ख्रिस्ती जीवन
JW.ORG वेबसाईटच्या होम पेजचा प्रचारात वापर करा
आपल्या वेबसाईटच्या होम पेजवर प्रामाणिक मनाच्या लोकांना आवडतील असे बरेच लेख आणि व्हिडिओ आहेत. (प्रेका १३:४८) तिथे सहसा बातम्यांमध्ये किंवा चर्चेत असलेले विषय दिलेले असतात.
तुम्ही jw.org वेबसाईटच्या होम पेजचा प्रचारात कसा वापर करू शकता?
वेबसाईट नियमितपणे उघडून पाहत जा. होम पेजवर “निवडक” या शीर्षकाखाली कोणते विषय आहेत ते पाहा. आणि आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्ही ते कसे वापराल याचा विचार करा. (“निवडक” या शीर्षकाखाली कोणतं साहित्य अलीकडे टाकण्यात आलं होतं ते पाहण्यासाठी “आणखी पाहा” यावर क्लिक करा.) वेबसाईटवर कोणती नवीन माहिती आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर प्रचार करण्यासाठी आपल्याला नवनवीन विषय मिळतील.
संभाषण सुरू करण्यासाठी “निवडक” या शीर्षकाखाली असलेले लेख आणि व्हिडिओ वापरा. क्षेत्रातले लोक काय विचार करत असतील याचा अंदाज आपल्याला यात दिलेल्या साहित्यांतून मिळू शकतो.
वेबसाईटचं होम पेज लोकांना दाखवा. काही विशिष्ट विषय दाखवा आणि वेबसाईटवर माहिती कशी शोधायची ते समोरच्या व्यक्तीला दाखवा.
लिंक पाठवा. काही लोकांना आपल्याशी समोरासमोर बोलायला आवडत नाही. पण ते आपल्या वेबसाईटला भेट द्यायला तयार असतात. त्यामुळे होम पेजची, त्यावर असलेल्या एखाद्या लेखाची किंवा व्हिडिओची लिंक आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला पाठवायला संकोच करू नका.