६-१२ एप्रिल, २०२६
गीत ८२ “तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या”
सत्यात नसलेल्या नातेवाइकांसोबत चांगले संबंध टिकवून ठेवा
“आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये.”—गलती. ६:९.
या लेखात:
सत्यात नसलेल्या नातेवइकांसोबत आपण चांगलं नातं कसं टिकवून ठेवू शकतो आणि ते सत्याबद्दल ऐकायला तयार असतील तर आपण प्रेमाने त्यांना यहोवाबद्दल कसं सांगू शकतो ते पाहा.
१-२. कोणत्या कारणांमुळे आपल्या नातेवाइकांसोबतचं आपलं नातं बिघडू शकतं?
येशूने त्याचा शिष्य बनण्याची इच्छा असलेल्या एका माणसाला म्हटलं: “घरी आपल्या नातेवाइकांकडे जा आणि यहोवाने तुझ्यासाठी जे काही केलंय . . . ते सगळं त्यांना सांग.” (मार्क ५:१९) येशूने असं म्हटलं कारण त्याला माहीत होतं, की माणसांना सहसा त्यांच्या जवळच्या लोकांना चांगल्या गोष्टी सांगायला आवडतात.
२ तुम्हाला पहिल्यांदा सत्याबद्दल कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? त्याबद्दल कोणाला सांगू आणि कोणाला नको असं तुम्हाला झालं असेल. तुम्ही तुमच्या नातेवाइकांना त्याबद्दल बोलला तेव्हा त्यांना कसं वाटलं होतं? कदाचित त्यांनी ते चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं नसेल. किंवा तुम्हाला ते चांगल्या प्रकारे सांगता न आल्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल आणि ते नाराज झाले असतील. जर असं असेल तर बायबल तत्त्वांशी तडजोड न करता, तुम्ही त्यांच्यासोबतचं नातं कसं टिकवून ठेवू शकता किंवा बिघडलेलं नातं पुन्हा कसं जोडू शकता?
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांसोबतचं आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी आपण कोणत्या चार गोष्टी करू शकतो, याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. आपण पाहू, की (१) सत्यात नसलेले आपले नातेवाईक यहोवाबद्दल ऐकायला तयार नसले, तरी आपण त्यांच्याशी दयेने कसं वागू शकतो? (२) त्यांनी आपलं मन दुखावलं तर आपण काय करू शकतो? (३) आपले नातेवाईक कधी न् कधी सत्यात येतील अशी आशा आपण कशी बाळगू शकतो आणि धीर कसा धरू शकतो? आणि (४) आपलं त्यांच्यावर प्रेम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?
दयेने वागा
४. येशू त्याच्या संदेशात आवड न दाखवणाऱ्यांशी कसा वागला?
४ येशूने सांगितलेल्या संदेशात ज्या लोकांनी आवड दाखवली नाही, त्यांच्याबद्दल त्याने आशा सोडली नाही. त्याने स्वतःची तुलना द्राक्षमळ्यात काम करणाऱ्या एका माणसाशी केली. त्या माणसाने अंजीराचं एक झाड लावलं. पण त्या झाडाला फळ येत नव्हतं. झाडाला फळ यावं म्हणून त्या माणसाने वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आणि खूप मेहनत घेतली. (लूक १३:६-९) येशूने जेव्हा हे उदाहरण दिलं तेव्हा तो तीनपेक्षा जास्त वर्षांपासून यहुद्यांना प्रचार करत होता. पण खूप कमी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. असं असूनसुद्धा येशूने धीर धरला आणि त्यांना शिकवण्यासाठी मेहनत घेतली. येशूने इतकी मेहनत का घेतली? कारण येशू खूप दयाळू होता.
५. कोणत्या गोष्टीमुळे येशूला यहुद्यांबद्दल कळवळा वाटायचा?
५ येशूला यहुद्यांबद्दल खूप कळवळा होता, कारण धर्मगुरू त्यांना यहोवाबद्दलचं सत्य सांगत नव्हते. म्हणून येशूने त्यांच्याबद्दल म्हटलं, की “ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.” (मार्क ६:३४) इतकंच काय, तर येशूच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याला यरूशलेमकडे पाहून रडू आलं. कारण त्याला माहीत होतं, की बरेच लोक त्याच्यावर आणि यहोवावर विश्वास नसल्यामुळे त्यांचा जीव गमावणार होते. (लूक १९:४१-४४) येशूसारखंच आपल्यालाही सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांबद्दल कळवळा असेल, तर आपण त्यांना मदत करायला प्रवृत्त होऊ.
६. सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांच्या बाबतीत आपण धीर का धरला पाहिजे? (गलतीकर ६:९)
६ गलतीकर ६:९ वाचा. आपले नातेवाईक सत्य शिकायला तयार नसले, तरी आपण धीर धरला पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. तसंच, आपण नेहमी ‘चांगलं ते करत राहिलं’ पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनातल्या खोलवर रूजलेल्या गोष्टी काढून टाकायला आणि यहोवावर विश्वास ठेवायला वेळ लागू शकतो. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की एकेकाळी आपणसुद्धा “कोणतीही आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय असे” होतो. (इफिस. २:१२) कोणीतरी आपल्या बाबतीत धीर धरला म्हणूनच आपण यहोवाबद्दल शिकू शकलो. आपणसुद्धा आपल्या नातेवाइकांच्या बाबतीत धीर धरला तर आपण त्यांना यहोवाबद्दल शिकायला मदत करू शकतो.
नातेवाईक वाईट वागले-बोलले तरी नाराज होऊ नका
७. कोणत्या कारणांमुळे येशूच्या भावांना येशूवर विश्वास ठेवणं कठीण गेलं असेल?
७ येशूने गालीलमध्ये केलेल्या चमत्कारांबद्दल त्याच्या भावांनीसुद्धा ऐकलं असेल. (लूक ४:१४, २२-२४) पण सुरुवातीला त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. (योहा. ७:५) त्यांनी असं का केलं याबद्दल बायबलमध्ये काही सांगितलेलं नाही. पण बऱ्याच यहुद्यांनी येशूवर विश्वास का ठेवला नाही याबद्दल आपल्याला त्यात वाचायला मिळतं. आपण येशूवर विश्वास ठेवला, तर समाजातले लोक आपल्याशी वाईट वागतील असं काहींना वाटत होतं. (योहा. ९:१८-२२) तर काहींनी येशूला लहानाचं मोठं होताना पाहिलं होतं. म्हणून तोच ख्रिस्त आहे हे मान्य करणं त्यांना कठीण जात होतं. (मार्क ६:१-४) अशाच काही कारणांमुळे येशूच्या भावांनासुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं असेल. कदाचित आपले नातेवाईकसुद्धा अशाच काही कारणांमुळे यहोवाबद्दल ऐकून घ्यायला तयार होत नसतील.
८. कोणत्या गोष्टीमुळे सत्यात नसलेले आपले नातेवाईक आपल्याशी वाईट वागत असतील?
८ ते असं का वागत असतील याचा विचार करा. येशूच्या काही नातेवाइकांना असं वाटलं, की “त्याला वेड लागलंय.” (मार्क ३:२१) त्यांना असं का वाटलं असेल? येशू लोकांना शिकवण्यात आणि त्यांना मदत करण्यात खूप व्यस्त असायचा. आणि यामुळे त्याला कधीकधी जेवायलाही वेळ मिळायचा नाही. (मार्क ३:२०) म्हणून तो जरा अतीच करतोय, असं कदाचित त्याच्या नातेवाइकांना वाटत असेल. सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांनासुद्धा असं वाटत असेल, की आपण खूपच धार्मिक झालोय. जर असं असेल तर आपण इतर गोष्टींनाही वेळ देतो, या गोष्टीची आपण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे.
९. कोणत्या गोष्टीमुळे आपल्या नातेवाइकांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो? (१ पेत्र ३:१, २) (चित्रंसुद्धा पाहा.)
९ नेहमी चांगलं वागा. आपल्या चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे आपल्या नातेवाइकांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो. (१ पेत्र ३:१, २ वाचा.) कदाचित एखाद्या बहिणीचा पती सत्यात नसेल. आणि जेव्हा ती बहीण प्रचाराला किंवा सभेला जात असेल तेव्हा त्याला एकटं पडल्यासारखं वाटत असेल. मग त्याला एकटं वाटू नये म्हणून ती काय करू शकते? कदाचित ती तिच्या रोजच्या कामांत थोडा बदल करू शकते. जसं की, तिचा पती घरात नसेल किंवा तो व्यस्त असेल अशा वेळी ती प्रचाराला जाऊ शकते. अशा प्रकारे काही फेरबदल केल्यामुळे तिला आपल्या पतीचं मन जिंकता येईल. इतकंच काय, तर यामुळे साक्षीदारांबद्दलचा त्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो.
