राज्य घोषकांचा वृत्तांत
२५ वर्षे जोगिणीचे काम करणारी स्त्री शेवटी सत्य शिकते
पवित्र शास्त्र असे भाकित करते की, एक “मोठा लोकसमुदाय” सर्व राष्ट्रांमधून सामोरा येऊन यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरी त्याची भक्ती करील. (प्रकटीकरण ७:९) हे आज घडत आहे आणि पुष्कळ लोक देवाच्या सत्याच्या मदतीने खोट्या धर्माची पकड तोडीत आहे हे पाहण्यात आम्हाला आनंद वाटत आहे. पुढील अनुभव याबद्दलची स्पष्टता पुरवितात.
▫ इटलीतील रोममधील एक स्त्री कळवतेः “मी लहान होते तेव्हापासून आपण जोगीण व्हावे असे मला सारखे वाटत होते. मला देवाची सेवा करण्याची अंतःकरणापासून इच्छा होती. माझी ही इच्छा वयाच्या ३२व्या वर्षी, डिसेंबर ८, १९६० रोजी पूर्ण झाली, जेव्हा मी आज्ञाधारकतेचा, गरीबीत व शुद्धतेत राहण्याचा पण घेतला. मला ३० गरीब आणि अनाथ, त्यागलेली मुले किंवा तुरुंगात असणाऱ्या पालकांची मुले यांची रात्रंदिवस काळजी घेण्याची नेमणूक मिळाली. मला माझ्या या कामात समाधान मिळाले.
“तथापि, माझा विश्वास दहा वर्षाच्या सेवेनंतर डगमगला, जेव्हा आमच्या संस्थेत दुफळी माजली. मला याचे नवल वाटत होते की, देव जर आम्हास मार्गदर्शन देत आहे तर मग तो त्याच्या या घरात अशी ही दुफळी व अव्यवस्था का माजू देत आहे.”
या जोगिणीची फ्रान्समध्ये राहणारी एक बहीण यहोवाची साक्षीदार होती. तिने या जोगिणीला पत्राद्वारे साक्ष दिली आणि तिला न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स पाठविले. जोगीण कळवतेः “२३ वर्षानंतर मला पहिल्यांदा देवाच्या वचनाचा संपर्क मिळाला.” यानंतर तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. ती म्हणतेः “मी माझ्या अभ्यासात प्रगति करीत राहिले तसे यहोवा देव, त्याच्या गरजा व त्याचे अद्भूत गुण याबद्दल मला शिकायला मिळाले. त्याला मूर्त्यांच्या उपयोगाबद्दल घृणा आहे हे समजल्यामुळे मला बरेच वाईट वाटले, कारण आमच्या संस्थेत लहान-मोठ्या प्रत्येक प्रकारच्या मूर्त्या होत्या. मला हे कळाले की, मला जर यहोवाला संतुष्ट करायची इच्छा आहे तर मग, मी त्या ठिकाणी राहू शकत नव्हते. या कारणास्तव, २५ वर्षांच्या निष्ठावंत जोगिणीच्या सेवेनंतर मला सरतेशेवटी सत्य मिळाले. तेव्हा ऑक्टोबर १, १९८५ रोजी मी माझा राजीनामा दिला. यामुळे माझ्या वरिष्ठांना खूपच आश्चर्य वाटले.
“माझ्या प्रेमळ बंधू-भगिनींनी मला आध्यात्मिक तसेच शारीरिकरित्या मदत केली. मी यहोवा व त्याच्या संस्थेला कृतज्ञता व्यक्त करून ऑगस्ट ३०, १९८६ रोजी बाप्तिस्मा घेतला व सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालण्यास सुरवात केली.”
देवाची सेवा करण्याच्या एका नवयुवतीच्या इच्छेला यहोवा आशीर्वादित करतो
▫ यहोवाचा साक्षीदार असलेल्या ब्राझिलमधील एका शिक्षिकेने शाळेतील उत्तरपत्रिका तपासताना एका १४ वर्षे वयाच्या विद्यार्थीनीला देवाबद्दल अधिक शिकून घेण्याची इच्छा असल्याचे तिने लिहिल्याचे पाहिले. तिने या विद्यार्थिनीसोबत पवित्र शास्त्र अभ्यास सुरु केला, पण या मुलीने प्रगति दाखवली तेव्हा तिच्या कॅथोलिक कुटुंबाने त्या अभ्यासास प्रतिबंध केला व आणि तिच्याकडील प्रकाशने नष्ट केली. या तरुण मुलीने शाळेत सुटीच्या वेळी अभ्यास सुरु केला, पण हे देखील उघडकीस आले. तेव्हा अभ्यास पत्रव्यवहाराने जारी राहिला. तरीपण, लवकरच तिच्या कुटुंबाला तिची पत्रे मिळाली व त्यांनी ती जाळून टाकली. बापाने तिला चर्चमधील विधीला जाण्याची जबरदस्ती केली. ती गेली, पण सोबत वाचण्यासाठी द वॉचटावर मासिकाची प्रत नेई व ती चर्च पुस्तिकेच्या आत त्याला लपवीत असे. हे साधारण सहा महिने चालले. एकदा ती राज्य सभागृहात जाण्यासाठी तिच्या घरातून पळाली. सभा चालू असताना तिचा बाप राज्यसभागृहाच्या दाराशी आला व त्याने बंधूजनांना तिच्या मुलीला सांगावयाला लावले की, ती घरी आली तिला खूप चोप मिळणार आहे. बंधूंनी त्याच्याशी चर्चा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही.
पुढल्या दिवशी ती मोठ्या आनंदाने बांधवांना भेटायला गेली. तिने आपल्या शरीरावर, बापाने चोप दिल्याचे घाव त्यांना दाखवले. मग, ती इतकी आनंदी का होती? राज्य सभागृहातून निघून गेल्यावर बापाने गावातील बऱ्याच लोकांकडे चौकशी करून आपल्या मुलीने यहोवाच्या साक्षीदारांपैकी होण्यामध्ये काय फायदे-तोटे आहेत त्याचे मूल्यमापन केले. त्याने महापौरांकडेही चौकशी केली. ते म्हणाले की, यहोवाचे साक्षीदार चांगले, विश्वासपात्र लोक आहेत. त्यांनी पुढे असेही म्हटले की, ते उत्तम सदाचारी असून कोणा मुलाने ते आत्मसात करणे खूपच चांगले आहे; कारण ते सर्वसाधारण युवकापेक्षा उच्च आहेत.
हे सगळे होते तरी तिला मार हा मिळालाच. बापाने मार देताना म्हटले की, ती परवानगी न घेता गेली होती म्हणून तो मार होता. त्याने पुढे असेही म्हटले की, तो आणखी तिला मार देणार, जर तिने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास करणे व सभांना जाण्याचे बंद केले तर! ही मुलगी आता आवेशी प्रचारक आहे आणि तिच्या कुटुंबातील काही जण सत्याबद्दल आस्था घेत आहेत.
खरेच, हा अनुभव दाखवितो त्याप्रमाणे ज्या तरुणांना देवाची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे अशांना यहोवा आशीर्वादित करतो.—स्तोत्रसंहिता १४८:१२, १३.