वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w19 जुलै पृ. २५-२९
  • यहोवाने मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लाजाळू स्वभावावर मात करणं
  • गिलियड प्रशालेत मिळालेला एक मौल्यवान धडा
  • मिशनरी सेवेत मिळालेलं सर्वोत्तम प्रशिक्षण
  • केनियामध्ये सेवा करणं
  • इथियोपियामध्ये आशीर्वाद अनुभवणे
  • यहोवाने वाढ होऊ दिली
  • यहोवाच्या सेवेतले सुखद अनुभव आणि शिकायला मिळालेल्या गोष्टी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • आपल्या महान शिक्षकाकडून आयुष्यभरासाठी मिळालेले धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा निष्ठेने वागतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा मला माझ्या तरुणपणापासून शिकवत आला आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
w19 जुलै पृ. २५-२९
मॅनफ्रेड आणि गेल टोनाक यांच्या लग्नाच्या दिवशी

जीवन कथा

यहोवाने मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिले

मॅनफ्रेड टोनाक

‘मला पायनियरिंग करायची होती, पण वाटायचं पायनियरींग करणं खरंच रोमांचक असेल का?’ मला माझी जर्मनीतली नोकरी आवडायची. मी आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या भागांत खाद्य सामग्री पाठवायचो. जसं की, दार एस्‌ सलाम, एलीसाबेथविले आणि अस्मारा या ठिकाणी. त्या वेळी मी विचारही केला नव्हता की पुढे जाऊन मी या आणि आफ्रिकेच्या इतर भागांत यहोवाची पूर्ण वेळची सेवा करीन!

शेवटी मी पायनियरिंग सुरू केली, तेव्हा मी विचारही केला नव्हता अशा प्रकारे माझं जीवन बदललं. (इफिस. ३:२०) पण तुम्ही विचार कराल नेमकं काय घडलं? चला सुरुवातीपासून सांगतो.

दुसरं महायुद्ध सुरू झाल्याच्या काही महिन्यांनी, म्हणजे १२ डिसेंबर १९३९ मध्ये जर्मनीतल्या बर्लिन शहरात माझा जन्म झाला. मग १९४५ मध्ये युद्ध संपणार होतं तेव्हा बर्लिन शहरावर विमानाद्वारे बरेचसे बॉम्ब हल्ले झाले. एकदा बॉम्ब हल्ले होत असताना आमचं घर जिथे होतं त्या रस्त्यावर बॉम्ब टाकण्यात आला. म्हणून मग आम्ही एका सुरक्षित ठिकाणी पळून गेलो. मग नंतर आम्ही आमच्या आईचा जन्म झाला होता तिथे, म्हणजे एरफर्टला गेलो.

जवळपास १९५० मध्ये मॅनफ्रेड टोनाक आपल्या आईबाबा आणि बहिणीसोबत

१९५० साली जर्मनीमध्ये माझ्या आईवडिलांसोबत आणि बहिणीसोबत

आई सत्याच्या शोधात होती. यासाठी तिने खूप प्रयत्न केले. तिने वेगवेगळ्या तत्त्वज्ञानी लोकांनी लिहिलेली पुस्तकं वाचली आणि अनेक धर्म तपासून पाहिले. पण तिचं काही समाधान झालं नाही. मग १९४८ मध्ये दोन साक्षीदार आमच्या घरी आले. माझ्या आईने त्यांना घरात बोलवलं आणि एका पाठोपाठ कितीतरी प्रश्‍न विचारले. मग तासाभराच्या आतच तिने मला आणि माझ्या लहान बहिणीला म्हटलं, “मला सत्य सापडलंय!” मग काही काळातच माझी आई, मी आणि माझी बहीण एरफर्टमध्ये सभांना जाऊ लागलो.

१९५० साली आम्ही पुन्हा बर्लिनला राहायला गेलो. तिथे आम्ही बर्लिन-क्र्‌युजबर्ग मंडळीत जाऊ लागलो. मग नंतर आम्ही आणखी एका ठिकाणी राहायला गेलो. तिथे आम्ही बर्लिन-टेम्पलहॉफ मंडळीत जाऊ लागलो. मग कालांतराने आईचा बाप्तिस्मा झाला. मी मात्र बाप्तिस्मा घ्यायला कचरत होतो. पण का?

लाजाळू स्वभावावर मात करणं

मी लाजाळू स्वभावाचा होतो म्हणून मला यहोवाच्या सेवेत जास्त करणं कठीण जात होतं. मी सेवाकार्यात भाग घ्यायचो पण दोन वर्षांपर्यंत माझ्यासोबत असणारे प्रचारकच घरमालकांशी बोलायचे. मी मात्र गप्प बसायचो. मग मी अशा काही बंधुभगिनींसोबत वेळ घालवला ज्यांनी धैर्य दाखवून यहोवाची उपासना केली होती. त्यांपैकी काही थोड्या काळासाठी नात्झी छळछावणीत होते, तर काहींनी पूर्व जर्मनीत तुरुंगवास सोसला होता. इतर असेही भाऊबहीण होते ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपली साहित्यं लपवून पूर्व जर्मनीत नेली. जर ते पकडले गेले असते तर त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं असतं. त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे मी खूप प्रभावित झालो. मी विचार केला, जर यांनी आपला जीव आणि स्वातंत्र्य यहोवासाठी आणि इतर भाऊबहिणींसाठी धोक्यात घातलं, तर मला तर फक्‍त आपल्या लाजाळू स्वभावावर मात करायची आहे. मी यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे.

मग १९५५ या वर्षी मी खास प्रचार मोहिमेत सहभाग घेतला आणि तेव्हा मी माझ्या लाजाळू स्वभावावर हळूहळू मात करायला सुरुवात केली. बंधू नेथन नॉर यांनी इनफोरमंटa यात आलेल्या एका पत्रात अशी घोषणा केली की ही मोहीम संघटनेने आखलेली आजपर्यंतची सर्वात मोठी मोहीम असणार आहे. त्यांनी म्हटलं, जर यात सर्व प्रचारकांनी भाग घेतला तर “आजपर्यंतच्या प्रचारकार्यातला हा आपल्यासाठी सर्वात चांगला महिना ठरेल!” आणि त्यांचे शब्द अगदी शंभर टक्के खरे ठरले. पुढे मी यहोवाला समर्पण केलं आणि १९५६ मध्ये माझ्या बाबांचा, माझा आणि माझ्या बहिणीचा बाप्तिस्मा झाला. पण लवकरच मला आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागणार होता.

मला पायनियरिंग सुरू करायची होती. पण मी आता नाही तर नंतर सुरू करेन, असा बरीच वर्षं विचार करत राहिलो. त्याआधी मला इतर गोष्टी करायच्या होत्या. मी बर्लिनमध्ये, वस्तू परदेशातून होलसेलमध्ये खरेदी-विक्री आणि आयात-निर्यात व्यापार यांबद्दल शिकून घ्यायचं ठरवलं. त्यानंतर मला कामाचा अनुभव मिळावा म्हणून नोकरीही करून बघायची होती. म्हणून मी १९६१ साली हेम्बुर्गमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. जर्मनीचं सर्वात मोठं बंदर हेम्बुर्गमध्ये आहे. माझं काम मला इतकं आवडू लागलं की मी पायनियरिंग करायचं पुढे ढकलू लागलो. मग पुढे काय झालं?

यहोवाची सेवा ही आपल्या जीवनात सर्वात पहिल्या स्थानी असणं गरजेचं आहे हे समजण्यासाठी मला प्रेमळ बांधवांनी मदत केली. आणि त्यासाठी मी यहोवाचा खूप आभारी आहे. माझ्या बऱ्‍याचशा मित्रांनी पायनियरिंग सुरू केली होती. त्यांचं एक चांगलं उदाहरण माझ्यासमोर होतं. त्यासोबतच, बंधू एरीक मुन्ड यांनी मला यहोवावर भरवसा ठेवण्याचं प्रोत्साहन दिलं. बंधू एरीक यांना छळछावणीत राहावं लागलं होतं. त्यांनी म्हटलं की छळछावणीत ज्या बांधवांनी स्वतःवर भरवसा ठेवला त्यांचा पुढे जाऊन विश्‍वास कमकुवत झाला. पण ज्यांचा यहोवावर पूर्णपणे भरवसा होता ते विश्‍वासू राहिले आणि मंडळीचे भक्कम आधारस्तंभ बनले.

१९६३ मध्ये मॅनफ्रेड टोनाक

१९६३ मध्ये पायनियरिंग सुरू केली तेव्हा

तसंच, बंधू मार्टीन पोएट्‌जिंगर जे पुढे जाऊन नियमन मंडळाचे सदस्य बनले ते बांधवांना प्रोत्साहन देत राहिले. त्यांनी म्हटलं: “हिंमत ही खूप मौल्यवान संपत्ती आहे!” या शब्दांवर मी खोलवर विचार केला आणि शेवटी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व जून १९६३ मध्ये मी पायनियरिंग सुरू केली. हा माझ्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय होता! मग दोन महिन्यांनी मी एक नवीन नोकरी शोधणार, त्याआधीच मला खास पायनियर म्हणून सेवा करण्याची नेमणूक मिळाली. मग काही वर्षांनंतर माझ्या सर्व अपेक्षेपलीकडे असलेला आशीर्वाद यहोवाने मला दिला. मला गिलियड प्रशालेच्या ४४ व्या वर्गाचं आमंत्रण मिळालं.

गिलियड प्रशालेत मिळालेला एक मौल्यवान धडा

बंधू नेथन नॉर आणि लायमन स्वींगल यांच्याकडून मी खासकरून एक महत्त्वपूर्ण धडा शिकलो: “आपली नेमणूक सहजासहजी सोडू नका.” कठीण वाटत असलं तरी मिळालेली नेमणूक पूर्ण करायची असं प्रोत्साहन त्यांनी दिलं. बंधू नॉरने म्हटलं: “तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करणार? गरीबी, अस्वच्छता, डास यांवर की झाडं, फुलं, हसरे चेहरे यांवर? लोकांवर प्रेम करायला शिका!” एक दिवस बंधू स्वींगल, काही बांधवांनी लगेच हार का मानली हे समजवत होते, तेव्हा ते खूप भावुक झाले; त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. मग शांत होण्यासाठी त्यांना त्यांचं भाषण थोड्या वेळेसाठी थांबवावं लागलं. ही गोष्ट माझ्या मनाला खूप भिडली आणि मी मनाशी ठाम निर्णय केला की मी ख्रिस्ताला आणि आपल्या विश्‍वासू बांधवांना कधीच निराश करणार नाही.—मत्त. २५:४०.

१९६७ मध्ये मॅनफ्रेड टोनाक, क्लॉड लिन्डसे आणि हेनरीच डेह्नबॉस्टल काँगोच्या लुबुम्बाशीमध्ये मिशनरी सेवेत

१९६७ मध्ये मी, क्लॉड आणि हेनरीच काँगोच्या लुबुम्बाशीमध्ये मिशनरी सेवेत

आम्हाला आमची नेमणूक मिळाली तेव्हा बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या काही जणांनी आमच्यापैकी काहींना विचारलं की आम्ही सेवा करायला कुठे जाणार. प्रत्येकाचं उत्तर ऐकल्यावर ते त्याबद्दल सकारात्मक बोलले. पण जेव्हा मी “काँगो (किन्शासा)” असं म्हटलं तेव्हा मात्र त्यांनी म्हटलं, “ओ, काँगो! यहोवा तुमच्यासोबत असो!” त्या दिवसांत काँगो (किन्शासा) हिंसा, हत्या, युद्ध यांसाठी चर्चेत असायचं. बऱ्‍याचशा बातम्यांमध्ये त्याबद्दल सांगितलं जायचं. पण मी गिलियडमध्ये शिकलेल्या गोष्टींवर विचार करत राहिलो. सप्टेंबर १९६७ मध्ये आम्ही पदवीधर झालो. त्यानंतर काही काळातच मी, हेनरीच डेह्नबॉस्टल आणि क्लॉड लिन्डसे आम्ही तिघं काँगोची राजधानी किन्शासाला जायला निघालो.

मिशनरी सेवेत मिळालेलं सर्वोत्तम प्रशिक्षण

किन्शासाला पोहोचल्यावर आम्ही तीन महिन्यांपर्यंत फ्रेंच भाषा शिकलो. मग आम्ही लुबुम्बाशी शहरात आलो. याचं नाव आधी एलीसाबेथविले असं होतं. लुबुम्बाशी काँगोच्या दक्षिण भागात, झांबियाच्या सीमेजवळ आहे. आम्ही मिशनरी गृहात राहू लागलो. ते शहराच्या मधोमध होतं.

लुबुम्बाशीमध्ये बऱ्‍याचशा भागात प्रचार झाला नव्हता. तिथल्या लोकांना आम्ही पहिल्यांदा प्रचार करणार या गोष्टीमुळे आम्ही खूप उत्सुक होतो. लवकरच आम्हाला पुष्कळ आस्थेवाईक लोक भेटले जे बायबल अभ्यास करायला तयार होते. पण सर्वांसोबत अभ्यास करायला वेळ कमी पडत होता. सरकारी आणि पोलीस अधिकारी यांनासुद्धा आम्ही प्रचार केला. अनेकांनी देवाच्या वचनाबद्दल आणि प्रचारकार्याबद्दल आदर दाखवला. तिथले लोक जास्तकरून स्वाहिली भाषा बोलायचे त्यामुळे मी आणि क्लॉड लिन्डसे आम्ही दोघांनी ही भाषादेखील शिकून घेतली. त्यानंतर आम्हाला स्वाहिली भाषा बोलल्या जाणाऱ्‍या मंडळी पाठवण्यात आलं.

आम्हाला भरपूर चांगले अनुभव आले पण अनेक आव्हानांनाही आम्हाला तोंड द्यावं लागलं. कितीतरी वेळा दारू प्यायलेले सशस्त्र सैनिक आणि रागीट पोलीस आमच्यावर खोटे आरोप लावायचे. एकदा तर मिशनरी गृहात मंडळीची सभा चालू असताना पोलिसांनी बंदुकी घेऊन तिथे धाड टाकली. ते आम्हाला पोलीस चौकीत घेऊन गेले आणि रात्री १० वाजेपर्यंत आम्हाला जमिनीवर बसवून ठेवलं आणि मग सोडून दिलं.

१९६९ मध्ये मला प्रवासीकार्याची नेमणूक मिळाली. विभागीय पर्यवेक्षक म्हणून मी सेवा केली तेव्हा मला उंच गवतांतून, चिखलातून खूप चालावं लागायचं. पण आफ्रिकेत हे सर्वसामान्य होतं. एका गावात तर रात्री माझ्या पलंगाखाली एक कोंबडी आणि तिची पिल्लं झोपायची. दिवस उजाडायच्या आतच ती आणि तिची पिल्लं जो आवाज करायचे आणि मला उठवायचे ते मी कधीच विसरू शकणार नाही. तसंच, संध्याकाळी बांधवांनी शेकोटीभोवती बसून केलेल्या सत्याबद्दलच्या चर्चाही मी कधीच विसरू शकत नाही.

एक मोठं आव्हान आमच्यासमोर होतं, ते म्हणजे काही जण यहोवाचे साक्षीदार बनण्याचं ढोंग करत होते. पण खरंतर ते कीटावाला चळवळीलाb पाठींबा देत होते. त्यांपैकी काही जणांचा बाप्तिस्माही झाला होता आणि मंडळीत ते वडिलांची जबाबदारीही हाताळत होते. हे लोक ‘दडलेल्या खडकांसारखे’ होते. पण विश्‍वासू बंधुभगिनी यांच्या बहकाव्यात आले नाहीत. (यहू. १२) कालांतराने यहोवाने या लोकांना मंडळीतून काढून टाकलं आणि त्यानंतर बरेच लोक सत्यात आले.

मग १९७१ मध्ये मला किन्शासाच्या शाखा कार्यालयात नेमणूक मिळाली. तिथे मला वेगवेगळी कामं हाताळावी लागली जसं की पत्रव्यवहार, साहित्यांची मागणी आणि सेवाकार्याशी संबंधित कार्य. मूलभूत सुविधा जरी नीट कार्य करत नसल्या तरी मोठ्या देशात आपल्या कामाचं नियोजन कसं करायचं हे मी बेथेलमध्ये शिकलो. कधीकधी तर विमानाने पाठवलेले टपाल मंडळीपर्यंत बऱ्‍याच महिन्यांनंतर पोहोचायचे. कारण आधी टपाल विमानातून उतरवून बोटीत ठेवण्यात यायचे. मग त्या बोटी कित्येक आठवड्यांपर्यंत एकाच जागी थांबून राहायच्या. कारण पाण्यात भरपूर प्रमाणात गवत असल्यामुळे बोटींना पुढे जाणं शक्य नसायचं. या सर्व समस्या असल्या तरी काम कसं पूर्ण करायचं हे मी तिथल्या बांधवांकडून शिकलो.

बांधव कमी पैशात मोठमोठी अधिवेशनं कशी आयोजित करतात हे पाहून मला खूप आश्‍चर्य वाटायचं. वाळवीच्या वारूळाला आकार देऊन ते मंच तयार करायचे. तसंच, ते हत्ती गवत नावाच्या उंच गवताची भिंत आणि त्यापासूनच बसण्यासाठी गोल आसनही तयार करायचे. ते बांबूचा वापर करून स्तंभ तयार करायचे आणि बोरूंचं छप्पर आणि टेबल बनवायचे. तसंच, ते बांबूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी झाडांच्या सालींचा वापर दोरीप्रमाणे करायचे. समोर येणाऱ्‍या समस्यांवर कशी मात करायची यासाठी या बंधुभगिनींच्या चांगल्या कल्पना पाहून मी थक्कच राहायचो. हे बंधुभगिनी हळूहळू माझ्या खूप जिवाभावाचे झाले. पण मला त्यांना सोडून नवीन नेमणुकीसाठी जावं लागलं तेव्हा मात्र मला त्यांची खूप आठवण आली.

केनियामध्ये सेवा करणं

१९७४ साली मला केनियामधल्या नैरोबी इथल्या शाखा कार्यालयात पाठवण्यात आलं. तिथे भरपूर काम होतं कारण केनिया शाखा जवळपासच्या १० देशांत चाललेल्या प्रचारकार्याचं काम पाहायची. तिथल्या काहींमध्ये तर आपल्या कामावर बंदी होती. मला कित्येक वेळा अशाच देशांमध्ये पाठवलं जायचं आणि इथियोपियामध्ये तर हमखास पाठवण्यात यायचं. तिथे आपल्या बांधवांना त्या वेळी तीव्र छळाचा सामना करावा लागला होता. बऱ्‍याचशा बांधवांना खूप वाईट वागणूक देण्यात आली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं; काहींना तर मारूनही टाकण्यात आलं. या सर्व गोष्टी घडल्या तरी आपले बांधव विश्‍वासात टिकून राहिले कारण त्यांचं यहोवासोबत आणि एकमेकांसोबत चांगलं नातं होतं.

१९८० मध्ये माझ्या जीवनात एक खूप छान प्रसंग आला. माझं लग्न गेल मॅथेसनशी झालं. गेल मुळची कॅनडातली. आम्ही दोघं गिलियड प्रशालेत भेटलो होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पत्र लिहायचो. गेल मिशनरी म्हणून बोलिव्हियामध्ये सेवा करत होती. मग आम्ही १२ वर्षांनंतर पुन्हा न्यूयॉर्कमध्ये भेटलो. त्यानंतर काही काळातच आम्ही केनियामध्ये लग्न केलं. गेल नेहमी यहोवासारखा विचार करते आणि आहे त्यात समाधानी राहते याबद्दल मी तिचे नेहमी आभार मानतो. माझ्यासाठी आजही तिची साथ खूप मोलाची आहे आणि ती माझी एक प्रेमळ सोबतीण आहे.

१९८६ मध्ये मला आणि गेलला प्रवासीकार्याची नेमणूक मिळाली. पण त्यासोबतच शाखा समितीचा सदस्य म्हणूनही मला काम पाहावं लागायचं. त्या वेळी केनिया शाखा बऱ्‍याच देशांमध्ये चाललेलं प्रचाराचं काम पाहायची.

१९९२ मध्ये मॅनफ्रेड टोनाक अस्मारा (एरिट्रियामधलं) इथे अधिवेशनात भाषण देताना

१९९२ मध्ये अस्मारा इथे अधिवेशनात भाषण देताना

१९९२ मध्ये अस्मारा (एरिट्रियामधलं) इथे झालेल्या अधिवेशनासाठीची तयारी मी कधीच विसरू शकत नाही. त्या वेळी तिथे आपल्या कामावर बंदी नव्हती. खूप शोधल्यानंतर आम्हाला अधिवेशनासाठी एक गोडाऊन मिळालं. बाहेरून तर ते चांगलं नव्हतंच पण आतून तर त्याची अगदी वाईट अवस्था होती. पण अधिवेशनाच्या दिवशी पाहिलं तर आपल्या बंधुभगिनींनी त्याचं रूपांतर अशा एका सुंदर जागेत केलं, जिथे आम्ही यहोवाची उपासना करू शकत होतो. ज्या जागा खराब दिसत होत्या त्यांना झाकून टाकण्यासाठी बऱ्‍याच कुटुंबांनी सुंदर कापडं आणली होती. आम्ही सगळे, म्हणजे अधिवेशनाला उपस्थित असलेले १,२७९ जण अधिवेशनानंतर खूप आनंदित होतो.

प्रवासीकार्य आमच्यासाठी आव्हानात्मक होतं, कारण दर आठवड्याला आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागायचं. एकदा आम्ही समुद्र किनाऱ्‍यावर असलेल्या खूप प्रशस्त बंगल्यात राहिलो, तर दुसऱ्‍या एका आठवड्यात पत्र्यांनी बनवलेल्या एका छोट्या खोलीत राहिलो. तिथे बाथरूम ३०० फूट अंतरावर होतं. पण आम्हाला सेवा कुठेही करावी लागत असली, तरी आवेशी प्रचारक आणि पायनियर यांच्यासोबत आमचा सेवेत दिवस खूप चांगला जायचा. या सर्व गोड आठवणी आम्ही कधीच विसरू शकणार नाही. मग पुढची नेमणूक मिळाल्यावर आम्हाला आमच्या प्रिय मित्रांना सोडून जावं लागायचं. आम्हाला त्यांची फार आठवण यायची.

इथियोपियामध्ये आशीर्वाद अनुभवणे

१९८७ ते १९९२ यादरम्यान केनिया शाखेखाली असलेल्या अनेक देशांत आपल्या कामाला कायदेशीर मान्यता मिळाली. यामुळे वेगवेगळ्या शाखा आणि देशातली कार्यालये स्थापन करण्यात आली. मग १९९३ मध्ये आम्हाला इथियोपियामधल्या ॲडीस अबाबा इथे सेवेसाठी पाठवण्यात आलं. इथेसुद्धा बरीच वर्षं आपलं काम गुप्तपणे केलं जायचं पण नंतर इथेही आपल्या कामाला कायदेशीर मान्यता मिळाली.

१९९६ या सालात मॅनफ्रेड आणि गेल टोनाक इथियोपियामध्ये

१९९६ मध्ये प्रवासीकार्यादरम्यान इथियोपियामध्ये शहराबाहेरच्या गावात प्रचार करताना

यहोवाने इथियोपियामध्ये चाललेल्या प्रचारकामाला आशीर्वादित केलं आहे. इथे आपले बरेच बंधुभगिनी पायनियर म्हणून सेवा करत आहेत. २०१२ पासून प्रत्येक वर्षी पाहिलं तर एकूण प्रचारकांपैकी २० टक्के पेक्षा जास्त प्रचारक नियमित पायनियर सेवा करत आहेत. त्यासोबतच, बंधुभगिनींना ईश्‍वरशासित प्रशालांमुळे चांगलं प्रशिक्षणही मिळत आहे. तसंच, १२० पेक्षा जास्त राज्य सभागृह बांधण्यात आली आहेत. २००४ मध्ये बेथेलगृह एका नवीन जागी हलवण्यात आलं आणि तिथेच संमेलनगृहसुद्धा बांधण्यात आलं. हा आमच्यासाठी एक आशीर्वादच होता!

इतकी वर्षं मला आणि गेलला इथियोपियामधल्या बांधवांसोबत वेळ घालवता आला आणि यामुळे इथे आमचे खूप जवळचे मित्रसुद्धा बनले आहेत. त्यांच्या प्रेमळ आणि दयाळू स्वभावामुळे ते आम्हाला खूप प्रिय आहेत. आता आम्हाला शारीरिक समस्या आहेत त्यामुळे आम्हाला मध्य युरोप शाखेत नेमणूक मिळाली आहे. इथे आमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. पण आम्हाला इथियोपियाच्या बांधवांची, प्रिय मित्रांची खूप आठवण येते.

यहोवाने वाढ होऊ दिली

यहोवाने त्याचं काम कसं वाढावलं हे आम्ही पाहिलं आहे. (१ करिंथ. ३:६, ९) उदाहरणार्थ, रुआंडातून काही लोक काँगोमध्ये तांबा धातूच्या शोधात आले तेव्हा मी त्यांना प्रचार केला. त्या वेळी रुआंडामध्ये एकही प्रचारक नव्हता. पण आज तिथे ३०,००० पेक्षा जास्त बंधुभगिनी आहेत. १९६७ मध्ये काँगो (किन्शासा) इथे जवळपास ६,००० प्रचारक होते, पण आज तिथे जवळपास २,३०,००० प्रचारक आहेत. तसंच, २०१८ साली तिथे १० लाखापेक्षा जास्त लोक स्मारकविधीला उपस्थित राहिले होते. एके काळी केनिया शाखेच्या देखरेखीखाली असलेल्या देशांत, आज प्रचारकांची संख्या १,००,००० पेक्षा जास्त झाली आहे.

आज मॅनफ्रेड आणि गेल टोनाक

५० वर्षांपूर्वी यहोवाने वेगवेगळ्या बंधुभगिनींचा वापर करून मला पूर्ण वेळेची सेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आजही मला माझ्या लाजाळू स्वभावावर मात करावी लागते, पण मी यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवायला शिकलो आहे. आफ्रिकेत असताना जो अनुभव आला त्यामुळे मी धीर दाखवायला आणि समाधानी वृत्ती बाळगायला शिकलो. जे बंधुभगिनी मनापासून आदरातिथ्य दाखवतात, हार मानत नाहीत आणि ज्यांचा यहोवावर भरवसा आहे अशांबद्दल गेल आणि मला भरपूर कौतुक वाटतं. यहोवाने माझ्यावर केलेल्या अपार कृपेबद्दल मी त्याचा खूप ऋणी आहे. यहोवाने खरंच मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिलेत!—स्तो. ३७:४.

a याला नंतर आपली राज्य सेवा असं नाव देण्यात आलं आणि आज याऐवजी आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका याचा वापर होतो.

b “कीटावाला” हा स्वाहिली शब्द आहे ज्याचा अर्थ “वर्चस्व, मार्गदर्शन किंवा राज्य करणं” असा होतो. त्या चळवळीचा हेतू राजनैतिक होता; या चळवळीचं समर्थन करणाऱ्‍यांना बेल्जियमपासून विभक्‍त व्हायचं होतं. कीटावाला गटाने यहोवाच्या साक्षीदारांची साहित्यं मिळवली, त्याचा अभ्यास केला आणि त्यांचं वाटपही केलं. आपले वैयक्‍तिक राजनैतिक विचार, अंधविश्‍वासावर आधारित प्रथा आणि अनैतिक जीवनशैली यांचा त्यांनी बायबलमधल्या शिकवणींत समावेश केला. अशा प्रकारे त्यांनी सत्यात भेसळ केली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा