वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जुलै पृ. ८-१३
  • यशयाच्या पुस्तकातून सांत्वन मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यशयाच्या पुस्तकातून सांत्वन मिळवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपली परिस्थिती अचानक बदलते तेव्हा
  • दोषीपणाची भावना सतावते तेव्हा
  • जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा
  • यहोवा “दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • आपण कधीच एकटे नाही!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जुलै पृ. ८-१३

१४-२० सप्टेंबर, २०२६

गीत ४१ यहोवा माझी प्रार्थना ऐक

यशयाच्या पुस्तकातून सांत्वन मिळवा

“यहोवा असं म्हणतो: . . . ‘आई जसं आपल्या मुलाचं सांत्वन करते, तसं मी तुमचं सांत्वन करत राहीन.’”—यश. ६६:१२, १३.

या लेखात:

आपण निराश किंवा दुःखी असतो तेव्हा यशयाच्या पुस्तकातल्या वचनांवर मनन केल्यामुळे आपल्याला सांत्वन कसं मिळू शकतं ते पाहा.

१-२. आपण निराश असतो तेव्हा यहोवा काय करतो?

कल्पना करा, एक लहान मूल जोरजोरात हुंदके देऊन रडतंय. त्याच्या आईवडिलांसोबत तो एका दुसऱ्‍या ठिकाणी राहायला चाललाय आणि त्याला त्याच्या मित्रांना सोडून जावं लागतंय. किंवा कदाचित त्याच्याकडून काही चूक झाल्यामुळे त्याला खूप वाईट वाटतंय. अशा वेळी त्याची आई काय करेल? ती त्याला जवळ घेईल, त्याचं म्हणणं ऐकून घेईल आणि तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे याची त्याला जाणीव करून देईल.

२ बायबलमध्ये यहोवा स्वतःची तुलना मुलावर जिवापाड प्रेम करणाऱ्‍या आईशी करतो. तो म्हणतो: “आई जसं आपल्या मुलाचं सांत्वन करते, तसं मी तुमचं सांत्वन करत राहीन.” (यश. ६६:१३) खरंतर, आईवडील आपल्या मुलावर प्रेम करतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने यहोवा आपल्यावर प्रेम करतो. (यश. ४९:१५) आपण निराश असतो किंवा दुःखी असतो तेव्हा यहोवा बायबलमधून आपल्याला सांत्वन आणि बळही देतो.—रोम. १५:४.

३. आपण या लेखात काय पाहणार आहोत?

३ यहोवाने यशयाच्या पुस्तकात सांत्वन देणारी बरीच वचनं नमूद केली आहेत. (यश. ४०:१) जुन्या काळातले यहुदी लोक कठीण परिस्थितीतून जात होते, तेव्हा त्यांना सांत्वन मिळावं म्हणून यहोवाने यशयाला ही वचनं लिहून ठेवायची प्रेरणा दिली. आज आपणही ‘खूप कठीण काळात’ जगतोय, आणि आपल्यालाही सांत्वनाची गरज आहे. (२ तीम. ३:१) म्हणून या पुस्तकातल्या काही वचनांवर आता आपण लक्ष देऊ या. त्यामुळे आपल्याला पुढे दिलेल्या तीन परिस्थितींमध्ये सांत्वन आणि बळ मिळेल: (१) जेव्हा आपली परिस्थिती अचानक बदलते, (२) आधी केलेल्या चुकांमुळे दोषीपणाची भावना सतावते किंवा (३) आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो.

आपली परिस्थिती अचानक बदलते तेव्हा

४. परिस्थिती अचानक बदलल्यामुळे काय होऊ शकतं?

४ आपल्या आयुष्यात अचानक काहीही घडू शकतं. (उप. ९:११; १ करिंथ. ७:३१) आपल्याला आजारपण येऊ शकतं, पैशांची चणचण भासू शकते, राजकीय घडामोडींचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो किंवा यहोवाच्या सेवेतली आपली नेमणूक बदलू शकते. अशा परिस्थितींत पुढे काय होईल याची आपल्याला काळजी वाटू शकते. आपल्या एका भावाचं उदाहरण घ्या. त्याचं नाव जोसेफ आहे. जवळपास १७ वर्षं बेथेलमध्ये सेवा केल्यानंतर त्याची नेमणूक बदलली. तो म्हणतो: “मला सुरुवातीला काहीच सुचत नव्हतं. बेथेलमध्ये इतकी वर्षं सेवा केल्यानंतर बाहेर जाऊन नव्याने सगळं सुरू करायला मला खूप कठीण गेलं. कुठून सुरुवात करायची हेच मला कळत नव्हतं.” जोसेफसारखीच आपली परिस्थिती अचानक बदलते, तेव्हा यहोवा यशयाच्या पुस्तकातून आपल्याला कसं सांत्वन देतो?

५. यशया ४२:१६ या वचनामधून यहोवा आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी देतो? (चित्रसुद्धा पाहा.)

५ यशया ४२:१६ वाचा. आपली परिस्थिती अचानक बदलते, तेव्हा आपल्याला एका अर्थाने अंध झाल्यासारखं वाटू शकतं. आपण ‘अनोळखी, अंधाऱ्‍या रस्त्यांवरून, ओबडधोबड जमिनीवरून चाललोय’ असं आपल्याला वाटू शकतं. आपल्याला एखाद्या घनदाट जंगलात हरवल्यासारखंही वाटू शकतं. पण यहोवा खातरी देतो, की अशा परिस्थितीतही तो आपल्याला सोडणार नाही आणि आपलं मार्गदर्शन करत राहील. अशा बिकट परिस्थितीत तो आपला मार्ग प्रकाशमय करेल, आपला हात धरून आपल्याला अंधारातून बाहेर काढेल आणि आपला रस्ता सपाट करेल. यहोवा हे कसं करेल? तो त्याच्या वचनांतून आणि संघटनेकडून आपल्याला योग्य सल्ले देईल. (स्तो. ११९:१०५; यश. ३०:२१) शिवाय, तो भाऊबहिणींचा आणि इतरांचा वापर करून आपल्याला व्यावहारिक मार्गांनी मदत पुरवेल. म्हणून पुढे काय होईल याची आपल्याला काळजी वाटते, तेव्हा यहोवा आपल्याला मदत करेल यावर भरवसा ठेवा. कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्या मनातली घालमेल खूप चांगल्या प्रकारे समजतो.—यश. ४१:१०; १ पेत्र ५:६, ७.

कोलाज: एका जोडप्याला यशया ४२:१६ मधल्या देवाच्या अभिवचनामुळे मदत होते. त्यात असं म्हटलंय: अनोळखी रस्त्यांवरून . . . , मी [तुला] कधीही सोडून देणार नाही.’ १. एक जोडपं दुसरीकडे राहायला जाण्यासाठी सामानसुमान बांधत आहे. २. त्यांच्या नवीन मंडळीतलं एक कुटुंब त्यांचं प्रेमाने स्वागत करत आहे.

तुमची परिस्थिती अचानक बदलली, तरी यहोवा तुम्हाला सोडून देणार नाही (परिच्छेद ५ पाहा) b


६. आपली परिस्थिती अचानक बदलली तरी आपण कोणत्या गोष्टीची खातरी ठेवू शकतो?

६ आधी उल्लेख केलेल्या जोसेफने आणि त्याच्या बायकोने बेथेल सोडल्यानंतर यहोवाने त्यांची कशी काळजी घेतली हे अनुभवलं. तो म्हणतो: “त्या काळात यहोवाने आम्हाला कसा आधार दिला हे आम्ही पाहिलं. त्याने भाऊबहिणींचा वापर करून आम्हाला मदत केली. आम्हाला ज्या गोष्टींची गरज होती त्या अगदी योग्य वेळी त्याने आम्हाला पुरवल्या. त्याने आम्हाला भावनिक आधारही दिला. आजसुद्धा तो अशाच प्रकारे आमची काळजी घेतोय. ‘ना चिंता उद्याची काही मला, आहे सोबती तो मेंढपाळ माझा!’a या आपल्या एका खास गीतातल्या ओळी माझ्या मनाला भिडल्या. आपण ठरवल्याप्रमाणे जरी गोष्टी घडल्या नाहीत तरी एक गोष्ट मात्र पक्की आहे, ती म्हणजे यहोवा पावलोपावली आपल्यासोबत असेल.” तुमचीही परिस्थिती अचानक बदलली आणि ती कितीही कठीण वाटत असली, तरी यहोवा तुम्हाला लागणारं बळ आणि मार्गदर्शन पुरवत राहील याची तुम्ही खातरी ठेवू शकता.—यश. ५४:१०; ५८:११.

दोषीपणाची भावना सतावते तेव्हा

७. आधी केलेल्या चुकांमुळे काहींना कसं वाटू शकतं?

७ आपण आपली गंभीर पापं मंडळीतल्या वडिलांकडे कबूल करतो, तेव्हा ते आपल्याला प्रेमळपणे मदत करतात. त्यानंतर अशी चूक आपल्याकडून पुन्हा घडू नये यासाठी आपण शक्य ते सगळं करतो. (नीति. २८:१३; याको. ५:१४-१६; १ योहा. १:९) तरीसुद्धा आपल्या मनात कधीकधी दोषीपणाची भावना येऊ शकते. यहोवाने आपल्याला दया दाखवली असली तरी आपल्याला वाटू शकतं, की ‘मी खरंच त्याच्या क्षमेच्या लायक आहे का?’ (२ करिंथ. २:७) आपल्या पापांचं ओझं मागे सारणं आपल्याला कठीण वाटू शकतं आणि त्या आठवणी पुन्हापुन्हा आपल्या मनात डोकावू शकतात. दावीद राजासोबतही असंच घडलं. तो म्हणाला: “माझ्या पापामुळे मला जराही शांती नाही. मी सुन्‍न पडलोय आणि पार चिरडून गेलोय.” (स्तो. ३८:३, ८) तुम्हालाही आधी केलेल्या चुकांमुळे असंच वाटत असेल, तर यशयाच्या पुस्तकामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं.

८-९. यशया १:१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्या पापांची क्षमा कशी करतो?

८ यशया १:१८ वाचा. यहोवा आपली पापं पूर्णपणे माफ करतो हे समजावून सांगण्यासाठी तो एका सुंदर शब्दचित्राचा वापर करतो. तो म्हणतो: “तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील.” रक्‍तासारखा लाल रंग आपल्या कपड्यांना लागला, तर तो कितीही धुतला तरी सहजासहजी निघत नाही. पण यहोवा मात्र आपली पापं पूर्णपणे पुसून टाकतो, तेव्हा त्याचा डागही मागे राहू देत नाही.

९ दावीद राजाचं उदाहरण घ्या. त्याने व्यभिचार आणि खून यांसारखी गंभीर पापं केली होती, तरी यहोवाने त्याला माफ केलं. इतकंच नाही, तर त्याचा पुढे एकनिष्ठ सेवक म्हणून उल्लेखही केला. (२ शमु. ११:३, ४, १४, १५; १२:१३; १ राजे ९:४, ५) यहोवाने दावीदच्या चुका नाही तर त्याचा विश्‍वासूपणा लक्षात ठेवला. त्याच प्रकारे आपण आपल्या पापांसाठी पश्‍चात्ताप करतो, तेव्हा यहोवा आपल्याला मोठ्या मनाने क्षमा करतो आणि पुढेही शुद्ध विवेकाने त्याची सेवा करायला मदत करतो. पण तरीही दोषीपणाची भावना आपल्या मनातून जात नसेल, तर यशयाच्या पुस्तकातून आपल्याला आणखी मदत कशी मिळू शकते?

१०. यशया ३८:१७ मधून आपल्याला कसं सांत्वन मिळतं?

१० यशया ३८:१७ आणि तळटीप वाचा. या वचनात सांगितलंय, की एखाद्याने मनापासून पश्‍चात्ताप केला तर यहोवा त्याची पापं पाठीमागे टाकून देतो. तो पुन्हा मागे वळून त्यांकडे पाहत नाही किंवा त्यांचा विचारही करत नाही. बायबलच्या एका संदर्भानुसार या वचनाचं भाषांतर असंही केलं जाऊ शकतं: “मी जणू कधी पाप केलंच नव्हतं अशा प्रकारे तू माझं पाप माफ केलं आहेस.” यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा ती त्याच्या नजरेत जणू कधी घडलीच नव्हती असं तो समजतो. तो पुन्हा आपल्याला त्यांसाठी दोषी ठरवत नाही किंवा शिक्षाही करत नाही. तो आपली पापं पूर्णपणे पुसून टाकतो. त्याने असं वचन दिलंय, की “मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.” (यश. ४३:२५) खरंच या वचनामुळे आपल्याला किती सांत्वन मिळतं! विचार करा, या विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी आपली पापं लक्षात ठेवत नसेल, तर मग आपण ती का लक्षात ठेवावीत?

आधी केलेल्या चुकांमुळे आजचा आनंद गमावू नका

११. आपल्या पूर्वीच्या चुकांऐवजी यहोवा कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो? (चित्रसुद्धा पाहा.)

११ दोषीपणाची भावना पुन्हा डोकं वर काढते, तेव्हा आपण स्वतःला यहोवाच्या अभिवचनांची आठवण करून दिली पाहिजे. तो आपल्याला पूर्णपणे क्षमा करतो. आपल्या पूर्वीच्या चुकांमुळे त्याला आपली लाज वाटत नाही. तसंच, तो अपरिपूर्ण माणसांसारखं आपल्या चुका लक्षातही ठेवत नाही. (यश. ५७:१६) आपण आधी काय केलंय यापेक्षा आपण आज काय करतोय आणि भविष्यात आपल्याला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचं आहे हे यहोवासाठी जास्त महत्त्वाचं आहे. (यश. ५५:७) खरंच, आपला देव किती प्रेमळ आणि क्षमाशील आहे! म्हणून आपण आपल्या पूर्वीच्या चुकांमुळे आपला आजचा आनंद आणि भविष्यातल्या सुंदर जीवनाची आशा गमावू नये.

कोलाज: एका भावाला यशया ३८:१७ या वचनामुळे मदत होते. त्यात असं म्हटलंय: “माझे सगळे अपराध तू पाठीमागे टाकलेस.” १. एक भाऊ पूर्वी केलेल्या चुका आठवून खूप दुःखी झालाय. २. नंतर, तो पायनियर सेवा प्रशालेत आनंदाने उत्तर देतोय.

आपण पूर्वी केलेल्या चुका यहोवा लक्षात ठेवत नाही (परिच्छेद ११ पाहा) c


जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा

१२. आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला कसं वाटू शकतं?

१२ आपली जवळची व्यक्‍ती आपल्याला सोडून जाते, तेव्हा आपल्याला दुःख अनावर होतं आणि तो त्रास बराच काळ राहतो. कधीकधी आपल्याला प्रश्‍न पडतो, की यहोवाने आपल्या जवळच्या व्यक्‍तीला का मरू दिलं. आपला भाऊ मायकल यालाही असंच वाटलं होतं. त्याच्या आईवडिलांचा आगीत जळून मृत्यू झाला होता. तो म्हणतो: “माझ्या काळजात कोणीतरी सुरा भोसकल्यासारखं मला वाटलं. यहोवाने त्यांना का मरू दिलं असा सारखासारखा विचार करून मी त्याच्यावर खूप चिडायचो. मला हे माहीत होतं, की त्यांच्या मृत्यूला तो जबाबदार नव्हता. पण त्याने तो होण्यापासून रोखलंही नव्हतं.” तुम्हालाही कधी मायकलसारखंच वाटलंय का? जर असेल, तर तुम्हाला आशा आणि सांत्वन मिळावं म्हणून यहोवाने कोणतं अभिवचन दिलंय?

१३. यशया २५:८ मध्ये यहोवाने काय अभिवचन दिलंय?

१३ यशया २५:८ वाचा. यहोवाने अभिवचन दिलंय, की तो “मृत्यू कायमचा काढून टाकेल.” कल्पना करा, मृत्यूचं नामोनिशाण नसेल अशा परिस्थितीत तुम्ही जगाल! जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याचं दुःख तुम्हाला परत सहन करावं लागणार नाही. (यश. ३५:१०) तिला जिथे पुरलंय त्या जागेला पाहून होणाऱ्‍या वेदनाही राहणार नाहीत. उलट, तुमची जवळची व्यक्‍ती सदासर्वकाळ तुमच्यासोबत राहील आणि तिचं आरोग्यही चांगलं असेल. खातरी बाळगा, या सगळ्या गोष्टी करायची यहोवाची फक्‍त इच्छाच नाही तर तसं करायची त्याच्याकडे ताकदही आहे आणि फक्‍त तोच हे करू शकतो!—प्रकटी. २१:४, ५.

१४. पुनरुत्थानाच्या आशेवर विचार केल्यामुळे तुम्हाला कसं वाटतं? (यशया २६:१९) (चित्रसुद्धा पाहा.)

१४ यशया २६:१९ वाचा. यहोवा फक्‍त मृत्यूच काढून टाकणार नाही, तर तो आपल्या प्रियजनांना परत उठवणारसुद्धा आहे. याबद्दल बोलताना यहोवा स्वतः म्हणतो: “माझ्या लोकांच्या मृतदेहांमध्ये पुन्हा जीव येईल.” याचा अर्थ मेलेल्यांना पुन्हा उठवायची जबाबदारी यहोवाने स्वतः घेतली आहे आणि ते त्याच्या स्मरणात सुरक्षित आहेत. त्याच्या ठरवलेल्या वेळी तो त्यांना पुन्हा जिवंत करेल. वाळलेल्या गवतावर सकाळचं दव पडल्यामुळे जसं ते पुन्हा हिरवंगार होतं, तसंच यहोवाने फुंकलेल्या जीवनाच्या श्‍वासामुळे मृत्यूची झोप घेत असलेले आपले प्रियजन पुन्हा जिवंत होतील. खरंच, आपल्याला आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटल्यामुळे होणारा आनंद त्या वेळी गगनात मावणार नाही!—मार्क ५:४२ सोबत तुलना करा.

कोलाज: एका बहिणीला यशया २६:१९ मधल्या देवाच्या अभिवचनामुळे मदत होते. त्यात असं म्हटलंय: “तुझे मेलेले जिवंत होतील.” १. एका बहिणीची लहान मुलगी वारली आहे. ती तिच्या मुलीच्या खोलीत बसून रडत आहे आणि तिच्या हातामध्ये एक फोटो फ्रेम आहे. २. पुनरुत्थान झालेल्या आपल्या मुलीला ती आनंदाने मिठी मारत आहे.

आपण आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटू ही आशा पक्की आहे (परिच्छेद १४ पाहा)


१५. पुनरुत्थानाच्या आशेमुळे दुःख सहन करायला आपल्याला कशी मदत होते?

१५ हे खरंय, की यहोवाने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनामुळे आज आपलं दुःख पूर्णपणे नाहीसं होत नाही. पण यहोवा आपल्या प्रियजनांना विसरलेला नाही ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपल्याला सांत्वन मिळतं. आधी उल्लेख केलेल्या मायकलासुद्धा यामुळेच सांत्वन मिळालं. तो म्हणतो: “यशया २६:१९ या वचनामुळे, माझे आईवडीलही यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहेत आणि ते त्याच्या आठवणीत सुरक्षित आहेत ही गोष्ट समजून घ्यायला मला मदत झाली. तो त्याच्या ठरवलेल्या वेळी त्यांना पुन्हा जिवंत करणार आहे हे माहीत असल्यामुळे मला सांत्वन आणि बळ मिळतं.” यहोवाने दिलेलं अभिवचन आपणही नेहमी डोळ्यांसमोर ठेवलं, तर आपल्या प्रियजनांना गमावल्याचं दुःख आपल्याला सहन करता येईल.

१६. दुःखाच्या प्रसंगात कोणत्या वचनांमुळे तुम्हाला सांत्वन मिळालंय?

१६ आपण या लेखात यशयाच्या पुस्तकातल्या काही वचनांवर चर्चा केली. आपली परिस्थिती अचानक बदलते, आधी केलेल्या चुकांमुळे दोषीपणाची भावना सतावते आणि आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा ही वचनं आपल्याला सांत्वन देतात. यहोवाने बायबलमध्ये ही वचनं नमूद करून ठेवल्याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! (स्तो. ९४:१९) तुमचंही एखादं आवडीचं वचन आहे का? दुःखाच्या प्रसंगातून जात असताना तुम्हाला सांत्वन मिळालंय असं एखादं वचन तुम्हाला आठवतंय का? तुम्ही ते पाठ करू शकता किंवा येता-जाता सहज दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला दुःखातून सावरायला मदत होईल. कारण तुम्हाला नेहमी सांत्वन मिळत राहावं अशी स्वर्गातल्या तुमच्या पित्याची, यहोवाची इच्छा आहे.

पुढे दिलेल्या वचनातून तुम्हाला कसं सांत्वन मिळतं?

  • यशया ४२:१६?

  • यशया १:१८; ३८:१७?

  • यशया २५:८; २६:१९?

गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा

a या ओळी “हाती यहोवाचा हात” या खास गीतातून घेतल्या आहेत.

b चित्राचं वर्णन: एका जोडप्याची बेथेलमधली नेमणूक बदलल्यानंतर नवीन मंडळीतले भाऊबहीण त्यांचं स्वागत करत आहेत.

c चित्राचं वर्णन: आधी केलेल्या चुकांना मागे सारून एक भाऊ आता पायनियर सेवा प्रशालेचा आनंद घेतोय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा