६-१२ जुलै, २०२६
गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र
बायबलमधली तत्त्वं इतकी महत्त्वाची का आहेत?
“आपल्या विचारशक्तीने पवित्र सेवा करता येईल.”—रोम. १२:१.
या लेखात:
बायबल तत्त्वं म्हणजे काय आणि बायबल वाचताना आपण ती कशी ओळखू शकतो ते पाहा.
१-२. (क) बायबल कधी लिहिण्यात आलं? (ख) बायबल आजच्या काळातही उपयोगी का आहे?
बायबलचं लिखाण आजपासून जवळपास ३,५०० वर्षांपूर्वी सुरू झालं आणि २,००० वर्षांपूर्वी संपलं. खरंच, बायबल खूप जुनं पुस्तक आहे. पण असं असलं तरी, ते “देवाचं वचन” आहे आणि आजही तितकंच प्रभावी आहे. (इब्री ४:१२; २ तीम. ३:१६, १७) आजच्या काळातसुद्धा लाखो लोकांना बायबलमुळे जीवनातल्या समस्यांचा सामना करायला मदत होत आहे.
२ पण हे कसं शक्य आहे? याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं, त्याचा लेखक ‘जिवंत देव’ आहे आणि तो बुद्धिमान आहे. (१ तीम. ४:१०; रोम. १६:२६, २७) दुसरं, त्यातली तत्त्वं काळाच्या ओघात कधीच जुनी होत नाहीत. तसंच, आपण कोणत्याही समस्येत असलो तरी या तत्त्वांमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.
३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
३ या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत: (१) बायबल तत्त्वं म्हणजे काय? (२) आजच्या काळात ती आपल्यासाठी का महत्त्वाची आहेत? आणि (३) बायबल वाचताना आपण ती कशी ओळखू शकतो? तसंच, येशूच्या शिकवणींमधून बायबल तत्त्वांचं महत्त्व कसं दिसून येतं हेही आपण पाहू या.
बायबल तत्त्वं म्हणजे काय?
४. बायबल तत्त्वं म्हणजे काय?
४ तत्त्वं म्हणजे बायबलमधली मुलभूत सत्यं. याच तत्त्वांवर नियम बनवले जातात. कधीकधी नियमसुद्धा तत्त्वं असू शकतात. (मत्त. २२:३७) पण तत्त्वं नियमांपेक्षा श्रेष्ठ असतात. ते कसं? नियम विशिष्ट काळासाठी किंवा परिस्थितीसाठी बनवले जातात. पण तत्त्वांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. तत्त्वांवरून यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला समजतं. त्यामुळे तत्त्वं वेगवेगळ्या काळात आणि परिस्थितींत लागू केली जाऊ शकतात. एखादा नियम का बनवण्यात आला हे समजायला त्यामागचं तत्त्वं लक्षात घेणं गरजेचं आहे. यहोवाने दिलेला प्रत्येक नियम तत्त्वांवर आधारित असतो. आणि ही तत्त्वं वेगवेगळ्या परिस्थितींत आणि काळात लागू केली जाऊ शकतात. (स्तो. ११९:१११) नियम बदलू शकतात, पण तत्त्वं कधीच बदलत नाहीत किंवा जुनी होत नाहीत.—यश. ४०:८.
५. नियम आणि तत्त्वं यांमधला फरक समजावून सांगा. (चित्रंसुद्धा पाहा.)
५ नियम आणि तत्त्वांमधला फरक समजायला एक उदाहरण घ्या. एक आई तिच्या मुलाला गॅसला हात लावू नकोस असं सांगते. हा एक नियम आहे. पण यामागचं तत्त्व काय आहे? हेच की एखाद्या गरम वस्तूला हात लावला तर आपल्याला भाजू शकतं. आणि हे तत्त्व घरातल्या इतर वस्तूंच्या बाबतीतही लागू केलं जाऊ शकतं. जसं की इस्त्री, हिटर, इत्यादी. इतकंच काय, तर हे तत्त्व घराबाहेर इतर ठिकाणीही लागू केलं जाऊ शकतं. हे खरंय, की तो मुलगा मोठा झाल्यावर गॅसचा वापर करेल. पण असं करताना त्याला भाजणार नाही याची तो तेव्हासुद्धा काळजी घेईल. या उदाहरणावरून आपल्याला हेच समजतं, की नियम बदलू शकतात पण तत्त्वं मात्र कायम राहतात.
नियम बदलू शकतो, पण त्यामागचं तत्त्व कधीच बदलत नाही (परिच्छेद ५ पाहा)
बायबल तत्त्वं का महत्त्वाची आहेत?
६. (क) यहोवाने बायबलमध्ये काय दिलंय? (ख) यहोवाने आपल्यावर भरवसा असल्याचं कसं दाखलंय?
६ यहोवाने आपल्याला काही थेट नियम दिले आहेत. ते पाळल्यामुळे आपण बरेच धोके टाळू शकतो. यावरून यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्याचं दिसून येतं. (याको. २:११) त्यासोबतच, या नियमांमागचं तत्त्व समजून घ्यायलाही तो आपल्याला मदत करतो. पण यहोवाने प्रत्येक बारीकसारीक गोष्टींसाठी नियम दिले नाहीत. उलट, चांगले निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते करण्यासाठी त्याने बायबलमध्ये तत्त्वं दिली आहेत. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत नियम न देऊन यहोवाने आपल्यावर भरवसा असल्याचं दाखवलंय. तसंच, योग्य निर्णय घेऊन त्याच्यावरचं आणि त्याच्या तत्त्वांवरचं आपलं प्रेम दाखवायची संधीही त्याने आपल्याला दिली आहे.—गलती. ५:१३.
७. बायबल तत्त्वांचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.)
७ बायबल तत्त्वांचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे समजायला एक उदाहरण घ्या. हायवेवर वाहन चालकांना सूचना देण्यासाठी रस्त्याच्या कडेला काही पाट्या असतात. जसं की, आपल्या गाडीची गती किती असली पाहिजे, किंवा गाडी कुठे थांबवावी आणि कुठे थांबवू नये. हे नियम मोडल्यामुळे आपल्याला कोणता दंड भरावा लागेल हे त्यांतल्या काही पाट्यांवर लिहिलेलं असतं. पण, काही पाट्या पुढे येणाऱ्या धोक्यांबद्दल इशारा देण्यासाठी असतात. जसं की, पुढे अपघाती क्षेत्र आहे, रस्त्यावर वळणं आहेत, इत्यादी. अशा प्रकारच्या इशारा देणाऱ्या पाट्या पाहून एक चांगला चालक सावधपणे गाडी चालवतो. त्याच प्रकारे चुकीच्या गोष्टींबद्दल बायबलमध्ये असलेले नियम तर आपण पाळतोच, शिवाय यहोवाला आवडणार नाही असं काम किंवा विचार करायचंही आपण टाळतो. पण असं करण्यासाठी आपल्याला यहोवाची विचारसरणी माहीत असणं गरजेचं आहे.
बायबल तत्त्वं रस्त्यावरच्या पाट्यांसारखे आपल्याला पुढे येणाऱ्या धोक्यांबद्दल इशारा देतात (परिच्छेद ७ पाहा)
८. बायबल वाचताना आपण काय केलं पाहिजे आणि याचा आपल्याला काय फायदा होईल? (रोमकर १२:१, २)
८ बायबलची तत्त्वं समजून घेतल्यामुळे आणि ती जीवनात लागू केल्यामुळे आपल्याला यहोवा कसा विचार करतो हे समजून घ्यायला मदत होते. म्हणून बायबलमधले अहवाल वाचताना त्यांतून मिळणारे धडे आपण जीवनात कसे लागू करू शकतो, याचा आपण विचार केला पाहिजे. तसंच, आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की यहोवाने या गोष्टी त्याच्या वचनात का लिहून ठेवल्या आणि त्या पाळल्यामुळे मला कसा फायदा होऊ शकतो. असं केल्यामुळे आपल्याला ‘आपली विचारशक्ती’ वापरून यहोवाची सेवा करता येईल. तसंच, “देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे” याचीही आपल्याला खातरी पटेल.—रोमकर १२:१, २ वाचा.a
९. बायबल तत्त्वांप्रमाणे जगल्यामुळे आणखी काय फायदा होतो? (इब्री लोकांना ५:१३, १४)
९ बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपण यहोवासारखं वागायला शिकतो. आपण बायबलच्या तत्त्वांप्रमाणे जगतो, तेव्हा यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत होतं. (इब्री लोकांना ५:१३, १४ वाचा.) लहान मुलांना अनुभव कमी असल्यामुळे काय करावं आणि काय नाही याबद्दल त्यांना बरेच नियम द्यावे लागतात. आणि मुलंही फक्त शिक्षा मिळेल या भीतीने नियम पाळतात. पण यहोवा आपल्याला लहान मुलांसारखं वागवत नाही. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे चांगले निर्णय घेऊ याची त्याला खातरी असते. आपण असं करतो तेव्हा तोही खूप खूश होतो.—स्तो. १४७:११; नीति. २३:१५, २६; २७:११.
आपण बायबल तत्त्वं कशी ओळखू शकतो?
१०. आपण बायबलची तत्त्वं कशी ओळखू शकतो?
१० आपण बायबल वाचतो आणि त्यांतले धडे कसे लागू करता येतील याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला बायबलची तत्त्वं सापडतात. आणि या तत्त्वांमुळे यहोवा एखाद्या गोष्टीबद्दल कसा विचार करतो आणि त्याला कसं वाटतं हे आपल्याला समजतं. तसंच, एखादा नियम का देण्यात आलाय याचा विचार केल्यामुळेही आपल्याला त्यामागची तत्त्वं समजायला मदत होते. नियमांमागच्या कारणांचा आपण जितका जास्त विचार करतो, तितकं जास्त आपल्याला यहोवाला जाणून घेता येतं. पण यहोवाची विचारसरणी समजून घ्यायला आपण त्याला प्रार्थना करणं आणि आपली विचारशक्ती वाढवणंही गरजेचं आहे. (नीति. २:१०-१२) तसंच, आपण स्वतःला काही प्रश्नही विचारू शकतो. जसं की, ‘यहोवाने हा नियम का दिला असेल? जर यहोवाला ही गोष्ट आवडत नाही, तर अशीच दुसरी एखादी गोष्ट मी केली तर त्याला कसं वाटेल? या बायबल अहवालातून मला काय शिकायला मिळालं, आणि ते मी माझ्या जीवनात कसं लागू करू शकतो?’ बायबल अहवालांमधले धडे आणि नियमांमागची कारणं शोधल्यामुळे आपल्याला चांगले निर्णय घेता येतील आणि यहोवाला खूश करता येईल.
११. बायबलची तत्त्वं कशी ओळखायची हे येशूने डोंगरावरच्या उपदेशात कसं समजावून सांगितलं? (चित्रसुद्धा पाहा.)
११ आपण बायबलची तत्त्वं कशी ओळखू शकतो, हे येशूने डोंगरावरच्या उपदेशात समजावून सांगितलं. आता आपण याचीच तीन उदाहरणं पाहू या. प्रत्येक उदाहरणात येशूने आधी नियम सांगितला आणि मग त्यामागचं तत्त्वं समजावून सांगितलं. येशूने जे शिकवलं त्यावर मनन केल्यामुळे आजच्या काळात आपण ती तत्त्वं कशी लागू करू शकतो हे आपल्याला समजेल. तसंच, ती लागू केल्यामुळे कोणते फायदे होऊ शकतात हेही आपल्याला समजेल.
देवाने दिलेल्या नियमांमागची बायबल तत्त्वं कशी शोधावी हे येशूने डोंगरावरच्या उपदेशात शिकवलं (परिच्छेद ११ पाहा)
१२. मत्तय ५:२१, २२ मधल्या नियमामागचं तत्त्व काय आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
१२ मत्तय ५:२१, २२ वाचा. “खून करू नका.” या नियमामागचं तत्त्व काय आहे? आपण इतरांचा द्वेष करू नये, म्हणजे आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांचं मन दुखावू नये किंवा त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये असं यहोवाला वाटतं. येशूला इथे म्हणायचं होतं, की आपण जरी एखाद्याचा खरोखर खून केला नाही, तरी त्याच्याबद्दल मनात द्वेष बाळगून आपण या नियमामागचं तत्त्व मोडतो. शिवाय, जर आपण एखाद्याबद्दल ‘मनात राग बाळगला’ किंवा त्याला वाईटसाईट बोललो तर आपल्याला त्याबद्दल देवाला “जाब द्यावा लागेल.” खरंतर एखाद्याचा द्वेष केल्यामुळेच एक व्यक्ती खून करायला प्रवृत्त होते.—१ योहा. ३:१५.
१३. मत्तय ५:२१, २२ मधलं तत्त्व आपण आज कसं लागू करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ मत्तय ५:२१, २२ मधलं तत्त्व आपण आज कसं लागू करू शकतो? आपण कधीच इतरांबद्दल मनात राग किंवा द्वेष बाळगणार नाही. (लेवी. १९:१८; ईयो. ३६:१३) का बरं? कारण असं केल्यामुळे आपण इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलायला किंवा करायला प्रवृत्त होऊ शकतो. (नीति. १०:१२) यात एखाद्याची बदनामी करणं किंवा निंदा करणंही सामील आहे. (नीति. २०:१९; २५:२३) येशूच्या काळात इंटरनेट किंवा सोशल मिडिया नव्हतं. पण आजच्या काळात ते सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला जर येशूने सांगितलेलं तत्त्व पाळायचं असेल, तर आपण इंटरनेटवर काहीही पोस्ट करण्याआधी विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण असं केलं नाही, तर एखाद्याचं नाव खराब होऊ शकतं किंवा इतरांच्या नजरेत त्याचा आदर कमी होऊ शकतो. हे खरंय, की आपण खरोखर कोणाचा खून करणार नाही. पण आपल्याकडून कधीही कोणाचं नाव खराब होणार नाही याची आपण नेहमी खबरदारी बाळगली पाहिजे.
(परिच्छेद १२-१३ पाहा)
१४. मत्तय ५:२७, २८ मधल्या नियमामागचं तत्त्व काय आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
१४ मत्तय ५:२७, २८ वाचा. “व्यभिचार करू नका.” या नियमामागचं तत्त्व काय आहे? यहोवाला फक्त अनैतिक कामांचाच नाही, तर अनैतिक विचारांचाही वीट आहे. येशूने सांगितलं, की एखाद्या लग्न झालेला माणसाने जर दुसऱ्या स्त्रीबद्दल मनात चुकीच्या इच्छा बाळगल्या किंवा तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं तर तो पाप करतो. म्हणून असे चुकीचे विचार मनात आले, तर ते लगेच मुळासकट उपटून काढणं खूप गरजेचं आहे; मग हे करणं कितीही कठीण असलं तरीही. (मत्त. ५:२९, ३०) हे तत्त्व अविवाहित लोकांनाही लागू होतं.
१५. मत्तय ५:२७, २८ मधलं तत्त्व आपण आज कसं लागू करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ मत्तय ५:२७, २८ मधलं तत्त्व आपण आज कसं लागू करू शकतो? आपण आपल्या मनात कुठल्याही प्रकारच्या अनैतिक इच्छा बाळगणार नाही. (२ शमु. ११:२-४; ईयो. ३१:१-३) येशूने सांगितलेलं हे तत्त्व आपल्याला पाळायचं असेल, तर आपण कुठल्याच प्रकारचं अश्लील साहित्य किंवा पोर्नोग्राफी पाहणार नाही. आपण असा तर्क करणार नाही, की ‘मी तर अनैतिक काम कधीच करणार नाही, मग ते पाहण्यात काय हरकत आहे?’ काही प्रकारची पोर्नोग्राफी पाहण्यात काहीच नुकसान नाही असं जगातल्या लोकांना वाटतं. पण आपण मात्र त्यांच्यासारखा विचार कधीच करणार नाही. येशूच्या काळात फोन, कंप्यूटर यांसारखी यंत्रणं नव्हती. पण तरी या यंत्रणांचा आपण कसा वापर करावा त्याबद्दल यहोवाला काय वाटतं हे या तत्त्वावरून आपल्याला कळतं. आपण जर फोनवरून कोणाला अश्लील फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज पाठवले तर यहोवाला ते अजिबात आवडणार नाही. येशूने सांगितलेलं तत्त्व पाळल्यामुळे पती-पत्नींना एकमेकांना एकनिष्ठ राहायला मदत होईल. (मला. २:१५) तसंच, या तत्त्वामुळे अविवाहित लोकांनाही अनैतिक गोष्टींपासून दूर राहायला मदत होईल.—नीति. ५:३-१४.
(परिच्छेद १४-१५ पाहा)
१६. मत्तय ५:४३, ४४ मधल्या नियमामागचं तत्त्व काय आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
१६ मत्तय ५:४३, ४४ वाचा. “आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर.” या नियमामागचं तत्त्व काय आहे? आपण सगळ्यांनाच आपला शेजारी समजलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे अशी यहोवाची इच्छा आहे. पण येशूच्या काळातल्या यहुद्यांनी या नियमाचा चुकीचा अर्थ लावला आणि असा समज करून घेतला, की त्यांनी फक्त इतर यहुद्यांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांच्या शत्रूंचा द्वेष केला पाहिजे. पण या नियमाचा असा अर्थ होत नाही हे येशूला माहीत होतं. त्याला माहीत होतं, की यहोवा एक प्रेमळ देव असल्यामुळे आपण सगळ्यांना आपला शेजारी समजावं असं त्याला वाटतं; मग ते कुठल्याही राष्ट्राचे किंवा संस्कृतीचे असले तरीही.—मत्त. ५:४५-४८.
१७. मत्तय ५:४३, ४४ मधलं तत्त्व लागू केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ मत्तय ५:४३, ४४ मधलं तत्त्व आपण आज कसं लागू करू शकतो? शेजाऱ्यांवर प्रेम असल्यामुळे आपण जगातल्या वादविवादांमध्ये आणि युद्धांमध्ये भाग घेणार नाही. (यश. २:४; मीखा ४:३) यामुळे दुसऱ्या संस्कृतीच्या, देशाच्या किंवा धर्माच्या लोकांशी प्रेमाने वागायला आपल्याला मदत होईल. (प्रे. कार्यं १०:३४, ३५) तसंच, इतर जण आपल्याशी किंवा आपल्या जवळच्यांशी वाईट वागले, तरी त्यांना क्षमा करायला आपल्याला मदत होईल.—मत्त. १८:२१, २२; मार्क ११:२५; लूक १७:३, ४.
(परिच्छेद १६-१७ पाहा)
बायबल तत्त्वांप्रमाणे जगायचा निश्चय करा
१८. (क) आपण कोणता निश्चय केला पाहिजे? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?
१८ यहोवा आपल्याला लहान मुलांसारखं वागवत नाही ही किती चांगली गोष्ट आहे! त्याची इच्छा आहे, की आपण नेहमी बायबल तत्त्वांच्या आधारावर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. (१ करिंथ. १४:२०) म्हणून, निर्णय घेताना आपण “यहोवाची इच्छा काय आहे, हे ओळखायचा” निश्चय केला पाहिजे. (इफिस. ५:१७) आपण शिक्षा मिळेल या भीतीने नाही, तर यहोवावर प्रेम असल्यामुळे त्याला आवडेल असे निर्णय घेतले पाहिजेत. पण योग्य निर्णय घ्यायला मदत व्हावी म्हणून यहोवाने आपल्याला आणखी एक भेट दिली आहे. ती म्हणजे, आपला विवेक. याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.
गीत ९५ सत्याचा प्रकाश वाढत जातो!
a बऱ्याचदा आपल्याला बायबल तत्त्वांचा काळजीपूर्वक विचार करावा लागू शकतो. निर्णय घेताना एक तत्त्व समजून घ्यायला दुसऱ्या तत्त्वाची मदत घ्यावी लागू शकते. अशा वेळी आपल्या तर्कबुद्धीचा किंवा विचारशक्तीचा वापर केल्यामुळे यहोवा खूश होईल असे निर्णय घ्यायला आपल्याला मदत होईल. पहिल्या शतकातले यहूदी लोक ख्रिस्ती बनण्याआधी परंपरेने चालत आलेले नियम पाळत होते. पण ख्रिस्ती बनल्यानंतर त्यांना निर्णय घ्यायची ही नवीन पद्धत शिकून घ्यावी लागणार होती.