अभ्यास लेख १४
गीत ८ यहोवा आमचा गड
“आजच ठरवा तुम्ही कोणाची उपासना करणार”
“मी आणि माझं कुटुंब तर यहोवाचीच उपासना करणार.”—यहो. २४:१५.
या लेखात:
आपण यहोवाची सेवा करायची निवड का केली, याची काही कारणं पाहणार आहोत.
१. खऱ्या अर्थाने आनंदी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि का? (यशया ४८:१७, १८)
आपल्या स्वर्गातल्या पित्याचं आपल्यावर जिवापाड प्रेम आहे. त्याची इच्छा आहे, की आपण आता आणि भविष्यातही जीवनाचा आनंद लुटावा. (उप. ३:१२, १३) त्याने आपल्याला काही खास कौशल्यं दिली आहेत. पण स्वतःवर राज्य करायची किंवा चांगलं आणि वाईट काय हे ठरवायची क्षमता त्याने आपल्याला दिलेली नाही. (उप. ८:९; यिर्म. १०:२३) त्याला माहीत आहे, की खरा आनंद हा त्याची सेवा करून आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जीवन जगूनच आपल्याला मिळेल.—यशया ४८:१७, १८ वाचा.
२. (क) आपण कशावर विश्वास ठेवावा असं सैतानाला वाटतं? (ख) सैतानाचा दावा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने काय केलं?
२ आपण यहोवाशिवाय आनंदी राहू शकतो आणि माणसं यशस्वीपणे स्वतःवर राज्य करू शकतात, या गोष्टींवर आपण विश्वास ठेवावा असं सैतानाला वाटतं. (उत्प. ३:४, ५) सैतानाचा हा दावा किती खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने बंडखोर माणसांना काही काळासाठी स्वतःवर राज्य करायची परवानगी दिली. आणि माणसाने माणसांवर राज्य केल्याचे किती वाईट परिणाम होत आहेत हे तर आपण पाहतच आहोत! याच्या अगदी उलट, यहोवाची सेवा केल्यामुळे बऱ्याच स्त्री-पुरुषांना आनंदी जीवन जगता आलं. त्यांच्याबद्दल आपण बायबलमध्ये वाचू शकतो. येशूनेसुद्धा नेहमी यहोवाची सेवा केली त्यामुळे तो खूप आनंदी होता. आणि खरंच आपण येशूकडून खूप काही शिकू शकतो. चला तर मग, या लेखात आपण तीन प्रश्नांवर चर्चा करू या: (१) येशूने यहोवाची सेवा करायचं का निवडलं? (२) आपण फक्त आपल्या स्वर्गातल्या पित्याची उपासना का केली पाहिजे? आणि (३) यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याजवळ कोणती कारणं आहेत?
येशूने यहोवाची सेवा करायचं का निवडलं?
३. (क) सैतानाने येशूला कोणतं आमिष दाखवलं? (ख) येशूने कोणती निवड केली?
३ येशूच्या बाप्तिस्म्याच्या काही वेळानंतरच सैतानाने त्याला एक आमिष दाखवलं. त्याने म्हटलं की जर येशूने एकदाच त्याची उपासना केली, तर तो जगातली सगळी राज्यं त्याला देईल. इथे येशूला एक निवड करायची होती: आपण यहोवाची उपासना करणार की सैतानाची. मग त्याने काय केलं? त्याने सैतानाला म्हटलं: “अरे सैताना, चालता हो! कारण असं लिहिलंय: ‘तू फक्त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि फक्त त्याचीच पवित्र सेवा कर.’” (मत्त. ४:८-१०) येशूने यहोवाचीच सेवा करायची निवड का केली? चला याची काही कारणं पाहू या.
४-५. येशूने कोणत्या कारणांमुळे यहोवाची सेवा करायचं निवडलं?
४ येशूने यहोवाची सेवा करायची निवड करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, त्याचं पित्यावरचं प्रेम. येशूचं यहोवावर मनापासून प्रेम आहे. (योहा. १४:३१) शिवाय, येशूला माहीत आहे की यहोवा हाच जीवनाचा उगम आहे. तो भरवशालायक आणि उदार आहे. (स्तो. ३३:४; ३६:९; याको. १:१७) तसंच, यहोवाचीच उपासना करणं योग्य आहे. त्यामुळे येशूने यहोवाची सेवा केली. (योहा. ८:२८, २९; प्रकटी. ४:११) याशिवाय, यहोवा कधीच येशूशी खोटं बोलला नाही. आणि येशूकडे जे आहे ते सगळं यहोवानेच त्याला दिलं. (योहा. १:१४) याच्या अगदी उलट, सैतानामुळे मानवजातीवर पाप आणि मृत्यू ओढावला. तो खोटारडा आहे. तसंच तो लोभी आणि स्वार्थी आहे. (योहा. ८:४४) येशूला या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे यहोवाच्या विरोधात जाऊन सैतानासारखं वागायचा विचारही कधी त्याच्या मनात आला नाही.—फिलिप्पै. २:५-८.
५ आपण जर यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर बरेच चांगले परिणाम होतील हे येशूला माहीत होतं. त्याने यहोवाची सेवा करण्यामागे हेसुद्धा एक कारण होतं. (इब्री १२:२) त्याला माहीत होतं की तो जर विश्वासू राहिला तर त्याच्या पित्याचं नाव पवित्र होईल. तसंच पाप आणि मृत्यूपासून मानवजातीची सुटका होईल.
आपण फक्त यहोवाची उपासना का केली पाहिजे?
६-७. (क) आज बरेच जण यहोवाची उपासना का करत नाहीत? (ख) आपण फक्त यहोवाचीच उपासना का केली पाहिजे?
६ आज बरेच जण यहोवाची उपासना करत नाहीत. कारण त्यांना अजून त्याच्या सुंदर गुणांबद्दल कळलेलं नाही. तसंच त्याने त्यांच्यासाठी कायकाय केलंय हेसुद्धा त्यांना माहीत नाही. पौलने अथेन्समध्ये ज्या लोकांना प्रचार केला होता, त्यांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी होती.—प्रे. कार्यं १७:१९, २०, ३०, ३४.
७ पौलने अथेन्समधल्या लोकांना सांगितलं, की खरा देवच, “सगळ्यांना जीवन, श्वास आणि इतर सगळ्या गोष्टी देतो.” त्याने पुढे म्हटलं: “त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.” तो निर्माणकर्ता आहे. “त्याने एका माणसाद्वारे सगळी राष्ट्रं बनवली.” म्हणून आपण फक्त त्याचीच उपासना केली पाहिजे.—प्रे. कार्यं १७:२५, २६, २८.
८. कोणती गोष्ट यहोवा कधीच करणार नाही? समजावून सांगा.
८ यहोवा निर्माणकर्ता आणि या विश्वाचा सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे, तो लोकांना त्याची उपासना करायची जबरदस्ती करू शकला असता. पण तो असं कधीच करणार नाही. याउलट, त्याचं आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम आहे याचे आणि त्याच्या अस्तित्वाचे तो आपल्याला पुरावे देतो. त्याची इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याचे मित्र बनावं आणि ही मैत्री सर्वकाळासाठी राहावी. (१ तीम. २:३, ४) म्हणूनच, त्याच्या उद्देशांबद्दल आणि मानवजातीसाठी तो कोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहे, यांबद्दल इतरांना शिकवायला तो आपल्याला प्रशिक्षण देतोय. (मत्त. १०:११-१३; २८:१९, २०) तसंच, त्याने आपल्याला मंडळ्यांमध्ये संघटित केलंय आणि आपली काळजी घेण्यासाठी प्रेमळ वडिलांना नेमलंय.—प्रे. कार्यं २०:२८.
९. सर्व लोकांवर असलेलं यहोवाचं प्रेम कसं दिसून येतं?
९ जे यहोवाचं अस्तित्व नाकारतात त्यांनासुद्धा तो चांगल्या गोष्टी देतो. यावरून त्याचं प्रेम दिसून येतं. आता या गोष्टींचा विचार करा: हजारो वर्षांपासून बऱ्याच लोकांनी यहोवाच्या इच्छेऐवजी स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगायचं निवडलं. असं असूनसुद्धा यहोवाने त्यांना जीवन जगण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रेमळपणे दिल्या आहेत. (मत्त. ५:४४, ४५; प्रे. कार्यं १४:१६, १७) यहोवामुळे ते आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत चांगली नाती जोडू शकतात, आपलं कुटुंब वाढवू शकतात, काम करू शकतात आणि आपल्या मेहनतीच्या फळाचा आनंद घेऊ शकतात. (स्तो. १२७:३; उप. २:२४) या पुराव्यांवरून स्पष्टपणे कळतं, की आपल्या स्वर्गातल्या पित्याचं सर्व माणसांवर प्रेम आहे. (निर्ग. ३४:६) म्हणून या लेखात पुढे आपण पाहू, की आपण यहोवाची सेवा करायची निवड का करतो आणि त्याची सेवा करणाऱ्यांना तो कसे आशीर्वाद देतो.
आपण यहोवाची सेवा करायची निवड का करतो?
१०. (क) यहोवाची सेवा करायचं मुख्य कारण कोणतं? (मत्तय २२:३७) (ख) यहोवाच्या धीरामुळे तुम्हाला कसा फायदा झालाय? (स्तोत्र १०३:१३, १४)
१० येशूप्रमाणेच, यहोवाची सेवा करायचं आपलं मुख्य कारण म्हणजे, त्याच्यावरचं आपलं प्रेम. (मत्तय २२:३७ वाचा.) आपण जेव्हा यहोवाच्या चांगल्या गुणांबद्दल शिकतो तेव्हा आपल्याला त्याच्या आणखी जवळ जावंसं वाटतं. उदाहरणार्थ, तो आपल्या लोकांशी धीराने कसा वागतो त्याचा विचार करा. जेव्हा इस्राएली लोकांनी त्याची आज्ञा मोडली तेव्हा त्याने त्यांना अशी विनंती केली: “कृपा करून तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून द्या.” (यिर्म. १८:११) यहोवाला माहीत आहे की आपण अपरिपूर्ण आहोत, म्हणून तो आपल्याशी धीराने वागतो. (स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.) तुम्ही जेव्हा यहोवाच्या या आणि इतर चांगल्या गुणांवर मनन करता, तेव्हा तुम्हाला कायमसाठी त्याची सेवा करावीशी वाटत नाही का?
११. आपण आणखी कोणत्या कारणामुळे आपल्या स्वर्गातल्या पित्याची सेवा करायची निवड करतो?
११ आपण आणखी एका कारणासाठी यहोवाची सेवा करतो. ते कारण म्हणजे यहोवाची सेवा करणंच योग्य आहे हे आपल्याला माहीत आहे. (मत्त. ४:१०) तसंच, आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की आपण यहोवाला एकनिष्ठ राहिलो तर बऱ्याच चांगल्या गोष्टी होऊ शकतात. जसं की, यहोवाचं नाव पवित्र होऊ शकतं, सैतान खोटारडा आहे हे सिद्ध होऊ शकतं आणि आपल्या पित्याचं मन आनंदी होऊ शकतं. आणि जर आपण आता त्याची सेवा करायची निवड केली, तर आपल्याला कायमच्या जीवनाची आशाही मिळू शकते.—योहा. १७:३.
१२-१३. जेन आणि पॅमच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?
१२ जे लहान आहेत त्यांनीसुद्धा लहानपणीच यहोवावरचं प्रेम वाढवलं, तर म्हातारपणीही त्या प्रेमाची ज्योत तेवत राहील. आता जेन आणि पॅमa या दोन सख्ख्या बहिणींच्या उदाहरणाचा विचार करा. त्यांनी जेव्हा बायबल अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा जेन ११ वर्षांची आणि पॅम १० वर्षांची होती. त्यांच्या आईवडिलांना साक्षीदारांसोबत अभ्यास करायला आवडत नसलं, तरी त्यांनी जेन आणि पॅमला तसं करायची परवानगी दिली होती; पण अभ्यास करण्यासोबतच त्यांनी चर्चलापण आलं पाहिजे अशी त्यांची अट होती. मग साक्षीदारांसोबत अभ्यास केल्यामुळे त्यांना काय फायदा झाला? जेन म्हणते: “शाळेतली मुलं माझ्यावर ड्रग्ज घ्यायचा आणि अनैतिक गोष्टी करायचा दबाव टाकायची. पण साक्षीदारांनी मला बायबलमधून जे शिकवलं त्यामुळे मला या दबावाचा सामना करता आला.”
१३ मग काही वर्षांनी त्या प्रचारक बनल्या. नंतर त्यांनी पायनियर सेवाही सुरू केली. आणि त्यासोबतच त्या त्यांच्या वयस्कर आईवडिलांची काळजीही घ्यायच्या. आता मागे वळून पाहताना जेन म्हणते: “मला हे शिकायला मिळालं की यहोवा त्याच्या मित्रांची मनापासून काळजी घेतो. आणि २ तीमथ्य २:१९ मध्ये सांगितल्याप्रमाणे, ‘जे आपले आहेत त्यांना यहोवा ओळखतो.’” यात काहीच शंका नाही, की जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याची सेवा करायची निवड करतात त्यांची तो काळजी घेतो!
१४. आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून यहोवाच्या नावावर लागलेला कलंक कसा मिटवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१४ यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटवण्याची आपली इच्छा आहे. या परिस्थितीचा विचार करा: तुमचा एक जवळचा मित्र आहे. तो प्रेमळ, उदार आणि इतरांना नेहमी माफ करणारा आहे. एक दिवस तुम्ही ऐकता, की त्याच्यावर क्रूर आणि बेइमान असण्याचा आरोप लावण्यात आलाय. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही नक्कीच तुमच्या मित्राची बाजू घ्याल. त्याच प्रकारे सैतान आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्यांनी यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून त्याचं नाव बदनाम केलंय. म्हणून यहोवाबद्दल खऱ्या गोष्टी सांगून आपण त्याची बाजू घेतो. (स्तो. ३४:१; यश. ४३:१०) आपण आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून हे दाखवून देतो, की आपल्याला मनापासून यहोवाची सेवा करायची आहे.
तुम्ही यहोवाची बाजू घ्याल का? (परिच्छेद १४ पाहा)b
१५. प्रेषित पौलने त्याच्या जीवनातली ध्येयं बदलल्यामुळे त्याला कसा फायदा झाला? (फिलिप्पैकर ३:७, ८)
१५ यहोवाला खूश करण्यासाठी आणि त्याची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी आपण आनंदाने आपल्या जीवनातली ध्येयं बदलायला तयार असतो. उदाहरणार्थ, प्रेषित पौलचं यहुदी समाजात एक मानाचं स्थान होतं. पण येशूचा शिष्य बनण्यासाठी आणि यहोवाची सेवा करण्यासाठी त्याने ते सगळं सोडून दिलं. (गलती. १:१४) यामुळे त्याला त्याच्या जीवनात बरेच आशीर्वाद मिळाले. इतकंच काय, तर त्याला ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करायची संधीसुद्धा मिळाली. त्याने यहोवाची सेवा करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याचा त्याला कधीच पस्तावा झाला नाही आणि आपल्यालाही कधी होणार नाही.—फिलिप्पैकर ३:७, ८ वाचा.
१६. जुलियाच्या अनुभवातून आपण काय शिकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१६ जर आपण यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं, तर तो आपल्याला आता आणि भविष्यातही आशीर्वाद देईल. जुलिया नावाच्या बहिणीचा विचार करा. सत्य शिकण्याआधी लहान असल्यापासूनच ती चर्चमध्ये गाणी गायची. तिचं हे कौशल्य गायनात कुशल असलेल्या एका व्यक्तीने (ऑपरा गायक) ओळखलं आणि तिला त्यासाठी प्रशिक्षण दिलं. लवकरच जुलियाला प्रसिद्धी मिळाली आणि ती मोठमोठ्या ठिकाणी जाऊन गाणी गाऊ लागली. ती जेव्हा एका सुप्रसिद्ध संगीत विद्यालयात शिक्षण घेत होती, तेव्हा तिच्या वर्गसोबत्याने तिला देवाबद्दल सांगायला सुरुवात केली. तसंच देवाचं नाव यहोवा आहे हेसुद्धा त्याने तिला सांगितलं. त्यानंतर लगेचच ती आठवड्यातून दोनदा बायबल अभ्यास करू लागली. काही काळाने संगीत क्षेत्रात करिअर करण्याऐवजी तिने यहोवाची सेवा करायचा निर्णय घेतला. हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता. ती म्हणते: “बरेच लोक मला म्हणाले की ‘तू तुझं कौशल्य वाया घालवतेस.’ पण मला माझं संपूर्ण आयुष्य यहोवाच्या सेवेत घालवायचं होतं.” मग ३० पेक्षा जास्त वर्षांआधी घेतलेल्या या तिच्या निर्णयाबद्दल तिला आज कसं वाटतं? ती म्हणते: “मला मनाची शांती मिळाली आहे आणि मला पूर्ण भरवसा आहे, की भविष्यात यहोवा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल.”—स्तो. १४५:१६.
जेव्हा यहोवाची सेवा आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, तेव्हा आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात (परिच्छेद १६ पाहा)c
यहोवाची सेवा करत राहा
१७. जगाचा अंत जवळ आहे या गोष्टीचा: (क) यहोवाची सेवा करायचं निवडलं नाही त्यांच्यावर कसा परिणाम होतो? (ख) यहोवाची सेवा करायचं निवडलंय त्यांच्यावर कसा परिणाम होतो?
१७ आपण अशा जगात जगतोय, ज्याचा अंत उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. प्रेषित पौलने लिहिलं: “कारण, ‘खूप थोडा वेळ’ उरला आहे आणि ‘जो येणार आहे तो येईल, तो उशीर करणार नाही.’” (इब्री १०:३७) मग याचा आपल्या सगळ्यांवर कसा परिणाम होतो? एक गोष्ट तर खरी आहे, की लोकांकडे यहोवाची सेवा करायची निवड करण्यासाठी खूप कमी वेळ उरलाय. (१ करिंथ. ७:२९) आणि आपण जर आधीपासूनच यहोवाची सेवा करायची निवड केली असेल, तर आपल्याला हे माहीत आहे की आपल्याला संकटांचा सामना करावा लागला, तरी तो “खूप थोडा वेळ” असेल.
१८. आपण काय करावं अशी येशूची आणि यहोवाची इच्छा आहे?
१८ येशूने आपल्याला त्याचे शिष्य बनायचं आणि पुढेही त्याच्यामागे चालत राहायचं प्रोत्साहन दिलं. (मत्त. १६:२४) त्यामुळे आपण बऱ्याच वर्षांपासून जरी यहोवाची सेवा करत असलो, तरी पुढेही ती सेवा करत राहायचा आपण निश्चय केला पाहिजे. आपण त्याची सेवा करत राहण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. असं करणं कदाचित सोपं नसेल. पण त्याची सेवा करत राहिल्यामुळे आपण खूश राहू आणि आपल्याला आशीर्वादही मिळतील.—स्तो. ३५:२७.
१९. जिनच्या अनुभवावरून आपण काय शिकतो?
१९ काहींना असं वाटतं, की यहोवाची सेवा करण्यासाठी बरेच त्याग करावे लागतील. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला असं वाटतं का, की यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा आनंद घेता येणार नाही? जिन नावाचा एक तरुण भाऊ म्हणतो: “यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे मला काहीच मजा करता येत नाही असं मला वाटायचं. मला वाटायचं, की माझ्या वयाची सगळी मुलं खूप मजा करत आहेत. ते सगळे पार्टी करायचे, डेटवर जायचे, मारामारीचे व्हिडिओ गेम्स खेळायचे. पण माझा सगळा वेळ प्रचारात आणि सभांमध्येच जायचा.” अशा विचारांचा जिनवर कसा प्रभाव पडला? तो म्हणतो: “मी दुहेरी जीवन जगू लागलो. पण मला त्यात थोडीफार मजा येत असली, तरी मी खूश नव्हतो. म्हणून बायबलप्रमाणे वागल्यामुळे काय फायदा होतो, यावर मी विचार करू लागलो. मग मी मनापासून यहोवाची सेवा करायचा निर्णय घेतला. मला असं म्हणता येईल, की तेव्हापासून आतापर्यंत यहोवाने माझ्या सगळ्या प्रार्थनांचं उत्तर दिलंय.”
२०. आपला काय निर्धार असला पाहिजे?
२० स्तोत्रकर्त्याने यहोवासाठी असं गीत गायलं: “तुझ्या अंगणांत राहण्यासाठी तू ज्याला निवडतोस आणि आपल्याजवळ येऊ देतोस, तो माणूस सुखी आहे!” (स्तो. ६५:४) तर चला, आपण यहोवाची सेवा करायचा निर्धार करू या आणि यहोशवासारखं म्हणू या: “मी आणि माझं कुटुंब तर यहोवाचीच उपासना करणार.”—यहो. २४:१५.
गीत २८ यहोवा तुझे मित्र कोण?
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b चित्राचं वर्णन: एक स्त्री अधिवेशनाच्या बाहेर उभ्या असलेल्या विरोधकांच्या घोषणा ऐकते. मग ती ट्रॉलीजवळ जाते आणि सत्याची वचनं ऐकते.
c चित्राचं वर्णन: जुलियाने यहोवाची सेवा करायची निवड केली, याचं नाट्यरूपांतर.