अभ्यास लेख २२
गीत १५ याहाचा जो एकुलता त्याची स्तुती करा!
यहोवाचं नाव येशूसाठी किती महत्त्वाचं होतं?
“मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय आणि पुढेही करीन.”—योहा. १७:२६.
या लेखात:
येशूने यहोवाचं नाव कसं प्रकट केलं? तसंच, त्याने त्याचं नाव पवित्र कसं केलं आणि त्याच्या नावावर लागलेला कलंक कसा मिटवला? या प्रश्नांची उत्तरं पाहू या.
१-२. (क) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने काय केलं? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
इ.स. ३३ ची निसान १४ ची वेळ आहे. गुरुवारचा दिवस आहे आणि संध्याकाळ उलटून गेली आहे. येशूने नुकतंच आपल्या विश्वासू प्रेषितांसोबत शेवटचं भोजन केलंय. त्याला माहीत होतं की लवकरच यहूदा त्याचा विश्वासघात करणार आहे, त्याचा छळ केला जाणार आहे आणि मग त्याला शत्रूंच्या हाती ठार मारलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या प्रेषितांसोबत शेवटचं भोजन केल्यानंतर, तो त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या बऱ्याच गोष्टी सांगतो. त्यांची जेव्हा तिथून निघण्याची वेळ होते तेव्हा येशू मनापासून एक प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. ही प्रार्थना आपल्याला योहानच्या १७ व्या अध्यायात पाहायला मिळते.
२ आता आपण याच प्रार्थनेबद्दल शिकून घेणार आहोत आणि त्यातून दोन प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहोत: (१) येशूच्या मृत्यूच्या आधी त्याला कोणत्या गोष्टींची चिंता होती? (२) पृथ्वीवर असताना त्याच्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान कोणती गोष्ट त्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची होती?
“मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय”
३. येशूने यहोवाच्या नावाबद्दल काय म्हटलं आणि त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (योहान १७:६, २६)
३ येशू त्याच्या प्रार्थनेत म्हणाला: “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय.” आणि ही गोष्ट त्याच्यासाठी किती महत्त्वाची होती हे आपल्याला समजतं, कारण त्याने दोनदा या गोष्टीचा उल्लेख केला. (योहान १७:६, २६ वाचा.) पण जेव्हा तो म्हणाला की “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय” तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? त्याच्या शिष्यांना देवाचं नाव माहीत नव्हतं का? नाही, असं नव्हतं. येशूचे शिष्य यहुदी होते. देवाचं नाव यहोवा आहे हे त्यांना आधीपासूनच माहीत होतं. कारण हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं नाव हजारो वेळा येतं. त्यामुळे येशूने जेव्हा म्हटलं, “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय” तेव्हा तो त्याच्या शिष्यांना देवाचं नाव यहोवा आहे असं सांगत नव्हता, तर यहोवा कसा आहे हे तो त्यांना सांगत होता. तसंच, त्याने आपल्या शिष्यांना यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखून घ्यायला मदत केली. जसं की, त्याने त्यांना यहोवाच्या उद्देशांबद्दल सांगितलं. त्याने काय केलंय, तो काय करणार आहे याबद्दल सांगितलं. त्याच्या गुणांबद्दल सांगितलं. आणि फक्त येशूच यहोवाबद्दल इतक्या चांगल्या प्रकारे सांगू शकत होता.
४-५. (क) एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्यासाठी खास कसं बनतं? उदाहरण द्या. (ख) येशूच्या शिष्यांसाठी यहोवाचं नाव आणखी खास कसं बनलं?
४ एखाद्याचं नाव आपल्यासाठी खास कसं बनतं हे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाचा विचार करा. समजा, तुमच्या मंडळीत डेव्हिड नावाचे वडील आहेत आणि ते डॉक्टरसुद्धा आहेत. तुम्ही त्यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखता. पण, एकदा असं घडतं की तुमची तब्येत बिघडते. आणि तुम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. त्या हॉस्पिटलमध्ये ते भाऊ काम करतात. ते त्यांच्या कौशल्याचा वापर करून तुमचा जीव वाचवतात. या घटनेनंतर तुम्ही जेव्हाजेव्हा या भावाचं नाव ऐकाल, तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर कोणतं चित्र उभं राहील? फक्त एका वडिलाचं चित्र उभं राहील का? नाही. तर अशा डॉक्टरचंही चित्र उभं राहील, ज्याने तुमचा जीव वाचवलाय.
५ त्याच प्रकारे, येशूच्या शिष्यांना यहोवाचं नाव आधीपासूनच माहीत होतं. पण, येशूच्या सेवाकार्यामुळे त्यांच्यासाठी ते नाव आणखी खास बनलं. आपण असं का म्हणू शकतो? कारण, येशूने त्याच्या वागण्या-बोलण्यातून यहोवासारखे गुण दाखवले. त्यामुळे येशूच्या शिकवणी ऐकून आणि तो लोकांशी ज्या प्रकारे वागला ते बघून प्रेषितांना यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ‘ओळखता आलं.’—योहा. १४:९; १७:३.
“तुझं स्वतःचं नाव जे तू मला दिलं आहेस”
६. येशू जेव्हा म्हणाला की यहोवाने त्याला आपलं नाव दिलंय तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (योहान १७:११, १२)
६ येशूने आपल्या शिष्यांसाठी या प्रार्थनेत असं म्हटलं: “तुझं स्वतःचं नाव, जे तू मला दिलं आहेस, त्या नावासाठी त्यांना सांभाळ.” (योहान १७:११, १२ वाचा.) मग याचा अर्थ असा होतो का, की इथून पुढे येशूला ‘यहोवा’ हे नाव मिळणार होतं? नाही. लक्ष द्या, की येशूने आपल्या प्रार्थनेत यहोवाच्या नावाबद्दल बोलताना “तुझं स्वतःचं नाव” असं म्हटलं. म्हणजेच, येशूला यहोवाचं नाव मिळणार नव्हतं. मग येशूला इथे नेमकं काय म्हणायचं होतं? पहिली गोष्ट म्हणजे, येशू यहोवाचा प्रतिनिधी होता आणि तो यहोवाच्या वतीने बोलायचा. तो त्याच्या पित्याच्या नावाने आला आणि पित्याच्या नावाने त्याने बरीच अद्भुत कामं केली. (योहा. ५:४३; १०:२५) दुसरी गोष्ट म्हणजे, येशूच्या नावाचा अर्थ “यहोवा तारण करतो” असा होतो. म्हणजेच येशूच्या नावाच्या अर्थातच यहोवाचं नाव आहे. यावरून हे स्पष्ट होतं की येशू नेमकं असं का बोलला होता.
७. येशू यहोवाच्या नावाने कसा बोलला हे समजावून सांगण्यासाठी उदाहरण द्या.
७ एका उदाहरणाचा विचार करा. एक राजदूत आपल्या राजाचा प्रतिनिधी असतो. तो त्याच्या नावाने येतो आणि त्याच्या वतीने बोलतो. त्यामुळे तो जो काही संदेश सांगतो तो जणू राजाकडूनच आहे असं समजलं जातं. त्याच प्रकारे येशू यहोवाचा प्रतिनिधी होता आणि तो त्याच्या नावाने लोकांशी बोलला.—मत्त. २१:९; लूक १३:३५.
८. पृथ्वीवर येण्याआधीही ‘येशूमध्ये’ यहोवाचं नाव होतं असं का म्हणता येईल? (निर्गम २३:२०, २१)
८ बायबलमध्ये येशूला शब्द म्हटलंय. कारण यहोवाने स्वर्गदूतांना आणि मानवांना आपला संदेश सांगण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी त्याचा वापर केला. (योहा. १:१-३) इस्राएली लोक जेव्हा ओसाड रानात होते तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी यहोवाने ज्या स्वर्गदूताचा वापर केला तो कदाचित येशूच असावा. यहोवाने इस्राएली लोकांना या स्वर्गदूताची आज्ञा पाळायला सांगितलं तेव्हा त्याने असं म्हटलं: “माझं नाव त्याच्यात आहे.”a (निर्गम २३:२०, २१ वाचा.) यहोवाचं नाव ‘येशूमध्ये’ होतं, कारण तो त्याच्या वतीने बोलला. तसंच यहोवाची बाजू घेण्यात आणि त्याचं नाव पवित्र करण्यात त्याने एक महत्त्वाची भूमिका बजावली.
“बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर”
९. येशूसाठी यहोवाचं नाव खूप महत्त्वाचं होतं असं का म्हणता येईल? समजावून सांगा.
९ आपण आताच चर्चा केल्याप्रमाणे पृथ्वीवर येण्याआधीपासूनच येशूसाठी यहोवाचं नाव खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळेच यहोवाचं नाव त्याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्याने प्रत्येक गोष्ट करताना दाखवून दिलं. आपल्या सेवाकार्याच्या शेवटीशेवटी त्याने असं म्हटलं: “बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” त्यानंतर त्याच्या पित्याने लगेचच आकाशातून मोठ्या आवाजात असं म्हटलं: “मी त्याचा गौरव केलाय आणि पुन्हा करीन.”—योहा. १२:२८.
१०-११. (क) येशूने यहोवाच्या नावाचा गौरव कसा केला? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) यहोवाचं नाव पवित्र करण्याची आणि त्याच्या नावावरचा कलंक मिटवण्याची गरज का होती?
१० यहोवाने तर आपल्या नावाचा गौरव केलाच, शिवाय येशूनेही आपल्या पित्याच्या नावाचा गौरव केला. तो कसा? एक मार्ग म्हणजे, त्याने आपल्या पित्याच्या चांगल्या गुणांबद्दल आणि कामांबद्दल लोकांना सांगितलं. पण यहोवाच्या नावाचा गौरव करण्यात आणखी बरंच काही सामील होतं. यहोवाचं नाव पवित्र करणं आणि त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवणंही गरजेचं होतं. ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेतून दिसून येतं. त्याने म्हटलं: “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.”—मत्त. ६:९.
११ पण यहोवाचं नाव पवित्र करण्याची आणि त्याच्या नावावरचा कलंक मिटवण्याची गरज का होती? कारण एदेन बागेत दियाबल सैतानाने यहोवा देवाचा अपमान केला होता आणि त्याचं नाव बदनाम केलं होतं. त्याने असा आरोप लावला होता की यहोवा खोटं बोलतोय आणि तो आदाम-हव्वापासून चांगल्या गोष्टी राखून ठेवतोय. (उत्प. ३:१-५) तसंच, यहोवाची काम करायची पद्धत चुकीची आहे असाही आरोप त्याने लावला. सैतानाच्या या खोट्या आरोपांमुळे यहोवाचं नाव बदनाम झालं. नंतर, ईयोबच्या दिवसांत सैतानाने माणसांवरही असा आरोप लावला, की ते स्वार्थासाठी यहोवाची सेवा करतात. तसंच, त्यांचं यहोवावर मनापासून प्रेम नाही म्हणून परीक्षा आल्यावर ते त्याची सेवा करायचं सोडून देतील. (ईयो. १:९-११; २:४) पण नक्की कोण खोटं बोलत होतं, यहोवा की सैतान? हे समजण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागणार होता.
येशूने आपल्या शिष्यांना देवाचं नाव पवित्र करणं किती महत्त्वाचं आहे हे शिकवलं (परिच्छेद १० पाहा)
“मी माझा प्राण देतो”
१२. यहोवाच्या नावावर प्रेम असल्यामुळे येशू काय करायला तयार होता?
१२ येशूचं यहोवावर प्रेम होतं. म्हणूनच त्याचं नाव पवित्र करण्यासाठी आणि त्याच्या नावावरचा कलंक मिटवण्यासाठी शक्य ते सगळं करायची त्याची इच्छा होती. त्याने म्हटलं: “मी माझा प्राण देतो.” (योहा. १०:१७, १८) हो, यहोवाच्या नावासाठी येशू आपला जीव द्यायलाही तयार होता.b पहिल्या मानवी जोडप्याने, म्हणजे आदाम-हव्वाने सैतानाची बाजू घेऊन यहोवाकडे पाठ फिरवली. याच्या अगदी उलट, येशू पृथ्वीवर येऊन यहोवावरचं आपलं प्रेम सिद्ध करायला तयार होता. त्याने यहोवाला पूर्णपणे एकनिष्ठ राहून त्याचं प्रेम सिद्ध केलं. (इब्री ४:१५; ५:७-१०) तो आयुष्यभर यहोवाला विश्वासू राहिला, अगदी वधस्तंभावरचा मृत्यू सोसेपर्यंत. (इब्री १२:२) अशा प्रकारे त्याने हे सिद्ध केलं, की त्याचं यहोवावर आणि त्याच्या नावावर खूप प्रेम आहे.
१३. सैतान खोटारडा आहे हे सिद्ध करण्यासाठी येशूच योग्य का होता? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ येशूने जे काही केलं त्यातून हेच दिसून आलं, की यहोवा नाही तर सैतान खोटारडा आहे! (योहा. ८:४४) इतर कोणापेक्षाही येशू यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळे, सैतानाच्या आरोपांमध्ये जराही तथ्य असतं तर ती गोष्ट येशूला कळली असती. पण येशूने यहोवाची बाजू घ्यायचा निश्चय केला होता. एका क्षणाला असं वाटत होतं, की यहोवाने येशूला सोडून दिलंय. पण आपल्या पित्याकडे पाठ फिरवण्याऐवजी येशू त्याच्यासाठी मरायलाही तयार होता.—मत्त. २७:४६.c
येशूने जे काही केलं त्यावरून हे सिद्ध झालं की यहोवा नाही, तर सैतान खोटा आहे! (परिच्छेद १३ पाहा)
“तू मला दिलेलं कार्य [मी] पूर्ण” केलंय
१४. यहोवाने येशूला त्याच्या विश्वासूपणाचं कोणतं प्रतिफळ दिलं?
१४ येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री जी प्रार्थना केली होती त्यात तो असं म्हणू शकला: “तू मला दिलेलं कार्य [मी] पूर्ण” केलंय. येशूला भरवसा होता की यहोवा त्याला त्याच्या विश्वासूपणाचं प्रतिफळ देईल. (योहा. १७:४, ५) येशूचा हा भरवसा तुटला नाही. कारण यहोवाने त्याला कबरेत राहू दिलं नाही. (प्रे. कार्यं २:२३, २४) यहोवाने येशूला पुन्हा उठवलं आणि त्याला स्वर्गात श्रेष्ठ स्थान दिलं. (फिलिप्पै. २:८, ९) नंतर येशू देवाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करू लागला. मग या राज्यामुळे काय होणार होतं? येशूने आपल्या शिष्यांना जी प्रार्थना शिकवली होती, त्यातल्या दुसऱ्या भागात तो असं म्हणाला: “तुझं राज्य येवो. तुझी [यहोवाची] इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.”—मत्त. ६:१०.
१५. येशू आणखी कायकाय करेल?
१५ लवकरच येशू देवाच्या शत्रूंच्या विरोधात युद्ध (हर्मगिदोनचं युद्ध) पुकारेल आणि त्यांचा नाश करेल. (प्रकटी. १६:१४, १६; १९:११-१६) त्यानंतर तो सैतानाला “अथांग डोहात” टाकेल. अथांग डोहात सैतान अशा अवस्थेत कैद असेल ज्यात त्याला काहीच करता येणार नाही. (प्रकटी. २०:१-३) मग, येशू हजार वर्षांसाठी राज्य करेल. तो पृथ्वीवर शांती आणेल आणि माणसांना परिपूर्ण बनायला मदत करेल. तो मेलेल्यांना पुन्हा उठवेल आणि पृथ्वीला नंदनवन बनवेल. अशा प्रकारे यहोवाचा उद्देश पूर्ण होईल.—प्रकटी. २१:१-४.
१६. हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी काय होईल?
१६ हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी काय होईल? मानवजातीला खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्या पापांची क्षमा मागायची गरज लागणार नाही. कारण माणसांमधून पाप आणि अपरिपूर्णता काढून टाकली जाईल. तसंच, यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी त्यांना कुठल्याही मध्यस्थाची किंवा याजकाची गरज नसेल. आणि “शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू [आदाममुळे आलेला मृत्यू] नाहीसा केला जाईल.” मेलेल्या लोकांना जिवंत केलं जाईल. त्यामुळे कबरी रिकाम्या होतील. तसंच, पृथ्वीवर असणारे सगळे जण परिपूर्ण होतील.—१ करिंथ. १५:२५, २६.
१७-१८. (क) हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी काय होईल? (ख) येशूचा शासनकाळ संपल्यानंतर तो काय करेल? (१ करिंथकर १५:२४, २८) (चित्रसुद्धा पाहा.)
१७ हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी आणखी काय होईल? त्या वेळी एक खास घटना घडेल. यहोवा पवित्र आणि न्यायी देव आहे की नाही याबद्दलचा वाद कायमचा मिटेल. तो कसा? एदेन बागेत सैतानाने असा दावा केला होता, की यहोवा खोटं बोलतो आणि तो प्रेमापोटी मानवांवर राज्य करत नाही. त्या वेळेपासून त्याचा आदर करणारे वेळोवेळी त्याचं नाव पवित्र करत आले आहेत. त्यामुळे, हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी यहोवाच्या नावावर लागलेला कलंक पूर्णपणे पुसून टाकला जाईल. यहोवाने हे सिद्ध केलेलं असेल की तो एक प्रेमळ पिता आहे आणि याबद्दल कसलीच शंका उरणार नाही.
१८ हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी सैतानाने केलेले दावे कायमचे खोटे सिद्ध होतील. मग येशूचा शासनकाळ संपल्यानंतर तो काय करेल? सैतानासारखं वागून तोही यहोवाविरुद्ध बंड करेल का? मुळीच नाही! (१ करिंथकर १५:२४, २८ वाचा.) येशू आपल्या पित्याला राज्य परत सोपवेल. आणि तो स्वतः त्याच्या अधीन होईल. हो, सैतानाच्या अगदी उलट तो यहोवावरच्या प्रेमापोटी सगळं काही सोडून द्यायला तयार होईल.
हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी येशू स्वतःहून यहोवाला राज्य पुन्हा सोपवतोय (परिच्छेद १८ पाहा)
१९. यहोवाचं नाव येशूसाठी किती महत्त्वाचं होतं?
१९ यहोवा येशूला आपलं नाव द्यायला का तयार होता, हे आपण आता समजू शकतो. पिता कसा आहे याचं हुबेहूब चित्र येशूने लोकांसमोर रेखाटलं. मग यहोवाचं नाव येशूसाठी किती महत्त्वाचं होतं? ते त्याच्यासाठी सगळं काही होतं. तो त्या नावासाठी मरायलाही तयार होता. तसंच, पुढे हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी तो यहोवाला सगळं काही द्यायलासुद्धा तयार होईल. मग आपण येशूसारखं कसं वागू शकतो? या प्रश्नाचं उत्तर पुढच्या लेखात पाहू या.
गीत १६ यहोवाने अभिषिक्त निवडला, याहची स्तुती करा!
a काही वेळा यहोवाचा संदेश पोहोचवताना स्वर्गदूत यहोवाच्या वतीने बोलले. त्यामुळे, काही वेळा जेव्हा बायबलमध्ये यहोवा बोलतोय असं म्हणण्यात आलंय, त्या वेळी त्या घटनेत खरंतर स्वर्गदूत त्याच्या वतीने बोलत होता. (उत्प. १८:१-३३) शास्त्रवचनांमध्ये जरी असं सांगण्यात आलं असलं, की मोशेला यहोवाकडून नियमशास्त्र मिळालं, तरी इतर वचनांवरून असं कळतं की ते नियमशास्त्र देण्यासाठी यहोवाने स्वर्गदूतांचा वापर केला.—लेवी. २७:३४; प्रे. कार्यं ७:३८, ५३; गलती. ३:१९; इब्री २:२-४.
b यासोबतच येशूच्या मृत्यूमुळे मानवांसाठी सर्वकाळाच्या जीवनाचा मार्ग मोकळा झाला.
c एप्रिल २०२१ च्या टेहळणी बुरूज अंकातला पान ३०-३१ वर “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.