जीवन कथा
यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे मला खरी सुरक्षितता मिळाली
जेव्हा लोक मला माझ्याबद्दल विचारतात तेव्हा मी त्यांना म्हणतो की, “मी यहोवाच्या हातातली सुटकेस आहे!” जसं मला जिथे हवंय तिथे मी माझी सुटकेस घेऊन जातो, तसंच यहोवाने आणि त्याच्या संघटनेने मला केव्हाही आणि कुठेही घेऊन जावं असं मला वाटतं. मी अशा नेमणुका स्वीकारल्या आहेत ज्या खूप कठीण होत्या आणि ज्यात जीवाचा धोकासुद्धा होता. पण यहोवावर भरवसा ठेवल्यामुळेच खरी सुरक्षा मिळते हे मला शिकायला मिळालं.
यहोवावर भरवसा ठेवायला सुरुवात
१९४८ मध्ये नायजेरियाच्या एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला. त्या वेळी माझे काका मुस्तफा आणि माझा मोठा भाऊ वहाबी यांनी यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. मी नऊ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. मी पार तुटून गेलो होतो. पण मग वहाबीने मला सांगितलं, की आपल्या वडिलांचं पुनरुत्थान होईल आणि आपल्याला त्यांना पुन्हा बघता येईल. या विचाराने मला इतकं सांत्वन मिळालं, की मी बायबल अभ्यास सुरू केला. आणि १९६३ साली माझा बाप्तिस्मा झाला. काही काळानंतर माझ्या तिघा भावांचाही बाप्तिस्मा झाला.
१९६५ मध्ये मी लागोसमध्ये माझा दुसरा मोठा भाऊ विल्सन याच्याकडे गेलो आणि ईग्बोबी मंडळीतल्या पायनियरांसोबत प्रचार करू लागलो. त्यांच्यासोबत प्रचार करायला मला खूप मजा यायची. प्रचारकार्यातला त्यांचा आनंद आणि आवेश पाहून मीसुद्धा १९६८ च्या जानेवारी महिन्यात पायनियर सेवा सुरू केली.
बेथेलमध्ये सेवा करणारे भाऊ ॲल्बर्ट ओलुगबेबी यांनी आम्हा तरुणांसोबत एक खास सभा भरवली. उत्तर नायजेरियात खास पायनियरांची किती गरज आहे याबद्दल त्या सभेत सांगण्यात आलं. ब्रदर ॲल्बर्टने मोठ्या आवेशाने जे म्हटलं होतं ते मला अजूनही आठवतंय. ते म्हणाले होते: “शेत कापणीसाठी तयार आहे. तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती यहोवासाठी खर्च करू शकता.” यशया संदेष्ट्याने जी आवेशी मनोवृत्ती दाखवली होती तसंच मलाही करायचं होत. त्यामुळे मी खास पायनियर सेवेसाठी अर्ज भरला.—यश. ६:८.
१९६८ च्या मे महिन्यात मला उत्तर नायजेरियातल्या कानो शहरात खास पायनियर म्हणून नेमणूक मिळाली. त्या वेळी तिथे बियाफ्रन युद्ध (१९६७-१९७०) चालू होतं. या युद्धामुळे उत्तर नायजेरिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. आणि मग या युद्धाचा वणवा पूर्व नायजेरियापर्यंतसुद्धा पोचला होता. पण एका बांधवाला माझी खूप काळजी वाटत होती, त्यामुळे त्यांनी मला उत्तर नायजेरियामध्ये न जाण्याचा सल्ला दिला. पण मी त्यांना म्हटलं: “तुम्हाला माझी काळजी आहे, हे मी समजू शकतो. पण मी तिथे सेवा करावी अशी जर यहोवाची इच्छा असेल, तर यहोवा तिथे माझ्यासोबत असेल की नाही अशी शंका मला जराही वाटत नाही.”
युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या शहरात यहोवावर भरवसा
कानोमधली परिस्थिती खूपच खराब होती. युद्धामुळे ते मोठं शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. प्रचार करताना कधीकधी युद्धामध्ये मेलेल्या लोकांचे शव आम्हाला पाहायला मिळायचे. तसं पाहायला गेलं तर कानोमध्ये बऱ्याच मंडळ्या होत्या. पण युद्धामुळे भाऊबहीण दुसरीकडे पळून गेले होते. आता फक्त जेमतेम १५ पेक्षाही कमी प्रचारक तिथे उरले होते. आणि तेसुद्धा खूप निराश आणि घाबरलेल्या स्थितीत. पण जेव्हा आम्ही सहा खास पायनियर तिथे गेलो तेव्हा आम्हाला पाहून त्या भाऊबहिणींना खूप आनंद झाला. आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं. तसंच आम्ही त्यांना सभा आणि प्रचारकार्य पुन्हा सुरू करायला मदत केली. यासोबतच क्षेत्रसेवेचे अहवाल पाठवण्याच्या बाबतीत आणि शाखा कार्यालयाला साहित्यांची मागणी पाठवण्याच्या बाबतीतसुद्धा आम्ही त्यांना मदत केली.
आम्ही खास पायनियर हौसा भाषा शिकू लागलो. कारण लोक जेव्हा त्यांच्या मातृभाषेत संदेश ऐकायचे तेव्हा ते आमचं चांगलं ऐकून घ्यायचे. पण तिथे ज्या धर्माचा जास्त प्रभाव होता, त्या धर्माच्या लोकांना आमचं प्रचारकार्य आवडत नव्हतं. त्यामुळे आम्हाला खूप सावध राहून प्रचारकार्य करावं लागायचं. एकदा तर असं झालं की मी आणि एक भाऊ, आम्ही प्रचारकार्य करत होतो आणि एक माणूस चाकू घेऊन आमच्या मागे लागला. पण आम्ही त्याच्या खूप पुढे निघून गेल्यामुळे कसंबसं तिथून निसटलो. पण हे सगळे धोके असूनसुद्धा यहोवाने आम्हाला सुरक्षित ठेवलं. आणि हळूहळू प्रचारकांची संख्या वाढू लागली. (स्तो. ४:८) आज कानोमधल्या ११ मंडळ्यांमध्ये जवळजवळ ५०० पेक्षा जास्त प्रचारक सेवा करत आहेत.
नायजरमध्ये विरोधाचा सामना
नायजरच्या नियामे इथे खास पायनियर म्हणून सेवा करताना
कानोमध्ये काही महिने घालवल्यानंतर १९६८ च्या ऑगस्ट महिन्यात मला आणि आणखी दोन खास पायनियरांना नियामे इथे पाठवण्यात आलं. हे शहर नायजर प्रचासत्ताकचं राजधानी शहर आहे. लवकरच आम्हाला कळलं, की पश्चिम आफ्रिकेतलं नायजर शहर सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक आहे. आम्हाला गर्मीचा सामना करावा लागणार होता. पण त्यासोबतच आम्हाला तिथली मुख्य भाषा, फ्रेंचसुद्धा शिकून घ्यावी लागणार होती. इतक्या सगळ्या अडचणी असूनसुद्धा आम्ही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला आणि तिथे राहणाऱ्या मोजक्याच प्रचारकांसोबत त्या राजधानी शहरात सेवाकार्य करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला, की काही काळातच नियामेमधल्या जितक्या लोकांना वाचता येत होतं, त्या जवळपास सगळ्यांपर्यंत बायबल अभ्यासासाठी वापरण्यात येणाऱ्या सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते या पुस्तकाची एक प्रत पोचली होती. इतकंच काय, तर या पुस्तकाची एक प्रत मिळवण्यासाठी लोक कधीकधी आम्हाला शोधत यायचे!
याच्या काही काळातच आम्हाला जाणवलं की तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना यहोवाच्या साक्षीदारांचं काम आवडत नाही. १९६९ च्या जुलै महिन्यात आम्ही तिथल्या पहिल्या विभागीय संमेलनासाठी एकत्र आलो होतो. त्यासाठी जेमतेम २० लोक तिथे जमले होते. त्या संमेलनात दोन प्रचारकांचा बाप्तिस्माही होणार होता. पण संमेलनाच्या पहिल्या दिवशी, पोलीस तिथे आले आणि त्यांनी आमचा कार्यक्रम बंद पाडला. त्यांनी खास पायनियर आणि विभागीय पर्यवेक्षकांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. आमची उलटतपासणी केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी परत आम्हाला तिथे यायला सांगितलं. आता समस्या काही सुटणार नाही हे जाणवल्यावर आम्ही एका घरातच बाप्तिस्म्याचं भाषण द्यायची व्यवस्था केली आणि कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने बाप्तिस्म्याच्या उमेदवारांना एका नदीत बाप्तिस्मा दिला.
काही आठवड्यांनंतर तिथल्या सरकारने मला आणि माझ्यासोबत असलेल्या पाच खास पायनियरांना तो देश सोडायला सांगितलं. त्यांनी ४८ तासांत आम्हाला तिथून निघायला सांगितलं. आणि सगळी व्यवस्था आम्हाला स्वतःलाच करायची होती. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं आणि थेट नायजेरियाच्या शाखा कार्यालयात गेलो. नंतर तिथे आम्हाला नवीन नेमणुका मिळाल्या.
मला नायजेरियाच्या ओरीसनबारे या गावात नेमणूक मिळाली. तिथे प्रचारकांचा एक लहान गट होता. आणि त्यांच्यासोबत प्रचार करायला आणि बायबल अभ्यास घ्यायला मला खूप मजा यायची. पण सहा महिन्यांनंतर शाखा कार्यालयाने मला पुन्हा नायजरला जायला सांगितलं. सुरुवातीला मला थोडं आश्चर्य वाटलं आणि भीतीही वाटली. पण नायजरमधल्या भाऊबहिणींना परत भेटण्यासाठी मी खूप उत्सुक होतो.
मी नियामेला परत आलो. तिथे आल्याच्या एक दिवसानंतर तिथल्या एका व्यापाराने ओळखलं की मी एक साक्षीदार आहे. आणि तो मला बायबलबद्दल प्रश्न विचारू लागला. आम्ही सोबत मिळून अभ्यास केला. त्यानंतर त्याने सिगारेट ओढण्याची आणि खूप जास्त दारू पिण्याची सवय सोडली आणि बाप्तिस्मा घेतला. नायजरमधल्या वेगवेगळ्या भागांत हळूहळू का होईना पण प्रगती होत होती. आणि त्यात माझाही सहभाग होता याचं मला समाधान होतं. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे आलो तेव्हा त्या देशात फक्त ३१ साक्षीदार होते. पण तिथून निघताना तिथे ६९ साक्षीदार होते.
“गिनीमधल्या प्रचारकार्याबद्दल आम्हाला इतकं काही माहीत नाही”
१९७७ च्या डिसेंबर महिन्यात मी पुन्हा नायजेरियाला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो. तीन आठवड्याच्या त्या कोर्सच्या शेवटी शाखा समितीचे संयोजक मॅलकम विगो यांनी मला सिएरा लिऑन शाखेकडून आलेलं एक पत्र वाचून दाखवलं. तिथल्या बांधवांना एका अविवाहित पायनियर बांधवाची गरज होती. आणि या बांधवाचं आरोग्य चांगलं असावं आणि त्याला इंग्रजी आणि फ्रेंच भाषा बोलता यावी अशी त्यांची अपेक्षा होती, म्हणजे तो गिनीमध्ये विभागीय पर्यवेक्षकाचं काम करू शकेल. ब्रदर विगोने मला सांगितलं की मला याच गोष्टीसाठी प्रशिक्षण मिळालंय. ही नेमणूक इतकी सोपी नसेल या गोष्टीवर जोर देत ते म्हटले: “तिथे जाण्याआधी नीट विचार कर.” पण मी लगेच त्यांना म्हटलं: “जर यहोवा मला तिथे पाठवतोय, तर मी नक्की जाईन.”
मी सिएरा लिऑनला गेलो आणि शाखा कार्यालयातल्या बांधवांना भेटलो. शाखा समितीतल्या एका भावाने मला म्हटलं: “गिनीमधल्या प्रचारकार्याबद्दल आम्हाला इतकं काही माहीत नाही.” खरंतर, गिनीच्या आसपासच्या क्षेत्रात होणाऱ्या प्रचारकार्यासाठी शाखा कार्यालय जबाबदार होतं. पण तिथल्या तणावात्मक राजकीय परिस्थितीमुळे तिथल्या प्रचारकांसोबत संपर्क साधणं अशक्य होतं. बरेच प्रयत्न करूनसुद्धा शाखा कार्यालयाला तिथल्या बांधवांना भेटण्यासाठी एखादा प्रतिनिधी पाठवता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला गिनीचं राजधानी शहर कोनाक्री इथे जाता येईल का असं विचारलं. आणि तिथे राहायची परवानगी मला मिळते का हेही मला पाहायचं होतं.
“जर यहोवा मला तिथे पाठवतोय, तर मी नक्की जाईन”
जेव्हा मी कोनाक्रीमध्ये आलो तेव्हा मी नायजेरियातल्या दूतावासात गेलो आणि तिथल्या अधिकाऱ्याला भेटलो. मला गिनीमध्ये प्रचार करायची इच्छा आहे असं मी त्यांना सांगितलं. तिथे अटक होण्याची शक्यता असल्यामुळे किंवा जीवाला धोका असल्यामुळे त्यांनी मला ‘तिथे न राहिलेलंच बरं,’ असं सांगितलं. ते मला बोलले: “नायजेरियाला परत जा आणि तिथेच प्रचारकार्य कर.” पण मी त्यांना म्हटलं: “मला इथेच राहायचंय.” त्यामुळे त्यांनी गिनीच्या सरकारी अधिकाऱ्याला मला मदत करण्यासाठी पत्र लिहिलं आणि त्यांनी मला मदत केली.
नंतर मी सिएरा लिऑनमधल्या शाखा कार्यालयात गेलो आणि बांधवांना अधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं. ते ऐकून बांधव खूपच खूश झाले आणि यहोवाने मला कसा आशीर्वाद दिला हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. शेवटी मला गिनीमध्ये राहायची परवानगी मिळालीच!
सिएरा लिऑन इथे विभागीय कार्यात
१९७८ ते १९८९ पर्यंत मी गिनीमध्येच विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम केलं. आणि लायबेरिया इथे पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम केलं. सुरुवातीला मी बऱ्याचदा आजारी पडायचो. आणि खासकरून दूरदूरच्या ठिकाणी असताना असं व्हायचं. पण मंडळीतले भाऊ मला लगेच हॉस्पिटलला घेऊन जायचे.
एकदा तर मी मलेरियामुळे खूपच आजारी पडलो होतो आणि मला पोटात जंतही झाले होते. हळूहळू मी बरा होत होतो. पण मी ऐकलं, की मला दफन कुठं करायचं यावर बांधव चर्चा करत होते! जीवावर बेतणाऱ्या यांसारख्या परिस्थितींमधून जात असताना माझ्या मनात एकदाही माझी नेमणूक सोडायचा विचार आला नाही. मला या गोष्टीची खातरी होती, की खरी आणि कायम टिकणारी सुरक्षा फक्त मेलेल्यांना उठवणारा देवच देऊ शकतो.
एक पती-पत्नी म्हणून यहोवावर भरवसा
१९८८ साली लग्नाच्या दिवशी
१९८८ मध्ये डॉर्कस नावाच्या एका पायनियर बहिणीशी माझी भेट झाली. ती खूप नम्र आणि देवाच्या सेवेत आवेशी होती. नंतर आमचं लग्न झालं आणि विभागीय कार्यात तिने मला छान साथ दिली. तिने माझ्या नेमणुकीत मला खूप मदत केली आहे आणि बरेच त्यागही केले आहेत. एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत जाण्यासाठी आम्हाला आमचं सामान घेऊन जवळजवळ २५ कि.मी. चालावं लागायचं. आणि दूरच्या मंडळ्यांमध्ये जाण्यासाठी आम्ही मिळेल त्या वाहनाचा उपयोग करून चिखल आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागायचा.
डॉर्कस खूप धाडसी होती. कधीकधी आम्हाला मगरींनी भरलेल्या नद्या पार कराव्या लागायच्या. एकदा पाच दिवसांचा प्रवास करताना, एका नदीवरून जाणारा लाकडी पूल तुटल्यामुळे आम्हाला छोट्या नावेतून नदी पार करावी लागली. जेव्हा डॉर्कस नावेतून उतरण्यासाठी उभी राहिली तेव्हा तिचा तोल जाऊन ती खोल पाण्यात पडली. आम्हाला दोघांनाही पोहता येत नव्हतं आणि त्या नदीत बऱ्याच मगरी होत्या. पण बरं झालं, की तिथल्या काही तरुण मुलांनी पाण्यात उडी मारली आणि तिला वाचवलं. बऱ्याच दिवसांपर्यंत आम्हाला या घटनेमुळे रात्री भीतीदायक स्वप्नं पडायची. पण तरी आम्ही आमची सेवा करत राहिलो.
आमची दोन्ही मुलं, जाहगिफ्ट आणि एरीक यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहेत
१९९२ ला आम्हाला एक सुखद धक्का बसला. आम्हाला कळलं, की डॉर्कस गरोदर आहे. त्यामुळे आता खास पायनियर म्हणून सेवा करायची की नाही, हे आम्हाला ठरवावं लागणार होतं. आम्ही विचार केला, यहोवाने आम्हाला एक भेट दिली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचं नाव जाहगिफ्ट (म्हणजे यहोवाकडून भेट) असं ठेवलं. त्यानंतर चार वर्षांनी एरीकचा जन्म झाला. खरंच, आमची दोन्ही मुलं यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहेत. जाहगिफ्टने कोनाक्री इथल्या भाषांतर विभागात (आर.टी.ओ.) काही काळापर्यंत सेवा केली. आणि एरीक एक सहायक सेवक आहे.
डॉर्कसला खास पायनियर सेवा सोडावी लागली. पण तरी ती मुलांना सांभाळत असताना पायनियर म्हणून सेवा करत राहिली. आणि यहोवाच्या मदतीने मी पूर्ण वेळची सेवा करत राहू शकलो. आमची मुलं मोठी झाल्यावर डॉर्कसला पुन्हा खास पायनियर म्हणून सेवा करणं शक्य झालं. आणि आता आम्ही दोघेही कोनाक्री इथे मिशनरी म्हणून सेवा करत आहोत.
खऱ्या सुरक्षिततेचा स्रोत
यहोवाने मला जिथे-जिथे नेलं तिथे-तिथे मी गेलो. आणि या संबंध काळात मी आणि माझ्या पत्नीने यहोवाचं संरक्षण आणि आशीर्वाद अनुभवले. भौतिक गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे ज्या चिंतांचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो त्या सगळ्यांतून आमची एका अर्थाने सुटका झाली, असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही यहोवावर भरवसा ठेवला. डॉर्कस आणि मी आमच्या आयुष्यातून हेच शिकलोय, की खऱ्या सुरक्षिततेचा स्रोत हा ‘उद्धार करणारा देव,’ यहोवाच आहे. (१ इति. १६:३५) मला या गोष्टीची पूर्ण खातरी आहे, की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो ‘मौल्यवान वस्तू जशा थैलीत सांभाळून ठेवल्या जातात, तसा सांभाळून ठेवेल.’—१ शमु. २५:२९.