अभ्यास लेख १२
गीत ११९ खरा विश्वास बाळगू या!
विश्वासाने चालत राहा!
“आपण दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालत आहोत.”—२ करिंथ. ५:७.
या लेखात:
महत्त्वाचे निर्णय घेताना आपण विश्वासाने कसं चालत राहू शकतो ते पाहा.
१. पौल ज्या प्रकारे जीवन जगला त्याचा विचार करून तो खूश का होता?
पौलने त्याच्या आयुष्यात यहोवाची बरीच सेवा केली होती. पण आता त्याला समजलं होतं की लवकरच त्याला मारून टाकण्यात येईल. तरीही ज्या प्रकारे तो जीवन जगला त्याबद्दल विचार करून तो खूश होता. कारण त्याने यहोवाच्या सेवेत बरेच चांगले निर्णय घेतले होते आणि त्याला याची खातरी होती, की यहोवा त्याच्यावर खूश आहे. म्हणूनच तो म्हणू शकला: “मी धाव पूर्ण केली आहे आणि विश्वास टिकवून ठेवला आहे.” (२ तीम. ४:६-८) आपल्यालासुद्धा पौलसारखे चांगले निर्णय घ्यायची इच्छा आहे आणि यहोवाला खूश करायचं आहे. मग आपण हे कसं करू शकतो?
२. विश्वासाने चालणं म्हणजे काय?
२ पौलने स्वतःबद्दल आणि इतर विश्वासू ख्रिश्चनांबद्दल असं म्हटलं: “आपण दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालत आहोत.” (२ करिंथ. ५:७) पौलला इथे नेमकं काय म्हणायचं होतं? बायबलमध्ये “चालणं” हा शब्द काही वेळा, एखादी व्यक्ती ज्या प्रकारे जीवन जगते याला सूचित करतो. जेव्हा एक व्यक्ती दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालते, तेव्हा तिचे निर्णय ती जे पाहते, ऐकते आणि तिला जे वाटतं यावरच आधारित असतात. पण याउलट, जी व्यक्ती विश्वासाने चालते, ती निर्णय घेताना यहोवा त्याबद्दल काय विचार करतो ते बघते. तिच्या कामांवरून हे दिसून येतं की यहोवा तिला आशीर्वाद देईल याची तिला खातरी आहे. तसंच, देवाच्या वचनात दिलेला सल्ला पाळल्यामुळे तिला आता चांगलं जीवन जगता येईल आणि भविष्यात सर्वकाळाचं जीवन मिळेल याचीही तिला खातरी असते.—स्तो. ११९:६६; इब्री ११:६.
३. विश्वासाने चालल्यामुळे कोणते फायदे होतात? (२ करिंथकर ४:१८)
३ हे खरं आहे की आपल्या सगळ्यांनाच कधीकधी आपण जे पाहतो, ऐकतो आणि आपल्याला जे वाटतं त्या आधारावर निर्णय घ्यावे लागतात. पण आपण जर फक्त त्या आधारावरच महत्त्वाचे निर्णय घेतले तर आपल्याला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. का? कारण आपण जे पाहतो आणि ऐकतो ते नेहमी बरोबर असेलच असं नाही. आणि जर आपण अशा प्रकारे निर्णय घेतले तर आपण कदाचित यहोवाला आवडणार नाही असं काहीतरी करून बसू. (उप. ११:९; मत्त. २४:३७-३९) पण याउलट, जर आपण विश्वासाने चाललो तर आपण असे निर्णय घेऊ जे ‘प्रभूच्या दृष्टीत चांगले असतील.’ (इफिस. ५:१०) देवाचा सल्ला पाळल्यामुळे आपल्याला मनाची शांती आणि खरा आनंद मिळेल. (स्तो. १६:८, ९; यश. ४८:१७, १८) आणि जर आपण असंच विश्वासाने चालत राहिलो, तर आपल्याला भविष्यात सर्वकाळाचं जीवन मिळेल.—२ करिंथकर ४:१८ वाचा.
४. आपण विश्वासाने चालतोय, की दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालतोय हे आपण कसं ओळखू शकतो?
४ आपण विश्वासाने चालतोय, की दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालतोय हे आपल्याला कसं कळेल? यासाठी आपण स्वतःला काही प्रश्न विचारू शकतो. जसं की, मी कोणत्या आधारावर निर्णय घेतो? मी फक्त दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे निर्णय घेतो, की यहोवाचा सल्ला लक्षात ठेवून निर्णय घेतो? आता आपण तीन महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीत विश्वासाने कसं चालत राहू शकतो ते पाहू या. त्या तीन गोष्टी म्हणजे, नोकरी, लग्न आणि संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन. या तीनही गोष्टींच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्यामुळे आपल्याला चांगले निर्णय घेता येतील हेही आपण पाहू या.
नोकरी निवडताना
५. नोकरी निवडताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे?
५ आपल्या सगळ्यांनाच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायची इच्छा असते. (उप. ७:१२; १ तीम. ५:८) काही नोकऱ्यांमध्ये चांगला पगार मिळतो. त्यामुळे नोकरी करणाऱ्याला त्याच्या रोजच्या गरजा तर भागवता येतातच, शिवाय भविष्यासाठी काही रक्कम बाजूलाही काढून ठेवता येते. पण इतर नोकऱ्यांमध्ये जेमतेम पगार मिळतो. त्यामुळे नोकरी करणाऱ्याला फक्त कुटुंबाच्या गरजाच भागवता येतात. हे खरंय, की नोकरी निवडताना आपण किती पगार मिळेल याचा विचार करतो. पण आपण फक्त याच गोष्टीचा विचार करून चालणार नाही. कारण जर असं केलं तर आपण फक्त दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालणारे बनू.
६. नोकरी निवडताना आपण विश्वासाने कसं चालत राहू शकतो? (इब्री लोकांना १३:५)
६ जर आपण विश्वासाने चालणारे असू, तर या नोकरीचा यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘या नोकरीमुळे मला यहोवाला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत का?’ (नीति. ६:१६-१९) ‘ही नोकरी माझ्या उपासनेच्या आड येईल का?’ ‘मला कुटुंबापासून बराच काळ दूर राहावं लागेल का?’ (फिलिप्पै. १:१०) जर या प्रश्ननांची उत्तरं हो असतील, तर अशी नोकरी न केलेलीच बरी. मग नोकरी शोधणं कठीण असलं तरीही. विश्वासाने चालत राहिल्यामुळे आपल्या निर्णयांवरून यहोवावरचा आपला भरवसा दिसून येईल. हा भरवसा, की तो आपल्या गरजा नक्की पूर्ण करेल.—मत्त. ६:३३; इब्री लोकांना १३:५ वाचा.
७-८. दक्षिण अमेरिकेतला एक भाऊ विश्वासाने कसा चालला? (चित्रसुद्धा पाहा.)
७ दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या झेवियरa नावाच्या भावाला विश्वासाने चालत राहणं किती महत्त्वाचं आहे हे कळलं. तो म्हणतो: “मी एका चांगल्या नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यात मला आधीच्या नोकरीपेक्षा दुप्पट पगार मिळणार होता आणि ते माझ्या आवडीचं काम होतं.” पण झेवियरची पायनियर सेवा करायची मनापासून इच्छा होती. तो पुढे म्हणतो: “माझा इंटरव्यूचा दिवस आला. इंटरव्यूला जाण्याआधी मी यहोवाला प्रार्थना केली. मला याची खातरी होती की माझ्यासाठी काय चांगलंय हे यहोवाला माहीत आहे. मला कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करायची होती. पण मला अशी नोकरी करायची नव्हती, जी माझ्या आध्यात्मिक ध्येयांच्या आड येईल.”
८ झेवियर म्हणतो: “इंटरव्यूच्या वेळी मॅनेजरने म्हटलं की मला सारखासारखा ओव्हरटाईम करावा लागेल. मी त्यांना आदराने म्हटलं की माझ्या उपासनेच्या कामांमुळे मी ते करू शकत नाही.” हो, झेवियरने ती नोकरी न करायचा निर्णय घेतला. त्याच्या दोन आठवड्यांनंतर त्याने पायनियर सेवा सुरू केली. आणि नंतर त्या वर्षी, त्याला एक अर्धवेळची नोकरी मिळाली. तो म्हणतो: “यहोवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि मला पायनियर सेवा करता येईल अशी नोकरी मला मिळाली. आता माझ्याकडे असं काम आहे, ज्यामुळे मला यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची जास्तीत जास्त सेवा करता येते. आणि याचा मला खूप आनंद आहे.”
कामाच्या ठिकाणी बढती मिळत असेल, तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल? तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं ते यहोवाला माहीत आहे याची तुम्हाला खातरी आहे, हे तुमच्या निर्णयावरून दिसून येईल का? (परिच्छेद ७-८ पाहा)
९. ट्रेसरच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
९ तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीमुळे विश्वासाने चालत राहणं कठीण जातंय का? काँगोमध्ये राहणाऱ्या ट्रेसर नावाच्या भावाचा विचार करा. तो म्हणतो: “माझी नवीन नोकरी माझं स्वप्न होतं. मला त्यात आधीच्या नोकरीपेक्षा तिप्पट पगार मिळत होता आणि तिथले लोक मला खूप मानायचे.” पण ओव्हरटाईम करावा लागत असल्यामुळे ट्रेसर बऱ्याचदा सभा चुकवायचा. तसंच, बेइमानीच्या कामांवर पांघरूण घालायचा दबावही त्याच्यावर असायचा. त्याला ही नोकरी सोडायची होती, पण आपल्याला दुसरी नोकरी मिळेल की नाही याची त्याला भीती होती. मग कुठल्या गोष्टीमुळे त्याला मदत झाली? तो म्हणतो: “हबक्कूक ३:१७-१९ या वचनांमुळे मला हे समजून घ्यायला मदत झाली, की मी जरी माझी नोकरी गमावली तरी यहोवा कशी न कशी माझी काळजी घेईल. म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिला.” तो शेवटी म्हणतो: “बऱ्याच लोकांना वाटतं की चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी एक व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा त्याग करायला तयार होईल; कुटुंबासोबतच्या आणि उपासनेच्या वेळेचाही. मला याचा आनंद आहे की मी यहोवासोबतचं आणि माझ्या कुटुंबासोबतचं नातं टिकवून ठेवू शकलो. ती नोकरी सोडल्याच्या एका वर्षानंतर यहोवाने मला एक चांगली नोकरी शोधायला मदत केली. यामुळे मला माझ्या गरजा भागवण्याइतके पैसे मिळत आहेत आणि यहोवाची सेवा करायला जास्त वेळही मिळतोय. जेव्हा आपण यहोवाला आपल्या जीवनात पहिलं स्थान देतो, तेव्हा कदाचित काही काळासाठी आपल्याला पैशांची चणचण भासेल. पण यहोवा आपली काळजी घेईल, हे नक्की.” हो, आपण जर यहोवाच्या सल्ल्यावर आणि त्याने दिलेल्या वचनावर भरवसा ठेवला तर आपण विश्वासाने चालत राहू शकतो. आणि तो आपल्याला भरपूर आशीर्वादही देईल.
जोडीदार निवडताना
१०. जोडीदार निवडताना कशा प्रकारे विचार केल्यामुळे आपण कदाचित दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालू?
१० विवाह ही देवाकडून मिळालेली एक भेट आहे. आणि लग्न करावंसं वाटणं चुकीचं नाही. एक बहीण जेव्हा एका भावाशी लग्न करायचा विचार करते तेव्हा तो कसा दिसतो, कसा वागतो, इतर जण त्याच्याबद्दल काय विचार करतात, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे का, तो सोबत असताना ती खूश असते का, या गोष्टींचा ती कदाचित विचार करेल.b या गोष्टींवर विचार करणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी, जर त्या बहिणीने फक्त याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला तर ती दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालत असेल.
११. जोडीदार निवडण्याच्या बाबतीत आपण विश्वासाने कसं चालत राहू शकतो? (१ करिंथकर ७:३९)
११ जेव्हा भाऊबहीण जोडीदार निवडण्याच्या बाबतीत यहोवाचा सल्ला पाळतात, तेव्हा यहोवाला खरंच किती आनंद होत असेल! उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटलंय “ऐन तारुण्याचा काळ” ओसरेपर्यंत लग्न न केलेलंच बरं. हे भाऊबहीण या सल्ल्याचं पालन करतात. (१ करिंथ. ७:३६) यहोवाच्या नजरेत एका चांगल्या पतीमध्ये किंवा पत्नीमध्ये जे गुण असले पाहिजेत, ते गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत का, याची ते खातरी करतात. (नीति. ३१:१०-१३, २६-२८; इफिस. ५:३३; १ तीम. ५:८) जर साक्षीदार नसलेल्या व्यक्तीने त्यांच्यात आवड दाखवली, तर ते या मोहाला बळी पडत नाही. उलट, ते १ करिंथकर ७:३९ (वाचा.) मध्ये दिलेली “प्रभूमध्ये” लग्न करायची आज्ञा पाळतात. अशा प्रकारे ते विश्वासाने चालत राहतात. कारण त्यांना याची खातरी असते की कोणत्याही व्यक्तीपेक्षा यहोवा त्यांच्या भावनिक गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करेल.—स्तो. ५५:२२.
१२. रोजाच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
१२ कोलंबियात पायनियर म्हणून सेवा करणाऱ्या रोजा नावाच्या बहिणीचा विचार करा. तिच्या कामाच्या ठिकाणी साक्षीदार नसलेल्या एका माणसाला ती आवडू लागली. रोजालाही तो आवडू लागला. ती म्हणते: “पाहायला गेलं तर तो खूप चांगला माणूस होता. तो बऱ्याच लोकांना मदत करायचा आणि त्याला कोणत्याही वाईट सवयी नव्हत्या. तो माझ्याशी ज्या प्रकारे वागायचा ते मला खूप आवडायचं. मला माझ्या पतीमध्ये जे गुण हवे होते, ते सगळे त्याच्यात होते. पण इतकंच की तो साक्षीदार नव्हता.” ती पुढे म्हणते: “त्याला ‘नाही’ म्हणणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. कारण माझं मन त्याच्यात गुंतलं होतं. त्या वेळी मला खूप एकटं वाटायचं. मला लग्न करायची इच्छा होती, पण साक्षीदारांमध्ये मला हवा तसा मुलगा मिळत नव्हता.” तरी रोजाने फक्त दिसणाऱ्या गोष्टींवर लक्ष लावलं नाही. यहोवासोबतच्या तिच्या नात्यावर याचा कसा परिणाम होईल यावर तिने विचार केला. त्यामुळे तिने त्या माणसाशी सगळे संबंध तोडून टाकले. आणि ती यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिली. त्याच्या काही काळातच, तिला सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचं आमंत्रण मिळालं आणि आता ती खास पायनियर म्हणून सेवा करत आहे. रोजा म्हणते: “यहोवाने मला इतके आशीर्वाद दिलेत, की त्यातून मिळणारा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही.” यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागणं नेहमीच सोपं नसतं; खासकरून एखाद्या गोष्टीत आपल्या भावना गुंतलेल्या असतात तेव्हा. पण तशा परिस्थितीतसुद्धा आपण यहोवाची आज्ञा पाळली, तर आपला नेहमी फायदाच होईल.
संघटनेकडून मार्गदर्शन मिळतं तेव्हा
१३. संघटनेकडून आपल्याला जेव्हा मार्गदर्शन मिळतं तेव्हा कदाचित कशामुळे आपण दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे चालू?
१३ यहोवाची सेवा करत राहायला आपल्याला मदत व्हावी म्हणून सहसा आपल्याला वडिलांकडून, विभागीय पर्यवेक्षकांकडून, शाखा कार्यालयाकडून आणि नियमन मंडळाकडून मार्गदर्शन मिळतं. पण अमुक एक मार्गदर्शन आपल्याला का देण्यात आलंय, हे जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा काय? अशा वेळी ते मार्गदर्शन योग्य असेल का, याबद्दल आपल्या मनात कदाचित शंका येईल. इतकंच काय, तर कदाचित मार्गदर्शन देणाऱ्या भावांची अपरिपूर्णता, त्यांच्या चुका आपल्याला दिसू लागतील.
१४. जेव्हा संघटनेकडून आपल्याला एखादं मार्गदर्शन मिळतं तेव्हा विश्वासाने चालत राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (इब्री लोकांना १३:१७)
१४ आपण जेव्हा विश्वासाने चालतो तेव्हा आपल्याला हा भरवसा असतो की सगळ्या गोष्टी यहोवाच्या नियंत्रणात आहेत आणि त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. यामुळे आपण आज्ञा पाळायच्या म्हणून पाळत नाही, तर त्या लगेच पाळायला तयार असतो. (इब्री लोकांना १३:१७ वाचा.) आपल्याला माहीत आहे की आपण आज्ञा पाळतो तेव्हा मंडळीची एकता वाढते. (इफिस. ४:२, ३) तसंच, आपल्याला हासुद्धा भरवसा असतो की पुढाकार घेणारे भाऊ जरी अपरिपूर्ण असले, तरी आज्ञा पाळल्यामुळे यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल. (१ शमु. १५:२२) आणि पुढे जर या मार्गदर्शनात खरंच काही बदल करायची गरज असली, तर यहोवा ते योग्य वेळी नक्की बदलेल.—मीखा ७:७.
१५-१६. संघटनेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल एका भावाला शंका असली, तरी विश्वासाने चालत राहायला त्याला कशामुळे मदत झाली? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ विश्वासाने चालत राहिल्यामुळे बरेच फायदे होतात. याचं एक उदाहरण विचारात घ्या. पेरूमध्ये स्पॅनिश भाषा जरी जास्त बोलली जात असली, तरी तिथले बरेच लोक स्थानिक भाषा बोलतात. त्यांपैकी एक म्हणजे केचुआ भाषा. केचुआ भाषा बोलणारे भाऊबहीण बऱ्याच वर्षांपर्यंत त्यांच्या क्षेत्रात केचुआ भाषेच्या लोकांना शोधत होते. पण सरकारी नियमांमुळे लोकांना शोधण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला. (रोम. १३:१) त्यामुळे काही भाऊबहिणींना असं वाटलं की आता आपलं हे काम नीट होणार नाही. पण तरी त्यांनी त्या मार्गदर्शनाचं पालन केलं. त्यामुळे त्यांना यहोवाकडून खूप आशीर्वाद मिळाले. त्यांना केचुआ बोलणाऱ्या बऱ्याच लोकांना शोधता आलं.
१६ केचुआ भाषेच्या मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या केविन नावाच्या भावाचा विचार करा. त्याच्या मनातही अशी शंका होती, की नवीन पद्धतीप्रमाणे प्रचार केल्यामुळे त्यांना केचुआ भाषा बोलणाऱ्या लोकांना शोधता येईल का. ते म्हणतात: “‘आता आम्हाला केचुआ भाषा बोलणारे लोक कसे भेटतील?’ असं मला वाटलं होतं.” मग केविनने काय केलं? ते म्हणतात: “मला नीतिवचनं ३:५ हे वचन आठवलं आणि मी मोशेचा विचार केला. इजिप्तमधून बाहेर निघताना यहोवाने त्याला असा सल्ला दिला, जो कदाचित त्याला चुकीचा वाटू शकला असता. यहोवाने मोशेला इस्राएली लोकांना तांबड्या समुद्राकडे घेऊन जायला सांगितलं. पण तिथे पोहोचल्यावर त्यांना वाटलं असेल, की ‘इथून आता आपली सुटका होणार नाही.’ कारण इजिप्तचे लोक त्यांचा पाठलाग करत होते. तरी मोशेने यहोवाची आज्ञा पाळली आणि यहोवानेही एक मोठा चमत्कार करून त्यांची सुटका केली.” (निर्ग. १४:१, २, ९-११, २१, २२) केविन नवीन पद्धतीने प्रचार करायला तयार होता. याचा काय परिणाम झाला? तो म्हणतो: “यहोवाने ज्या प्रकारे आम्हाला आशीर्वाद दिला, त्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आधी आम्ही खूप चालायचो, तरी आम्हाला केचुआ भाषा बोलणारे एक-दोनच लोक भेटायचे. आता आम्ही अशा ठिकाणी प्रचार करतो, जिथे केचुआ भाषा बोलणारे बरेच लोक भेटतात. याचा परिणाम म्हणजे, आम्हाला बऱ्याच लोकांशी संभाषण सुरू करता आलं, पुनर्भेटी घेता आल्या आणि बायबल अभ्यास सुरू करता आले. आणि आता आमच्या सभांची उपस्थितीही वाढली आहे.” हे खरंय, की आपण विश्वासाने चालतो तेव्हा यहोवा आपल्याला नेहमी आशीर्वाद देतो.
केचुआ भाषा बोलणारे लोक कुठे भेटतील हे बऱ्याच लोकांनी भाऊबहिणींना सांगितलं (परिच्छेद १५-१६ पाहा)
१७. या लेखातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१७ या लेखात आपण तीन गोष्टींच्या बाबतीत विश्वासाने कसं चालत राहू शकतो ते पाहिलं. पण आपण जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात विश्वासाने चालत राहिलं पाहिजे. जसं की, मनोरंजन निवडण्याच्या बाबतीत, शिक्षणाबद्दल निर्णय घेण्याच्या बाबतीत, मुलांना कसं वाढवायचं याबद्दल निर्णय घेण्याच्या बाबतीत. कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण फक्त दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावरच नाही, तर इतर गोष्टींचाही विचार करून निर्णय घेऊ. आणि त्या गोष्टी म्हणजे, यहोवासोबतचं आपलं नातं, त्याचा सल्ला आणि आपली काळजी घेण्याचं त्याने दिलेलं वचन. जर आपण असं केलं, तर आपण “सदासर्वकाळ [आपल्या] देवाच्या, यहोवाच्या नावाने” चालत राहू.—मीखा ४:५.
गीत १५६ विश्वासाने ताकदवान!
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b उदाहरणासाठी, या परिच्छेदात एक बहीण लग्नासाठी मुलगा शोधत आहे, असं सांगण्यात आलंय. पण हाच सल्ला लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या भावालाही लागू होतो.