वाचकांचे प्रश्न
नीतिवचनं ३०:१८, १९ मध्ये कोणत्या अर्थाने असं म्हणण्यात आलंय, की “पुरुषाचं तरुण स्त्रीशी वागणं” ‘समजण्यापलीकडे आहे?’
बऱ्याच लोकांना इतकंच काय तर बायबलच्या विद्वानांनाही या वचनाचं कोडं पडतं. नवे जग भाषांतरात या वचनांचं असं भाषांतर करण्यात आलंय: “अशा तीन गोष्टी आहेत, ज्या माझ्या समजण्यापलीकडे आहेत; [किंवा “ज्यांचं मला खूप आश्चर्य वाटतं,” तळटीप] चार गोष्टी अशा आहेत, ज्या मला समजत नाहीत. आकाशात गरुडाचं उडणं, खडकावर सापाचं सरपटणं, समुद्रावर जहाजाचं चालणं आणि पुरुषाचं तरुण स्त्रीशी वागणं.”—नीति. ३०:१८, १९.
आधी आपण असं मानायचो, की “पुरुषाचं तरुण स्त्रीशी वागणं” हा वाक्यांश एखाद्या वाईट कामाचं वर्णन आहे. का? या अध्यायाच्या इतर वचनांमध्ये अशा गोष्टींबद्दल सांगण्यात आलंय, ज्या “‘पुरे झालं!’ असं कधीही म्हणत नाहीत.” (नीति. ३०:१५, १६) आणि २० व्या वचनांत अशा एका ‘व्यभिचारी स्त्रीबद्दल’ सांगितलंय, जी ‘आपण काहीच केलेलं नाही’ असा दावा करते. त्यामुळे आपण असा तर्क करायचो, की आकाशात उडणाऱ्या गरुडासारखं, खडकावर सरपटणाऱ्या सापासारखं किंवा समुद्रावर चालणाऱ्या जहाजासारखं, माणूस कदाचित त्याने केलेल्या कामाची कोणतीही निशाणी सोडणार नाही. या आधारावर आपण असा निष्कर्ष काढायचो, की “पुरुषाचं तरुण स्त्रीशी वागणं” एका वाईट गोष्टीला सूचित करतं. ते म्हणजे, एक धूर्त तरुण एका भोळ्याभाबड्या तरुणीला तिच्या नकळत तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी तिला फसवतो.
पण या वचनातून काहीतरी चांगलं सांगायचंय असं आपण म्हणू शकतो. कारण या पुस्तकाचा लेखक त्याला ज्या गोष्टींचं आश्चर्य वाटलं, त्याचं वर्णन करत होता.
हिब्रू हस्तलिखितांवरूनसुद्धा दिसून येतं, की या वचनातून काहीतरी चांगलंच सांगायचंय. हिब्रू शास्त्रवचनांच्या एका शब्दकोशाप्रमाणे नीतिवचनं ३०:१८ मधले “माझ्या समजण्यापलीकडे आहेत” या शब्दांसाठी असलेले हिब्रू शब्द आश्चर्यकारक किंवा अशक्य अशा गोष्टीला सूचित करतात.
अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीमधले प्रॉफेसर क्रॉफर्ड टॉयसुद्धा असं म्हणतात, की या बायबल उताऱ्याचा वाईट अर्थ निघत नाही. ते म्हणतात: “लेखकाला फक्त त्याला आश्चर्य वाटलेल्या गोष्टींचं वर्णन करायचं होतं.”
त्यामुळे नीतिवचनं ३०:१८, १९ मधले शब्द आश्चर्यकारक, इतकंच काय तर समजण्यापलीकडे असलेल्या गोष्टींचं वर्णन करतात, असं आपण म्हणून शकतो. म्हणून बायबलच्या लेखकाप्रमाणे आपल्यालाही नीतिवचनं ३०:१९ मधल्या गोष्टींचं आश्चर्य वाटतं. जसं की गरुड आकाशात उंच भरारी कशी घेतो, पाय नसतानाही खडकावर अगदी सहजपणे साप कसा सरपटतो, एखादं अवजड जहाज मैलोनमैल समुद्री प्रवास कसं करतं आणि एक तरुण स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडून आनंदी संसार कसा थाटतात, याचं आपल्यालाही आश्चर्य वाटतं.