Photo by Stringer/Getty Images
जागे राहा!
मध्य पूर्व देशांमध्ये युद्ध—बायबल काय म्हणतं?
सध्या अमेरीका, इस्राएल आणि इराणमध्ये जे युद्ध चालू आहे त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. परिस्थिती आणखी खराब होऊन याचं मोठ्या युद्धामध्ये रुपांतर होईल का? येणारं संकट टाळून सरकारं कायम टिकणारी शांती प्रस्थापित करू शकतात का?
ज्यांना बायबलमधल्या भविष्यवाण्या माहीत आहेत त्यांना कदाचित असं वाटत असेल, की मध्य पूर्व देशांमधलं हे युद्ध ही बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या हर्मगिदोनच्या लढाईची सुरुवात आहे.
पण बायबल काय म्हणतं?
सरकारं मध्य पूर्व देशांमधलं युद्ध थांबवू शकतात का?
बायबलमध्ये म्हटलंय: “शासकांवर भरवसा ठेवू नका. माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही.”—स्तोत्र १४६:३.
येणारा काळच सांगू शकतो, की सरकारं मध्य पूर्व देशांमध्ये काही प्रमाणात का होईना शांती टिकवून ठेवू शकतात की नाही. पण बायबलमध्ये हे स्पष्टपणे सांगितलंय, की कोणताही राजकीय नेता, माणसांचं सरकारं किंवा इतर कोणतीही संघटना या जगातून पूर्णपणे युद्ध काढून टाकू शकतं नाही आणि कायम टिकणारी शांती आणू शकत नाही. फक्त देवच “सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत” करू शकतो.—स्तोत्र ४६:९.
याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी टेहळणी बुरूज चा हा अंक वाचा “युद्धांचा अंत—कसा?”
मध्य पूर्व देशांमधलं युद्ध बायबलमधली भविष्यवाणी पूर्ण करत आहे का?
बायबलमध्ये म्हटलंय: “तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल. . . . एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.”—मत्तय २४:६, ७.
मध्य पूर्व देशांतलं युद्ध हे ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीच्या’ चिन्हांपैकीच एक आहे. आणि आपण “शेवटच्या दिवसांत” जगत असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. (मत्तय २४:३; २ तीमथ्य ३:१) जगातल्या आजच्या परिस्थितीवरून दिसून येतं, की देव लवकरच सगळ्या युद्धांचा अंत करणार आहे आणि या जगातल्या इतर समस्याही तो काढून टाकणार आहे.
याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी इंग्रजीतला हा लेख वाचा “‘शेवटच्या दिवसांची’ किंवा ‘काळाची’ चिन्हं काय आहेत?”
हर्मगिदोनच्या लढाईची सुरुवात मध्य पूर्व देशांमधून होईल का?
बायबलमध्ये म्हटलंय: “त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणलं.”—प्रकटीकरण १६:१६.
हर्मगिदोनचं युद्ध हे मानवी सरकारांमध्ये किंवा मध्य पूर्व देशांमध्ये सुरू होणारं युद्ध नाही. तर हे युद्ध सगळ्या मानवी सरकारांमध्ये आणि देवामध्ये होणार आहे.
याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी हा लेख वाचा “हर्मगिदोन म्हणजे काय?”
या कठीण काळाला चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?
बायबलमध्ये म्हटलंय: “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.
यहोवाa देव प्रार्थना ऐकणारा देव आहे, आणि प्रार्थनेत आपण त्याला आपल्या सगळ्या चिंता सांगाव्यात असं त्याला वाटतं. कारण त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे. तो आपल्याला चिंतांचा सामना करायला मदत करू शकतो. (१ पेत्र ५:७) याचा एक मार्ग म्हणजे, आजच्या काळात ही युद्धं का चालू आहेत, याचं खरं कारण समजायला तो आपल्याला मदत करतो. इतकंच नाही, तर या युद्धांचा तो कसा अंत करेल आणि यामुळे झालेलं नुकसान भरून काढायला तो कायकाय करणार आहे हेसुद्धा समजायला तो आपल्याला मदत करतो.—प्रकटीकरण २१:३, ४.
देव आपल्याला कशी मदत करू शकतो याबद्दल आणखी माहीत करून घेण्यासाठी इंग्रजीतला हा लेख वाचा “बायबलमधून तुम्हाला सांत्वन मिळू शकतं.”
a बायबलमध्ये सांगितलं आहे की यहोवा हे देवाचं नाव आहे.—स्तोत्र ८३:१८.