२७ एप्रिल-३ मे, २०२६
गीत ९९ लाखो आपण भाऊबहिणी
बाप्तिस्म्यानंतर येणाऱ्या समस्यांचा सामना करायला तयार असा
“माझी पावलं तुझ्याच मार्गांवर राहू दे.”—स्तो. १७:५.
या लेखात:
नवीनच बाप्तिस्मा झालेले भाऊबहीण पुढे येणाऱ्या समस्यांसाठी कसे तयार राहू शकतात ते पाहा.
१-२. बाप्तिस्म्यानंतर येणाऱ्या समस्यांसाठी तयार राहायला आपण काय करू शकतो? उदाहरण द्या.
आपल्याला माहीत आहे, की सैतानाच्या या जगात आपल्यावर समस्या तर येतीलच. म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “अडखळणं तर नक्कीच येतील.” (मत्त. १८:७) त्यामुळे आपला विश्वास कमजोर होऊ शकतो. कदाचित आपल्या भाऊबहिणींसोबत आपले मतभेद होतील किंवा इतर काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण जर आपण आधीच तयार असलो, तर आपल्याला यहोवाच्या जवळ राहायला मदत होईल.
२ एका उदाहरणाचा विचार करा. आपल्याला वारंवार मंडळीमध्ये नैसर्गिक विपत्तींसाठी तयार राहण्याबद्दल सूचना मिळतात. मग आपण त्यासाठी तयारी कशी करू शकतो? सर्वात आधी, आपल्या भागात कोणत्या नैसर्गिक विपत्ती येऊ शकतात याचा आपण विचार करतो. आपण राहत असलेलं ठिकाण आपल्यासाठी जर नवीन असेल, तर खासकरून हे करणं खूप गरजेचंय. आपल्या भागत कोणत्या विपत्ती येऊ शकतात हे आपल्याला माहीत असलं, तर विपत्ती आपल्यावर सुरक्षीत राहण्यासाठी कोणती पावलं उचलायची हे आपल्याला कळेल. (नीति. २१:५) त्याच प्रकारे, बाप्तिस्म्यानंतर आपल्यावर कोणत्या समस्या येऊ शकतात हे जर आपल्याला माहीत असेल, तर समस्या आल्यावर नेमकं काय करायचं हेसुद्धा आपल्याला कळेल. यामुळे आपल्याला समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करता येईल आणि यहोवासोबतचं नातं मजबूत ठेवता येईल. (स्तो. १७:५) म्हणूनच, आपण या लेखामध्ये बाप्तिस्म्यानंतर आपल्यावर कोणत्या तीन समस्या येऊ शकतात हे पाहणार आहोत. त्यासोबतच त्यांसाठी तयार राहायला आपण काय करू शकतो हेही पाहणार आहोत.a
कदाचित भाऊबहीण तुमचं मन दुखावतील
३. बाप्तिस्म्यानंतर आपल्याला कोणत्या समस्येचा सामना करावा लागू शकतो?
३ तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सभेला आला होता, तेव्हा यहोवाच्या लोकांमधलं प्रेम पाहून तुम्हाला कसं वाटलं होतं हे तुम्हाला आठवतंय का? भाऊबहिणींमधलं प्रेम पाहून हेच सत्य आहे याची तुम्हाला खातरी पटली असेल. (योहा. १३:३५; कलस्सै. ३:१२) आपली बहीण ब्लॅन्काb हिलासुद्धा असंच वाटलं होतं. पण तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिने अपेक्षाही केली नव्हती असं काहीतरी घडलं. ती म्हणते: “एक बहीण माझ्याशी खूप वाईट वागली. तसंच ती मंडळीतल्या इतर भाऊबहिणींबद्दलही वाईटसाईट बोलायची. याचं मला खूप आश्चर्य वाटलं. कारण मी बायबल अभ्यासातून आणि सभांमधून हेच शिकले होते, की यहोवाचे साक्षीदार नेहमी इतरांशी शांतीने आणि प्रेमाने वागायचा प्रयत्न करतात.” हे खरंय, की यहोवाचे लोक त्याच्यासारखे गुण वाढवण्यासाठी शक्य ते सगळं करतात. पण अपरिपूर्णतेमुळे त्यांच्याकडून कधीकधी चुका होतात. (इफिस. ४:२३, २४; १ योहा. १:८) म्हणून काही वेळा भाऊबहिणींच्या वागण्या-बोलण्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं. (याको. ३:८) आणि दुःखाची गोष्ट म्हणजे यामुळे काहींनी यहोवाची सेवा करायचंच सोडून दिलंय.
४. भाऊबहिणींनी तुमचं मन दुखावल्यावर तुमचा विश्वास कमजोर पडू नये म्हणून तुम्ही आताच काय करू शकतो? (इफिसकर ४:३२)
४ ब्लॅन्कासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. मग त्यासाठी तयार राहायला तुम्ही काय करू शकतो? तुम्ही इफिसकर ४:३२ (वाचा.) मधला सल्ला लागू करायची स्वतःला सवय लावू शकता. जर तुम्ही नेहमी इतरांशी प्रेमाने आणि दयेने वागायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला बऱ्याच समस्या टाळता येतील. तसंच, इतरांकडून चूक होते तेव्हा त्यांना मनापासून माफ करायचंसुद्धा तुम्ही ध्येय ठेवू शकता. पण असं करायला तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते? तुम्ही यहोवाकडे क्षमेसाठी किती वेळा विनंती करता आणि तो तुम्हाला किती वेळा मोठ्या मनाने माफ करतो, याचा तुम्ही विचार करू शकता. (मत्त. ६:१२) माफ करण्याच्या बाबतीत यहोवा किती उदार आहे यावर विचार केल्यामुळे तुम्हालाही इतरांना माफ करायला सोपं जाईल.
५. एखादी व्यक्ती आपलं मन दुखावते तेव्हा कोणत्या बायबल तत्त्वामुळे आपल्याला मदत होऊ शकते? (नीतिवचनं १९:११) (चित्रंसुद्धा पाहा.)
५ नीतिवचनं १९:११ वाचा. बायबल म्हणतं, की जर कोणी आपलं मन दुखावलं तर सखोल समजc आपला राग शांत करायला आपल्याला मदत करू शकते. या तत्त्वामुळे रीमाला खूप मदत झाली. तिचा बाप्तिस्मा होऊन काही वर्षं झाली आहेत. ती म्हणते: “भाऊबहीण माझं मन दुखावतात किंवा मला वाईट वाटेल असं वागतात, तेव्हा मी नीतिवचनं १९:११ हे वचन आठवते. मी त्यांच्या परिस्थितीचा, त्यांच्या पार्श्वभूमीचा आणि ते अशा प्रकारे का वागले असतील याचा विचार करते. तसंच मी त्यांच्यासोबत प्रचारालाही जाते. असं केल्यामुळे मला त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येतं.” हा खरंच खूप चांगला सल्ला आहे. आपण आताच आपल्या भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. आपण त्यांना जितकं चांगलं ओळखू, तितकं आपल्याला त्यांना माफ करणं सोपं जाईल.
ज्या भावासोबत किंवा बहिणीसोबत तुमचे मतभेद झाले असतील त्यांच्यासोबत तुम्ही प्रचार करू शकता (परिच्छेद ५ पाहा)
६. भाऊबहिणींसोबत चांगलं नातं जोडायला तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
६ तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींमुळे मदत होऊ शकते? भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे जाणून घेत असताना त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. (नीतिवचनं १०:१२ सोबत तुलना करा; रोम. १२:१०; फिलिप्पै. २:२, ३) अलीकडेच बाप्तिस्मा झालेल्या मार्कला यामुळे कशी मदत झाली याचा विचार करा. तो भाऊबहिणींसोबत जास्त वेळ घालवू लागला तेव्हा त्याला त्यांच्या चुका जास्त प्रमाणात दिसू लागल्या. मग मार्कला यहोवाच्या आणि भाऊबहिणींच्या जवळ राहायला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो: “मला जाणवलं, की जगातले लोक तर खूप गंभीर पापं करतात. पण त्या मानाने भाऊबहिणींच्या चुका मात्र खूप क्षुल्लक आहेत. मला समजलं, की मी भाऊबहिणींच्या छोट्यामोठ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणून मी त्यांच्या चांगल्या गुणांचा विचार करू लागलो.” जर तुम्हीही असंच केलं तर तुम्हालासुद्धा भाऊबहिणींसोबत चांगलं नातं जोडायला मदत होईल.
कदाचित तुम्ही सोडून दिलेल्या गोष्टी तुम्हाला आठवतील
७. आधी सोडून दिलेल्या गोष्टींची आपल्याला आठवण का येऊ शकते?
७ जेव्हा तुम्ही सैतानाचं जग सोडलं आणि यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनला, तेव्हा तुम्हाला नक्कीच खूप आनंद झाला असेल यात काही शंका नाही. तुम्ही कदाचित विचार कराल: ‘एखाद्याला आधी सोडून दिलेल्या गोष्टींची आठवण कशी येऊ शकते?’ पण एखादी कठीण समस्या येते, तेव्हा आधी सोडून दिलेल्या गोष्टींची आपल्याला आठवण येऊ शकते आणि पुन्हा त्या गोष्टी करायची इच्छा होऊ शकते. (गणना ११:४-६ सोबत तुलना करा.) उदाहरणार्थ, काही भाऊबहिणींनी यहोवाच्या सेवेसाठी त्यांचं मोठं करिअर आणि प्रसिद्धी सोडून दिली आहे. काहींनी बायबल अभ्यास केल्यामुळे त्यांच्या जवळच्या मित्रांसोबतचं त्यांचं नातं तुटलंय. तर काहींनी यहोवाला खूश करण्यासाठी त्यांच्या चुकीच्या सवयी आणि व्यसनं सोडून दिली आहेत. जर एखाद्या भावाने किंवा बहिणीने पुन्हा त्या गोष्टी केल्या, तर यहोवाला किती वाईट वाटेल याचा विचार करा. मग तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?
८. अब्राहाम आणि साराच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
८ बायबलमध्ये आपल्याला अशा काही लोकांबद्दल वाचायला मिळतं, ज्यांनी यहोवासाठी काही गोष्टी सोडून दिल्या. त्यांनाही आधी सोडून दिलेल्या गोष्टींची आठवण होऊ शकली असती. अब्राहाम आणि साराचंच उदाहरण घ्या. ते आधी ऊर नावाच्या शहरात राहायचे. ते शहर खूप सुंदर होतं आणि मजबूत भिंतींनी वेढलेलं होतं. पण यहोवाची आज्ञा पाळण्यासाठी त्यांनी ते शहर सोडलं आणि साधं जीवन जगू लागले. (इब्री ११:८, ९) कदाचित त्यांना त्यांच्या आधीच्या जीवनाची कधीकधी आठवण येत असेल. पण जर अब्राहाम आणि सारा ऊर मधल्या सुखसुविधांची “सतत आठवण करत राहिले असते” आणि त्या गोष्टी आता आपल्याकडे असाव्यात अशी इच्छा बाळगत राहिले असते, तर त्यांनी पुन्हा तिथे जाण्याचा निर्णय घेतला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट, यहोवाने त्यांना भविष्यासाठी जे वचन दिलं होतं त्याचा ते विचार करत राहिले.—इब्री ११:१५, १६.
९. पौलने ज्या गोष्टी सोडून दिल्या होत्या त्यांबद्दल त्याला कसं वाटायचं? (फिलिप्पैकर ३:७, ८, १३)
९ प्रेषित पौलनेही यहोवाच्या सेवेसाठी काही गोष्टी सोडून दिल्या होत्या. ख्रिस्ती बनण्याआधी त्याने गमलियेल नावाच्या सुप्रसिद्ध शिक्षकाकडून यहुदी नियमशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. (प्रे. कार्यं २२:३) त्यामुळे तो पुढे यहुदी लोकांचा पुढारी होऊ शकला असता आणि त्याला समाजात मानाचं स्थान मिळालं असतं. (गलती. १:१३, १४) पण आनंदाच्या संदेशासाठी त्याने या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. ख्रिस्ती बनल्यानंतर त्याचं जीवन काही सोपं नव्हतं. त्याला बऱ्याचदा मारहाण झाली, तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्याच्या लोकांनीच त्याला वाईट वागणूक दिली. (२ करिंथ. ११:२३-२६) जर पौल फक्त त्याच्या समस्यांचा विचार करत बसला असता आणि त्याच्या सध्याच्या परिस्थितीची तुलना त्याच्या आधीच्या जीवनाशी करत राहिला असता, तर आपण ख्रिस्ती बनून चूक केली आहे असा तो विचार करू लागला असता. पण पौलने असं केलं नाही. उलट, त्याला येशूचा शिष्य बनण्याचा जो सुहक्क मिळाला होता आणि भविष्यात त्याला जे आशीर्वाद मिळणार होते त्याचा त्याने विचार केला. त्याने ज्या गोष्टी सोडल्या होत्या त्याचा त्याला जराही पस्तावा नव्हता.—फिलिप्पैकर ३:७, ८, १३ वाचा.
१०. आपण कोणत्या गोष्टींचा नेहमी विचार केला पाहिजे? (मार्क १०:२९, ३०) (चित्रंसुद्धा पाहा.)
१० मग आपण का शिकू शकतो? ख्रिस्ती बनण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी सोडून दिल्या आहेत त्याची तुम्हाला कदाचित आठवण येऊ शकते. पण असं झालं, तर तुम्ही त्या गोष्टी का सोडल्या हेसुद्धा आठवा. (उप. ७:१०) तुम्ही सोडून दिलेल्या गोष्टींची तुलना, सत्यात आल्यामुळे तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांशी करा. सत्य शिकल्यामुळे तुम्हाला विश्वातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीशी, म्हणजे यहोवाशी मैत्री करता आली. (नीति. ३:३२) तुम्हाला प्रेमळ भाऊबहीण मिळाले. (मार्क १०:२९, ३० वाचा.) आणि भविष्यासाठी एक सुंदर आशाही मिळाली. (यश. ६५:२१-२३) यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांचा तुम्ही नेहमी विचार करत राहिलात, तर तुम्हाला आधी सोडून दिलेल्या गोष्टींची आठवण होणार नाही.
आधी सोडून दिलेल्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी आपण यहोवाने आपल्यावर सोपवलेलं प्रचाराचं काम आनंदाने करू शकतो (परिच्छेद १० पाहा) e
११. रोजमेरीकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
११ रोजमेरी नावाची बहीण जवळपास ५० वर्षांची असताना तिचा बाप्तिस्मा झाला. सत्यात येण्यासाठी तिने काही गोष्टी सोडून दिल्या. पण त्या गोष्टींची तिला आठवण होऊ नये म्हणून तिने काय केलं याचा विचार करा. ती म्हणते: “सुरुवातीला मला ख्रिस्मस आल्यावर खूप वाईट वाटायचं. कारण मी आणि माझं कुटुंब हा सण खूप थाटामाटत साजरा करायचो. आम्ही सगळे त्या वेळी सोबत असायचो. मी सगळ्यांना गिफ्ट द्यायचे. त्यांना गिफ्ट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप छान वाटायचं.” मग तिला कशामुळे मदत झाली? ती म्हणते: “मी इतर वेळी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवते. मी दर वर्षी एका वेगळ्या दिवशी, माझ्या कुटुंबातल्या लोकांना बोलावते आणि त्यांना गिफ्ट देते. तसंच माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हेसुद्धा मी त्यांना सांगते.” पण या बहिणीला आणखी एका समस्येचा सामना करावा लागला. ती म्हणते: “सत्य शिकल्यामुळे माझ्या जवळच्या मैत्रिणी मला सोडून गेल्या. त्यामुळे मला कधीकधी त्यांची खूप आठवण यायची आणि एकटं पडल्यासारखं वाटायचं.”d मग या बहिणीने काय केलं? ती वेगवेगळ्या बहिणींसोबत प्रचाराला जाऊ लागली. ती म्हणते: “असं केल्यामुळे मला नवीन मैत्रिणी बनवता आल्या. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्यांची खूप कदर आहे.” खरंच, या बहिणीकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. कदाचित, तुम्ही यहोवासाठी अशा काही गोष्टी सोडून दिल्या असतील, ज्यांमुळे तुम्हाला खूप आनंद व्हायचा. पण लक्षात असू द्या, तुम्हाला आता त्यापेक्षाही चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि त्यांमुळे तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकता. (फिलिप्पै. ४:८, ९) तसंच, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: तुम्ही यहोवासाठी ज्या गोष्टी सोडून दिल्या आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गोष्टी यहोवाने तुम्हाला दिल्या आहेत.
कदाचित इतर जण सत्य सोडतील
१२. कधीकधी मंडळीत असं काय घडतं ज्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटू शकतं?
१२ हे दुष्ट जग सोडून तुम्ही यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनला तेव्हा तुम्हाला नक्कीच खूप आनंद झाला असेल. कारण यहोवाच्या कुटुंबात सगळे सत्याच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतात आणि इतरांनाही तसं करायला मदत करतात. (यश. ६५:१४) पण असं असलं तरी, काही वेळा मंडळीतली एखादी व्यक्ती गंभीर पाप करते. आणि जर त्या व्यक्तीने पश्चात्ताप केला नाही, तर तिला मंडळीतून काढूनही टाकलं जातं. (१ करिंथ. ५:१३) आपली बहीण समर हिच्या मंडळीत अशी घटना घडली तेव्हा तिला कसं वाटलं याचा विचार करा. ती म्हणते: “माझा बाप्तिस्मा झाल्याच्या काही काळानंतरच, आमच्या मंडळीतल्या एका वडिलांनी गंभीर पाप केलं आणि त्यांना मंडळीतून काढून टाकण्यात आलं. हे घडलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. एक वडील यहोवाविरूद्ध आणि मंडळीविरूद्ध पाप कसं करू शकतात असं मला वाटलं.” हे खरं आहे, की आपल्या भाऊबहिणींचं यहोवावर प्रेम आहे आणि त्यांना त्याच्या जवळ राहण्याची इच्छा आहे यावर आपण भरवसा ठेवतो. (१ करिंथ. १३:४, ७) पण असं असलं तरी, दरवर्षी काही लोकांना मंडळीतून काढून टाकलं जातं. आणि जर ती व्यक्ती आपल्या जवळची असली किंवा आपण तिला खूप मानत असलो, तर आपल्याला खूप वाईट वाटू शकतं.
१३. आपली जवळची एखादी व्यक्ती यहोवाला सोडून गेली, तर आपला विश्वास कमजोर होऊ नये म्हणून आपण आता काय करू शकतो?
१३ आपली जवळची एखादी व्यक्ती यहोवाला सोडून गेली, तर आपला विश्वास कमजोर होऊ नये म्हणून आपण आता काय करू शकतो? आपण यहोवासोबतचं आपलं नातं नेहमी मजबूत ठेवू शकतो. (याको. ४:८) हे नातं दुसऱ्यांच्या विश्वासावर अवलंबून नसलं पाहिजे. हे खरंय, की आपण कुटुंबात आणि मंडळीत सोबत मिळून यहोवाची उपासना करतो. पण असं असली तरी, आपण स्वतःसुद्धा दररोज प्रार्थना केली पाहिजे आणि बायबल वाचलं पाहिजे.—स्तो. १:२; ६२:८.
१४. आपण प्रेषित पेत्रच्या उदाहरणातून काय शिकू शकतो? (योहा. ६:६६-६८)
१४ याबद्दल प्रेषित पेत्रच्या उदाहरणातूनही आपल्याला मदत होऊ शकते. एकदा असं झालं, की येशूचे बरेच शिष्य त्याला सोडून गेले. कारण त्याने शिकवलेल्या गोष्टी त्यांना समजल्या नाहीत. पेत्रलासुद्धा त्या गोष्टी समजल्या नसतील, तरीसुद्धा तो विश्वासू राहिला. (योहान ६:६६-६८ वाचा.) इतर शिष्य काय करत आहेत याकडे पेत्रने लक्ष दिलं नाही. उलट, येशूकडून त्याला जे सत्य शिकायला मिळालं होतं, त्याचा त्याने विचार केला. म्हणूनच येशूने शिकवलेल्या काही गोष्टी त्याला समजल्या नसल्या, तरी त्याचा विश्वास डगमगला नाही. त्याच प्रकारे, आज जरी काही लोकांनी सत्य सोडून दिलं, तरी यहोवा याच संघटनेचा वापर करून आपल्याला सत्य शिकवतोय हे आपण विसरू नये. संघटनेकडून आपल्याला जी सत्य समजली आहेत त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे आणि नेहमी यहोवाला विश्वासू राहिलं पाहिजे. आधी उल्लेख केलेली समर म्हणते: “मी स्वतःला नेहमी या गोष्टीची आठवण करून देते, की एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यावरून मंडळीतली किंवा संघटनेतली प्रत्येक व्यक्ती चुकीची आहे असं सिद्ध होत नाही. तसंच, याचा अर्थ असाही होत नाही, की यहोवामध्ये काही कमतरता आहेत. उलट, तो खूप चांगला देव आहे.”
१५. तुम्हाला एमिलीच्या उदाहरणातून काय शिकायला मिळालं?
१५ एमिलीच्या उदाहरणाचा विचार करा. तिच्या बाप्तिस्म्याच्या एका आठवड्यानंतरच तिची आई तिला आणि तिच्या कुटुंबाला सोडून गेली आणि तिला मंडळीतून काढून टाकण्यात आलं. एमिली म्हणते: “असं होईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात कठीण दिवस होते. मला माझ्या आईची खूप आठवण येते.” मग एमिलीला कशामुळे मदत झाली? ती म्हणते: “मी एकटी नाही. माझे वडील आणि संपूर्ण मंडळी माझ्यासोबत आहे. माझी मंडळी माझं कुटुंबच आहे! मंडळीतल्या प्रत्येकाला काही न् काही समस्या आहेत. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करणं आणि एकमेकांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचंय.” (१ पेत्र ५:९) भाऊबहिणींसोबतचं नातं मजबूत करण्यासाठी आपल्याला समस्या येईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. आपण आताच आपल्या भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. जर आपण असं केलं, तर आपल्याला कधीच एकटं वाटणार नाही.
१६. आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
१६ नेहमी लक्षात असू द्या, यहोवा ज्याच्यावर प्रेम करतो त्यांनाच शिस्त लावतो. (इब्री १२:६) मंडळीतून काढून टाकलेल्या प्रत्येकाने पुन्हा त्याच्याकडे यावं असं त्याला वाटतं. (२ पेत्र ३:९) जर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला मंडळीतून काढून टाकण्यात आलं असेल, तर तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की त्यांना यहोवाकडे परत आणण्यासाठी वडील शक्य ते सगळं करतील.—२ तीम. २:२४, २५.
जर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला मंडळीतून काढून टाकण्यात आलं असेल, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, की त्यांना यहोवाकडे परत यायला मदत करायची वडिलांची इच्छा आहे (परिच्छेद १६ पाहा) f
१७. आपण कशाची खातरी ठेवू शकतो?
१७ या लेखात आपण बाप्तिस्म्यानंतर येणाऱ्या फक्त काही समस्यांचा विचार केला. पण कोणतीही समस्या आली तरी आपण यहोवाला विश्वासू राहू शकतो आणि समस्यांना तोंड द्यायची आताच तयारी करू शकतो. आपण हे कधीच विसरू नये, की यहोवा नेहमी आपल्यासोबत आहे. तो आपल्याला आतापर्यंत मदत करत आला आहे आणि पुढेही करेल याची आपण खातरी ठेवू शकतो! (१ पेत्र ५:१०) समस्यांचा सामना करण्यासाठी लागणारं बळ आणि धीर तो आपल्याला नक्की देईल. जर आपण यहोवाची मदत घेत राहिलो, तर कोणतीही समस्या आली तरी आपण त्याच्या जवळ राहू शकतो.—स्तो. ११९:१६५; रोम. ८:३८, ३९.
गीत १५४ अनंत प्रेम
a हा लेख जरी नुकताच बाप्तिस्मा झालेल्यांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला असला, तरी याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होऊ शकतो.
b नावं बदलण्यात आली आहेत.
c सखोल समज असल्यामुळे आपण लगेच रागावणार नाही. उलट, एखादी व्यक्ती असं का वागली किंवा बोलली असेल याचा आपण विचार करू. असं केल्यामुळे आपल्याला शांत राहायला आणि भाऊबहिणींना माफ करायला मदत होईल.
d फक्त बायबल अभ्यास घेणाऱ्यांनीच नाही, तर आपण सगळ्यांनीच बायबल विद्यार्थ्यांना आणि नवीनच बाप्तिस्मा झालेल्यांना मदत केली पाहिजे आणि प्रेम दाखवलं पाहिजे. मार्च २०२१ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या “विद्यार्थ्याला प्रगती करायला सगळेच मदत करू शकतात” या लेखाचे परिच्छेद १५ आणि १६ पाहा.
e चित्राचं वर्णन: प्रचारात असताना एक बहीण काही मुलींना एक खेळ खेळताना पाहते. पूर्वी तीसुद्धा तो खेळ खेळत असल्याचं तिला आठवतं. नंतर ती बहीण कदाचित तिच्या पूर्वीच्या टीममधल्या एका मुलीला साक्ष देते.
f चित्राचं वर्णन: दोन वडील मंडळीतून काढून टाकलेल्या एका व्यक्तीला भेटायला गेले आहेत आणि त्याला यहोवाकडे परत यायचं प्रोत्साहन देत आहेत.