वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जानेवारी पृ. १४-१९
  • आपल्याला खंडणीची गरज का आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्याला खंडणीची गरज का आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खंडणीमुळे आपली सुटका होते
  • खंडणीमुळे आपल्याला परिपूर्ण बनण्याची आशा मिळते
  • खंडणीमुळे आपल्याला यहोवाशी मैत्री करता येते
  • खंडणीच्या व्यवस्थेवरून यहोवाची दया दिसून येते
  • येशूच्या खंडणी बलिदानातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • खंडणीबद्दल कदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • यहोवाच्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाची क्षमा—आपण कदर का करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जानेवारी पृ. १४-१९

१६-२२ मार्च, २०२६

गीत २० तू दिलेस अनमोल अर्पण

आपल्याला खंडणीची गरज का आहे?

“मृत्यूच्या अधीन असलेल्या माझ्या या शरीरापासून कोण माझी सुटका करेल?”—रोम. ७:२४.

या लेखात:

खंडणीमुळे यहोवा आपल्या पापांची क्षमा कशी करतो, आपल्याला परिपूर्ण बनण्याची आशा कशी देतो, तसंच यामुळे आपल्याला यहोवाशी मैत्री करायला कशी मदत होते, ते पाहा.

१-२. आपल्याला कशापासून सुटका हवी आहे आणि का? (रोमकर ७:२२-२४) (चित्रसुद्धा पाहा.)

कल्पना करा, एक इमारत कोसळली आहे. त्याच्या ढिगाऱ्‍याखाली एक माणूस अडकलाय. तो जिवंत आहे, पण त्याला स्वतःहून तिथून बाहेर पडणं शक्य नाही. जर त्याला तिथून बाहेर पडायचं असेल तर त्याला मदतीसाठी कोणालातरी हाक मारावी लागेल.

२ आपली परिस्थितीसुद्धा त्या माणसासारखीच आहे. आदामने देवाविरुद्ध बंड केलं तेव्हा तो पापी बनला. मग त्याने ते पाप वारशाने त्याच्या मुलांनाही दिलं. याचा परिणाम म्हणजे, संपूर्ण मानवजात पापाच्या ओझ्याखाली दबून गेली आहे. आणि पापाच्या परिणामांपासून ते स्वतःला वाचवू शकत नाहीत. याबद्दलच प्रेषित पौलने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात सांगितलंय. (रोमकर ७:२२-२४ वाचा.) त्यात त्याने ‘मृत्यूच्या अधीन असलेल्या त्याच्या शरीरापासून’ त्याची सुटका व्हावी अशी विनंती केली आहे. बायबल म्हणतं, वारशाने मिळालेल्या पापामुळे मृत्यू येतो आणि पौलसुद्धा याच पापाच्या ओझ्याखाली दबलेला होता. (रोम. ६:२३) आज आपलीही परिस्थिती अशीच अवघड आहे. आपल्यालासुद्धा कोणाच्यातरी मदतीची गरज आहे.

कोसळलेल्या इमारतीखाली दबून जखमी झालेला एक माणूस हात पुढे करून मदत मागतोय.

कोसळलेल्या इमारतीखाली दबलेल्या माणसाप्रमाणेच आपणही वारशाने मिळालेल्या पापाच्या ओझ्याखाली दबलो आहोत. आपल्यालाही सुटकेची गरज आहे (परिच्छेद १-२ पाहा)


३. खंडणीमुळे आपली सुटका कशी होते?

३ आपल्या अवघड परिस्थितीबद्दल सांगितल्यानंतर पौल आपल्याला मिळालेल्या एका आशेबद्दलही बोलतो. “मृत्यूच्या अधीन असलेल्या माझ्या या शरीरापासून कोण माझी सुटका करेल?” असं विचारल्यानंतर पौल स्वतःच याचं उत्तर देतो. तो म्हणतो: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो!” (रोम. ७:२५) इथे पौल येशूच्या खंडणीa बलिदानाबद्दल बोलत होता. खंडणी बलिदानामुळे (१) आपल्या पापांची क्षमा होते, (२) आपल्याला परिपूर्ण बनण्याची आशा मिळते आणि (३) आपल्याला यहोवाशी मैत्री करायला मदत होते. या लेखात आपण याच तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत. यामुळे आशा देणाऱ्‍या यहोवा देवावरचं आपलं प्रेम वाढेल. (रोम. १५:१३) त्यासोबतच, आपली येशूबद्दलची कदरसुद्धा वाढेल. कारण “त्याच्याद्वारे खंडणी देऊन आपली सुटका करण्यात आली आहे.”—कलस्सै. १:१४.

खंडणीमुळे आपली सुटका होते

४-५. आपल्यापैकी प्रत्येकाला खंडणीची गरज का आहे? (उपदेशक ७:२०)

४ आपल्या सगळ्यांनाच क्षमा मिळवण्यासाठी खंडणीची गरज आहे. प्रत्येक अपरिपूर्ण व्यक्‍ती वागण्या-बोलण्यात चुकते. (उपदेशक ७:२० वाचा.) पण काही पापं खूप गंभीर असतात. उदाहरणार्थ, मोशेच्या नियमशास्त्रानुसार जी व्यक्‍ती अनैतिक लैंगिक कृत्य करायची किंवा खून करायची तिला मृत्यूदंडाची शिक्षा मिळायची. (लेवी. २०:१०; गण. ३५:३०, ३१) हे खरंय, की काही पापं इतकी गंभीर नसतात. पण तरी ती पापंच असतात. जसं की, स्तोत्रकर्ता दावीदने म्हटलं: “[माझ्या] जिभेने पाप करू नये म्हणून मी सांभाळीन.” (स्तो. ३९:१) खरंच, आपल्या बोलण्यातूनही आपल्याकडून पाप घडू शकतं.—याको. ३:२.

५ तुम्ही कधी असं काही बोलला आहात का जे तुम्ही बोलायला नको होतं? किंवा असं वागला आहात का ज्याचा तुम्हाला नंतर पस्तावा झाला? यात काही शंका नाही की आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत असं कधी न्‌ कधी झालं असेल. बायबल म्हणतं: “‘आपल्यामध्ये पाप नाही,’ असं जर आपण म्हटलं, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत आणि आपल्यामध्ये सत्य नाही.”—१ योहा. १:८.

६-७. आपली पापं माफ करण्यासाठी यहोवाकडे कोणता आधार आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

६ यहोवा एक न्यायी देव आहे. तो आपल्या पापांकडे असंच दुर्लक्ष करू शकत नाही; जणू काय पापांमुळे त्याला काहीच फरक पडत नाही. उलट तो त्यांच्याकडे गंभीरतेने पाहतो. (यश. ५९:२) पण आपल्याला क्षमा करण्यासाठी त्याला एका आधाराची गरज आहे. आणि खंडणी बलिदानामुळे त्याला आपल्याला माफ करायचा आधार मिळतो.—इफिस. १:७.

७ मोशेच्या नियमशास्त्रानुसार इस्राएली लोकांना त्यांच्या पापांचं प्रायश्‍चित्त करण्यासाठी प्राण्याचं बलिदान देण्याची गरज होती. (लेवी. ४:२७-३१; १७:११) या बलिदानांवरून हे स्पष्ट होतं, की मानवांना प्रायश्‍चित्तासाठी एका मोठ्या बलिदानाची गरज होती; ते म्हणजे येशूचं खंडणी बलिदान. या बलिदानामुळे मानवांना भविष्यात बरेच आशीर्वाद मिळतील. तसंच, या बलिदानामुळे यहोवाला आपली पापं माफ करायचा कायदेशीर आधार मिळतो. पौलने करिंथमधल्या ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात जे म्हटलं त्यावरून कळतं, की खंडणीमुळे आपल्याला किती फायदे होतात हे त्याला माहीत होतं. करिंथमधल्या भाऊबहिणींनी पूर्वी केलेल्या चुकांबद्दल सांगितल्यानंतर त्याने म्हटलं: “तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आलं आहे; तुम्हाला पवित्र करण्यात आलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे आणि आपल्या देवाच्या पवित्र शक्‍तीद्वारे तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलं आहे.”—१ करिंथ. ६:९-११.

एक इस्राएली कुटुंब आनंदाने याजकाला मेंढरू देत आहे.

इस्राएली लोकांना त्यांच्या पापांचं प्रायश्‍चित्त करण्यासाठी प्राण्यांची बलिदानं देण्याची गरज होती. या बलिदानांवरून हे स्पष्ट होतं की मानवांना प्रायश्‍चित्तासाठी एका मोठ्या बलिदानाची गरज होती (परिच्छेद ६-७ पाहा)


८. या वर्षाच्या स्मारकविधीला हजर राहण्याआधी तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करू शकता?

८ या वर्षाच्या स्मारकविधीला हजर राहण्याआधी यहोवाच्या क्षमेमुळे आणि खंडणीमुळे तुम्हाला काय फायदा झालाय याचा विचार करा. आपण ज्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केलाय त्यांबद्दल आपल्याला दोषी वाटून घेण्याची गरज नाही. पण असं करणं तुम्हाला कठीण जात असेल तर काय? कदाचित तुम्ही म्हणाल: ‘यहोवा माफ करू शकतो हे मला माहीत आहे, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.’ जर तुम्हाला असं वाटत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा: माफ करणारा यहोवा आहे आणि न्याय करण्याचा आधिकार त्याने त्याच्या मुलाला दिलाय. कोणाला माफी मिळाली पाहिजे आणि कोणाला नाही हे ठरवायचा आधिकार त्याने तुम्हाला किंवा इतर कोणालाही दिलेला नाही. बायबल असं म्हणतं: “जसा [यहोवा] स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर . . . त्याचा मुलगा, येशू याचं रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.” (१ योहा. १:६, ७) बायबलच्या इतर शिकवणींवर आपला जितका भरवसा आहे, तितकाच भरवसा आपण या सत्यावरसुद्धा ठेवला पाहिजे. खंडणी बलिदानामुळे यहोवाला आपली पापं माफ करायचा कायदेशीर आधार मिळालाय. आणि तो ‘क्षमाशील आहे’ असं बायबल आपल्याला सांगतं.—स्तो. ८६:५.

खंडणीमुळे आपल्याला परिपूर्ण बनण्याची आशा मिळते

९. बायबलमध्ये ‘पाप’ हा शब्द कशाला सूचित करतो? (स्तोत्र ५१:५)

९ बायबलमध्ये ‘पाप’ हा शब्द फक्‍त चुकीच्या कामांनाच नाही, तर एका स्थितीलाही सूचित करतो. आणि आपली जन्मापासूनच पापी स्थिती आहे. (स्तोत्र ५१:५ वाचा.) या स्थितीमुळे आपण फक्‍त चुकीची कामं करायलाच प्रवृत्त होत नाही, तर आपण आजारी पडतो, म्हातारे होतो आणि मरतोसुद्धा. त्यामुळे नुकतीच जन्मलेली बाळं का आजारी पडतात आणि कधीकधी तर मरतात याचं कारण आपल्याला कळतं. तसंच, चांगल्या आणि वाईट अशा सगळ्याच लोकांवर दुःख आणि मृत्यू का येतो हेसुद्धा आपल्याला कळतं. आदामने पाप केल्यामुळे आपल्या सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे.

१०. पाप केल्यानंतर आदाम आणि हव्वाला कसं वाटलं?

१० आदाम आणि हव्वाने पाप केल्यानंतर त्यांना कसं वाटलं याचा विचार करा. पापामुळे त्यांच्या भावनांवर खोलवर परिणाम झाला. त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्यानंतर त्यांचा विवेक त्यांना लगेच बोचू लागला. (रोम. २:१५) त्यांना काहीतरी चुकीचं घडल्याची जाणीव झाली. त्यांना लाज वाटली आणि त्यांनी त्यांचं शरीर झाकलं. त्यांना गुन्हेगार असल्यासारखं वाटलं आणि ते यहोवापासून लपले. (उत्प. ३:७, ८) त्यांना त्यांच्या जीवनात पहिल्यांदा दोषी असल्यासारखं वाटलं, लाज वाटली आणि भिती वाटली. थोड्या प्रमाणात का होईना त्यांच्या मृत्यूपर्यंत या भावनांनी त्यांना सतावलं असेल.—उत्प. ३:१६-१९.

११. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला काय सहन करावं लागतं?

११ पापामुळे आपली स्थिती आदाम आणि हव्वासारखीच आहे. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आज आपल्याला शारीरिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागतो. आपली परिस्थिती सुधारण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी तो कमीच पडतो. असं का होतं? कारण बायबल म्हणतं, आपल्याला “व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आलं” आहे. (रोम. ८:२०) फक्‍त आपलीच नाही तर संपूर्ण मानवजातीची परिस्थिती अशीच आहे. उदाहरणार्थ, आज माणूस पर्यावरण वाचवायचा, गुन्हेगारी आणि गरीबी कमी करायचा आणि जगात शांती आणण्याचा प्रयत्न करतोय. पण इतके प्रयत्न करूनही ते व्यर्थ ठरत आहेत. मग खंडणीमुळे आपली या पापी स्थितीतून कशी सुटका होऊ शकते?

१२. खंडणीमुळे आपल्याला कोणती आशा मिळली आहे?

