अभ्यास लेख १५
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
“देवाच्या जवळ जाणं” हेच आपल्या हिताचं आहे!
“माझ्यासाठी तर देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.”—स्तो. ७३:२८.
या लेखात:
आपण देवाच्या जवळ कसं जाऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतील ते पाहू या.
१-२. (क) एखाद्यासोबत मैत्री घट्ट करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
तुमचा एखादा जवळचा मित्र आहे का? त्याच्यासोबतची तुमची मैत्री कशी घट्ट झाली? कदाचित तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवला असेल, त्याच्या समस्यांबद्दल आणि त्याच्या आवडीनिवडींबद्दलही तुम्ही जाणून घेतलं असेल. तुम्हाला समजलं असेल की त्याच्यात बरेच चांगले गुण आहेत. आणि तसेच गुण आपणही स्वतःमध्ये वाढवले पाहिजेत असं तुम्हाला वाटलं असेल. अशा प्रकारे तुमचं तुमच्या मित्रावरचं प्रेम वाढलं असेल.
२ यावरून कळतं की एखाद्यासोबतची आपली मैत्री घट्ट करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते. यहोवासोबतच्या आपल्या नात्याबद्दलही हीच गोष्ट खरी आहे. म्हणून या लेखात आपण पाहू, की आपण देवाच्या जवळ कसं जाऊ शकतो. असं केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतील हेसुद्धा आपण लक्षात घेऊ. पण सर्वात आधी आपण पाहू, की आपल्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या, यहोवाच्या जवळ जाणं आपल्या हिताचं का आहे.
३. यहोवाच्या जवळ गेल्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर मनन करणं का गरजेचं आहे? समजावून सांगा.
३ देवाच्या जवळ जाणं आपल्या हिताचं आहे हे आपण सगळेच मान्य करू. पण देवाच्या जवळ जाणं हे आपल्या हिताचं का आहे याच्या कारणांवर मनन केल्यामुळे आपल्याला त्याच्या जवळ जात राहायची प्रेरणा मिळेल. (स्तो. ६३:६-८) उदाहरणार्थ, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की चांगला आहार घेणं, व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं आणि भरपूर पाणी पिणं आपल्यासाठी चांगलं आहे. पण तरी बरेच लोक याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. खरंतर, या चांगल्या सवयींचा आपल्याला खूप फायदा होतो. आपण जर त्या फायद्यांवर विचार करत राहिलो, तर त्या सवयी लावायला आपल्याला मदत होईल. त्याच प्रकारे देवाच्या जवळ जाणं हे आपल्या हिताचं आहे हे कदाचित आपल्याला माहीत असेल. पण त्यामुळे आपल्याला किती फायदे होतात यावर आपण जेव्हा मनन करतो, तेव्हा देवाच्या आणखी जवळ जात राहायची आपल्याला प्रेरणा मिळते.—स्तो. ११९:२७-३०.
४. स्तोत्र ७३:२८ मध्ये स्तोत्रकर्त्याने काय म्हटलं?
४ स्तोत्र ७३:२८ वाचा. स्तोत्र ७३ चा लेखक लेवी वंशातला होता आणि त्याला यहोवाच्या मंदिरात संगीतकार म्हणून नेमण्यात आलं होतं. त्याने कदाचित बरीच वर्षं यहोवाची विश्वासूपणे सेवा केली. पण तरीसुद्धा “देवाच्या जवळ जाणं” हिताचं आहे या गोष्टीची त्याला स्वतःला आणि इतरांना आठवण करून द्यावीशी वाटली. मग देवाच्या जवळ जाण्याचे कोणते फायदे आहेत?
‘देवाच्या जवळ गेल्यामुळे’ आनंद होतो
५. (क) देवाच्या जवळ गेल्यामुळे आपण आनंदी कसे होतो? (ख) नीतिवचनं २:६-१६ प्रमाणे यहोवाचा सल्ला पाळल्यामुळे तुम्हाला वैयक्तिकरीत्या कसा फायदा होऊ शकतो आणि तुमचं संरक्षण कसं होऊ शकतं ते सांगा.
५ आपण जितकं जास्त यहोवाच्या जवळ जाऊ, तितकं जास्त आनंदी होऊ. (स्तो. ६५:४) असं म्हणायची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा आपण बायबल वाचतो आणि यहोवाने दिलेला सल्ला पाळतो, तेव्हा आपण बुद्धिमान होतो. अशा व्यावहारिक बुद्धीमुळे आपलं जगाच्या वाईट प्रभावापासून आणि गंभीर चुका करण्यापासून संरक्षण होतं. (नीतिवचनं २:६-१६ वाचा.) त्यामुळेच बायबलमध्ये असं म्हटलंय: “ज्या माणसाला बुद्धी सापडते आणि जो माणूस समंजसपणा मिळवतो तो सुखी!”—नीति. ३:१३.
६. स्तोत्रकर्त्याने आपला आनंद कशामुळे गमावला?
६ हे खरंय, की कधीकधी यहोवाच्या मित्रांनासुद्धा दुःखाचा सामना करावा लागतो. ७३ व्या स्तोत्राचा लेखक जेव्हा नकारात्मक गोष्टींवर विचार करू लागला, तेव्हा त्याने त्याचा आनंद गमावला. तो असा विचार करू लागला, की दुष्ट लोक देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नसले तरी त्यांचं सगळं चांगलं होतं. त्याला या गोष्टीचा खूप राग आला. इतकंच काय, तर त्याला त्यांचा हेवा वाटू लागला. तो असा विचार करू लागला की हिंसक आणि घमेंडी लोक त्यांना हवं ते मिळवू शकतात. ते धडधाकट असतात आणि त्यांना कोणत्याही समस्या नसतात. (स्तो. ७३:३-७, १२) एक वेळ तर अशी आली, की या सगळ्या गोष्टींमुळे स्तोत्रकर्ता खूप निराश झाला. त्याला असं वाटू लागलं, की यहोवाची सेवा करण्यासाठी तो जी काही मेहनत घेतोय ती व्यर्थ आहे. त्यामुळे दुःखी होऊन त्याने असं म्हटलं: “खरंच, मी उगाचच माझं हृदय शुद्ध ठेवलं आणि निर्दोषतेने आपले हात धुतले.”—स्तो. ७३:१३.
७. आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा आपण काय करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
७ स्तोत्रकर्ता जरी दुःखी झाला तरी त्याने या गोष्टीचा स्वतःवर जास्त परिणाम होऊ दिला नाही. त्याने काही चांगली पावलं उचलली. तो “देवाच्या महान उपासना मंडपात” गेला. तिथे यहोवाने त्याचे चुकीचे विचार सुधारले. (स्तो. ७३:१७-१९) आपणही जेव्हा दुःखी असतो तेव्हा आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राला, यहोवाला त्याबद्दल माहीत असतं. अशा वेळी जर आपण मार्गदर्शनासाठी त्याला प्रार्थना केली, मंडळीतून आणि त्याच्या वचनातून तो पुरवत असलेली मदत स्वीकारली, तर आपल्याला आपल्या दुःखांवर मात करण्यासाठी लागणारी ताकद मिळेल. यासोबतच, आपण चिंतांनी ग्रासलेलो असतो, तेव्हासुद्धा यहोवा आपल्याला सांत्वन देतो आणि आपलं मन शांत करतो.—स्तो. ९४:१९.a
७३ वं स्तोत्र लिहिणारा लेवी “देवाच्या महान उपासना मंडपात” उभा आहे (परिच्छेद ७ पाहा)
‘देवाच्या जवळ गेल्यामुळे’ जीवनाला उद्देश आणि खरी आशा मिळते
८. आणखी कोणत्या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे देवाच्या जवळ जाणं आपल्या हिताचं आहे?
८ आणखी दोन महत्त्वाच्या कारणांमुळे देवाच्या जवळ जाणं आपल्या हिताचं आहे. पहिलं म्हणजे, यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश मिळतो. दुसरं म्हणजे, भविष्यासाठी आपल्याला एक भक्कम आशा मिळते. (यिर्म. २९:११) चला तर मग, या दोन्ही फायद्यांकडे आणखी बारकाईने लक्ष देऊ या.
९. देवाच्या जवळ गेल्यामुळे आपल्या जीवनाला उद्देश कसा मिळतो?
९ देवाच्या जवळ गेल्यामुळे आपल्या जीवनाला उद्देश मिळतो. आज बऱ्याच लोकांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. त्यांना असं वाटतं, की जीवनाला काहीच उद्देश नाही आणि काही काळाने मानवजात नष्ट होईल. पण देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला याची खातरी पटली आहे, की देव “अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो.” (इब्री ११:६) देवाने आपल्याला त्याची सेवा करायच्या उद्देशाने बनवलंय. त्यामुळेच, आपण आज जेव्हा त्याची सेवा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदी असतो.—अनु. १०:१२, १३.
१०. यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना कोणतं अभिवचन देतो? (स्तोत्र ३७:२९)
१० आज बऱ्याच लोकांना भविष्यासाठी खरी आशा नाही. ते नोकरी-धंदा करतात, लग्न करतात, कुटुंब वाढवतात आणि भविष्यासाठी पैसे साठवून ठेवतात. पण त्यांच्या आयुष्यात देव कुठेच नसतो. याच्या अगदी उलट, देवाच्या सेवकांना हे माहीत असतं की तो त्यांची काळजी घेईल. (स्तो. २५:३-५; १ तीम. ६:१७) आपला आपल्या देवावर पूर्ण भरवसा आहे. आपल्याला याची खातरी आहे की भविष्यासाठी त्याने दिलेलं अभिवचन तो नक्कीच पूर्ण करेल. त्याने वचन देलंय, की नंदनवनात आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टींचा आनंद घेता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला कायमसाठी आपल्या देवाची उपासना करता येईल.—स्तोत्र ३७:२९ वाचा.
११. देवाच्या जवळ गेल्यामुळे काय होतं आणि यामुळे आपल्याला कोणती संधी मिळते?
११ आणखी काही कारणांमुळे देवाच्या जवळ जाणं आपल्या हिताचं आहे. उदाहरणार्थ, यहोवा पश्चात्ताप करणाऱ्या लोकांची पापं माफ करायचं वचन देतो. (यश. १:१८) यामुळे आपल्याला पूर्वी केलेल्या पापाच्या ओझ्याखाली जगावं लागत नाही. (स्तो. ३२:१-५) आणि आपल्याकडे यहोवाला खूश करण्याची संधी असते. (नीति. २३:१५) देवासोबत जवळचं नातं जोडल्यामुळे आपल्याला आणखीन कोणते आशीर्वाद मिळू शकतात याचा तुम्ही विचार करू शकता. आता आपण पाहू या, की आपण देवाच्या जवळ कसं जात राहू शकतो.
आपण “देवाच्या जवळ” कसं जात राहू शकतो?
१२. देवाच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही कायकाय केलं?
१२ तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, तर देवाच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही आधीच बरंच काही केलं असेल. तुम्ही यहोवा देवाबद्दल आणि येशू ख्रिस्ताबद्दल जाणून घेतलं, तुमच्या पापांसाठी पश्चात्ताप केला, देवावरचा विश्वास मजबूत केला आणि त्याच्या इच्छेनुसार वागण्यासाठी मेहनत घेतली. पण देवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी या गोष्टी करत राहणं गरजेचं आहे.—कलस्सै. २:६.
१३. देवाच्या जवळ जात राहण्यासाठी आपल्याला कोणत्या तीन गोष्टी मदत करतील?
१३ देवाच्या जवळ जात राहायला आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे मदत होईल? (१) आपण नियमितपणे बायबल वाचलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण असं करताना देवाबद्दलच्या मूलभूत गोष्टी शिकणं एवढंच आपलं ध्येय नसावं. उलट, आपल्यासाठी त्याची काय इच्छा आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या वचनात दिलेल्या तत्त्वांप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. (इफिस. ५:१५-१७) (२) त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याच्या पुराव्यांवर आपण मनन केलं पाहिजे आणि त्याच्यावरचा आपला विश्वास वाढवला पाहिजे. (३) यहोवाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याचा आपण नेहमी द्वेष केला पाहिजे. आणि जे लोक त्या गोष्टी करतात त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे.—स्तो. १:१; १०१:३.
१४. १ करिंथकर १०:३१ प्रमाणे यहोवाला खूश करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या गोष्टी करू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१४ १ करिंथकर १०:३१ वाचा. यहोवाला आवडतील अशा गोष्टी सतत करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. यात फक्त सभेला आणि प्रचाराला जाणंच सामील नाही, तर आपण आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा यहोवाला आनंद होईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपण जेव्हा सगळ्या बाबतीत प्रामाणिक असतो आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टी इतरांना देतो, तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. (२ करिंथ. ८:२१; ९:७) तसंच, यहोवाला असंही वाटतं, की त्याने दिलेल्या जीवनाच्या देणगीचा आपण आदर करावा. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष देतो आणि सुदृढ राहण्यासाठी इतर गोष्टी करतो, तेव्हा जीवन देणाऱ्या आपल्या यहोवा देवाच्या आपण आणखी जवळ जातो. आपण यहोवा देवाला आनंदी करण्यासाठी जे प्रयत्न करतो, त्यांमुळे त्याला खूप आनंद होतो; मग ते प्रयत्न कितीही छोटे असले तरी.—लूक १६:१०.
जेव्हा आपण सुरक्षिततेची काळजी घेऊन गाडी चालवतो, व्यायाम करून आणि पौष्टिक अन्न खाऊन स्वतःची काळजी घेतो आणि इतरांचा पाहुणचार करतो तेव्हा आपण यहोवाला खूश करत असतो (परिच्छेद १४ पाहा)
१५. आपण इतरांशी कसं वागावं असं यहोवाला वाटतं?
१५ यहोवा नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांशी दयेने वागतो. (मत्त. ५:४५) त्याची इच्छा आहे की आपणही इतरांशी तसंच वागावं. उदाहरणार्थ, आपण “कोणाचीही बदनामी करू नये, भांडखोर असू नये; तर . . . सर्वांशी सौम्यतेने वागावं,” असं त्याला वाटतं. (तीत ३:२) त्यामुळे इतर लोक यहोवाची सेवा करत नाहीत म्हणून आपण त्यांना कमी समजत नाही. (२ तीम. २:२३-२५) अशा प्रकारे, सगळ्यांशी दयेने वागून आपण देवाच्या आणखी जवळ जातो.
चुका झाल्या तरी आपण “देवाच्या जवळ” जाऊ शकतो
१६. काही काळ यहोवाची सेवा केल्यानंतर स्तोत्र ७३ च्या लेखकाला कसं वाटलं?
१६ कधीकधी आपल्या चुकांमुळे आपल्याला असं वाटू शकतं, की आपण यहोवाच्या प्रेमाच्या लायक नाही. आधी पाहिल्याप्रमाणे ७३ व्या स्तोत्राच्या लेखकालाही असंच वाटलं होतं. त्याने म्हटलं: “माझी पावलं तर जवळजवळ भरकटलीच होती; मी पडण्याच्या बेतात होतो.” (स्तो. ७३:२) त्याने कबूल केलं, की तो “निराश” झाला होता, “अविचारी” माणसासारखा विचार करत होता आणि यहोवापुढे “बुद्धिहीन पशूसारखा” झाला होता. (स्तो. ७३:२१, २२) मग त्याच्या चुकांमुळे, यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही आणि तो आपल्याला कधीच क्षमा करणार नाही असा त्याने विचार केला का?
१७. (क) स्तोत्रकर्ता खूप जास्त निराश झाला तेव्हा त्याने काय केलं? (ख) त्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१७ यहोवाने आपल्याला सोडून दिलंय, असं जरी स्तोत्रकर्त्याला वाटलं असलं, तरी ते खूप थोड्या काळासाठी होतं. असं दिसतं, की तो जेव्हा खूप जास्त निराश झाला होता, तेव्हा त्याला जाणवलं की आपण यहोवाच्या जवळ गेलं पाहिजे. त्याने म्हटलं: “पण आता मी सतत तुझ्यासोबत आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस. तू सल्ला देऊन मला मार्ग दाखवशील आणि पुढे माझ्यावर कृपा करशील.” (स्तो. ७३:२३, २४) आपणसुद्धा जेव्हा खूप जास्त निराश होतो किंवा खूप कमजोर असतो, तेव्हा आपण यहोवाकडे आपला “खडक” म्हणून पाहिलं पाहिजे. (स्तो. ७३:२६; ९४:१८) जर काही काळासाठी आपली पावलं भरकटली, तरी यहोवा “क्षमाशील” देव आहे अशी खातरी बाळगून आपण त्याच्याकडे परत आलं पाहिजे. (स्तो. ८६:५) खासकरून, आपण जेव्हा खूप जास्त निराश असतो तेव्हा आपण यहोवाच्या जवळ गेलं पाहिजे.—स्तो. १०३:१३, १४.
जेव्हा आपल्याला आध्यात्मिकरीत्या खूप कमजोर झाल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण यहोवाच्या उपासनेशी संबंधित कामं जास्तीत जास्त करून त्याच्या आणखी जवळ जाऊ शकतो (परिच्छेद १७ पाहा)
नेहमी “देवाच्या जवळ” जा
१८. आपण यहोवाच्या कितीही जवळ गेलो तरी ते कमीच आहे असं का म्हणता येईल?
१८ आपण यहोवाच्या कितीही जवळ गेलो आणि त्याच्याबद्दल कितीही शिकलो तरी ते कमीच आहे. कारण बायबल म्हणतं, यहोवाचे मार्ग, त्याची बुद्धी आणि त्याचं ज्ञान खूप “अफाट आहे!” (रोम. ११:३३) म्हणून आपण कायम त्याच्याबद्दल शिकत राहू.
१९. स्तोत्रांतल्या वचनांतून आपल्याला कशाची खातरी मिळते?
१९ स्तोत्र ७९:१३ म्हणतं: “आम्ही, म्हणजे तुझ्या कुरणातला कळप असलेले तुझे लोक सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ; आम्ही पिढ्या न् पिढ्या तुझी उपकारस्तुती करू.” देवाच्या जवळ जात असताना आपणही याची खातरी बाळगू शकतो, की तो आपल्याला नेहमी आशीर्वाद देईल. त्यामुळे आपण पूर्ण विश्वासाने असं म्हणू शकतो: “देव माझा खडक आहे, तो माझ्या मनाला बळ देतो. तोच माझा सर्वकाळाचा वाटा आहे.”—स्तो. ७३:२६.
गीत ३२ यहोवाला इमानी राहा!
a जे बऱ्याच काळापासून तणावाचा, चिंतेचा किंवा निराशेचा सामना करत आहेत, त्यांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागू शकते. याच्या जास्त माहितीसाठी टेहळणी बुरूज, क्र. १ २०२३ पाहा.