वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 सप्टेंबर पृ. २-७
  • वडिलांची मदत घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वडिलांची मदत घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण वडिलांची मदत कधी घेतली पाहिजे?
  • आपण वडिलांची मदत का घेतली पाहिजे?
  • वडील आपली मदत कशी करतात?
  • आपली जबाबदारी काय आहे?
  • गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • भावांनो, तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 सप्टेंबर पृ. २-७

अभ्यास लेख ३६

गीत १०३ मेंढपाळ—माणसांच्या रूपात भेटी!

वडिलांची मदत घ्या

“त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावं.”—याको. ५:१४.

या लेखात:

आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा आपण मंडळीतल्या वडिलांची मदत का घेतली पाहिजे, ते पाहा.

१. यहोवाची सगळी मेंढरं त्याच्यासाठी मौल्यवान आहेत हे त्याने कसं दाखवून दिलं?

यहोवाची सगळी मेंढरं त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. कारण त्याने येशूच्या रक्‍ताने त्यांना विकत घेतलंय. त्यासोबतच, त्याने त्यांची काळजी घेण्यासाठी मंडळीतल्या वडिलांना नेमलंय. (प्रे. कार्यं २०:२८) यहोवाची इच्छा आहे की वडिलांनी त्यांची प्रेमळपणे काळजी घ्यावी. मंडळीतले वडील भाऊबहिणींना प्रोत्साहन देतात आणि त्यांना यहोवाला विश्‍वासू राहायला मदत करतात. असं करून ते येशूच्या मार्गदर्शनाचं पालन करतात.—यश. ३२:१, २.

२. यहोवा कोणाकडे विशेष लक्ष देतो? (यहेज्केल ३४:१५, १६)

२ यहोवाला त्याच्या सगळ्या मेंढरांची खूप काळजी आहे. पण मदतीची गरज असलेल्यांकडे तो विशेष लक्ष देतो. यहोवा वडिलांचा वापर करून आध्यात्मिक रित्या कमजोर असलेल्यांना मदत करतो. (यहेज्केल ३४:१५, १६ वाचा.) पण जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा आपण सगळ्यांनी ती मागावी असं त्याला वाटतं. आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा आपण यहोवाला फक्‍त प्रार्थनाच करू नये, तर मंडळीतल्या ‘मेंढपाळांची आणि शिक्षकांचीसुद्धा’ मदत घ्यावी असं यहोवाला वाटतं.—इफिस. ४:११, १२.

३. वडिलांच्या भूमिकेबद्दल जाणून घेतल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच काय फायदा होऊ शकतो?

३ यहोवा त्याच्यासोबतचं नातं कमजोर झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी, वडिलांचा वापर कसा करतो याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. यासाठी आपण काही प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत. जसं की, आपण वडिलांची मदत कधी घेतली पाहिजे? आपण असं का केलं पाहिजे? आणि ते आपली मदत कशी करतात? आपल्याला आता जरी त्यांच्या मदतीची गरज नसली, तरी या प्रश्‍नांची उत्तरं मिळाल्यामुळे यहोवाने घालून दिलेल्या व्यवस्थेबद्दल आपली कदर आणखी वाढेल. तसंच, जेव्हा आपल्याला त्यांच्या मदतीची गरज असेल तेव्हा आपण काय केलं पाहिजे हेसुद्धा समजेल.

आपण वडिलांची मदत कधी घेतली पाहिजे?

४. याकोब ५:१४-१६, १९, २० या वचनांमध्ये आध्यात्मिक रित्या आजारी असण्याबद्दल सांगितलंय असं आपण का म्हणू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

४ यहोवा वडिलांचा वापर करून आपल्याला मदत कशी करतो याबद्दल शिष्य याकोबने सांगितलं. त्याने म्हटलं: “तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावं.” (याकोब ५:१४-१६, १९, २० वाचा.) इथे याकोब आध्यात्मिक रित्या आजारी असण्याबद्दल बोलत होता. असं आपण का म्हणू शकतो? कारण याकोब इथे आजारी व्यक्‍तीला वैद्याकडे नाही, तर वडिलांकडे जायचा सल्ला देतो. तसंच, याकोब हेसुद्धा सांगतो की जेव्हा एका व्यक्‍तीची पापं माफ केली जातात तेव्हा तो बरा होतो. एखादी व्यक्‍ती जेव्हा आजारी पडते तेव्हा तिला डॉक्टरकडे जायची, तिच्या आजाराबद्दल त्यांना सांगायची आणि त्यांच्या सूचना पाळायची गरज असते. अगदी त्याच प्रकारे, जेव्हा एक व्यक्‍ती आध्यात्मिक रित्या आजारी असते तेव्हा तिला वडिलांकडे जायची, तिच्या समस्येबद्दल त्यांना सांगायची आणि बायबलमधून त्यांनी दिलेला सल्ला पाळायची गरज असते.

