धडा २३
बाप्तिस्मा—एक महत्त्वाचं ध्येय!
येशूने शिकवलं की त्याच्या अनुयायांनी बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. (मत्तय २८:१९, २० वाचा.) पण बाप्तिस्मा म्हणजे काय? आणि बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्तीने कोणती पावलं उचलली पाहिजेत?
१. बाप्तिस्मा म्हणजे काय?
“बाप्तिस्मा” हा शब्द पाण्याखाली “बुडवणं” या अर्थाच्या ग्रीक शब्दापासून आला आहे. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याला यार्देन नदीत बुडवण्यात आलं आणि त्यानंतर तो “पाण्यातून वर” आला. (मार्क १:९, १०) त्याच प्रकारे खऱ्या ख्रिश्चनांचा बाप्तिस्मा होतो तेव्हा त्यांना पाण्यात पूर्णपणे बुडवलं जातं.
२. बाप्तिस्मा घेतल्यामुळे काय दिसून येतं?
बाप्तिस्मा घेऊन एक व्यक्ती दाखवते की तिने तिचं जीवन यहोवा देवाला समर्पित केलंय. पण एक व्यक्ती आपलं जीवन यहोवाला नेमकं कसं समर्पित करते? बाप्तिस्मा घ्यायच्या काही काळाआधी ती प्रार्थना करून यहोवाला सांगते, की तिला कायम त्याची सेवा करायची आहे. ती यहोवाला वचन देते, की ती फक्त त्याचीच उपासना करेल आणि जीवनात त्याच्या इच्छेला पहिलं स्थान देईल. ती ‘स्वतःला नाकारून’ येशूच्या शिकवणी आणि उदाहरणाप्रमाणे ‘चालत राहायचा’ निर्णय घेते. (मत्तय १६:२४) त्या व्यक्तीने समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे तिला यहोवासोबत आणि त्याच्या उपासकांसोबत जवळची मैत्री जोडता येते.
३. बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्तीने कोणती पावलं उचलली पाहिजेत?
बाप्तिस्मा घेण्यासाठी यहोवाबद्दल शिकणं आणि त्याच्यावर असलेला विश्वास वाढवणं खूप महत्त्वाचंय. (इब्री लोकांना ११:६ वाचा.) तुमचं ज्ञान आणि विश्वास जसजसा वाढतो, तसतसं यहोवावर असलेलं तुमचं प्रेमही वाढत जातं. यामुळे त्याच्याबद्दल दुसऱ्यांना सांगायची आणि त्याला आवडेल अशा प्रकारे वागायची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. (२ तीमथ्य ४:२; १ योहान ५:३) अशा रितीने एक व्यक्ती “यहोवाच्या सेवकांना शोभेल असं वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट” करू लागते. त्यानंतर, ती आपलं जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घ्यायचा निर्णय घेऊ शकते.—कलस्सैकर १:९, १०.a
आणखी जाणून घेऊ या
येशूच्या बाप्तिस्म्यावरून आपण काय शिकतो आणि बाप्तिस्मा घेण्याआधी काय करणं गरजेचं आहे हे पाहू या.
४. येशूच्या बाप्तिस्म्यावरून शिकण्यासारख्या गोष्टी
येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी मत्तय ३:१३-१७ वाचा. त्यानंतर या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो बाळ होता का?
त्याचा बाप्तिस्मा फक्त डोक्यावर पाणी शिंपडून झाला का?
देवाने येशूला ज्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं होतं, ते महत्त्वाचं काम त्याने बाप्तिस्म्यानंतर सुरू केलं. लूक ३:२१-२३ आणि योहान ६:३८ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
बाप्तिस्म्यानंतर येशूने कोणत्या गोष्टीला आपल्या जीवनात पहिलं स्थान दिलं?
५. बाप्तिस्म्याच्या ध्येयापर्यंत पोहोचणं शक्य आहे
समर्पण करून बाप्तिस्मा घ्यायच्या विचाराने कदाचित सुरुवातीला तुम्हाला थोडी भीती वाटेल. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हळूहळू प्रगती करायचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे काही काळानंतर हे महत्त्वाचं पाऊल उचलायला तुम्हाला भीती वाटणार नाही. काही लोकांनी हे कशा प्रकारे केलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.
योहान १७:३ आणि याकोब १:५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल?
१. समर्पण करताना आपण यहोवाला प्रार्थनेत सांगतो की आपल्याला कायम त्याची सेवा करायची आहे
२. बाप्तिस्मा घेऊन आपण इतरांना दाखवतो की आपण देवाला समर्पण केलं आहे
६. बाप्तिस्मा घेणं म्हणजे यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनणं
जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आपण जगभरात असलेल्या एका प्रेमळ कुटुंबाचा भाग बनतो. यहोवाचे साक्षीदार कुठल्याही देशाचे किंवा संस्कृतीचे असले, तरी ते सारख्याच शिकवणी मानतात आणि बायबलच्या तत्त्वांप्रमाणे जगायचा प्रयत्न करतात. स्तोत्र २५:१४ आणि १ पेत्र २:१७ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
बाप्तिस्मा घेतल्यामुळे एक व्यक्ती यहोवाच्या आणि त्याच्या लोकांच्या आणखी जवळ कशी येते?
काही जण म्हणतात: “मी अजून बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार नाहीए.”
कदाचित तुम्हालाही असंच वाटत असेल. पण तरी बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रयत्न करत राहणं चांगलं आहे, असं तुम्हाला वाटतं का?
थोडक्यात
येशूने शिकवलं की त्याच्या अनुयायांनी बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. बाप्तिस्म्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एका व्यक्तीने यहोवावर असलेला विश्वास मजबूत केला पाहिजे, त्याच्या तत्त्वांप्रमाणे जगलं पाहिजे आणि स्वतःचं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे.
उजळणी
बाप्तिस्मा म्हणजे काय आणि तो घेणं महत्त्वाचं का आहे?
समर्पण म्हणजे काय? आणि ते कधी केलं जातं?
समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्तीने कायकाय केलं पाहिजे?
हेसुद्धा पाहा
बाप्तिस्म्याचा नेमका अर्थ आणि त्याबद्दलचे काही गैरसमज जाणून घ्या.
बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती कशी करता येईल ते जाणून घ्या.
“यहोवावरचं प्रेम आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करतं” (टेहळणी बुरूज, मार्च २०२०)
एका व्यक्तीला बाप्तिस्मा घ्यायची प्रेरणा कशामुळे मिळाली ते जाणून घ्या.
“मी सत्याची स्वतः खातरी करावी असं त्यांना वाटायचं” (ऑनलाईन लेख)
a एखाद्या व्यक्तीने आधीच चर्चमध्ये बाप्तिस्मा घेतला असेल, तरी तिला पुन्हा बाप्तिस्मा घ्यावा लागेल का? हो, कारण तेव्हा तिला बायबलमधून सत्य शिकवण्यात आलं नव्हतं.—प्रेषितांची कार्यं १९:१-५ आणि धडा १३ पाहा.