सर्वांस मान द्या
“सर्वांस मान द्या . . . देवाचे भय धरा, राजाला मान द्या.”—१ पेत्र २:१७.
१. (अ) देव व येशू ख्रिस्ताशिवाय कोण सन्मानास योग्य आहेत? (ब) पहिले पेत्र २:१७ नुसार मानवाना किती क्षेत्रात सन्मान दाखवायचा आहे?
आम्ही यहोवा देव व येशू ख्रिस्त यांचा सन्मान करण्याच्या बंधनात आहोत हे आपण पाहिले आहे. हे योग्य, सूज्ञ व प्रेमळ कर्तव्य आहे. तथापि, आम्ही सहमानवांचा देखील आदर केला पाहिजे हे देखील देवाचे वचन स्पष्ट दाखविते. “सर्वांस मान द्या,” असे आपल्याला सांगण्यात आले आहे. (१ पेत्र २:१७) या वचनाची समाप्ती “राजाला मान द्या,” या आज्ञेने झालेली आहे, त्यामुळे याचा हा मतितार्थ निघतो की, जे अधिकारपदी आहेत, जे सन्मान मिळण्याच्या लायकीचे आहेत अशांना सन्मान दिला गेला पाहिजे. यास्तव, प्रश्न हा आहे की, आपण कोणाचा सन्मान करावा? यात काहींना वाटते त्यापेक्षा अधिक जणांचा समावेश होऊ शकेल. आम्हास असे म्हणता येईल की इतर लोकांना सन्मान द्यावा अशी चार विविध क्षेत्रे आहेत.
राजकीय अधिकाऱ्यांना सन्मान
२. पहिले पेत्र २:१७ मध्ये उल्लेखिण्यात आलेला “राजा” मानवी राजे व राजकीय अधिकारी आहेत हे आम्ही कसे जाणतो?
२ यापैकीचे पहिले क्षेत्र हे प्रापंचिक सरकारसोबत संबंधित आहे. आम्ही राजकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करावयास हवा. “राजाला मान द्या,” असे जेव्हा पेत्राने म्हटले तेव्हा त्याच्या मनात राजकीय अधिकारी होते असे आम्ही का म्हणतो? कारण येथे तो ख्रिस्ती मंडळीबाहेरील परिस्थितीची चर्चा करीत होता. त्याने नुकतेच म्हटले होतेः “मनुष्यांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला . . . अधीन असा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या, आणि अधिकारी . . . त्याने पाठविलेले म्हणून त्यांच्या अधीन असा.” येथे लक्ष द्या की, पेत्र देवाला “राजा”च्या विरोधात ठेवतो व म्हणतो की, “देवाचे भय धरा, राजाला मान द्या.” (१ पेत्र २:१३, १४) या कारणास्तव, ज्याला आम्ही सन्मान द्यावा असे पेत्र म्हणतो तो “राजा” हा मानवी राजे व राजकीय अधिकारी आहेत.
३. “वरिष्ठ अधिकारी” कोण आहेत, व ते कशास पात्र आहेत?
३ याचप्रमाणे प्रेषित पौलानेही आज्ञा केलीः “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांस मान्य [अधीन] असावे.” हे वरिष्ठ अधिकारी यहोवा देव व येशू ख्रिस्त नाहीत, तर ते राजकीय अधिकारी, सरकारी अधिकारी आहेत. हेच मनात ठेवून पौल पुढे म्हणतो की, “ज्याचे देणे त्या सर्वांना भरुन द्या . . . ज्याला सन्मान त्याला सन्मान” द्या. होय, ज्यांना देवाने राजकीय अधिपत्य चालविण्याची मुभा दिली आहे ते सन्मानास पात्र आहेत.—रोमकर १३:१, ७.
४. (अ) राजकीय अधिकाऱ्यांना सन्मान कसा व्यक्त केला जाऊ शकतो? (ब) अधिकाऱ्यांना सन्मान दाखविण्यात प्रेषित पौलाने कसे उदाहरण घालून दिले?
४ आम्ही राजकीय अधिकाऱ्यांस कोणत्या प्रकारे सन्मान दाखवितो? एक म्हणजे त्यांना आदराने वागवणे. (पडताळा १ पेत्र ३:१५.) ते जरी दुष्ट माणसे असतील तरी त्यांच्या पदामुळे ते अशा आदरास पात्र आहेत. टॅसिटस या रोमी इतिहासकाराने फेलिक्स सुभेदाराचे वर्णन “अपाय होण्याची कसलीही भीती नसणारा व मनाला वाटेल ते वाईट कर्म करणारा” असे केले. तरीपण पौलाने आपल्या समर्थनाचे प्रास्ताविक फेलिक्सला आदराने संबोधून सुरु केले. तसेच, दुसरा हेरोद अग्रिप्पा राजा नीच गुन्हे करीत जीवन व्यतित करीत होता तरी पौल त्याला म्हणालाः “आपणापुढे . . . मला आज प्रत्युत्तर द्यावयाचे आहे यावरुन मी आपणाला भाग्यवान समजतो.” याचप्रमाणे सुभेदार फेस्त हा मूर्तिपूजक होता तरी त्याला “महाराज” असे संबोधून पौलाने त्याला सन्मान दिला.—प्रे. कृत्ये २४:१०; २६:२, ३, २४, २५.
५. सरकारी अधिकाऱ्यांना आणखी कोणत्या प्रकाराने सन्मान दाखविला जाऊ शकतो, आणि यहोवाचे साक्षीदार याबाबतीत कसे चांगले उदाहरण ठेवतात?
५ प्रेषित पौलाने सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे देणे देण्याबद्दल लिहिले तेव्हा त्याद्वारे त्यांचा सन्मान करण्याची सूचना केल्याचे दिसते. त्याने म्हटले की, “ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात” द्या. (रोमकर १३:७) यहोवाचे साक्षीदार जगातील कोणत्याही देशात राहात असले तरी ते याप्रकारचे देणे देतात. इटलीतील ला स्टँपा या वृत्तपत्राने हे निरिक्षण दिलेः “ते कोणालाही हवेहवेसे वाटणारे अत्यंत निष्ठावंत नागरिक आहेत: ते कर डावलत नाहीत किंवा स्वतःच्या फायद्यासाठी गैरसोयीचे कायदे चुकवीत नाहीत.” तसेच अमेरिकेतील फ्लॉरिडाच्या पाम बीचमध्ये निघणारे द पोस्ट या वृत्तपत्राने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल ही नोंद घेतलीः “ते कर देतात. ते या प्रजासत्ताकातील अत्यंत प्रामाणिक नागरिक आहेत.”
मालकांना सन्मान देणे
६. सन्मान आणखी कोणास द्यावा असे प्रेषित पौल व पेत्र म्हणतात?
६ सन्मान दाखवण्यास हवा असे दुसरे क्षेत्र नोकरी हे आहे. कामाच्या अनुषंगाने जे अधिकारी आहेत अशांना ख्रिश्चनांनी सन्मान दाखविण्याबद्दल प्रेषित पौल व पेत्र या दोघांनीही जोरदारपणे सांगितले आहे. पौलाने लिहिलेः “जे दास म्हणून जुवाखाली आहेत, त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे. यासाठी की देवाच्या नामाची व शिक्षणाची निंदा होऊ नये. आणि ज्यांस विश्वास ठेवणारे धनी आहेत त्यांनी हे बंधु आहेत म्हणून त्यांचा अवमान करु नये तर त्यांना दास या अर्थाने अधिक तत्परतेने सेवा करण्याचा वाव द्यावा.” आणि पेत्राने म्हटलेः “घरच्या चाकरांनो, तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असा. जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे तर जे कठोर त्यांच्याही . . . अधीन असा.”—१ तीमथ्य ६:१, २; १ पेत्र २:१८; इफिसकर ६:५; कलस्सैकर ३:२२, २३.
७. (अ) “दासांनी” आपल्या “धन्याच्या” अधीन राहावे या पवित्र शास्त्र सूचनेचा आज कसा योग्य अवलंब होऊ शकतो? (ब) ज्यांना ख्रिस्ती मालक आहेत अशा कर्मचाऱ्यांनी काय करण्याची दक्षता घ्यावी?
७ अर्थात, जगात आज गुलामगिरी प्रचलित नाही. पण ख्रिश्चनांच्या बाबतीत दास-धनी नातेसंबंधाचे जे तत्त्व सांगण्यात आले ते आजच्या मालक-कर्मचारी नात्यास लागू करता येऊ शकते. याप्रकारे, मालक जरी संतुष्ट होण्यास कठीण असले तरी ख्रिस्ती कामगार त्यांना सन्मान दाखविण्याच्या जबाबदारीखाली आहेत. पण जर, मालकच स्वतः कोणी समविश्वासू असला तर काय? तेव्हा या नातेसंबंधामुळे खास विचार किंवा सवलतींची अपेक्षा धरण्यापेक्षा कर्मचाऱ्याने आपल्या ख्रिस्ती मालकाची अधिक तत्परतेने सेवा केली पाहिजे, आणि कोणत्याही बाबतीत त्याचा गैरफायदा घेऊ नये.
कौटुंबिक वर्तुळातील सन्मान
८, ९. (अ) मुलांनी कोणाला सन्मान दाखविला पाहिजे? (ब) मुलांनी हा सन्मान का दाखवावा, व तो ते कसा दाखवू शकतील?
८ कौटुंबिक वर्तुळ हे ते तिसरे क्षेत्र आहे जेथे सन्मास दाखविला जाण्यास हवा. उदाहरणार्थ, मुले पालकांना सन्मान दाखवण्याच्या बंधनात आहेत. ही केवळ मोशेद्वारे देण्यात आलेल्या नियमशास्त्रातील गरज नव्हती तर ख्रिश्चनांवरील बंधनही आहे. प्रेषित पौलाने लिहिलेः “मुलांनो, आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आई यांचा मान राख.’”—इफिसकर ६:१, २; निर्गम २०:१२.
९ मुलांनी आपल्या पालकांचा का सन्मान करावा? कारण पालकांना देव-प्रणीत अधिकार आहे आणि पालकांनी मुलांना जन्माला घातले व ते त्यांची बालपणापासून काळजी घेतात व संगोपन करतात या कारणामुळे त्यांचा सन्मान होण्यास हवा. मग, मुले आपल्या पालकांना कसा सन्मान दाखवू शकतात? त्यांची आज्ञा मानून व त्यांना अधीन राहून त्यांनी हे केले पाहिजे. (नीतीसूत्रे २३:२२, २५, २६; कलस्सैकर ३:२०) हा सन्मान दाखविण्यामध्ये मोठ्या झालेल्या मुलांनीही आपल्या वयस्कर पालकांना किंवा आजोबा-आजींना आर्थिक तसेच आध्यात्मिक साहाय्य देण्याचे समाविष्ट आहे. या गोष्टीचा, स्वतःच्या मुलांची काळजी करणे आणि ख्रिस्ती सहवास व सेवा कार्य यात पूर्ण सहभाग घेण्याच्या जबाबदारीसोबत समतोल राखला जाण्यास हवा.—इफिसकर ५:१५-१७; १ तीमथ्य ५:८; १ योहान ३:१७.
१०. स्त्रियांवर कोणाचा सन्मान करण्याची जबाबदारी आहे, आणि हे त्या कोणकोणत्या प्रकारे करू शकतात?
१० तथापि, सन्मान देण्याच्या बाबतीत कौटुंबिक वर्तुळात केवळ मुलेच जबाबदार नाहीत. स्त्रियांनी आपल्या पतींचा सन्मान केला पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले की, “बायकोने आपल्या नवऱ्याची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३; १ पेत्र ३:१, २) पतीची “भीड” राखण्यात सन्मान निश्चितपणे गोवलेला आहे. साराने आपला पती अब्राहाम याचा सन्मान केला; ती त्याला “धनी” असे संबोधीत असे. (१ पेत्र ३:६) यास्तव, बायकांनी सारेचे अनुकरण केले पाहिजे. पतीच्या निर्णयांचा स्वीकार करुन ते निर्णय यशस्वी होतील याकरता परिश्रम घेऊन त्यांना सन्मान दाखवा. आपल्या पतीवर अधिक ओझे लादण्यापेक्षा त्यांच्यावरील असणारा भार वाहण्यासाठी मदत देण्यामध्ये होता होईल ते केल्यामुळे तुम्हाला हा सन्मान प्रदर्शित करता येईल.
११. सन्मान दाखविण्याच्या बाबतीत पतींवर कोणते बंधन आहे व का?
११ आता पतींबद्दल काय? त्यांना देववचनात अशी सूचना देण्यात आली आहेः “नवऱ्यांनो, तसेच तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; जीवनरुपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधु असे तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) या गोष्टीने प्रत्येक पतीला विचार करायला लावले पाहिजे. आपल्या बायकोवर जणू “मोलवान, नाजूक, काळजीपूर्वक हाताळा! सन्मान द्या!” अशी खूणचिठ्ठी डकवलेली आहे असे त्यांनी समजले पाहिजे. यास्तव पतींनी हे लक्षात ठेवावे की, त्यांनी आपल्या बायकोला विचारपूर्वकतेने वागवून सन्मान दाखविला नाही तर त्यांचे यहोवा देवासोबत असणारे नाते दुबळे होईल; कारण त्यांच्या प्रार्थनांना व्यत्यय येईल. यास्तव, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना सन्मान दाखवणे हे खरेच लाभाचे आहे.
मंडळीत
१२. (अ) मंडळीत सन्मान करण्याची जबाबदारी कोणावर आहे? (ब) मान मिळविणे योग्य आहे हे येशूने कसे दाखवून दिले?
१२ ख्रिस्ती मंडळीत असता सन्मान दाखविण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. आपल्याला ही सूचना आहेः “मान देण्यात एकमेकांमध्ये पुढाकार घेणारे” असा. (रोमकर १२:१०, न्यू.व.) सन्मान स्वीकारणे योग्यपणाचे आहे हे येशूने एका दाखल्यात स्पष्ट केले. तो म्हणाला की, जेव्हा आपल्याला कोठे जेवणावळीचे आमंत्रण येते तेव्हा आपण खालची जागा घ्यावी, तेव्हा यजमान आपल्याला कदाचित वर येऊन बसावयास सांगतील व मग सर्व आमंत्रितांसमोर आपला सन्मान होईल. (लूक १४:१०) आपल्या सर्वांनाच मान हवासा वाटत असतो त्यामुळे आपणही एकेमकांना मान देण्याची समभावना बाळगू नये का? हे आम्हाला कसे करता येईल?
१३. मंडळीतील इतरांना आपण सन्मान दाखवू शकू असे कोणते मार्ग आहेत?
१३ एखादे काम चांगले केल्याबद्दलची रसिकता व्यक्त करणे हे जवळजवळ सन्मान दाखवण्यासारखेच आहे. याकरताच, एखाद्याने भाषण दिले किंवा मंडळीत आपले विवेचन सादर केले त्याबद्दल आम्ही त्याची प्रशंसा करुन हा सन्मान दाखवू शकतो. याचप्रमाणे आपण मनाची लीनता धारण करून आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनींना आदराने वागवण्याद्वारे देखील एकमेकांचा सन्मान करु शकतो. (१ पेत्र ५:५) याद्वारे आमचे बांधव हे यहोवा देवाचे सन्मानास पात्र असणारे सेवक आहेत म्हणून त्यांचे आम्हास मोठे मोल वाटते हे दाखवू शकतो.
१४. (अ) मंडळीतील बांधव भगिनींना कसा योग्य सन्मान दाखवू शकतात? (ब) देणग्या देणे हा देखील सन्मान दाखवण्याचा एक मार्ग आहे हे कशामुळे दिसते?
१४ प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला ही सूचना केली की, त्याने ख्रिस्ती वयस्कर भगिनींना माता आणि तरुण भगिनींना बहिणी मानून “पूर्ण शुद्धतेने” व्यवहार करावा. होय, जेव्हा बांधव ख्रिस्ती भगिनींसोबत फाजील सलगी करण्याचे टाळतात तेव्हा ते त्यांचा सन्मान करत असतात. पौलाने पुढे लिहिलेः “ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर.” गरजवंत विधवांना आर्थिक साहाय्य देऊन हा सन्मान दाखवला जाऊ शकतो. पण या साहाय्यास पात्र ठरण्यासाठी ती “चांगल्या कर्माविषयी नावाजलेली” असली पाहिजे. (१ तीमथ्य ५:२-१०) भौतिक देणग्यांच्या बाबतीत लूकने मिलिता बेटावरील लोकांचा हा अनुभव लिहिलाः “त्यांनी आमचा बहुतप्रकारे सन्मान केला; आणि आम्ही हाकारुन निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ जहाजावर भरले.” (प्रे. कृत्ये २८:१०) अशाप्रकारे भौतिक देणग्या देण्याद्वारे सन्मान दाखवला जाऊ शकतो.
१५. (अ) कोणाला सन्मान दाखवण्याच्या बाबतीत आम्हावर खास बंधन आहे? (ब) जे पुढाकार घेतात अशांना सन्मान दाखविण्याचा एक मार्ग कोणता?
१५ तीमथ्याला लिहिलेल्या पत्रात आणखी माहिती लिहिताना पौल लिहितोः “जे वडील अध्यक्षतेचे काम चांगले चालवितात, विशेषेकरुन जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य मोजिले जावे.” (१ तीमथ्य ५:१७) तर मग, आपण वडील किंवा देखरेख्यांचा कशाप्रकाराने सन्मान करु शकतो? पौल म्हणालाः “जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे, तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा.” (१ करिंथकर ११:१) जेव्हा आम्ही पौलाचे अनुकरण करण्याच्या त्याच्या शब्दांचे पालन करतो तेव्हा आम्ही त्याचा सन्मान करतो. हेच आज आम्हामध्ये जे पुढाकार घेत आहेत त्यांच्याबद्दल देखील लागू होणारे आहे. त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा आम्ही ज्या मर्यादेपर्यंत प्रयत्न करतो तितका आम्ही त्यांना सन्मान देत असतो.
१६. पुढाकार घेणाऱ्यांच्या बाबतीत सन्मान दाखविण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत?
१६ देखरेख्यांचा सन्मान करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ही सूचना ऐकणेः “तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या [“आपणामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या,” न्यू.व.] आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जिवांकरिता जागृत राहतात.” (इब्रीयांस १३:१७) मुले जशी पालकांच्या आज्ञा मानून त्यांचा सन्मान करतात तसेच आम्हामध्ये जे पुढाकार घेतात अशांना आज्ञाधारक व अधीन राहून आम्हाला त्यांचा सन्मान करता येईल. तसेच पौल व त्याच्या सहकाऱ्यांना मिलिताच्या दयावंत रहिवाशांनी भौतिक देणग्या देऊन सन्मान केला तसेच संस्थेच्या पुष्कळ फिरत्या प्रतिनिधींचा अशाच पद्धतीने वेळोवेळी सत्कार करण्यात आला. तथापि, त्यांनी अशा देणग्यांची कधी मागणी करु नये, किंवा त्याबद्दलची कदर केली जाईल असा संकेत देऊ नये किंवा त्या गरजेच्या आहेत असे कळवू नये.
१७. सन्मान दाखवण्याच्या बाबतीत देखरेखीची जबाबदारी असणाऱ्यांवर कोणते बंधन आहे?
१७ उलटपक्षी, ईश्वरशासित संस्थेमध्ये जे देखरेखीच्या पदावर आहेत, मग ते स्थानिक मंडळीत असो, फिरते प्रतिनिधि या नात्याने विभागात किंवा प्रांतात असो, किंवा वॉचटावर संस्थेच्या कोणा शाखा दप्तरात असो, किंवा कौटुंबिक वर्तुळात असो, या सर्वांवर, ते ज्यावर देखरेख ठेवून आहेत अशांना सन्मान दाखवण्याचे बंधन आहे. यासाठी समभावना व समविश्वासूंच्या गरजा जाणून घेण्याची गरज आहे. ते सर्वदा जवळ जाण्याजोगे आणि येशूने म्हटले त्याप्रमाणे सौम्य व मनाचा व अंतःकरणाचे लीन असावयास हवे.—मत्तय ११:२९, ३०.
एकमेकांचा सन्मान करण्यासाठी परिश्रम घेणे
१८. (अ) जे सन्मानास पात्र आहेत अशांना तो दाखविण्यामध्ये आम्हाला कशामुळे अडथळा होऊ शकतो? (ब) मनाची नकारात्मक व विपरीत भावना राखण्याचे समर्थन का करता येणार नाही?
१८ आम्ही सर्वांनीच एकमेकांचा सन्मान करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, कारण असे करण्यामध्ये एक प्रबळ अडखळण उभे असते. हे अडखळण किंवा आडकाठी ही आमचे अपरिपूर्ण अंतःकरण आहे. “मानवाच्या मनातल्या [“अंतःकरणातल्या,” न्यू.व.] भावना बाळपणापासून दुष्ट असतात,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (उत्पत्ती ८:२१) एखाद्याबद्दल नकारात्मक, विपरीत भावना मनात उभारणे ही एक अशी मानवी प्रवृत्ती आहे जी इतरांना योग्य सन्मान देण्यात अडथळा निर्माण करते. आम्ही सर्वच कमकुवत, अपरिपूर्ण मानव असून आम्हाला यहोवाची दया व कनवाळूपणाची गरज आहे. (रोमकर ३:२३, २४) याबद्दलची कदर राखून आपण आमच्या बांधवांच्या अशक्तपणावर विचार करीत राहू नये किंवा त्यांच्यावर प्रश्नार्थक हेतू लादू नयेत.
१९. कोणत्याही नकारात्मक प्रवृत्तीला तोंड देण्यामध्ये आम्हाला कशामुळे मदत मिळू शकेल?
१९ अशा नकारात्मक भावनावरील उपाय प्रेम व आत्मसंयमन हा आहे. आमच्या बांधवांच्या बाबतीत आपल्याला सहानुभूतीयुक्त, निष्ठावंत व सरळ दृष्टीकोण राखला पाहिजे व त्यांच्या चांगल्या गुणांची नोंद घेतली पाहिजे. आम्हाला आकलन होत नाही असे काही असले तर आपण आमच्या बांधवांना संशयाचा फायदा देऊ आणि पेत्राची ही सूचना मान्य करुः “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) आपल्या बांधवांना योग्य असणारा सन्मान द्यायचा आहे तर अशा स्वरुपातील प्रीती आम्हाठायी असली पाहिजे.
२०, २१. (अ) एकमेकांना सन्मान दाखविण्यामध्ये आणखी कोणती प्रवृत्ती अडथळा निर्माण करू शकते? (ब) या प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी कशामुळे आपल्याला मदत मिळू शकेल?
२० इतरांना योग्य तो सन्मान दाखवण्यापासून आणखी एक प्रवृत्ती अडथळा आणू शकते व ती म्हणजे चिडखोर होणे किंवा एकदम संवेदनाक्षम होणे. संवेदनाला त्याची योग्य जागा आहे. कलाकारांना आपल्या व्यवसायामध्ये आवाज किंवा रंग याबाबतीत संवेदनाक्षम असले पाहिजे. पण अवास्तव संवेदनाक्षम होणे किंवा चिडखोर बनणे हे इतरांसोबतच्या आमच्या नातेसंबंधामध्ये स्वार्थी होण्याजोगे आहे व ते आपसातील शांती नष्ट करू शकते व दुसऱ्यास सन्मान दाखवण्यापासून परावृत्त करू शकते.
२१ यासंबंधाने आपल्याला उत्तम सल्ला उपदशेक ७:९ मधील शब्दात सापडतोः “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.” या कारणास्तव एकदम संतापणे वा उद्विग्न होणे हे ज्ञान व चांगला विचार तसेच प्रेम यांची उणीव असल्याचे दाखवते. आम्ही जागृत राहिले पाहिजे, कारण न राहिल्यास, नकारात्मक वृत्ती, अधिक टिकात्मक प्रवृत्ती, किंवा अवास्तव संताप या आमच्या पतित भावना उचंबळल्या जावून इतरांना जो योग्य सन्मान दाखवायचा आहे तो दाखवण्यापासून आम्हाला मागे ठेवले जाईल.
२२. सन्मान दाखविण्याच्या आमच्या कर्तव्याचे कसे समालोचन करता येईल?
२२ खरेच इतरांना सन्मान प्रदर्शित करण्याची पुष्कळ कारणे आपणापाशी आहेत. आणि आपण पाहिले आहे त्याप्रमाणे हा सन्मान दाखविण्याचे आणखी पुष्कळ मार्ग उपलब्ध होऊ शकतील. आम्ही या बाबतीत सर्वदा जागृत असले पाहिजे, कारण कोणताही स्वार्थी गुण किंवा नकारात्मक प्रवृत्ती हा सन्मान दाखविण्यामध्ये अडथळा आणू शकते. खासपणे आम्ही आपल्या कौटुंबिक वर्तुळात हा सन्मान दाखविण्याची काळजी घ्यावी. पती व पत्नीने एकमेकांना आणि मुलांनी आपल्या पालकांना सन्मान दाखवावा. मंडळीत आपण आपल्या सह उपासकांना व खासपणे जे परिश्रम घेतात व देखरेखीच्या स्थानावर आहेत अशांना सन्मान दाखवावा. या सर्व क्षेत्रात वर नमूद केल्याप्रमाणे सन्मान दाखविणे हे आपल्याच हिताचे आहे कारण येशूने म्हटले त्याप्रमाणे, “घेण्यापेक्षा देणे ह्यात अधिक धन्यता आहे.”—प्रे. कृत्ये २०:३५.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ आपण सरकारी अधिकाऱ्यांना का व कसा सन्मान दाखवला पाहिजे?
▫ मालक-कर्मचारी नातेसंबंधात कोणता पवित्र शास्त्रीय सल्ला लागू करता येण्याजोगा आहे?
▫ कौटुंबिक वर्तुळात सन्मान कसा दाखवला जाण्यास हवा?
▫ मंडळीत कोणता खास सन्मान दाखवला जाऊ शकतो व का?
▫ सन्मान दाखवण्यात मागे टाकणाऱ्या मानवी अशक्तपणावर कशी मात करता येईल?