बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण
यिर्मया २९:११—“तुमच्यासाठी माझ्या काय योजना आहेत ते मला माहीत आहेत”
“यहोवाa म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझे काय विचार आहेत, हे मला चांगलं माहीत आहे. ते विचार शांतीचे आहेत; संकटाचे नाहीत. ते तुम्हाला चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत.’”—यिर्मया २९:११, नवे जग भाषांतर.
“प्रभू म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझ्या काय योजना आहेत ते मला माहीत आहेत. त्या योजना समृद्धी देणाऱ्या आहेत, संकटाच्या नाहीत. त्या तुम्हाला आशा आणि चांगलं भविष्य देणाऱ्या आहेत.’”—यिर्मया २९:११, न्यू इंटरनॅशनल व्हर्शन.
यिर्मया २९:११ याचा अर्थ
यहोवा देवाने आपल्या उपासकांना शांतिपूर्ण भविष्य द्यायचं अभिवचन दिलं होतं. हे शब्द जरी प्राचीन काळातल्या त्याच्या सेवकांना उद्देशून लिहिलेले असले, तरी त्यांतून आजसुद्धा देवाचे काय विचार आहेत ते कळतं. तो ‘आशा देणारा देव’ आहे. (रोमकर १५:१३) खरंतर, आपल्याला चांगल्या भविष्याची ‘आशा मिळावी,’ म्हणूनच त्याने अशी अभिवचनं बायबलमध्ये लिहून ठेवली आहेत.—रोमकर १५:४.
यिर्मया २९:११ याचा मागचा-पुढचा संदर्भ
यिर्मया २९:११ मधले हे शब्द इस्राएली लोकांना लिहिलेल्या एका पत्रातले आहेत. या इस्राएली लोकांना यरुशलेममधून बाबेलला बंदी म्हणून नेण्यात आलं होतं.b (यिर्मया २९:१) यहोवाने त्यांना सांगितलं होतं, की ते बराच काळ बंदिवासात राहतील. त्यामुळे त्यांनी तिथे घरं बांधावीत, मळे लावावेत आणि आपली कुटुंबं वाढवावीत. (यिर्मया २९:४-९) पण यासोबतच देवाने त्यांना असंही सांगितलं होतं: “‘तुम्हाला बाबेलमध्ये राहून ७० वर्षं पूर्ण झाल्यावर मी तुमच्याकडे लक्ष देईन. आणि तुम्हाला [यरुशलेममध्ये] परत आणायचं माझं वचन मी पूर्ण करीन.” (यिर्मया २९:१०) अशा प्रकारे देवाने त्यांना याची खातरी दिली, की तो त्यांना विसरणार नाही आणि आपल्या मायदेशात परत यायची त्यांची आशा नक्कीच पूर्ण होईल.—यिर्मया ३१:१६, १७.
देवाने इस्राएली लोकांना दिलेलं अभिवचन पाळलं. आधीच सांगितल्याप्रमाणे, पर्शियाचा राजा कोरेश याने बाबेलवर विजय मिळवला. (यशया ४५:१, २; यिर्मया ५१:३०-३२) त्यानंतर कोरेशने यहुदी लोकांना त्यांच्या मायदेशात जाण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे, ७० वर्षांचा बंदिवास संपल्यावर ते यरुशलेममध्ये परत आले.—२ इतिहास ३६:२०-२३; एज्रा ३:१.
यिर्मया २९:११ मधल्या पूर्ण झालेल्या अभिवचनातून आपल्याला खातरी मिळते, की देवाने आपल्याला दिलेली अभिवचनंही नक्कीच पूर्ण होतील. देवाच्या राज्याद्वारे संपूर्ण पृथ्वीवर शांती आणण्याचं अभिवचन हे यांपैकीच एक आहे.—स्तोत्र ३७:१०, ११, २९; यशया ५५:११; मत्तय ६:१०.
यिर्मया २९:११ याबद्दल गैरसमज
गैरसमज: देवाने प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशिष्ट “योजना” केली आहे.
खरी माहिती: जीवनात कोणता मार्ग निवडायचा हे ठरवायचं स्वातंत्र्य देव लोकांना देतो. यिर्मया २९:११ मधले शब्द त्याने बाबेलमधल्या इस्राएली लोकांना एक समूह म्हणून उद्देशून म्हटले होते. त्यांच्याबद्दल त्याचा विचार चांगलाच होता. त्याला त्यांना शांतिपूर्ण भविष्य द्यायचं होतं. (यिर्मया २९:४) पण या अभिवचनाचा फायदा करून घ्यायचा की नाही, हे देवाने प्रत्येक व्यक्तीला स्वतः ठरवू दिलं. (अनुवाद ३०:१९, २०; यिर्मया २९:३२) ज्यांनी ‘देवाचा शोध घ्यायची’ निवड केली त्यांनी प्रामाणिक मनाने त्याला प्रार्थना केली.—यिर्मया २९:१२, १३.
गैरसमज: देव त्याच्या सेवकांना भरपूर धनसंपत्ती देऊन ‘समृद्ध’ करेल.
खरी माहिती: बायबलच्या काही भाषांतरामध्ये यिर्मया २९:११ मध्ये “समृद्धी” हा शब्द वापरला आहे. यासाठी हिब्रू भाषेत वापरलेल्या शब्दाचा अर्थ “शांती, आरोग्य आणि हित” असा होतो. या वचनाचा मागचा-पुढचा संदर्भ पाहिला तर एक गोष्ट लक्षात येतं. ती म्हणजे, देवाने बंदिवासातल्या इस्राएली लोकांना धनसंपत्ती नाही, तर शांती द्यायचं आणि त्यांचं भलं करायचं अभिवचन दिलं होतं. ते पुढेही एक समूह म्हणून अस्तित्वात राहणार होते आणि एक दिवस नक्कीच यरुशलेमला परत येणार होते.—यिर्मया २९:४-१०.
यिर्मया अध्याय २९ वाचा आणि त्यासोबतच स्पष्टीकरण देणाऱ्या तळटिपा आणि संदर्भ-वचनंही वाचा
a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा आहे.—स्तोत्र ८३:१८.
b यिर्मया २९:११ याबद्दल दि एक्सपोसिटर्स बायबल कमेंट्री म्हणतं: “बायबलमध्ये दिलेल्या सगळ्यात सुंदर अभिवचनांपैकी हे एक आहे. यावरून बंदिवासातल्या आपल्या लोकांबद्दल याहवेहला [यहोवाला] किती काळजी होती हे कळतं. त्याने त्यांना सकारात्मक राहण्यासाठी आणि आशा ठेवण्यासाठी एक कारण दिलं होतं.”—खंड ७, पान ३६०.