अभ्यास लेख २३
गीत २ देवाचं अतुल्य नाव!
यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
“यहोवा म्हणतो, ‘तुम्ही माझे साक्षीदार आहात.’”—यश. ४३:१०.
या लेखात:
यहोवाचं नाव पवित्र करण्यात आणि त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवण्यात आपली काय भूमिका आहे हे पाहू या.
१-२. यहोवाचं नाव येशूसाठी महत्त्वाचं होतं हे आपल्याला कसं कळतं?
येशूसाठी यहोवाचं नाव खूप महत्त्वाचं आहे. यहोवाच्या नावाची बाजू घेण्यात त्याने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. आपण मागच्या लेखात पाहिलं होतं की यहोवा पवित्र आहे. आणि तो जे काही करतो ते योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी येशू मरायलासुद्धा तयार होता. (मार्क १४:३६; इब्री १०:७-९) पुढे हजार वर्षांच्या शासनानंतर यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी येशू त्याचा सगळा अधिकार यहोवाला पुन्हा सोपवून देईल. (१ करिंथ. १५:२६-२८) येशूने यहोवासाठी जे काही केलं त्यातून त्याचं यहोवावर किती प्रेम आहे हे सिद्ध झालं.
२ येशू त्याच्या पित्याच्या नावाने पृथ्वीवर आला. (योहा. ५:४३; १२:१३) त्याने त्याच्या शिष्यांना त्याच्या पित्याचं नाव प्रकट केलं. (योहा. १७:६, २६) त्याने यहोवाच्या नावाने शिकवलं आणि चमत्कार केले. (योहा. १०:२५) इतकंच काय तर येशूने यहोवाला ‘त्याच्या नावासाठी त्याच्या शिष्यांना सांभाळ’ असं म्हटलं. (योहा. १७:११) खरंच, येशूसाठी यहोवाचं नाव खूप महत्त्वाचं होतं. मग, येशूचा खरा शिष्य असण्याचा दावा करणाऱ्या एखाद्याला जर यहोवाचं नावच माहीत नसेल किंवा तो त्याच्या नावाचा उपयोग करत नसेल, तर तो येशूचा खरा शिष्य असण्याचा दावा कसा काय करू शकतो?
३. आपण या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?
३ खरे ख्रिस्ती या नात्याने आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो. म्हणूनच आपण यहोवाच्या नावावर प्रेम करतो आणि त्याचा आदर करतो. (१ पेत्र २:२१) या लेखात आपण पाहू या, की ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ सांगणाऱ्यांची यहोवाच्या नावाने ओळख कशी होते. (मत्त. २४:१४) तसंच यहोवाचं नाव आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं का असलं पाहिजे, यावरसुद्धा आपण चर्चा करू या.
‘आपल्या नावाकरता निवडलेले लोक’
४. (क) येशूने स्वर्गात परत जाण्याआधी आपल्या शिष्यांना काय करायला सांगितलं? (ख) त्याने जे सांगितलं त्यामुळे कोणता प्रश्न उभा राहतो?
४ स्वर्गात परत जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं: “पवित्र शक्ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्यं १:८) म्हणजे आनंदाचा संदेश फक्त इस्राएलमध्येच नाही, तर संपूर्ण जगात घोषित केला जाणार होता. आणि शेवटी सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना येशूचे शिष्य बनण्याची संधी मिळणार होती. (मत्त. २८:१९, २०) पण येशू म्हणाला: “तुम्ही . . . माझ्याबद्दल साक्ष द्याल.” मग या नवीन शिष्यांना यहोवाचं नाव ओळखण्याची गरज होती का, की ते फक्त येशूबद्दल साक्ष देणार होते? प्रेषितांची कार्यं १५ व्या अध्यायात सांगितलेल्या घटनांमुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
५. यरुशलेममधल्या प्रेषित आणि वडीलजनांनी कसं दाखवून दिलं की सगळ्यांनी यहोवाचं नाव ओळखणं गरजेचं आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
५ इ.स. ४९ मध्ये यरुशलेममधले प्रेषित आणि वडील एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमले होते. तो विषय म्हणजे, ख्रिस्ती बनण्यासाठी सुंता न झालेल्या विदेश्यांना काय करण्याची गरज होती. या चर्चेच्या शेवटी येशूचा भाऊ याकोब याने असं म्हटलं: “देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याबद्दल [पेत्रने] अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंय.” मग संदेष्टा आमोसच्या शब्दांचा उल्लेख करून त्याने म्हटलं: “म्हणजे, त्यांपैकी उरलेली माणसं सगळ्या राष्ट्रांच्या लोकांसोबत, अर्थात माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांसोबत मिळून अगदी मनापासून यहोवाचा शोध घेतील. . . . यहोवाचे हे शब्द आहेत.” (प्रे. कार्यं १५:१४-१८) म्हणजेच या नवीन शिष्यांना यहोवाबद्दल फक्त शिकूनच घ्यायचं नव्हतं, तर ते ‘त्याच्या नावाने ओळखलेसुद्धा जाणार’ होते. याचाच अर्थ ते इतरांना त्याच्या नावाबद्दल सांगणार होते आणि लोक त्यांना त्याच्या नावाने ओळखणार होते.
पहिल्या शतकाच्या नियमन मंडळाच्या सभेत त्या विश्वासू भावांना हे समजलं, की ख्रिश्चनांना देवाच्या नावाने ओळखलं जाणं खूप महत्त्वाचं आहे (परिच्छेद ५ पाहा)
६-७. (क) येशू पृथ्वीवर का आला होता? (ख) यामागे आणखी कोणतं महत्त्वाचं कारण होतं?
६ आता आणखी एका गोष्टीचा विचार करा. येशूच्या नावाचा अर्थ “यहोवा तारण करतो” असा होतो. आणि विश्वास ठेवणाऱ्यांचं तारण करण्यासाठी यहोवाने त्याचाच वापर केला. सर्व मानवजातीच्या वतीने आपल्या जीवनाचं बलिदान देण्यासाठी येशू या पृथ्वीवर आला. (मत्त. २०:२८) त्याने दिलेल्या खंडणी बलिदानामुळे सर्व मानवजातीला वाचवणं शक्य झालं आणि त्यांच्यासाठी सर्वकाळाच्या जीवनाचा मार्ग मोकळा झाला.—योहा. ३:१६.
७ पण मुळात मानवांना वाचवण्याची गरज का होती? एदेन बागेत काय घडलं होतं, त्याचा विचार करा. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे आपल्या पहिल्या आईवडिलांनी म्हणजेच आदाम-हव्वाने यहोवाविरुद्ध बंड केलं. आणि म्हणून त्यांनी कायम जगायची संधी गमावली. (उत्प. ३:६, २४) वारशाने मिळालेल्या या पापामुळे त्यांच्या वंशजांनीसुद्धा कायम जगण्याची संधी गमावली. पण पापी मानवांचं तारण करण्यापेक्षाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. यहोवाचं नाव बदनाम झालं होतं. (उत्प. ३:४, ५) तर आदाम आणि हव्वाच्या वंशजांचं तारण हे एका मोठ्या वादविषयाशी संबंधित होतं. तो म्हणजे, यहोवाचं नाव पवित्र करणं. येशू यहोवाचा प्रतिनिधी असल्यामुळे आणि तो त्याच्या नावाने आल्यामुळे त्याने यहोवाचं नाव पवित्र करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.
येशूचा खरा शिष्य असण्याचा दावा करणाऱ्या एखाद्याला जर यहोवाचं नावच माहीत नसेल किंवा तो त्याच्या नावाचा उपयोग करत नसेल, तर तो येशूचा खरा शिष्य असण्याचा दावा कसा काय करू शकतो?
८. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना कोणती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं होतं?
८ येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना हे समजून घेणं गरजेचं होतं, की त्यांना तारण खरंतर येशूचा पिता यहोवा याच्याकडून मिळणार होतं. (योहा. १७:३) येशूप्रमाणेच त्यांनाही यहोवाच्या नावाने ओळखलं जाणार होतं. यहोवाचं नाव पवित्र करणं इतकं महत्त्वाचं का आहे, हेसुद्धा त्यांनी ओळखणं गरजेचं होतं. कारण त्यांचं तारण त्यावरच अवलंबून होतं. (प्रे. कार्यं २:२१, २२) त्यामुळे येशूच्या सगळ्या विश्वासू शिष्यांनी यहोवा आणि येशूबद्दल शिकणं गरजेचं होतं. म्हणूनच येशूने योहान १७ मधल्या त्याच्या प्रार्थनेचा शेवट या शब्दांनी केला: “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय आणि पुढेही करीन. तुझं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांच्यामध्ये असावं आणि मी त्यांच्यासोबत ऐक्यात असावं, म्हणून मी ते प्रकट करीन.”—योहा. १७:२६.
“तुम्ही माझे साक्षीदार आहात”
९. यहोवाचं नाव आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
९ आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यातून आपल्याला हे स्पष्ट दिसून आलं की आपल्याला जर येशूचे शिष्य व्हायचं असेल तर आपण यहोवाचं नाव पवित्र केलं पाहिजे. (मत्त. ६:९, १०) यहोवाचं नाव आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे आणि हे आपण आपल्या कामांतून दाखवलं पाहिजे. मग यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी आणि सैतानाने त्याच्यावर लावलेले आरोप खोटे सिद्ध करण्यासाठी आपण काय करू शकतो?
१०. यशया ४२ ते ४४ अध्यायात आपल्याला कोणत्या लाक्षणिक खटल्याबद्दल वाचायला मिळतं? (यशया ४३:९; ४४:७-९) (चित्रसुद्धा पाहा.)
१० यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आपल्याला यशयाच्या ४२ ते ४४ अध्यायांमध्ये वाचायला मिळतं. या अध्यायांमध्ये एका लाक्षणिक खटल्याचं वर्णन करण्यात आलंय. हा खटला खरा देव कोण आहे याबद्दलचा आहे. या खटल्यात, देव असल्याचा दावा करणाऱ्यांना यहोवा ते खरोखर देव आहेत, हे सिद्ध करायला सांगतो. तसंच, या देवांचे दावे खरे असल्याचं सिद्ध करायला तो साक्षीदारांना पुढे बोलवतो. पण कोणालाच ते दावे सिद्ध करता येत नाहीत!—यशया ४३:९; ४४:७-९ वाचा.
आपण बऱ्याच मार्गांनी एका लाक्षणिक खटल्यात सहभागी आहोत (परिच्छेद १०-११ पाहा)
११. यशया ४३:१०-१२ मध्ये यहोवा त्याच्या लोकांना काय म्हणतो?
११ यशया ४३:१०-१२ वाचा. यहोवा त्याच्या लोकांना म्हणतो: “तुम्ही माझे साक्षीदार आहात . . . आणि मीच देव आहे.” पुढे तो त्यांना विचारतो: “माझ्याशिवाय दुसरा कोणी देव आहे का?” (यश. ४४:८) आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मोठा बहुमान आहे. यहोवाच खरा देव आहे याची साक्ष आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून देऊ शकतो. त्याचं नाव सगळ्या नावांपेक्षा महान आहे. सैतानाने आपल्यावर कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तरी आपण ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून आपण हे दाखवू शकतो, की आपण यहोवावर खरं प्रेम करतो आणि त्याला एकनिष्ठ राहतो. अशा प्रकारे आपण यहोवाचं नाव पवित्र करू शकतो.
१२. यशया ४०:३, ५ मधली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?
१२ जेव्हा आपण यहोवाच्या नावाला पाठिंबा देतो तेव्हा आपण येशू ख्रिस्तासारखं वागत असतो. यशयाने अशा एका व्यक्तीबद्दलसुद्धा भविष्यवाणी केली, जो “यहोवासाठी मार्ग मोकळा [किंवा, “तयार,” तळटीप]” करणार होता. (यश. ४०:३) ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने येशूसाठी मार्ग तयार केला. पण खरंतर त्याने यहोवासाठी मार्ग तयार केला. कारण येशू यहोवाच्या नावाने आला आणि त्याच्या वतीने बोलला. (मत्त. ३:३; मार्क १:२-४; लूक ३:३-६) याच भविष्यवाणीत पुढे असं म्हटलंय: “यहोवाचं वैभव प्रकट होईल.” (यश. ४०:५) हे कसं होणार होतं? जेव्हा येशू या पृथ्वीवर आला, तेव्हा त्याने यहोवाचं प्रतिनिधित्व इतक्या चांगल्या प्रकारे केलं की जणू स्वतः यहोवाच या पृथ्वीवर आला होता.—योहा. १२:४५.
१३. आपण येशूसारखं कसं वागू शकतो?
१३ येशूसारखेच आपणही यहोवाचे साक्षीदार आहोत. आपण यहोवाच्या नावाने ओळखले जातो आणि त्याच्या अद्भुत कार्यांबद्दल सर्वांना सांगतो. पण हे आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी, यहोवाचं नाव पवित्र करण्यात येशूची भूमिका किती महत्त्वाची आहे, हेसुद्धा आपण इतरांना सांगितलं पाहिजे. (प्रे. कार्यं १:८) येशूने यहोवाबद्दल जितकी चांगल्या प्रकारे साक्ष दिली, तितकी आजपर्यंत कोणीही दिलेली नाही. आपणही त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो. (प्रकटी. १:५) मग यहोवाचं नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हे दाखवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आणखी काय केलं पाहिजे?
यहोवाचं नाव आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे
१४. स्तोत्र १०५:३ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला यहोवाच्या नावाबद्दल कसं वाटतं?
१४ आपल्याला यहोवाच्या नावाचा अभिमान आहे. (स्तोत्र १०५:३ वाचा.) आपण यहोवाच्या नावाचा अभिमानाने गौरव करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. (यिर्म. ९:२३, २४; १ करिंथ. १:३१; २ करिंथ. १०:१७) त्याच्या नावाचा आदर करणं आणि त्याची बाजू घेणं ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत ही गोष्ट आपल्या कामावरच्या लोकांना, शाळेतल्या सोबत्यांना, शेजारच्यांना आणि इतरांना सांगायला आपल्याला कधीच लाज नाही वाटली पाहिजे. यहोवाचं नाव आपण इतरांना सांगू नये असं सैतानाला वाटतं. (यिर्म. ११:२१; प्रकटी. १२:१७) खरंतर, लोकांनी यहोवाचं नाव विसरून जावं असं सैतानाला आणि त्याच्या खोट्या शिकवणी पसरवणाऱ्यांना वाटतं. (यिर्म. २३:२६, २७) पण, आपलं यहोवाच्या नावावर प्रेम असल्यामुळे आपण ‘दिवसभर त्याच्या नावामुळे आनंदी असतो.’—स्तो. ५:११; ८९:१६.
१५. यहोवाला त्याच्या नावाने हाक मारण्याचा काय अर्थ होतो?
१५ आपण यहोवाला त्याच्या नावाने हाक मारतो. (योए. २:३२; रोम. १०:१३, १४) यहोवाच्या नावाने हाक मारणं यात त्याला ओळखणं आणि त्याच्या नावाचा वापर करणं, यापेक्षाही जास्त सामील आहे. यहोवाला त्याच्या नावाने हाक मारण्यात त्याला एक व्यक्ती म्हणून ओळखणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं, मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी त्याच्यावर अवलंबून राहणंही सामील आहे. (स्तो. २०:७; ९९:६; ११६:४; १४५:१८) तसंच, आपण इतरांना त्याच्या नावाबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल सांगतो. आणि यहोवाला खूश करण्यासाठी त्यांना पश्चाताप करायला आणि त्याप्रमाणे पाऊल उचलायलाही मदत करतो.—यश. १२:४; प्रे. कार्यं २:२१, ३८.
१६. सैतान खोटा आहे हे आपण कसं सिद्ध करू शकतो?
१६ आपण यहोवाच्या नावासाठी दुःख सोसायला तयार असतो. (याक. ५:१०, ११) समस्या असतानाही आपण यहोवाला एकनिष्ठ राहतो तेव्हा आपण सैतानाला खोटं ठरवत असतो. ईयोबच्या दिवसांत काय झालं याचा विचार करा. यहोवाची सेवा करणाऱ्यांवर सैतानाने असा आरोप लावला: “माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपल्याकडे असलेलं सर्वकाही देईल.” (ईयो. २:४) सैतानाने असाही दावा केला की माणसं फक्त चांगल्या परिस्थितीतच यहोवाची सेवा करतील आणि कठीण समस्या आल्यावर ती त्याला सोडून देतील. पण ईयोबने यहोवाला विश्वासू राहून सैतानाचे हे आरोप खोटे सिद्ध केले. आपल्याकडेही सैतानाला खोटं ठरवण्याची संधी आहे. सैतानाने आपल्यावर कोणतीही समस्या आणली, तरी आपण यहोवाला कधीच सोडून देणार नाही. आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो की यहोवा त्याच्या नावासाठी आपल्याला नक्की सांभाळेल.—योहा. १७:११.
१७. १ पेत्र २:१२ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आणखी कोणत्या मार्गाने यहोवाच्या नावाचा गौरव करू शकतो?
१७ आपण यहोवाच्या नावाचा आदर करतो. (नीत. ३०:९; यिर्म. ७:८-११) आपण यहोवाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्या नावाने ओळखले जातो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यातून एकतर यहोवाचा आदर होऊ शकतो किंवा त्याचा अपमान होऊ शकतो. (१ पेत्र २:१२ वाचा.) म्हणून आपल्या वागण्या-बोलण्यातून यहोवाचा गौरव करण्यासाठी आपण शक्य ते सगळं केलं पाहिजे. आपण जर असं केलं, तर अपरिपूर्ण असूनसुद्धा आपण यहोवाच्या नावाचा गौरव करू शकतो.
१८. आपण आणखी कोणत्या मार्गाने यहोवाचं नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हे सिद्ध करू शकतो? (तळटीपसुद्धा पाहा.)
१८ आपल्याला आपल्या नावापेक्षा यहोवाच्या नावाची जास्त चिंता आहे. (स्तो. १३८:२) ही गोष्ट लक्षात ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे? यहोवाच्या नावावर आपलं प्रेम असल्यामुळे आपण जे काही करतो, त्यामुळे लोक कदाचित आपल्याला वाईटसाईट बोलतील.a पण हे लक्षात असू द्या, की यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी येशू एका अपराध्यासारखं लज्जास्पद मरण सोसायलासुद्धा तयार होता. बायबल म्हणतं: “त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ सोसला.” म्हणजेच लोक आपल्याबद्दल काय बोलतील याबद्दल त्याने जास्त विचार नाही केला. (इब्री १२:२-४) उलट, त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं.—मत्त. २६:३९.
१९. यहोवाच्या नावाबद्दल आपल्याला कसं वाटतं आणि का?
१९ आपल्याला यहोवाच्या नावाचा आणि यहोवाचे साक्षीदार या नावाने ओळखले जाण्याचा अभिमान आहे. यामुळे लोकांनी आपला कितीही अपमान करायचा प्रयत्न केला तरी आपण तो सहन करायला तयार आहोत. आपल्याला आपल्या नावापेक्षा यहोवा देवाचं नाव सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर मग, सैतानाने आपल्याला कितीही खचवण्याचा प्रयत्न केला, तरी आपण यहोवाच्या नावाचा गौरव करत राहायचा निश्चय करू या. जर आपण असं केलं तर आपणही हे सिद्ध करू शकतो की येशूप्रमाणेच यहोवाचं नाव आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
गीत १० यहोवाचा जयजयकार करा!
a ईयोबच्या तीन मित्रांनी जेव्हा त्याच्या नावावर कलंक लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ईयोबसारखा विश्वासू माणूससुद्धा चुकीचा विचार करू लागला. सुरुवातीला त्याने त्याच्या मुलांना गमावलं आणि त्याच्याकडची सगळी धनसंपत्ती गमावली, तेव्हा “ईयोबने पाप केलं नाही किंवा चुकीचं काही केल्याचा देवावर आरोप लावला नाही.” (ईयो. १:२२; २:१०) पण जेव्हा ईयोबवर चुकीची कामं करण्याचा आरोप लावण्यात आला, तेव्हा तो “विचार न करता” बोलला. (ईयो. ६:३, तळटीप) त्याने यहोवाचं नाव पवित्र करण्यापेक्षा स्वतःच्या नावावर लावलेला कलंक मिटवण्याला जास्त महत्त्व दिलं.—ईयो. १३:४, ५; ३२:२; ३४:५.