आपल्या चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे सत्यात नसलेल्या आपल्या जोडीदाराचा यहोवाच्या साक्षीदारांबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो (परिच्छेद ९ पाहा) f
१०. इतर जण आपली टीका करतात तेव्हा आपण येशूसारखं कसं वागू शकतो?
१० टीका होते तेव्हा प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देऊ नका. लोकांनी जेव्हा येशूला खादाड आणि दारूडा म्हटलं, तेव्हा तो त्यांच्यावर चिडला नाही आणि त्याबद्दल स्पष्टीकरणही देत बसला नाही. त्याची इच्छा होती, की तो कसा आहे हे लोकांनी स्वतः पाहावं आणि ठरवावं. (मत्त. ११:१९) तो ज्या प्रकारे जीवन जगला त्यावरून हे दिसून आलं, की यहोवाची सेवा करण्यासोबतच तो त्याच्या मित्रांसोबतही वेळ घालवतो आणि आनंदी राहतो. (योहान २:२, ६-१० सोबत तुलना करा.) त्याच प्रकारे तुमचे नातेवाईक तुमची टीका करतात, तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आपण येशूसारखं वागू शकतो आणि यहोवाची सेवा करण्यासोबतच इतर गोष्टींसाठीही वेळ काढू शकतो. यामुळे आपल्या नातेवाइकांना त्यांनी आपल्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत याची जाणीव होईल.
धीर धरा आणि आशा सोडू नका
११. येशू आपल्या भावांशी कसा वागला?
११ बायबलमधून आपल्याला कळतं की येशू आपल्या भावांशी नेहमी धीराने वागला. येशूने कानामध्ये पहिला चमत्कार केला तेव्हा कदाचित त्याचे भाऊसुद्धा तिथे होते. (योहा. २:११, १२) पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. असं असलं तरी येशूने त्यांच्यासोबचं नातं तोडलं नाही. या घटनेला जवळजवळ तीन वर्षं झाल्यानंतरही आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं, की येशू त्याच्या भावांशी प्रेमाने बोलला.—योहा. ७:५-८.
१२. आपले नातेवाईक कधी न् कधी सत्यात येतील अशी आशा आपण का ठेवू शकतो?
१२ अलीकडेच आपण शिकलो, की मोठं संकट सुरू झाल्यानंतरसुद्धा लोकांकडे यहोवाबद्दल शिकून घ्यायची संधी असेल. त्यामुळे आपले नातेवाईकसुद्धा सत्यात येऊ शकतात अशी आशा आपल्याला मिळते. खोट्या धर्माचा नाश होईलa तेव्हा आपण त्यांना याबद्दल सांगितल्याचं त्यांना आठवेल. (प्रकटी. १७:१६) यामुळे कदाचित तेसुद्धा आपल्यासोबत शुद्ध उपासना करू लागतील. आजसुद्धा जेव्हा आपले नातेवाईक समस्यांचा सामना करतात, तेव्हा आपण त्यांना मदत करण्यासाठी शक्य ते सगळं केलं पाहिजे. कदाचित आपलं प्रेम पाहून त्यांनाही यहोवाबद्दल जाणून घ्यायची इच्छा होईल.
तुमचं त्यांच्यावर प्रेम असल्याचं दाखवा
१३. आपण यहोवाच्या सेवेत व्यस्त असलो तरी आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे?
१३ हे खरंय, की आपण यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त असतो. पण यामुळे आपल्या नातेवाइकांसाठी आपल्याकडे वेळ नाही किंवा आपलं त्यांच्यावर आधीसारखं प्रेम राहिलेलं नाही, असं त्यांना वाटू देऊ नका. (मत्त. ७:१२) मग आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपल्याला त्यांची काळजी आहे हे आपण कसं दाखवू शकतो? चला, याचे काही मार्ग पाहू या.
१४-१५. सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांवर आपलं प्रेम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? उदाहरण द्या.
१४ वेळोवेळी बोला आणि प्रेम असल्याचं दाखवा. आपण वेळोवेळी आपल्या नातेवाइकांची विचारपूस करू शकतो आणि आपलं कसं चाललंय हेसुद्धा त्यांना सांगू शकतो. जसं की, तुम्ही जर अलीकडेच कुठे फिरायला गेला असाल किंवा मित्रांसोबत वेळ घालवला असेल तर तुम्ही त्यांना फोटो पाठवू शकता किंवा त्याबद्दल त्यांना सांगू शकता. शिवाय, तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांना समजेल, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि यामुळे तुमचं त्यांच्यासोबतचं नातं आणखी मजबूत होईल.
१५ आर्मेनियामध्ये राहणाऱ्या ॲनाचं उदाहरण घ्या. तिच्या नातेवाइकांमध्ये कोणाचा वाढदिवस असला किंवा सुट्ट्या असल्या की ती तिच्या नातेवाइकांसोबत छान वेळ घालवायची. पण जेव्हा ॲना सत्यात आली तेव्हा तिच्या नातेवाइकांना तिची काळजी वाटू लागली. आपलं नातं आधीसारखं राहणार नाही आणि साक्षीदार बनल्यामुळे तिचं आयुष्य कठीण होईल अशी त्यांना काळजी वाटू लागली. मग ॲनाने काय केलं? ती म्हणते: “मी माझ्या नातेवाइकांना भेटायला जाते, तेव्हा माझं कसं चाललंय आणि मी कायकाय करत असते हे त्यांना सांगते. मी त्यांना माझ्या घरीसुद्धा बोलावते आणि भाऊबहिणींशी त्यांची ओळख करून देते. त्यामुळे आता तेसुद्धा भाऊबहिणींसोबत खूप चांगल्या प्रकारे बोलतात. त्यांना समजलंय, की मी आता किती खूश आहे. यामुळे त्यांना माझी जास्त काळजी वाटत नाही.”
१६. येशूने त्याचा भाऊ त्याच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं कसं दाखवलं? (तळटीपसुद्धा पाहा.)
१६ ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचं दाखवा. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर तो त्याच्या भावाला, याकोबला भेटला. असं करून त्याचा भाऊ त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याने दाखवलं. (१ करिंथ. १५:७) येशूने आपल्याबद्दल अजूनही हार मानली नाही हे समजल्यामुळे याकोबला किती आनंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. या भेटीमुळे येशूच ख्रिस्त असल्याची याकोबला खातरी पटली असेल आणि त्याने त्याच्या घरच्यांनासुद्धा येशूची खरी ओळख पटवून द्यायचा प्रयत्न केला असेल.b—प्रे. कार्यं १:१४.
१७. आपण रोमकर १२:१५ मधला सल्ला कसा लागू करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ रोमकर १२:१५ वाचा. आपल्या नातेवाइकांच्या सुखदुःखाच्या काळात आपण जर त्यांच्यासोबत राहिलो, तर त्यांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो.c उदाहरणार्थ, जेव्हा आपल्या नातेवाइकांच्या घरात बाळाचा जन्म होतो तेव्हा आपण त्यांना शुभेच्छा देऊ शकतो, भेटी देऊ शकतो आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकतो. तसंच, त्यांच्या घरात एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा आपण त्यांना सांत्वन देऊ शकतो, व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतो. शिवाय, त्यांना मेसेज करून किंवा फोन करूनही आपण त्यांची विचारपूस करू शकतो. पण फक्त दुःखाच्या वेळीच नाही तर इतर वेळीही आपण त्यांची विचारपूस केली पाहिजे.
आपल्या नातेवाइकांच्या कठीण परिस्थितींत आपण त्यांना मदत केली, तर त्यांचा आपल्याबद्दलचा आणि सत्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो (परिच्छेद १७ पाहा) g
१८. आपण अंद्रियासारखं कसं वागू शकतो?
१८ त्यांची भाऊबहिणींशी ओळख करून द्या. अंद्रियाला येशू हाच मसीहा असल्याचं कळलं, तेव्हा त्याच्या भावाने, पेत्रनेसुद्धा येशूला येऊन भेटावं अशी त्याची इच्छा होती. म्हणून तो खूप उत्साहाने पेत्रला येशूकडे घेऊन गेला. (योहा. १:४०-४२) आपणही असंच करू शकतो. आपण आपल्या नातेवाइकांना सभेला बोलवू शकतो किंवा भाऊबहिणींसोबत जेवायलाही बोलवू शकतो. आपण जेव्हा आपल्या नातेवाइकांची आपल्या भाऊबहिणींशी ओळख करून देतो, तेव्हा यहोवाचे साक्षीदारही इतरांसारखे सर्वसामान्य लोक आहेत याची त्यांना जाणीव होईल.
१९. आपण काही गोष्टी का करत नाही हे आपल्या नातेवाइकांना समजत नसलं तरी आपण त्यांच्याशी कसं वागू शकतो? (१ पेत्र ३:१५)
१९ १ पेत्र ३:१५ वाचा. आपण काही गोष्टी का करत नाही हे कदाचित आपल्या नातेवाइकांना पूर्णपणे कधीच समजणार नाही. पण आपण त्यांच्याशी किती प्रेमाने आणि आदराने वागतो हे ते कधीच विसरणार नाहीत. इतर वेळी त्यांच्यासोबत वेळ घालवायला आपण जी मेहनत घेतो त्याची ते कदर करतील. हे खरंय, की आपण बायबलच्या तत्त्वांविरुद्ध असलेल्या सणांमध्ये किंवा रितीरिवाजांमध्ये भाग घेत नाही. पण आपण जेव्हा इतरवेळी त्यांना भेटतो, त्यांच्यासोबत जेवतो आणि त्यांना भेटी देतो, तेव्हा त्यांना खूप आनंद होऊ शकतो.
हार मानू नका
२०. याकोबच्या उदाहरणातून आपल्याला काय कळतं?
२० येशू पृथ्वीवर असताना त्याचा भाऊ याकोब त्याचा शिष्य बनला नाही. (गलती. १:१८, १९; २:९) पण नंतर मात्र तो त्याचा शिष्य बनला आणि त्याने त्याच्या शिकवणी मनापासून पाळल्या. जसं की, याकोबने देवाच्या प्रेरणेने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्याने येशूच्या डोंगरावरच्या उपदेशातल्या बऱ्याच गोष्टी लिहिल्या.d
२१. सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांच्या बाबतीत आपण हार का मानू नये?
२१ आपलं आपल्या नातेवाइकांवर प्रेम आहे आणि आपल्याला त्यांची काळजी आहे, हे दाखवण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी कदाचित ते सत्यात आवड दाखवणार नाहीत आणि आपल्याशी चांगलं वागणार नाहीत. पण असं असूनसुद्धा आपण हार का मानू नये? कारण आपल्याला यहोवा आणि येशूसारखं वागायची इच्छा आहे. ते नेहमी आपल्याशी प्रेमाने आणि धीराने वागतात. (लूक ६:३३, ३६) आपल्या चांगल्या वागण्यामुळे काही काळाने कदाचित आपल्या नातेवाइकांचं आपल्याबद्दलचं मत बदलेल आणि आपण त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या अभिवचनांबद्दल सांगितलेल्या गोष्टी आठवतील. जर आपण हार मानली नाही, तर कधीतरी तेसुद्धा आपल्यासोबत यहोवाची उपासना करू लागतील. खरंच, त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत!
गीत ६० ऐकून वाचेल जीव त्यांचा!
a मे २०२४ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या पान ११ वरच्या, “यहोवा भविष्यात लोकांचा न्याय कसा करेल?” या लेखाचे परिच्छेद ११-१३ पाहा.
b असं दिसतं की येशूच्या पुनरुत्थानानंतर कमीतकमी त्याचे दोन भाऊ, म्हणजे याकोब आणि यहूदा ख्रिस्ती बनले.
d याकोब १:२ आणि मत्तय ५:११, १२; याकोब १:१९ आणि मत्तय ५:२२; याकोब १:२२; २:२४ आणि मत्तय ७:२१; याकोब २:१३ आणि मत्तय ५:७; ६:१४, १५ या वचनांची तुलना करा.
e अशा परिस्थितींत काय करायचं याबद्दल आणखी माहितीसाठी १५ मे, २००२ च्या आणि १५ नोव्हेंबर, २००७ च्या टेहळणी बुरूज अंकातले “वाचकांचे प्रश्न” हे लेख पाहा.
f चित्राचं वर्णन: प्रचाराला जाण्याआधी एक बहीण तिच्या नवऱ्यासाठी जेवण बनवते.
g चित्राचं वर्णन: तीच बहीण सत्यात नसलेल्या तिच्या सासूला भेटायलाही वेळ काढते.