कोलाज: १. एक व्यक्‍ती डॉक्टरला त्याच्या खांद्याच्या समस्येबद्दल सांगतोय. २. एक भाऊ आणि मंडळीचे वडील बाहेर बाकावर बसले आहेत आणि तो भाऊ वडिलांना त्याच्या परिस्थितीबद्दल सांगतोय.

आपण आजारी पडतो, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. त्याच प्रकारे जेव्हा आपण आध्यात्मिक रित्या आजारी होतो, तेव्हा आपण वडिलांची मदत घेतली पाहिजे (परिच्छेद ४ पाहा)


५. यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर होतंय हे आपल्याला कसं समजू शकतं?

५ याकोबच्या पाचव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा आपल्याला वाटतं की यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर होत चाललंय तेव्हा आपण मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली पाहिजे. यहोवासोबतचं आपलं नातं पूर्णपणे खराब होण्याआधीच आपण ही मदत घेणं खूप गरजेचंय. यासाठी आपण स्वतःशी प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचंय. कारण बायबल आपल्याला सांगतं, की आपलं हृदय आपल्याला फसवू शकतं. आणि यहोवासोबतचं आपलं नातं चांगलं आहे असं भासवायचा प्रयत्न करू शकतं. पण खरंतर तसं नसण्याचीसुद्धा शक्यता आहे. (याको. १:२२) सार्दिसमधल्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीतसुद्धा असंच काहीसं घडलं होतं. त्यामुळे ते यहोवाला न आवडणारी कामं करत आहेत असं येशूने त्यांना सांगितलं. (प्रकटी. ३:१, २) त्यामुळे आपली आध्यात्मिक स्थिती कशी आहे हे आपण सतत तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. मग आपण हे कसं करू शकतो? एक मार्ग म्हणजे, यहोवाच्या सेवेसाठी आधी आपला जसा आवेश होता तसाच आताही आहे का याचं आपण परीक्षण करू शकतो. (प्रकटी. २:४, ५) यासाठी आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकतो. जसं की, बायबल वाचायचा आणि त्यावर मनन करायचा माझा आनंद कमी झालाय का? मी सभांची तयारी न करता, सभांना जायचं म्हणून जातोय का? प्रचारासाठीचा माझा आवेश कमी झालाय का? मी नेहमी पैसा आणि ऐशआरामाच्या गोष्टींचाच विचार करत असतो का? जर या प्रश्‍नांपैकी एकाचंही उत्तर हो असेल, तर याचा अर्थ यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर होत चाललंय. आणि आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. कारण जर आपण असं केलं, तर आपली अध्यात्मिक स्थिती आणखी खराब होऊ शकते. जर यहोवासोबतचं आपलं नातं पुन्हा मजबूत करणं आपल्याला शक्य नसेल किंवा यहोवाच्या तत्वांविरुद्ध आपण एखादं काम केलं असेल तर आपण मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली पाहिजे.

६. ज्या व्यक्‍तीच्या हातून गंभीर पाप घडतं तिने काय केलं पाहिजे?

६ काही पापं इतकी गंभीर असतात, की पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीने जर पश्‍चाताप केला नाही तर तिला मंडळीतून काढून टाकलं जाऊ शकतं. जर आपल्या हातून असं एखादं पाप घडलं, तर आपण मंडळीतल्या एखाद्या वडिलाशी बोललं पाहिजे. (१ करिंथ. ५:११-१३) ज्या व्यक्‍तीने गंभीर पाप केलंय, तिला यहोवासोबतचं तिचं नातं पुन्हा आधीसारखं करण्यासाठी मदतीची गरज असते. खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवाने आपल्याला माफ करावं, म्हणून आपण “पश्‍चात्तापाला शोभतील अशी कामं” केली पाहिजेत. (प्रे. कार्यं २६:२०) आणि या कामांमध्ये आपल्या हातून पाप घडल्यावर वडिलांशी बोलणंसुद्धा सामील आहे.

७. गंभीर पाप करणाऱ्‍यांशिवाय वडिलांची मदत आणखी कोण घेऊ शकतात?

७ वडील फक्‍त गंभीर पाप केलेल्यांनाच नाही, तर आध्यात्मिक रित्या कमजोर झालेल्यांनासुद्धा मदत करतात. (प्रे. कार्यं २०:३५) कदाचित, चुकीच्या इच्छांविरुद्ध लढणं तुम्हाला कठीण जात असल्यामुळे तुम्हाला चिंता वाटत असेल. आणि जर तुम्हाला सत्यात येण्याआधी ड्रग्स घ्यायची किंवा पोर्नोग्राफी पाहायची सवय असेल किंवा तुम्ही अनैतिक जीवन जगत असाल, तर तुम्हाला ही लढाई लढणं आणखीनच कठीण जाऊ शकतं. पण तुम्हाला एकट्यानेच ही लढाई लढण्याची गरज नाही. तुम्ही अशा एखाद्या वडिलांशी बोलू शकता ज्यांच्याबद्दल तुम्हाला खातरी असेल, की ते तुमचं लक्ष देऊन ऐकतील. तसंच, तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्ध लढण्यासाठी कोणते बदल केले पाहिजेत हे समजावून सांगतील. शिवाय, ते तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतील की तुम्ही जर चुकीच्या इच्छांविरुद्ध लढण्यासाठी मेहनत घेतली तर यहोवा तुमच्यावर खूश होईल. (उप. ४:१२) तुम्हाला बऱ्‍याच काळापासून चुकीच्या इच्छांविरुद्ध लढावं लागत असल्यामुळे तुम्ही कदाचित निराश व्हाल. पण, वडील तुम्हाला याची आठवण करून देतील, की तुम्ही मदतीसाठी विचारल्यामुळे हे दिसून येतं की तुम्ही नम्र आहात आणि तुम्हाला यहोवाला खूश करायची इच्छा आहे.—१ करिंथ. १०:१२.

८. आपण केलेल्या प्रत्येक चुकीबद्दल आपण वडिलांशी बोललं पाहिजे का? समजावून सांगा.

८ तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकांबद्दल तुम्हाला मंडळीतल्या वडिलांना सांगायची गरज नाही. समजा, तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं मन दुखावलं असेल किंवा तुमचा तुमच्या रागावरचा ताबा सुटला असेल. अशा वेळी मंडळीतल्या वडिलांशी बोलण्याऐवजी, तुम्ही आपल्या भावासोबत किंवा बहिणीसोबत शांती टिकवून ठेवण्याबद्दल येशूने जो सल्ला दिला तो लागू करू शकता. (मत्त. ५:२३, २४) तसंच तुम्ही सौम्यता, धीर आणि आत्मसंयम या गुणांवर संशोधन करू शकता. त्यामुळे तुम्हाला भविष्यात हे गुण आणखी चांगल्या प्रकारे दाखवता येतील. पण तुम्हाला जर तुमची समस्या स्वतःहून सोडवता येत नसेल, तर तुम्ही मंडळीतल्या वडिलांची मदत घेऊ शकता. पौलने फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात एका भावाला सांगितलं, की त्याने युवदीया आणि सुंतुखे या दोन बहिणींना आपसातले मतभेद सोडवायला मदत करावी. अगदी तसंच, आपल्या मंडळीतले वडीलसुद्धा आपल्याला मदत करू शकतात.—फिलिप्पै. ४:२, ३.

आपण वडिलांची मदत का घेतली पाहिजे?

९. आपण वडिलांची मदत घ्यायला का लाजू नये? (नीतिवचनं २८:१३)

९ आपल्या हातून एखादं गंभीर पाप होतं किंवा चुकीच्या इच्छांविरुद्ध लढणं आपल्याला कठीण जातं तेव्हा आपण वडिलांची मदत घेतली पाहिजे. आणि असं करण्यासाठी आपल्याला विश्‍वासाची आणि धैर्याची गरज आहे. आपण वडिलांची मदत घ्यायला लाजलं नाही पाहिजे. कारण यहोवाची इच्छा आहे, की आपलं त्याच्यासोबतचं नातं घट्ट असावं. आणि यासाठी आपली मदत करायला त्याने वडिलांना नेमलंय. म्हणून जेव्हा आपण वडिलांची मदत घेतो, तेव्हा खरंतर आपण यहोवाची आज्ञा पाळतो आणि त्याच्यावर भरवसा असल्याचं दाखवतो. योग्य ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मदतीची गरज असते हे आपल्याला माहीत आहे. (स्तो. ९४:१८) त्यामुळे जेव्हा आपल्या हातून पाप घडतं, तेव्हा आपण ते कबूल केलं पाहिजे आणि त्या गोष्टी पुन्हा न करायचा निश्‍चय केला पाहिजे. जर आपण असं केलं तर यहोवा आपल्याला दया दाखवेल आणि माफ करेल.—नीतिवचनं २८:१३ वाचा.

१०. आपण जर आपली पापं झाकायचा प्रयत्न केला, तर काय होऊ शकतं?

१० आपण वडिलांना आपल्या हातून घडलेल्या गंभीर पापाबद्दल सांगतो, तेव्हा यहोवा आपल्याला माफ करू शकतो आणि त्याच्यासोबतचं आपलं नातं पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकतं. पण जर आपण वडिलांशी बोललो नाही, तर आपलंच नुकसान होईल. जेव्हा दावीद राजाने आपलं पाप झाकायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक नुकसान सहन करावं लागलं. (स्तो. ३२:३-५) जसं, एखाद्या जखमेवर आपण मलमपट्टी केला नाही, तर ती आणखी चिघळू शकते. त्याच प्रकारे आपण जर काळजी घेतली नाही, तर यहोवासोबतचं आपलं नातं आणखी खराब होऊ शकतं. आणि असं होऊ नये हीच यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे तो आपल्याला वडिलांची मदत घ्यायला सांगतो. आपण जर असं केलं, तर यहोवासोबतचं आपलं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल.—यश. १:५, ६, १८.

११. आपण जर गंभीर पापं झाकायचा प्रयत्न केला, तर इतरांवर काय परिणाम होऊ शकतो?

११ आपण जर वडिलांना आपण केलेल्या गंभीर पापाबद्दल सांगितलं नाही, तर इतरांचंसुद्धा नुकसान होऊ शकतं. यहोवाची पवित्र शक्‍ती मंडळीवर राहणार नाही. आणि यामुळे भाऊबहिणींमधली शांती भंग होऊ शकते. (इफिस. ४:३०) त्याच प्रकारे जर मंडळीतल्या एखाद्याने गंभीर पाप केल्याचं आपल्याला समजलं, तर आपण त्या व्यक्‍तीला वडिलांशी बोलायचं प्रोत्साहन देऊ शकतो.a पण जर आपण ते पाप झाकायचा प्रयत्न केला, तर त्याच्या पापात आपणसुद्धा भागीदार होतो. (लेवी. ५:१) आपलं यहोवावर प्रेम आहे. म्हणून आपण खरं बोलायला पुढे आलं पाहिजे. जेव्हा आपण असं करतो, तेव्हा आपण मंडळी शुद्ध ठेवायला हातभार लावत असतो. तसंच, पाप केलेल्या व्यक्‍तीचं यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत करायलासुद्धा आपण मदत करत असतो.

वडील आपली मदत कशी करतात?

१२. आध्यात्मिक रित्या कमजोर असलेल्यांना वडील कशी मदत करतात?

१२ बायबलमध्ये वडिलांना आध्यात्मिक रित्या कमजोर असलेल्यांना मदत करायला सांगितलंय. (१ थेस्सलनी. ५:१४) तुमच्या हातून एखादी चूक होते, तेव्हा वडील तुमचे विचार आणि भावना समजून घ्यायला तुम्हाला काही प्रश्‍न विचारतील. (नीति. २०:५) तुमच्या संस्कृतीमुळे, स्वभावामुळे किंवा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल लाज वाटत असल्यामुळे तुम्हाला वडिलांशी बोलणं कठीण जाऊ शकतं. पण असं असलं तरी मन मोकळेपणाने त्यांच्याशी बोला. तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाल, या भीतीने स्वतःला रोखू नका. (ईयो. ६:३) कारण वडील तुम्हाला लगेच चुकीचं ठरवणार नाहीत. उलट, ते तुमचं लक्ष देऊन ऐकतील आणि तुमचं सगळं काही ऐकून घेतल्यानंतरच ते बायबलमधून तुम्हाला सल्ला देतील. (नीति. १८:१३) वडिलांना याची जाणीव असते, की मेंढरांची काळजी घ्यायला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे एका भेटीतच समस्या सुटली पाहिजे, अशी ते अपेक्षा करत नाहीत.

१३. वडील प्रार्थना करून आणि बायबलमधून सल्ला देऊन आपल्याला कशी मदत करू शकतात? (चित्रंसुद्धा पाहा.)

१३ तुम्ही केलेल्या चुकांमुळे तुम्हाला दोषी असल्यासारखं वाटत असेल. पण तुम्ही आणखी खचून जाल, असं वडील काहीही बोलणार नाहीत. उलट, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील. त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थनांमध्ये किती “ताकद असते” हे पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल! वडील जी मदत करतात त्यात ‘यहोवाच्या नावाने तेल’ लावणंही सामील आहे. (याको. ५:१४-१६) इथे “तेल” हा शब्द देवाच्या वचनातल्या सत्याला सूचित करतो. वडील बायबलचा कुशलपणे वापर करून तुम्हाला सांत्वन आणि दिलासा देतील आणि यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल. (यश. ५७:१८) त्यांनी बायबलमधून दिलेल्या सल्ल्यामुळे योग्य ते करायचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल. वडील तुम्हाला यहोवाचा आवाज ऐकायलासुद्धा मदत करू शकतात. यहोवा म्हणतो: “योग्य मार्ग हा आहे. यावर चाला.”—यश. ३०:२१.

कोलाज: १. मागच्या चित्रात दाखवलेला डॉक्टर त्या माणसाचा खांदा तपासतोय आणि त्याच्या खांद्याचा एक्स-रे भींतीवर लावलाय. २. मगच्या चित्रात दाखवलेले वडील, दुसऱ्‍या एका वडीलासोबत त्या भावाच्या घरी गेले आहेत. ते त्या भावाला बायबलमधून प्रोत्साहन देत आहेत आणि भाऊ आनंदाने ऐकत आहे.

वडील बायबलचा वापर करून आपल्याला सांत्वन आणि प्रोत्साहन देतात (परिच्छेद १३-१४ पाहा)


१४. गलतीकर ६:१ प्रमाणे “चुकीचं पाऊल” उचलणाऱ्‍या व्यक्‍तीला वडील कशी मदत करतात? (चित्रंसुद्धा पाहा.)

१४ गलतीकर ६:१ वाचा. एखादा ख्रिस्ती “चुकीचं पाऊल” उचलतो, तेव्हा तो यहोवाच्या नीतिमान स्तरांच्या विरुद्ध वागत असतो. चुकीचं पाऊल उचलणं म्हणजे, एखादा चुकीचा निर्णय घेणं किंवा एखादं गंभीर पाप करणं. ज्या व्यक्‍तीच्या हातून असं काहीतरी घडतं, त्या व्यक्‍तीला वडील “सौम्यतेने सुधारण्याचा प्रयत्न” करतात. “सुधारणा” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ कायमचं अपंगत्व येऊ नये, म्हणून एखादं सरकलेलं हाड पुन्हा योग्य जागेवर बसवणं, असासुद्धा होऊ शकतो. जसा एखादा कुशल डॉक्टर मोडलेलं हाड पुन्हा जोडण्यासाठी पेशंटला कमीत कमी त्रास होईल याकडे लक्ष देतो. अगदी त्याच प्रकारे वडीलसुद्धा आपल्याला आध्यात्मिक रित्या बरं करताना आपल्या दुःखात आणखी भर पडणार नाही, याकडे लक्ष देतात. तसंच, वडिलांना “स्वतःकडे लक्ष” द्यायचीसुद्धा आज्ञा देण्यात आली आहे. म्हणून ते एखाद्याला बायबलमधून सल्ला देताना, हे विसरत नाहीत की त्यांच्याकडूनसुद्धा चुका होतात. त्यामुळे एखाद्याला मदत करताना ते कधीच असा विचार करत नाही, की ते त्याच्यापेक्षा जास्त नीतिमान आहेत. उलट, ते नम्र राहतात आणि प्रेमाने त्याला मदत करतात.—१ पेत्र ३:८.

१५. आपल्यावर एखादी समस्या येते, तेव्हा आपण काय करू शकतो?

१५ आपण वडिलांवर भरवसा ठेवू शकतो. कारण त्यांना आपल्या खाजगी गोष्टी इतरांना न सांगायचं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यासोबतच त्यांना जे योग्य वाटतं ते सांगण्याऐवजी, ते बायबलमधून सल्ला देतात आणि आपल्या समस्यांचा सामना करायला आपल्याला मदत करतात. कारण त्यांना याचंसुद्धा प्रशिक्षण दिलेलं असतं. (नीति. ११:१३; गलती. ६:२) वडिलांचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. तसंच काही वडील कमी अनुभवी असतात, तर काही जास्त. असं असलं तरी आपण मनमोकळेपणाने कोणत्याही वडिलांसोबत आपल्या समस्येबद्दल बोलू शकतो. पण याचा अर्थ आपल्याला आपल्या आवडीचा सल्ला मिळत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या वडिलांचा सल्ला घेत राहायचं असं नाही. कारण जर आपण असं केलं, तर आपण अशा व्यक्‍तीसारखे होऊ जो त्याला ‘ऐकायच्या आहेत अशाच गोष्टी ऐकतो’ आणि देवाच्या वचनातलं “फायदेकारक शिक्षण” नाकारतो. (२ तीम. ४:३) आपण एखाद्या वडिलांकडे आपली समस्या घेऊन जातो, तेव्हा ते आपल्याला कदाचित विचारतील की आपण याबद्दल दुसऱ्‍या एखाद्या वडिलांशी बोललोय का किंवा त्यांचा सल्ला घेतलाय का. वडील नम्र असल्यामुळे आपल्याला सल्ला देण्याआधी ते कदाचित इतर वडिलांशीसुद्धा बोलतील.—नीति. १३:१०.

आपली जबाबदारी काय आहे?

१६. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी काय आहे?

१६ वडील आपल्याला समस्या आल्यावर मदत करतात आणि आपल्याला सल्ला देतात. पण कोणता निर्णय घ्यावा हे ते आपल्याला सांगत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या वागण्या बोलण्यातून हे दाखवलं पाहिजे, की आपल्याला यहोवाला खूश करायचं आहे. आणि ही आपल्या प्रत्येकाची वैयक्‍तिक जबाबदारी आहे. यहोवाच्या मदतीने आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि त्याला विश्‍वासू राहू शकतो. (रोम. १४:१२) एखाद्या परिस्थितीत आपण काय करावं हे वडील आपल्याला सांगणार नाही. याउलट, त्या परिस्थितीबद्दल यहोवाला काय वाटतं हे समजून घ्यायला ते आपल्याला बायबलमधून मदत करतील आणि निर्णय आपल्यावर सोडतील. त्यांनी दिलेला बायबलमधला सल्ला पाळल्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या ‘समजशक्‍तीला’ प्रशिक्षित करता येईल.—इब्री ५:१४.

१७. आपण कोणता निश्‍चय केला पाहिजे?

१७ यहोवाची मेंढरं असण्याचा आपल्याला किती मोठा बहुमान मिळालाय! आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं, म्हणून यहोवाने ‘चांगल्या मेंढपाळाला,’ म्हणजे येशूला त्याच्या जीवनाचं खंडणी बलिदान द्यायला या पृथ्वीवर पाठवलं. (योहा. १०:११) तसंच, यहोवाने आपल्याला असं वचन दिलंय: “मी तुम्हाला असे मेंढपाळ देईन, जे माझ्या इच्छेप्रमाणे वागतील. ते तुम्हाला चारा म्हणून ज्ञान आणि सखोल समज देतील.” (यिर्म. ३:१५) मंडळीतल्या वडिलांचा वापर करून यहोवा आज हे वचन पूर्ण करतोय. जेव्हा आपण आध्यात्मिक रित्या खूप कमजोर होतो किंवा आजारी पडतो, तेव्हा आपण वडिलांची मदत घ्यायला कचरलं नाही पाहिजे. तर चला, आपण सगळे यहोवाने घालून दिलेल्या या व्यवस्थेचा पूर्ण फायदा घ्यायचा निश्‍चय करू या!

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण वडिलांची मदत कधी घेतली पाहिजे?

  • आपण वडिलांची मदत का घेतली पाहिजे?

  • वडील आपली मदत कशी करतात?

गीत ३१ देवासोबत चालत राहा!

a पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण वडिलांशी बोलायचं प्रोत्साहन देऊनही त्याने बरेच दिवस तसं केलं नाही, तर वडिलांना सांगायची जबाबदारी आपली आहे. कारण आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहायचं आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा