अभ्यास लेख १९
गीत ६ सृष्टी करते यहोवाची स्तुती
विश्वासू स्वर्गदूतांसारखं वागा!
“[यहोवाच्या] सर्व शक्तिशाली स्वर्गदूतांनो, त्याची स्तुती करा!”—स्तो. १०३:२०.
या लेखात:
विश्वासू स्वर्गदूतांच्या उदाहरणातून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात ते पाहा.
१-२. (क) स्वर्गदूतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? (ख) स्वर्गदूतांमध्ये आणि आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी सारख्या आहेत?
यहोवाने तुम्हाला सत्याकडे आकर्षित केलं, तेव्हा त्याने तुम्हाला त्याच्या प्रेमळ उपासकांच्या एका कुटुंबाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित केलं. त्याच्या या कुटुंबात संपूर्ण जगभरात असलेले आपले भाऊबहीण आणि त्यासोबतच लाखो स्वर्गदूतसुद्धा आहेत. (दानी. ७:९, १०) आपण स्वर्गदूतांचा विचार करतो, तेव्हा ते आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत, हे आपल्या लक्षात येतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हापासून अस्तित्वात आहोत त्याच्या कितीतरी जास्त काळापासून स्वर्गदूत अस्तित्वात आहेत. (ईयो. ३८:४, ७) ते आपल्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहेत. तसंच, ते इतके पवित्र आणि नीतिमान आहेत, की आपण अपरिपूर्ण मानव त्यांची बरोबरी कधीच करू शकत नाही.—लूक ९:२६.
२ पण स्वर्गदूतांमध्ये आणि आपल्यामध्ये इतका फरक असूनही, त्यांच्यात आणि आपल्यात बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. उदाहरणार्थ, स्वर्गदूतांप्रमाणे आपणही यहोवाच्या चांगल्या गुणांचं अनुकरण करू शकतो. स्वर्गदूतांप्रमाणेच आपल्यालाही इच्छास्वातंत्र्य आहे. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही वैयक्तिक नाव आहे. आपलं वेगळं असं एक व्यक्तिमत्त्व आहे आणि आपल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तसंच, स्वर्गदूतांप्रमाणेच आपल्यालाही आपल्या निर्माणकर्त्याबद्दल शिकून घ्यायची आणि त्याची उपासना करायची इच्छा आहे.—१ पेत्र १:१२.
३. विश्वासू स्वर्गदूतांकडून आपण काय शिकू शकतो?
३ स्वर्गदूतांमध्ये आणि आपल्यामध्ये बऱ्याच बाबतीत सारखेपणा आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं. आणि आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. या लेखात आपण शिकणार आहोत, की आपण विश्वासू स्वर्गदूतांच्या नम्रतेचं, लोकांबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमाचं आणि त्यांच्या सहनशीलतेचं अनुकरण कसं करू शकतो. तसंच, मंडळी शुद्ध ठेवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचंही आपण अनुकरण कसं करू शकतो तेसुद्धा पाहू या.
स्वर्गदूत नम्र आहेत
४. (क) स्वर्गदूत नम्रता कशी दाखवतात? (ख) स्वर्गदूत नम्र का आहेत? (स्तोत्र ८९:७)
४ विश्वासू स्वर्गदूत नम्र आहेत. ते अनुभवी, शक्तिशाली आणि बुद्धिमान असले तरी नेहमी यहोवाच्या सूचनांचं पालन करतात. (स्तो. १०३:२०) ते त्यांची नेमणूक पार पाडत असताना कधीही आपल्या कामाबद्दल बढाई मारत नाहीत. तसंच, इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी ते कधीच त्यांच्या विलक्षण शक्तीचा वापर करत नाहीत. ते जे काम करतात त्याचं श्रेय त्यांना मिळत नसलं, तरी ते आनंदाने देवाची इच्छा पूर्ण करतात.a (उत्प. ३२:२४, २९; २ राजे १९:३५) यहोवाला मिळणारा गौरव त्यांना मिळावा असं त्यांना अजिबात वाटत नाही. मग प्रश्न येतो की स्वर्गदूत इतके नम्र का आहेत? कारण ते यहोवावर प्रेम करतात आणि त्याचा मनापासून आदर करतात.—स्तोत्र ८९:७ वाचा.
५. प्रेषित योहानची चूक सुधारताना स्वर्गदूताने नम्रता कशी दाखवली? (चित्रसुद्धा पाहा.)
५ स्वर्गदूत किती नम्र आहेत, हे दाखवणाऱ्या एका घटनेचा विचार करा. जवळपास इ.स. ९६ मध्ये एका स्वर्गदूताने प्रेषित योहानला एक विस्मयकारक दृष्टान्त दाखवला. या स्वर्गदूताचं नाव सांगण्यात आलेलं नाही. (प्रकटी. १:१) मग हा दृष्टान्त पाहून योहानने काय केलं? अहवालात म्हटलंय, की त्याने त्या स्वर्गदूताची उपासना करायचा प्रयत्न केला. पण त्या एकनिष्ठ स्वर्गदूताने त्याला लगेच थांबवलं आणि म्हटलं: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि . . . तुझ्या बांधवांसारखाच फक्त एक दास आहे. देवाची उपासना कर!” (प्रकटी. १९:१०) खरंच, यावरून तो स्वर्गदूत किती नम्र होता हे दिसून येत नाही का? या स्वर्गदूताला गौरव आणि प्रशंसा नको होती. त्याने लगेच योहानचं लक्ष यहोवा देवाकडे वळवलं. पण त्याने योहानला खालच्या नजरेनेही पाहिलं नाही. हा स्वर्गदूत योहानपेक्षा खूप जास्त काळापासून यहोवाची सेवा करत असला आणि त्याच्यापेक्षा खूप शक्तिशाली असला, तरी त्याने नम्रपणे म्हटलं की योहानसारखाच तोसुद्धा यहोवाची सेवा करणारा एक दास आहे. त्याला योहानची चूक सुधारावी लागली, तरी तो त्याच्याशी कडक शब्दांत बोलला नाही. किंवा त्या वृद्ध प्रेषिताशी तो कठोरपणे वागला नाही. याउलट, तो त्याच्याशी प्रेमाने बोलला. कदाचित त्या स्वर्गदूताने ओळखलं असावं की योहानने भारावून जाऊन तसं केलं.
स्वर्गदूत योहानशी नम्रतेने वागला (परिच्छेद ५ पाहा)
६. आपण स्वर्गदूतांच्या नम्रतेचं अनुकरण कसं करू शकतो?
६ आपण स्वर्गदूतांच्या नम्रतेचं अनुकरण कसं करू शकतो? आपणसुद्धा आपल्या नेमणुका पार पाडत असताना बढाई न मारता किंवा आपल्या कामाचं श्रेय न घेता ते पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे. (१ करिंथ. ४:७) यासोबत जर आपण इतरांपेक्षा जास्त काळ यहोवाची सेवा केली असेल किंवा आपल्याजवळ काही विशेष बहुमान असतील, तर आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजलं नाही पाहिजे. उलट, आपल्याजवळ जितक्या जास्त जबाबदाऱ्या असतील तितकंच आपण स्वतःला कमी समजलं पाहिजे. (लूक ९:४८) आपल्याला स्वतःबद्दल गाजावाजा करायचा नाही, तर विश्वासू स्वर्गदूतांप्रमाणेच इतरांची सेवा करायची आहे.
७. एखाद्याला सुधारावं लागतं किंवा सल्ला द्यावा लागतो तेव्हा आपण नम्रता कशी दाखवू शकतो?
७ आपल्याला आपल्या मुलांना सुधारावं लागतं किंवा एखाद्या भावाला किंवा बहिणीला सल्ला द्यावा लागतो, तेव्हासुद्धा आपण त्या स्वर्गदूतासारखी नम्रता दाखवू शकतो. एखाद्याला सल्ला देताना कदाचित आपल्याला तो स्पष्ट शब्दांत द्यावा लागेल. पण सल्ला देताना तो नेहमी प्रेमळ शब्दांत दिला पाहिजे; नाहीतर ज्याला आपण सल्ला देतोय तो खचून जाईल. जर आपण नम्र राहिलो, तर आपल्याला आदराने आणि प्रेमळपणे इतरांना बायबल आधारित सल्ला देता येईल.—कलस्सै. ४:६.
स्वर्गदूतांचं लोकांवर प्रेम आहे
८. (क) लूक १५:१० मधून स्वर्गदूतांचं लोकांवर प्रेम असल्याचं कसं दिसून येतं? (ख) प्रचारकार्यात स्वर्गदूत कोणती भूमिका पार पाडतात? (चित्रसुद्धा पाहा.)
८ स्वर्गदूत असा विचार करत नाहीत, की मानवांचा आणि आपला काहीच संबंध नाही, किंवा माणसं इतकी महत्त्वाची नाहीत. उलट, ते लोकांवर प्रेम करतात. जेव्हा एखादी पापी व्यक्ती पश्चात्ताप करते, म्हणजे जेव्हा एखादं हरवलेलं मेंढरू यहोवाकडे परत येतं, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. तसंच, जेव्हा एखादी व्यक्ती सत्य शिकून आपल्या जीवनात बदल करते तेव्हाही त्यांना आनंद होतो. (लूक १५:१० वाचा.) स्वर्गदूत प्रचारकार्यातही अगदी उत्साहाने भाग घेतात. (प्रकटी. १४:६) ते लोकांना थेट प्रचार करत नसले, तरी यहोवाबद्दल शिकून घ्यायची इच्छा असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचायला ते आपल्याला मदत करतात. हे खरंय की एखाद्या ठरावीक घटनेत स्वर्गदूतांचाच सहभाग होता हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. कारण लोकांना मदत करायला किंवा आपल्या सेवकांचं मार्गदर्शन करायला यहोवा इतर माध्यमांचासुद्धा वापर करतो; जसं की, त्याच्या पवित्र शक्तीचा. (प्रे. कार्यं १६:६, ७) असं असलं तरी, तो स्वर्गदूतांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करतो. त्यामुळेच जेव्हा आपण लोकांना प्रचार करतो तेव्हा आपण याची खातरी ठेवू शकतो, की ते आपल्याला नक्कीच मदत करतील.—“त्यांच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या” ही चौकट पाहा.b
एका जोडप्याने नुकतंच आपलं सार्वजनिक साक्षकार्य संपवलंय. घरी जात असताना, बहीण एका स्त्रीकडे बघत आहे. ती स्त्री खूप टेंशनमध्ये दिसते. बहिणीच्या लक्षात येतं की स्वर्गदूत देवाला शोधत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला मदत करू शकतात. आणि ती त्या स्त्रीसोबत सहानुभूतीने बोलायला प्रवृत्त होते (परिच्छेद ८ पाहा)
९. स्वर्गदूतांचं लोकांवर असलेल्या प्रेमाचं आपण अनुकरण कसं करू शकतो?
९ स्वर्गदूतांचं लोकांवर जे प्रेम आहे त्याचं अनुकरण आपण कसं करू शकतो? एखाद्याला मंडळीत पुन्हा स्वीकारलं गेल्याची घोषणा आपण ऐकतो, तेव्हा स्वर्गदूतांप्रमाणेच आपल्यालासुद्धा आनंद झाला पाहिजे. आपण मोठ्या मनाने त्या व्यक्तीचं मंडळीत स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवून दिलं पाहिजे. (लूक १५:४-७; २ करिंथ. २:६-८) तसंच, आपण प्रचारकार्यात जास्तीत जास्त भाग घेऊनही स्वर्गदूतांचं अनुकरण करू शकतो. (उप. ११:६) आणि आनंदाची बातमी सांगताना ज्याप्रमाणे स्वर्गदूत आपल्याला मदत करतात, त्याचप्रमाणे आपल्या भाऊबहिणींना प्रचारकार्यात मदत करण्यासाठी आपण संधी शोधू शकतो. उदाहरणार्थ, आपण कमी अनुभव असलेल्या प्रचारकांसोबत काम करायची योजना करू शकतो. किंवा मग वयस्कर किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या भाऊबहिणींसोबत प्रचारकार्यात सहभाग घेता यावा म्हणून आपण त्यांना मदत करू शकतो.
१०. साराच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो?
१० आपल्या परिस्थितीमुळे जर आपल्याला यहोवाच्या सेवेत हवं तितकं करता येत नसलं तर काय? तरीसुद्धा आपण प्रचारकार्यात स्वर्गदूतांसोबत काम करायचे मार्ग शोधू शकतो. भारतात राहणाऱ्या साराc नावाच्या बहिणीच्या अनुभवाचा विचार करा. जवळपास २० वर्षं पायनियर सेवा केल्यानंतर सारा आजारी पडली आणि तिला अंथरुणावरून उठणं किंवा चालणं-फिरणं अशक्य झालं. साहजिकच ती खूप उदास झाली. पण नियमित बायबल वाचनासोबतच मंडळीतल्या भाऊबहिणींच्या पाठिंब्यामुळे तिला हळूहळू आपला हरवलेला आनंद परत मिळवता आला. तिच्या परिस्थितीमुळे तिला सेवाकार्यात काही बदल करावे लागले. तिला पत्र लिहायला उठूनही बसता येत नव्हतं. त्यामुळे टेलिफोनद्वारे साक्षकार्य करायचा एकच पर्याय तिच्याकडे उरला होता. म्हणून तिने तिच्या सर्व पुनर्भेटींना फोन केला. त्यांनीसुद्धा थोडीफार आवड असणाऱ्या इतर लोकांची तिला माहिती दिली. याचा काय परिणाम झाला? काही महिन्यांतच साराकडे ७० बायबल अभ्यास होते. ते सगळे ती स्वतः चालवू शकत नव्हती. त्यामुळे तिने मंडळीतल्या इतर भाऊबहिणींना काही अभ्यास सोपवून दिले. त्यांच्यापैकी बरेच बायबल विद्यार्थी आता सभांना येतात. खरंच, प्रचारकार्यात होता होईल तितकं करणाऱ्या सारासारख्या भाऊबहिणींसोबत काम करताना स्वर्गदूतांना किती आनंद होत असेल!
स्वर्गदूत सहनशील आहेत
११. विश्वासू स्वर्गदूतांनी सहनशीलतेच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण कसं मांडलंय?
११ विश्वासू स्वर्गदूत सहनशीलतेच्या बाबतीतसुद्धा आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहेत. त्यांनी हजारो वर्षांपासून दुष्टता आणि अन्याय सहन केला आहे. त्यांनी एकेकाळी त्यांच्यासोबत सेवा करणाऱ्या सैतानाला आणि इतर अनेक दुष्ट स्वर्गदूतांना यहोवाविरुद्ध बंड करताना पाहिलंय. (उत्प. ३:१; ६:१, २; यहू. ६) तसंच, बायबल अशा एका विश्वासू स्वर्गदूताबद्दलही सांगतं, ज्याचा एका शक्तिशाली दुष्ट स्वर्गदूताने विरोध केला होता. (दानी. १०:१३) शिवाय, संपूर्ण मानवी इतिहासात स्वर्गदूतांनी फक्त मोजक्याच लोकांना खरी उपासना करताना पाहिलंय. इतक्या वाईट परिस्थितीतही, एकनिष्ठ स्वर्गदूत आनंदाने आणि आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की योग्य वेळी देव सगळा अन्याय दूर करेल.
१२. सहनशक्ती वाढवायला कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?
१२ आपण स्वर्गदूतांच्या सहनशीलतेचं अनुकरण कसं करू शकतो? स्वर्गदूतांप्रमाणे आपल्यालाही अन्यायाचा सामना करावा लागू शकतो. पण त्यांच्यासारखीच आपणसुद्धा ही खातरी बाळगू शकतो, की योग्य वेळी देव सगळी दुष्टता काढून टाकेल. त्यामुळे विश्वासू स्वर्गदूतांप्रमाणे आपणही “चांगलं ते करत राहायचं सोडू नये.” (गलती. ६:९) तसंच, आपली सहनशक्ती वाढवायला यहोवा आपल्याला मदत करेल असं वचनही त्याने आपल्याला दिलंय. (१ करिंथ. १०:१३) आपण यहोवाला त्याच्या पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करू शकतो. कारण त्यामुळे आनंद आणि धीर उत्पन्न होतो. (गलती. ५:२२; कलस्सै. १:११) पण तुम्हाला जर विरोधाचा सामना करावा लागला तर काय? अशा वेळी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा आणि घाबरू नका. यहोवा नेहमी तुमच्या पाठीशी असेल आणि तुम्हाला ताकद देईल.—इब्री १३:६.
स्वर्गदूत मंडळी शुद्ध ठेवायला मदत करतात
१३. शेवटल्या दिवसांमध्ये स्वर्गदूतांना कोणती खास नेमणूक दिली गेली आहे? (मत्तय १३:४७-४९)
१३ शेवटल्या दिवसांमध्ये यहोवाने स्वर्गदूतांना एक खास नेमणूक दिली आहे. (मत्तय १३:४७-४९ वाचा.) जगभरातले लाखो लोक राज्याच्या आनंदाच्या बातमीकडे आकर्षित होत आहेत. त्यांपैकी काही लोक खरे ख्रिस्ती बनण्यासाठी पावलं उचलत आहेत. पण काही जण मात्र तसं करत नाहीत. “दुष्टांना नीतिमानांपासून वेगळं” करण्यासाठी स्वर्गदूतांना नेमण्यात आलंय. याचा अर्थ मंडळीची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी मदत करायला त्यांना नेमण्यात आलंय. पण याचा अर्थ असा होत नाही, की बायबल अभ्यास करायचं सोडून दिलेल्या किंवा सभा आणि प्रचाराला यायचं बंद केलेल्या लोकांपैकी कोणीही मंडळीत कधीच परत येऊ शकत नाही. किंवा याचा असाही अर्थ होत नाही, की मंडळीत कधीच समस्या येणार नाहीत. पण तरीसुद्धा आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की मंडळ्या शुद्ध ठेवण्यासाठी स्वर्गदूत खूप मेहनत घेत आहेत.
१४-१५. मंडळीच्या आध्यात्मिक आणि नैतिक शुद्धतेबद्दल स्वर्गदूतांना जशी काळजी आहे तशी काळजी आपण कशी दाखवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१४ मंडळीच्या शुद्धतेबद्दल स्वर्गदूतांना जशी काळजी आहे तशीच काळजी आपण कशी दाखवू शकतो? मंडळी नैतिक रितीने आणि आध्यात्मिक रितीने शुद्ध ठेवायची आपली जबाबदारी पार पाडून आपण असं करू शकतो. त्यासाठी आपण यहोवावर प्रेम करणाऱ्या लोकांशी मैत्री केली पाहिजे आणि यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येईल अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या हृदयाचं रक्षण करता येईल. (स्तो. १०१:३) आपण आपल्या भाऊबहिणींना यहोवाला विश्वासू राहायलासुद्धा मदत करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या भावाने किंवा बहिणीने गंभीर पाप केल्याचं आपल्याला कळतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे? त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आपण त्यांना वडिलांशी बोलायला सांगू शकतो. जर ते तसं करायला तयार नसतील, तर आपण वडिलांना त्याबद्दल माहिती देऊ शकतो. कारण आध्यात्मिक रितीने कमजोर असलेल्या आपल्या भावाला किंवा बहिणीला लवकरात लवकर मदत मिळावी अशी आपली इच्छा असते.—याको. ५:१४, १५.
१५ दुःखाची गोष्ट म्हणजे गंभीर पाप करणाऱ्या काहींना मंडळीतून काढून टाकलं जातं. अशा परिस्थितीत आपण त्यांची “संगत सोडून” देतो.d (१ करिंथ. ५:९-१३) त्यामुळे मंडळी शुद्ध ठेवायला मदत होते. शिवाय मंडळीतून काढून टाकलेल्या लोकांशी संगत करायचं टाळल्यामुळे आपण खरंतर त्यांना दया दाखवत असतो. आपल्या ठाम भूमिकेमुळे त्यांना यहोवाकडे परत येण्याची गरज आहे या गोष्टीची जाणीव होते. ते जर यहोवाकडे परत आले, तर यहोवा आणि स्वर्गदूतांप्रमाणेच आपल्यालाही खूप आनंद होईल.—लूक १५:७.
एखाद्या भावाने किंवा बहिणीने गंभीर पाप केलंय हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? (परिच्छेद १४ पाहा)e
१६. तुम्ही कोणत्या मार्गांनी स्वर्गदूतांचं अनुकरण करायचा प्रयत्न करू शकता?
१६ यहोवाने आपल्याला स्वर्गदूतांबद्दल शिकायची आणि त्यांच्यासोबत काम करायची संधी दिली हा खरंच किती मोठा बहुमान आहे! आपण त्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण करत राहू या. जसं की त्यांची नम्रता, लोकांवर असलेलं त्यांचं प्रेम, त्यांची सहनशीलता आणि मंडळीला नैतिक आणि आध्यात्मिक रितीने शुद्ध ठेवण्याबद्दल त्यांची काळजी. अशा प्रकारे, आपण जर विश्वासू स्वर्गदूतांचं अनुकरण करत राहिलो, तर आपणही कायम यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबात राहू शकतो.
गीत १२३ देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चाला
a लाखो-करोडो स्वर्गदूतांपैकी बायबलमध्ये फक्त दोन स्वर्गदूतांची नावं देण्यात आली आहेत. ती म्हणजे, मीखाएल आणि गब्रीएल.—दानी. १२:१; लूक १:१९.
b साक्ष द्या ५९ ¶१७; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.५-HI ३ या प्रकाशनांमध्ये आणखी अनुभव दिलेत.
c नाव बदलण्यात आलंय.
d २०२४ च्या नियमन मंडळाकडून रिपोर्ट #२ मध्ये स्पष्ट करण्यात आल्याप्रमाणे, जेव्हा मंडळीतून काढून टाकलेली व्यक्ती सभेला येते तेव्हा प्रचारक त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करून तिचं थोडक्यात स्वागत करायचं की नाही ते ठरवू शकतात.
e चित्रांचं वर्णन: एक बहीण दुसऱ्या बहिणीला वडिलांशी बोलायला सांगते. पण ती तसं करत नाही. म्हणून ही बहीण त्याबद्दल वडिलांना जाऊन सांगते.