वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 फेब्रुवारी पृ. २६-२९
  • “मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आव्हानं
  • यहोवा आईवडिलांकडून कोणती अपेक्षा करतो?
  • आईवडिलांना आपल्या मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायला कशामुळे मदत होईल?
  • आईवडिलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 फेब्रुवारी पृ. २६-२९
एक आईवडील आपल्या मुलीला प्रेमाने मिठी मारत आहेत.

“मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत”

“वारसा” हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं? कदाचित तुम्ही पैशांचा, जमिनीचा किंवा वाडवडिलांकडून मिळालेल्या एखाद्या मौल्यवान वस्तूचा विचार कराल. वारसा कोणत्याही रूपात असला, तरी तो आपल्यासाठी खूप मौल्यवान असतो आणि आपण तो जिवापाड जपतो.

बायबलमध्ये मुलांना “यहोवाकडून मिळालेला वारसा” म्हटलंय. (स्तो. १२७:३) त्यामुळे ख्रिस्ती आईवडील त्यांच्या मुलांना यहोवाने दिलेली अनमोल भेट समजतात. त्यांना सुरक्षित ठेवायला आणि त्यांच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करायला ते शक्य ते करतात. तसंच, ते त्यांना यहोवासोबत जवळचं नातं जोडायलाही मदत करतात.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आज बरेच आईवडील त्यांच्या मुलांना देवाकडून मिळालेली भेट समजत नाहीत. (यश. ४९:१५; २ तीम. ३:१-३) तसंच, इतर काहींना त्यांच्या मुलांची मनापासून काळजी घ्यायची इच्छा तर असते, पण काही अव्हानांमुळे त्यांना तसं करणं जड जातं. मग ही आव्हानं कोणती आहेत? यहोवा आईवडिलांकडून कोणती अपेक्षा करतो? आणि आईवडिलांना आपल्या मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायला कशामुळे मदत होईल?

आव्हानं

  • लोकांचा दबाव. काही देशांमध्ये जोडप्यांना जितकी जास्त मुलं असतात, तितका त्यांना समाजात मान असतो. म्हणून काही जोडपी घरच्यांकडून किंवा नातेवाइकांकडून येणाऱ्‍या दबावामुळे, आपली ऐपत नसतानाही बरीच मुलं होऊ देतात.

  • भविष्याची चिंता. काही देशांमध्ये अन्‍नटंचाई असल्यामुळे किंवा वैद्यकीय सुविधा कमी असल्यामुळे लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे काही आईवडील असा विचार करतात, की आपण जर जास्त मुलं होऊ दिली तर निदान त्यांतली काही मुलं तरी जगतील. तसंच, काही देशांमध्ये सरकारं वृद्धांच्या मदतीसाठी योजना करत नाहीत. अशा देशांमधले लोक म्हातारपणी मदत व्हावी म्हणून जास्त मुलं होऊ देतात.

  • कुटुंब नियोजन. काही देशांमध्ये गर्भनिरोधक साधनं सहजासहजी उपलब्ध नसतात. तर काही ठिकाणी कमी दर्जेची साधनं उपलब्ध असल्यामुळे लोक त्यांचा वापर करत नाहीत. कारण त्यांना वाटतं, की त्यामुळे त्यांच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. तसंच, काही ठिकाणी ही साधनं विकत घेणं लोकांना परवडण्यासारखं नसल्यामुळे ते त्यांचा वापर करत नाहीत.a

यहोवा आईवडिलांकडून कोणती अपेक्षा करतो?

एक कुटुंब बागेत गेलं आहे. त्यांतला पिता आपल्या तरुण मुलीचं लक्ष देऊन ऐकत आहे आणि त्यांतली आई त्यांच्या लहान मुलासोबत खेळत आहे.

प्रत्येक मुलाला पुरेसा वेळ द्या

मुलांच्या गरजा पुरवाव्यात. यहोवाने आईवडिलांना त्यांच्या अल्पवयीन मुलांची काळजी घ्यायची जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठी आईवडिलांनी मेहनत करावी आणि त्यांच्या प्रत्येक मुलाची अन्‍न, वस्त्र आणि निवाऱ्‍याची गरज पूर्ण करावी असं यहोवाला वाटतं. तसंच, त्यांनी मुलांना शालेय शिक्षण पुरवण्याचीसुद्धा गरज आहे. पण त्यासाठी मुलांना आपल्यापासून दूर बोर्डिंग स्कूलला पाठवायची गरज नाही. उलट आपली मुलं मोठी होईपर्यंत ती आपल्यासोबतच राहावी या गोष्टीची प्रत्येक ख्रिस्ती आईवडील खातरी करतात. आणि ते आपल्या मुलांना जीवनात उपयोगी पडतील अशी कौशल्य शिकून घ्यायलाही मदत करतात. तसंच, ते प्रत्येक मुलाला वेळ देतात. त्यामुळे मुलांना प्रेमाची आणि सुरक्षेची जाणीव होते. पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आईवडिलांनी श्रीमंत असणं गरजेचंय का? नाही. यहोवा अशी अपेक्षा करत नाही. खरंतर, यहोवाने त्याच्या लाडक्या मुलाची जबाबदारी एका गरीब, पण कष्टाळू जोडप्यावर सोपवली.—मत्त. १३:५५, ५६; लूक २:२४.

बायबल तत्त्व: “जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्‍वास नाकारला आहे. तो विश्‍वास नसलेल्या माणसापेक्षाही वाईट आहे.”—१ तीम. ५:८.

यहोवाला माहीत आहे, की आईवडिलांचं वय झाल्यावर त्यांना मुलांच्या मदतीची गरज पडू शकते. खरंतर मुलं जेव्हा त्यांच्या वयस्कर आईवडिलांना गरजेच्या गोष्टी पुरवण्याची व्यवस्था करतात, तेव्हा ते त्यांचा आदर करत असल्याचं दाखवतात. (निर्ग. २०:१२; १ तीम. ५:४) पण आपल्या मुलांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करण्याऐवजी, आपण आपल्या मुलांसाठी काय करू शकतो याचा विचार आईवडिलांनी करावा असं यहोवाला वाटतं.—२ करिंथ. १२:१४.

यहोवाबद्दल शिकवावं. मुलांनी यहोवावर प्रेम करावं आणि त्याची उपासना करावी, म्हणून त्यांना योग्य शिक्षण देण्याची जबाबदारीही आईवडिलांवर आहे. आणि ही जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची आहे असं यहोवाला वाटतं.—अनु. ६:६, ७.

बायबल तत्त्व: “[मुलांना] यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवत राहा.”—इफिस. ६:४.

आईवडिलांना आपल्या मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायला कशामुळे मदत होईल?

एक जोडपं एका विषयावर चर्चा करत आहे. त्यांच्या टेबलवर बायबल आहे.

तुम्हाला किती मुलं हवी आहेत याबद्दल आधीच बोला

आधीच योजना बनवा. जर तुम्ही कुटुंब वाढवायची योजना करत असाल, तर तुमच्या परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करा. उदाहरणार्थ, तुम्हाला जर बरीच मुलं झाली, तर तुम्हाला त्या प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याची, कपड्यालत्त्याची आणि शिक्षणाची जबाबदारी पेलता येईल का? जर तसं नसेल, तर किती मुलं होऊ द्यायची याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोला. कारण तुम्हाला प्रत्येक मुलाला यहोवाच्या इच्छेप्रमाणे वाढवावं लागणार आहे. आपण ठरवल्याप्रमाणेच आपल्या जीवनात सगळं घडणार नाही हे यहोवाला माहीत आहे. (उप. ९:११) असं असलं तरी, तुम्ही मुलांना वाढवण्यासाठी जी मेहनत घ्याल त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल.

बायबल तत्त्व: “मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात, पण जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.”—नीति. २१:५.

“तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला एक बुरूज बांधायचा असेल, तर तो आधी बसून खर्चाचा हिशोब लावणार नाही? आणि तो पूर्ण करायची आपली ऐपत आहे की नाही याची खातरी करणार नाही?”—लूक १४:२८.

यहोवाला पहिली जागा द्या. कुटुंबात यहोवाच्या उपासनेला पहिली जागा द्या. तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा. त्यांना सभांमध्ये लक्ष द्यायला आणि त्यांतून शिकायला मदत करा. दर आठवडी कौटुंबिक उपासना करा. मुलांना प्रचार करायला शिकवा. तुमची जबाबदारी तुमच्या मोठ्या मुलांवर किंवा नातेवाइकांवर सोपवू नका. मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते. पण त्यातून मिळणाऱ्‍या आनंदाची तुलना तुम्ही कशाशीच करू शकत नाही.

बायबल तत्त्व: “माझी मुलं सत्याच्या मार्गावर चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही.”—३ योहा. ४.b

यहोवावर भरवसा ठेवा. कुटुंब वाढवण्याबद्दल किंवा मुलांचं संगोपन करण्याबद्दल तुमच्या आजूबाजूच्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. पण त्यांचं ऐकण्यापेक्षा यहोवावर भरवसा ठेवा आणि त्याने दिलेल्या तत्त्वांचं पालन करा.

कोलाज: १. आईवडील आपल्या छोट्या मुलासोबत सभेत एकत्र बसले आहेत. तो मुलगा उत्तर द्यायला हात वर करतोय. २. एक कुटुंब एकत्र मिळून प्रचार करत आहे. त्यांतला पिता आपल्या तरुण मुलीसोबत प्रचार करत आहेत, तर आई दुसऱ्‍या दोन लहान मुलांसोबत प्रचार करत आहे.

मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते

जर तुम्ही जास्त मुलं न होऊ द्यायचं ठरवलं, तरी म्हातारपणात यहोवा तुम्हाला एकटं सोडणार नाही याची खातरी ठेवा. मुलांना “म्हातारपणाची काठी” समजू नका. ‘म्हातारपणात माझं कसं होईल’ अशी चिंता करू नका. कारण यहोवाने तुमची काळजी घ्यायचं वचन दिलंय आणि तो त्याचं वचन कधीच मोडणार नाही.—यहो. २३:१४.

बायबल तत्त्व: “यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव, म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.”—नीति. ३:५, ६.

“मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय, पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं, किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्‍नासाठी भीक मागत असलेलं पाहिलं नाही.”—स्तो. ३७:२५.

“आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.”—मत्त. ६:३३.

खरंच, मुलं यहोवाकडून मिळालेली एक अनमोल भेट आहे. जेव्हा ख्रिस्ती आईवडील यहोवाकडून मिळालेल्या या भेटीची मनापासून काळजी घेतात, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! ते आपल्या मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करतात. ते कुटुंबाचं नियोजन करतात आणि लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऐवजी यहोवाच्या तत्त्वांचं पालन करतात. असं करून ते दाखवतात की त्यांची मुलं त्यांच्यासाठी “यहोवाकडून मिळालेला वारसा” आहेत.

त्यांना जराही पस्तावा नाही

एक पिता त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत कौटुंबिक उपासना करत आहे.

जे आईवडील जास्त मुलं होऊ न द्यायचा निर्णय घेतात, त्यांना खरंच समस्यांना तोंड द्यावं लागतं का? ज्या देशांमधली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्या देशांतल्या लोकांना हा प्रश्‍न पडू शकतो. पण अशाच काही देशांमध्ये राहणारे कुटुंबप्रमुख काय म्हणतात ते पाहा.

तुमच्यावर जास्त मुलं होऊ द्यायचा दबाव आला का?

“हो. मंडळीतूनही आला. एका जोडप्याने आम्हाला म्हटलं, ‘तुम्हाला एकच मुलगा का आहे? आफ्रिकामध्ये असं मानतात, की तुम्हाला जर एक मुलगा असला, तर तुम्हाला एकही मुलगा नाही. आणि जर तुम्हाला दोन मुलं असली, तर याचा अर्थ तुम्हाला एकच मुलगा आहे.’ आमच्या दुसऱ्‍या मुलीच्या जन्मानंतरही आमच्यावरचा हा दबाव कमी झाला नाही.”—जेरेमियस

कुटुंब छोटं ठेवल्यामुळे तुम्हाला काही समस्या आल्या आहेत का?

“अजिबात नाही. उलट आमचं कुटुंब छोटं असल्यामुळे, मला आणि माझ्या बायकोला आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवायला सोपं जातं. इतकंच काय, तर आमच्या प्रत्येकाचं यहोवासोबतचं नातं मजबूत ठेवायलाही आम्हाला मदत झाली. मी एका मोठ्या कुटुंबात लहानाचा मोठा झालो, त्यामुळे आमच्या गरजा पुरवण्यासाठी आणि आमच्या शिक्षणासाठी माझ्या आईवडिलांना किती समस्यांचा सामना करावा लागला हे मी स्वतः पाहिलंय.”—जेरेमियस

तुमच्या निर्णयाबद्दल तुमच्या मुलांना कसं वाटतं?

“ज्या कुटुंबात जास्त मुलं असतात, त्या कुटुंबातल्या मुलांना बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. कारण त्यांच्या आईवडिलांना प्रत्येक मुलाची गरज भागवणं खूप कठीण जातं. पण आमच्या मुलांना मात्र तसं काही सहन करावं लागत नाही. म्हणून ते खूश आहेत.”—फिलिप

“आमची मुलं मोठी होत असताना त्यांना नेहमी प्रेमाची आणि सुरक्षेची जाणीव होत असल्यामुळे ते आनंदी होते. आमच्या घरी यहोवावर प्रेम करणाऱ्‍या भाऊबहिणींची नेहमी ये-जा असायची. त्यांच्यामुळे आम्हाला मदत झाली आणि यहोवाच्या सेवेत चांगली ध्येयं ठेवायचं प्रोत्साहनही मिळालं. आम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे आमची मुलं यहोवाची चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत, हे पाहून आम्हाला खूप छान वाटतं.”—कारलोस

कुटुंब छोटं ठेवल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला?

“आमच्या या निर्णयामुळे आम्हाला कुटुंबाच्या गरजा भागवणं सोपं गेलं. तीन वर्षांआधी माझी चांगल्या पगाराची नोकरी गेली आणि त्यामुळे आमची परिस्थिती अचानक बदलली. पण आमचं कुटुंब छोटं असल्यामुळे आम्हाला या परिस्थितीचा सामना करणं सोपं गेलं. कारण आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला जास्त काही करावं लागलं नाही.”—जेरेमियस

“आमच्या निर्णयामुळे आम्हाला मुलांच्या गरजा तर पुरवता आल्याच, शिवाय त्यांना यहोवासोबत चांगली मैत्री करायलाही मदत करता आली. आमचं कुटुंब छोटं असल्यामुळे आम्हाला गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवाही करता आली. तसंच, आमच्या कोणत्याच मुलाच्या गरजेकडे आमचं दुर्लक्ष झालं नाही. आणि आज आमची सगळी मुलं यहोवाच्या सेवेत चांगली प्रगती करत आहेत.”—लिनादे

तुम्हाला इतर आईवडिलांना काय सांगायला आवडेल?

“स्तोत्र ३४:१० मधले शब्द किती खरे आहेत हे मी अनुभवलंय. तिथे म्हटलंय: ‘यहोवाचा शोध घेणाऱ्‍यांना काहीच कमी पडणार नाही.’ यहोवाने नेहमी मला आणि माझ्या कुटुंबाला लागणाऱ्‍या सगळ्या गोष्टी पुरवल्या आहेत.”—रफेल

a कुटुंब नियोजन करणं हा नवरा-बायकोचा निर्णय आहे. आणि कोणीही त्यांच्या निर्णयाची टीका करू नये. आपल्याला किती मुलं हवी, केव्हा हवी आणि गर्भनिरोधक साधनं वापरायची की नाही, हे ते स्वतः ठरवतील. पण गर्भपात व्हावा या हेतूने ते कोणत्याही प्रकारची औषधं वापरणार नाहीत. (रोम. १४:४, १०-१३) तसंच, ख्रिस्ती जोडप्यांनी, १ करिंथकर ७:३-५ मध्ये दिलेला सल्लाही लागू केला पाहिजे.

b योहानने ज्या भाऊबहिणींना सत्य शिकायला मदत केली, त्यांना तो या वचनात “मुलं” म्हणतो. मुलांना यहोवाची सेवा करताना पाहून आईवडिलांनाही योहानसारखंच वाटतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा