वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 सप्टेंबर पृ. ८-१३
  • अन्याय होतो तेव्हा . . .

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अन्याय होतो तेव्हा . . .
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाला आणि येशूला अन्यायाचा राग आहे
  • इतरांवर अन्याय होताना पाहून येशूने काय केलं?
  • येशूसारखं वागा
  • आपण आत्ता काय करू शकतो?
  • अन्यायाचा सामना कसा करायचा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • बायबल प्रश्‍नांची उत्तरे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • अन्यायाविषयी देव काही करील का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • अन्याय अपरिहार्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 सप्टेंबर पृ. ८-१३

अभ्यास लेख ३७

गीत ११४ धीराने वागू या

अन्याय होतो तेव्हा . . .

“तो त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत राहिला, पण पाहा! ते अन्यायीपणे वागले.”—यश. ५:७.

या लेखात:

इतरांना अन्याय सहन करताना पाहून येशूने काय केलं आणि आपण त्याच्यासारखं कसं वागू शकतो, याबद्दल पाहू या.

१-२. बरेच लोक अन्याय पाहून काय करतात आणि आपल्या मनात कदाचित कोणते प्रश्‍न येऊ शकतात?

जगात आपल्याला सगळीकडे अन्याय पाहायला मिळतो. लोकांना आपल्या आर्थिक स्थितीमुळे, त्यांच्या रंगरूपामुळे, संस्कृतीमुळे किंवा मग इतर कारणांमुळे अन्याय सहन करावा लागतो. आज स्वार्थी व्यापाऱ्‍यांचं आणि भ्रष्टाचारी नेत्यांचं फक्‍त आपले खिसे भरण्याकडे लक्ष असतं. पर्यावरणावर किंवा लोकांवर याचा काय परिणाम होतोय, याचा ते विचारच करत नाही. या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर या न त्या मार्गाने परिणाम होतोच.

२ सगळ्यांनाच शांतीने राहायला आवडतं आणि कोणीही आपल्याशी वाईट वागू नये असं वाटतं. त्यामुळेच लोकांवर अन्याय होतो किंवा ते इतरांवर अन्याय होताना पाहतात, तेव्हा ते रागाने पेटून उठतात. म्हणून ते याविरुद्ध लढायचा प्रयत्न करतात. ते मोर्चे काढतात, आंदोलनं करतात किंवा अन्याय दूर करण्याचा दावा करणाऱ्‍या राजनैतिक गटांना पाठिंबा देतात. पण ख्रिस्ती या नात्याने आपण मानतो, की आपण या “जगाचा भाग नाही.” तसंच, हा अन्याय काढून टाकण्यासाठी आपण देवाच्या राज्याची वाट पाहतो. (योहा. १७:१६) असं असलं तरी, हा सगळा अन्याय बघून आपल्याला वाईट वाटतं आणि कधीकधी तर आपल्याला रागही येतो. त्यामुळे कदाचित आपल्या मनात असे प्रश्‍न येतील: ‘मी अन्यायाचा सामना कसा करू शकतो? अन्याय काढून टाकण्यासाठी मी आत्ता काहीतरी करू शकतो का?’ या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी यहोवाला आणि येशूला अन्यायाबद्दल काय वाटतं, हे सगळ्यात आधी आपण तपासून बघू या.

यहोवाला आणि येशूला अन्यायाचा राग आहे

३. अन्याय पाहून आपल्याला राग येतो हे समजण्यासारखं का आहे? (यशया ५:७)

