वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 फेब्रुवारी पृ. ८-१३
  • बाप्तिस्म्याचा अर्थ समजून घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बाप्तिस्म्याचा अर्थ समजून घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाप्तिस्मा म्हणजे का?
  • बाप्तिस्मा कसा घेतला जातो
  • “पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने”
  • बाप्तिस्मा—एक महत्त्वाचं ध्येय!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ
    उपासनेतील ऐक्य
  • बाप्तिस्मा—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • बाप्तिस्मा म्हणजे काय?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 फेब्रुवारी पृ. ८-१३

१३-१९ एप्रिल, २०२६

गीत ५२ ख्रिस्ती समर्पण

बाप्तिस्म्याचा अर्थ समजून घ्या

“लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या.”—मत्त. २८:१९.

या लेखात:

बाप्तिस्मा म्हणजे काय, तो घेणं का महत्त्वाचंय आणि तो कसा घेतला जातो ते पाहा.

१. बाप्तिस्म्याची शिकवण आपल्या मुलभूत शिकवणींपैकी एक आहे असं का म्हणता येईल?

बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेतात तेव्हा आपल्याला खरंच किती आनंद होतो, नाही का? इ. स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट च्या दिवशी जेव्हा बऱ्‍याच लोकांनी बाप्तिस्मा घेतला, तेव्हा सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनासुद्धा खूप आनंद झाला. त्या दिवशी प्रेषित पेत्रने एक भाषण दिलं आणि बाप्तिस्म्याचं महत्व समजावून सांगितलं. (प्रे. कार्यं २:३८, ४०, ४१) काही वर्षांनंतर प्रेषित पौलने म्हटलं, की ‘बाप्तिस्म्याची शिकवण, ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींपैकी’ एक आहे. (इब्री ६:१, २) पण बाप्तिस्म्याची शिकवण आपल्या मुलभूत शिकवणींपैकी एक असली, तरी आपण त्याबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेणं खूप गरजेचंय. असं का म्हणता येईल?

२. आपल्याला बाप्तिस्म्याबद्दल चांगली समज असणं का गरजेचंय?

२ घराचा पाया जर भक्कम असला, तर घरसुद्धा मजबूत उभं राहतं. त्याच प्रकारे, बाप्तिस्म्याबद्दल आपल्याला चांगली समज असेल तर आपला विश्‍वासही मजबूत होऊ शकतो. आपण बाप्तिस्मा घेण्याच्या दिशेने प्रगती करत असलो, किंवा आपल्या बाप्तिस्म्याला बरीच वर्षं झाली असली, तरी आपल्या सगळ्यांनाच त्याबद्दल चांगली समज असणं खूप गरजेचंय. म्हणूनच आपण या लेखात पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करू: बाप्तिस्मा म्हणजे काय? तो कसा घेतला जातो? आणि पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचंय?

बाप्तिस्मा म्हणजे का?

३. बाप्तिस्मा म्हणजे काय?

३ आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आपण जाहीरपणे दाखवतो, की (१) आपण यहोवा आणि येशूबद्दलचं सत्य शिकून त्यावर विश्‍वास ठेवलाय, (२) आपण आपल्या पापांचा पश्‍चात्ताप केलाय, (३) यहोवाच्या सेवेसाठी आपण आपल्या जीवनात बदल केले आहेत, (४) तारण येशूमुळेच शक्य असल्याचं आपण मान्य केलंय, आणि (५) यहोवाला प्रार्थनेत असं वचन दिलंय, की आपण त्याच्या संघटनेसोबत मिळून त्याची इच्छा पूर्ण करू. आपण जेव्हा यहोवाला असं वचन देऊन आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आपण कायमच्या जीवनाच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो.

४. पाण्यात पूर्णपणे बुडणं कशाला सूचित करतं? (चित्रसुद्धा पाहा.)

४ बाप्तिस्म्याच्या वेळी एका व्यक्‍तीला पाण्यात पूर्णपणे बुडवलं जातं आणि बाहेर काढलं जातं.a जणू काय त्या व्यक्‍तीचा मृत्यू होऊन तिला पुरण्यात आलं आणि पुन्हा जिवंत करण्यात आलं. (कलस्सैकर २:१२ सोबत तुलना करा.) जेव्हा एका व्यक्‍तीला पाण्यात बुडवलं जातं, तेव्हा जणू काय तिने तिचं जुनं व्यक्‍तिमत्त्व सोडून दिलंय. आणि जेव्हा ती पाण्यातून बाहेर येते, तेव्हा ती यहोवाच्या इच्छेप्रमाणे असलेलं नवीन जीवन जगू लागते.

कोलाज: बऱ्‍याच चुकीच्या सवयी सोडून एक माणूस बाप्तिस्मा घेतोय. १. तो टी.व्ही. वर बाक्सींग मॅच बघतोय. २. तो सिगारेट ओढतोय. ३. तो खूप दारू पितोय. ४. नंतर तो बाप्तिस्मा घेतोय.

जेव्हा आपला बाप्तिस्मा होतो तेव्हा आपण आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व सोडून यहोवाच्या इच्छेप्रमाणे असलेलं नवीन जीवन जगू लागतो (परिच्छेद ४ पाहा)


५. बाप्तिस्मा घेण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याची तुलना आपण कशाशी करू शकतो, आणि का? (१ पेत्र ३:१८-२१)

५ १ पेत्र ३:१८-२१ वाचा. जर तुम्ही आताच यहोवाबद्दल शिकायला सुरुवात केली असेल तर तुम्ही कदाचित म्हणाल, ‘मला कधी बाप्तिस्मा घ्यायला जमेल की नाही माहीत नाही.’ नोहाला यहोवाने जहाज बांधायला सांगितलं तेव्हा त्यालाही कदाचित असंच वाटलं असेल. पण नोहाने मेहनत घेतली, देवाच्या सूचना पाळल्या, त्याच्यावर विश्‍वास ठेवला आणि म्हणून तो जहाज बांधू शकला आणि स्वतःचा जीव वाचवू शकला. या कामात यहोवाही त्याच्यासोबत होता. नोहासारखंच तुम्हीही मेहनत घेतली, यहोवावर विश्‍वास ठेवला आणि त्याच्या सगळ्या आज्ञा पाळल्या तर तुम्हालाही बाप्तिस्म्याचं तुमचं ध्येय गाठता येईल.—उत्प. ६:२२.

६. बाप्तिस्मा आपल्याला कसं वाचवतो?

६ १ पेत्र ३:२१ या वचनात प्रेषित पेत्रने म्हटलं, की बाप्तिस्मा ‘आपल्याला वाचवतो.’ पण आपला जीव वाचवायला आणि पापांची क्षमा मिळवायला फक्‍त बाप्तिस्मा घेणंच पुरेसं आहे का? बायबल म्हणतं, फक्‍त येशूचं रक्‍तच आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करू शकतं. (१ योहा. १:७) असं असलं तरी, आपण बाप्तिस्मा घेणं खूप गरजेचंय. कारण यहोवाने आपल्याला असं करायची आज्ञा दिली आहे. तसंच, बाप्तिस्म्यामुळे आपल्याला यहोवाकडे “एका शुद्ध विवेकाची विनंती करणं” शक्य होतं. त्यामुळे यहोवा येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्या पापांना माफ करतो आणि आपल्याला सर्वकाळ जगायची आशा देतो. म्हणूनच आपण म्हणू शकतो, की बाप्तिस्मा आपल्याला वाचवतो.

बाप्तिस्मा कसा घेतला जातो

७. बाप्तिस्मा कसा दिला जातो?

७ बाप्तिस्मा पाण्यात बुडून घेतला जातो, याशिवाय त्याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही. असं असलं तरी, बाप्तिस्म्याच्या दिवशी बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांनी कसा पेहराव करावा आणि तिथे उपस्थित असलेल्यांनी कसं वागावं याबद्दल बायबलची काही तत्त्वं आपल्याला मदत करतात. (१ करिंथ. १४:४०; १ तीम. २:९) सहसा बाप्तिस्मा देण्याचं काम वडील करतात. पण यामुळे ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत असा याचा अर्थ होत नाही. (१ करिंथ. १:१४, १५) तसंच, बाप्तिस्मा जास्त लोकांसमोर किंवा थोड्या लोकांसमोरही दिला जाऊ शकतो.—प्रे. कार्यं ८:३६.

८. बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना कोणते प्रश्‍न विचारले जातात आणि का? (प्रेषितांची कार्यं २:३८-४२) (चित्रसुद्धा पाहा.)

८ आपण ‘तोंडाने विश्‍वास जाहीर केला’ पाहिजे, असं बायबल म्हणतं. (रोम. १०:९, १०) पौलने म्हटलं, की आपला विश्‍वास फक्‍त मनात ठेवणं पुरेसं नाही, तर तो तोंडाने जाहीर करणंही गरजेचंय. कारण यामुळेच तारण शक्य आहे. हे खरंय, की आपण प्रचार करतो तेव्हा आपला विश्‍वास तोंडाने जाहीर करतो. पण खासकरून बाप्तिस्म्याच्या दिवशी असं करणं खूप गरजेचंय. म्हणूनच त्या दिवशी, बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना दोन प्रश्‍न विचारले जातात. पहिला म्हणजे: “तुम्ही तुमच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून यहोवा देवाला तुमचं जीवन समर्पित केलं आहे का, आणि यहोवा देव येशू ख्रिस्ताद्वारे सर्वांचं तारण करणार आहे या गोष्टीचा स्वीकार केला आहे का?” या प्रश्‍नावरून समजतं, की बाप्तिस्मा घेणाऱ्‍याने बाप्तिस्म्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत. पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्रने जे भाषण दिलं होतं, त्यात तो असंच काहीसं बोलला होता. दुसरा प्रश्‍न म्हणजे: “बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला एक यहोवाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाईल आणि तुम्ही यहोवाच्या संघटनेचा भाग बनाल याची तुम्हाला जाणीव आहे का?” या प्रश्‍नावरून आपल्याला जाणवतं, की आपण आपल्या समर्पणाच्या वचनाप्रमाणे जगलं पाहिजे आणि यहोवाच्या संघटनेसोबत आणि आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून यहोवाची सेवा केली पाहिजे. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनीही असंच केलं होतं. (प्रेषितांची कार्यं २:३८-४२ वाचा.) या प्रश्‍नांची ‘हो’ अशी उत्तरं दिल्यामुळे एक व्यक्‍ती बाप्तिस्म्यासाठी तयार असल्याचं दाखवते.

एका संमेलनात वेगवेगळ्या वयाचे भाऊबहीण समोरच्या रांगेत उभे राहून बाप्तिस्म्यासाठी आपल्या तोंडाने विश्‍वास जाहीर करत आहेत.

बाप्तिस्मा घेताना आपण ‘तोंडाने विश्‍वास जाहीर करतो’ (परिच्छेद ८ पाहा) d


९. यहोवासोबत चांगलं नातं जोडण्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत?

९ सत्य शिकण्याआधी कदाचित आपण चांगलं जीवन जगलो असू. आपण कोणतंही गंभीर पाप केलं नसेल. किंवा कदाचित आपण सत्यात लहानाचे मोठे झालो असू. पण तरीही आपण पश्‍चात्ताप करून बाप्तिस्मा घेणं गरजेचंय का? हो नक्कीच. कारण आपण सगळेच जन्मापासूनच पापी आहोत आणि त्यामुळे देवापासून दूर आहोत. (स्तो. ५१:५) पण आपण जेव्हा यहोवाबद्दल शिकू लागतो, तेव्हा आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा त्याच्या इच्छेला जास्त महत्त्व देतो. त्यानंतर आपण आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करतो आणि तो मार्ग सोडून देतो. मग आपण यहोवाला आवडेल असं जीवन जगू लागतो. त्यानंतर आपण बाप्तिस्मा घेऊ शकतो.—प्रे. कार्यं ३:१९.

१०. पूर्वी तुमचा बाप्तिस्मा झाला असला तरी तुम्हाला काय करायची गरज आहे?

१० पूर्वी तुमचा चर्चमध्ये बाप्तिस्मा झाला असला किंवा तुम्ही प्रार्थनेत देवाला समर्पणही केलं असलं, तरी तुम्ही पुन्हा यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा का घेतला पाहिजे? कारण त्या वेळी तुम्हाला यहोवा आणि येशूबद्दलच्या सत्याचं अचूक ज्ञान नव्हतं. तसंच, देवाच्या इच्छेबद्दलही तुम्हाला पुरेसं ज्ञान नव्हतं. पहिल्या शतकातल्या इफिसमधल्या काही लोकांनीसुद्धा पूर्वी बाप्तिस्मा घेतला होता. पण तेव्हा त्यांना येशूच्या शिकवणींबद्दल पुरेसं ज्ञान नव्हतं. म्हणून प्रेषित पौलने त्यांना पुन्हा बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं.b (प्रे. कार्यं १९:१-५) त्यांच्यासारखंच, आजसुद्धा आपल्याला बाप्तिस्मा घेण्यासाठी यहोवाच्या इच्छेबद्दल अचूक ज्ञान असणं गरजेचंय.

“पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने”

११. “पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा” घेण्याचा काय अर्थ होतो? (मत्तय २८:१८-२०)

११ येशूने नवीन शिष्यांना “पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा” घ्यायची आज्ञा दिली. (मत्तय २८:१८-२० वाचा.) याचा काय अर्थ होतो? बायबलप्रमाणे एखाद्याच्या ‘नावात’ त्याचं पद आणि अधिकारही सामील आहे. म्हणूनच आपण एखाद्याच्या नावाने काहीतरी करतो, तेव्हा आपण त्या व्यक्‍तीच्या अधिकाराला मानत असल्याचं दाखवतो. (मत्तय १०:४१ सोबत तुलना करा; “कि वह भविष्यवक्‍ता है,” वरची हिंदी स्टडी नोट पाहा.) तर मग आपण पित्याला, मुलाला आणि पवित्र शक्‍तीला मानत असल्याचं कसं दखवू शखतो?

१२. आपण पित्याच्या नावाने बाप्तिस्मा कसा घेऊ शकतो? (प्रकटीकरण ४:११) (चित्रसुद्धा पाहा.)

१२ पित्याच्या नावाने. यहोवा आपला पिता आहे आणि त्यानेच आपल्याला जीवन दिलं आहे असं आपण मानतो. तसंच, तो सर्वशक्‍तिमान देव आहे आणि सगळ्या गोष्टी त्यानेच बनवल्या आहेत हेही आपण मानतो. (प्रकटीकरण ४:११ वाचा.) शिवाय आपण हेसुद्धा मानतो, की यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो. आपण प्रार्थना करताना आणि इतरांना त्याच्याबद्दल सांगताना आदराने त्याच्या नावाचा वापर करतो. (स्तो. ६५:२) पण, पित्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्यात आणखी एक गोष्ट सामील आहे. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्रचं भाषण ऐकणाऱ्‍यांना यहोवाबद्दल आधीच माहीत होतं. पण आता त्यांना हे मान्य करायची गरज होती, की आपल्याला सर्वकाळचं जीवन मिळावं म्हणून यहोवानेच येशूच्या बलिदानाची व्यवस्था केली आहे.—रोम. ५:८.

आधीच्या चित्रात दाखवलेली नुकताच बाप्तिस्मा झालेली बहीण तिच्या घरात प्रार्थना करत आहे.

बाप्तिस्म्यानंतरही पित्याच्या अधिकाराला मानत राहा (परिच्छेद १२ पाहा)


१३. आपण मुलाच्या नावाने बाप्तिस्मा कसा घेऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ मुलाच्या नावाने. आपण येशूला देवाचा एकुलता एक मुलगा असल्याचं मानतो. तसंच, यहोवासोबत जवळचं नातं जोडण्याचा “मार्ग” येशूच आहे हेही आपल्याला माहीत आहे. (योहा. १४:६) येशूमुळेच आपली पाप आणि मृत्यूतून सुटका होते आणि सर्वकाळ जगण्याची आशा मिळते. म्हणून आपण फक्‍त आपल्या बाप्तिस्म्याच्या दिवशीच नाही, तर दररोज येशूसारखं वागायचा प्रयत्न करतो. (१ योहा. २:६) तसंच, आपण येशूसारखं आवेशाने प्रचारही करतो आणि कोणत्याच गोष्टीला या कामाच्या आड येऊ देत नाही. (लूक ४:४३) आपला छळ झाला तरी आपण एकनिष्ठपणे यहोवाची सेवा करत राहतो. (२ तीम. ३:१२) शिवाय, येशू “मंडळीचं मस्तक” असल्याचंसुद्धा आपण मानतो. म्हणून त्याने ज्यांना आपली काळजी घ्यायला आणि आपलं नेतृत्व करायला नेमलंय त्यांच्या आपण अधीन राहतो.—इफिस. ४:८, ११, १२; ५:२३.

आधीच्या चित्रात दाखवलेला नुकताच बाप्तिस्मा झालेला भाऊ घरोघरच्या सेवाकार्यात एका माणसाला बायबलमधून वचन दाखवतोय.

बाप्तिस्म्यानंतरही मुलाच्या अधिकाराला मानत राहा (परिच्छेद १३ पाहा)


१४. (क) आपण पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा कसा घेऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे आणखी कोणत्या प्रकारचे बाप्तिस्मे होतात? (“अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे आणखी कोणत्या प्रकारचे बाप्तिस्मे होतात?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१४ पवित्र शक्‍तीच्या नावाने. आपण मानतो, की पवित्र शक्‍ती एक व्यक्‍ती नाही किंवा त्रैक्याचा भाग नाही. याउलट, ती देवाची क्रियाशील शक्‍ती आहे. देवाने पवित्र शक्‍तीचा वापर करून संदेष्ट्यांना आणि बायबलच्या लेखकांना त्याचे विचार कळवले. म्हणूनच आपण दररोज बायबल वाचतो आणि त्याप्रमाणे वागतो. (२ पेत्र १:२०, २१) तसंच, आपण गंभीर पाप करण्यापासूनही दूर राहतो. कारण आपल्याला माहीत आहे, की आपण जर गंभीर पाप केलं तर देवाची पवित्र शक्‍ती आपल्यावर आणि मंडळीवर काम करणार नाही.—इफिस. ४:३०.

आधीच्या चित्रात दाखवलेली नुकताच बाप्तिस्मा घेतलेली बहीण तिच्या घरात बायबल वाचत आहे.

बाप्तिस्म्यानंतरही पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत राहा (परिच्छेद १४ पाहा)


अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे आणखी कोणत्या प्रकारचे बाप्तिस्मे होतात?

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे पाण्याच्या बाप्तिस्म्यासोबत खाली दिलेले बाप्तिस्मेही होतात.

  • जेव्हा त्यांना येशूसोबत स्वर्गात सेवा करायचं आमंत्रण मिळतं, तेव्हा त्यांचा पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा होतो. (मत्त. ३:११)

  • ख्रिस्तात आणि त्यांच्यात इतकं ऐक्य असतं की जणू काय ते ख्रिस्ताच्या शरीराचाच भाग आहेत. या अर्थाने त्यांचा “ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा” होतो. (गलती. ३:२७, २८; १ करिंथ. १२:२७)

  • पृथ्वीवरचं त्यांचं जीवन संपेपर्यंत ते विश्‍वासूपणे येशूचं अनुकरण करतात आणि मग त्यांना स्वर्गात जिवंत केलं जातं. या अर्थाने त्यांचा ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा होतो. (रोम. ६:३-५)

१५. आपण काय करायचा निश्‍चय केला पाहिजे?

१५ तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, तरी बाप्तिस्मा इतका महत्त्वाचा का आहेc याची वेळोवेळी स्वतःला आठवण करून देत राहा. आणि यहोवाला दिलेल्या वचनाप्रमाणे कायम जगत राहा. पण जर तुमचा बाप्तिस्मा झाला नसेल आणि एखादी गोष्ट तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखत असेल तर काय? बाप्तिस्म्याचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

तुमचं उत्तर काय असेल?

  • पाण्यात पूर्णपणे बुडून बाप्तिस्मा घेणं कशाला सूचित करतं?

  • बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना कोणते प्रश्‍न विचारले जातात आणि का?

  • “पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा” घेण्याचा काय अर्थ होतो?

गीत १६१ करेन तुझी पुरी इच्छा

a ‘बाप्तिस्मा’ यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “बुडवणं” किंवा पाण्याखाली डुबवणं असा होतो. म्हणून काही चर्चमध्ये देतात तसं फक्‍त पाणी शिंपडून बाप्तिस्मा देणं योग्य नाही.

b इफिसमधल्या लोकांनी “योहानचा बाप्तिस्मा” घेतला होता. (प्रे. कार्यं १९:३) बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने यहुद्यांना मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करायला सांगितलं. आणि ज्यांनी तसं केलं, त्यांना त्याने बाप्तिस्मा दिला. (मार्क १:४, ५) पण नियमशास्त्र रद्द झालं तेव्हा योहानचा बाप्तिस्माही रद्द झाला. तेव्हापासून यहोवा फक्‍त “एकच बाप्तिस्मा” मान्य करतो आणि त्यामुळेच तारण मिळतं.—इफिस. ४:५.

c jw.org आणि JW लायब्ररी वरच्या “बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं” या लेख मालिकेतला “बाप्तिस्मा म्हणजे काय?” हा लेख पाहा.

d चित्राचं वर्णन: संमेलनात बाप्तिस्मा घेणारे भाऊबहीण तोंडाने विश्‍वास जाहीर करत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा