वाचकांचे प्रश्न
राष्ट्रं “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा कधी करतील?
अलिकडच्या टेहळणी बुरूजa अंकात आलेल्या “वाचकांचे प्रश्न” या लेखात आपण पाहिलं, की यहोवा लवकरच, ‘दहा शिंगांच्या’ (सगळ्या सरकारांच्या) मनात “आपला विचार“ घालेल. त्या विचाराप्रमाणे, दहा शिंगं त्यांची संपूर्ण सत्ता आणि अधिकार ‘गडद लाल रंगाच्या जंगली पशूला’, म्हणजेच संयुक्त राष्ट्राला देतील. या पशूला “जंगली पशूची मूर्ती” असंसुद्धा म्हटलंय. (प्रकटी. १३:१४, १५; १७:३, १६, १७) त्यानंतर “दहा शिंगं” आणि नव्याने अधिकार मिळालेला जंगली पशू संपूर्ण जगातल्या खोट्या धर्माचा नाश करतील. मग प्रश्न हा आहे, की राष्ट्रं “शांती आहे, सुरक्षा आहे!”b अशी घोषणा केव्हा करतील? खोट्या धर्माचा नाश करण्याच्या आधी की नंतर?—१ थेस्सलनी. ५:३.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर भविष्यात “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा नेमकी केव्हा होईल हे आपल्याला माहीत नाही. जर आपल्याला या भविष्यवाणीबद्दल सगळीच बारीकसारीक माहिती असती, तर आपल्याला सतर्क राहायची गरजच पडली नसती. पण येशूने आपल्याला वारंवार ‘सतत जागे राहायची’ आठवण करून दिली. (मत्त. २४:४२; २५:१३; २६:४१) म्हणूनच आता आपण पौलने यहोवाच्या प्रेरणेने थेस्सलनीकाच्या भाऊबहिणींना जे पत्र लिहिलं, त्यातल्या भविष्यवाणीकडे लक्ष देऊ या.
पौलने म्हटलं: “‘शांती आहे, सुरक्षा आहे!’ असं जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा . . . त्यांच्यावर अचानक नाश येईल.” (१ थेस्सलनी. ५:२, ३) आपल्या प्रकाशनांमध्ये या वचनाला बऱ्याचदा अशा प्रकारे समजवण्यात आलंय, की “शांती आहे, सुरक्षा आहे” ही घोषणा मोठ्या बाबेलच्या म्हणजेच, खोट्या धर्माच्या नाशाच्या आधी होईल. आणि खोट्या धर्माच्या नाशानेच मोठ्या संकटाची सुरुवात होईल. ही घोषणा जणू काय, मोठं संकट सुरू होण्याचं चिन्हच असेल.
पण या भविष्यवाणीचा काळजीपूर्वक विचार केल्यावर असं दिसून येतं, की “शांती आहे, सुरक्षा आहे” ही घोषणा खोट्या धर्माचा नाश झाल्याच्या नंतरही होऊ शकते. असं आपण का म्हणू शकतो? पुढे दिलेल्या प्रश्नांचा विचार करा.
जगातल्या युद्धांमध्ये खोट्या धर्माची काय भूमिका आहे? बायबल म्हणतं: “तिच्यामध्ये [‘मोठी वेश्या,’ मोठी बाबेल] . . . पृथ्वीवर वध करण्यात आलेल्या सर्वांचं रक्त आढळलं.” (प्रकटी. १७:१, ५; १८:२४) इतिहासावरून असं दिसून येतं, की खोट्या धर्माने कायम युद्धांना पाठिंबा दिलाय. इतकंच काय, तर खोट्या धर्मामुळे झालेल्या हिंसाचारामुळे लाखो लोकांचा जीव गेलाय. त्यामुळे राष्ट्रं कदाचित असा विचार करतील, की खोट्या धर्माच्या नाशानंतरच पृथ्वीवर शांती आणि सुरक्षा आणणं शक्य आहे. म्हणून आपण म्हणू शकतो, की कदाचित खोट्या धर्माचा नाश झाल्याच्या नंतर “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा होईल.
“शांती आहे, सुरक्षा आहे” ही घोषणा झाल्यानंतर कोणती घटना घडेल? पौलने म्हटलं: “त्यांच्यावर अचानक नाश येईल.” (१ थेस्सलनी. ५:३) जर राष्ट्रांनी खोट्या धर्माचा नाश करण्याआधी “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा केली आणि पौलने सांगितल्याप्रमाणे या घटनेनंतर लगेच त्यांचा “अचानक नाश” झाला, तर खोट्या धर्माचा नाश करण्यासाठी ही राष्ट्रं राहणारच नाहीत. म्हणून या वचनाचा अर्थ कदाचित असा होऊ शकतो, की राष्ट्रं आधी खोट्या धर्माचा नाश करतील, मग “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा करतील. आणि त्यानंतर राष्ट्रांचा लगेच नाश होईल.
या घटनांचा यहोवाच्या लोकांवर कोणता प्रभाव पडेल? पौलने म्हटलं: “बांधवांनो, तुम्ही मात्र अंधारात नाही. त्यामुळे, दिवसाच्या प्रकाशाने चोराला गाठावं तसा तो दिवस तुम्हाला गाठणार नाही.” (१ थेस्सलनी. ५:४) जर खोट्या धर्माच्या नाशानंतर “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा झाली, तर यहोवाच्या लोकांना हे समजेल, की लवकरच राष्ट्रांचा नाश होणार आहे. या अर्थाने ते अंधारात नसतील. पण राष्ट्रांनी मात्र खोट्या धर्माचा नाश केल्यामुळे त्यांना वाटेल, की त्यांना जगात शांती आणि सुरक्षा आणण्यात यश मिळालंय. पण त्यांचा नाश अचानक होईल. म्हणजे तो दिवस त्यांच्यावर चोरासारखा येईल.
मग लवकरच आपण काय घडण्याची अपेक्षा करू शकतो? लवकरच, “दहा शिंगं” आणि अधिकार मिळालेला जंगली पशू खोट्या धर्माचा नाश करतील आणि मोठं संकट सुरू होईल. पण “शांती आहे, सुरक्षा आहे” अशी घोषणा नेमकी केव्हा होईल? याच्या आपण दोन शक्यता पाहिल्या. पहिली: खोट्या धर्माचा नाश होण्याच्या आधी. दुसरी: सरकारांनी मोठ्या बाबेलचा पूर्णपणे नाश केल्यावर ही घोषणा केली जाईल. पण नेमक्या या घटना कशा घडतील ही येणारी वेळच सांगेल. कारण बायबलच्या भविष्यवाण्या, त्या पूर्ण होत असताना किंवा पूर्ण झाल्यावरच स्पष्टपणे समजतात.—योहा. १२:१६ सोबत तुलना करा.
“शांती आहे, सुरक्षा आहे” ही घोषणा नेमकी केव्हा होईल हे आपल्याला माहीत नाही. पण आपण ‘सतत जागे राहिलं’ पहिजे. तसंच, आपलं यहोवासोबत चांगलं नातं असलं, तरच आपण या घटनांसाठी पूर्णपणे तयार राहू शकू.—१ थेस्सलनी. ५:६.
a नोव्हेंबर २०२५ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.
b पौलच्या शब्दांवरून दिसतं, की ही कदाचित एकच घोषणा असेल, किंवा एका पाठोपाठ एक होणाऱ्या बऱ्याच घोषणा असतील.