बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण
१ करिंथकर १०:१३—“देव विश्वासू आहे”
“माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही. पण देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही. तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.”—१ करिंथकर १०:१३, नवे जग भाषांतर.
“मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्यावाचून निराळी परीक्षा तुम्हांवर आली नाही; पण देव विश्वासू आहे, तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.”—१ करिंथकरांस पत्र १०:१३, पंडिता रमाबाई भाषांतर.
१ करिंथकर १०:१३ याचा अर्थ
या वचनातून आपल्याला देवाच्या एका खास गुणाबद्दल कळतं. तो म्हणजे, विश्वासूपणा. या गुणामुळे आपल्याला त्याच्यासोबतचं नातं मजबूत करायला मदत होते. देवाचे विश्वासू सेवक मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकतात. खासकरून ते जेव्हा परीक्षांचा आणि छळाचा सामना करतात तेव्हा.
“माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.” देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करायचा मोह त्याच्या सेवकांना होऊ शकतो. अशा परीक्षा कठीण असल्या तरी त्या अनोख्या नाहीत, कारण बऱ्याच जणांना त्या परीक्षांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे देवाचे सेवक ही खातरी ठेवू शकतात, की त्यांनाही अशा परीक्षांचा सामना करता येईल.
“देव विश्वासू आहे.” यहोवाa देव भरवशालायक आहे आणि आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. तो त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना, त्याला एकनिष्ठ राहणाऱ्यांना आणि त्याची आज्ञा पाळणाऱ्यांना कधीच सोडणार नाही असं अभिवचन त्याने दिलंय. आणि हे अभिवचन त्याने नेहमी पाळलंय. (अनुवाद ७:९; स्तोत्र ९:१०; ३७:२८) म्हणूनच या वचनात त्याने दिलेली दोन अभिवचनंही तो नक्की पूर्ण करेल असा भरवसा त्याचे उपासक ठेवू शकतात.
“तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही.” देव विश्वासू आहे हे तो कसं दाखवतो? तो त्याच्या सेवकांना सहन करता येणार नाही अशा परीक्षा त्यांच्यावर येऊ देत नाही. त्याला त्याच्या प्रत्येक सेवकाच्या मर्यादांची जाणीव आहे.—स्तोत्र ९४:१४.
“परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.” देव त्याच्या उपासकांच्या एकतर परीक्षा काढू शकतो किंवा ती परीक्षा सहन करण्यासाठी त्यांना मदत करू शकतो. जसं की, तो त्यांना पवित्र शक्तीद्वारे मार्गदर्शन देऊ शकतो, बायबलमधून सांत्वन देऊ शकतो किंवा भाऊबहिणींद्वारे व्यावहारिक मदत पुरवू शकतो.—योहान १४:२६; २ करिंथकर १:३, ४; कलस्सैकर ४:११.
१ करिंथकर १०:१३ याचा मागचा-पुढचा संदर्भ
प्रेषित पौलने करिंथ मंडळीला लिहिलेल्या पत्रात आपल्याला या वचनाचा उल्लेख मिळतो. या पत्रात त्याने करिंथ मंडळीला एक इशारा म्हणून प्राचीन काळातल्या इस्राएली लोकांचं उदाहरण दिलं. (१ करिंथकर १०:११) इस्राएली लोकांना ज्या-ज्या परीक्षांचा आणि मोहांचा सामना करावा लागला त्यांबद्दल पौलने करिंथकरांना सांगितलं. जसं की, मूर्तिपूजा आणि लैंगिक अनैतिकता. (१ करिंथकर १०:६-१०) काही इस्राएली लोक त्या मोहांना बळी पडले. त्यांचं उदाहरण देऊन पौलने करिंथकरांना आठवण करून दिली, की ते कधीच मोहाला बळी पडणार नाही असा फाजील आत्मविश्वास त्यांनी बाळगू नये. (१ करिंथकर १०:१२) असं असलं तरी, देवाचे विश्वासू सेवक कोणत्याही परीक्षेचा सामना करू शकतात याची खातरी पौलने त्यांना १ करिंथकर १०:१३ या वचनातून दिली.
१ करिंथकर पुस्तकात काय सांगितलंय हे जाणून घ्यायला खाली दिलेला व्हिडिओ पाहा.
a यहोवा हे देवाचं नाव आहे. (स्तोत्र ८३:१८) “यहोवा कोण आहे?” हा लेख पाहा.