वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ३/१ पृ. ८-१३
  • यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अधिक महत्त्वपूर्ण समृद्धी
  • आजची आध्यात्मिक समृद्धी
  • दशमांश व अर्पणे
  • “तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा”
  • यहोवास ठकवणे
  • ‘खरा प्रभू’ निवाडा करतो
  • मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • खरा प्रभु न्यायासाठी येतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ३/१ पृ. ८-१३

यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो

“परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतीसूत्रे १०:२२.

१-३. भौतिक गोष्टींची पुष्कळांना काळजी वाटत असली तरी सर्वांनी भौतिक धनाबद्दल कोणती गोष्ट ओळखलीच पाहिजे?

काही लोकांची पैशाची समृद्धी किंवा त्याची उणीव याबद्दलची बोलणी सुटत नाही. अलिकडे त्यांना अशी खूप बोलणी करावी लागली जी तितकी सुखावह नव्हती. पाश्‍चात्य देशात १९९२ मध्ये मंदी आली आणि त्यामुळे अधिकारी आणि इतर थरातील कामगारांना कामच उरले नाही अशी स्थिती आली. पुष्कळांना याची काळजी लागली आहे की, ते कधी समृद्धीचा काळ पाहू शकतील का.

२ भौतिकरित्या सुखसंपन्‍न असणे ही चुकीची गोष्ट आहे का? नाही. काही प्रमाणात ते स्वाभाविक आहे. तरीपण, पैशाबद्दल असे काही मूलभूत सत्य आहे ज्याची आम्ही सर्वांनी ओळख बाळगलीच पाहिजे. शेवटी, सर्वच भौतिक गोष्टी निर्माणकर्त्याकडून मिळत आहेत. तोच, “पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्‍यांस जीवित देणारा देव [यहोवा, न्यू.व.] आहे.”—यशया ४२:५.

३ अर्थात, यहोवा, कोण श्रीमंत असेल व कोण गरीब राहील याची पूर्वनिश्‍चिती करीत नसला तरी “पृथ्वी व तिच्या उपजाचा” आपण जसा उपयोग करीत आहोत त्याबद्दल आम्ही सर्वजण त्याला जबाबदार आहोत. आम्ही आपणापाशी असणाऱ्‍या संपत्तीचा इतरांवर धनीपणा गाजविण्यासाठी उपयोग करीत आहोत तर यहोवा त्याबद्दल आम्हाला जबाबदार धरील. आणि जो कोणी यहोवा ऐवजी धनाची चाकरी करतो त्याला, “जो आपल्या धनावर भरवसा ठेवितो तो पडेल” हा अनुभव जरुर घडेल. (नीतीसूत्रे ११:२८; मत्तय ६:२४; १ तीमथ्य ६:९) यहोवापुढे नम्र अंतःकरण न राखणाऱ्‍या माणसाला कितीही भौतिक समृद्धता असली तरी ती शेवटी कवडीमोलाची आहे.—उपदेशक २:३-११, १८, १९; लूक १६:९.

अधिक महत्त्वपूर्ण समृद्धी

४. भौतिक विपुलतेपेक्षा आध्यात्मिक समृद्धी ही का चांगली आहे?

४ भौतिक समृद्धीबरोबरच पवित्र शास्त्र आध्यात्मिक समृद्धीचा देखील उल्लेख करते. ही अधिक चांगल्या प्रकारातील समृद्धी आहे. (मत्तय ६:१९-२१) आध्यात्मिक समृद्धी यहोवासोबत तृप्तीकारक नातेसंबंध जोडते, व ते सर्वकाळासाठी टिकू शकतात. (उपदेशक ७:१२) याखेरीज, आध्यात्मिक समृद्धी असणारे देवाचे सेवक हितकारी भौतिक आशीर्वादांना गमावीत नाहीत. नव्या जगात आध्यात्मिक समृद्धीचा भौतिक समृद्धीसोबत संबंध असेल. आज सहसा, कटू स्पर्धा किंवा आरोग्य व सुख यांचा त्याग करून भौतिक सुरक्षा मिळवण्याचा यत्न केला जातो; पण नव्या जगात तर विश्‍वासू जनांना त्याचा पुरेपूर लाभ घेता येईल. (स्तोत्रसंहिता ७२:१६; नीतीसूत्रे १०:२८; यशया २५:६-८) त्यांना, “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखीन कष्ट देत नाही,” याचा प्रत्येक गोष्टीत अनुभव येईल.—नीतीसूत्रे १०:२२.

५. भौतिक गोष्टींबद्दलचे कोणते अभिवचन येशूने दिले?

५ आज देखील जे आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देत आहेत, अशांना भौतिक गोष्टींबद्दल विशिष्ट समाधान मिळते. ते काम करून आपला खर्च व कुटुंबाची उपजिविका करतात हे खरे. काहींना मंदीच्या काळात आपली नोकरी देखील गमवावी लागत असेल; तरी पण या काळज्यांमुळे ते चिंताक्रांत होत नाहीत. उलटपक्षी, ते येशूच्या या अभिवचनावर विश्‍वास ठेवून आहेत की, “यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर प्रथम, तुम्ही त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तीही सर्व तुम्हांस मिळतील.”—मत्तय ६:३१-३३.

आजची आध्यात्मिक समृद्धी

६, ७. (अ) देवाच्या लोकांच्या आध्यात्मिक समृद्धीच्या काही प्रकाराचे वर्णन द्या. (ब) आज कोणता भविष्यवाद पूर्ण होत आहे, आणि यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

६ या कारणास्तव, यहोवाच्या लोकांनी देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याची निवड केली आहे, आणि याबद्दल ते केवढे आशीर्वादित आहेत! ते आपल्या शिष्य बनविण्याच्या कामात समृद्ध यश मिळवीत आहेत. (यशया ६०:२२) त्यांना यहोवाकडून शिक्षण मिळत आहे, आणि “विश्‍वासू व बुद्धिमान दास”मार्फत आध्यात्मिक अन्‍नाचा उत्तम साठा ते नित्याने अनुभवीत आहेत. (मत्तय २४:४५-४७; यशया ५४:१३) याशिवाय, यहोवाचा आत्मा त्यांच्यावर आहे व तो त्यांच्यामध्ये आनंदी असे आंतरराष्ट्रीय बंधुत्व घडवून आणतो.—स्तोत्रसंहिता १३३:१; मार्क १०:२९, ३०.

७ हीच खरी आध्यात्मिक समृद्धी आहे, ती पैशाने मिळू शकत नाही. ही यहोवाच्या अभिवचनाची लक्षणीय पूर्णता आहेः “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो: ‘माझ्या मंदिरात अन्‍न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पाहा.’” (मलाखी ३:१०) या अभिवचनाची पूर्णता आज आपण अनुभवली आहे. तरीपण, सर्व संपत्तीचा मूळ उगम, यहोवा, हा आपल्या सेवकांना दशमांश किंवा दहावा हिस्सा देण्यासाठी का विचारणा करीत आहे? या दशमांशामुळे कोणाचा फायदा होतो? या प्रश्‍नांची उत्तरे पाहण्यासाठी, यहोवाने मलाखी संदेष्ट्याद्वारे इ. स. पूर्वीच्या पाचव्या शतकात हे शब्द का उच्चारले ते विचारात घ्या.

दशमांश व अर्पणे

८. नियमशास्त्रानुसार इस्राएलांची भौतिक समृद्धी कशावर अवलंबून होती?

८ मलाखीच्या काळी लोकांचा उत्कर्ष होत नव्हता. ते का? काही अंशी याचा संबंध अर्पणे व दशमांश याजबरोबर होता. त्या काळी इस्राएल लोक मोशेच्या नियमशास्त्र कराराखाली होते. यहोवाने हा करार त्यांच्याशी केला तेव्हा त्याने हे अभिवचन दिले की, जर इस्राएल तो पाळून चालतील तर तो त्यांना आध्यात्मिक व भौतिक रितीने समृद्धी देईल. एकंदरीत, इस्राएलाची समृद्धी त्यांच्या विश्‍वासूपणावर अवलंबून होती.—अनुवाद २८:१-१९.

९. प्राचीन इस्राएलांच्या काळी यहोवाने इस्राएलांना दशमांश देण्याची व अर्पणे आणण्याची का आज्ञा दिली होती?

९ नियमशास्त्रामुळे इस्राएलांवर मंदिरात अर्पणे आणण्याचे व दशमांश देण्याचे बंधन होते. यापैकीच्या काही अर्पणांचा यहोवाच्या वेदीवर पूर्णपणे होम करीत; बाकीच्या अर्पणांचे याजक व अर्पणे देणारा यात विभाजन होई; या अर्पणातील खास भागाचे केवळ यहोवाला अर्पण देण्यात येत असे. (लेवीय १:३-९; ७:१-१५) दशमांशाबद्दल मोशाने इस्राएलांना सांगितले होतेः “भूमीच्या उत्पन्‍नाचा दशमांश परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] आहे. मग ते जमिनीचे धान्य असो अथवा झाडांची फळे असोत; ते परमेश्‍वराप्रीत्यर्थ [यहोवा, न्यू.व.] पवित्र होय.” (लेवीय २७:३०) हा दशमांश पवित्र स्थानी काम करणाऱ्‍या लेव्यांना देत व नंतर मंदिरात नेत. तसेच याजक नसलेले लेवीही त्यांना मिळालेला दशमांश अहरोनाच्या वंशातील याजकांना देत. (गणना १८:२१-२९) इस्राएलांनी दशमांश द्यावा अशी यहोवाने का आज्ञा दिली होती? एक गोष्ट ही, की, याद्वारे ते, यहोवाच्या चांगुलतेबद्दल आपल्याला कदर आहे हे दृश्‍यरुपाने दाखवू शकत होते. आणि दुसरी ही की, याद्वारे ते लेव्यांना आधार मिळावा यासाठी दान देत होते. यामुळे लेव्यांना आपली कर्तव्ये आणि लोकांना नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी पूर्ण करता येऊ शकत होती. (२ इतिहास १७:७-९) अशाप्रकारे, खऱ्‍या भक्‍तीला आधार मिळे व त्याचा प्रत्येकाला लाभ प्राप्त होत असे.

१०. इस्राएलांनी दशमांश व अर्पणे आणण्याचे बंद केले तेव्हा काय घडले?

१० दशमांश व अर्पणांचा वापर नंतर लेव्यांद्वारे होत होता तरी ती यहोवाला वाहिलेली दाने होती व या कारणामुळे ती चांगल्या प्रतीची व त्याला योग्य असण्याच्या जरुरीची होती. (लेवीय २२:२१-२५) पण जेव्हा इस्राएल लोक दशमांश देण्यात मागे पडले किंवा त्यांनी हलक्या दर्जाची अर्पणे आणणे सुरु केले तेव्हा काय घडले? याबद्दल नियमशास्त्रात शिक्षा नव्हती, पण त्याचे परिणाम मात्र दिसले. यहोवाने आपले आशीर्वाद त्यांच्यापासून रोखून धरले; आणि लेव्यांनी, त्यांना भौतिक मदत मिळेना म्हणून मंदिरातील कामे सोडली व ते आपल्या उपजिविकेसाठी काम शोधू लागले. अशाप्रकारे सर्व इस्राएलांना त्रास सहन करावा लागला.

“तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा”

११, १२. (अ) इस्राएलांनी नियमशास्त्र आचरण्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा काय घडले? (ब) यहोवाने इस्राएलांना बाबेलातून परत आणले तेव्हा त्याने त्यांना कोणती नेमणूक दिली?

११ इस्राएलाच्या इतिहासादरम्यान काहीजण नियमशास्त्र आचरण्यात आणि दशमांश देण्यात उदाहरणशील होते. (२ इतिहास ३१:२-१६) परंतु, सर्व राष्ट्र एकंदर पाहता, बेपर्वा बनले होते. त्यांनी वेळोवेळी यहोवाचा करार मोडला व शेवटी ते इ. स. पूर्वी ६०७ मध्ये शत्रूंपुढे पराजित झाले व त्यांना बाबेलात बंदी म्हणून नेण्यात आले.—२ इतिहास ३६:१५-२१.

१२ ती खरीच कडक शिक्षा होती, पण ७० वर्षानंतर यहोवाने त्याच्या लोकांना आपल्या स्वगृही परत आणले. आता, यशयाने नंदनवनविषयक दिलेल्या बहुत भविष्यवादांची त्यांच्या परतण्यानंतर प्रारंभिक पूर्णता होण्यास सुरवात झाली. (यशया ३५:१, २; ५२:१-९; ६५:१७-१९) तरीपण यहोवाने आपल्या लोकांना परत आणण्यामागील प्रमुख कारण, पार्थिव नंदनवन उभारावे हे नव्हते, तर मंदिराची उभारणी करून त्यामध्ये खरी भक्‍ती पुन्हा स्थापावी हे होते. (एज्रा १:२, ३) इस्राएलांनी यहोवाची आज्ञा मानल्यास भौतिक लाभ पुन्हा मिळणार होते; आणि यहोवाचा आशीर्वाद त्यांना आध्यात्मिक व भौतिक समृद्धी देणार होता. यालाच अनुसरून ते इ. स. पूर्वी ५३७ मध्ये परत आल्यावर लागलेच यहूद्यांनी यरुशलेमात वेदी उभारली व मंदिराचे काम सुरु केले. तथापि, याला खूप विरोध आला व ते काम त्यांना थांबवावे लागले. (एज्रा ४:१-४, २३) यामुळे, इस्राएल यहोवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेऊ शकले नाहीत.

१३, १४. (अ) इस्राएल लोक मंदिर बांधण्याच्या कामी अपयशी झाले तेव्हा काय घडले? (ब) शेवटी मंदिर कसे बांधून पूर्ण झाले, पण पुढे इस्राएलांनी आणखी कोणती बेपर्वा वृत्ती दाखवली?

१३ इ. स. पूर्वी ५२० मध्ये यहोवाने हाग्गय व जखऱ्‍या संदेष्ट्यांना सामोरे आणून इस्राएलांना मंदिराच्या कामाची परत सुरवात करावी असे प्रोत्साहन देऊ केले. हाग्गयने दाखवले की, राष्ट्राला भौतिक गोष्टींचा तुटवडा आहे व हे यहोवाच्या मंदिराबद्दल आवेश न राखण्यामुळे घडले असे त्याने म्हटले. तो म्हणालाः “आता सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो, ‘तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता, पण त्यांनी तुम्हास उब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.’ सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] असे म्हणतो की, ‘तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा; त्याने मी प्रसन्‍न होईन व माझा महिमा प्रकट करीन.’”—हाग्गय १:५-८.

१४ हाग्गय व जखऱ्‍या यांनी दिलेल्या उत्तेजनामुळे प्रोत्साहीत होऊन इस्राएलांनी आपल्या कामात मन घातले, आणि मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तथापि, ६० वर्षांनी नेहम्याने यरुशलेमाला भेट दिल्यावर त्याला दिसले की, इस्राएल परत एकदा यहोवाच्या नियमशास्त्राबद्दल बेपर्वा झाले आहेत. त्याने ही परिस्थिती सुधरविली. पण आपल्या दुसऱ्‍या भेटीच्या वेळी पुन्हा परिस्थिती वाईट झाल्याचे बघितले. तो कळवतोः “मला आणखी असे कळले की, लेव्यांस मुशाहिरा न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतावर पळून गेले.” (नेहम्या १३:१०) ही समस्या हाताळली गेली, आणि “सर्व यहूदी लोक धान्य, द्राक्षारस व तेल यांचे दशमांश भांडारात पावते करू लागले.”—नेहम्या १३:१२.

यहोवास ठकवणे

१५, १६. यहोवाने मलाखीद्वारे इस्राएलांना, कोणत्या बाबतीत अपयशी ठरल्यामुळे वाग्दंड दिला?

१५ याच काळी मलाखी आपले भविष्य कथनाचे कार्य करीत होता असे दिसते व तो इस्राएलांच्या अविश्‍वासूपणाबद्दल आणखी कळवतो. तो यहोवाने इस्राएलांना उद्‌गारिलेले शब्द लिखित करून म्हणतोः “‘मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे,’ असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्‍या तुम्हा याजकांस परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] विचारतो.” काय चुकले होते? यहोवा स्पष्टीकरण देतोः “तुम्ही अंधळा पशू अर्पिता, [तरी तुम्ही म्हणताः] ‘हा अधर्म नव्हे.’ लंगडा किंवा रोगी असा बलि देता [तरी तुम्ही म्हणताः] ‘हा अधर्म नव्हे.’”—मलाखी १:६-८.

१६ अशाप्रकारे डोळ्यांसमोर चित्र उभे करणाऱ्‍या उदाहरणांचा उपयोग करून मलाखीने स्पष्ट केले की, इस्राएली अर्पणे जरी आणीत होते तरी ती हलक्या दर्जाची असल्यामुळे त्यातून अपमानाची भावना स्पष्ट दिसत होती. मलाखीने असेही लिहिलेः “‘तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधि तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हांकडे वळेन,’ असे सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो.” यहोवा खासपणे कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो ते न समजल्यामुळे त्यांनी विचारलेः “आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?” यहोवाने उत्तर दिलेः “मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकविले आहे.” इस्राएलांनी सर्व संपत्तीचा उगम, यहोवा याला कसे ठकविले होते? यहोवाने उत्तर दिलेः “दशमांश व अर्पणे यासंबंधाने.” (मलाखी ३:७, ८) होय, दशमांश व अर्पणे आणण्याचे नाकारल्यामुळे ते यहोवाला ठकवीत होते!

१७. दशमांश व अर्पणे यांनी इस्राएलात कोणता उद्देश पूर्ण केला, आणि यहोवाने दशमांशाबद्दल कोणते अभिवचन दिले?

१७ ही ऐतिहासिक पार्श्‍वभूमी इस्राएलात दशमांश व अर्पणे यांचे काय महत्त्व होते ते दाखवते. ते, अर्पणे वाहणाऱ्‍याची कदर सूचित करीत होते, व त्यामुळे खऱ्‍या भक्‍तीला देखील भौतिकरित्या हातभार मिळू शकला. या कारणामुळेच यहोवाने इस्राएलांना हे उत्तेजन दिलेः “सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा.” याद्वारे काय घडेल ते सांगताना यहोवाने हे अभिवचन दिलेः “मी जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हांकरता वर्षितो.” (मलाखी ३:१०) यहोवाचा आशीर्वाद त्यांना समृद्धी आणू शकत होता.

‘खरा प्रभू’ निवाडा करतो

१८. (अ) यहोवा कोणाच्या येण्याबद्दल इशारा देतो? (ब) हे मंदिरात येणे कधी झाले, कोणाचा समावेश होता आणि याचा इस्राएलावर कोणता परिणाम दिसला?

१८ यहोवाने मलाखीद्वारे असा इशाराही दिला की, तो लोकांचा निवाडा करण्यासाठी येणार. “पाहा! मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. ज्या [“खऱ्‍या,” न्यू.व.] प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पाहा, करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे.” (मलाखी ३:१) मंदिरात येण्याचे हे अभिवचन केव्हा पूर्ण झाले? मत्तय ११:१० मध्ये येशूने मलाखीचा, मार्ग तयार करण्यासाठी येणाऱ्‍या निरोप्याचा भविष्यवाद उद्धृत करून तो बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला लागू केला. (मलाखी ४:५; मत्तय ११:१४) अशाप्रकारे, न्यायनिवाड्याचा तो काळ इ. स. २९ मध्ये आला! पण, यहोवा या “[“खऱ्‍या,” न्यू.व.] प्रभूसोबत मंदिरात येणारा कराराचा निरोप्या, दुसरा निरोप्या कोण होता? स्वतः येशू, कारण तो दोनदा यरुशलेमाच्या मंदिरात आला व अगदी नाट्यपूर्णरितीने ते त्याने स्वच्छ केले आणि बेईमानीपणे धंदा करणाऱ्‍यांना तेथून हाकून लावले. (मार्क ११:१५-१७; योहान २:१४-१७) पहिल्या शतकातील या न्यायनिवाड्याच्या काळाबद्दल यहोवाने भविष्यवादितपणे असे विचारलेः “त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल?” (मलाखी ३:२) खरे पाहता, इस्राएल लोक टिकले नाहीत. त्यांची छानणी झाली, ते उणे भरले आणि इ. स. ३३ मध्ये यहोवाचे निवडलेले राष्ट्र या पदावरून दूर गेले.—मत्तय २३:३७-३९.

१९. पहिल्या शतकात कोणत्या अर्थी एक अवशेष यहोवाकडे परतला, आणि यांना कोणता आशीर्वाद मिळाला?

१९ तथापि, मलाखीने आणखी असे लिहिलेः “रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा तो [यहोवा] बसेल; लेवी वंशजांस शुद्ध करील; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्‍वराला [यहोवा, न्यू.व.] बलि अर्पण करतील.” (मलाखी ३:३) याच्या अनुषंगाने, पहिल्या शतकात यहोवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्‍या बहुतेकांना दूर सारण्यात आले तरी काहींची शुद्धी करण्यात आली, ते यहोवाकडे आले व त्यांनी त्याला स्वीकृत वाटणारी अर्पणे वाहिली. हे कोण होते? ज्यांनी कराराचा निरोप्या, येशूला प्रतिसाद दिला ते. इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टप्रसंगी तो प्रतिसाद दाखवणारे १२० जण यरुशलेमात माडीवरील खोलीत एकत्र जमले होते. पवित्र आत्म्यामुळे मजबूती मिळाल्यामुळे ते धार्मिकतेची अर्पणे सादर करू लागले व यामुळे त्यांची संख्या लागलेच वाढू लागली. ते लवकरच सबंध रोमी साम्राज्यभर पसरले. (प्रे. कृत्ये २:४१; ४:४; ५:१४) अशाप्रकारे एक अवशेष यहोवाकडे परतला.—मलाखी ३:७.

२०. यरुशलेम व त्याच्या मंदिराचा नाश झाला तेव्हा देवाच्या नव्या इस्राएलाचे काय झाले?

२० या इस्राएलाच्या अवशेषात विदेश्‍यांचाही भरणा झाला. हे जणू इस्राएलाच्या फांदीत कलम करण्यात आले व यांचे आता आत्म्याने अभिषिक्‍त असणाऱ्‍यांचे मिळून एक राष्ट्र, “देवाचा इस्राएल” तयार झाले. (गलतीकर ६:१६; रोमकर ११:१७) इ. स. ७० मध्ये रोमी सैन्याने यरुशलेमाचा व मंदिराचा नाश केला तेव्हा पार्थिव इस्राएलांवर “भट्टीसारखा तप्त दिवस” आला. (मलाखी ४:१; लूक १९:४१-४४) पण देवाच्या आध्यात्मिक इस्राएलाचे काय झाले? यहोवाने, “जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्‍या पुत्रावर दया करितो” तशी त्यांजवर दया दाखवली. (मलाखी ३:१७) अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीने येशूच्या भविष्यवादित इशाऱ्‍याकडे लक्ष दिले. (मत्तय २४:१५, १६) त्यांचा बचाव झाला व त्यांजवर यहोवाचा आशीर्वाद येत राहून ते आध्यात्मिक रितीने समृद्ध झाले.

२१. मलाखी ३:१ व १० वचनांबद्दल कोणते प्रश्‍न अद्याप राहतात?

२१ यहोवाचे केवढे समर्थन झाले! पण आज मलाखी ३:१ची कशी पूर्णता होत आहे? तसेच मलाखी ३:१० मध्ये भांडारात दशमांश आणण्याबद्दल जे उत्तेजन देण्यात आले आहे त्याबद्दल ख्रिस्ती जनाने कसा प्रतिसाद द्यावा? या गोष्टींची चर्चा पुढील लेखात होईल.

तुम्हाला विवेचीत करता येईल?

▫ सर्व संपत्तीचा उगम सर्वतोपरि कोण आहे?

▫ भौतिक धनापेक्षा आध्यात्मिक समृद्धी अधिक चांगली का आहे?

▫ इस्राएलात दशमांश व अर्पणांनी कोणता उद्देश साध्य केला?

▫ “खरा प्रभू,” यहोवा हा इस्राएलांचा न्यायनिवाडा करण्यासाठी मंदिरात केव्हा आला व याचा कोणता परिणाम दिसून आला?

▫ पहिल्या शतकात यहोवा मंदिरात आल्यावर कोण त्याच्याकडे परतले?

[११ पानांवरील चित्रं]

यहोवाचे प्रतिनिधित्व करणारा येशू, कराराचा निरोप्या या नात्याने पहिल्या शतकात मंदिरात न्यायनिवाडा करण्यासाठी आला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा