युद्धाचे भीषण परिणाम
ज्यांना युद्धाची प्रत्यक्ष झळ बसली आहे त्यांच्यासाठी यापेक्षा वाईट कदाचित काहीच असू शकत नाही. जगभरात ज्या सैनिकांनी आणि नागरिकांनी हे अनुभवलंय तेच याची भीषणता खऱ्या अर्थाने समजू शकतात.
सैनिक
“तुमच्याभोवती भयंकर घटना घडत असतात. लोक मारले जात असतात, गंभीरपणे जखमी होत असतात आणि पुढे काय होईल या भीतीने तुम्हाला सतत असुरक्षित वाटत असतं.”—गॅरी, ब्रिटन.
“माझ्या चेहऱ्यावर आणि पाठीत गोळ्या लागल्या होत्या. कितीतरी लोकांची, अगदी लहान-लहान मुलांची आणि म्हाताऱ्या-कोताऱ्या लोकांचीसुद्धा हत्या होताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. युद्धामुळे तुमचं मन अगदी दगडासारखं होऊन जातं.”—विल्मार, कोलंबिया.
“तुमच्या डोळ्यांसमोर एखाद्याला गोळी घालून ठार मारलं जातं तेव्हा ते दृश्य मनातून जाता जात नाही. त्याचं ते ओरडणं, विव्हळणं सतत तुमच्या कानांत घुमत असतं. त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात कधी, म्हणजे कधीच विसरू शकत नाही.”—झफिरा, अमेरिका.
नागरिक
“माझ्या जीवनातला आनंद कायमचा हरपून गेलाय असं मला वाटलं. तुम्हाला तुमच्या जिवाची काळजी असते. पण त्याहून जास्त तुमच्या घरच्यांची, जवळच्या लोकांची तुम्हाला काळजी वाटत असते.”—ओलेक्सान्द्रा, युक्रेन.
“पहाटे दोनपासून रात्री अकरापर्यंत अन्नासाठी रांगेत उभं राहावं लागायचं, तेव्हा खूप भीती वाटायची. कारण कधी कुठली गोळी येऊन लागेल याचा नेम नसायचा.”—दलेर, ताजिकिस्तान.
“युद्धात माझे आईवडील मारले गेले आणि मी अनाथ झाले. आता माझं सांत्वन करायला, माझी काळजी घ्यायला कोणीच उरलं नाही.”—मेरी, रुआंडा.
युद्धाचे इतके भयंकर परिणाम सोसूनही या सगळ्यांना मनाची शांती मिळाली. इतकंच काय, त्यांना पक्की खातरी आहे, की लवकरच सगळ्या युद्धांचा आणि हिंसक संघर्षांचा कायमचा अंत होईल. हे कसं शक्य होईल हे या टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या अंकात बायबलच्या आधाराने समजावून सांगितलंय.