमचाही एक लहान भाग होता याबद्दल आम्ही आनंदी आहोत. उदाहरणार्थ, अलास्काचे आता स्वतःचे एक मुख्य शाखा दप्तर आहे. ते २५ पेक्षा अधिक मंडळ्याची देखरेख करते.
प्रिन्स रुपर्ट येथे १९८८ मध्ये, शहराच्या अगदी मध्य भागात राज्य सभागृहाचे समर्पण करण्याची सुसंधी आम्हाला प्राप्त झाली होती. होय, यशयाप्रमाणे आम्ही देखील असे म्हणण्यात आनंदी आहोत: “तू राष्ट्रांची वाढ केली आहे, हे परमेश्वरा [यहोवा, NW] . . . तू आपला महिमा दाखविला आहे; तू देशाच्या चतुःसीमा वाढविल्या आहेत.”—यशया २६:१५.
[चित्र]
विभागीय कार्यात सेवा करणे १९६४-६७
[चित्र]
किनारपट्टीवर साक्षकार्यासाठी वापरण्यात येणारी एक प्रकारची बोट