डेव्हीड माझा | जीवन कथा
दुःखाच्या वादळात अडकलेलं कुटुंब किनाऱ्यावर येतं
आनंदी कुटुंब माझ्यासाठी एक स्वप्नच होतं. पण बायबलचा अभ्यास केल्यावर आणि त्यातली तत्त्वं लागू केल्यावर माझ्यासाठी ते स्वप्न खरं ठरलं. त्यानंतर मी आणि माझी बायको, आमच्या तीन मुलांसोबत मिळून मनापासून यहोवाची सेवा करू लागलो.
पण २४ एप्रिल २००४ ला आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यासाठी आम्ही अजिबात तयार नव्हतो.
आमच्या मुलीचा म्हणजे लॉरेनचा जन्म झाला, तेव्हा एक चांगला पिता कसा असतो हे मला माहीतच नव्हतं. मग आमच्या मुलाचा म्हणजे मायकलचा जन्म झाला. तेव्हापण मला याची अजिबात कल्पना नव्हती. कारण माझ्या आईवडिलांचं आपसात कधीच पटलं नाही. ते सतत भांडायचे. शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला. मला एक चांगला कुटुंबप्रमुख बनायचं होतं, पण त्यासाठी नेमकं काय करायचं हेच मला माहीत नव्हतं.
तरुण वयातच मला दारू आणि ड्रग्सचं व्यसन लागलं. मोठा झाल्यावरही मला या सवयींवर ताबा मिळवता आला नाही. माझ्या व्यसनांमुळे आणि जुगार खेळण्याच्या सवयीमुळे मी बरेच चुकीचे निर्णय घेतले. परिस्थिती इतकी खराब झाली की माझी बायको काई आमच्या मुलांना घेऊन मला सोडून गेली. मी आतून पार तुटून गेलो होतो.
मी काईला विचारलं की ‘मी काय केलं तर तू परत येशील?’ त्यावर ती म्हणाली: “तू फक्त बायबल अभ्यास सुरू कर.” इतकीच तिची अट होती, कारण ती आधीपासूनच ग्लोरिया नावाच्या एका साक्षीदार बहिणीसोबत बायबल अभ्यास करत होती. खरंतर बायबल अभ्यास काय असतो हे मला माहीत नव्हतं. आणि तो करण्यात मला रसही नव्हता. पण काईने परत घरी यावं, एवढंच मला पाहिजे होतं. म्हणून मी ग्लोरिया आणि तिचा नवरा बिल यांना भेटायला तयार झालो.
जीवन बदलून टाकणारी चर्चा
बिल आणि ग्लोरिया घरी आले तेव्हा त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, त्यांचं नातं किती घट्ट आहे हे पाहून मी थक्क झालो. त्यांच्याशी बोलल्यावर मला कळलं की त्यांची मुलं माझ्याच वयाची आहेत आणि ती खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. आनंदी कुटुंबाचं रहस्य कदाचित बायबलमध्ये असू शकतं, असा पहिल्यांदाच मी विचार करू लागलो.
त्या दिवशी बिल आणि ग्लोरिया माझ्या समस्यांबद्दल माझ्याशी बोलले. त्यांनी मला बायबलमधून गलतीकर ६:७ हे वचन दाखवलं. त्यात म्हटलंय: “एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.” तेव्हा मी विचार केला, ‘हे तत्त्व जर मी माझ्या जीवनात लागू केलं असतं, तर इतक्या समस्या माझ्या वाट्याला आल्याच नसत्या!’
काई आणि डेव्हीड
हळूहळू माझ्या लक्षात आलं की बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे माझं जीवन खरंच खूप सुधारलंय. मी आणि माझ्या बायकोने सिगारेट ओढायचं सोडून दिलं. मला माझी दुसरी व्यसनंही सोडता आली. मग १९८५ मध्ये आम्हाला तिसरं मूल झालं. आम्ही त्याचं नाव डेव्हीड ठेवलं. लाडाने आम्ही त्याला डेव्ही म्हणायचो. त्याचा जन्म झाला तेव्हा कुठे मला कळलं की एक चांगला पिता कसा असतो.
एकत्र मिळून यहोवाची सेवा
मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवताना आमच्या लक्षात आलं, की आमचंही यहोवासोबतचं नातं आणखी घट्ट होतय. लिसनिंग टू द ग्रेट टीचर! यासारख्या प्रकाशनातून मुलांना शिकवताना आम्ही खूप काही शिकलो. शिवाय, मंडळीतल्या कुटुंबांकडूनही आम्हाला आणि आमच्या मुलांना बरंच काही शिकायला मिळालं.
मायकल आणि त्याची बायको डायना
काही काळाने आमची तिन्ही मुलं पायनियर सेवा करू लागली. २००४ च्या सुरुवातीला आमची मुलगी लॉरेन स्पॅनिश भाषेच्या मंडळीत सेवा करू लागली. मायकलचं लग्न ठरल्यामुळे त्याने नुकतीच बेथेल सेवा सोडली होती. तो आणि त्याची बायको डायना, ग्वाम या ठिकाणी सेवा करायला जाणार होते. डेव्ही त्या वेळी १९ वर्षांचा होता आणि त्याने अलीकडेच डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये सेवा सुरू केली होती.
आमच्या मुलांनी आयुष्यात जे निर्णय घेतले होते त्यांमुळे आम्हाला त्यांचा खूप अभिमान होता. आम्ही जणू काही ३ योहान ४ या वचनात जे म्हटलंय ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्यात म्हटलंय: “माझी मुलं सत्याच्या मार्गावर चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही.” पण आम्हाला याची जरासुद्धा कल्पना नव्हती, की फक्त एका फोनकॉलमुळे आमचं आयुष्यच बदलून जाईल.
हादरवून टाकणारी एक घटना
२४ एप्रिल २००४ चा दिवस होता. मी आणि काई दोन जोडप्यांसोबत संध्याकाळी बाहेर जेवायला गेलो होतो. रेस्टॉरेंट शंभरएक किलोमीटर लांब असल्यामुळे आम्ही सगळे माझ्याच गाडीतून गेलो होतो. जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खाण्यासाठी मी सगळ्यांना एका कॅफेमध्ये सोडलं आणि गाडी पार्क करायला गेलो. इतक्यात माझा फोन वाजला. माझ्या मित्राचा फोन होता. त्याच्या आवाजावरून काहीतरी भयंकर घडल्याचं जाणवलं.
तो म्हणाला, “एक वाईट बातमीए. डेव्हीचा ॲक्सिडेंट झालाय.”
मी घाबरतच त्याला विचारलं, “डेव्ही कसाय?”
सुरुवातीला त्याला शब्दच फुटत नव्हते. पण नंतर कचरत-कचरतच त्याने सांगितलं, की ‘आपला डेव्ही गेला.’
फोन ठेवल्यावर, हिंमत मिळावी म्हणून मी यहोवाला लगेच प्रार्थना केली. मग मी कॅफेत गेलो आणि बाकीच्यांना सांगितलं, की ‘मला जरा बरं वाटत नाहीए. आपण घरी गेलेलं बरं.’ कारण मला घरी गेल्यावर एकट्यात काईला ही गोष्ट सांगायची होती.
माझ्यासाठी दीड तासांचा तो प्रवास कधीही न संपणाऱ्या प्रवासासारखा होता. डेव्ही खरंतर आम्हाला भेटायला लवकरच घरी येणार होता. त्यामुळे काई खूप खूश होती आणि त्याबद्दल भरभरून बोलत होती. ते सगळं ऐकून मला आणखीनच त्रास होत होता. काईला आमच्या मुलाबद्दल अजून माहीतही नव्हतं, पण इकडे माझ्या फोनवर सांत्वन देणारे कितीतरी मेसेज येत होते.
बाकीच्यांना घरी सोडवून मी आणि काई घरी आलो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि लगेच ओळखलं की काहीतरी भयानक घडलंय! तिने मला विचारलं, “काय झालंय?” मला माहीत होतं की मी आता तिला जे सांगणार आहे ते ऐकून ती पार हादरून जाईल. कारण जवळजवळ दोन तासांआधी एका फोनकॉलमुळे माझीही अशीच अवस्था झाली होती.
दुःखातून सावरायला मदत
काई आणि मी आधी बऱ्याच समस्यांमधून गेलोय आणि यहोवा त्याच्या लोकांना टिकून राहायला मदत करतो हे आम्हाला माहीत होतं. (यशया ४१:१०, १३) पण हे संकट फार वेगळं होतं. माझ्या डोक्यात सारखा एकच विचार येत होता, ‘ज्याने यहोवासाठी इतकं केलं त्याच्यासोबत असं कसं होऊ शकतं? यहोवाने त्याला का नाही वाचवलं?’
आमच्या दुसऱ्या दोन मुलांनाही या बातमीवर विश्वास बसत नव्हता. तेही पार खचून गेले होते. लॉरेन डेव्हीसाठी आईसारखीच होती. म्हणून त्याच्या जाण्याचं दुःख तिला पचवता आलं नाही. मायकलचीसुद्धा तीच अवस्था होती. तो जरी जवळपास पाच वर्षं घरापासून लांब राहत असला, तरी त्याने अलीकडेच पाहिलं होतं की त्याचा लहान भाऊ किती मोठा झालाय, प्रौढ झालाय.
आमच्या मंडळीतल्या भाऊबहिणींनी या दुःखातून सावरायला आम्हाला खूप मदत केली. डेव्हीच्या जाण्याचा काईला खूप जास्त त्रास झाला होता. पण या प्रेमळ भाऊहिणींनी दिलेल्या धीराचा आणि मदतीचा काईला खूप फायदा झाला. (नीतिवचनं १७:१७) त्यांचं हे प्रेम मी कधीच विसरणार नाही!
आमच्या या दुःखातून बाहेर पडायला काई आणि मी प्रार्थना करायचं, बायबल अभ्यास करायचं आणि सभांना जायचं कधीच सोडलं नाही. यामुळे आमचं दुःख पूर्णपणे नाहीसं झालं नाही. पण आम्हाला माहीत होतं की यहोवासोबतचं आमचं नातं टिकवून ठेवायला या गोष्टी करत राहणं गरजेचं आहे.—फिलिप्पैकर ३:१६.
लॉरेन आणि तिचा नवरा जस्टिन
या काळात मायकल आणि डायना आमच्या जवळ राहायला आले. लॉरेनही आमच्या इंग्रजी भाषेच्या मंडळीत आली. पुढची काही वर्षं आम्हाला एकमेकांची साथ असल्यामुळे सगळ्यांनाच या दुःखातून सावरायला मदत झाली. नंतर लॉरेनचं लग्न झालं. तिच्या नवऱ्याची, म्हणजे जस्टिनचीही आम्हाला खूप मदत झाली.
एक कठीण प्रवास
डेव्ही गेल्यानंतर त्याच्या दुःखातून सावरण्यासाठी आम्ही आणखी एक गोष्ट केली. ती करणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. पण त्यामुळे आम्हाला मदतच झाली. आता काई तुम्हाला त्याबद्दल सांगेल.
“जेव्हा माझ्या नवऱ्याने मला डेव्हीबद्दल सांगितलं, तेव्हा मला दुःखाच्या खाईत पडल्यासारखं वाटलं आणि बऱ्याच काळापर्यंत मला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. ते दुःख इतकं मोठं होतं की मला साध्यासाध्या गोष्टीही करता येत नव्हत्या. माझे अश्रू थांबता थांबत नव्हते. खरं सांगायचं तर मला कधीकधी यहोवाचाच राग यायचा. मला बाकीच्यांचाही राग यायचा. कारण ते जिवंत होते, पण माझा डेव्ही नव्हता. माझ्या डोक्यात काहीपण विचार यायचे.
“मला डॉमिनिकन प्रजासत्ताकला जायचं होतं. डेव्ही कुठे राहायचा, कुठे सेवा करायचा हे सगळं पाहायचं होतं. पण मी अजूनही मनाने खचलेले होते, गळून गेले होते. त्यामुळे मला हा प्रवास कठीण वाटत होता.
“डेव्हीच्या एका मैत्रिणीने मला सांगितलं, की डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये असणारे त्याचे इतर मित्रही दुःखात आहेत आणि त्यांना आम्हाला भेटायचंय. तिच्या या बोलण्यामुळे मला तो प्रवास करायची हिंमत मिळाली.
“आम्हाला ज्या गोष्टीची गरज होती, नेमकी तीच या प्रवासातून मिळाली. आम्हाला कळलं की डेव्हीचं यहोवावर किती प्रेम आहे! त्याच्या मंडळीत एकच भाऊ वडील म्हणून सेवा करायचा. त्या भावाने आम्हाला सांगितलं, की डेव्हीवर सोपवलेली कोणतीही जबाबदारी पूर्ण होईल याची मला गॅरेंटी असायची.
“आम्ही डेव्हीच्या घराकडे गेलो. तेव्हा आजूबाजूचे लोक आमच्याकडे आले आणि डेव्हीने त्यांच्यासाठी किती चांगल्या-चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल ते कौतुकाने आम्हाला सांगू लागले. डेव्हीचा हा प्रेमळ स्वभाव मला आधीपासूनच माहीत होता. पण माझ्या लेकराने येशूसारखं वागण्यासाठी किती मेहनत घेतली होती, हे मला इथे आल्यावर पाहायला मिळालं!
डेव्ही डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये सेवा करताना
“आम्ही डेव्हीच्या एका बायबल विद्यार्थ्यालाही भेटलो. तो खूप गरीब होता आणि एका छोट्याशा घरात राहायचा. आजारी असल्यामुळे तो बिछान्याला खिळून होता. तरी डेव्ही त्याच्याशी खूप आदराने आणि प्रेमाने वागायचा असं मंडळीच्या भाऊबहिणींकडून आम्हाला कळलं. हे ऐकून मला डेव्हीचा खूप अभिमान वाटला.
“हा प्रवास आमच्यासाठी खूप जास्त कठीण होता. तरी या प्रवासामुळे डेव्हीच्या मित्रांसोबत आम्हाला आमचं दुःख वाटता आलं आणि एकमेकांना दिलासाही देता आला. या प्रवासाने आमच्या जखमांवर जणू फुंकर घातली. असं वाटलं की आमचं दुःख थोडं हलकं झालंय.”
डेव्हीमुळे मिळालेलं प्रोत्साहन
८ जानेवारी २००५ च्या सावध राहा! अंकात डेव्हीच्या जाण्याबद्दल आणि डॉमिनिकन प्रजासत्ताकमधल्या त्याच्या सेवेबद्दल एक लेख छापण्यात आला होता. या लेखामुळे वाचणाऱ्यांना कशी मदत होईल, याचा आम्हाला जराही अंदाजा नव्हता. मग मे २०१९ मध्ये निक नावाच्या भावाने आम्हाला संपर्क केला आणि असं सांगितलं:
“२००४ च्या शेवटी-शेवटी मी कॉलेजमध्ये होतो. त्या वेळी मी कोणतंच आध्यात्मिक ध्येय ठेवलं नव्हतं. त्यामुळे मी जराही खूश नव्हतो. म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली. त्याला सांगितलं, की ‘माझ्या तरुणपणाचा चांगला वापर करायला मला मदत कर.’ त्यानंतर मी सावध राहा! मधला डेव्हीचा लेख वाचला. हा लेख जणू माझ्या प्रार्थनेचं उत्तरच होतं!
“मी कॉलेज सोडलं आणि पायनियरिंग सुरू केली. तसंच, मी स्पॅनिश भाषा शिकून परदेशात सेवा करायचं ध्येयही ठेवलं. काही वर्षांनी मला निकाराग्वामध्ये सेवा करायची आणि माझ्या बायकोसोबत सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला हजर राहायची संधीही मिळाली. मला पायनियर सेवेची प्रेरणा कुठून मिळाली, असं लोकांनी विचारल्यावर मी त्यांना डेव्हीचा अनुभव सांगतो.”
२०१९ ला आम्ही अर्जेंटिनाच्या ब्वेनॉस एरीझ या शहरात आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी गेलो होतो. तिथे आमच्या हॉटेलमध्ये ॲबी नावाची एक बहीण होती. तिच्या दयाळू आणि प्रेमळ स्वभावाने आमचं मन जिंकलं. तिला भेटून काई आणि मला डेव्हीचीच आठवण झाली.
डेव्हीच्या अनुभवामुळे ॲबीला पूर्णवेळच्या सेवेची आणि दुर्गम भागात सेवा करायची प्रेरणा मिळाली
अधिवेशनाहून परत हॉटेलवर आल्यावर आम्ही ॲबीला डेव्हीच्या लेखाची लिंक पाठवली. काही मिनिटांतच तिचा मॅसेज आला. ती आम्हाला भेटायला खूप उत्सुक होती. म्हणून आम्ही तिला भेटायला गेलो. ॲबीने भावुक होऊन सांगितलं, की डेव्हीच्या अनुभवामुळेच तिला पायनियर सेवा करायची प्रेरणा मिळाली. म्हणून सप्टेंबर २०११ मध्ये तिने पायनियर सेवा सुरू केली आणि मग ती दुर्गम भागात सेवा करायला गेली. ती म्हणाली: “माझ्या नेमणुकीत अडचणी आल्यावर मी डेव्हीचा लेख पुन्हापुन्हा वाचते.” इतकंच काय, तर तिच्याकडे त्या लेखाची प्रतही होती.
यांसारख्या अनुभवांवरून कळतं, की आपण एका जागतिक कुटुंबाचा भाग आहोत. खरंच, यहोवाच्या लोकांसारखी एकी कुठेच पाहायला मिळत नाही!
डेव्हीच्या उदाहरणाचा किती लोकांना फायदा झालाय, हे समजल्यावर आम्हाला खूप बरं वाटलं. यहोवाच्या सेवेत मेहनत घेणाऱ्या सर्व तरुणांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. ते त्यांच्या आवेशाने दुसऱ्यांच्या मनावर छाप पाडतात. त्यांच्या उदाहरणामुळे इतरांना यहोवाच्या सेवेत जास्तीत जास्त करण्याची प्रेरणा मिळते. या गोष्टीची त्यांना कल्पनाही नसते.
“[देवाच्या] दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत”
लूक २०:३७ मध्ये येशू यहोवाची, तो “अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव” म्हणून ओळख करून देतो. ते जिवंत होते तेव्हाच यहोवा त्यांचा देव नव्हता, तर त्यांचा मृत्यू होऊन बराच काळ लोटल्यानंतरही तो त्यांचा देव होता, असं यहोवा म्हणत होता. यहोवा असं का म्हणत होता? याचं कारण ३८ व्या वचनात वाचायला मिळतं. येशू म्हणतो: “त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.”
यहोवाचे विश्वासू सेवक त्याच्या नजरेत अजूनही जिवंतच आहेत. यावरून कळतं की तो त्यांना उठवायला किती आतुर आहे! (ईयोब १४:१५; योहान ५:२८, २९) डेव्हीबद्दल आणि मृत्यूच्या झोपेत असलेल्या इतर सेवकांबद्दलही यहोवाला तसंच वाटतं, याची मला खातरी पटली आहे.
मला डेव्हीला भेटायची खूप इच्छा आहे. पण काई जेव्हा डेव्हीला भेटेल तेव्हा ते दृश्य पाहायला मी जास्त आतुर आहे. कारण काईसारखं दुःखात बुडालेलं मी कोणालाच पाहिलं नाही. म्हणूनच लूक ७:१५ मधले शब्द माझ्यासाठी खूप खास आहेत. त्यात म्हटलंय: “तेव्हा [मेलेला मुलगा] उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे सोपवलं.”
सप्टेंबर २००५ ला मी काईसोबत पायनियर सेवा सुरू केली. माझी बायको, आमची मुलं आणि त्यांचे जोडीदार या सगळ्यांसोबत मिळून पायनियर सेवा करणं माझ्यासाठी बहुमानच आहे! आमच्या कुटुंबात एकी आहे. त्यामुळे आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे असतो. तसंच, नवीन जगात आमचं लेकरू डेव्ही आमच्यासोबत असेल, त्या दिवसाचीही आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहतोय.