राज्याच्या आशेने हर्षित व्हा
“आशेने हर्षित, संकटात सहनशील” असा.—रोमकर १२:१२.
१. यहोवाच्या सहवासात आम्हाला का आनंद मिळू शकतो, आणि प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना काय करण्याचे आर्जविले?
“धन्यवादित देव.” (१ तीमथ्य १:११) हे यहोवाचे किती उत्तम प्रकारे वर्णन देतात! का बरे? कारण त्याची सर्व कृत्ये त्याला मोठा आनंद देतात. वस्तुतः यहोवा सर्व चांगल्या गोष्टी तसेच आनंद देणाऱ्या गोष्टींचा उगम असल्यामुळे, त्याच्या सर्व बुद्धिजीवी प्राण्यांना त्याच्या समागमात आनंद मिळतो. या कारणामुळे, प्रेषित पौलानेही ख्रिश्चनांना, यहोवा देवास जाणण्याच्या आनंदी हक्काची कदर करण्यास व त्याच्या सर्व अद्भूत देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच तो दाखवीत असलेल्या कनवाळूपणाबद्दल आनंद व्यक्त करण्यास आर्जविले. पौलाने लिहिलेः “प्रभूमध्ये आनंद करा, पुनःही सांगतो, आनंद करा.”—फिलिप्पैकर ४:४; स्तोत्रसंहिता १०४:३.
२. कोणती आशा मोठा आनंद देते, आणि या आशेबद्दल काय करण्याचे ख्रिश्चनांना उत्तेजन देण्यात आले आहे?
२ पौलाने सादर केलेल्या या आर्जवाकडे ख्रिश्चन लक्ष देत आहे का? होय, निश्चितपणे! देवाने येशू ख्रिस्ताच्या आध्यात्मिक बांधवांना जी वैभवी आशा उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये ते आनंद करीत आहेत. (रोमकर ८:१९-२१; फिलिप्पैकर ३:२०, २१) होय, त्यांना माहीत आहे की, मृत तसेच जिवंत मानवजातीची जी मोठी भावी आशा आहे तिची पूर्तता ते ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्यात आपली सेवा सादर करून करतील. राजे व याजक या नात्याने सेवा करण्याचा व सहवारीस बनण्याच्या हक्काचा त्यांना किती आनंद वाटेल त्याचा विचार करा! (प्रकटीकरण २०:६) तसेच मानवजातीला परिपूर्ण प्राप्त करून देण्यात आणि आमच्या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करण्याच्या कामी मदत करण्यात त्यांना केवढा आनंद होईल! खरेच, देवाच्या सर्व सेवकांना “युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगकालापूर्वी देऊ केले,” त्याची आशा आहे. (तीतास १:२) या भव्य आशेचा दृष्टीकोण राखूनच प्रेषित पौल सर्व ख्रिश्चनांना “आशेने हर्षित” व्हा, असे उत्तेजन देतो.—रोमकर १२:१२.a
खरा आनंद—हृदयाचा गुण
३, ४. (अ) “आनंद करणे” या संज्ञेचा काय अर्थ होतो, आणि ख्रिश्चनांनी केव्हा आनंद करावा? (ब) खरा आनंद काय असतो, आणि तो कशावर आधारीत आहे?
३ “आनंद करणे” याचा अर्थ तो वाटणे किंवा व्यक्त करणे असा आहे. त्याचा अत्यानंद किंवा उत्साहाची सतत अवस्था असा अर्थ होत नाही. पवित्र शास्त्रात “आनंद,” “विजयोत्सव,” आणि “आनंद करणे” यासाठी जे इब्री व ग्रीक शब्द वापरण्यात आले आहेत ते अंतस्थ भावना व आनंदाचे वक्तव्य यांना अनुलक्षून आहेत. यासाठीच, ख्रिश्चनांना “आनंदाने राहा,” “सर्वदा आनंदित असा,” असे उत्तेजन देण्यात आले आहे.—२ करिंथकर १३:११, न्यू.व.; १ थेस्सलनीकाकर ५:१६.
४ पण एखादा कसा नेहमीच आनंदी असू शकतो? हे शक्य आहे कारण खरा आनंद हा हृदयाचा गुण, खोल अंतस्थ गुण, आध्यात्मिक रुपाचा आहे. (अनुवाद २८:४७; नीतीसूत्रे १५:१३; १७:२२) तो देवाच्या आत्म्याचे फळ असून पौलाने त्याला प्रीती या गुणानंतर लगेचचा क्रमांक दिला. (गलतीकर ५:२२) अंतस्थ गुण असल्यामुळे तो बाह्य गोष्टींवर, आमच्या बंधूजनांवर देखील अवलंबित नाही. पण तो देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. हा गुण, आम्हापाशी सत्य, राज्याची आशा आहे आणि आपण यहोवास संतुष्ट वाटणाऱ्या गोष्टीच करीत आहोत ही जाणीव असल्यामुळे खोल आंतरिक समाधानातून उद्भवत असतो. अशाप्रकारे, आनंद हा काही व्यक्तीत्वाचा उपजत गुण नाही; तर तो “नवे मनुष्यत्व” याचा भाग आहे. ही अशी गुणांची जुळवणी आहे, ज्यामुळे येशू ख्रिस्त वेगळीच व्यक्ती असल्याचे दिसून आले.—इफिसकर ४:२४; कलस्सैकर ३:१०.
५. आनंदाचे बाह्य प्रदर्शन केव्हा व कसे दिसू शकते?
५ आनंद हा हृदयाचा गुण, [म्हणजे लाक्षणिक अंतःकरणाशी संबंधित असलेली अंतस्थ भावना असली] तरी तो कित्येक प्रसंगी बाह्यरुपाने प्रदर्शित करता येतो. तर मग, आनंदाचा प्रत्यय देणारे प्रसंग कोणकोणते आहेत? ते मुखावरील प्रसन्नतापासून आनंदाचा उद्घोष करणे येथपर्यंत दिसतात. (१ राजे १:४०; लूक १:४४; प्रे. कृत्ये ३:८; ६:१५) याचा अर्थ, जे लोक बोलके दिसत नाहीत किंवा हसत नाहीत ते आनंदी नाहीत, असा समजावा का? नाही! खरा आनंद सतत बडबड करणे, हसणे, स्मित करणे किंवा मोठमोठ्याने हसणे याद्वारे व्यक्त होत नसतो. आनंद हा परिस्थितीनुसार विविध प्रकारांनी प्रदर्शित होतो. राज्य सभागृहात केवळ आनंद आम्हाला समानशील बनवीत नसतो, तर आमचे बंधुप्रेम व कळवळा ते करीत असतो.
६. अनिष्ट परिस्थिती आली असताना सुद्धा ख्रिश्चन सर्वदा का आनंदी असू शकतात?
६ आनंदाचा नित्य प्रकार हा ख्रिश्चनाच्या नव्या व्यक्तीमत्वातील आंतरिक असा चिरस्थायी भाग असतो. यामुळे सतत आनंदी राहण्याचे शक्य होते. अर्थात, कधी कधी आम्ही काही गोष्टींमुळे विचलीत होतो, किंवा अनिष्ट परिस्थितींना तोंड देतो. तरीही आम्हाला आपल्या अंतःकरणी आनंद ठेवता येतो. आरंभीचे काही ख्रिस्ती दास होते आणि त्यांना असे मालक होते ज्यांना संतुष्ट करणे मोठे कठीण जात होते. अशा प्रकारातील ख्रिस्ती नेहमी आनंदी असू शकत होते का? होय, त्यांच्या राज्य आशेमुळे व अंतःकरणातील आनंदामुळे.—योहान १५:११; १६:२४; १७:१३.
७. (अ) संकटात असताना आनंदी असण्याबद्दल येशूने काय म्हटले? (ब) संकटाच्या वेळी टिकून राहण्यामध्ये कशामुळे मदत मिळते, आणि कोणाचे याबाबतीत सर्वोत्तम उदाहरण आहे?
७ “आशेने हर्षित असा,” असे म्हटल्यानंतर लागलेच प्रेषित पौल म्हणालाः “संकटात सहनशील.” (रोमकर १२:१२) येशूने देखील संकटातील आनंदाबद्दल भाष्य केले. मत्तय ५:११, १२ मध्ये त्याने म्हटलेः “जेव्हा . . . लोक तुमची निंदा व छळ करतील . . . तेव्हा तुम्ही धन्य. आनंद व उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे.” या प्रसंगी आनंद व उल्लास हा बाह्यरुपाने दिसण्याची गरज नाही; तर ते छळामध्ये दृढपणे टिकून राहून यहोवा व येशू ख्रिस्त यांना संतुष्टता देऊ शकलो याबद्दलचे खाले आंतरिक समाधान असते. (प्रे. कृत्ये ५:४१) खरे म्हणजे, हा आनंदच आम्हाला संकटात असताना सहनशील राखण्याची मदत देतो. (१ थेस्सलनीकाकर १:६) याबद्दल येशूने आम्हापुढे सर्वात उत्तम उदाहरण मांडले आहे. शास्त्रवचने आम्हाला सांगतात की, “त्याजपुढे जो आनंद ठेविलेला होता, त्याकरता त्याने . . . वधस्तंभ सहन केला.”—इब्रीयांस १२:२.
समस्या असतानाही आशेत हर्ष करणे
८. ख्रिश्चनांना कोणत्या समस्या येतील, पण या समस्या ख्रिश्चनांचा आनंद का हिरावू शकत नाहीत?
८ यहोवाचा सेवक असण्यामुळे कोणाला समस्यांपासून मुक्तता मिळत नाही. कदाचित त्याच्यावर कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, ढासळते आरोग्य, किंवा प्रियजनांचा मृत्यु या गोष्टी येऊ शकतील. या गोष्टींमुळे दुःख होत असले तरी त्या राज्य आशेबद्दलचा आमचा आनंद, आमच्या अंतःकरणी वसत असलेला आनंद हिरावून घेऊ शकत नाही.—१ थेस्सलनीकाकर ४:१३.
९. अब्राहामाला कोणत्या समस्या आल्या, आणि त्याच्या हृदयी हर्ष होता हे आम्हाला कसे कळते?
९ याचे उदाहरण म्हणून अब्राहामाला विचारात घ्या. त्याच्यासाठी जीवन सर्वदा सुखावह नव्हते. त्याला कौटुंबिक समस्या होत्या. त्याची दासी हागार तसेच त्याची बायको सारा यांचे पटत नव्हते. क्षुल्लक बाबीवरुन भांडणे होत. (उत्पत्ती १६:४, ५) इश्माएल इसहाकाची थट्टा, त्याचा छळ करी. (उत्पत्ती २१:८, ९; गलतीकर ४:२९) शेवटी अब्राहामाची प्रिय बायको सारा ही वारली. (उत्पत्ती २३:२) एवढ्या समस्या आल्या तरी तो राज्य संतानाबद्दल, अब्राहामाचे संतान, जो पृथ्वीवरील सर्व कुळांना आशीर्वादित करणार होता, त्याच्याबद्दल हर्षित होता. (उत्पत्ती २२:१५-१८) असा हा आनंद आपल्या अंतर्यामी बाळगल्यामुळेच त्याला ऊर हे आपले स्वगृह सोडल्यावर जवळजवळ शंभर वर्षे यहोवाची सेवा करण्यामध्ये टिकून राहता येणे शक्य झाले. या कारणास्तव, त्याच्याबद्दल असे लिहिण्यात आलेः “ज्याला पाये आहेत, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची तो वाट पाहात होता.” अब्राहामाचा येणाऱ्या मशीही राज्यावर विश्वास होता, त्यामुळेच, देवाकडून राजा होण्याची आधीच नियुक्ती मिळालेला प्रभु येशू ख्रिस्त असे म्हणून शकलाः “अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेने उल्लासित झाला व तो पाहून त्याला हर्ष झाला.”—इब्रीयांस ११:१०; योहान ८:५६.
१०, ११. (अ) आम्हाला ख्रिस्ती या नात्याने कशाबद्दल लढत द्यावी लागते, आणि आमची कशी सुटका होते? (ब) आमच्या पापीष्ठ शरीराविरुद्ध पूर्ण रुपाने लढत देण्याची आमची क्षमता कशामुळे भरुन निघते?
१० अपूर्ण मानव या नात्याने आम्हाला आमच्या पापीष्ठ शरीरासोबत लढत द्यावी लागते. योग्य तेच करीत राहण्यासाठी दिलेली ही लढत बरीच त्राग्याची ठरत असते. आमच्या अशक्तपणासोबत आम्ही देत असलेली लढत याचा हा अर्थ नव्हे की, आम्हाला काही आशा नाही. स्वतः पौलाला या लढतीबद्दल खूप शोकाकूल वाटले व म्हणून तो म्हणालाः “मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवील?” पण पुढे तो म्हणतोः “आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे उपकारस्मरण करतो.” (रोमकर ७:२४, २५) येशू ख्रिस्त व त्याने दिलेली खंडणी याद्वारे आमची सुटका होते.—रोमकर ५:१९-२१.
११ ख्रिस्ताच्या खंडणीचे यज्ञार्पण, आमची पूर्ण रुपाने लढत देण्याची असणारी अक्षमता भरुन काढते. या खंडणीबद्दल आपण हर्ष करू शकतो, कारण ती आमचा विवेक शुद्ध करते व आमच्या पापांची क्षमा प्रदान करते. इब्रीयांस पत्र ९:१४ मध्ये पौल “ख्रिस्ताचे रक्त” याबद्दल बोलतो, जे “आमचा विवेकभाव . . . निर्जिव कर्मांपासून . . . शुद्ध” करते. यामुळे ख्रिश्चनांचा विवेक धिक्कार व दोषी भावनांनी भारावून जाण्याची गरज नाही. हे आणि आपणापाशी असणारी आशा यामुळे हर्षाने आनंदित होण्याची प्रबळ शक्ती देते. (स्तोत्रसंहिता १०३:८-१४; रोमकर ८:१, २, ३२) आमच्या आशेबद्दलचा खोल, गंभीर विचार करण्यामुळे आपणा सर्वांना ही लढत यशस्वीरित्या देण्यासाठी उत्तेजन मिळू शकेल.
आमची आशा मनात अगदी जवळ ठेवणे
१२. अभिषिक्त ख्रिस्ती कोणत्या आशेसंबंधाने मनन करू शकतात?
१२ आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या शेषांनी तसेच दुसरी मेंढरे यांनी आपली “तारणाची आशा” मनात ठेवली पाहिजे, व ती शिरस्राण या नात्याने सतत घालून ठेवली पाहिजे. (१ थेस्सकलनीकाकर ५:८) अभिषिक्त ख्रिस्ती स्वर्गात अमरत्व प्राप्त होण्याच्या, यहोवाच्या सान्निध्यतेमध्ये जाण्याचा आणि वैभवी येशू ख्रिस्त तसेच कित्येक शतके आपली सचोटी राखून ठेवणाऱ्या १,४४,००० सदस्यांपैकी इतरांसोबत व्यक्तीगत सहवास अनुभवण्याच्या अद्भूत हक्कावर मनन करू शकतात. तो सहवास केवढा अवर्णनीय व समृद्ध असेल!
१३. पृथ्वीवर अद्याप जिवंत असणाऱ्या अभिषिक्तांना आपल्या आशेबद्दल काय वाटते?
१३ सध्या पृथ्वीवर जिवंत असणाऱ्या थोड्याशा अभिषिक्त जनांना त्यांच्या राज्य आशेबद्दल काय वाटावे? याचा सारांश, १९१३ मध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या एकाने जे विवेचन मांडले त्यामध्ये सांगता येईलः “आमची आशा ही खात्रीची गोष्ट आहे व ती लहान कळपाच्या १,४४,००० सदस्यांच्या शेवटल्या व्यक्तीपर्यंत पूर्ण होत राहील व अशी पूर्ण होईल की, ज्याची आम्ही कधी कल्पनाही केलेली नाही. १९१४ मध्ये आम्ही शेषांनी स्वर्गात जाण्याची आशा बाळगली होती, ज्या आशेचे महत्त्व व अर्थ आम्ही अद्याप गमाविलेला नाही. याउलट, आम्ही पूर्वी होतो तितकेच तिजविषयी दृढ आहोत आणि अधिक काळासाठी जरी आम्हाला थांबून राहावे लागले तरी तिजबद्दल आम्हाठायी कदर आहे. त्यासाठी जरी लक्षावधी वर्षे लागली तरी तिजसाठी थांबून राहणे योग्यतेचे आहे. मी तर आमच्या या आशेला पूर्वीपेक्षा अधिक मोलवान मानतो, आणि मी तिजबद्दल वाटणारी आवड कधीच सोडणार नाही. लहान कळपास असणारी आशा याची खात्री देते की, दुसरी मेंढरे जी अपेक्षा राखून आहेत ती न चुकता, आमच्या कल्पनेच्या पलिकडे, अपूर्व मार्गाने पूर्ण होईल. या कारणामुळेच आम्ही या घटकेपर्यंत तग धरुन आहोत; आणि देव आपली “मोलवान व अति महान अशी वचने” खरेपणाने पूर्ण करून दाखवीपर्यंत आमचा दृढ राहण्याचा निश्चय आहे.—२ पेत्र १:४; गणना २३:१९; रोमकर ५:५.
नंदनवनाच्या आशेमध्ये सध्या हर्ष करणे
१४. मोठ्या लोकसमुदायाने कोणती आशा आपल्या मनात ठेवली पाहिजे?
१४ अशा या आवेशी विश्वासाचे वक्तव्य दुसरी मेंढरे यांच्या मोठ्या लोकसमुदायात हर्ष करण्याचे भव्य कारण पुरविते. (प्रकटीकरण ७:१५, १६) अशांनी हर्मगिदोनातून बचावून जाण्याची आशा मनामध्ये राखली पाहिजे. होय, देवाचे राज्य यहोवा देवाचे विश्वव्यापी सार्वभौमत्व तसेच त्याचे प्रतापी नाम मोठे संकट आणून गौरवीत आहे ते पुढे पाहण्याची आशा धरा. ते मोठे संकट, ज्याचा सैतान हा देव आहे त्या पृथ्वीवरील दुष्ट जनांचे पारिपत्य करील. अशा या मोठ्या संकटातून बचावून जाणे किती आनंदाचे असेल!—दानीएल २:४४; प्रकटीकरण ७:१४.
१५. (अ) पृथ्वीवर असताना येशूने कोणते बरे करण्याचे काम केले व का? (ब) हर्मगिदोनातून बचावणाऱ्या लोकांच्या कोणत्या आरोग्यविषयक गरजा असणार, आणि त्या पुनरुत्थितांपेक्षा कशा वेगळ्या असणार?
१५ प्रकटीकरण ७:१७ त्या मोठ्या लोकसमुदायाबद्दल असे म्हणतेः “कोकरा . . . जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ त्यांस नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” या भविष्यवादाची आता आध्यात्मिक दृष्टीने पूर्णता होत असली तरी हर्मगिदोनातून वाचणारे तो खरोखरी पूर्ण होत असलेला पाहतील. ते कसे? तुम्हाला आठवते ना, येशूने या पृथ्वीवर असताना काय केले? होय, त्याने लुळ्यांना बरे केले, लंगड्यांना चालविले, बहिऱ्यांचे कान खुले केले, अंधळ्यांना डोळे दिले, कुष्ठरोगी, पक्षघात्यांना बरे केले आणि “सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी” बरी केली. (मत्तय ९:३५; १५:३०, ३१) याचीच गरज आज ख्रिश्चनांना नाही का? मोठा लोकसमुदाय जुन्या जगातील आपली अपंगता व शारीरिक दुर्बलता नव्या जगात घेऊन जातील. मग, कोकरा याबाबतीत काय करण्याची अपेक्षा आम्ही बाळगू शकतो? हर्मगिदोनातून वाचणाऱ्यांच्या गरजा पुनरुत्थान होणाऱ्या लोकांपेक्षा अगदीच भिन्न असणार. पुनरुत्थान मिळणाऱ्या लोकांना जरी मानवी पूर्णता आरंभाला लाभत नसेल तरी त्यांची एकंदर, सबळ, आरोग्यदायी शरीराद्वारे पुन:निर्मिती होणार आहे. पुनरुत्थानाच्या चमत्काराद्वारे त्यांच्या पूर्वीच्या शारीरिक दुर्बलता बरे करण्याच्या चमत्काराकरवी सुधारण्याची गरज राहणार नाही. उलटपक्षी, हर्मगिदोनातून जिवंतपणे बचावून जाण्याचा अद्वितीय अनुभव लाभल्यामुळे मोठ्या लोकसमुदायापैकी पुष्कळांना अद्भूत चमत्काराद्वारे त्यांची शारीरिक दुर्बलता सुधारण्याची गरज राहणार व ती त्यांना दिली जाईल. यास्तव, येशूने बरे करण्याच्या केलेल्या कामाचा मतितार्थ, मोठ्या लोकसमुदायाला, ते केवळ बचावून जातील इतकेच नव्हे तर त्यानंतर त्यांना बरेही करण्यात येईल हे आनंदी भवितव्य आहे हे दाखविण्याचा अर्थ राखून होता.
१६. (अ) हर्मगिदोनातून बचावणाऱ्यांना अद्भुतरित्या बरे करण्याचे काम केव्हा होण्याची अपेक्षा धरता येईल, व कोणत्या परिणामासह? (ब) हजार वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही कशाविषयी हर्ष करण्याचे चालू ठेवू?
१६ अशाप्रकारे हर्मगिदोनातून बचावणाऱ्यांच्या बाबतीत अद्भूतरित्या बरे करण्याचा कार्यक्रम हर्मगिदोनानंतर लगेचच आणि पुनरुत्थान घडण्याच्या बऱ्याच काळ आधी होण्याची अपेक्षा राखता येईल. (यशया ३३:२४; ३५:५, ६; प्रकटीकरण २१:४; पडताळा मार्क ५:२५-२९.) त्यावेळी लोक आपले चष्मे, काठ्या, कुबड्या चाकांच्या गाड्या, दातांची कवळी, श्रवणयंत्रे इत्यादि गोष्टी काढून फेकतील. तो केवढा हर्षाचा काळ असेल! येशूद्वारे होणारे हे आरंभाचे पुनर्वसनाचे कार्य, हर्मगिदोनातून बचावणारे नव्या पृथ्वीचा पाया बनतील या गोष्टीशी किती सुसंगतता दाखवते! क्षीण करणारे आजार व रोग काढून टाकले जातील की, ज्यामुळे बचावणारे हे लोक मोठ्या उत्साहाने पुढे होऊन त्यांच्यापुढे हजार वर्षांसाठी जी अद्भूत कार्ये राखून ठेवली आहेत त्यांजकडे उत्सुकतेने बघू लागतील. तेथून पुढे त्यांना जुन्या जगाची कसलीही गोष्ट मागे रेटू शकणार नाही. होय, हर्मगिदोनातून वाचल्यानंतर देखील हा मोठा लोकसमुदाय हजार वर्षांच्या शेवटाला परिपूर्ण मानवी जीवन प्राप्त होण्याच्या अद्भूत आशेमध्ये हर्ष करीत राहील. या आनंदी ध्येयाप्रत पोहंचण्याची आशा ते सबंध हजार वर्षाच्या कारकिर्दीभर हर्षाने करीत राहतील.
१७. नंदनवनाचे पुनर्वसन होताना कोणते आनंद मिळतील?
१७ तीच तुमची आशा आहे तर, या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करण्याच्या आनंदात सहभागी होण्याची कल्पना देखील आपणापुढे उभी करा. (लूक २३:४२, ४३) हर्मगिदोनातून वाचणारे या पृथ्वीला स्वच्छ बनविण्यात मदत करतील व त्यामुळे मृतांचे पुनरुत्थान होण्यास उत्तम व सुखावह स्थळ पुरविण्यात येईल. मयतीच्या विधीऐवजी आता पुनरुत्थानाद्वारे जिवंत होणाऱ्या मृतजनांचे परत स्वागत करण्याचे सभारंभ होतील. यात आमच्या त्या सर्व प्रियजनांचाही समावेश असेल ज्यांनी मरणात प्रवेश केला आहे. शिवाय गत शतकांमधील विश्वासू पुरुष व स्त्रिया यांच्या बरोबर मिळणारा समृद्ध सहवास याचाही जरा विचार करा. तुम्हाला खासपणे कोणाशी बोलावेसे वाटते? हाबेल, हनोख, नोहा, ईयोब, अब्राहाम, सारा, इसहाक, याकोब, योसेफ, मोशे, यहोशवा, राहाब, दबोरा, शमशोन, दाविद, एलिया, अलीशा, यिर्मया, यहेज्केल, दानीएल की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाशी? तर मग, हे आनंदी भवितव्य देखील तुमच्या आशेचा एक भाग आहे. तुम्हाला त्यांच्याशी संभाषण करता येईल, त्यांच्याकडून शिकता येईल आणि सबंध पृथ्वीस नंदनवनात बदलविताना त्यांच्यासोबत मिळून काम करता येईल.
१८. आम्हाला आणखी कोणत्या आनंदाचा विचार करता येईल?
१८ तसेच पोषक अन्न, शुद्ध पाणी व स्वच्छ हवा आणि यहोवाने उद्देशिले होते त्या पृथ्वीवरील पूर्ण वातावरणाचा समतोल यांचे पुनर्वसन याबद्दल देखील जरा विचार करा. त्या काळी जीवन हे केवळ परिपूर्णतेतील आनंदमय स्वरुपाचे नसणार, तर त्याला हर्षमय कार्याच्या क्रियाशील व अर्थभरीत सहभाग घेण्याचीही जोड राहणार. गुन्हेगारी, स्वार्थीपणा, द्वेष, भांडणे यापासून मुक्त असणाऱ्या लोकांच्या जागतिक समाजाचे चित्र आपल्यापुढे उभारा. ते असे बंधुत्व असेल जेथे सर्वांद्वारे आत्म्याची फलप्राप्ती उत्पादित केली व जोपासली जाईल. हे केवढे थरारक आहे!—गलतीकर ५:२२, २३.
जीवन अर्थभरीत करणारी आशा
१९. (अ) रोमकर १२:१२ मध्ये सांगण्यात आलेला हर्ष केव्हा अनुभवायचा आहे? (ब) जीवनातील ओझ्यांनी आमच्या आशेला बाजूस सारु न देण्याचा आम्ही का निश्चय राखावा?
१९ ज्याची पूर्ति होत असते ती आशा पुढे राहात नाही, या कारणास्तव, पौलाने रोमकर १२:१२ मध्ये ज्या हर्षाबद्दलचे उत्तेजन दिले आहे त्याचा आज अनुभव घ्यावयाचा आहे. (रोमकर ८:२४) देवाचे राज्य जे भावी आशीर्वाद देणार आहे त्यांचा विचार करणे हे त्या आशेबद्दल सध्या हर्ष करण्याचे कारण देते. यास्तव, या भ्रष्ट जगाच्या भारदस्त जीवनाला तुमची वैभवी आशा बाजूला सारण्यासाठी प्रवृत्त करू नका. पुढे जी आशा आहे तिजवरील आपली दृष्टी ढळू देऊ नका, निराश होऊ नका व माघार घेऊ नका. (इब्रीयांस १२:३) ख्रिस्ती मार्गाक्रमणाचा त्याग करण्यामुळे तुमच्या समस्या सुटणार नाहीत. जर कोणी जीवनातील ओझ्यांमुळे देवाची सेवा करण्याचे सोडून देतो तरीही हे लक्षात असू द्या की ती ओझी त्याजवर तशीच राहतील, पण तो आपली आशा गमावील आणि अद्भूत भवितव्याचा जो हर्ष समोर आहे तो गमावण्याची शक्यता आहे.
२०. राज्य आशेला जे कवटाळतात अशांवर कोणता परिणाम घडतो, व का?
२० यहोवाच्या लोकांना आनंदी जीवन जगण्याचे हरएक कारण आहे. त्यांची तेजोमय व प्रेरित आशा जीवन जगण्याचा अर्थभरीतपणा देते. पण ते ही आपली हर्षमय आशा स्वतःपुरतीच ठेवत नाही. ते तर इतरांशी तिची सहभागिता करण्यास उत्सुक आहेत. (२ करिंथकर ३:१२) अशाप्रकारे जे राज्याच्या आशेला कवटाळतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो व ते देवापासून मिळालेल्या सुवार्तेची माहिती इतरांना कळवून त्यांना उत्तेजन देतात. यामुळे, संदेशाचा स्वीकार करणाऱ्यांचे जीवन, मानवजातीस सर्वसाधारणपणे देण्यात आलेल्या अद्भूत आशेने, म्हणजेच देवाचे राज्य या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करील या आशेने भरून जाते. लोकांनी या आशेचा स्वीकार केला नाही तरी आम्ही आंनदीच राहू, कारण ती आशा आपणाकडे आहे. जे आपला कान फिरवतात त्यांचेच नुकसान होईल, आमचे नाही.—२ करिंथकर ४:३, ४.
२१. काय समीप आहे व आम्ही आमच्या आशेचे कसे मूल्यमापन करावे?
२१ “पाहा, मी सर्व नवे करतो.” असे देवाने अभिवचन दिले आहे. (प्रकटीकरण २१:५) नवे जग त्यातील आश्चर्यावह व अमर्याद आशीर्वादासह समीप आलेले आहे. आमची आशा, मग ती स्वर्गीय असो की, पृथ्वीवरील नंदनवनाची, ती खूपच बहुमूल्य आहे. ती बळकट धरुन राहा. सध्याच्या कठीण काळी, ती “जिवाचा नांगर [असून] अचल, बळकट” असल्याचा दृष्टीकोण राखा. आपली आशा यहोवा, “सनातन दुर्ग—आश्रय दुर्ग” यावर दृढ राखून आम्हाला आम्हापुढे असलेल्या ‘आशेसंबंधाने हर्षित’ होण्याचे बळकट व उल्लासित कारण निश्चितच आहे.—इब्रीयांस ६:१९; यशया २६:४, द ॲम्प्लीफाईड बायबल.
[तळटीपा]
a १९९२ या वर्षभरात यहोवाच्या साक्षीदारांनी जगभर “आशेने हर्षित . . . प्रार्थनेत तत्पर” असा हे वार्षिक वचन ठरवले आहे.—रोमकर १२:१२.
उजळणीसाठी प्रश्न
▫ मानवजातीची मोठी आशा कोणती आहे?
▫ खरा हर्ष काय आहे?
▫ हर्मगिदोनातील बचावणाऱ्यांचे अद्भुतरित्या बरे होणे केव्हा घडू शकते?
▫ जीवनातील भाराला आमच्या आशेला बाजूस सारण्यासाठी का प्रवृत्त करू देऊ नये?
▫ नव्या जगातील कोणत्या हर्षाकडे तुम्ही डोळे लावून आहात?
[१७ पानांवरील चित्रं]
बरे करण्याचे येशूने केलेले अद्भूत चमत्कार प्रत्यक्ष पाहणे यामुळे तुमचे अंतःकरण आनंदाने भरुन जाणार नाही का?
[१८ पानांवरील चित्रं]
राज्यामध्ये हर्षित असणारे इतरांमध्ये आपल्या आशेची सहभागिता करून त्यांना उत्तेजित करतात