१२ येशूच्या खंडणी बलिदानामुळेच “सृष्टीही नाशाच्या गुलामीतून मुक्‍त केली जाईल” ही आशा आपल्याला मिळते. (रोम. ८:२१) याचा अर्थ नवीन जगात परिपूर्ण झाल्यावर आपण आजारी पडणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीमुळे निराश होणार नाही. तसंच, कोणत्याच गोष्टीमुळे आपल्याला चिंता होणार नाही, दोषीपणाची भावना सतावणार नाही किंवा भीतीही वाटणार नाही. यासोबतच, आपल्याला खंडणी बलिदान देणारा “शांतीचा राजकुमार” येशू त्या वेळी आपल्यावर राज्य करेल. आज आपण ज्या समस्या स्वतःच्या बळावर सोडवू शकत नाही त्या सोडवायला तो आपल्याला मदत करेल.—यश. ९:६, ७.

१३. स्मारकविधीला उपस्थित राहण्याआधी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करू शकता?

१३ तुम्ही परिपूर्ण व्हाल तेव्हा तुमचं जीवन कसं असेल याचा विचार करा. प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजंतवानं वाटेल. तसंच आपल्या कुटुंबाला उपाशी राहावं लागेल, ते आजारी पडतील किंवा एखाद्याचा मृत्यू होईल अशी भीती तुम्हाला कधीच सतावणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यात मिळणार असल्या, तरी आतासुद्धा आपल्याला शांती मिळू शकते. बायबल म्हणतं: “ही खातरीलायक आणि पक्की आशा आपल्या जिवासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.” (इब्री ६:१८, १९) नांगर जसं जहाजाला स्थिर राहायला मदत करतं, तशीच आपली आशा आपला विश्‍वास स्थिर ठेवायला आणि परीक्षांचा सामना करताना धीर धरायला आपल्याला मदत करते. तसंच तुम्ही हीसुद्धा खातरी बाळगू शकता, की यहोवाचा “मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.” (इब्री ११:६) खंडणीमुळे आज आपल्याला सांत्वन मिळतं आणि भविष्यासाठी आशासुद्धा मिळते.

खंडणीमुळे आपल्याला यहोवाशी मैत्री करता येते

१४. पापामुळे देवासोबतच्या आपल्या नात्यावर काय परिणाम झालाय? आणि असं का म्हणता येईल?

१४ आदाम आणि हव्वाने पाप केलं तेव्हापासून मानवजात देवापासून दूरावली आहे. बायबल म्हणतं, की आपण देवाचे शत्रू बनलो आहोत. (रोम. ८:७, ८; कलस्सै. १:२१) यहोवाचे नीतिमान स्तर इतके उच्च आहेत, की तो आपल्या पापांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणूनच बायबल यहोवाबद्दल म्हणतं: “तुझे डोळे इतके शुद्ध आहेत, की तुला अनीती पाहवत नाही, तुला दुष्टता सहन होत नाही.” (हब. १:१३) पापामुळे आपल्यामध्ये आणि देवामध्ये एक दरी निर्माण झाली आहे आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री तुटली आहे. ती दरी भरून काढल्याशिवाय आपली यहोवासोबत मैत्री होणं शक्य नाही. त्यामुळेच आपल्याला खंडणीची गरज आहे.

१५. खंडणीमुळे आपल्याला यहोवासोबत पुन्हा नातं जोडणं कसं शक्य झालंय?

१५ बायबलमध्ये येशूबद्दल “तो आपल्या पापांसाठी दिलेलं प्रायश्‍चित्ताचं बलिदान आहे” असं म्हटलंय. (१ योहा. २:२) मग येशूच्या बलिदानामुळे आपल्या पापांचं प्रायश्‍चित्त कसं होतं? येशूच्या मृत्यूमुळे यहोवाला आपल्यासोबत पुन्हा नातं जोडायचा एक आधार मिळतो. (रोम. ३:२३-२६) इतकंच काय, तर येशूने खंडणी बलिदान देण्याआधी ज्या विश्‍वासू सेवकांचा मृत्यू झाला त्यांनासुद्धा यहोवा या आधारावर नीतिमान ठरवू शकला. (उत्प. १५:१, ६) यहोवाला पूर्ण खातरी होती की भविष्यात येशू खंडणी बलिदान देईल. म्हणूनच तो त्यांना नीतिमान ठरवू शकला. (यश. ४६:१०) खरंच, खंडणीमुळे आपला यहोवासोबत मैत्री करण्याचा मार्ग पुन्हा खुला झाला.

१६. स्मारकविधीला उपस्थित राहण्याआधी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ यहोवासोबतच्या मैत्रीमुळे तुम्हाला काय फायदा झालाय याचा विचार करा. येशूने शिकवल्याप्रमाणे तुम्ही यहोवाला ‘पिता’ मानू शकता. (मत्त. ६:९) तसंच तुम्ही त्याला तुमचा ‘मित्रही’ मानू शकता. पण त्याच्यासाठी पिता आणि मित्र या शब्दांचा वापर करताना आपण ते आदराने आणि नम्रतेने केलं पाहिजे. का? कारण त्याच्यासोबतची मैत्री आपण स्वतः कमवलेली नाही, तर येशूने दिलेल्या खंडणीमुळेच हे शक्य झालंय. खरंतर, यहोवासोबत आपली मैत्री व्हावी म्हणून यहोवाने स्वतः येशूला आपल्यासाठी दिलंय. (कलस्सै. १:१९, २०) यामुळेच आपण अपरिपूर्ण असूनसुद्धा आज यहोवासोबत चांगलं नातं जोडू शकतो.

रोमी सैनिक येशूला वधस्तंभावर खिळण्याची तयारी करत आहेत. एका सैनिकाच्या हातात हातोडा आणि खिळा आहे, तर दोन सैनिक येशूला वधस्तंभाकडे घेऊन येत आहेत.

येशूच्या बलिदानामुळे यहोवाला आपल्यासोबत पुन्हा मैत्रीचं नातं जोडायचा कायदेशीर आधार मिळतो (परिच्छेद १६ पाहा)


खंडणीच्या व्यवस्थेवरून यहोवाची दया दिसून येते

१७. येशूच्या खंडणी बलिदानातून यहोवाच्या दयेबद्दल काय समजतं? (इफिसकर २:४, ५)

१७ खंडणीमुळे यहोवा खूप दयाळू असल्याचं स्पष्ट होतं. “आपण अपराधांत मेलेले असूनसुद्धा त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.” (इफिसकर २:४, ५ वाचा.) यहोवाला माहीत आहे, की मानवांची परिस्थिती कोसळलेल्या इमारतीखाली अडकलेल्या माणसासारखी आहे. कारण ते वासशाने मिळालेल्या पापाच्या जाळ्यात अडकले आहेत आणि त्यांना सुटकेची गरज आहे. म्हणूनच तो “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांची हाक ऐकतो. (प्रे. कार्यं १३:४८) अशा लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहोचवून तो त्यांच्या हाकेला उत्तर देतो. यामुळे त्यांनाही यहोवाला आणि येशूला जाणून घेता येतं. (योहा. १७:३) आदाम आणि हव्वाने पाप केल्यावर यहोवाचा उद्देश फोल ठरेल असं सैतानाला वाटलं असेल. पण सैतानाचा असा विचार करणं किती चुकीचं होतं हे यहोवाने सिद्ध केलं.

१८. खंडणीमुळे होणाऱ्‍या फायद्यांवर विचार करत असताना आपण कोणता महत्त्वाचा वादविषय लक्षात ठेवला पाहिजे?

१८ खंडणीमुळे आपल्याला वैयक्‍तिकरीत्या खूप फायदे होतात. पण असं असलं तरी, एदेन बागेत सैतानाने उपस्थित केलेला महत्त्वाचा वादविषय मिटवायलाही यहोवा या व्यवस्थेचा वापर करतोय हे आपण विसरू नये. (उत्प. ३:१-५, १५) तसंच, खंडणीच्या व्यवस्थेचा वापर करून यहोवा त्याच्या नावावर लागलेला कलंक पुसून टाकेल आणि ते पवित्र करेल. त्यासोबतच तो प्रेमळ देव असल्यामुळे पाप आणि मृत्यूतून आपली सुटका करेल. आपण अपरिपूर्ण असलो तरी यहोवा त्याच्या कृपेमुळे सैतानाने केलेला दावा खोटा ठरवायची आपल्याला एक संधी देतो. (नीति. २७:११) खरंच, यहोवाने आपल्यासाठी खंडणीची व्यवस्था केल्यामुळे आपण त्याचे खूप आभारी आहोत. मग त्याबद्दल कदर असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? पुढच्या लेखात आपण हेच पाहणार आहोत.

खंडणी बलिदानामुळे आपल्याला . . .

  • पापांची क्षमा कशी मिळते?

  • परिपूर्ण व्हायची आशा कशी मिळते?

  • यहोवासोबत मैत्री कशी करता येते?

गीत १९ प्रभूचं सांजभोजन

a शब्दाचा अर्थ: खंडणी म्हणजे एखादी गोष्ट सोडवण्यासाठी दिली जाणारी किंमत. आज्ञाधारक लोकांची पाप आणि मृत्यूतून सुटका करण्यासाठी येशूच्या जिवाची खंडणी देण्यात आली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा