बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण
रोमकर १०:१३—‘प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करा’
“जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.”—रोमकर १०:१३, नवे जग भाषांतर.
“जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”—रोमकर १०:१३, द होली बायबल मराठी—आर.व्ही.
रोमकर १०:१३ याचा अर्थ
देव भेदभाव करत नाही. तो सगळ्या लोकांना त्यांचा जीव वाचवायची आणि सर्वकाळाचं जीवन मिळवायची संधी देतो; मग ते कोणत्याही राष्ट्राचे किंवा वंशाचे असोत, गरीब किंवा श्रीमंत असोत. पण त्या संधीचा फायदा करून घेण्यासाठी आपण यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारली पाहिजे. यहोवा हे सर्वशक्तिमान देवाचं नाव आहे.a—स्तोत्र ८३:१८.
बायबलमध्ये ‘यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारणं’ याचा अर्थ, फक्त देवाचं नाव माहीत असणं किंवा उपासनेत ते वापरणं इतकाच होत नाही. (स्तोत्र ११६:१२-१४) तर देवावर भरवसा ठेवणं आणि मदतीसाठी त्याच्यावर विसंबून राहणं असाही त्याचा अर्थ होतो.—स्तोत्र २०:७; ९९:६.
देवाचं नाव येशूसाठी खूप महत्त्वाचं होतं. त्याने शिकवलेल्या प्रार्थनेच्या सुरुवातीलाच म्हटलं: “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्तय ६:९) येशूने असंही सांगितलं की आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळवायचं असेल, तर आपण यहोवाला ओळखलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे.—योहान १७:३, ६, २६.
द होली बायबल मराठी—आर.व्ही. यात रोमकर १०:१३ मध्ये “प्रभू” असं जे म्हटलंय ते खरंतर यहोवाला सूचित करतं असं आपण का म्हणू शकतो? कारण हे वचन योएल २:३२ मधून घेण्यात आलंय आणि तिथे मूळ हिब्रू भाषेत “प्रभू” ही पदवी नाही, तर देवाचं नाव वापरण्यात आलंय.b
रोमकर १०:१३ याचा मागचा-पुढचा संदर्भ
रोमकर १० व्या अध्यायात सांगितलंय, की जर एका व्यक्तीचा येशू ख्रिस्तावर विश्वास असेल तरच त्याचं देवासोबत चांगलं नातं असेल. (रोमकर १०:९) या गोष्टीला जुन्या करारातली बरीच वचनं दुजोरा देतात. लोकांना तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगून एक व्यक्ती तिचा विश्वास “जाहीर” करते. यामुळे इतरांनाही आपला विश्वास वाढवायची आणि सर्वकाळाचं जीवन मिळवायची संधी मिळते.—रोमकर १०:१०, १४, १५, १७.
रोमकर अध्याय १० वाचा आणि त्यासोबतच स्पष्टीकरण देणाऱ्या तळटिपा आणि संदर्भ-वचनंही वाचा.
a प्राचीन काळातल्या बायबलच्या हस्तलिखितांमध्ये देवाचं नाव जवळपास ७,००० वेळा आलंय. हिब्रू भाषेत देवाचं नाव चार अक्षरी आहे (יהוה). त्याला टेट्राग्रमॅटन म्हणतात. इंग्रजी भाषेत सहसा देवाचं नाव “जेहोवा” असं लिहिलं जातं. पण काही विद्वान ते “याव्हे” असं लिहिणं पसंत करतात.
b ‘जुन्या करारात’ ज्या वचनांमध्ये देवाचं नाव आहे त्या वचनांचा नवीन करारात उल्लेख करताना बायबलचे लेखक सहसा देवाचं नाव वापरायचे. दि अँकर बायबल डिक्शनरी असं म्हणतं: “नवा करार पहिल्यांदा लिहिण्यात आला तेव्हा लेखकांनी जुन्या करारातल्या बऱ्याच वचनांचा आपल्या लिखाणांत उल्लेख केला. ज्या वचनांमध्ये देवाचं नाव आहे, त्या वचनांचा नव्या करारात उल्लेख करताना त्यांनी काही किंवा सगळ्या ठिकाणी याव्हे अथवा देवाचं चार अक्षरी नाव ठेवल्याचा पुरावा आहे.” (खंड ६, पान ३९२) जास्त माहितीसाठी नवे जग भाषांतर यातला अतिरिक्त लेख क५ “ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत देवाचं नाव” हे पाहा.