यहोवाच्या निकट असा
“प्रार्थनेत तत्पर असा.”—रोमकर १२:१२.
१. प्रार्थनेबद्दल यहोवाची काय इच्छा आहे, आणि प्रार्थनेबद्दल प्रेषित पौलाने काय उत्तेजन दिले?
यहोवा आपल्या सर्व विश्वासू लोकांसंबंधाने “आशेचा देव” आहे. “प्रार्थना ऐकणारा” देव या नात्याने तो त्यांची विनवणी ऐकतो. ही विनवणी देवाने त्यांच्यापुढे राखलेल्या हर्षमय आशेची प्राप्ती होण्याबद्दलची असते. (रोमकर १५:१३; स्तोत्रसंहिता ६५:२) शिवाय तो आपल्या सर्व सेवकांना त्यांना हव्या त्या वेळी आपणाकडे येण्याचे उत्तेजन त्याचे वचन, पवित्र शास्त्र याद्वारे देतो. त्यांची अत्यंत कळकळीची विनंती ऐकण्यासाठी तो सर्वदा तयार असतो. खरे म्हणजे, तो त्यांना “प्रार्थनेत तत्पर” राहण्यास व “निरंतर प्रार्थना” करण्याचे उत्तेजन देतो.a (रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) सर्व ख्रिश्चनांनी त्याला नित्याने प्रार्थना करीत राहावी, आपले अंतःकरण त्याच्यापुढे मोकळे करावे व या सर्व विनंत्या त्यांनी त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या नामात सादर कराव्यात अशी यहोवाची इच्छा आहे.—योहान १४:६, १३, १४.
२, ३. (अ) आम्ही “प्रार्थनेत तत्पर” असावे असे देव आम्हाला का आर्जवितो? (ब) आम्ही प्रार्थना करावी अशी देवाची इच्छा आहे याबद्दल आम्हाला कोणती हमी देण्यात आली आहे?
२ देव हा आर्जव का करतो? कारण जीवनातील दबाव व जबाबदाऱ्या आम्हाला इतक्या भाराखाली आणू शकतात की प्रार्थना करण्याचे आम्हाला भानच राहात नाही. तसेच समस्या वाढतील व आम्हाला आशेने हर्षित असण्याचे थांबवून प्रार्थना करण्याचे बंद करतील. या गोष्टींमुळेच, आम्हाला प्रार्थना करण्याबद्दलचे स्मरण मिळण्याची आणि मदत व सांत्वनाचा उगम, यहोवा आमचा देव याच्या अगदी निकट राहण्याची गरज आहे.
३ याकोब या शिष्याने लिहिलेः “देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) होय, आमची मानवी स्थिती अपूर्णतेची असली तरी आमचे म्हणणे ऐकू येणार नाही इतका देव उंच नाही की, दूर नाही. (प्रे. कृत्ये १७:२७) तसेच तो बेपर्वा आणि निष्काळजी नाही. स्तोत्रकर्ता म्हणतोः “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] नेत्र धार्मिकांकडे असतात. त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात.”—स्तोत्रसंहिता ३४:१५; १ पेत्र ३:१२.
४. यहोवाचे प्रार्थनकडे लक्ष असते ही गोष्ट उदाहरणाद्वारे कशी चित्रित करता येते?
४ यहोवा प्रार्थना करण्याचे निमंत्रण देतो. याची तुलना आपल्याला, जेथे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असून ते एकमेकांशी बोलत आहे त्या मेळाव्यासोबत करता येईल. तुम्ही तेथे एक निरिक्षक म्हणून आहात. पण कोणी तुमच्याकडे येतो, तुमचे नाव घेतो व आपले म्हणणे तुम्हापुढे मांडतो. यामुळे तुमचे लक्ष एका खास अर्थी आकर्षित होते. याचप्रमाणे, देवही आपल्या लोकांच्या बाबतीत, ते कोठेही असले तरी, नेहमी कान देत असतो. (२ इतिहास १६:९; नीतीसूत्रे १५:३) यास्तव, तो जेव्हा आपल्या लोकांना बघतो तेव्हा तो जणू त्यांच्याबाबत संरक्षण पुरवणारा व आस्था प्रदर्शित करणारा असतो. पण जेव्हा आम्ही प्रार्थनेत देवाचे नाव घेतो तेव्हा त्याचे लक्ष आकर्षित करण्यात येते व तो आपल्याकडे संपूर्ण लक्ष देतो. मानवाच्या अंतःकरणात व मनात गुप्तपणे वास करणाऱ्या आणि शब्दांनी सादर न केलेल्या याचना देखील यहोवा आपल्या शक्तीद्वारे जाणू व समजू शकतो. देवाच्या नावाचा प्रांजळपणे धावा करणाऱ्या आणि त्याच्या निकट राहण्याचा शोध घेणाऱ्या सर्वांकडे तो येईल अशी देव हमी देतो.—स्तोत्रसंहिता १४५:१८.
देवाच्या उद्देशानुरुप प्रतिसाद
५. (अ) “प्रार्थनेत तत्पर” असा ही सूचना आमच्या प्रार्थनांबद्दल काय सुचविते? (ब) देव आमच्या प्रार्थनांचे कसे उत्तर देतो?
५ प्रार्थनेत तत्पर असा ही सूचना दाखविते की, यहोवा आपला प्रतिसाद दाखविण्याआधी आम्हाला कधीकधी एखाद्या गोष्टीबद्दल प्रार्थना करीत राहायला लावतो. आम्ही कृपा किंवा दयाळूपणाबद्दल प्रार्थना केली तिला आता बराच काळ उलटला आहे असे वाटून त्यात कंटाळून जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासाठीच, यहोवा आम्हाला जे आर्जवितो की, अशा प्रवृत्तीच्या आहारी आम्ही जाऊ नये तर आम्ही प्रार्थना करीत राहावी. आम्हास वाटणाऱ्या काळजीबद्दल आम्ही त्याची नित्याने याचना करीत राहावी व असा आत्मविश्वास राखावा की, तो आमच्या प्रार्थनांचा आदर करतो आणि आमच्या खऱ्या गरजा, आम्ही त्याबद्दल विचार मांडला आहे म्हणून नव्हे तर जरुर पुऱ्या करील. यहोवा देव आमच्या याचना त्याच्या उद्देशानुरुप निश्चये तोलून बघतो. उदाहरणार्थ, कदाचित आमच्या विनंतीमुळे इतरांवर परिणाम घडत असेल. ही परिस्थिती, एखाद्या बापास त्याचा मुलगा एका सायकलीची विचारणा करतो या उदाहरणाशी तुल्य होऊ शकते. बापाला माहीत आहे की, या मुलास सायकल घेऊन दिली तर दुसरा मुलगाही म्हणेल की, त्याला देखील सायकल हवी. एक मुलगा सायकल चालवण्यासाठी अजून लहान आहे असे वाटून बाप हे ठरवील की विशिष्ट वेळेपर्यंत ती सायकल घेऊ नये. याचप्रमाणे, आपला वेळ व उद्देश याच्या अनुरोधात आमचा स्वर्गीय पिता आमच्यासाठी व इतरांसाठी काय सर्वोत्तम ठरू शकेल हे ठरवीत असतो.—स्तोत्रसंहिता ८४:८, ११; पडताळा हबक्कूक २:३.
६. प्रार्थनेबद्दल येशूने कोणता दाखला दिला, व प्रार्थनेत दाखविण्यात येणारी तत्परता काय सूचविते?
६ येशूने, आपल्या शिष्यांनी “सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये” म्हणून जो दाखला दिला तो लक्षवेधी आहे. एका विधवेने, न्याय मिळत नाही हे पाहून मानवी न्यायाधिशाला आपली सतत विनंती सादर केली आणि शेवटी तिने न्याय मिळवून घेतला. येशूने पुढे म्हटलेः “देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?” (लूक १८:१-७) प्रार्थनेत तत्पर राहाणे हे यहोवावरील आमचा विश्वास, आमचे अवलंबत्व, त्याच्या निकट राहण्याची आमची स्वेच्छा आणि आमची याचना त्याच्या हाती सोपविण्याची इच्छा दाखवीत असते.—इब्रीयांस ११:६.
यहोवाच्या निकट राहण्याची उदाहरणे
७. यहोवाशी निकट राहण्यामध्ये आपण हाबेलच्या विश्वासाचे कसे अनुकरण करू शकतो?
७ देवाच्या सेवकांनी उद्गारिलेल्या प्रार्थनांची, पवित्र शास्त्र भरपूर उदाहरणे देते. ही “सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरिता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.” (रोमकर १५:४) यहोवाच्या निकट राहिलेल्यांच्या उदाहरणांचे परिक्षण केल्यामुळे आमची आशा बळकट होते. हाबेलाने देवास स्वीकृत असणारे अर्पण सादर केले; आणि जरी प्रार्थना करण्यात आल्याचा अहवाल दिलेला नाही, तरी, आपले अपर्ण यहोवाने स्वीकारावे हे निश्चयी त्याने यहोवास प्रार्थिले असावे. इब्रीयांस ११:४ म्हणतेः “हाबेलाने काईनापेक्षा चांगला यज्ञ विश्वासाने देवाला अर्पिला; तेणेकरून तो नीतीमान आहे अशी त्याजविषयी साक्ष झाली.” हाबेलला उत्पत्ती ३:१५ मधील देवाने दिलेले अभिवचन ठाऊक होते, पण याबद्दल सध्या आपल्याला जितकी माहिती आहे त्याच्या तुलनेत त्याला फारच कमी माहिती होती. तरीही आपणापाशी असणाऱ्या ज्ञानाआधारे हाबेलने कृति केली. असेच आज देवाच्या सत्याबद्दल आस्था राखणाऱ्या काही नवीनांचे आहे. त्यांनी बरेच ज्ञान मिळवलेले नाही, तरी ते प्रार्थना करतात व आपणापाशी असणाऱ्या ज्ञानाचा हाबेलप्रमाणे होता होईल तितका उपयोग करतात. होय, ते विश्वासानुरुप कृति करतात.
८. अब्राहाम यहोवाच्या निकट राहू शकला हे आम्ही खात्रीने कसे म्हणू शकतो, आणि आम्ही स्वतःला कोणता प्रश्न विचारावा?
८ अब्राहाम हा आणखी एक देवाचा विश्वासू सेवक होता. तो “जे . . . विश्वास ठेवतात त्या सर्वांचा . . . बाप” बनला. (रोमकर ४:११) आज आम्हापाशी पूर्वी कधी नव्हता इतका प्रबळ विश्वास असण्याची आणि अब्राहामाप्रमाणेच विश्वासाने प्रार्थना करण्याची गरज आहे. उत्पत्ती १२:८ कळविते की, त्याने “परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] वेदी बांधली आणि परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] नामाने प्रार्थना केली.” अब्राहामाला देवाचे नाव ठाऊक होते व त्याचा त्याने प्रार्थनेत उपयोग केला. तो वेळोवेळी प्रार्थनेत तत्पर राहिला व त्याने “सनातन देव यहोवा याच्या नावाचा धावा केला.” (उत्पत्ती १३:४; २१:३३, न्यू.व.) अब्राहाम विश्वासाने देवाचा धावा करीत राहिला व यामुळे त्याला किर्ती मिळाली. (इब्रीयांस ११:१७-१९) प्रार्थनेमुळे अब्राहामाला राज्य आशेबद्दल मोठा हर्ष करीत राहण्याची मदत मिळाली. तर मग, आपण देखील प्रार्थनेत तत्पर राहण्याबद्दल अब्राहामाच्या उदाहरणाचे अनुकरण करीत आहोत का?
९. (अ) दाविदाच्या प्रार्थना आज देवाच्या लोकांसाठी इतक्या फायद्याच्या का आहेत? (ब) दाविदाने यहोवाशी निकट असण्यासंबंधाने प्रार्थना केली तशी आपण केल्यास काय परिणाम घडू शकतो?
९ प्रार्थनेत तत्पर राहण्याच्या बाबतीत दावीद देखील उल्लेखनीय गृहस्थ होता; आणि त्याची स्तोत्रे, प्रार्थना कशा असाव्यात त्याची माहिती देतात. उदाहरणार्थ, देवाचे लोक तारण किंवा मुक्तता याबद्दल (३:७, ८; ६०:५), मार्गदर्शनाबद्दल (२५:४, ५), संरक्षणाबद्दल (१७:८), पापांच्या क्षमेबद्दल (२५:७, ११, १८), आणि शुद्ध अंतःकरण याबद्दल (५१:१०) उचितपणे प्रार्थना करू शकतात. दाविदाला क्लेश जाणवले तेव्हा त्याने प्रार्थिलेः “आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर.” (८६:४) आपण देखील अंतःकरणातील अशा आनंदाबद्दल प्रार्थना करावी आणि हे जाणावे की, आपण आपल्या आशेत हर्षित असावे अशी यहोवाची देखील इच्छा आहे. दाविद यहोवाच्या निकट राहिला व त्याने प्रार्थिलेः “माझ्या जिवाने तुझी कास धरिली आहे; तुझा उजवा हात मला संभाळून धरितो.” (६३:८) तर मग, आपणही दावीदाप्रमाणेच यहोवाच्या निकट राहू का? राहिल्यास तो आपणाला देखील उंचावील.
१०. एकदा आसाफाच्या मनात कोणता चुकीचा विचार आला होता, पण त्याने काय जाणून घेतले?
१० आपल्याला यहोवाच्या निकट राहायेच आहे तर आम्ही दुर्जन लोक जे निष्काळजी व जडवादी जीवन जगत आहेत ते पाहून त्यांचा हेवा करण्याचे टाळले पाहिजे. स्तोत्रकर्त्या आसाफाला देखील एकदा असेच वाटले होते की यहोवाची सेवा करण्यात काही अर्थ नाही, कारण दुष्ट लोक “स्वस्थ असून सर्वदा धनवृद्धी करीत असतात,” हे त्याला पाहायला मिळाले. तरीही आपली ही विचारसरणी चुकीची आहे हे त्याने ताडले व हे अनुभवले की, दुष्ट जन “निसरड्या स्थलांवर” असतात. शेवटी त्याला कळाले की, यहोवाच्या निकट असणे यापेक्षा इतर काहीही चांगले नाही व म्हणूनच तो देवास असे म्हणालाः “मी नेहमी तुजजवळ आहे; तू माझा उजवा हात धरिला आहे. पाहा, जे तुजपासून दूर जातात ते नष्ट होतात. . . . मजविषयी म्हटले तर देवासमीप जाणे यात माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला [यहोवा, न्यू.व.] आपले आश्रयस्थान केले आहे. यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी.” (स्तोत्रसंहिता ७३:१२, १३, १८, २३, २७, २८) दुष्ट, आशा नसलेल्या लोकांच्या निर्धास्त जीवनशैलीबद्दल हेवा करण्याऐवजी आपण आसाफाचे उदाहरण अनुसरुन यहोवाच्या निकट राहू या.
११. यहोवाच्या निकट राहण्यामध्ये दानीएल हा कसा चांगले उदाहरण आहे, आणि आम्ही त्याचे कसे अनुकरण करू शकतो?
११ प्रार्थनेबद्दल शासकीय निर्बंधांचा अवमान केल्यामुळे सिंहांच्या गुहेत पडण्याचा धोका उद्भवला असताना देखील दानीएल निश्चयाने प्रार्थनेत तत्पर राहिला. तथापि, यहोवाने “आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली,” आणि दानीएलाची सुटका केली. (दानीएल ६:७-१०, २२, २७) प्रार्थनेत तत्पर राहिल्यामुळे दानीएलला मोठा आशीर्वाद मिळाला. तेव्हा आम्हीही, खासपणे आमच्या राज्य प्रचारास विरोध संभवल्यास प्रार्थनेत तत्पर राहतो का?
येशू, आमचे उदाहरण
१२. (अ) येशूने आपल्या सेवकपणाच्या आरंभाला प्रार्थनेबद्दल कोणते उदाहरण ठेवले, आणि याचा ख्रिश्चनांना कसा लाभ मिळू शकतो? (ब) येशूची नमुनेदार प्रार्थना प्रार्थनेबद्दल काय प्रकटविते?
१२ येशूच्या पृथ्वीवरील सेवकपणात, तो अगदी आरंभापासून प्रार्थनेत गुंतलेला असलेले पाहावयास मिळते. त्याने बाप्तिस्मा घेताना जी प्रार्थनाशील वृत्ती दाखविली ती आज आधुनिक काळात बाप्तिस्मा घेणाऱ्यांसाठी उत्तम उदाहरण आहे. (लूक ३:२१, २२) पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे जे सूचित आहे ते पूर्ण करण्यासाठी एखादा देवाच्या मदतीसाठी प्रार्थना करू शकतो. येशूने इतरांनाही देवाकडे प्रार्थनेने येण्यासाठी मदत दिली. एकदा येशू एका विशिष्ट जागी प्रार्थना करीत असता त्याच्या शिष्यांपैकी एकाने नंतर त्याच्याकडे येऊन त्याला म्हटलेः ‘प्रभूजी, आम्हास प्रार्थना करावयास शिकवा.” त्यावेळी येशूने नमुनेदार प्रार्थना शिकवली. त्यामधील विषय दाखवितात की, देवास व त्याचे उद्देश यांना प्राधान्य दिले पाहिजे. (लूक ११:१-४) अशाप्रकारे आम्ही आपल्या प्रार्थनेत प्रमाणबद्धता व समतोलपणा राखला पाहिजे आणि “जे श्रेष्ठ ते” कधीही नजरेआड करू नये. (फिलिप्पैकर १:९, १०) हे खरे कधी कधी विशिष्ट समस्या उद्भवते व ते प्रार्थनेत सांगण्याची गरज राहते. तेव्हा येशूप्रमाणे ख्रिस्तीजन देवाकडे प्रार्थना करून विशिष्ट नेमणूक पूर्ण करण्यासाठी किंवा विशिष्ट परिक्षा वा धोका याला सामना देण्यासाठी बळ मिळण्याची विनंती करू शकतात. (मत्तय २६:३६-४४) खरे म्हणजे व्यक्तीगत प्रार्थनेत जीवनातील हरएक विषयाचा समावेश असतो.
१३. इतरांसाठी प्रार्थना करण्याचे महत्त्व येशूने कसे दाखवून दिले?
१३ इतरांसाठी प्रार्थना करण्याचे महत्त्व येशूने स्वतःच्या उदाहरणावरुन दाखवून दिले. त्याला ठाऊक होते की, जसा त्याचा द्वेष करण्यात आला व छळ झाला तसेच त्याच्या शिष्यांचे देखील घडेल. (योहान १५:१८-२०; १ पेत्र ५:९) यासाठीच, त्याने देवाला विनंती केली की, “तू त्यांस वाईटापासून राखावे.” (योहान १७:९, ११, १५, २०) शिवाय पेत्राला खास परिक्षेला तोंड द्यावे लागेल हे जाणून त्याने त्याला म्हटलेः “तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंति केली आहे.” (लूक २२:३२) आपण देखील आमच्या बांधवांसाठी प्रार्थना केली, आणि केवळ आमच्याच समस्या व आस्था यांचा नव्हे तर इतरांबद्दल देखील विचार राखल्यास ते किती लाभदायक ठरते!—फिलिप्पैकर २:४; कलस्सैकर १:९, १०.
१४. येशू आपल्या सर्व सेवकपणात यहोवाच्या निकट राहिला हे आपणाला कसे कळते, आणि आपल्याला त्याचे कसे अनुकरण करता येईल?
१४ आपल्या सबंध सेवकपणात येशू प्रार्थनेत तत्पर राहून यहोवाच्या निकट राहिला. (इब्रीयांस ५:७-१०) प्रे. कृत्ये २:२५-२८ मध्ये प्रेषित पेत्र स्तोत्रसंहिता १६:८ चे अवतरण घेऊन, ते प्रभू येशू ख्रिस्ताला लागू करून म्हणतोः “मी प्रभूला [यहोवा, न्यू.व.] आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे.” आम्ही देखील असेच करू शकतो. देवाने आमच्या निकट राहावे म्हणून त्याची प्रार्थना करू शकतो आणि त्याला मानसिक रितीने आपणापुढे नित्य ठेवण्यामुळे आपला यहोवावर आत्मविश्वास आहे हे प्रदर्शित करू शकतो. (पडताळा स्तोत्रसंहिता ११०:५; यशया ४१:१०, १३.) तेव्हा, यहोवा आपला पाठीराखा असल्यामुळे व तो आम्हाला ढळू न देण्यामुळे सर्व प्रकारचे त्रास टाळता येतील.
१५. (अ) आपण कशाबाबतीत प्रार्थनेत तत्पर राहण्यामध्ये मागे पडू नये? (ब) आपण जी उपकारस्तुती करतो त्याबद्दल काय इशारा दिलेला आहे?
१५ होय, यहोवाने आम्हाबाबतीत जो चांगुलपणा दाखविला आहे, “देवाची अतिशय कृपा,” ज्यात आमच्या पापास्तव त्याने आपल्या पुत्राचे खंडणी यज्ञार्पण देण्याची देगणीही समाविष्ट आहे, तिजबद्दल आपण त्याचे आभार मानण्यात कधीही मागे पडू नये. (२ करिंथकर ९:१४, १५; मार्क १०:४५; योहान ३:१६; रोमकर ८:३२; १ योहान ४:९, १०) येशूच्या नामाने “सर्व गोष्टीबद्दल देवपित्याचे उपकारस्मरण करा”वे. (इफिसकर ५:१९, २०; कलस्सैकर ४:२; १ थेस्सलनीकाकर ५:१८) आपण, आम्हापाशी जे नाही त्या गोष्टींच्या मागे लागत राहण्यामध्ये किंवा आमच्या व्यक्तीगत समस्यांमध्ये पूर्ण गढून गेल्यामुळे, जे आहे त्याबद्दलचे उपकार स्मरण करण्यात विरजण पडू न देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे.
आपला भार यहोवावर टाकणे
१६. एखादा भार आपल्याला त्रासात टाकत असतो तेव्हा आम्ही काय करावे?
१६ प्रार्थनेत तत्पर राहाणे हे आमच्या निष्ठेची खोली प्रदर्शित करते. आम्ही देवाचा धावा करतो तेव्हा आम्हाला त्याच्याकडून उत्तर येण्याआधी देखील त्याचा आम्हावर चांगला परिणाम घडतो. आमच्या मनात काही भार त्रास देत असला तर ही सूचना पाळून आपल्याला यहोवाच्या निकट राहता येईलः “तू आपला भार परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” (स्तोत्रसंहिता ५५:२२) काळज्या, चिंता, निराशा, भय इत्यादि स्वरुपाचे आमचे सर्व भार देवावर पूर्ण विश्वासाने टाकून आपल्याला “सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाची शांती,” अंतःकरणाची शांती मिळू शकते.—फिलिप्पैकर ४:४, ७; स्तोत्रसंहिता ६८:१९; मार्क ११:२४; १ पेत्र ५:७.
१७. आपल्याला देवाकडील शांती कशी मिळवता येईल?
१७ ही देवाकडील शांती लगेच मिळू शकते का? आम्हाला लगेच विरंगुळा मिळत असला तरी, येशूने पवित्र आत्म्याकरता प्रार्थना करण्यासंबंधाने जे म्हटले होते ते येथेही खरेपणाने लागू पडतेः “मागत राहा, म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोकत राहा म्हणजे तुम्हास उघडले जाईल.” (लूक ११:९-१३, न्यू.व.) वस्तुतः पवित्र आत्म्याद्वारेच आपल्याला चिंता दूर सारता येत असल्यामुळे आपण देवाची शांती मिळावी आणि आपल्या भारासंबंधाने मदत मिळावी म्हणून विचारणा करीत राहण्यात तत्पर असले पाहिजे. प्रार्थनेत तत्पर राहिल्यामुळेच आपणाला हवी असणारी मुक्तता व अंतःकरणाची शांती मिळू शकते याबद्दल खात्री बाळगू शकतो.
१८. विशिष्ट परिस्थितीत असता आपण नक्की कशासाठी प्रार्थना करावी हे जर आपल्याला कळत नसेल तर यहोवा आमच्यासाठी काय करतो?
१८ पण प्रार्थना कशाबद्दल करावी हेच जर आपल्याला माहीत नसेल तर काय? कधी कधी आमची परिस्थिती आपल्याला स्पष्ट दिसत नसल्यामुळे किंवा आपण हताश झाल्यामुळे आपला आतील आक्रोश तसाच राहतो, त्यामुळे यहोवाकडे काय मागावे हे आपल्याला समजत नाही. येथेच पवित्र आत्मा आपल्यासाठी रदबदली करु शकतो. पौलाने लिहिलेः “प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्व्छासांनी आपल्यासाठी विनंती करतो.” (रोमकर ८:२६) ते कसे? देवाच्या वचनात आमच्या परिस्थितीशी सुसंगत असणाऱ्या प्रार्थना तसेच प्रेरित भविष्यवाद आहेत. तो हे आमच्याखातर जणू रदबदली करु देतो. ही रदबदली तो, आम्ही आमच्यासाठी जी प्रार्थना करणार होतो व ज्याचा कदाचित आम्हाला अर्थ कळून आला असता, त्याखातर करू देतो व त्यांना त्यानुसार पूर्ण करतो.
प्रार्थना व आशा पुढे चालू राहणार
१९. प्रार्थना व आशा या गोष्टी निरंतर का राहणार?
१९ आमच्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना निरंतर चालू राहणार. नवीन जग व त्यामधील आशीर्वाद यांच्यासंबंधाने त्या विशेषेकरुन असणार. (यशया ६५:२४; प्रकटीकरण २१:५) आपणहि आशेने हर्षित होत राहू, कारण आशा ही कोणातरी रुपात सर्वदा राहणारी आहे. (पडताळा १ करिंथकर १३:१३.) यहोवाने पृथ्वीबद्दल लावलेला शब्बाथाचा विश्राम दिन जेव्हा संपेल तेव्हा तो कोणकोणत्या नव्या गोष्टी सामोऱ्या आणील त्याची आपल्याला कल्पनाही करवत नाही. (उत्पत्ती २:२, ३) तो आपल्या लोकांना सदासर्वकाळासाठी प्रेमळ आश्चर्य देत राहील; आणि भवितव्य त्यांच्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यामध्ये अनेक भव्य गोष्टी राखून ठेवील.
२०. आमचा काय निर्धार असावा व का?
२० एवढी थरारक आशा आम्हापुढे असता, आपण सर्व प्रार्थनेत तत्पर राहून यहोवाशी निकट राहू या. आपल्याला मिळत असलेल्या सर्व आशीर्वादास्तव स्वर्गीय पित्याचे उपकार मानण्याचे आपण कधीही विसरु नये. नियुक्त वेळी आम्ही राखलेल्या अपेक्षा, आम्ही विचार केला वा अपेक्षा धरली त्यापेक्षाही अगदी विलोभनीयरित्या पूर्ण होतील, कारण यहोवा, “आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा . . . फारच फार करावयास . . . शक्तीमान आहे.” (इफिसकर ३:२०) हे सर्व पाहता, आपण यहोवा, आमचा “प्रार्थना ऐकणारा” देव याला सदासर्वकाळासाठी स्तुती, सन्मान व उपकारस्मरण देत राहू या!
[तळटीपा]
a वेबस्टर यांचा न्यू डिक्शनरी ऑफ सिनॉनिमस् म्हणतोः “तत्पर हा जवळजवळ अपूर्व गुण राहिला आहे; तो अपयश, शंका, किंवा अडचणी याद्वारे आलेली निराशा दूर करण्याचा भाव दर्शवितो व शेवटाचा आग्रह वा घेतलेल्या कामाकडे अचल राहण्याची प्रवृत्ती दर्शवितो.”
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ आम्ही प्रार्थनेत तत्पर राहण्याची का गरज आहे?
▫ प्रार्थनेबद्दलच्या ख्रिस्तपूर्व उदाहरणांकडून आपण काय शिकू शकतो?
▫ येशूचे उदाहरण आपल्याला प्रार्थनेबद्दल काय शिकवते?
▫ आपण आपला भार यहोवावर कसा टाकू शकतो व त्यामुळे कोणता परिणाम मिळू शकेल?
[२५ पानांवरील चित्रं]
सिंहाच्या गुहेत टाकले जाण्याचा धोका होता तरी दानीएल प्रार्थनेत तत्पर राहिला