बायबलमधल्या लोकांकडून शिका
ओबद्या—त्याने यहोवाची भीती बाळगली
ओबद्या हा अहाब राजाच्या “राजमहालाची व्यवस्था” पाहायचा. अहाब दुष्ट होता आणि त्याने इस्राएल देशात होणाऱ्या बाल दैवताच्या उपासनेला थांबवलं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण देशात बाल दैवताची खोटी उपासना पसरली होती. पण ओबद्या “लहानपणापासून यहोवाचं भय बाळगत” होता. तो “यहोवाला फार भिऊन वागायचा.” (१ राजे १८:१-१३) ईजबेल राणीने यहोवाच्या सगळ्या संदेष्ट्यांना ठार मारण्याचा हुकूम दिला, तेव्हा ओबद्याने खूप हिंमत दाखवून त्या संदेष्ट्यांना मदत केली. त्यांचा जीव वाचावा म्हणून त्याने त्यांना लपवून ठेवलं. जरा विचार करा, राणीच्या हुकुमाच्या विरोधात जाऊन एखाद्या संदेष्ट्याला लपवण्यासाठी खूप धाडसाची गरज होती. पण ओबद्याने अशा १०० संदेष्ट्यांना लपवून ठेवलं! तसंच, दुष्काळाच्या काळात त्याने त्या सगळ्या संदेष्ट्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी पुरवल्या. राजा आणि राणीची सेवा करणाऱ्या शेकडो खोट्या संदेष्ट्यांपासून लपून हे काम करणं ओबद्याला किती कठीण गेलं असेल याचा विचार करा.—१ राजे १८:१९.
आपण ओबद्याकडून काय शिकू शकतो? यहोवाचं भय असल्यामुळे ओबद्या अहाब राजाच्या भीतीवर मात करू शकला. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या भावांचा जीव वाचवला. आपण राहतो त्या ठिकाणी जर आपल्या कामावर बंदी असेल, तर यहोवाचं भय आपल्याला धैर्य दाखवायला मदत करेल. आणि या धैर्यामुळेच आपण आपल्या भाऊबहिणींना मदत करायला नेहमी तयार राहू.