जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
१-७ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास १७-१९
“इतरांना यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा”
बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून तुम्ही बोध घेणार का?
७ आता आपण आसाचा मुलगा यहोशाफाट याच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ. यहोशाफाट राजामध्ये असे बरेच चांगले गुण होते ज्यांमुळे यहोवाचं मन आनंदित झालं. जेव्हा तो यहोवावर निर्भर राहिला तेव्हा त्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या. पण, त्याने आपल्या जीवनात काही चुकीचे निर्णयदेखील घेतले. उदाहरणार्थ, त्याने आपल्या मुलाचं लग्न अहाब या दुष्ट राजाच्या मुलीशी लावून दिलं. तसंच, तो अहाब राजासोबत मिळून अरामी लोकांविरुद्ध लढण्यास गेला. खरंतर, यहोवाचा संदेष्टा मीखाया याने त्याला युद्धात न जाण्याविषयी ताकीद दिली होती. पण, यहोशाफाटाने त्याचं ऐकलं नाही. जेव्हा तो युद्धात गेला तेव्हा अरामी लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. (२ इति. १८:१-३२) नंतर जेव्हा तो यरुशलेमेत पोचला, तेव्हा येहू संदेष्ट्याने त्याला विचारलं: “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यांवर प्रीती करावी काय?”—२ इतिहास १९:१-३ वाचा.
टेहळणी बुरूज१५ ८/१५ ११-१२ ¶८-९
यहोवाचं असीम प्रेम विसरू नका
८ यहोवाचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे, ही गोष्ट आपल्याला समजावी असं त्याला वाटतं. तो आपल्यात असणाऱ्या कमतरता नव्हे तर चांगल्या गोष्टींना पाहतो. (२ इति. १६:९) उदाहरणार्थ, यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींना यहोवानं कसं पाहिलं याचा विचार करा. इस्राएलचा राजा अहाब, रामोथ-गिलादमधील अरामाच्या सैन्याविरुद्ध लढाई करणार होता. यात त्याला साथ देण्याचा चुकीचा निर्णय यहोशाफाट राजानं घेतला. या लढाईत अहाब राजा नक्की जिंकेल असं ४०० खोट्या संदेष्ट्यांनी त्याला सांगितलं. पण या लढाईत त्यांचा पराभव होईल असं यहोवाचा संदेष्टा मीखाया यानं यहोशाफाट आणि अहाब यांना सांगितलं आणि तसंच झालं. या लढाईत अहाब राजाचा मृत्यू झाला आणि यहोशाफाट राजा कसाबसा त्यातून वाचला. या लढाईनंतर, यहोवानं येहूचा वापर करून यहोशाफाट राजानं केलेल्या चुकीबद्दल त्याची कानउघडणी केली. पण “तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत” असंदेखील येहूनं त्याला सांगितलं.—२ इति. १८:४, ५, १८-२२, ३३, ३४; १९:१-३.
९ याच्या काही वर्षांआधी, यहोशाफाटानं आपले सर्व सरदार, लेवी आणि याजकांना यहूदाच्या सर्व नगरांमध्ये जाऊन यहोवाच्या आज्ञा शिकवण्याचा हुकूम दिला होता. याचा परिणाम इतका चांगला झाला, की आसपासच्या राज्यातील लोकांनाही यहोवाची ओळख झाली. (२ इति. १७:३-१०) नंतर जेव्हा यहोशाफाट राजानं चुकीचा निर्णय घेतला तेव्हा, त्यानं केलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण यहोवानं केली. आपणही कधीकधी चुकतो. पण हे उदाहरण आपल्याला किती दिलासा देणारं आहे! यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याकडून होईल तितकं करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण केलेल्या चांगल्या गोष्टी तो कधीच विसरणार नाही, याची पक्की खात्री आपण बाळगू शकतो.
आध्यात्मिक रत्नं
यहोवाची पूर्ण हृदयाने सेवा करा!
१० यहोशाफाट याची “चालचलणूक त्याचा बाप आसा याच्याप्रमाणे होती.” (२ इति. २०:३१, ३२) आपल्या पित्याप्रमाणेच यहोशाफाटाने लोकांना यहोवाची उपासना करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं. यहूदा राज्यातील लोकांना शिकवण्यासाठी त्याने काही पुरुषांना “परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ” घेऊन पाठवलं. (२ इति. १७:७-१०) इतकंच नाही तर लोकांना यहोवाकडे परत येण्यास मदत करण्यासाठी, तो इस्राएल राज्याच्या उत्तरेकडे असलेल्या एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत गेला. (२ इति. १९:४) यहोशाफाट एक असा राजा होता ज्याने आपल्या पूर्ण मनाने यहोवाचा शोध केला.—२ इति. २२:९.
११ आजदेखील यहोवाची इच्छा आहे, की जगभरातील लोकांना त्याच्याबद्दल शिकवलं जावं. आणि खरंतर या कामात आपण सर्व जण हातभार लावू शकतो. प्रत्येक महिन्यात शिकवण्याच्या या कार्यात सहभागी होण्याचं ध्येयं तुम्ही ठेवलं आहे का? इतरांनीही यहोवाची उपासना करण्यास सुरवात करावी म्हणून त्यांना बायबल शिकवायला तुम्हाला आवडेल का? असं करता यावं म्हणून तुम्ही प्रार्थना करता का? आणि जर एखादा बायबल अभ्यास तुम्हाला मिळाला, तर तो घेण्यासाठी तुम्ही तुमचा वैयक्तिक वेळ खर्च करण्यास तयार आहात का? एखादा बायबल अभ्यास सुरू करता यावा यासाठी तुम्ही जर मेहनत घेत असाल, तर यहोवा तुम्हाला नक्कीच मदत करेल. यहोवाची उपासना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी यहोशाफाटाने ज्या प्रकारे लोकांना मदत केली, त्या प्रकारे तुम्हीही अक्रियाशील झालेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू शकता. तसंच, ज्यांनी पाप करण्याचं सोडून दिलं आहे अशा बहिष्कृत झालेल्या लोकांना मंडळीतील वडील भेटण्याची व्यवस्था करू शकतात आणि त्यांना मदत करू शकतात.
८-१४ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास २०-२१
“तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा”
या दुष्ट जगाच्या अंताचा एकत्र मिळून सामना करू या!
८ यहोशाफाट राजाच्या काळात एका मोठ्या व शक्तिशाली सैन्याने देवाच्या लोकांवर हल्ला केला. (२ इति. २०:१, २) देवाच्या सेवकांनी स्वतःच्या शक्तीने या शत्रूंवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तर, त्यांनी यहोवाकडे मदत मागितली. (२ इतिहास २०:३, ४ वाचा.) पण, प्रत्येकाने त्याला योग्य वाटेल त्यानुसार स्वतंत्रपणे असे केले नाही. बायबलमध्ये असे सांगितले आहे: “तेव्हा सर्व यहुदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले.” (२ इति. २०:१३) सर्व तरुण व वृद्ध इस्राएली लोकांनी यहोवावर भरवसा ठेवला व त्याच्या मार्गदर्शनाचे पालन केले. यामुळे, यहोवाने त्यांचे संरक्षण केले. (२ इति. २०:२०-२७) देवाच्या लोकांनी संकटांचा सामना कसा करावा याचे हे किती चांगले उदाहरण आहे!
नवीन जोडप्यांनो—यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या
७ यहोवाने यहजिएल नावाच्या एक लेव्याचा वापर करून यहोशाफाटला असं सांगितलं: “तुम्ही फक्त आपल्या जागी स्थिर उभे राहा आणि यहोवा तुम्हाला कसं वाचवेल ते पाहा.” (२ इति. २०:१३-१७) ही गोष्ट खूपच वेगळी होती. कारण युद्धात कोणीही नुसतंच उभं राहत नाही, त्याला लढावंच लागतं. पण यहोशाफाटला हे कोणत्या माणसाने नाही, तर स्वतः यहोवाने सांगितलं होतं. त्यामुळे यहोशाफाटने यहोवाच्या शब्दांवर भरवसा ठेवून जसं सांगितलं होतं तसंच केलं. तो आणि त्याचे लोक शत्रूंचा सामना करायला गेले तेव्हा त्याने आपल्या सैन्यासमोर शूर योद्ध्यांना नाही, तर यहोवाची स्तुती करणाऱ्या लेव्यांना ठेवलं. त्या लेव्यांच्या हातांत कोणतंही शस्त्र नव्हतं. यहोशाफाटने दाखवलेला हा भरवसा यहोवाने वाया जाऊ दिला नाही. त्याने शत्रूच्या सैन्यांचा नाश केला.—२ इति. २०:१८-२३.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ १२७१ ¶१-२
यहोराम
यहोरामने जितका काळ राज्य केलं, त्या संपूर्ण काळात त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. आधी अदोमने आणि नंतर लिब्नाने यहूदाविरुद्ध बंड केलं. (२रा ८:२०-२२) एलीयाने त्याला सांगितलं होतं, की “यहोवा तुझ्या बायका-मुलांवर आणि तुझ्या लोकांवर संकट आणेल आणि तुझ्या संपूर्ण मालमत्तेचा नाश करेल. आणि तुला अनेक आजार होऊन भयंकर त्रास होईल. आणि तुला आतड्यांचाही रोग होईल आणि तो दिवसेंदिवस इतका वाढेल, की शेवटी तुझी आतडी बाहेर पडतील.”—२इत २१:१२-१५.
आणि नेमकं हेच झालं. यहोवाने अरबी आणि पलिष्टी लोकांना लगेच देशाचा ताबा घेऊ दिला. आणि त्यांनी यहोरामच्या बायका-मुलांना बंदी बनवून नेलं. मग दोन वर्षांनी “त्याची आतडी बाहेर आली” आणि तो शेवटी मेला.—२इत २१:७, १६-२०; २२:१; १इत ३:१०, ११.
१५-२१ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास २२-२४
“धाडस दाखवणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद देतो”
वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
देवाचे मंदिर असलेल्या शहरात अर्थात जेरूसलेमेत तो भयंकर काळ होता. राजा अहज्या याची नुकताच हत्या झाली होती. यानंतर, त्याची आई अथल्या हिने एक अतिशय वाईट काम केले. तिने तिच्या स्वतःच्या नातवांची म्हणजे अहज्याच्या पुत्रांची हत्या करवली! कशासाठी माहीत आहे?—त्यांच्याऐवजी तिला राणी होता यावे म्हणून.
पण अथल्याचा एक नातू, बाळ यहोआश मात्र त्याच्या दुष्ट आजीच्या तावडीतून सुटतो. त्याच्या आजीला हे माहीतही होत नाही. कसे काय माहीत आहे?—त्याचे असे होते, की त्या बाळाची एक आत्या असते जिचे नाव यहोशेबा होते. ती बाळ यहोआशला देवाच्या मंदिरात लपवून ठेवते. ती त्याला मंदिरात लपवून ठेवू शकली कारण तिचा नवरा यहोयादा तिथे महायाजक होता. अशा प्रकारे ते दोघं नवरा-बायको यहोआशला तिथे सुरक्षित ठेवतात.
वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
सहा वर्षांपर्यंत यहोआश मंदिरातच लहानाचा मोठा होतो; कोणालाच त्याचा थांगपत्ता लागत नाही. तेथे त्याला यहोवा देवाविषयी आणि त्याच्या नियमांचे शिक्षण दिले जाते. शेवटी, सात वर्षांचा झाल्यावर यहोयादा, यहोआशला राजा बनवण्याचे ठरवतो. तो हे कसे करतो आणि यहोआशची दुष्ट आजी राणी अथल्या हिचे काय होते याविषयी तुम्हाला आणखी ऐकायचे आहे का?—
बरं, यहोयादा, त्या काळी जेरुसलेमच्या राजांच्या खास अंगरक्षकांची एक गुप्त सभा भरवतो. आपण राजा अहज्या याच्या एका पुत्राला कसे वाचवले ते तो त्यांना सांगतो. आणि मग, यहोआशला त्यांच्यासमोर आणतो. हाच जेरूसलेमच्या राजगादीचा खरा वारस आहे हे अंगरक्षक लगेच ओळखतात. आणि मग ते सर्व मिळून एक योजना आखतात.
यहोयादा एके दिवशी यहोआशला लोकांसमोर आणतो आणि त्याच्या डोक्यावर राजमुकूट घालतो. तेव्हा सर्व लोकांनी, “टाळ्यांचा गजर करून म्हटले, ‘राजा चिरायु होवो.’” अंगरक्षक लगेच यहोआशभोवती सुरक्षा कडे उभारतात. काय गोंधळ चालला आहे हे पाहण्यासाठी राणी अथल्या पळतच बाहेर येते. तिला वाटते, की कोणीतरी तिच्याविरुद्ध फितुरी करत आहे म्हणून ती फितुरी रे फितुरी असे ओरडू लागते. तेव्हाच यहोयादाच्या हुकूमावरून अंगरक्षक, राणी अथल्या हिचा वध करतात.—२ राजे ११:१-१६.
इन्साइट-१ ३७९ ¶५
दफन, दफनभूमी
महायाजक यहोयादा याला त्याच्या मृत्यूनंतर एक बहुमान मिळाला. त्याला “दावीदपुरात राजांच्या कबरेत दफन” केलं गेलं. ही एक खास गोष्ट होती, कारण तो राजघराण्यातला नव्हता. बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेला ही एकच व्यक्ती आहे, जिला हा खास बहुमान मिळाला.—२इत २४:१५, १६.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-२ १२२३ ¶१३
जखऱ्या
१२. आपल्या मृत्यूच्या वेळी जखऱ्या म्हणाला: “यहोवाने हे पाहावं आणि तुझ्याकडून याचा हिशोब घ्यावा.” जेव्हा सीरियाच्या सैन्याने यहूदावर हल्ला करून त्याचं मोठं नुकसान केलं आणि जेव्हा यहोआशने ‘यहोयादा याजकाच्या मुलांचं रक्त सांडल्यामुळे,’ यहोआशच्या दोन सेवकांनी त्याला ठार मारलं, तेव्हा जखऱ्याचे हे शब्द पूर्ण झाले.—२इत २४:१७-२२, २५.
२२-२८ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास २५-२७
“यहोवा तुला त्याहून जास्त देऊ शकतो”
इन्साइट-१ १२६६ ¶६
यहोआश
यहूदाचा राजा अमस्या याने अदोमच्या लोकांशी लढण्यासाठी इस्राएलच्या राजाकडून १,००,००० सैनिक भाड्याने मागवले. पण खऱ्या देवाच्या एका माणसाच्या सल्ल्यावरून त्याने त्यांना आपापल्या घरी परत पाठवून दिलं. ही गोष्ट सैनिकांना मुळीच आवडली नाही. ते खूप चिडले, कारण त्यांना जरी आधीच १०० तालान्त चांदी देण्यात आली होती, तरी आता मात्र त्यांना लुटीतल्या मालातलं काहीच मिळणार नव्हतं. ते आपापल्या घरी परत गेले तर खरं, पण नंतर त्यांनी दक्षिणेकडच्या राज्यातल्या शहरांवर हल्ला करून त्यांची लूटमार केली.—२इत २५:६-१०, १३.
यहोवा किती चांगला आहे याचा स्वतः अनुभव घेऊन पाहा
१६ यहोवासाठी त्याग करा. याचा असा अर्थ होत नाही, की यहोवाला खूश करण्यासाठी आपल्याला सगळं काही सोडून द्यावं लागेल. (उप. ५:१९, २०) पण सेवा वाढवण्यासाठी आपण कोणतेही त्याग करायला तयार नसलो तर येशूने दिलेल्या उदाहरणातल्या माणसासारखी चूक आपण करून बसू. जीवनात चांगल्या-चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतली. पण देवासाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. (लूक १२:१६-२१ वाचा.) फ्रान्समध्ये राहणारा क्रिस्टोफर नावाचा एक भाऊ म्हणतो: “यहोवासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी जितका वेळ द्यायला पाहिजे होता तितका देत नव्हतो.” म्हणून त्याने आणि त्याच्या बायकोने पायनियरिंग करायचं ठरवलं. पण ते करण्यासाठी त्या दोघांना आपली नोकरी सोडून द्यावी लागली. आपला खर्च भागवण्यासाठी ते साफसफाईचं काम करू लागले आणि कमी पैशात आनंदी राहायला शिकले. पायनियरिंग करण्यासाठी त्यांनी जे काही त्याग केले त्यांबद्दल त्यांना कसं वाटतं? क्रिस्टोफर म्हणतो: “आम्ही खूप खूश आहोत, कारण आता आम्हाला प्रचारकार्यासाठी भरपूर वेळ देता येतो आणि आम्हाला अनेक चांगल्या पुनर्भेटीही मिळाल्या आहेत. शिवाय, आमच्या बायबल विद्यार्थ्यांना यहोवाबद्दल शिकताना पाहून खूप आनंद होतो.”
आध्यात्मिक रत्नं
टेहळणी बुरूज०७-E १२/१५ १० ¶१-२
आध्यात्मिक प्रगती करायला तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता का?
उज्जीया फक्त १६ वर्षांचा होता तेव्हा तो दक्षिणेकडच्या यहूदा राज्याचा राजा बनला. त्याने ५० हून जास्त वर्षं राज्य केलं. सुरुवातीपासूनच उज्जीया “यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.” तो हे कोणामुळे करू शकला? बायबल म्हणतं: “जखऱ्याने उज्जीयाला खऱ्या देवाचं भय बाळगायला शिकवलं आणि जखऱ्याच्या दिवसांत तो देवाची सेवा करत राहिला. त्याने यहोवाची सेवा केली त्या संपूर्ण काळात, खऱ्या देवाच्या आशीर्वादाने त्याची भरभराट झाली.”—२ इतिहास २६:१, ४, ५.
राजाचा सल्लागार असलेल्या जखऱ्याबद्दल आपल्याला जास्त काही माहीत नाही. पण त्याला ‘खऱ्या देवाचं भय बाळगणारा’ आणि त्याची ‘सेवा करणारा’ असं म्हणण्यात आल्यामुळे तरुण राजा उज्जीयावर योग्य ते करत राहण्यासाठी त्याचा नक्कीच चांगला प्रभाव पडला असेल. द एक्स्पोझिटर बायबल म्हणतं: “जखऱ्या एक अशी व्यक्ती होती जिला शास्त्रवचनं चांगल्या प्रकारे माहीत होती, भरपूर अनुभव होता आणि तो आपल्याकडे असलेलं ज्ञान इतरांना देऊ शकत होता.” शिवाय एका बायबल विद्वानानेसुद्धा जखऱ्याबद्दल असं म्हटलं: “त्याला भविष्यवाण्यांची चांगली समज होती, तो बुद्धिमान, अतिशय धार्मिक आणि चांगला व्यक्ती होता. आणि यामुळे नक्कीच त्याचा उज्जीयावर चांगला प्रभाव पडला असावा.”
२९ मे–४ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास २८-२९
“आईवडिलांचा पाठिंबा नसला, तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता”
यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
८ हिज्कीयाची पार्श्वभूमी रूथपेक्षा खूपच वेगळी होती. देवाला समर्पित असलेल्या राष्ट्रात त्याचा जन्म झाला होता. पण, या समर्पित राष्ट्रातील सर्वच इस्राएली लोक देवाला विश्वासू नव्हते. हिज्कीयाचा पिता, राजा आहाज हा खूप दुष्ट होता. त्यानं देवाच्या मंदिराचा अनादर केला आणि लोकांना इतर देवतांची उपासना करण्यास प्रवृत्त केलं. इतकंच नव्हे तर त्यानं आपल्या काही मुलांना खोट्या देवासमोर अर्पण म्हणून जिवंत जाळलं. हिज्कीयाचं बालपण खरंच खूप भयानक होतं!—२ राजे १६:२-४, १०-१७; २ इति. २८:१-३.
यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
९ तसं पाहायला गेलं तर आहाजाच्या वाईट उदाहरणाचा परिणाम हिज्कीयावर व्हायला हवा होता. आणि त्यानं पाहिलेल्या वाईट गोष्टींमुळे त्याच्या मनात यहोवाविषयी राग उत्पन्न होऊन त्यानंदेखील यहोवाकडे पाठ फिरवायला हवी होती. हिज्कीयाप्रमाणे आजही काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या हिज्कीयाला सहन कराव्या लागलेल्या समस्यांपेक्षा कमी असल्या, तरी त्यांना असं वाटतं की यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर “रुष्ट” होण्यासाठी हे पुरेसं कारण आहे. (नीति. १९:३) इतर काही जणांना असं वाटतं की त्यांच्या कुटुंबाच्या वाईट पार्श्वभूमीचा त्यांच्यावर परिणाम होईल आणि तेही त्यांच्या आईवडिलांनी केलेल्या चुका पुन्हा करतील. (यहे. १८:२, ३) असा विचार करणं तुम्हाला तर्कशुद्ध वाटतं का?
१० हिज्कीयाच्या जीवनावरून हे सिद्ध होतं की असा विचार करणं नक्कीच चुकीचं आहे. खरंतर, यहोवावर नाराज होण्यासाठी आपण एकही योग्य कारण पुढे करू शकत नाही. लोकांसोबत होणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीला तो कारणीभूत नाही. (ईयो. ३४:१०) हे खरं आहे की आईवडील आपल्या मुलांना चांगल्या किंवा वाईट गोष्टी शिकवू शकतात. (नीति. २२:६; कलस्सै. ३:२१) पण, म्हणून आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती बनणार हे आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरत नाही. कारण, यहोवानं आपल्याला इच्छास्वातंत्र्याची देणगी दिली आहे. त्यामुळे, चांगलं करायचं की वाईट हे आपण स्वतःच ठरवू शकतो. (अनु. ३०:१९) पण, या मौल्यवान देणगीचा हिज्कीयानं कसा वापर केला?
११ हिज्कीयाचा पिता यहुदाचा सर्वात वाईट राजा ठरला. पण, हिज्कीया मात्र सर्वात चांगल्या राजांपैकी एक होता. (२ राजे १८:५, ६ वाचा.) त्यानं आपल्या पित्याच्या वाईट उदाहरणाचं अनुकरण केलं नाही. याउलट, यशया, मीखा आणि होशे या यहोवाच्या संदेष्ट्यांचं त्यानं काळजीपूर्वक ऐकलं. त्यांनी दिलेला सल्ला आणि सुधारणा यांकडेही त्यानं लक्ष दिलं. त्यामुळेच, आपल्या पित्यानं निर्माण केलेल्या अनेक समस्यांना सोडवण्यास तो प्रवृत्त झाला. त्यानं देवाचं मंदिर शुद्ध केलं, लोकांच्या पापांसाठी यहोवाकडे क्षमा मागितली आणि देशात असलेल्या मूर्ती नष्ट केल्या. (२ इति. २९:१-११, १८-२४; ३१:१) नंतर, जेव्हा सन्हेरीब या अश्शूरच्या राजानं यरुशलेमवर हल्ला करण्याची धमकी दिली तेव्हा हिज्कीयानं अप्रतिम धैर्य आणि विश्वास दाखवला. यहोवा आपलं संरक्षण करेल असा भरवसा त्याला होता आणि त्यानं आपल्या लोकांचंही धैर्य वाढवलं. (२ इति. ३२:७, ८) पुढे एक वेळ अशी आली जेव्हा हिज्कीयाच्या मनात गर्व आला. पण, यहोवानं त्याची कानउघडणी केली तेव्हा त्यानं नम्रपणे ती स्वीकारली. (२ इति. ३२:२४-२६) खरंच हिज्कीयाचं उदाहरण आपल्यासाठी नक्कीच अनुकरण करण्याजोगं आहे. त्याच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे त्यानं स्वतःचं जीवन वाया जाऊ दिलं नाही. उलट, तो यहोवाचा मित्र असल्याचं त्यानं दाखवून दिलं.
आध्यात्मिक रत्नं
नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक
यहोवाचा एक विश्वासू सेवक असल्यामुळे यहोवाच्या उपासनेसाठी सर्वात पहिले स्थायी मंदिर बांधण्याच्या दाविदाच्या इच्छेचे नाथानाने आवेशाने समर्थन केले. पण या प्रसंगी नाथानाने यहोवाचा संदेश देण्याऐवजी स्वतःचे मत व्यक्त केले. त्या रात्री देवाने नाथानाला दावीद राजाला एक वेगळा संदेश द्यायला सांगितले. दावीद यहोवासाठी एक मंदिर बांधणार नाही तर ते बांधणारा त्याचा एक पुत्र असेल. यासोबतच नाथानाने दाविदाला असेही सांगितले की यहोवा त्याच्यासोबत एक करार करत आहे ज्याद्वारे त्याचे राजपद ‘कायमचे स्थापित’ होईल.—२ शमु. ७:४-१६.
देवासाठी मंदिर बांधण्याबाबत नाथानाने दाविदाला आधी जे सांगितले ते देवाच्या इच्छेशी सुसंगत नव्हते. पण नाथानाने नम्रपणे काहीही हरकत न घेता देवाची इच्छा स्वीकारली आणि त्यानुसार कार्य केले. नाथानाने आपल्यासाठी किती चांगले उदाहरण मांडले! देवाने आपल्यालाही एखाद्या बाबतीत सुधार करण्यास सांगितले तर आपणही नाथानाच्या उदाहरणाचे पालन केले पाहिजे. संदेष्टा या नात्याने नाथानाने यानंतर केलेली कार्ये दाखवतात की पुढेही त्याच्यावर यहोवाची मर्जी होती. मंदिरात ४,००० गायक व वादकांना नेमण्याची दाविदाला आज्ञा देण्यास यहोवाने नाथान व द्रष्टा गाद यांना सांगितले असे दिसते.—१ इति. २३:१-५; २ इति. २९:२५.
५-११ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास ३०-३१
“एकत्र येणं आपल्यासाठी चांगलं आहे”
इन्साइट-१ ११०३ ¶२
हिज्कीया
खऱ्या उपासनेसाठी असलेला त्याचा आवेश. वयाच्या २५ व्या वर्षी राजा झाल्या-झाल्या हिज्कीयाने यहोवाच्या उपासनेबद्दल आवेश दाखवला. त्याने सगळ्यात आधी मंदिराचे दरवाजे उघडले आणि ते दुरुस्त केले. मग याजकांना आणि लेव्यांना एकत्र बोलवून तो त्यांना म्हणाला: “मला, इस्राएलचा देव यहोवा याच्याशी एक करार करायची मनापासून इच्छा आहे.” हा यहोवाला विश्वासू राहायचा करार होता. नियमशास्त्राचा करार अजूनही पाळणं गरजेचं होतं. पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे यहोवाला विश्वासू राहायचा करार करून हिज्कीयाने यहूदामध्ये पुन्हा नियमशास्त्राचा करार पाळायला सुरुवात केली. त्याने मोठ्या आवेशाने लेव्यांना, संगितकारांना आणि गीतकारांना मंदिरात पुन्हा सेवा करण्यासाठी संघटित केलं. तो निसान महिना होता, म्हणजे वल्हांडण सण साजरा करण्याचा महिना होता. पण मंदिर तसंच याजक आणि लेवी अजूनही अशुद्ध होते. त्यामुळे निसान महिन्याच्या १६ व्या दिवशी मंदिर शुद्ध करण्यात करण्यात आलं आणि संपूर्ण इस्राएलच्या प्रायश्चित्तासाठी खास बलिदानं देण्यात आली. सर्वात आधी अधिकाऱ्यांनी बलिदानं आणली आणि मग लोकांनी हजारो होमार्पणं दिली.—२इत २९:१-३६.
इन्साइट-१ ११०३ ¶३
हिज्कीया
लोक अशुद्ध असल्यामुळे ते नेहमीच्या वेळी वल्हांडण सण साजरा करू शकत नव्हते. त्यामुळे हिज्कीयाने नियमशास्त्रातल्या एका आज्ञेचा फायदा घेतला. या आज्ञेनुसार, अशुद्ध असलेले लोक एक महिन्यानंतर वल्हांडण सण साजरा करू शकत होते. मग हा सण साजरा करण्यासाठी हिज्कीयाने आपल्या दूतांच्या (धावणाऱ्यांच्या) हातून पत्रं पाठवून फक्त यहूदाच्याच नाही, तर इस्राएलच्या लोकांनाही वल्हांडण सणासाठी बोलवलं. इस्राएलमधल्या बऱ्याच लोकांनी या दूतांची थट्टा केली. पण अश्शेर, मनश्शे आणि जबुलून इथले लोक नम्र होऊन यरुशलेमला आले. एफ्राईम आणि इस्साखारमधले काही लोकसुद्धा आले. यांशिवाय, इस्राएली नसलेले यहोवाचे बरेच उपासकही तिथे आले. उत्तरेकडच्या राज्यातल्या लोकांना सणाला उपस्थित राहून खऱ्या उपासनेच्या बाजूने उभं राहणं खरंच सोपं नव्हतं. राजाने पाठवलेल्या दूतांसारखंच या लोकांचीही थट्टा आणि विरोध झाला असेल. कारण इस्राएलच्या दहा वंशाच्या राज्यातले लोक खोट्या उपासनेत पार बुडून गेले होते.—२इत ३०:१-२०; गण ९:१०-१३.
इन्साइट-१ ११०३ ¶४-५
हिज्कीया
वल्हांडण सणानंतर सात दिवसांसाठी इस्राएलमध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यात आला. या सणासाठी आलेले लोक इतक्या आनंदात होते, की त्यांनी हा सण आणखी ७ दिवस पाळायचा ठरवला. “इस्राएलचा राजा दावीद याच्या मुलाच्या, म्हणजे शलमोनच्या काळापासून आतापर्यंत यरुशलेममध्ये असं कधीही झालं नव्हतं. म्हणून यरुशलेममध्ये लोक मोठा जल्लोष करत होते.”—२इत ३०:२१-२७.
त्यांना झालेला आनंद हा खरा आणि मनापासून होता, हे पुढे झालेल्या गोष्टींवरून आपल्याला कळतं. कारण त्यांनी घरी परतण्याआधी संपूर्ण यहूदा, बन्यामीन, आणि इतकंच नाही तर एफ्राईम आणि मनश्शेच्या प्रदेशातल्या पूजेच्या स्तंभांचा चुराडा केला, उच्च स्थानं आणि वेदी पाडून टाकल्या आणि पूजेचे खांब तोडून टाकले. (२इत ३१:१) तसंच, मोशेने जो तांब्याचा साप बनवला होता त्याचाही हिज्कीया राजाने चुराडा केला. कारण त्या काळापर्यंत, इस्राएली लोक त्याची पूजा करत होते. (२रा १८:४) या सगळ्या गोष्टींमुळे खरी उपासना पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सुरू झाली. या मोठ्या सणानंतर शुद्ध उपासना अशीच सुरू राहावी त्यासाठीही हिज्कीया राजाने पावलं उचलली. त्याने यरुशलेममधल्या लोकांना अशी आज्ञा दिली की त्यांनी याजक आणि लेव्यांना त्यांच्या हक्काचा भाग द्यावा. आणि अशा प्रकारे त्याने याजक आणि लेव्यांची व्यवस्था लावून दिली.—२इत ३१:२-१२.
आध्यात्मिक रत्नं
या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल
१४ आपण नम्र आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इतरांचं लक्षपूर्वक ऐकणं. याकोब १:१९ मध्ये म्हटलं आहे, की आपण “ऐकण्यास उत्सुक” असलं पाहिजे. याबाबतीत यहोवा एक सर्वोत्तम उदाहरण आहे. (उत्प. १८:३२; यहो. १०:१४) हे आपल्याला निर्गम ३२:११-१४ मध्ये दिलेल्या संवादावरून कळतं. (वाचा.) यहोवाला मोशेचं सर्वकाही ऐकून घेण्याची गरज नव्हती तरी त्याने मोशेला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली. तुम्ही कधी अशा व्यक्तीचं लक्षपूर्वक ऐकाल का, जिच्या हातून चूक झाली आहे? आणि मग तिने दिलेले सल्ले तुम्ही लागू कराल का? आपण कदाचित असं करणार नाही. पण विश्वासाने प्रार्थना करणाऱ्या सर्वांचं यहोवा धीराने ऐकतो!
१५ स्वतःला विचारा: ‘यहोवाने अब्राहाम, राहेल, मोशे, यहोशवा, मानोहा, एलीया आणि हिज्कीया यांचं ऐकलं. जर तो इतका नम्र होऊन लोकांचं ऐकतो, तर मीही तसं करण्याचा प्रयत्न करू नये का? शक्य असेल तेव्हा बांधवांनी दिलेले सल्ले ऐकण्याद्वारे आणि ते लागू करण्याद्वारे मी त्यांना आणखी आदर देऊ शकतो का? माझ्या मंडळीत किंवा कुटुंबात कोणी अशी व्यक्ती आहे का, जिला माझ्या मदतीची गरज आहे? तिला मदत करण्यासाठी मी काय करू शकतो?’—उत्प. ३०:६; शास्ते १३:९; १ राजे १७:२२; २ इति. ३०:२०.
१२-१८ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास ३२-३३
“कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या”
इन्साइट-१ २०४ ¶५
अश्शूर
सन्हेरीब. हिज्कीयाने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड केलं. (२रा १८:७) म्हणून सन्हेरीबने यहूदाची ४६ शहरं काबीज केली. (यश ३६:१, २ सोबत तुलना करा) मग लाखीश इथे तळ दिलेला असताना त्याने हिज्कीयाकडे ३० तालान्त सोनं आणि ३०० तालान्त चांदी इतका दंड भरायची मागणी केली. (२रा १८:१४-१६; २इत ३२:१; यश ८:५-८ सोबत तुलना करा) हिज्कीयाने ही मागणी पूर्ण केली तरीसुद्धा सन्हेरीबने माणसं पाठवून कोणत्याही परिस्थितीत त्याला शरण यायला सांगितलं.—२रा १८:१७–१९:३४; २इत ३२:२-२०.
सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
१२ आपण एखादी गोष्ट स्वतःच्या बळावर करू शकत नाही तेव्हा यहोवा आपली मदत करण्यास नेहमीच तयार असतो; पण ज्या गोष्टी करणे आपल्या हातात आहे त्या आपण कराव्यात अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. हिज्कीयाने “आपले सरदार व योद्धे” यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या सर्वांनी मिळून “नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद” करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, “कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुनः बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, . . . आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या.” (२ इति. ३२:३-५) अशा रीतीने त्या काळी आपल्या लोकांचे संरक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने हिज्कीया, त्याचे सरदार आणि विश्वासू संदेष्टे यांसारख्या अनेक धैर्यवान मनुष्यांचा उपयोग केला.
सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
१३ यानंतर हिज्कीयाने जे केले, ते पाण्याचे झरे बंद करण्यापेक्षा व शहराची तटबंदी मजबूत करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे होते. एका चांगल्या मेंढपाळाप्रमाणे हिज्कीयाला आपल्या राज्यातील लोकांची काळजी होती. त्यामुळे त्याने लोकांना एकत्रित करून त्यांना या शब्दांत प्रोत्साहन दिले: “अश्शूरचा राजा व त्याजबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. मांसमय भुजांचा त्यांस आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] आम्हाबरोबर आहे.” हे शब्द ऐकून लोकांचा विश्वास किती दृढ झाला असेल! राजाने त्यांना आठवण करून दिली की खुद्द यहोवा त्यांच्या बाजूने लढणार होता. “यहूदाचा राजा हिज्कीया याच्या या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.” हिज्कीयाने बोललेल्या शब्दांमुळे लोकांचे धैर्य वाढले याकडे लक्ष द्या. यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे हिज्कीया, त्याचे सरदार व योद्धे, तसेच मीखा व यशया यांच्यासारखे संदेष्टे, यांनी चांगले मेंढपाळ बनून लोकांचे मार्गदर्शन केले.—२ इति. ३२:७, ८; मीखा ५:५, ६ वाचा.
आध्यात्मिक रत्नं
खरा पश्चात्ताप म्हणजे काय?
११ काही काळानंतर यहोवाने मनश्शेची प्रार्थना ऐकली. कारण त्याच्या प्रार्थनांवरून यहोवाने पाहिलं, की त्याचं मन बदललं आहे. मनश्शेने जेव्हा त्याच्याकडे दयेची भीक मागितली तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं आणि त्याचं राज्यपद त्याला परत दिलं. राज्यपद परत मिळाल्यावर मनश्शेनेसुद्धा हे दाखवून दिलं, की त्याला मनापासून पश्चात्ताप झाला होता. अहाबने जे केलं नव्हतं ते त्याने केलं. त्याने आपला चुकीचा मार्ग बदलला. देशातून खोटी उपासना काढून टाकण्यासाठी आणि लोकांना खऱ्या उपासनेकडे आणण्यासाठी त्याने पावलं उचलली. (२ इतिहास ३३:१५, १६ वाचा.) हे करण्यासाठी त्याला धैर्याची आणि विश्वासाची खूप गरज होती. कारण कित्येक वर्षं त्याने वाईट कामं केली होती आणि आपल्या कुटुंबासमोर, दरबारातल्या लोकांसमोर आणि प्रजेसमोर त्याचं वाईट उदाहरण होतं. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने आपल्या काही चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि याचाच त्याचा नातू योशिया याच्यावर चांगला परिणाम झाला असावा. कारण तो नंतर एक खूप चांगला राजा बनला.—२ राजे २२:१, २.
१२ मनश्शेच्या उदाहरणातून आपण काय शिकतो? तो यहोवासमोर फक्त नम्र झाला नाही, तर त्याने आणखी बरंच काही केलं. त्याने यहोवाकडे प्रार्थना केली. त्याच्याकडे दयेची भीक मागितली. आपला चुकीचा मार्ग सोडून दिला आणि केलेल्या चुका सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केला. तो पुन्हा यहोवाची उपासना करू लागला आणि इतरांनाही तीच गोष्ट करायला त्याने मदत केली. ज्यांनी आपल्या जीवनात फार वाईट कामं केली आहेत त्यांना मनश्शेच्या उदाहरणातून खूप मदत होऊ शकते. कारण त्याच्या उदाहरणातून हे दिसून येतं, की यहोवा किती “चांगला आणि क्षमाशील” आहे! (स्तो. ८६:५) जे खरा पश्तात्ताप करतात त्यांना तो नक्की क्षमा करेल.
१९-२५ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास ३४-३६
“देवाच्या वचनाचा तुम्ही पूर्ण फायदा घेत आहात का?”
इन्साइट-१ ११५७ ¶४
हुल्दा
नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी ऐकल्यावर, याबद्दल यहोवाचं मार्गदर्शन काय आहे हे योशीयाला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्याने हुल्दा संदेष्टीकडे काही माणसांना पाठवलं. तेव्हा तिने यहोवाचा संदेश त्यांना सांगितला. तो संदेश असा होता, की या पुस्तकात सांगितलेली सगळी संकटं इस्राएलमधल्या धर्मत्यागी लोकांना सोसावी लागतील. पुढे हुल्दाने असंही म्हटलं, की ही सगळी संकटं योशीया जीवनकाळात येणार नाहीत, कारण तो यहोवासमोर नम्र झाला होता..—२रा २२:८-२०; २इत ३४:१४-२८.
यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी असा!
२० योशीया राजाने देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे कार्य सुरू केल्यावर, मुख्य याजक हिल्कीयाला ‘मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.’ त्याने तो ग्रंथ राजाचा चिटणीस शाफान याला दिला आणि शाफानाने तो राजा योशीयाला वाचून दाखवला. (२ इतिहास ३४:११-२१ वाचा.) याचा काय परिणाम झाला? राजाने तो ऐकताच दुःखित होऊन आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या सेवकांना यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्याची आज्ञा दिली. संदेष्ट्री हुल्दा हिने देवाकडून आलेला संदेश सांगितला. यात यहूदात चालत असलेल्या खोट्या उपासनेची निंदा करण्यात आली होती. पण या मूर्तिपूजक प्रथा बंद करण्यासाठी योशीयाने केलेल्या प्रयत्नांची मात्र यहोवाने दखल घेतली. त्यामुळे, सबंध राष्ट्रावर जरी संकटे येतील असे भाकीत करण्यात आले तरी योशीयावर मात्र यहोवाची कृपा राहणार होती. (२ इतिहास ३४:१९-२८) यावरून आपण काय शिकू शकतो? नक्कीच आपणही योशीयासारखीच इच्छा बाळगली पाहिजे आणि यहोवाच्या मार्गदर्शनाचे तत्परतेने पालन केले पाहिजे. तसेच, धर्मत्याग व अविश्वासूपणा यांसारख्या गोष्टींना आपण आपल्या उपासनेच्या मार्गात येऊ दिल्यास कोणते दुष्परिणाम घडू शकतात हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. योशीयाप्रमाणेच आपल्यालाही खऱ्या उपासनेविषयी जो आवेश आहे त्याची यहोवा नक्कीच दखल घेईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.
आध्यात्मिक रत्नं
बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून तुम्ही बोध घेणार का?
१५ योशीया राजाकडून आपण काय शिकू शकतो? योशीया हा एक चांगला राजा होता. तरी त्याने एक अशी चूक केली ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. (२ इतिहास ३५:२०-२२ वाचा.) त्याने कोणती चूक केली? योशीया राजा इजिप्तचा राजा नखो याच्यासोबत युद्ध लढण्यास गेला. मुळात तसं करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. खरंतर, नखो राजाने स्वतः योशीयाला सांगितलं होतं, की त्याला त्याच्याविरुद्ध लढण्याची इच्छा नाही. बायबल म्हणतं की नखो राजाने जे सांगितलं होतं ते खरंतर देवाकडून होतं. पण, तरी योशीया राजा नखोविरुद्ध युद्ध लढण्यासाठी गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. योशीया राजाने नखो राजासोबत युद्ध का लढलं, याबद्दल बायबल काही सांगत नाही.
१६ नखो राजा जे बोलला ते खरोखर यहोवाकडून आहे किंवा नाही, हे योशीयाने आधी तपासून पाहायला हवं होतं. हे तो कसं करू शकत होता? त्याने यहोवाचा संदेष्टा यिर्मया याला विचारायला हवं होतं. (२ इति. ३५:२३, २५) तसंच, योशीयाने परिस्थितीदेखील तपासून पाहायला हवी होती. कारण, खरंतर नखो हा यरुशलेम नगराविरुद्ध नाही तर कर्कमीश नगराविरुद्ध लढण्यासाठी निघाला होता. तसंच, नखो राजाने यहोवाची किंवा त्याच्या लोकांची निंदाही केली नव्हती. योशीयाने निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टींवर काळजीपूर्वक विचार केला नाही. यापासून आपण कोणता धडा शिकू शकतो? आपल्यासमोर जेव्हा एखादी समस्या येते आणि आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा अशा परिस्थितीत आपण काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे हे आधी आपण तपासून पाहिलं पाहिजे.
१७ आपल्याला जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला कोणत्या बायबल तत्त्वांमुळे मदत होईल हे आपण पाहिलं पाहिजे. तसंच, ती तत्त्वं आपण कशी लागू करू शकतो याबद्दलही आपण आधी विचार करणं गरजेचं आहे. काही वेळा आपल्याला आपल्या प्रकाशनांमध्ये थोडं अधिक संशोधन करण्याची किंवा मंडळीच्या एखाद्या वडिलांकडे सल्ला मागण्याची गरज पडू शकते. ते आपल्याला इतर बायबल तत्त्वांचा विचार करण्यास मदत करू शकतात. पुढील परिस्थितीची कल्पना करा: समजा एका ख्रिस्ती बहिणीचा पती सत्यामध्ये नाही. ही बहीण एका विशिष्ट दिवशी सेवाकार्याला जाण्याचं नियोजन करते. (प्रे. कृत्ये ४:२०) पण, त्या दिवशी आपल्या पत्नीने सेवाकार्यासाठी जाऊ नये अशी तिच्या पतीची इच्छा आहे. तो तिला म्हणतो की बऱ्याच दिवसांपासून त्यांनी सोबत मिळून वेळ घालवलेला नाही. आणि म्हणून सोबत चांगला वेळ घालवता यावा यासाठी तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याची त्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून, बहीण बायबलमधील काही वचनांवर विचार करते. तिला या गोष्टीची जाणीव आहे, की तिने यहोवाची आज्ञा पाळली पाहिजे, आणि येशूने ख्रिश्चनांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली आहे. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये ५:२९) पण, त्याच वेळी ती हेदेखील लक्षात ठेवते, की पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहिलं पाहिजे आणि देवाची सेवक या नात्यानं तिनं समंजसपणा दाखवणंदेखील गरजेचं आहे. (इफिस. ५:२२-२४; फिलिप्पै. ४:५) तिच्या पतीला असं वाटतं का की तिने कधीही सेवाकार्याला जाऊ नये? की, त्याला फक्त त्या विशिष्ट दिवशी तिच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे? यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला समंजसपणा दाखवून असे निर्णय घ्यायचे आहेत, ज्यांमुळे आपण यहोवाचं मन आनंदित करू शकतो.
२६ जून–२ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एज्रा १-३
“यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या”
जखऱ्याने जे पाहीलं ते तुम्ही पाहू शकता का?
यहूदी लोकांमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. कारण बाबेलच्या बंदिवासात त्यांनी बरीच वर्ष घालवल्यानंतर आता यहोवा देवाने त्यांची सुटका करण्यासाठी पर्शियाचा राजा कोरेश ‘याचं मन प्रेरित केलं होतं.’ राजाने अशी घोषणा केली, की सर्व यहुद्यांनी आपल्या मायदेशी परत जाऊन “इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर पुन्हा बांधावं.” (एज्रा १:१, ३) कल्पना करा, यहुद्यांना ही गोष्ट ऐकून किती आनंद झाला असेल! कारण देवाने आपल्या लोकांना जो देश दिला होता तिथे खरी उपासना आता पुन्हा सुरू होणार होती.
रथ आणि मुकुट तुमचं संरक्षण करतात
२ यरुशलेममध्ये परत आलेले यहुदी मुळात यहोवाचे विश्वासू सेवक आहेत हे जखऱ्याला माहीत होतं. बाबेलमधलं आपलं घरदार आणि शेतीवाडी सोडून येण्यास “देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली” होती ते हेच लोक होते. (एज्रा १:२, ३, ५) यरुशलेममध्ये येण्यासाठी ते आपला ओळखीचा परिसर सोडून आले होते. आणि त्यांच्यापैकी बहुतेकांनी तर पूर्वी कधीही यरुशलेम पाहिलं नव्हतं. यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याचं काम त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं, की डोंगराळ प्रदेशातून सुमारे १,६०० किलोमीटरचा खडतर व धोकादायक प्रवास करण्यासही ते तयार झाले होते.
आध्यात्मिक रत्नं
एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे
१:३-६. बॅबिलोनमध्येच राहिलेल्या काही इस्राएलांप्रमाणे, अनेक यहोवाचे साक्षीदार असे आहेत ज्यांना पूर्णवेळेची सेवा करता येत नाही किंवा अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करता येत नाही. पण जे असे करू शकतात त्यांना ते पाठिंबा व उत्तेजन देतात आणि राज्य-प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याच्या वृद्धीसाठी स्वच्छेने दान देतात.