देवाचे सेवक—संघटित व आनंदी लोक
“ज्या लोकांचा देव यहोवा आहे ते धन्य!”—स्तोत्र १४४:१५, NW.
१, २. (अ) यहोवाला त्याच्या सेवकांसाठी दर्जे ठरवण्याचा अधिकार का आहे? (ब) यहोवाची कोणती दोन गुणलक्षणे आहेत जी आपण विशेषकरुन अनुसरली पाहिजेत?
यहोवा विश्वाचा सार्वभौम राजा, सर्वशक्तीमान देव, आमचा निमार्णकर्ता आहे. (उत्पत्ती १:१; स्तोत्र १००:३) यामुळेच त्याच्या सेवकांच्या हिताचे जे आहे ते त्याला माहीत असल्यामुळे वर्तणुकीचे दर्जे बनवण्याचा त्याला अधिकार आहे. (स्तोत्र १४३:८) शिवाय त्या सर्वांनी त्याच्या गुणांचे अनुकरण करावे म्हणून तो त्यांचा प्रमुख उदाहरण आहे. “देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा,” असे एका प्रेषिताने लिहिले.—इफिसकर ५:१.
२ आम्ही अनुकरण करावे असे देवाच्या एका गुणलक्षणाचा संघटनेसोबत संबंध आहे. तो ‘अव्यवस्था माजविणारा देव नाही.’ (१ करिंथकर १४:३३) देवाने जे काही निर्माण केले त्याचे बारकाईने परिक्षण केल्यावर, आम्हाला या निष्कर्षाप्रत यावेच लागते की, तो संपूर्ण विश्वात व्यवस्था राखणारी व्यक्ती आहे. परंतु, त्याच्या सेवकांनी अनुकरण करावे असे देवाचे आणखी एक गुणलक्षण म्हणजे, त्याचा आनंद, कारण तो एक “आनंदी देव आहे.” (१ तीमथ्य १:११, NW) यास्तव, त्याची संघटनिय क्षमता आनंदामुळे संतुलित राहते. एक गुणलक्षण दुसऱ्याला हानी करण्यासाठी बनविलेले नाही.
३. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे आकाश, संघटित करण्याच्या देवाच्या क्षमतेला कसे प्रदर्शित करते?
३ यहोवाने, मोठ्या गोष्टीपासून अगदी लहानापर्यंत जे काही बनवले आहे ते, याचा पुरावा देते की तो व्यवस्थेचा देव आहे. उदाहरणार्थ, दृश्य विश्वाचा विचार करा. या विश्वात अब्जावधी तारे आहेत. हे तारे काही सहजगत्या इतरत्र पसरले नाहीत. खगोल भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ग्रीनस्टाईन निरीक्षण करतात की, “ताऱ्यांच्या व्यवस्थेचा एक उत्तम नमूना आहे.” ते सर्व गटांमध्ये सुसंघटित आहेत ज्यांना आकाशगंगा असे म्हटले जाते. या आकाशगंगेत कोट्यावधी तारे असतात. शिवाय असा अंदाज लावला जातो की कोट्यावधी आकाशगंगा आहेत! ह्या आकाशगंगासुद्धा सुसंघटित आहेत. एका समूहात (थोडक्यांपासून हजारोंपर्यंत) अनेक आकाशगंगा आहेत. आकाशगंगांचे हे समूह मोठमोठ्या गटात सुसंघटित असून त्यांना महासमूह असे म्हटले जाते.—स्तोत्र १९:१; यशया ४०:२५, २६.
४, ५. सजीव गोष्टींतील संघटनेची उदाहरणे द्या.
४ देवाच्या सृष्टिची नामी व्यवस्था, केवळ दृश्य स्वर्गातच नव्हे तर, पृथ्वी आणि तिच्यावरील हजारो सजीव गोष्टींमध्ये सर्वतः दिसून येते. या सर्वांबद्दल, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक पॉल डेविस यांनी लिहिले की, “भौतिक जगाचे ऐश्वर्य व जटिल व्यवस्था” पाहिल्यावर निरीक्षक “भयचकित झाले आहेत.”—स्तोत्र १०४:२४.
५ सजीव गोष्टींमध्ये सापडणाऱ्या ‘जटिल व्यवस्थेच्या’ काही उदाहरणांचा आपण विचार करूया. मज्जातंतु शल्यचिकित्सक जोसफ ईवन्स मानवी मेंदू व मज्जारज्जुविषयी म्हणाले की: “त्यांच्या रचनेच्या सुव्यवस्थितपणाची वास्तविकता भारावून टाकणारी आहे.” अतिसूक्ष्म जिवंत पेशींबद्दल अणुजीवशास्त्रज्ञ एच. जे शॉग्नसे सांगतात: “सूक्ष्मजीवशास्त्र जगातील जटिल व सुंदर व्यवस्थेची इतकी उत्तमप्रकारे रचना केलेली आहे, जणू काय ते ईश्वरी कायद्याच्या व्यवस्थेचा एक भाग असल्यासारखे वाटते.” तसेच, रेणु जीवशास्त्रज्ञ मायकल डेन्टन पेशींमधील आनुवंशिकतेच्या नियमांच्या संग्रहाबद्दल (डीएनए) असे म्हणाले: “ते इतके परिणामकारी आहे की . . . या ग्रहावर अस्तित्वात राहिलेल्या सर्व जीवांच्या जातींच्या रचनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती . . . एका चमच्यात घेतली जाऊ शकते आणि तरी देखील सर्व पुस्तकातील सगळी माहिती ठेवण्यासाठी जागा राहिली असती.”—स्तोत्र १३९:१६ पहा.
६, ७. आत्मिक प्राण्यांमधील कोणती संघटना दाखवण्यात आली आहे आणि ते त्यांच्या निर्माणकर्त्याला गुणग्राहकता कशी व्यक्त करतात?
६ यहोवा केवळ त्याच्या भौतिक निर्मितीलाच नव्हे, तर स्वर्गातील आत्मिक निर्मितीला देखील सुसंघटित करतो. दानीएल ७:१०, आम्हाला कळवते की ‘दहा हजार गुणित दहा हजार संख्येचे देवदूत यहोवासमोर उभे राहतात.’ (पं. र. भाषांतर.) शेकडो कोटी प्रत्येक शक्तिशाली आत्मिक प्राण्याला त्याचे त्याचे काम नेमून दिलेले आहे! इतक्या प्रचंड संख्येला सुसंघटित करण्यासाठी किती कौशल्य लागत असेल याचा नुसता विचारसुद्धा अचंबित करणारा आहे. बायबल उचितपणे म्हणते: “अहो परमेश्वराच्या [यहोवा, NW] दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहा, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या [यहोवा, NW] सर्व सैन्यांनो जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा.”—स्तोत्र १०३:२०, २१; प्रकटीकरण ५:११.
७ निर्माणकर्त्याची कार्ये किती भव्यपणे सुसंघटित व कार्यक्षम आहेत! तेव्हा स्वर्गातील शक्तिशाली आत्मिक प्राण्यांनी भयप्रेरित व आज्ञाधारकतेने असे म्हटले यात काहीच आश्चर्याचे नाही की: “हे प्रभो, आमच्या देवा, [यहोवा, NW] गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.
८. यहोवा पृथ्वीवरील त्याच्या सेवकांना संघटित करतो याची कोणती उदाहरणे आहेत?
८ यहोवा, पृथ्वीवरील त्याच्या सेवकांना देखील संघटित करतो. सा. यु. पूर्व २३७० मध्ये त्याने नोहाच्या दिवसात जलप्रलय आणला तेव्हा त्यातून नोहा आणि इतर सात जण कौटुंबिक संघटन या नात्याने बचावले. सा. य. पूर्व १५१३ च्या निर्गमनात, यहोवाने त्याच्या लाखो लोकांना ईजिप्तच्या दास्यत्वातून बाहेर आणले व त्यांना त्यांचा दररोजचा जीवनक्रम आणि उपासना सुसंघटित करण्यासाठी सविस्तर नियमांचा एक संग्रह दिला. त्यानंतर, वाग्दत्त देशात, हजारोंना मंदिरातील खास सेवेसाठी सुसंघटित करण्यात आले होते. (१ इतिहास २३:४, ५) पहिल्या शतकात, ख्रिस्ती मंडळ्या ईश्वरी मार्गदर्शनाखाली सुसंघटित केल्या जात होत्या: “आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता . . . सिद्ध करावे.”—इफिसकर ४:११, १२.
आधुनिक दिवसातील सेवकही सुसंघटित
९, १०. यहोवाने आपल्या काळात त्याच्या लोकांना कसे संघटित केले आहे?
९ त्याचप्रकारे, यहोवाने आधुनिक दिवसातील त्याच्या सेवकांना अशाप्रकारे संघटित केले आहे, जेणेकरून ते आमच्या दिवसासाठी, या सध्याच्या अभक्त व्यवस्थेचा अंत आणण्याआधी त्याच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे त्याचे कार्य परिणामकारकतेने करू शकतात. (मत्तय २४:१४) या विश्वव्यापी कार्यात काय गोवलेले आहे आणि उत्तम संघटना किती महत्त्वपूर्ण आहे याचा जरा विचार करा. लाखो पुरूष, स्त्रिया आणि मुलांना बायबल सत्य इतरांना शिकवण्यास प्रशिक्षित केले जात आहे. या प्रशिक्षणाला आणखी साहाय्य करण्यासाठी, अपरिमित बायबल व बायबल आधारित प्रकाशने छापली जातात. आता द वॉचटावर नियतकालिकाचा प्रत्येक अंक ११८ भाषांमध्ये १६ कोटीपेक्षा अधिक छापला जातो तर, अवेक! नियतकालिकाच्या ७३ भाषांमध्ये सुमारे १३ कोटी प्रती छापल्या जातात. जवळजवळ सर्वच अंक एकाच वेळी छापले जातात ज्यामुळे व्यावहारिकरीत्या यहोवाच्या सर्व सेवकांना एकाच वेळी एकाच प्रकारची माहिती मिळते.
१० यासोबतच, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ७३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांना बायबल प्रशिक्षणासाठी नियमितरीत्या एकत्र येण्यास सुसंघटित केले आहे. (इब्रीयांस १०:२४, २५) याशिवाय प्रत्येक वर्षी हजारो मोठमोठी—विभागीय आणि प्रांतिय संमेलने—एकत्रीकरणे आहेत. मोठ्या प्रमाणावर नवे किंवा सुधारित राज्य सभागृह, संमेलन गृह, बेथेल गृह व बायबल साहित्य छापण्याच्या तरतूदींचे विश्वव्यापी बांधकाम चालू आहे. बायबल शिक्षकांच्या सुधारित प्रशिक्षणासाठी प्रशाला आहेत जसे की मिशनऱ्यांसाठी वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला, शिवाय पायनियर सेवा प्रशाला. या प्रशाला विश्वातील सर्व प्रदेशांमध्ये चालविल्या जातात.
११. आताच उत्तम सुसंघटितपणा शिकून घेतल्याने भवितव्यात कोणते फायदे प्राप्त होतील?
११ यहोवाने पृथ्वीवरील आपल्या लोकांना त्यांची ‘सेवा पूर्ण करण्यासाठी’, सेवा करणाऱ्या त्याच्या देवदूतांच्या मदतीने किती उत्तम प्रकारे सुसंघटित केले आहे! (२ तीमथ्य ४:५; इब्रीयांस १:१३, १४; प्रकटीकरण १४:६) उत्तम सुसंघटनेच्या मार्गांद्वारे देव आता आपल्या सेवकांना प्रशिक्षण देऊन आणखी काहीतरी साध्य करीत आहे. त्याच्या सेवकांना चांगल्यारीतीने सज्ज केले जात आहे, जेणेकरून ते जेव्हा या व्यवस्थीकरणाच्या अंतापासून पार होतील तेव्हा नव्या जगात जीवनाची सुरवात करण्यासाठी ते आधीच सुसंघटित असतील. मग, यहोवाच्या मार्गदर्शनाखाली एका सुसंघटित पद्धतीने ते विश्वव्यापी नंदनवनाची उभारणी करण्यास चालू करतील. शिवाय मृतातून पुनरुत्थित झालेल्या कोट्यावधी लोकांना, जीवनासाठी आवश्यक असलेल्या देवाच्या सविस्तर मागण्यांविषयी शिकवण्यास ते पूर्णपणे तयार असतील.—यशया ११:९; ५४:१३; प्रेषितांची कृत्ये २४:१५; प्रकटीकरण २०:१२, १३.
सुसंघटित तरीही आनंदी
१२, १३. यहोवा आपल्या लोकांनी आनंदी असावे अशी इच्छा का बाळगतो?
१२ यहोवा हा विलक्षण कामकरी व सर्वोत्तम संघटक असला तरी, तो, भावनाशून्य, कडक किंवा यांत्रिक नाही. उलट, तो अतिशय प्रेमळ, आनंदी व्यक्ती आहे ज्याला आपल्या आनंदाची काळजी आहे. १ पेत्र ५:७ म्हणते की, “तो तुमची काळजी घेतो.” मानवांसाठी त्याने जे काही बनवले आहे त्यातून, त्याच्या सेवकांनी आनंदाने रहावे म्हणून त्यांच्याठायी असलेली त्याची काळजी व इच्छा आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ, देवाने परिपूर्ण पुरूष आणि स्त्रीला बनवले तेव्हा त्याने त्यांना सुखाच्या नंदनवनात ठेवले. (उत्पती १:२६-३१; २:८, ९) त्यांना सर्वोत्कृष्ट आनंदी ठेवण्यास जे काही लागत होते ते सर्व त्याने त्यांना दिले. परंतु त्यांनी बंड केल्यामुळे सर्व काही गमावले. त्यांच्या पापाच्या परिणामामुळे, आपल्याला अपूर्णत्वाचा आणि मृत्यूचा वारसा मिळाला.—रोमकर ३:२३; ५:१२.
१३ आता अपूर्ण असताना देखील, देवाने जे काही बनवले आहे त्यामध्ये आपण मानव आताही आनंदी राहू शकतो. आपल्याला आनंदी बनवणाऱ्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत. जसे की, उत्तुंग पर्वत, रमणीय तळे, नद्या, महासागर व समुद्रकिनारे; रंगीबेरंगी सुवासिक फुले आणि इतर वनस्पतींचे अनंत प्रकार; स्वादिष्ट अन्नाची विपुलता; कंटाळा येणार नाही असा प्रेक्षणीय सूर्यास्त; रात्रीच्या वेळी आपल्याला ज्याचा विचार करण्यास आवडते ते लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे आकाश; विविध जातींचे प्राणीराज्य आणि त्यांच्या पिल्लांचे खेळकर नखरे; उत्प्रेरक संगीत; मनोरंजक आणि उपयुक्त काम; चांगले मित्र. मग हे स्पष्टच आहे की, ज्याने ह्या सर्व गोष्टींची रचना केली तो एक आनंदी व्यक्ती आहे ज्याला इतरांना आनंदी बनवण्यास आवडते.
१४. यहोवा आमच्याकडून त्याचे अनुकरण करताना कोणत्याप्रकारच्या समतोलाची अपेक्षा करतो?
१४ अशाप्रकारे, यहोवा वरवरची सुसंघटित कार्यक्षमता इच्छित नाही. तर तो जसा आनंदी आहे तसेच त्याच्या सेवकांनीही असावे अशी त्याची इच्छा आहे. त्यांनी स्वतःच्या आनंदाचा नाश करून फाजिलपणे गोष्टी सुसंघटित करणे त्याला आवडत नाही. देवाच्या सेवकांनी, त्याच्याप्रमाणे आनंदासहित सुसंघटित कौशल्यांचा समतोल राखला पाहिजे, कारण जेथे त्याचा शक्तिशाली पवित्र आत्मा आहे तेथे आनंदही असतो. निश्चितपणे गलतीकर ५:२२ आपल्याला दाखवते की, त्याच्या लोकांवर कार्य करणारे देवाच्या पवित्र आत्म्याचे दुसरे फळ “आनंद” आहे.
प्रीती आनंद उत्पन्न करते
१५. आमच्या आनंदासाठी प्रीती इतकी महत्त्वपूर्ण का आहे?
१५ तुम्हाला हे जाणण्यास मनोरंजक वाटेल की “देव प्रीती आहे,” असे बायबल म्हणते. (१ योहान ४:८, १६) “देव संघटना आहे,” असे ते कधीच म्हणत नाही. प्रीती हा देवाचा प्रमुख गुण आहे आणि त्याच्या सेवकांनी त्याचे अनुकरण करणे अत्यावश्यक आहे. याचकारणास्तव, गलतीकर ५:२२ मध्ये देवाच्या आत्म्याच्या फळांच्या यादीत सर्वात प्रथम “प्रीती” व नंतर लगेचच “आनंद” येतो. प्रीती आनंद उत्पन्न करते. इतरांबरोबरच्या व्यवहारात आपण यहोवाच्या प्रीतीचे अनुकरण करतो तेव्हा त्यातून आनंद मिळतो, कारण प्रेमळ लोक आनंदी असतात.
१६. येशूने प्रीतीचे महत्त्व कसे प्रदर्शित केले?
१६ ईश्वरी प्रीतीचे अनुकरण करण्याच्या महत्त्वाला येशूच्या शिकवणींमध्ये ठळकपणे दाखवण्यात आले आहे. तो म्हणाला: “मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.” (योहान ८:२८) येशूला नेमके काय शिकवण्यात आले जे त्याने इतरांनाही शिकवले? देवावर आणि शेजाऱ्यावर प्रीती करण्याच्या त्या दोन सर्वात मोठ्या आज्ञा होत्या. (मत्तय २२:३६-३९) येशूने अशाप्रकारची प्रीती उदाहरण देऊन दर्शविली. “मी पित्यावर प्रीती करितो,” असे म्हणून मरणाप्रत देवाची इच्छा पूर्ण करण्याद्वारे त्याने हे सिद्ध करून दाखवले. शिवाय लोकांसाठी आपले प्राण अर्पण करून त्याने त्यांच्याबद्दल असलेली त्याची प्रीती व्यक्त केली. प्रेषित पौलाने इफिसमधील ख्रिश्चनांना सांगितले: ‘ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि स्वत:ला आपल्याकरिता अर्पण केले.’ (योहान १४:३१; इफिसकर ५:२) यास्तव, येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले: “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.”—योहान १५:१२, १३.
१७. इतरांना प्रीती दाखवणे महत्त्वाचे आहे हे पौलाने कसे दर्शवले?
१७ ही ईश्वरी प्रीती किती महत्त्वपूर्ण आहे हे पौलाने असे म्हणून व्यक्त केले की: “मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. . . . सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.”—१ करिंथकर १३:१-३, १३.
१८. आपल्या आनंदात भर घालणारी कोणती गोष्ट आपण यहोवाकडून अपेक्षा करू शकतो?
१८ आपण यहोवाच्या प्रीतीचे अनुकरण करतो तेव्हा, आपण चुका केलेल्या असल्या तरी तो आपल्याला त्याची प्रीती दाखवील याची खात्री बाळगू शकतो, कारण तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर आहे.” (निर्गम ३४:६) आपण चुका केल्यावर प्रामाणिकपणे पश्चात्ताप केला तर, देव त्यांचा लेखा घेणार नाही तर प्रेमळपणे आपणाला क्षमा करतो. (स्तोत्र १०३:१-३) होय, यहोवा “फार कनवाळू व दयाळू आहे.” (याकोब ५:११) या सर्व गोष्टी समजल्याने आपल्या आनंदात आणखी भर पडते.
आता सापेक्ष आनंद
१९, २०. (अ) पूर्ण आनंद आता शक्य का नाही? (ब) या काळात आपल्याला सापेक्ष आनंद मिळू शकतो याविषयी बायबल कसे दाखवते?
१९ परंतु, सैतानाच्या अधिपत्याखालच्या हिंसा, गुन्हे व अनैतिकतेने भरलेल्या जगात तसेच जेथे आजार आणि मृत्यूचा सामना आपल्याला करावा लागतो त्या शेवटल्या दिवसात राहात असताना आज आनंदी राहणे शक्य आहे का? होय, देवाच्या नव्या जगात जितक्या प्रमाणात आनंद असेल तेवढ्याची आम्ही आता अपेक्षा करू शकत नाही जसे की त्याचे वचन भाकीत करते, “पाहा, मी नवे आकाश व पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत; परंतु जे मी उत्पन्न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.”—यशया ६५:१७, १८.
२० देवाचे सेवक आता जो आनंद बाळगू शकतात तो सापेक्ष आहे कारण त्यांना त्याची इच्छा ठाऊक आहे व त्यांच्याजवळ लवकरच येणाऱ्या त्याच्या नंदनवनमय नव्या जगातील अद्भुत आशीर्वादांचे अचूक ज्ञान आहे. (योहान १७:३; प्रकटीकरण २१:४) याचकारणास्तव बायबल म्हणू शकते की: “हे सेनाधीश परमेश्वरा, [यहोवा, NW] जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य,” “जो पुरूष परमेश्वराचे [यहोवा, NW] भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य,” “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (स्तोत्र ८४:१२; १२८:१; मत्तय ५:५) अशाप्रकारे, आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्या सध्याच्या कठीण परिस्थितींमध्येही भरपूर आनंद मिळू शकतो. आपल्यावर अरिष्टे येतात तेव्हा देखील, जे लोक यहोवाला ओळखत नाहीत किंवा ज्यांना चिरकालिक जीवनाची आशा नाही असे लोक दुःखित होतात त्याप्रमाणे आपण होत नाही.—१ थेस्सलनीकाकर ४:१३.
२१. स्वतःचा वेळ, शक्ती आणि साधनसंपत्ती देऊन यहोवाचे सेवक आनंदाला कसे हातभार लावतात?
२१ सैतानाच्या जगात होणाऱ्या “अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप” करणाऱ्या लोकांना तसेच इतरांना बायबलचे सत्य शिकवण्यात यहोवाचे सेवक त्यांचा वेळ, शक्ती आणि साधनसंपत्ती खर्च करत असल्यामुळे त्यांना आनंद मिळतो. (यहेज्केल ९:४) बायबल म्हणते: “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्वर [यहोवा, NW] त्याला मुक्त करील. परमेश्वर [यहोवा, NW] त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल.” (स्तोत्र ४१:१, २) येशूने म्हटले त्याप्रमाणे, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
२२. (अ) आनंदाच्या अनुषंगाने, देवाचे सेवक आणि त्याची सेवा न करणारे यांच्यातील वैधर्म्य दाखवा. (ब) कोणत्या खास कारणासाठी आपण आनंदी असले पाहिजे?
२२ यास्तव, देवाचे सेवक सध्याच्या काळात सर्वश्रेष्ठ आनंदाची अपेक्षा करू शकत नाही तरी, देवाची सेवा करत नसलेले लोक ज्या आनंदाचा उपभोग घेऊ शकत नाहीत त्याचा ते आनंद लुटू शकतात. यहोवा घोषित करतो: “पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदय होऊन आकांत कराल.” (यशया ६५:१४) शिवाय, देवाची जे सेवा करतात त्यांच्याकडे आता आनंदाचे एक विशेष कारण आहे—त्यांच्याकडे देवाचा पवित्र आत्मा आहे जो ‘देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना दिला आहे.’ (प्रेषितांची कृत्ये ५:३२) तसेच लक्षात असू द्या की, देवाचा आत्मा जेथे आहे तेथे आनंद आहे.—गलतीकर ५:२२.
२३. आपण आपल्या पुढील अभ्यासात कोणत्या गोष्टीवर विचार करणार आहोत?
२३ आज, देवाच्या सेवकांच्या संघटनेत मंडळीत पुढाकार घेणारे ‘वृद्ध पुरूष,’ म्हणजेच वडीलजन महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ते यहोवाच्या लोकांच्या आनंदाला हातभार लावतात. (तीत १:५, NW) अशा लोकांनी त्यांच्या जबाबदारीकडे व आध्यात्मिक भाऊ आणि बहिणींसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे? आमचा पुढील लेख याची चर्चा करील.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ यहोवा संघटित असल्याचे निर्मिती कशी साक्ष देते?
▫ यहोवाने गतकाळात आणि सध्या त्याच्या सेवकांना कसे सुसंघटित केले आहे?
▫ यहोवा आपल्याकडून कोणत्याप्रकारचा समतोल इच्छितो?
▫ प्रीती आमच्या आनंदासाठी किती महत्त्वपूर्ण आहे?
▫ आपल्या काळात आपण कोणत्या प्रकारच्या आनंदाची अपेक्षा करू शकतो?