बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण
योहान ३:१६—“देवाने जगावर एवढी प्रीती केली”
“देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”—योहान ३:१६, नवे जग भाषांतर.
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६, द होली बायबल मराठी—आर.व्ही.
योहान ३:१६ याचा अर्थ
देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपण कायम जगावं असं त्याला वाटतं. यासाठीच त्याने आपल्या मुलाला, म्हणजेच येशूला या पृथ्वीवर पाठवलं. पृथ्वीवर असताना येशूने बऱ्याचशा गोष्टी केल्या. एक म्हणजे, त्याने आपल्या शिष्यांना देवाबद्दल म्हणजेच पित्याबद्दल शिकवलं. (१ पेत्र १:३) दुसरं म्हणजे, त्याने मानवांसाठी आपलं जीवन बलिदान म्हणून दिलं. त्यामुळे सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे.
“त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला”a या वाक्यांशावरून कळतं, की देवाचं आपल्यावर किती प्रेम आहे. येशू हा देवाचा खूप खास मुलगा होता. कारण देवाने त्याला स्वतः बनवलं होतं. (कलस्सैकर १:१७) तो “निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला आहे.” (कलस्सैकर १:१५) सर्व सृष्टी, इतकंच काय तर बाकीचे स्वर्गदूतसुद्धा येशूद्वारेच अस्तित्वात आले. असं असलं, तरी यहोवाb देवाने त्याच्या प्रिय मुलाला इतरांची “सेवा करायला आणि बऱ्याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला” पृथ्वीवर पाठवलं. (मत्तय २०:२८) पहिला मानव आदाम याच्याकडून आपल्याला वारशाने पाप आणि मृत्यू मिळालाय. त्यांतून आपली सुटका करण्यासाठी येशूने दुःख आणि मरण सोसलं.—रोमकर ५:८, १२.
येशूवर विश्वास ठेवण्याचा अर्थ, फक्त त्याला मानणं किंवा त्याने आपल्यासाठी जे केलं ते स्वीकारणं इतकाच होत नाही. तर येशूचं ऐकून आणि त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करून आपण आपला विश्वास दाखवूनही दिला पाहिजे. (मत्तय ७:२४-२७; १ पेत्र २:२१) बायबलमध्ये म्हटलंय, “जो मुलावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. पण जो मुलाच्या आज्ञा मोडतो त्याला जीवन मिळणार नाही.”—योहान ३:३६.
योहान ३:१६ याचा मागचा-पुढचा संदर्भ
येशूने हे शब्द निकदेम नावाच्या एका यहुदी धर्मगुरूसोबत बोलताना म्हटले. (योहान ३:१, २) त्याच्याशी बोलताना येशूने देवाच्या राज्याबद्दलc आणि “नव्याने जन्म” घेण्याबद्दल त्याला माहिती दिली. (योहान ३:३) तसंच आपला मृत्यू कसा होईल याबद्दलही त्याने निकेदमला सांगितलं. त्याने म्हटलं: “मनुष्याच्या मुलाला उंचावर [वधस्तंभावर] लटकवलं जाईल. आणि यामुळे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सर्वकाळाचं जीवन मिळेल.” (योहान ३:१४, १५) मग त्याने यावर भर दिला, की देवाला मानवांबद्दल असलेल्या महान प्रेमामुळेच त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची संधी मिळणार होती. शेवटी येशूने म्हटलं, की जीवन मिळवण्यासाठी आपण विश्वास असल्याचं दाखवलं पाहिजे आणि देवाला आवडणारी कामं केली पाहिजेत.—योहान ३:१७-२१.
a “एकुलता एक” यासाठी ग्रीक भाषेत मोनोयेनेस हा शब्द वापरण्यात आलाय. याचा अर्थ “त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही . . . खूप वेगळा, विशेष, अनोखा” असा होतो.—अ ग्रीक-इंग्लिश लेक्सीकन ऑफ द न्यू टेस्टामेंट अँड अदर अर्ली ख्रिश्चन लिटरेचर, पान ६५८.
b बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा आहे.—स्तोत्र ८३:१८.
c देवाच्या राज्याला “स्वर्गाचं राज्य” असंही म्हटलंय. ते स्वर्गातून राज्य करणारं एक सरकार आहे. (मत्तय १०:७; प्रकटीकरण ११:१५) त्या राज्याचा राजा म्हणून देवाने ख्रिस्ताला नेमलंय. हे राज्य पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्ण करेल. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) जास्त माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला “देवाचं राज्य काय आहे?” हा धडा पाहा.