इच्छास्वातंत्र्याबद्दल बायबल काय म्हणतं? देव आपलं नशीब ठरवतो का?
बायबलचं उत्तर
देवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिलंय, म्हणजेच आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. त्यामुळे आपलं भविष्य देव किंवा आपलं नशीब ठरवत नाही. याबद्दल बायबल काय म्हणतं ते पाहा.
देवाने माणसांना त्याच्या प्रतिरूपात बनवलंय. (उत्पत्ती १:२६) त्याने आपल्याला प्राण्यांसारखं बनवलेलं नाही. ते उपजत बुद्धीप्रमाणे वागतात. पण आपण आपल्या निर्माणकर्त्यासारखं प्रेम आणि न्याय असे गुण दाखवू शकतो. तसंच, त्याच्याप्रमाणेच आपल्यालाही इच्छास्वातंत्र्य आहे.
आपण आपल्या भविष्याबद्दल बरंच काही ठरवू शकतो. बायबल आपल्याला देवाचं ऐकून म्हणजे त्याच्या आज्ञा पाळून जीवन निवडायचं प्रोत्साहन देतं. (अनुवाद ३०:१९, २०) पण आपल्याला जर इच्छास्वातंत्र्य नसतं तर या सल्ल्याला काहीच अर्थ राहिला नसता. हे असं असतं जणू देवाने आपल्यावर अन्याय केलाय. आपण काय करावं याची जबरदस्ती करण्याऐवजी देव आपल्याला प्रेमाने अशी विनंती करतो: “तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल! मग तुझी शांती नदीसारखी” होईल.—यशया ४८:१८.
यश-अपयश नशीब ठरवत नाही. आपल्याला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण मेहनत केली पाहिजे. बायबल म्हणतं: “तुझ्या हातांना जे काही काम मिळेल, ते मन लावून कर.” (उपदेशक ९:१०) ते असंही म्हणतं: “मेहनत करणाऱ्यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात.”—नीतिवचनं २१:५.
खरंच, इच्छास्वातंत्र्य ही देवाकडून आपल्याला मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे! त्यामुळे आपण त्याच्यावर “पूर्ण मनाने” प्रेम करू शकतो आणि आपल्यालाही तसंच करायची इच्छा आहे.—मत्तय २२:३७.
देव सगळ्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवतो का?
बायबल सांगतं की देव सर्वशक्तिमान आहे. त्याची शक्ती अफाट आहे आणि त्याच्याशिवाय त्यावर कोणाचंच नियंत्रण नाही. (ईयोब ३७:२३; यशया ४०:२६) असं असलं तरी या शक्तीचा उपयोग तो सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी करत नाही. उदाहरणार्थ, बायबल सांगतं, की जुन्या काळातल्या बाबेलच्या लोकांच्या बाबतीत देवाने “स्वतःला आवरलं.” ते देवाच्या लोकांचे शत्रू होते, तरीही त्याने तसं केलं. (यशया ४२:१४) आजही जे लोक त्यांच्या इच्छास्वातंत्र्याचा वापर करून दुसऱ्यांचं नुकसान करतात, त्यांचं तसं वागणं सहन करायची तो निवड करतो. पण तो हे कायम करत राहणार नाही.—स्तोत्र ३७:१०, ११.