३ आपल्याला अन्याय का सहन होत नाही, याचं कारण बायबलमध्ये सांगितलंय. त्यात म्हटलंय, की आपल्याला यहोवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आलंय आणि त्याला ‘न्याय आणि नीती प्रिय आहेत.’ (स्तो. ३३:५; उत्प. १:२६) तो कधीच अन्यायीपणे वागत नाही आणि इतरांनीही तसंच वागावं असं त्याला वाटतं. (अनु. ३२:३, ४; मीखा ६:८; जख. ७:९) उदाहरणार्थ, यशया संदेष्ट्याच्या काळात काही इस्राएली लोक इतर इस्राएली लोकांशी अन्यायीपणे वागत होते. यहोवाने अन्याय सहन करणाऱ्‍या त्या इस्राएली लोकांचा ‘आक्रोश ऐकला.’ (यशया ५:७ वाचा.) त्यामुळे जे वारंवार नियमशास्त्राविरुद्ध काम करत होते आणि इतरांशी अन्यायीपणे वागत होते अशा लोकांना यहोवाने शिक्षा केली.—यश. ५:५, १३.

४. जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो तेव्हा येशूला कसं वाटतं? (चित्रसुद्धा पाहा.)

४ यहोवाप्रमाणेच येशूलाही न्याय प्रिय आहे आणि त्याला अन्यायाचा द्वेष आहे. एकदा येशूने एका माणसाला पाहिलं. त्याचा हात वाळलेला होता. त्याला पाहून येशूला खूप कळवळा आला. त्यामुळे त्याला त्याची मदत करावीशी वाटली. पण कठोर मनाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांना येशूसारखं अजिबात वाटलं नाही. त्यांना त्या बिचाऱ्‍या माणसाची बिलकुल पर्वा नव्हती. येशू शब्बाथाचा नियम मोडतोय याकडेच त्यांचं लक्ष होतं. मग येशूला त्या धार्मिक पुढाऱ्‍यांबद्दल काय वाटलं? “त्यांची मनं किती कठोर आहेत हे पाहून त्याला खूप दुःख झालं.”—मार्क ३:१-६.

येशू सभास्थानात यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांसोबत हात सुकलेल्या माणसाला बरं करण्याबद्दल बोलतोय. ते धार्मिक पुढारी येशूकडे अगदी तुच्छ नजरेने बघत आहेत.

यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांना लोकांशी काहीच घेणंदेणं नव्हतं. पण येशूला मात्र लोकांची खूप काळजी होती. (परिच्छेद ४ पाहा)


५. आपण अन्यायाबद्दल आपल्या मनात राग का ठेवू नये?

५ आपण पाहिलं, की यहोवा आणि येशूलाही अन्यायाचा राग येतो. त्यामुळे आपल्यालाही तसं वाटणं काही चुकीचं नाही. (इफिस. ४:२६) पण असं असलं तरी, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, अन्याय पाहून आपल्याला राग येत असला आणि त्यासाठी आपल्याकडे एक योग्य कारण असलं, तरी आपण अन्याय काढून टाकू शकत नाही. खरंतर आपण जर जास्त काळासाठी आपल्या मनात राग ठेवला, तर त्यामुळे आपलंच शारीरिक आणि भावनिक नुकसान होऊ शकतं. (स्तो. ३७:१, ८; याको. १:२०) मग आपण अन्यायाचा सामना कसा करू शकतो? चला, येशूचंच उदाहरण पाहू या.

इतरांवर अन्याय होताना पाहून येशूने काय केलं?

६. येशू पृथ्वीवर असताना लोकांना कोणत्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागत होता? (चित्रसुद्धा पाहा.)

६ येशूच्या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता. धार्मिक पुढारी सामान्य लोकांवर नियमांचं ओझं लादत होते आणि त्यामुळे त्यांचं जगणं खूप कठीण झालं होतं. येशूने हा सगळा अन्याय पाहिला होता. (मत्त. २३:२-४) त्याला माहीत होतं, की रोमी अधिकारी लोकांवर खूप जुलूम करत आहेत. त्यामुळे बऱ्‍याच यहुद्यांना रोमच्या शासनातून सुटका हवी होती. रोमी लोकांविरुद्ध लढण्यासाठी काहींनी तर गटसुद्धा तयार केले होते. असं असलं तरी, येशूने बदल घडवून आणण्यासाठी कोणत्याही चळवळी सुरू केल्या नाही किंवा त्यांना पाठिंबा दिला नाही. याउलट जेव्हा त्याला कळलं, की लोक त्याला राजा बनवायचा विचार करत आहेत तेव्हा तो तिथून निघून गेला.—योहा. ६:१५.

येशू एकटाच डोंगराकडे जाणाऱ्‍या मार्गावरून चालत आहे. डोंगराच्या पायथ्याला लोकांचा खूप मोठा जमाव जमलाय.

लोकांनी येशूला राजकारणात सामील करून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा तो त्यांच्यापासून दूर निघून गेला (परिच्छेद ६ पाहा)


७-८. पृथ्वीवर असताना येशूने अन्याय काढून टाकण्याचा प्रयत्न का केला नाही? (योहान १८:३६)

७ पृथ्वीवर असताना आपल्या आजूबाजूला होणारा अन्याय काढून टाकण्यासाठी येशूने राजकारणात भाग घेतला नाही. कारण त्याला माहीत होतं की माणसांना स्वतःवर राज्य करण्याचा अधिकार नाही आणि क्षमताही नाही. (स्तो. १४६:३; यिर्म. १०:२३) त्यासोबतच ते अन्यायाचं मूळ कारणही काढून टाकू शकत नाहीत. कारण या जगावर सैतानाचं राज्य आहे आणि जगातले बरेच लोक सहसा त्याच्यासारखंच वागतात. (योहा. ८:४४; इफिस. २:२) याशिवाय, अपरिपूर्णतेमुळे चांगल्यातला चांगला माणूससुद्धा नेहमीच न्यायीपणे वागू शकत नाही.—उप. ७:२०.

८ येशूला माहीत होतं की फक्‍त देवाचं राज्यच अन्यायाचं मूळ कारण पूर्णपणे काढून टाकेल. यासाठीच त्याने त्याचा वेळ आणि शक्‍ती “देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित” करण्यात घालवली. (लूक ८:१) त्याने “नीतिमत्त्वाची तहान आणि भूक” असलेल्यांना अशी खातरी दिली की भ्रष्टाचाराचा आणि अन्यायाचा नक्कीच अंत होईल. (मत्त. ५:६ आणि हिंदी अध्ययन नोट; लूक १८:७, ८) पण हा बदल कुठल्याही सामाजिक चळवळीमुळे नाही, तर फक्‍त देवाच्या राज्यामुळेच घडून येईल आणि ते “राज्य या जगाचं नाही.”—योहान १८:३६ वाचा.

येशूसारखं वागा

९. फक्‍त देवाचं राज्यच सर्व अन्याय काढून टाकेल याची तुम्हाला कशामुळे खातरी पटते?

९ येशूच्या काळात लोकांवर जितका अन्याय होत होता, त्यापेक्षा जास्त अन्याय आज होतोय. असं असलं तरी या शेवटच्या दिवसांतही अन्यायाचं मूळ कारण सैतान आणि त्याच्या प्रभावाखाली असणारे अपरिपूर्ण लोकच आहेत. (२ तीम. ३:१-५, १३; प्रकटी. १२:१२) येशूसारखंच आपल्यालाही माहीत आहे, की फक्‍त देवाचं राज्यच अन्यायाचं मूळ कारण काढून टाकू शकतं. देवाच्या राज्याला पाठिंबा असल्यामुळेच आपण अन्याय दूर करण्यासाठी मोर्च्यांमध्ये, आंदोलनांमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये भाग घ्यायला साफ नकार देतो. स्टेसीa नावाच्या बहिणीचा अनुभव विचारात घ्या. सत्य शिकण्याआधी स्टेसी अन्यायाविरुद्ध असलेल्या मोर्च्यांमध्ये नियमितपणे भाग घ्यायची. पण ती जे करत होती त्याबद्दल तिच्या मनात शंका येऊ लागली. ती म्हणते: “मोर्च्यांमध्ये भाग घेत असताना माझ्या मनात प्रश्‍न यायचा, की ‘मी जे करत आहे ते बरोबरए का?’ पण मी आता देवाच्या राज्याला पाठिंबा देत आहे. त्यामुळे मी जे करत आहे ते अगदी बरोबर आहे याची मला खातरीए. मला माहीत आहे, की जुलमाला बळी पडलेल्या प्रत्येकासाठी यहोवा जितक्या चांगल्या प्रकारे लढू शकतो, तितक्या चांगल्या प्रकारे मी कधीच लढू शकणार नाही.”—स्तो. ७२:१, ४.

१०. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या चळवळी येशूच्या शिकवणींविरुद्ध का आहेत? (मत्तय ५:४३-४८) (चित्रसुद्धा पहा.)

१० आज बरेच लोक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतात आणि बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. पण असं दिसून आलंय की या चळवळींमध्ये भाग घेणारे लोक कधीकधी रागाने पेटून उठतात. ते कायदा आपल्या हातात घेतात आणि लोकांचं नुकसान करतात. (इफिस. ४:३१) जेफरी नावाचा एक भाऊ काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या: “एखादं आंदोलन शांततेत चाललंय असं वाटत असलं, तरी काही क्षणांतच त्याचं रूपांतर हिंसेत आणि लूटमारीत होऊ शकतं.” पण येशूने आपल्याला याच्या अगदी उलट शिकवलंय. त्याने आपल्याला सगळ्या लोकांशी, इतकंच काय तर, जे आपल्याशी सहमत नसतात किंवा आपला छळ करतात त्यांच्याशीही प्रेमाने वागायला सांगितलंय. (मत्तय ५:४३-४८ वाचा.) म्हणून ख्रिस्ती या नात्याने आपण येशूसारखं वागायचा पुरेपूर प्रयत्न करतो.

वर्दळीच्या रस्त्यावर काही लोक आंदोलन करत आहेत. पण एक बहीण त्यांच्याकडे न बघता शांतपणे जात आहे.

आपल्या काळातल्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्‌यांच्या बाबतीत तटस्थ राहण्यासाठी धाडस लागतं (परिच्छेद १० पाहा)


११. येशूसारखं वागणं आपल्याला कधीकधी कठीण का जाऊ शकतं?

११ आपल्याला माहीत आहे, की देवाचं राज्य अन्याय पूर्णपणे काढून टाकेल. असं असलं तरी, आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा येशूसारखं वागायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. जानिया नावाच्या बहिणीसोबत काय घडलं याचा विचार करा. तिच्या रंगामुळे तिला भेदभावाचा सामना करावा लागला. ती म्हणते: “लोक मला जे बोलले, त्याचं मला खूप वाईट वाटलं. मला इतका राग आला, की त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं मला वाटलं. मग मी विचार केला, की मी वंशभेद आणि वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्‍या चळवळींमध्ये भाग घेईन. यामुळे तरी माझा राग शांत होईल असं मला वाटलं.” पण काही काळाने जानियाच्या लक्षात आलं की तिला स्वतःच्या विचारांमध्ये बदल करण्याची गरज आहे. ती म्हणते: “मला समजलं की यहोवावर भरवसा ठेवण्याऐवजी, मी लोकांवर जास्त भरवसा ठेवत होते आणि त्यांचं ऐकत होते. म्हणून मी त्या चळवळीमध्ये पुन्हा भाग न घ्यायचं ठरवलं.” जेव्हा आपल्यासोबत अन्याय होतो किंवा आपण इतरांवर अन्याय होताना पाहतो, तेव्हा राग येणं साहजिक आहे. पण आपला आपल्या रागावर ताबा असला पाहिजे आणि आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या जगाचे भाग नाही.—योहा. १५:१९.

१२. आपण जे वाचतो, पाहतो किंवा ऐकतो त्याबद्दल काळजीपूर्वक विचार करणं का गरजेचं आहे?

१२ आपल्यावर किंवा इतरांवर अन्याय होतो, तेव्हा शांत राहायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? एक गोष्ट म्हणजे आपण काय वाचतो, काय पाहतो किंवा काय ऐकतो त्याचा काळजीपूर्वक विचार करणं. कधीकधी इंटरनेटवर माहिती अशा प्रकारे मांडली जाते, ज्यामुळे लोकांना आश्‍चर्य वाटतं किंवा ते सरकारविरुद्ध कुरकुर करतात. पण ती माहिती जरी बरोबर असली, तरी आपण ती सतत वाचत राहिल्यामुळे समस्या सुटणार आहे का? मुळीच नाही. जर आपण अशा प्रकारची माहिती घेण्यात भरपूर वेळ घालवला, तर आपण उगीचच वैतागून जाऊ किंवा निराश होऊ. (नीति. २४:१०) याहून वाईट म्हणजे, यामुळे सर्व प्रकारचा अन्याय काढून टाकणाऱ्‍या देवाच्या राज्यापासून आपलं लक्ष भरकटू शकतं.

१३. दररोज बायबल वाचल्यामुळे आपल्याला अन्यायाबद्दल योग्य दृष्टिकोन टिकवून ठेवायला कशामुळे मदत होऊ शकते?

१३ जर आपण दररोज बायबल वाचलं आणि त्यावर मनन केलं, तर आपल्याला अन्यायाचा सामना करायला मदत होऊ शकते. आलिया नावाच्या बहिणीचा विचार करा. तिच्या समाजातल्या लोकांवर अन्याय होत होता. हे पाहून तिला खूप वाईट वाटलं. जे लोक वाईट वागत होते, त्यांना जबाबदार धरलं जात नव्हतं. म्हणून तिला खूप राग येत होता. ती म्हणते: “मला स्वतःला विचारावं लागलं, की ‘या सगळ्या समस्या यहोवा काढून टाकेल यावर माझा खरंच विश्‍वास आहे का?’ त्यानंतर मी ईयोब ३४:२२-२९ वाचलं. त्या वचनामुळे मला याची आठवण झाली, की यहोवापासून कुठलीच गोष्ट लपत नाही. कोणाचा न्याय कशा प्रकारे करायचा आहे हे फक्‍त त्यालाच माहीत आहे आणि तोच सगळं काही ठीक करेल.” पण मग देवाचं राज्य सगळ्या समस्या काढून टाकेल, याची वाट पाहत असताना आपण आत्ता काय करू शकतो?

आपण आत्ता काय करू शकतो?

१४. आपण आत्ता काय करू शकतो? (कलस्सैकर ३:१०, ११)

१४ लोक इतरांशी कसं वागतात हे आपल्या हातात नाही. पण आपण इतरांशी कसं वागतो हे मात्र आपल्या हातात आहे. आधी पाहिल्याप्रमाणे, आपण एकमेकांवर प्रेम करून येशूसारखं वागू शकतो. याच प्रेमामुळे आपण इतरांशी, तसंच आपल्यावर अन्याय करणाऱ्‍यांशीसुद्धा आदराने वागायला प्रवृत्त होतो. (मत्त. ७:१२; रोम. १२:१७) आपण जेव्हा सगळ्यांशी दयेने आणि न्यायाने वागतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो.—कलस्सैकर ३:१०, ११ वाचा.

१५. इतरांना बायबलची सत्यं सांगितल्यामुळे काय फायदा होऊ शकतो?

१५ अन्यायाचा सामना करायचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे इतरांना बायबलचं सत्य सांगणं. आपण असं का म्हणू शकतो? कारण “यहोवाचं ज्ञान” आधी क्रूर आणि हिंसक असलेल्या व्यक्‍तीला दयाळू आणि शांत स्वभावाचा बनवू शकतं. (यश. ११:६, ७, ९) जेमल नाव असलेल्या भावाचा विचार करा. सत्य शिकण्याआधी त्याला वाटायचं, की त्याच्या देशातलं सरकार लोकांशी वाईट वागतंय. त्यामुळे, त्या सरकाराविरुद्ध लढणाऱ्‍या एका गटात तो सामील झाला. तो म्हणतो: “एखाद्याविरुद्ध लढून तुम्ही त्याला बळजबरीने बदल करायला लावू शकत नाही. मीसुद्धा तसा बदललो नाही. तर मी जे बायबलचं सत्य शिकत होतो, त्यामुळे मी बदललो.” जेमल बायबलमधून जे शिकला, त्यामुळे त्याने सरकाराविरुद्ध लढायचा विचार डोक्यातून काढून टाकला. जर जास्तीत जास्त लोकांनी बायबल सत्यं शिकून घेतली आणि स्वतःमध्ये बदल केले, तर अन्याय करणारे खूप कमी लोक उरतील.

१६. तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगावंसं का वाटतं?

१६ येशूप्रमाणेच आपणही लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगायला उत्सुक असतो. कारण, ते राज्यच अन्याय पूर्णपणे काढून टाकू शकतं. याच आशेमुळे अन्याय सहन करणाऱ्‍यांना सांत्वन मिळू शकतं. (यिर्म. २९:११) आधी उल्लेख केलेली स्टेसी म्हणते: “बायबलची सत्यं शिकून घेतल्यामुळे मला खरंच खूप मदत झाली. मी जो अन्याय पाहिलाय आणि अनुभवलाय त्याचा मला सामना करता आला.” यहोवा बायबलच्या संदेशाचा वापर करून आपल्याला सांत्वन देतो. बायबलमधून सांत्वन देणारा हा संदेश इतरांना सांगण्यासाठी आधी आपली तयारी असली पाहिजे. या लेखात सांगितलेली वचनं खरी आहेत, याची तुम्हाला जितकी जास्त खातरी पटेल, तितकं जास्त शाळेमध्ये किंवा कामावर प्रश्‍न विचारणाऱ्‍या लोकांना उत्तर द्यायला तुम्हाला सोपं जाईल.b

१७. आपल्यावर होणाऱ्‍या अन्यायाचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

१७ आपल्याला माहीत आहे की जोपर्यंत सैतान या ‘जगाचा राजा’ आहे, तोपर्यंत आपल्याला अन्याय सहन करावा लागेल. पण लवकरच त्याला “हाकलून दिलं जाईल.” त्यामुळे आपण असहाय्य किंवा आशाहीन नाही. (योहा. १२:३१) यहोवा बायबलमधून फक्‍त आपल्याला अन्यायाचं कारणच सांगत नाही, तर आपल्याला अन्याय सहन करताना पाहून त्याला कसं वाटतं हेही सांगतो. (स्तो. ३४:१७-१९) म्हणूनच, त्याच्या मुलाद्वारे म्हणजे येशूद्वारे तो आपल्याला अन्यायाचा सामना करायला शिकवतो. तसंच, लवकरच या सर्व अन्यायाचा कायमचा अंत होणार आहे हेही तो आपल्याला सांगतो. (२ पेत्र ३:१३) तर चला, आपण राज्याचा आनंदाचा संदेश आवेशाने सगळ्यांना सांगत राहू या. आणि “न्यायाने आणि नीतिमत्त्वाने” भरलेल्या जगाची आतुरतेने वाट पाहू या.—यश. ९:७.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपल्याला अन्याय का सहन होत नाही?

  • अन्याय काढून टाकण्यासाठी लोक जे करतात त्याला आपण पाठिंबा का देत नाही?

  • अन्यायाचा सामना करण्यासाठी आपण आत्ता काय करू शकतो?

गीत १५८ “उशीर ना त्याला!”

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा या माहितीपत्रकातली आणखी माहिती—क मधले २४-२७ मुद्देसुद्धा पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा