अभ्यास लेख ४९
यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल का?
“तुम्ही मला हाक माराल, माझ्याकडे येऊन प्रार्थना कराल आणि मी तुमचं ऐकेन.”—यिर्म. २९:१२.
गीत ४१ यहोवा माझी प्रार्थना ऐक
सारांशa
१-२. यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देत नाही असं आपल्याला का वाटू शकतं?
“यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान, म्हणजे तो तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल.” (स्तो. ३७:४) किती सुंदर अभिवचन आहे! पण प्रार्थनेत आपण जे काही मागितलं, त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यहोवाने लगेच द्यावं अशी अपेक्षा आपण करावी का? हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? खाली दिलेल्या परिस्थितींचा विचार करा. एक अविवाहित बहीण सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचं आमंत्रण मिळावं म्हणून प्रार्थना करत आहे. पण बरीच वर्षं गेली तरी तिला अजूनही आमंत्रण मिळालेलं नाही. एक तरुण भाऊ मंडळीत जास्त सेवा करण्यासाठी त्याचा गंभीर आजार बरा व्हावा अशी यहोवाला प्रार्थना करत आहे. पण तरीसुद्धा त्याच्या तब्येतीत काही सुधारणा दिसत नाही. एक ख्रिस्ती आईवडील अशी प्रार्थना करत आहेत की त्यांच्या मुलाने सत्यात टिकून राहावं. पण त्यांचा मुलगा सत्य सोडून द्यायचा निर्णय घेतो.
२ तुम्हीसुद्धा कदाचित यहोवाकडे एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना केली असेल. पण तुम्हालासुद्धा प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल. आणि त्यामुळे ‘यहोवा इतरांच्या प्रार्थना ऐकतो, पण माझी प्रार्थना ऐकत नाही,’ असं कदाचित तुम्हाला वाटलं असेल. किंवा ‘माझ्या हातून काही चूक तर झाली नाही ना, ज्यामुळे यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही,’ असंसुद्धा तुम्हाला वाटलं असेल. जॅनिसb नावाच्या बहिणीलासुद्धा असंच वाटलं. तिने आणि तिच्या पतीने बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी यहोवाला प्रार्थना केली होती. ती म्हणते: “मला या गोष्टीची पूर्ण खातरी होती की आता लगेचच आम्हाला बेथेलला बोलवण्यात येईल.” पण महिने गेले, वर्षं गेली तरी त्यांना बेथेलचं आमंत्रण आलं नाही. जॅनिस म्हणते: “मला खूप वाईट वाटत होतं. मी गोंधळात पडले होते. मला असं वाटत होतं की मी यहोवाचं मन तर दुखावलं नाही ना? मी बेथेलला जाण्यासाठी बऱ्याच वेळा प्रार्थना केली होती. पण मला हे कळत नव्हतं की यहोवाने मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर का दिलं नाही.”
३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ कधीकधी आपल्या मनात अशी शंका येऊ शकते, की यहोवा आपल्या प्रार्थना खरंच ऐकतोय का? बायबल काळातल्या काही विश्वासू लोकांनासुद्धा असंच वाटलं होतं. (ईयो. ३०:२०; स्तो. २२:२; हब. १:२) पण मग यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देईल अशी खातरी आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे मिळू शकते? (स्तो. ६५:२) या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी या तीन प्रश्नांचा विचार करावा लागेल: (१) आपण यहोवाकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू शकतो? (२) यहोवा आपल्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो? (३) कधीकधी आपल्याला वाटतं त्यापेक्षा वेगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची का गरज पडू शकते?
आपण यहोवाकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू शकतो?
४. यिर्मया २९:१२ प्रमाणे यहोवा आपल्याला कोणत्या गोष्टीचं वचन देतो?
४ यहोवा आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल असं वचन तो आपल्याला देतो. (यिर्मया २९:१२ वाचा.) यहोवाचं आपल्या विश्वासू उपासकांवर खूप प्रेम आहे. म्हणूनच तो त्यांच्या प्रार्थनांकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. (स्तो. १०:१७; ३७:२८) पण याचा हा अर्थ होत नाही की तो आपल्या सगळ्याच मागण्या पूर्ण करेल. कारण काही प्रार्थनांचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला कदाचित नवीन जगापर्यंत थांबून राहावं लागेल.
५. आपल्या प्रार्थना ऐकताना यहोवा कोणती गोष्ट लक्षात घेतो? स्पष्ट करा.
५ यहोवा आपण केलेल्या प्रार्थनांचा त्याच्या एकंदर उद्देशाशी कसा संबंध आहे ते लक्षात घेतो. (यश. ५५:८, ९) या उद्देशाचा एक भाग म्हणजे त्याच्या अधिकाराखाली असलेल्या पृथ्वीवर पुरुष आणि स्त्रियांनी आनंदाने आणि एकतेने जगावं हा आहे. पण सैतानाचा असा दावा आहे की मानवांनी स्वतःवर राज्य करणंच योग्य आहे. (उत्प. ३:१-५) म्हणून सैतानाने केलेला दावा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने मानवाला स्वतःवर राज्य करण्याची परवानगी दिली आहे. म्हणूनच आज मानवी सरकारांमुळे तयार झालेल्या समस्यांना आज आपल्याला तोंड द्यावं लागतं. (उप. ८:९) त्यामुळे यहोवा आज सगळ्याच समस्या काढून टाकणार नाही हे समजण्यासारखं आहे. कारण असं जर केलं, तर मानवांनी राज्य करणंच योग्य आहे आणि ते मानवजातीच्या सगळ्या समस्या सोडवू शकतात असं कदाचित त्यामुळे काही लोकांना वाटू शकतं.
६. यहोवा जे काही करतो ते प्रेमाने आणि न्यायाने करतो या गोष्टीवर आपला भरवसा असणं का गरजेचं आहे?
६ यहोवा एकसारख्या प्रार्थनांची कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं देईल. उदाहरणार्थ, हिज्कीया राजा जेव्हा खूप आजारी होता, तेव्हा त्याने आपल्याला बरं करावं अशी यहोवाला कळकळून विनंती केली. आणि यहोवाने त्याची ही प्रार्थना ऐकली आणि त्याला बरं केलं. (२ राजे २०:१-६) पण दुसरीकडे पाहिलं तर प्रेषित पौलनेसुद्धा यहोवाला आपल्या ‘शरीरातला काटा’ काढून टाकण्याची, म्हणजे कदाचित त्याचं शारीरिक दुखणं बरं करण्याची यहोवाकडे विनंती केली. पण यहोवाने मात्र त्याची ही समस्या काढून टाकली नाही. (२ करिंथ. १२:७-९) तसंच, प्रेषित याकोब आणि प्रेषित पेत्रचंसुद्धा उदाहरण घ्या. त्या दोघांनाही हेरोद राजाकडून मृत्यूचा धोका होता. म्हणून पेत्र आणि कदाचित याकोबसाठी मंडळीतल्या भाऊबहिणींनी प्रार्थना केली असेल. याकोबला मात्र ठार मारण्यात येतं, पण पेत्रची मात्र चमत्कारिकपणे सुटका करण्यात येते. (प्रे. कार्यं १२:१-११) त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं, की ‘यहोवाने पेत्रसोबत याकोबलाही का वाचवलं नाही?’ याबद्दल बायबल काहीच सांगत नाही.c पण आपण एका गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की यहोवा ‘कधीच कोणावर अन्याय करत नाही.’ (अनु. ३२:४) शिवाय पेत्र आणि याकोब या दोघांना यहोवाची स्वीकृती होती, हे आपल्याला माहीत आहे. (प्रकटी. २१:१४) कधीकधी असं होऊ शकतं की आपण यहोवाकडे जे मागतो त्याचं उत्तर यहोवा आपण अपेक्षा केली नसेल अशा पद्धतीने देईल. पण यहोवा आपल्या प्रार्थनांचं नेहमी न्यायीपणे आणि प्रेमळपणे उत्तर देतो, या गोष्टीवर जर आपला भरवसा असेल, तर ‘यहोवाने आपल्या प्रार्थनेचं उत्तर अशा प्रकारे का दिलं?’ असा प्रश्न आपल्या मनात कधीच येणार नाही.—ईयो. ३३:१३.
७. आपण कोणती गोष्ट करायचं टाळलं पाहिजे आणि का?
७ आपण कधीच आपल्या परिस्थितीची तुलना इतरांच्या परिस्थितीशी करू नये. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट पद्धतीने यहोवाने आपल्या प्रार्थनांचं उत्तर द्यावं असं आपल्या वाटत असेल. पण तसं घडत नसेल. पण तशीच प्रार्थना दुसऱ्या एखाद्याने केली असेल, आणि त्या व्यक्तीच्या प्रार्थनेचं उत्तर मात्र यहोवाने दिलंय असं कदाचित आपल्याला वाटेल. ॲना नावाच्या बहिणीचंच उदाहरण घ्या. तिने आपल्या पतीचा म्हणजे मॅथ्यूचा कॅन्सर बरा व्हावा अशी यहोवाकडे प्रार्थना केली होती. आणि त्याच वेळी आणखी दोन वयस्कर बहिणीसुद्धा कॅन्सरशी झुंज देत होत्या. पण झालं असं, की त्या दोन बहिणी बऱ्या झाल्या, पण मॅथ्यूचा मात्र कॅन्सरमुळे मृत्यू झाला. सुरुवातीला ॲनाला असं वाटायचं की यहोवामुळे या दोन बहिणींना जर बरं वाटलं असेल, तर मग यहोवाने तिच्या पतीला का बरं केलं नाही. आता त्या दोन बहिणी कशामुळे बऱ्या झाल्या हे आपण सांगू शकत नाही. पण एक गोष्ट आपल्याला पक्की माहीत आहे, की आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या सगळ्या दुःखांसाठी यहोवाकडे कायमचा उपाय आहे. आणि त्याच्या मेलेल्या विश्वासू सेवकांना पुन्हा उठवण्यासाठी तो आतुर आहे.—ईयो. १४:१५.
८. (क) यशया ४३:२ प्रमाणे यहोवा आपल्याला कशी साथ देतो? (ख) कठीण परिस्थितीतून जात असताना प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (प्रार्थनेमुळे मदत होते हा व्हिडिओ पाहा.)
८ यहोवा कधीच आपली साथ सोडणार नाही. यहोवा एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याला आपण त्रासात असलेलं कधीच बघवत नाही. (यश. ६३:९) पण तरीसुद्धा नद्या आणि आगीच्या ज्वालांसारख्या आपल्यावर येणाऱ्या सगळ्याच परीक्षांमधून तो आपल्याला वाचवत नाही. (यशया ४३:२ वाचा.) पण या परीक्षांना तू “ओलांडशील” असं अभिवचन मात्र तो आपल्याला देतो. कोणत्याही समस्येमुळे किंवा परीक्षांमुळे तो कधीच आपलं कायमचं नुकसान होऊ देणार नाही. तसंच येणाऱ्या परीक्षांना आपल्याला धीराने तोंड देता यावं म्हणून तो त्याची पवित्र शक्तीसुद्धा देतो. (लूक ११:१३; फिलिप्पै. ४:१३) त्यामुळे परीक्षांना धीराने सहन करायला आणि विश्वासू राहायला ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे अगदी नेमक्या त्याच गोष्टी तो आपल्याला पुरवेल अशी खातरी आपण ठेवू शकतो.d
यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
९. याकोब १:६, ७ प्रमाणे यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा आपण का ठेवला पाहिजे?
९ आपण यहोवावर भरवसा ठेवावा अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (इब्री ११:६) आपल्यावर येणाऱ्या परीक्षांमुळे कधीकधी आपण भारावून जाऊ शकतो. इतकंच काय तर यहोवा आपल्याला मदत करेल की नाही अशीसुद्धा शंका आपल्या मनात येऊ शकते. पण बायबल याची खातरी देतं की देवाच्या सामर्थ्याने आपण “तट ओलांडू शकतो.” (स्तो. १८:२९) त्यामुळे अशा शंकांना बळी पडण्याऐवजी आपण पूर्ण विश्वासाने यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल असा भरवसा ठेवला पाहिजे.—याकोब १:६, ७ वाचा.
१०. आपण आपल्या प्रार्थनेप्रमाणे काम कसं करू शकतो? समजावून सांगा.
१० आपण आपल्या प्रार्थनेप्रमाणे काम करावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. उदाहरणार्थ, अधिवेशनाला जाता यावं म्हणून एक भाऊ त्याच्या मालकाला सुट्टीसाठी विनंती करेल. यहोवा या भावाच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देईल? तो कदाचित त्या भावाला त्याच्या मालकाशी बोलण्यासाठी लागणारी हिंमत देईल. पण असं असलं तरीसुद्धा त्या भावाला मालकाशी बोलावं लागेल. कदाचित त्याला हे पुन्हापुन्हा करावं लागेल. किंवा कदाचित दुसऱ्या एका कर्मचाऱ्यासोबत त्याला कामाची वेळ बदलून घ्यावी लागेल. किंवा गरज असेल तर तो त्याच्या मालकाकडे सुट्टी मागून त्या दिवसाचा पगार कापण्याची विनंतीही करेल.
११. आपण आपल्या मागण्यांबद्दल यहोवाला पुन्हापुन्हा प्रार्थना का केली पाहिजे?
११ आपल्या मागण्यांबद्दल आपण यहोवाला पुन्हापुन्हा प्रार्थना करावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (१ थेस्सलनी. ५:१७) येशूच्या शब्दांवरून कळून येतं की आपल्या काही मागण्या लगेच पूर्ण होणार नाहीत. (लूक ११:९) म्हणून आपण हार न मानता कळकळीने आणि पुन्हापुन्हा प्रार्थना केली पाहिजे. (लूक १८:१-७) आपण जर असं करत राहिलो तर आपण हे दाखवून देऊ, की फक्त हुक्की आली म्हणून आपण प्रार्थना करत नाही, तर ज्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतोय ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तसंच यहोवा आपल्याला मदत करू शकतो या गोष्टीवर आपला विश्वास आहे हेसुद्धा त्यातून दिसून येईल.
कधीकधी आपल्याला वाटतं त्यापेक्षा वेगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करण्याची का गरज पडू शकते?
१२. (क) आपण आपल्या प्रार्थनांबद्दल स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे आणि का? (ख) आपल्या प्रार्थनांमुळे यहोवाचा आदर होतोय या गोष्टीची आपण खातरी कशी करू शकतो? (“माझ्या प्रार्थनांवरून दिसून येतं का, की मी यहोवाचा आदर करतोय?” ही चौकट पाहा.)
१२ आपल्याला जेव्हा आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही तेव्हा आपण स्वतःला तीन प्रश्न विचारले पाहिजेत. पहिला, ‘मी योग्य गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे का?’ बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की ‘माझ्यासाठी योग्य काय हे मला माहीत आहे.’ पण आपण ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतोय तिचा जास्त काळ कदाचित आपल्याला फायदा होणार नसेल. आपण कदाचित यहोवाने एका विशिष्ट मार्गाने आपली समस्या सोडवावी म्हणून त्याला प्रार्थना करत असू. पण त्या समस्येवर यापेक्षाही चांगला उपाय असू शकतो. शिवाय असंही होऊ शकतं, की आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय, ती कदाचित यहोवाच्या इच्छेप्रमाणे नसेल. (१ योहा. ५:१४) उदाहरणार्थ, आधी उल्लेख केलेल्या आईवडिलांचाच विचार करा. त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली होती, की त्यांच्या मुलाने सत्यात टिकून राहावं. त्यांनी यहोवाकडे केलेली ही प्रार्थना योग्य आहे, असं कदाचित आपल्याला वाटेल. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की यहोवा कोणावरही त्याची सेवा करायची जबरदस्ती करत नाही. तर आपण सर्वांनी, यात आपली मुलंसुद्धा येतात, स्वतःहून त्याची उपासना करण्याचं निवडावं असं त्याला वाटतं. (अनु. १०:१२, १३; ३०:१९, २०) म्हणून आईवडिलांनी खरंतर यहोवाला अशी प्रार्थना करायला पाहिजे, की त्याने त्यांच्या मुलाच्या मनापर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करावी, म्हणजे यहोवावर प्रेम करायला आणि त्याचा मित्र बनायला ते त्याला प्रोत्साहन देऊ शकतील.—नीति. २२:६; इफिस. ६:४.
१३. १ पेत्र ५:६, ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्याला केव्हा मदत करेल? स्पष्ट करा.
१३ दुसरा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, तो म्हणजे ‘यहोवाच्या दृष्टिकोनातून, माझ्या प्रार्थनांचं उत्तर देण्याची ही योग्य वेळ आहे का?’ कधीकधी आपल्याला असं वाटेल की आपल्या प्रार्थनेचं यहोवाने आपल्याला लगेच उत्तर द्यावं. पण आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्याची योग्य वेळ यहोवाला माहीत आहे. (१ पेत्र ५:६, ७ वाचा.) आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर मिळत नाही, तेव्हा कदाचित आपण असा विचार करू की माझ्या प्रार्थनेला यहोवाचं उत्तर ‘नाही’ असं आहे. पण यहोवाला कदाचित ‘आत्ताच नाही’ असं म्हणायचं असेल. उदाहरणार्थ, आधी उल्लेख केलेल्या त्या तरुण भावाचा विचार करा, ज्याने आपला आजार बरा व्हावा म्हणून यहोवाला प्रार्थना केली होती. यहोवाने जर त्याला चमत्कारिकपणे बरं केलं असतं, तर सैतान असा दावा करू शकला असता की तो भाऊ त्याला बरं केलं म्हणून यहोवाची सेवा करत आहे. (ईयो. १:९-११; २:४) यासोबतच आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की सगळे आजार बरे करण्यासाठी यहोवाने एक वेळ ठरवली आहे. (यश. ३३:२४; प्रकटी. २१:३, ४) आणि तोपर्यंत यहोवाने आपल्याला चमत्कारिकपणे बरं करावं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. म्हणून त्या भावाने खरंतर यहोवाला अशी प्रार्थना करायला पाहिजे होती, की यहोवाने हे आजारपण सहन करायला आणि विश्वासूपणे त्याची सेवा करत राहायला त्याला बळ द्यावं आणि मनाची शांती द्यावी.—स्तो. २९:११.
१४. जॅनिसच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
१४ जॅनिसचं उदाहरण आठवा. तिने बेथेल सेवेला जाता यावं म्हणून यहोवाला प्रार्थना केली होती. पण पाच वर्षांचा काळ गेल्यानंतर यहोवाने तिच्या प्रार्थनेचं कसं उत्तर दिलं हे तिला समजलं. ती म्हणते: “मला बऱ्याच गोष्टी शिकवण्यासाठी आणि माझ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी यहोवाने त्या काळाचा उपयोग केला. मला त्याच्यावरचा विश्वास आणखी वाढवण्याची गरज होती. तसंच, व्यक्तिगत अभ्यासामध्ये मला आणखी सुधारणा करण्याची गरज होती. शिवाय मला हेही शिकायची गरज होती, की माझा आनंद मी कुठे सेवा करते या गोष्टीवर अवलंबून नाही.” नंतर, जॅनिस आणि तिच्या पतीला विभागीय कार्यात सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. मागच्या गोष्टी आठवून जॅनिस म्हणते, “यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. पण मी अपेक्षा केली होती त्या पद्धतीने नाही. पण यहोवाने किती सुंदर रितीने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं होतं हे समजून घ्यायला मला वेळ लागला. यहोवाचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्याला माझी किती काळजी आहे हे मला अनुभवता आलं, त्याबद्दल मी खरंच त्याचे खूप आभार मानते.”
जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही असं वाटत असेल, तर इतर गोष्टींसाठी प्रार्थना करायचा विचार करा (परिच्छेद १५ पाहा)f
१५. प्रार्थना करताना आपण आपला दृष्टिकोन व्यापक का ठेवला पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)
१५ तिसरा प्रश्न आपण स्वतःला असा विचारू शकतो, की ‘मी विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थना करतो का?’ विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थना करणं जरी चांगलं असलं तरी आपल्याबाबतीत यहोवाची काय इच्छा आहे हे जाणून घेण्यासाठी प्रार्थना करताना आपला दृष्टिकोन व्यापक असला पाहिजे. आता अविवाहित असलेल्या त्या बहिणीचा विचार करा, जिने सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी यहोवाला प्रार्थना केली होती. गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठीच तिला या प्रशालेला हजर राहायचं होतं. त्यामुळे या गोष्टीसाठी विनंती करत असतानाच, ती तिची सेवा वाढवण्यासाठी आणखी कोणते मार्ग आहेत, हे ओळखायलासुद्धा विनंती करू शकते. (प्रे. कार्यं १६:९, १०) मग त्या प्रार्थनेप्रमाणे कार्य करून ती तिच्या विभागीय पर्यवेक्षकाला जवळपासच्या मंडळ्यांमध्ये पायनियरची गरज आहे का, असं विचारू शकते. किंवा दुसऱ्या एखाद्या मंडळीत प्रचारकांची जास्त गरज आहे का हे विचारण्यासाठी ती शाखा कार्यालयाला पत्र लिहू शकते.e
१६. आपण कोणत्या गोष्टीची खातरी ठेवू शकतो?
१६ आपण हेच शिकलो की यहोवा आपल्या प्रार्थनांचं नेहमी न्यायीपणे आणि प्रेमळपणे उत्तर देईल अशी खातरी आपण बाळगू शकतो. (स्तो. ४:३; यश. ३०:१८) कधीकधी आपल्याला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळणार नाही. पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की यहोवा आपल्या प्रार्थनांकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. कारण त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो कधीच आपल्याला सोडणार नाही. (स्तो. ९:१०) म्हणून “नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवा” आणि प्रार्थनेत त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा.—स्तो. ६२:८.
गीत ४३ उपकारस्तुतीची प्रार्थना
a यहोवा आपल्या प्रार्थनांचं नेहमी न्यायीपणे आणि प्रेमळपणे उत्तर देईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो? या प्रश्नाचं उत्तर या लेखातून आपल्याला मिळेल.
b नाव बदलण्यात आलं आहे.
c टेहळणी बुरूज फेब्रुवारी २०२२ च्या अंकातला “यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवा” या लेखाचे परिच्छेद ३-६ पाहा.
d यहोवा आपल्याला कठीण समस्यांचा सामना करायला कशी मदत करतो याबद्दल जास्त माहितीसाठी jw.org वर प्रार्थनेमुळे मदत होते हा व्हिडिओ पाहा.
e तुम्हाला दुसऱ्या देशात जाऊन सेवा करायची इच्छा असेल, तर जास्त माहितीसाठी यहोवा की मरज़ी पूरी करने के लिए संगठित या हिंदीतल्या पुस्तकाचा अध्याय १० परिच्छेद ६-९ पाहा.
f चित्राचं वर्णन: दोन बहिणी सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरण्याआधी प्रार्थना करत आहेत. नंतर, त्यांच्यापैकी एकीला प्रशालेला बोलवलं जातं, तर दुसरीला बोलवलं जात नाही. ज्या बहिणीला प्रशालेचं आमंत्रण मिळत नाही ती जास्त निराश होत नाही, तर आपली सेवा वाढवण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत, हे ओळखता यावं म्हणून यहोवाला प्रार्थना करते. त्यानंतर ती गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायच्या आपल्या इच्छेबद्दल शाखा कार्यालयाला पत्र लिहिते.