अभ्यास लेख ३०
गीत ३२ यहोवाला इमानी राहा!
इस्राएलच्या राजांकडून महत्त्वाचे धडे
“तुम्हाला पुन्हा एकदा, नीतिमान आणि दुष्ट माणसातला; आणि देवाची सेवा करणारा आणि न करणारा, यांतला फरक दिसून येईल.”—मला. ३:१८.
या लेखात:
इस्राएलच्या राजांकडे यहोवाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं हे शिकून घेतल्यामुळे यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घ्यायला आपल्याला मदत होईल.
१-२. इस्राएलच्या काही राजांबद्दल बायबल काय सांगतं?
बायबलमध्ये अशा ४० पेक्षा जास्त पुरुषांची नावं दिली आहेत, ज्यांनी इस्राएलचे राजे म्हणून राज्य केलं.a त्यांपैकी काही राजांनी काय-काय केलं याबद्दलची माहिती अगदी प्रामाणिकपणे बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, चांगल्या राजांनीसुद्धा काही वाईट कामं केली. जसं की राजा दावीद. यहोवाने त्याच्याबद्दल म्हटलं: ‘माझा सेवक दावीद माझ्या दृष्टीने जे योग्य ते करून मनापासून माझ्या मार्गांवर चालला.’ (१ राजे १४:८) यहोवाने त्याच्याबद्दल असं म्हटलं असलं तरी त्याने विवाहित स्त्रीसोबत अनैतिक काम केलं. इतकंच काय तर तिच्या पतीला कट रचून युद्धात मारलंसुद्धा.—२ शमु. ११:४, १४, १५.
२ याउलट बऱ्याच अविश्वासू राजांनी काही चांगली कामंसुद्धा केली. रहबामचाच विचार करा. यहोवाच्या नजरेत तो “वाईट कामं करत राहिला.” (२ इति. १२:१४) असं असलं तरी त्याने काही चांगली कामंसुद्धा केली. यहोवाने त्याला आज्ञा दिली होती की त्याने इस्राएलच्या दहा वंशांसोबत लढू नये आणि त्यांना त्याचा राजा निवडू द्यावा. यहोवाची ही आज्ञा त्याने पाळली. तसंच त्याने देशाची शहरं मजबूत केली आणि त्यामुळे इस्राएल राष्ट्राला फायदा झाला.—१ राजे १२:२१-२४; २ इति. ११:५-१२.
३. इस्राएलच्या राजांबद्दल कोणता महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर इस्राएलच्या राजांनी चांगली आणि वाईट कामंसुद्धा केली तर मग यहोवाने कोणत्या आधारावर एक राजा विश्वासू आहे की नाही हे ठरवलं? या प्रश्नाच्या उत्तरामुळे यहोवा आपल्यात कोणत्या गोष्टी पाहतो हे समजून घ्यायला मदत होईल. इस्राएलच्या राजांचं परीक्षण करताना यहोवाने ज्या तीन गोष्टी विचारात घेतल्या त्यावर आता चर्चा करू या. त्या तीन गोष्टी म्हणजे ते पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत होते का? त्यांनी पश्चात्ताप केला की नाही? आणि ते खऱ्या उपासनेला जडून होते की नव्हते?
ते पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत होते
४. विश्वासू आणि अविश्वासू राजांमधला एक फरक कोणता?
४ ज्या राजांनी यहोवाला खूश केलं ते पूर्ण मनाने त्याची सेवा करत होते.b यहोशाफाट एक चांगला राजा होता. आणि त्याने “मनापासून यहोवाची सेवा केली.” (२ इति. २२:९) योशीयाबद्दल बायबलमध्ये म्हटलंय: “पूर्ण मनाने . . . यहोवाकडे परत येणारा योशीयासारखा एकही राजा त्याच्याआधी नव्हता.” (२ राजे २३:२५) शलमोनबद्दल काय? त्याने नंतर वाईट गोष्टी केल्या. बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याचं मन आपला देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.” (१ राजे ११:४) आणखी एक अविश्वासू राजा अबीयाम याच्याबद्दल बायबल म्हणतं: “त्याचं मन त्याचा देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.”—१ राजे १५:३.
५. पूर्ण मनाने यहोवाची उपासना करण्याचा काय अर्थ होतो?
५ पूर्ण मनाने यहोवाची उपासना करण्याचा काय अर्थ होतो? पूर्ण मनाने यहोवाची उपासना करणारी व्यक्ती उपासना फक्त केली पाहिजे म्हणून करत नाही. उलट आपल्या मनात गाढ आदर आणि प्रेम असल्यामुळे ती त्याची उपासना करते. तसंच तो आदर आणि प्रेम ती आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवते.
६. आपण पूर्ण मनाने यहोवाची सेवा कशी करत राहू शकतो? (नीतिवचनं ४:२३; मत्तय ५:२९, ३०)
६ पण मग आपण या विश्वासू राजांचं अनुकरण करून पूर्ण मनाने यहोवाची सेवा कशी करत राहू शकतो? वाईट गोष्टींचा प्रभाव टाळून आपण असं करू शकतो. उदाहरणार्थ, हानिकारक मनोरंजनामुळे आपलं मन भरकटू शकतं. तसंच वाईट संगतीमुळे आणि धनसंपत्तीचा सतत विचार करत राहिल्यामुळेही आपल्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. जर आपल्या लक्षात आलं की एखाद्या गोष्टीमुळे यहोवावरचं आपलं प्रेम कमजोर होत चाललंय, तर त्या गोष्टीला काढून टाकण्यासाठी आपण लगेच पाऊल उचललं पाहिजे.—नीतिवचनं ४:२३; मत्तय ५:२९, ३० वाचा.
७. वाईट प्रभावांपासून दूर राहणं का महत्त्वाचंय?
७ आपण कधीच आपलं मन भरकटू देऊ नये. जर आपण सावध नसलो तर आपण असा विचार करू की मी यहोवाच्या सेवेत व्यस्त आहे. त्यामुळे माझ्यावर कुठल्याच वाईट गोष्टीचा प्रभाव पडणार नाही. पण असा विचार करून आपण खरंतर स्वतःला फसवत असू. हे समजून घ्यायला कल्पना करा, की उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि तुम्ही कडक उन्हातून घरी आला आहात. घरी आल्यावर तुम्ही एसी किंवा कूलर चालू करता. पण मग तुम्ही दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या तर त्या एसीचा किंवा कूलरचा तुम्हाला कितपत फायदा होईल? जर तुम्ही दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या तर बाहेरची गरम हवा घरात येऊन घरातलं तापमान वाढवू शकतं. तर मुद्दा हा आहे, की आपण यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करण्यासाठी फक्त आध्यात्मिक अन्न घेणं पुरेसं नाही. त्यासोबतच आपण वाईट गोष्टींचा आपल्यावर प्रभाव होऊ नये म्हणून आपण आपल्या मनाचं दारही बंद केलं पाहिजे. यामुळे जगातली गरम ‘हवा’ किंवा देवाला न आवडणारे गुण आपल्या मनात शिरणार नाहीत आणि त्यामुळे आपलं मन भरकटणार नाही.—इफिस. २:२.
त्यांनी पश्चात्ताप केला
८-९. यहोवाने सुधारल्यानंतर दावीद राजा आणि हिज्कीया राजाने काय केलं? (चित्र पाहा.)
८ आपण आधी जसं पाहिलं तसं दावीद राजाने एक गंभीर चूक केली होती. पण जेव्हा नाथान संदेष्ट्याने त्याचं हे पाप त्याला दाखवून दिलं तेव्हा त्याने नम्रपणे पश्चात्ताप केला. (२ शमु. १२:१३) दावीदने नाथान संदेष्ट्याला दाखवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी वाईट वाटायचं नाटक केलं नाही, तर खरा पश्चात्ताप केला. स्तोत्र ५१ मध्ये असलेल्या त्याच्या शब्दांवरून त्याचा पश्चात्ताप किती खरा होता हे कळतं.—स्तो. ५१:३, ४, १७, उपरीलेखन.
९ हिज्कीया राजानेसुद्धा यहोवाविरुद्ध पाप केलं. बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याचं मन गर्विष्ठ झालं होतं. आणि त्यामुळे त्याच्यावर, यहूदावर आणि यरुशलेमवर देवाचा क्रोध भडकला.” (२ इति. ३२:२५) पण हिज्कीयाचं मन गर्विष्ठ का झालं होतं? कदाचित त्याच्याकडे असलेल्या धनसंपत्तीमुळे, अश्शूरी लोकांवर त्याने मिळवलेल्या विजयामुळे किंवा मग आजारातून चमत्काराने बरं झाल्यामुळे त्याचं मन गर्विष्ठ झालं असावं. त्याच्या या गर्विष्ठपणामुळेच त्याला बाबेलच्या लोकांना आपली धनसंपत्ती दाखवण्याचा मोह झाला असेल. पण याचा परिणाम म्हणजे यशया संदेष्ट्याने त्याची कडक शब्दांत कानउघडणी केली. (२ राजे २०:१२-१८) पण दावीद राजाप्रमाणेच हिज्कीया राजानेसुद्धा नम्रपणे पश्चात्ताप केला. (२ इति. ३२:२६) शेवटी यहोवाने त्याला “योग्य ते करत” राहणारा विश्वासू राजा म्हणून पाहिलं.—२ राजे १८:३.
दावीद आणि हिज्कीया राजाला त्यांची पापं दाखवून देण्यात आली तेव्हा त्यांनी नम्रपणे पश्चात्ताप केला (परिच्छेद ८-९ पाहा)
१०. अमस्या राजाला सुधारण्यात आलं तेव्हा त्याने काय केलं?
१० याच्या अगदी उलट, यहूदामधला राजा अमस्या “योग्य ते करत राहिला, पण पूर्ण मनाने नाही.” (२ इति. २५:२) पण त्याच्याबद्दल असं का म्हटलंय? यहोवाने अदोमी लोकांविरुद्ध त्याला विजय मिळवून दिल्यानंतर त्याने त्यांच्या देवांना नमन केलं.c मग नंतर जेव्हा यहोवाच्या संदेष्ट्याने त्याला त्याची चूक दाखवून दिली, तेव्हा त्याने उद्धटपणे त्याला त्याच्यापुढून घालवून दिलं.—२ इति. २५:१४-१६.
११. २ करिंथकर ७:९, ११ प्रमाणे माफी मिळवायला आपण काय केलं पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)
११ या सगळ्या उदाहरणांतून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला पाहिजे आणि तीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून जमेल ते केलं पाहिजे. पण जर आपल्याला मंडळीतल्या वडिलांकडून अगदी छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल सल्ला मिळाला तर काय? यहोवाने किंवा वडिलांनी आपल्याकडे पाठ फिरवली आहे असा आपण कधीच विचार करू नये. इस्राएलमधल्या चांगल्या राजांनासुद्धा सल्ल्याची आणि सुधारण्याची गरज पडली होती. (इब्री १२:६) त्यामुळे जेव्हा आपल्याला सुधारण्यात येतं तेव्हा आपण ते (१) नम्रपणे कबूल केलं पाहिजे, (२) गरज असलेले बदल केले पाहिजेत आणि (३) पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत राहिली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप दाखवतो तेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करेल.—२ करिंथकर ७:९, ११ वाचा.
आपल्याला सुधारण्यात येतं तेव्हा आपण ते (१) नम्रपणे कबूल केलं पाहिजे, (२) गरज असलेले बदल केले पाहिजे आणि (३) पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत राहिली पाहिजे (परिच्छेद ११ पाहा)f
ते खऱ्या उपासनेला जडून राहिले
१२. यहोवाला विश्वासू राहणारे राजे कोणत्या बाबतीत वेगळे होते?
१२ यहोवाने ज्या राजांना विश्वासू समजलं ते खऱ्या उपासनेला जडून राहिले होते. तसंच त्यांनी त्यांच्या राज्यातल्या लोकांनाही तसं करायचं प्रोत्साहन दिलं. आपण पाहिल्याप्रमाणे हे खरंय की त्यांच्यामध्येही कमतरता होत्या, पण त्यांनी फक्त यहोवाचीच उपासना केली आणि देशातून मूर्तिपूजा काढून टाकण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.d
१३. यहोवाने अहाब राजाला अविश्वासू का समजलं?
१३ यहोवाने काही राजांना अविश्वासू का समजलं? त्यांनी जे काही केलं होतं ते सगळं वाईटच होतं असं नव्हतं. उदाहरणार्थ, दुष्ट राजा अहाबला जेव्हा कळलं की तो नाबोथच्या खूनासाठी जबाबदार आहे, तेव्हा त्याने थोडीफार नम्रता दाखवली आणि त्याबद्दल त्याला वाईट वाटलं. (१ राजे २१:२७-२९) तसंच त्याने शहरं बांधली आणि इस्राएलला विजय मिळवून दिला. (१ राजे २०:२१, २९; २२:३९) पण अहाबने त्याच्या बायकोच्या प्रभावाखाली येऊन खोट्या उपासनेला उत्तेजन दिलं. यासाठी मात्र त्याने कधीच पश्चात्ताप केला नाही.—१ राजे २१:२५, २६.
१४. (क) यहोवाने रहबाम राजाला अविश्वासू का ठरवलं? (ख) बऱ्याच अविश्वासू राजांनी कोणतं चुकीचं पाऊल उचललं?
१४ आणखी एका अविश्वासू राजाचं, रहबामचं उदाहरण लक्षात घ्या. आधी सांगितल्याप्रमाणे त्याने त्याच्या राज्यात काही प्रमाणात चांगल्या गोष्टी केल्या होत्या. पण जेव्हा त्याचं राज्य मजबूत झालं तेव्हा तो यहोवाचे नियम सोडून खोट्या उपासनेकडे वळला. (२ इति. १२:१) त्यानंतर तो खऱ्या उपासनेत आणि खोट्या उपासनेत हेलकावे खाऊ लागला. (१ राजे १४:२१-२४) पण फक्त रहबाम आणि अहाब राजाच खऱ्या उपासनेपासून बहकले नाहीत. तर बरेच अविश्वासू राजेसुद्धा या ना त्या मार्गाने खऱ्या उपासनेपासून बहकले होते आणि त्यांनी इतरांनाही तसं करायचं प्रोत्साहन दिलं होतं. तर मग एखादा राजा चांगला आहे की वाईट हे यहोवा कसं ठरवायचा? तो राजा खऱ्या उपासनेला जडून आहे, की नाही या महत्त्वाच्या गोष्टीवरून यहोवा हे ठरवायचा.
१५. आपण खऱ्या उपासनेला जडून राहणं हे यहोवासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?
१५ उपासनेचा हा मुद्दा यहोवासाठी इतका महत्त्वाचा का आहे? याचं एक कारण म्हणजे खऱ्या उपासनेत देवाच्या लोकांचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राजांची होती. तसंच, खोट्या उपासनेमुळे त्यांच्या हातून गंभीर पाप आणि अन्याय होणार हे ठरलेलंच होतं. (होशे. ४:१, २) यासोबतच, राजे आणि त्यांची प्रजा यहोवाला समर्पित होती. म्हणून बायबलमध्ये खोट्या उपासनेत सहभागी होण्याची तुलना व्यभिचाराशी केली आहे. (यिर्म. ३:८, ९) व्यभिचार करणारी एक व्यक्ती तिच्या जोडीदाराविरुद्ध पाप करते आणि खूप वाईट रितीने तिचं मन दुखावते. त्या व्यक्तीच्या वेदना शब्दांत सांगण्यासारख्या नसतात. त्याच प्रकारे, यहोवाचा एखादा समर्पित सेवक जेव्हा खोट्या उपासनेत भाग घेतो, तेव्हा तो त्याच्या विरुद्ध पाप करतो आणि यामुळे यहोवाच्या मनाला खूप वेदना होतात.e—अनु. ४:२३, २४.
१६. यहोवाच्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट नीतिमान व्यक्तीला दुष्ट व्यक्तीपासून वेगळं करते?
१६ यातून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात? आपण खोट्या उपासनेपासून दूर राहायचा पक्का निश्चय केला पाहिजे. पण त्यासोबतच आपण खऱ्या उपासनेला जडून राहिलं पाहिजे आणि त्यात आवेशाने सहभाग घेतला पाहिजे. देवाच्या नजरेत चांगल्या व्यक्तीमध्ये आणि वाईट व्यक्तीमध्ये काय फरक आहे, हे मलाखी संदेष्ट्याने सांगितलं. तो म्हणाला: “तुम्हाला पुन्हा एकदा, नीतिमान आणि दुष्ट माणसातला; आणि देवाची सेवा करणारा आणि न करणारा, यांतला फरक दिसून येईल.” (मला. ३:१८) त्यामुळे आपण देवाची सेवा सोडून देण्याइतपत कुठल्याच गोष्टीला, इतकंच काय तर आपल्या अपरिपूर्णतांना आणि आपल्या चुकांनाही स्वतःवर प्रभाव करू देणार नाही. कारण यहोवाची सेवा सोडून देणंसुद्धा एक गंभीर पाप आहे.
१७. विवाह जोडीदाराबद्दल आपण जी निवड करू त्याचा यहोवाच्या उपासनेवर कसा परिणाम होऊ शकतो?
१७ तुम्ही जर लग्नाचा विचार करत असाल, तर यहोवाची सेवा करण्याबद्दल मलाखीने जे म्हटलं त्यामुळे एक चांगला विवाह जोडीदार निवडायला तुम्हाला मदत होऊ शकते. एखाद्या व्यक्तीमध्ये चांगले गुण असतील, पण जर तो खऱ्या देवाचा उपासक नसेल तर तो यहोवाच्या नजरेत नीतिमान आहे का? (२ करिंथ. ६:१४) एक विवाह जोडीदार या नात्याने तो तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देईल का? शलमोनच्या मूर्तिपूजक पत्नींमध्ये कदाचित चांगले गुण असतील. पण त्या यहोवाची उपासना करणाऱ्या नव्हत्या. आणि त्यांनी हळूहळू शलमोनचं मन खोट्या उपासनेकडे वळवलं.—१ राजे ११:१, ४.
१८. आईवडिलांनी आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे?
१८ आईवडिलांनो, तुमच्या मुलांमध्ये यहोवाच्या उपासनेबद्दल आवेश निर्माण करायला बायबलमध्ये असलेल्या राजांच्या अहवालांचा तुम्ही वापर करू शकता. त्यासोबतच, एक राजा चांगला होता की वाईट, हे तो यहोवाच्या उपासनेला पाठिंबा देत होता की नाही यावर अवलंबून होतं, ही गोष्ट समजून घ्यायला त्यांना मदत करा. तुमच्या मुलांना शब्दांनी आणि स्वतःच्या उदाहरणाने हे शिकवायचा प्रयत्न करा, की बायबलचा अभ्यास करणं, सभांना उपस्थित राहणं, क्षेत्रसेवेत भाग घेणं यांसारख्या आध्यात्मिक गोष्टी इतर कामांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. (मत्त. ६:३३) नाहीतर तुमची मुलं असा समज करून बसतील, की यहोवाचा साक्षीदार असणं ही पिढ्या न् पिढ्या चालत आलेली आपल्या “कुटुंबाची परंपराच” आहे. याचा परिणाम कदाचित असा होईल ते खऱ्या उपासनेला दुसऱ्या स्थानी ठेवतील किंवा मग ती पूर्णपणे सोडून देतील.
१९. ज्यांनी यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं त्यांच्याबद्दल कोणती आशा आहे? (“तुम्ही यहोवाकडे परत येऊ शकता!” ही चौकटसुद्धा पाहा.)
१९ जर एखाद्याने यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं, तर त्याच्याबद्दल आता काहीच आशा ठेवता येणार नाही, असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. कारण तो पश्चात्ताप करू शकतो आणि पुन्हा खरी उपासना करू शकतो. असं करण्यासाठी त्याला आपला स्वाभिमान गिळून टाकावा लागेल. आणि मंडळीतल्या वडिलांची मदत घ्यावी लागेल. (याको. ५:१४) पण एक गोष्ट मात्र खरी आहे. यहोवासोबत परत मैत्री करायला तो जी काही मेहनत घेतोय, त्याच्या तुलनेत यहोवाची पुन्हा मिळालेली स्वीकृती खूप मोठी आहे!
२०. आपण जर विश्वासू राजांचं अनुकरण केलं, तर यहोवा आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहील?
२० इस्राएलमधल्या राजांकडून आपल्याला काय शिकायला मिळालं? आपण जर पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत राहिलो, तर आपण इस्राएलमधल्या विश्वासू राजांसारखं होऊ शकतो. तर मग आपण आपल्या चुकांमधून शिकू या, पश्चात्ताप करू या आणि गरज असलेले बदल करू या. आणि फक्त एकाच खऱ्या देवाच्या उपासनेला जडून राहायचं महत्त्व आपण लक्षात ठेवू या. कारण जर आपण यहोवाला विश्वासू राहिलो, तर तो आपल्याला त्याच्या नजरेत योग्य ते करणारी व्यक्ती म्हणून पाहील.
गीत ४५ माझ्या मनातले विचार
a या लेखात, “इस्राएलचे राजे” हे शब्द यहोवाच्या लोकांवर राज्य करणाऱ्या सर्व राजांना सूचित करतात. मग ते यहूदाच्या दोन वंशांवर, इस्राएलच्या दहा वंशांवर किंवा मग सगळ्या १२ वंशांवर राज्य करणारे राजे असोत.
b शब्दांचा अर्थ: बायबलमध्ये सहसा “मन” किंवा “हृदय” हा शब्द एखादी व्यक्ती आतून कशी आहे याचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात आलाय. यामध्ये त्याची इच्छा, विचार, स्वभाव, वृत्ती, क्षमता आणि ध्येयं सामील आहे.
c त्या काळात इस्राएली नसलेले मूर्तिपूजक राजे सहसा जिंकलेल्या राष्ट्राच्या देवांची उपासना करायचे.
d राजा आसाने गंभीर अपराध केले. (२ इति. १६:७, १०) तरीसुद्धा, बायबलमध्ये त्याचा उल्लेख चांगला राजा म्हणून केला आहे. त्याने जरी सुरुवातीला सुधारणा करायचं नाकारलं, तरी त्याला नंतर पश्चात्ताप झाला असण्याची शक्यता आहे. एकंदरीत त्याच्या चुकांपेक्षा त्याच्या चांगल्या गुणांकडे यहोवाने लक्ष दिलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आसाने फक्त यहोवाची उपासना केली आणि त्याच्या राज्यातून मूर्तिपूजा काढून टाकायचा प्रयत्न केला.—१ राजे १५:११-१३; २ इति. १४:२-५.
e मोशेच्या नियमशास्त्रातल्या पहिल्या दोन आज्ञांमध्ये यहोवाला सोडून कोणाचीच किंवा कशाचीच उपासना करायची सक्त मनाई होती. यावरून कळतं की यहोवासाठी खरी उपासना किती महत्त्वाची होती.—निर्ग. २०:१-६.
f चित्रांचं वर्णन: एक तरुण वडील एका भावाला त्याच्या दारूच्या सवयीबद्दल सल्ला देत आहे. तो भाऊ नम्रपणे तो सल्ला स्वीकारतो, बदल करतो आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहतो.