कमल विर्दी | जीवन कथा
“मला वाटायचं की कोणासोबतही अन्याय होऊ नये”
ऑगस्ट १९७३ मध्ये मी आणि माझ्या दोन बहिणी इंग्लडमधल्या ट्विकनहम शहरात “ईश्वरी विजय” या आंतरराष्ट्रीय संम्मेलनासाठी गेलो होतो. तिथे आमची भेट ब्रदर एड्विन स्किन्नरशी झाली. ते १९२६ पासून भारतात मिशनरी म्हणून सेवा करत होते. जेव्हा त्यांना कळलं, की आम्ही पंजाबी बोलतो, तेव्हा ते आम्हाला म्हणाले: “तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर भारतात असलं पाहिजे.” त्यामुळे आम्ही भारतात जायचा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे आम्ही पंजाबी भाषेच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याच्या कामात मदत करू लागलो. पण त्याआधी माझ्यासोबत काय घडलं, ते मी तुम्हाला सांगते.
माझा जन्म एप्रिल १९५१ ला केनियामधल्या नैरोबी शहरात झाला. माझे आईवडील भारतीय होते आणि ते शीख धर्मातले होते. माझ्या वडिलांना दोन बायका होत्या. त्यांनी जेव्हा दुसरं लग्न केलं, तेव्हा माझी आई काहीच करू शकली नाही. माझ्या आईला आणि माझ्या सावत्र आईला जवळपास एकाच वेळी मुलं झाली. तेव्हा मी, माझी सख्खी भावंडं आणि माझी सावत्र भावंडं, असे आम्ही सगळे एकत्रच लहानाचे मोठे झालो. माझ्या मोठ्या काकांचा मुलगाही आमच्या सोबत राहायचा. आम्ही घरात एकूण सात मुलं होतो. १९६४ मध्ये मी १३ वर्षांची झाले, तेव्हा माझे वडील वारले.
न्यायाच्या शोधात
मोठी होत असताना माझ्या आजूबाजूला मी खूप भेदभाव आणि भांडणं पाहिली. पुढे मी बायबल शिकले, तेव्हा मला जाणवलं की माझं कुटुंब राहेल आणि लेआसारखं होतं. माझ्या लक्षात आलं, की माझे घरचे केनियाच्या नोकरांना वाईट वागणूक देत होते. कारण आम्हाला शिकवलं जायचं, की ते आमच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत. माझ्या वडिलांना वाटायचं, की आम्ही आफ्रिकेच्या लोकांसोबत नाही, तर आमचे शेजारी असलेल्या युरोपच्या लोकांसोबत जास्त मैत्री करावी. कारण त्यांच्याकडूनच आम्हाला खूप काही शिकायला मिळू शकतं. तसंच, पाकिस्तानी लोक आपले शत्रू आहेत आणि आपण त्यांच्याशीही कोणताच संबंध ठेवू नये असंही ते आम्हाला सांगायचे. पण मला वाटायचं की कोणासोबतही अन्याय किंवा भेदभाव होऊ नये. म्हणून मला माझ्या वडिलांचे विचार पटत नव्हते.
शीख धर्माची सुरुवात जवळपास १५०० साली गुरू नानक यांनी केली. मी त्यांच्या शिकवणी स्वीकारल्या होत्या. कारण मला त्या पटायच्या. त्यांपैकी एक शिकवण म्हणजे एकच खरा देव आहे. पण शीख धर्मातला अन्याय पाहून मला वाटायचं की काहीतरी गडबड आहे.
त्या धर्मात अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला कळत नव्हत्या. जसं की, शीख धर्म जवळपास ५०० वर्षं जुना आहे, म्हणून मी विचार करायचे: ‘मग त्याआधी कोणता धर्म होता? जेव्हा हे विश्व अस्तित्त्वात आलं तेव्हा देवाला मान्य असलेल्या पद्धतीने उपासना कशी केली जायची?’ आमच्या घरातल्या कॅलेंडरवर दहा शीख गुरूंचे फोटो होते. त्यांच्याकडे बघून मी विचार करायचे: ‘ते कसे दिसायचे ते कोणाला माहीत? जर याच गुरूंनी एकच खऱ्या देवाची उपासना करायला शिकवलंय, तर आपण यांच्या पुढे डोकं का टेकवयाचं?’
१९६५ मध्ये मी १४ वर्षांची असताना, आमचं पूर्ण कुटुंब भारतात राहायला गेलं. तिथे आम्हाला पैशांची अडचण भासू लागली. म्हणून आम्ही इंग्लडला जायचा विचार केला. पण सगळ्यांना एकत्र जाणं अशक्य असल्यामुळे आम्ही दोघं-दोघं करून लेस्टर शहरात आलो.
१६ वर्षांची असताना मी अंग मेहनतीचं काम करू लागले. तसंच, मी रात्रीची शाळा करून माझं शिक्षणही पूर्ण केलं. मी कामाच्या ठिकाणी बराच भेदभाव पाहिला. जसं की, गोऱ्या वर्णाच्या लोकांना बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त पगार मिळायचा. पण मला वाटायचं की सगळ्यांना समान वागणूक मिळावी. म्हणून मी तरुण कामगार संघाचा भाग बनले. इतकंच काय, तर मी बाहेरच्या देशातून आलेल्या काही बायकांना गोळा केलं आणि त्यांच्यासोबत संप केला. कसंही करून मला न्याय हवा होता!
उत्तराच्या शोधात
१९६८ मध्ये जेव्हा दोन साक्षीदार भावांनी माझं दार ठोठावलं, तेव्हा पहिल्यांदाच साक्षीदारांशी माझी भेट झाली. त्यांनी सांगितलं की देवाच्या राज्यात कोणताच भेदभाव नसेल. ही गोष्ट मला खूप आवडली. त्यांच्यापैकी एक साक्षीदार भाऊ आपल्या पत्नीला घेऊन परत माझ्या घरी आले. त्यानंतर मी, माझी बहीण जसविंदर आणि माझी सावत्र बहीण चानी आम्ही तिघींनी बायबल अभ्यास सुरू केला. फक्त सहा धड्यांतच आम्हाला या गोष्टीची खातरी पटली की यहोवा हा खरा देव आहे, बायबल त्याचं वचन आहे आणि देवाचं राज्यच सर्वांना न्याय मिळवून देईल.
पण आमच्या कुटुंबाने आमचा खूप विरोध केला. वडील गेल्यानंतर माझा सावत्र भाऊ कुटुंबप्रमुख बनला. माझी सावत्र आई त्याचे कान भरायची, म्हणून तो आमचा विरोध करायचा. तो जसविंदर आणि चानीला कडक बूटांनी लाथा मारायचा. त्याला माहीत होतं, की मी १८ वर्षांची असल्यामुळे तो मला हात लावू शकत नाही. पण माझ्या बहिणी लहान होत्या. त्यामुळे आपण त्यांच्याशी कसंही वागू शकतो, असं त्याला वाटायचं. एकदा तर त्याने बायबल जाळलं आणि त्यांच्या तोंडापुढे धरलं. आणि त्यांना म्हणाला: “बोलवा तुमच्या यहोवाला. बघू ही आग विझवतो की नाही!” त्या वेळी आम्ही गुपचूप एक-दोन सभांनाही गेलो होतो. आम्हाला खऱ्या देवाची, यहोवाची उपासना करायची होती. पण तशा परिस्थितीत ते अशक्य वाटत होतं. त्यामुळे आम्ही घर सोडून पळून जायचा निर्णय घेतला.
आम्ही आमच्या जेवणाचे आणि बस भाड्याचे पैसे जमा करू लागलो. मला मिळालेला पगार मला माझ्या सावत्र आईला द्यावा लागायचा. पण मी त्यातलेही काही पैसे बाजूला काढून ठेवायचे. मग आम्ही तीन सूटकेस विकत घेतल्या आणि त्या आमच्या घरापासून लांब लपवून ठेवल्या. त्यात आम्ही हळूहळू आमचे कपडे भरू लागलो. मे १९७२ ला जसविंदर १८ वर्षांची झाली आणि आमच्याकडे २,००० रुपये जमा झाले. तेव्हा आम्ही इंग्लंडमधल्या दक्षिण-पश्चिम दिशेला असलेल्या पेनझान्स शहरासाठी ट्रेन पकडली. तिथे पोचल्यावर आम्ही तिथल्या साक्षीदारांना फोन केला. त्यांनी प्रेमाने आमचं स्वागत केलं. त्या ठिकाणी आम्हाला भाड्याने घर घेता यावं आणि रोजचा खर्च भागवता यावा, म्हणून आम्ही बरीच कामं केली. जसं की, मासे साफ करणं.
आम्ही हॅरी आणि बेट्टी ब्रिग्स या वयस्कर जोडप्यासोबत आमचा बायबल अभ्यास सुरू ठेवला. मग सप्टेंबर १९७२ ला ट्रुरो राज्य सभागृहात एका छोट्याशा पूलमध्ये आमचा बाप्तिस्मा झाला. त्या वेळी आम्ही आमच्या घरच्यांपासून लपूनच होतो. मग चानीने पायनियर सेवा सुरू केली. मी आणि जसविंदर नोकरी करून घर चालवू लागलो.
गरज असलेल्या ठिकाणी प्रचार
हॅरी आणि बेट्टी जवळपास ९० वर्षांचे होते. पण तरी ते इंग्लंडच्या दक्षिण-पश्चिमकडे असलेल्या सिली बेटांवर नियमितपणे प्रचार करायला जायचे. त्यांच्याकडे बघून आपणही असंच काहीतरी करावं असं वाटायचं. त्यामुळे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे १९७३ मध्ये ब्रदर स्किन्नरशी आमचं बोलणं झाल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही काय केलं पाहिजे.
जानेवारी १९७४ ला आम्ही दिल्लीला गेलो. तिथे गेल्यावर भाऊ डिक कॉटरिल यांनी आम्हाला काही काळासाठी मिशनरींच्या घरात राहू दिलं. मग चानी पायनियर सेवा करू लागली, तर मी आणि जसविंदर प्रचारात जास्तीत जास्त वेळ घालवू लागलो.
नंतर आम्हाला पंजाबला जायला सांगण्यात आलं. तिथे आम्ही चंडीगढमध्ये एका मिशनरी घरात राहिलो. त्यानंतर आम्ही एक घर भाड्याने घेतलं. सप्टेंबर १९७४ ला मी पायनियर सेवा सुरू केली आणि मग १९७५ ला मला खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी बोलावण्यात आलं. प्रचार केल्यामुळे मला कळलं, की जास्तीत जास्त लोकांना यहोवाच्या प्रेमाबद्दल आणि न्यायाबद्दल कळावं, म्हणून पंजाबी भाषेत साहित्यांची खूप जास्त गरज आहे. मग १९७६ ला पंजाबी भाषेत साहित्यांचं भाषांतर करण्याच्या कामात मदत करण्यासाठी भारताच्या शाखा कार्यालयाने आम्हा तिघींना बोलावून घेतलं. त्या काळात टाइपराइटर किंवा कम्प्यूटर नव्हते. त्यामुळे या कामात खूप मेहनत होती. भाषांतर केलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला हाताने लिहून काढावी लागायची. आणि ते सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी आम्हाला त्याचं चेकिंग आणि प्रूफरीडिंगसुद्धा करावं लागायचं. त्यानंतर आम्ही जुन्या मशीन असलेल्या एका छापखान्यात जायचो आणि भाषांतर केलेला मजकूर छापण्यासाठी हाताने एक-एक अक्षर मशीनमध्ये बसवायचो.
चंडीगढमधली आमची मंडळी
आरोग्याच्या समस्या असूनही आनंदी
आमची परिस्थिती लवकरच बदलली. जसविंदरने एका साक्षीदाराशी लग्न केलं आणि ते कॅनडात स्थायिक झाले. तसंच, चानीने अमेरिकेतून आलेल्या एका जर्मन साक्षीदाराशी लग्न केलं आणि ते अमेरिकेत राहू लागले. त्या काळात माझी तब्येत खूप बिघडली आणि ऑक्टोबर १९७६ ला मला पुन्हा इंग्लंडला जावं लागलं. माझी आई आणि माझा सख्खा भाऊ लेस्टरमध्ये राहत होते. ते आमचा विरोध करत नव्हते. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्याकडे राहायला बोलावून घेतलं. नंतर डॉक्टरांनी मला सांगितलं, की मला इवान्स सिंड्रोम नावाचा एक मोठा आजार झालाय. हा एक दुर्मिळ आजार आहे आणि यात शरीर आपल्याच चांगल्या पेशी नष्ट करतं. मला यासाठी वेगवेगळे उपचार करावे लागले. इतकंच काय, तर माझ्या शरीराचा एक भागही (पांथरी किंवा प्लिहा) काढण्यात आला. त्यामुळे मला माझी पायनियर सेवा सोडावी लागली.
मी यहोवाला कळकळून प्रार्थना केली, की मी जर बरी झाले तर पूर्ण वेळेची सेवा सुरू करेन. आणि तसंच झालं! माझी तब्येत अधूनमधून खराब व्हायची, तरीसुद्धा १९७८ ला मी वुल्व्हरहॅम्पटन इथे राहायला गेले. तिथे पंजाबी भाषा बोलणारे बरेच लोक राहायचे. त्यामुळे मी तिथे पायनियर सेवा सुरू केली. लोकांना सभेला बोलवण्यासाठी आम्ही हातांनी आमंत्रण पत्रिका तयार करायचो आणि त्यांच्या झेरॉक्स काढायचो. मग त्या आमंत्रण पत्रिका आम्ही पंजाबी बोलणाऱ्या लोकांना द्यायचो आणि त्यांना जाहीर भाषणासाठी बोलवायचो. आता ब्रिटनमध्ये पंजाबी भाषेच्या पाच मंडळ्या आणि तीन गट आहेत.
मी भारतात पंजाबी भाषांतरकार म्हणून जे काम केलं होतं, ते ब्रिटनच्या शाखेला माहीत होतं. त्यामुळे १९९० च्या आसपास ब्रिटनच्या शाखेने मला संपर्क केला. त्यानंतर मी आठवड्यातले काही दिवस बेथेलला जाऊ लागले आणि तिथे गुरुमुखी लिपीच्या अक्षरांचं फॉन्ट आणि सॉफ्ट्वेअर तयार करण्याच्या कामात मदत करू लागले. त्या वेळी मी खूप व्यस्त होते. एकाच वेळी मी बऱ्याच गोष्टी करत होते. मी नोकरी करत होते, माझ्यापासून लांब राहणाऱ्या आईची काळजी घेत होते आणि बेथेलमध्येही सेवा करत होते. या सगळ्या गोष्टी करणं मला थोडं कठीण जात होतं. पण मी बेथेलमध्ये सेवा करू शकते या गोष्टीचा मला खूप आनंद होता.
१९९० च्या आसपास लंडन बेथेलमध्ये मला प्रशिक्षण मिळत असताना
सप्टेंबर १९९१ मध्ये मला बेथेलमध्ये पूर्ण वेळेची सेवा करायला आणि पंजाबी भाषेत बायबल आधारित साहित्यांचं भाषांतर करायला बोलावण्यात आलं. मला ही संधी मिळेल याचा मी विचारच केला नव्हता! कारण मी त्यासाठी पात्र नाही असं मला वाटायचं. त्यावर मी आजारीही होते. शिवाय, नवीन बेथेल सदस्यांसाठी असलेली वयाची मर्यादासुद्धा मी ओलांडली होती. एवढं सगळं असूनसुद्धा यहोवाने मला ही सुंदर संधी दिली होती! बेथेलमध्ये आनंदाने सेवा करत असताना आजाराने माझी पाठ काही सोडली नाही. किमोथेरपी आणि इतर उपचार करत असताना मला रक्त घेण्याचा दबाव आला. पण रक्त न घेता मी कशी काय बरी होत आहे, याचं माझ्या डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी मला लंडनच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेमिनारसाठी बोलवलं. तिथे जवळपास ४० डॉक्टर आले होते. मी रक्त का घेत नाही याबद्दल मी तिथे १० मिनिटं बोलले. त्यानंतर डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरं हॉस्पिटल माहिती विभागातल्या एका भावाने दिली.
या कठीण काळात जसविंदर आणि चानी माझ्या पाठीशी उभ्या होत्या. तसंच, बेथेलमधल्या आणि इतर मित्रमैत्रिणींचेही मी आभार मानते. कारण त्यांनीही मला साथ दिली. या सर्व कठीण काळात माझ्या नेमणुकीत टिकून राहण्यासाठी यहोवाने मला ताकद दिली.—स्तोत्र ७३:२६.
यहोवाच्या आशीर्वादानेच माणूस श्रीमंत होतो
आता बेथेलमध्ये सेवा करून मला ३३ वर्षं झाली आहेत. या संपूर्ण काळादरम्यान ‘यहोवा किती चांगला आहे याची मला पारख करता आली’ आहे. (स्तोत्र ३४:८; नीतिवचनं १०:२२) बऱ्याच काळापासून विश्वासूपणे सेवा करणाऱ्या वयस्कर भाऊबहिणींच्या उदाहरणांमुळे मला खूप मदत झाली आहे. पंजाबी भाषा बोलणारे माझे बरेच बायबल विद्यार्थी आता यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत, याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला खूप आनंद होतो. आता माझं माझ्या घरच्यांसोबत चांगलं चाललंय. माझी आई आणि माझा भाऊ साक्षीदार नाहीत. पण तरी माझी आई बऱ्याचदा मला असं म्हणते: “तू खरंच खूप धार्मिक आहेस! तू देवासाठी खूप करतेस.” मी जेव्हा माझ्या भावाला बेथेल सोडण्याबद्दल आणि पूर्ण वेळ आईची काळजी घेण्याबद्दल बोलले, तेव्हा तो मला म्हणाला: “तू तिथे चांगलं काम करतेस, त्यामुळे तिथेच राहा.” माझी आई बेथेलपासून थोडं लांब नर्सिंग होममध्ये राहत असली, तरी मी बऱ्याचदा तिला भेटायला जाते.
शेवटी मला एवढंच सांगायचंय, की जेव्हा-जेव्हा माझ्या आयुष्यात समस्या यायच्या, तेव्हा-तेव्हा मी स्वतःला म्हणायचे, ‘घाबरू नको कमल. यहोवा तुझी ढाल आहे! तो तुला खूप आशीर्वाद देईल.’ (उत्पत्ती १५:१) खरंच, मी आपला “न्यायी” देव यहोवा याचे खूप आभार मानते! कारण मी लहान होते तेव्हा त्याने माझ्याकडे लक्ष दिलं आणि मला एक अर्थपूर्ण काम दिलं. (यशया ३०:१८) मी अशा एका काळाची आतुरतेने वाट पाहत आहे, जेव्हा “‘मी आजारी आहे,’ असं देशातला एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.
चेम्सफोर्ड बेथेलमध्ये