जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
© 2022 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
६-१२ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ इतिहास २३-२६
“मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था”
इन्साइट-२ २४१
लेवी
दावीद राजाच्या काळात लेव्यांच्या कामांची चांगल्या प्रकारे व्यवस्था लावून देण्यात आली. दावीदने लेव्यांना मंदिराच्या कामाची देखरेख करणारे, अधिकारी, न्यायाधीश, द्वारपाल आणि वस्तूंच्या भांडारावर असणारे अधिकारी म्हणून नेमलं. तसंच अनेकांना मंदिरात, अंगणात आणि जेवणाच्या खोल्यांमध्ये याजकांना मदत करण्यासाठी नेमण्यात आलं होतं. हे लेवी अर्पणं, बलिदानं, शुद्धीकरणाची कामं आणि मोजमाप करायचं कामं करायचे. तसंच मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी ते पहारेकरी म्हणून काम करायचे. याशिवाय, याजकांच्या गटांप्रमाणेच गायन-वादन करणाऱ्या लेव्यांनासुद्धा २४ गटांमध्ये विभागलं होतं. हे गट आळीपाळीने मंदिरात सेवा करायचे. यासोबतच, काही खास कामांसाठी चिठ्ठ्या टाकून लेव्यांना नेमलं जायचं.—१इत २३, २५, २६; २इत ३५:३-५, १०.
इन्साइट-२ ६८६
याजक
ज्या याजकांना अधिकारी म्हणून नेमलं होतं, ते इतर याजकांच्या कामांची देखरेख करायचे. काही विशिष्ट कामांसाठी चिठ्ठ्या टाकून याजकांना नेमलं जायचं. याजकांना २४ वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं होतं. आणि ते वर्षांतून दोनदा एका आठवड्यासाठी मंदिरात सेवा करायचे. पण सणांच्या काळात जेव्हा हजारो बलिदानं दिली जायची तेव्हा मात्र सगळेच याजक मंदिरात सेवा असावेत असं दिसतं.—१इत २४:१-१८, ३१; २इत ५:११; २इत २९:३१-३५; ३०:२३-२५; ३५:१०-१९ सोबत तुलना करा.
यहोवाचे गुणगान करा
८ वस्तुतः, गायन हा मंदिरातील उपासनेमध्ये इतका महत्त्वाचा भाग होता की, संगीताच्या सेवेकरता ४,००० लेव्यांना बाजूला काढण्यात आले होते. (१ इतिहास २३:४, ५) यांना गायकही साथ देत असत. उपासनेमध्ये संगीत, विशेषपणे गायकांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. ते खासकरुन नियमशास्त्रातील महत्त्वाच्या गोष्टी बिंबवण्याकरता नव्हते तर, उपासनेसाठी योग्य उत्साह पुरवण्याकरता होते. त्याने यहोवाची उत्साही मार्गाने उपासना करण्यासाठी इस्राएल लोकांना मदत केली. या वैशिष्ट्यासाठी बारीक सारीक गोष्टीची तयारी, त्यासाठी दिलेले लक्ष, याला विचारात घ्या: “ते व त्यांचे भाऊबंद परमेश्वराप्रीत्यर्थ [यहोवा, NW] गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते.” (१ इतिहास २५:७) यहोवाचे गुणगान करण्याला त्यांनी किती गंभीरपणे घेतले हे लक्षात घ्या. ते गाण्यात तरबेज व निपुण होते!
इन्साइट-१ ८९८
द्वारपाल
मंदिरात. दावीदच्या काळात जवळपास ४,००० द्वारपाल होते आणि त्यांना वेगवेगळ्या गटांत विभागण्यात आलं होतं. प्रत्येक गट सात दिवसांसाठी ही जबाबदारी सांभाळायचा. देवाच्या मंदिरात पहारा देण्याची आणि सकाळ-संध्याकाळ दरवाजे उघडण्याची आणि बंद करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. (१इत ९:२३-२७; २३:१-६) यासोबतच, लोकांनी मंदिरात आणलेल्या दानासंबंधी असलेली कामंही ते पाहायचे. (२रा १२:९; २२:४) काही काळानंतर, दुष्ट राणी अथल्या हिच्यापासून लहान यहोआशचं रक्षण करण्यासाठी मंदिराच्या दरवाजांवर खास रक्षकांना नेमण्यात आलं होतं. (२रा ११:४-८) तसंच जेव्हा योशीया राजा देशातून मूर्तिपूजा काढून टाकत होता, तेव्हा बआल देवासाठी वापरल्या जाणाऱ्या मूर्तिपूजेच्या वस्तू मंदिरातून काढून टाकण्यासाठी द्वारपालांनी मदत केली.—२रा २३:४.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवाची उपासना केल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल!
१० आपण सोबत मिळून गीत गातो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. (स्तो. २८:७) गीत गाणं हा इस्राएली लोकांसाठी उपासनेचा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणूनच दावीद राजाने २८८ लेव्यांना मंदिरात गायक म्हणून नेमलं होतं. (१ इति. २५:१, ६-८) आज आपणसुद्धा यहोवाच्या स्तुतीसाठी गीत गाऊन त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम दाखवू शकतो. आणि यासाठी आपला आवाज चांगलाच असला पाहिजे अशी गरज नाही. विचार करा, बोलताना “आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो.” पण म्हणून आपण सभेत आणि सेवाकार्यात यहोवाबद्दल बोलायचं थांबवत नाही. (याको. ३:२) त्याचप्रमाणे, आपण इतकं काही चांगलं गात नाही असं वाटत असलं तरीपण आपण गीत गाऊन यहोवाची स्तुती करायचं थांबवू नये.
१३-१९ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ इतिहास २७-२९
“एका प्रेमळ पित्याचा सल्ला”
ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड होऊ नये
९ बायबलमधील सत्याची व्यक्तिशः खात्री करून घ्या. शास्त्रवचनांच्या ज्ञानाचा ठोस आधार असल्याशिवाय यहोवाचे सेवक असण्याची आपली जाणीव कमजोर होऊ शकते. (फिलिप्पैकर १:९, १०) तरुण असो वा वृद्ध, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने या गोष्टीची व्यक्तिशः खात्री करून घेतली पाहिजे की आपण जे मानतो ते खरोखर बायबलमध्ये प्रकट केलेल्या सत्याला धरून आहे. पौलाने आपल्या सहविश्वासू बांधवांना असा आग्रह केला: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) देवभीरू कुटुंबांतील तरुण ख्रिश्चनांनी हे ओळखले पाहिजे की केवळ त्यांचे आईवडील विश्वासात असल्यामुळे ते आपोआपच खरे ख्रिस्ती बनत नाहीत. खुद्द शलमोनाच्या पित्याने, दाविदाने त्याला “आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर,” असा सुज्ञ सल्ला दिला. (१ इतिहास २८:९) आपल्या पित्याने यहोवावर कसा विश्वास उत्पन्न केला याचे केवळ शलमोनाने निरीक्षण करून चालणार नव्हते. त्याला व्यक्तिशः यहोवाची ओळख करून घेण्याची गरज होती आणि त्याने असेच केले. त्याने देवाला अशी याचना केली: “या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे.”—२ इतिहास १:१०.
पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा
१३ धडा स्पष्टच आहे. आपण जर नियमित रीत्या हितकारक व समाधान देणारी कार्ये करत असू, अर्थात सभांना उपस्थित राहत असू व सेवा कार्यात सहभागी होत असू, तर ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. पण, पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्यात आणखी काहीतरी गोवलेले आहे. (२ इति. २५:१, २, २७) एक ख्रिस्ती व्यक्ती मनातल्या मनात जगातील काही गोष्टींवर प्रेम करत राहते, तेव्हा देवासोबतचा तिचा चांगला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. (लूक १७:३२) जर आपण खरोखर वाइटाचा वीट मानला व बऱ्याला चिकटून राहिलो तरच आपण देवाच्या राज्यास उपयोगी ठरू. (रोम. १२:९; लूक ९:६२) म्हणूनच, सैतानाच्या जगातील कोणतीही गोष्ट, मग ती कितीही उपयोगी किंवा हवीहवीशी वाटत असली, तरी राज्याशी संबंधित कार्ये पूर्ण मनाने करण्यास ती आपल्याला रोखणार नाही याची आपण प्रत्येकाने खातरी केली पाहिजे.—२ करिंथ. ११:१४; फिलिप्पैकर ३:१३, १४ वाचा.
“हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
२० राजा दावीदने शलमोनला आठवण करून दिली होती, की मंदिराच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत यहोवा त्याच्याबरोबर राहील. (१ इति. २८:२०) दावीदच्या या शब्दांवर शलमोनने नक्कीच मनन केलं असावं. शलमोन तरुण होता आणि त्याला कोणताही अनुभव नव्हता. पण, त्याने या गोष्टींना मंदिर बांधण्याच्या कार्याच्या आड येऊ दिलं नाही. याउलट, त्याने मोठं धैर्य दाखवलं आणि यहोवाच्या मदतीने फक्त साडे सात वर्षांत यहोवाच्या “अत्यंत भव्य” मंदिराचं काम पूर्ण केलं.
२१ यहोवाने शलमोनला मदत केली, आणि आज तो आपल्यालाही कुटुंबात आणि मंडळीत धैर्य दाखवण्यासाठी, तसंच कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो. (यश. ४१:१०, १३) यहोवाची सेवा करत असताना आपण धैर्य दाखवलं, तर यहोवा आपल्याला आता आणि येणाऱ्या भविष्यातही नक्कीच आशीर्वादित करेल. म्हणूनच, ‘हिंमत बांधा, धैर्य धरा आणि कार्य करा.’
आध्यात्मिक रत्नं शोधा
मैत्री धोक्यात असतानाही, तुम्ही मित्र बनून राहाल का?
दावीद राजाशी एकनिष्ठ असलेले इतरही बरेच सोबती होते, ज्यांनी दाविदाच्या कठीण काळादरम्यान त्याला साथ दिली होती. हूशय हा त्यांपैकीच एक होता. बायबलमध्ये हूशयची ओळख, “दाविदाचा मित्र” म्हणून करून देण्यात आली आहे. (२ शमु. १६:१६; १ इति. २७:३३) हूशयला कदाचित राजदरबारात स्थान असावं. तो राजाचा मित्र आणि त्याच्यासोबत काम करणारा होता. हूशयने बऱ्याच वेळा राजाने गुप्तपणे दिलेल्या निर्देशनांचं पालन केलं होतं.
दाविदाचा मुलगा अबशालोम याने राजाचं स्थान बळकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बऱ्याच इस्राएली लोकांनीही अबशालोमाची बाजू घेतली होती. पण हूशय मात्र दाविदाला विश्वासू राहिला. दावीद जेव्हा अबशालोमापासून पळून चालला होता, तेव्हा हूशय त्याला भेटण्यासाठी गेला. आपल्या मुलाने आणि ज्यांच्यावर आपला भरवसा होता त्यांनी आपल्याविरुद्ध बंड केला, याचं दाविदाला फार दुःख झालं होतं. हूशय दाविदाशी एकनिष्ठ राहिला. त्याने हा बंड मोडून काढण्यासाठी राजाने दिलेल्या आज्ञेचं पालन केलं. या कामात त्याचा जीवही जाऊ शकत होता. एक राजदरबारी आणि कर्तव्य म्हणून हूशयने दाविदाच्या आज्ञेचं पालन केलं नव्हतं, तर राजाचा एकनिष्ठ मित्र म्हणून त्याने त्याच्या आज्ञेचं पालन केलं होतं.—२ शमु. १५:१३-१७, ३२-३७; १६:१५—१७:१६.
२०-२६ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास १-४
“शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो”
इन्साइट-१ १७४ ¶५
सैन्य
इस्राएलच्या इतिहासात शलमोन हा एकमेव राजा होता ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात घोडे आणि रथ होते. यांपैकी बरेचसे घोडे त्याने इजिप्तमधून आणले होते. इतकंच नाही तर त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात घोडे आणि रथ होते, की त्यांना सांभाळण्यासाठी त्याला इस्राएलमध्ये शहरं बांधावी लागली. (१रा ४:२६; ९:१९; १०:२६, २९; २इत १:१४-१७) पण शलमोनच्या या गोष्टीला यहोवाने कधीच स्वीकृती दाखवली नाही.—यश ३१:१.
इन्साइट-१ ४२७
रथ
शलमोनचं राज्य सुरू होण्याआधी इस्राएलमध्ये संपूर्ण देशासाठी असलेलं असं एक खास सैन्य नव्हतं आणि युद्धासाठी असलेल्या रथांची संख्याही खूप कमी होती. कारण देवाने आज्ञा दिली होती, की इस्राएलच्या राजाने जास्त घोडे स्वतःजवळ ठेवू नयेत. राजाने जर जास्त घोडे स्वतःजवळ ठेवले तर त्याचा अर्थ असा होणार होता, की देशाच्या संरक्षणासाठी तो देवाऐवजी घोडे आणि रथ असलेल्या सैन्याच्या ताकदीवर जास्त विसंबून आहे. घोड्यांची संख्या कमी असल्यामुळे आपोआपच रथांची संख्यासुद्धा कमी असणार होती.—अनु १७:१
शलमोन राजा जेव्हा आपलं सैन्य वाढवत होता तेव्हा त्याने आपल्या सैन्यात १,४०० रथांचा समावेश केला होता. (१रा १०:२६, २९; २इत १:१४, १७) यरुशलेम आणि इतर काही शहरं खास रथांसाठी बांधण्यात आली होती. या रथांची आणि घोड्यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्या शहरांमध्ये होत्या.—१रा ९:१९, २२; २इत ८:६, ९; ९:२५.
आध्यात्मिक रत्नं शोधा
दुसरा इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे
१:११, १२. शलमोनाने देवाला केलेल्या विनंतीवरून असे दिसून येते की बुद्धी व ज्ञान मिळवण्याची त्याला मनस्वी इच्छा होती. आपल्या प्रार्थनांवरूनही आपल्या मनस्वी इच्छा कोणत्या आहेत हे दिसून येते. तेव्हा आपण कशाविषयी प्रार्थना करतो हे तपासून पाहणे सूज्ञतेचे चिन्ह आहे.
२७ मार्च–२ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास ५-७
“माझं मन नेहमी इथे राहील”
एकत्र येणे सोडू नका
नंतर, दावीद जेरूसलेममध्ये राजा बनला तेव्हा त्याने यहोवाच्या गौरवासाठी एक कायमचे मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा प्रकट केली. परंतु, दावीद हा शूर योद्धा असल्यामुळे यहोवाने त्याला म्हटले: ‘तू माझ्या नामाने मंदिर बांधणार नाहीस.’ उलट, त्याने दावीदाचा पुत्र शलमोन याला आपले मंदिर बांधायला निवडले. (१ इतिहास २२:६-१०) सा.यु.पू. १०२६ मध्ये साडे सात वर्षांच्या बांधकामानंतर शलमोनाने मंदिराचे उद्घाटन केले. आणि यहोवाने या मंदिराबद्दल आपली पसंती व्यक्त करून म्हटले: “हे जे मंदिर तू बांधिले आहे त्यास माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टि व माझे चित्त त्यावर सतत राहील.” (१ राजे ९:३) इस्राएली लोक विश्वासू राहतील तोपर्यंत देव त्या मंदिरावर आपली पसंती दाखवणार होता. पण ते योग्य मार्गापासून बहकले तर यहोवा त्या ठिकाणावरून त्याची पसंती काढून घेणार होता आणि ‘ते मंदिर उद्ध्वस्त होणार होते.’—१ राजे ९:४-९; २ इतिहास ७:१६, १९, २०.
इन्साइट-२ १०७७-१०७८
मंदिर
इतिहास. इस्राएली लोकांनी जेव्हा-जेव्हा यहोवाला सोडून दिलं तेव्हा-तेव्हा त्याने इतर राष्ट्रांना मंदिरातला खजिना आणि इतर मौल्यवान वस्तू लुटू दिल्या. उदाहरणार्थ, मंदिराचं उद्घाटन झाल्याच्या जवळपास फक्त ३३ वर्षांनंतर (इ.स.पू. ९९३), म्हणजे शलमोनचा मुलगा रहबाम याच्या काळात इजिप्तचा राजा शिशक याने मंदिर लुटलं. (१रा १४:२५, २६; २इत १२:९) शेवटी इ.स.पू. ६०७ मध्ये नबुखद्नेस्सर राजाच्या नेतृत्वाखाली बाबेलच्या सैन्याने मंदिराचा नाश केला.—२रा २५:९; २इत ३६:१९; यिर्म ५२:१३.
आध्यात्मिक रत्नं शोधा
तो ‘सर्व मानवजातीची मने ओळखतो’
शलमोनाने केलेल्या प्रार्थनेतून आपणही बरेच सांत्वन मिळवू शकतो. आपल्या बरोबरच्या लोकांना कदाचित आपल्या आंतरिक भावना, अर्थात आपले “क्लेश” किंवा आपले “दु:ख” पूर्णपणे समजणार नाही. (नीतिसूत्रे १४:१०) पण यहोवा आपले मन जाणतो आणि त्याला आपली खूप काळजी आहे. प्रार्थनेद्वारे त्याच्यापुढे मन मोकळे केल्यावर आपले मन हलके होते. यहोवावर “तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो,” असे बायबल आपल्याला सांगते.—१ पेत्र ५:७.
१०-१६ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास ८-९
“तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं”
जगावेगळी उदारता
अर्थात, शबाच्या राणीने देखील शलमोनाला भेटण्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम खर्च केला होता. शबाची राणी सध्याच्या येमेन प्रजासत्ताकच्या प्रदेशात राहत होती असे दिसते. तेथून यरुशलेमला येण्यासाठी या राणीने आणि तिच्या काफल्याने सुमारे १,६०० किलोमीटर प्रवास केला असावा. येशूने म्हटल्यानुसार, “ती पृथ्वीच्या सीमेपासून आली.” शबाच्या राणीने एवढा त्रास का घेतला? ती खासकरून “शलमोनाचे ज्ञान ऐकावयास” आली होती.—लूक ११:३१.
प्रतिफलदायी ठरलेली भेट
असो, राणी “आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली.” (१ राजे १०:२क) काहींचे म्हणणे आहे की “मोठा लवाजमा” यांत सशस्त्र संरक्षक होते. हे समजण्याजोगे आहे कारण, एकतर राणी ही शक्तिशाली प्रतिष्ठित व्यक्ती होती; शिवाय तिच्याबरोबर अंदाज लावता येत नाही इतक्या किंमतीचे सामानसुमान होते.*
पण, राणीने “परमेश्वराच्या [यहोवाच्या] नामासंबंधाने” शलमोनाची कीर्ती ऐकली होती, याकडे लक्ष द्या. तेव्हा हा प्रवास फक्त व्यापारी हेतूचा नव्हता. पुराव्यानुसार राणीने प्रामुख्याने शलमोनाच्या बुद्धीविषयी ऐकले होते—कदाचित त्याचा देव यहोवा याच्याविषयी ती माहीत करून घ्यायला आली असावी. ती कदाचित, यहोवाचे उपासक असलेल्या शेम किंवा हाम यांच्या वंशातून असल्यामुळे तिला आपल्या पूर्वजांच्या धर्माबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता असावी.
प्रतिफलदायी ठरलेली भेट
शलमोनाची बुद्धी व त्याच्या राज्याचे ऐश्वर्य पाहून शबाची राणी इतकी प्रभावित झाली की ती “गांगरून गेली.” (१ राजे १०:४, ५) काहींच्या मते या वाक्यांशाचा अर्थ असा होतो, की राणीने आश्चर्याने आपला “श्वास रोखला.” एक विद्वान तर म्हणतात, की ती बेशुद्ध पडली! काहीही असो, ती जे पाहत होती व ऐकत होती त्यामुळे राणी चाट पडली. अशा राजाची सुज्ञता ऐकायला मिळत असल्यामुळे तिने शलमोनाच्या दासांना धेन्य म्हटले; शलमोनाला सिंहासनावर विराजमान केल्याबद्दल तिने यहोवाचे आभार मानले. मग तिने राजाला किंमती देणग्या दिल्या; त्यातील फक्त सोन्याचीच किंमत आधुनिक किंमतीप्रमाणे ४,००,००,००० डॉलर होते. शलमोनानेही तिला देणग्या दिल्या; शलमोनाने, “तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरविली.”*—१ राजे १०:६-१३.
खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार
इस्राएल राष्ट्र विश्वासू असताना त्यावरील यहोवाचा समृद्ध आशीर्वाद सभोवतालच्या राष्ट्रांकरता साक्ष ठरला. जसे, यहोवाने अभिवचन दिलेल्या आशीर्वादांचे कथन केल्यावर मोशेने म्हटले: “परमेश्वराचे [यहोवा] नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल.” (अनुवाद २८:१०) शलमोनाला स्वतःच्या विश्वासामुळे बुद्धी आणि धनसंपत्ती देण्यात आली. त्याच्या आधिपत्याखाली राष्ट्राची भरभराट झाली आणि त्या राष्ट्राने दीर्घकाळापर्यंत शांतीचा आनंद घेतला. त्या काळाविषयी आपण वाचतो: “पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ति ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकावयास येत असत.” (१ राजे ४:२५, २९, ३०, ३४) शलमोनाला भेट देणाऱ्यांपैकी शबाची राणी ही प्रमुख होती. राष्ट्र आणि त्याच्या राजावरील यहोवाचा आशीर्वाद स्वतः पाहिल्यावर तिने म्हटले: “धन्य आपला देव परमेश्वर [यहोवा]; त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापिले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”—२ इतिहास ९:८.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ १०९७
राजासन
इस्राएलच्या सगळ्या राजांपैकी फक्त शलमोनच्याच राजासनाचं इतकं सविस्तर वर्णन करण्यात आलंय. (१रा १०:१८-२०; २इत ९:१७-१९) राजासनासमोर असलेल्या सहा पायऱ्यांचा उल्लेख केल्यानंतर बायबल असं म्हणतं: “राजासनाच्या दोन्ही बाजूंना हात ठेवण्यासाठी आधार असून त्यांच्या बाजूला सिंहांचे दोन पुतळे उभे करण्यात आले होते. सहा पायऱ्यांवर दोन्ही बाजूंना एकेक असे १२ सिंहांचे पुतळे उभे करण्यात आले होते.” (२इत ९:१७-१९) राजासनाच्या दोन्ही बाजूंना असलेले सिंहांचे दोन पुतळे राजा म्हणून शलमोनच्या अधिकाराला सूचित करत होते. (उत्प ४९:९, १०; प्रक ५:५) आणि १२ सिंह कदाचित इस्राएलच्या १२ वंशांना आणि या राजासनावर बसणाऱ्या राजाला त्यांचा पाठिंबा आहे या गोष्टीला सूचित करत असावेत.
१७-२३ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास १०-१२
“चांगल्या सल्ल्याचे फायदे”
तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता
रहबामला आता एक कठीण निर्णय घ्यावा लागणार होता. जर त्याने लोकांच्या इच्छेनुसार निर्णय घेतला असता तर त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि महलात राहणाऱ्या लोकांना कदाचित काही सुखसोयी गमवाव्या लागल्या असत्या. आणि जर त्याने लोकांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेतला असता तर लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारला असता. मग त्याने कोणता निर्णय घेतला? तो सर्वात आधी अशा वृद्ध लोकांशी बोलला ज्यांनी त्याच्या वडिलांना मदत केली होती. त्यांनी रहबामला प्रजेचं ऐकण्याचा सल्ला दिला. पण मग रहबाम आपल्या वयाच्या लोकांशी बोलला आणि त्याने लोकांशी कठोरपणे वागण्याचा निर्णय घेतला. रहबामने प्रजेला म्हटलं: “माझ्या वडिलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हाला चाबकाने शासन केले असेल पण मी टोकदार धातूची टोके जोडलेल्या चाबकांनी शासन करीन.”—२ इति. १०:६-१४, ईझी-टू-रीड व्हर्शन.
योग्य निर्णय कसे घ्यावेत
आपल्या निर्णयांची चर्चा करण्यासाठी यहोवाने मंडळीत प्रौढ लोकांचीही तरतूद केली आहे. (इफिसकर ४:११, १२) काहीजण सगळ्यांकडून सल्ला घेतात पण जी व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे बोलते तिचेच ते ऐकतात; असे आपण करू नये. अशा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे सल्ला मिळाल्यावर ते तो सल्ला ऐकतात. तसेच, आपण रहबामाच्या उदाहरणावरून शिकायला मिळणारा धडा देखील लक्षात ठेवला पाहिजे. त्याला एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा होता तेव्हा त्याच्या पित्याची सेवा केलेल्या वडिलधाऱ्या पुरुषांकडून त्याला उत्तम सल्ला मिळाला. पण त्यांचा सल्ला ऐकण्याऐवजी त्याने त्याच्या वयाच्या तरुणांचा सल्ला घेतला. त्यांचा सल्ला घेऊन त्याने चुकीचा निर्णय घेतला आणि याचा परिणाम असा झाला की, त्याला आपल्या राज्याचा एक मोठा भाग गमवावा लागला.—१ राजे १२:१-१७.
सल्ला घेताना, शास्त्रवचनांचे चांगले ज्ञान असलेल्या व योग्य तत्त्वांचा आदर करणाऱ्या अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. (नीतिसूत्रे १:५; ११:१४; १३:२०) जमल्यास, त्यामध्ये गोवलेल्या तत्त्वांवर आणि तुम्ही जमा केलेल्या सर्व माहितीवर मनन करा. यहोवाच्या वचनाच्या प्रकाशात तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे पाहू लागता तेव्हा योग्य निर्णय कोणता आहे हे कदाचित अधिक स्पष्ट दिसू लागेल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
इन्साइट-२ ७६८ ¶१
रहबाम
रहबाम अतिशय उद्धट आणि इतरांच्या भावना समजून न घेणारा राजा होता. त्यामुळे बहुतेक लोकांनी त्याला पाठिंबा द्यायचं सोडून दिलं. इस्राएलच्या १२ वंशांपैकी फक्त यहूदा आणि बन्यामीन वंश, दोन्ही राज्यांचे याजक आणि लेवी, तसंच दहा वंशांतले काही लोक त्याला पाठिंबा देत होते.—१रा १२:१६, १७; २इत १०:१६, १७; ११:१३, १४, १६.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ ९६६-९६७
बकऱ्यांसारखी दैवतं
यहोशवा २४:१४ वरून आपल्याला समजतं, की इजिप्तमध्ये केल्या जाणाऱ्या खोट्या उपासनेचा इस्राएली लोकांवर काही प्रमाणात प्रभाव पडला होता. (यहे २३:८, २१) म्हणून बायबलचे काही विद्वान असं मानतात, की यराबामने ‘बकऱ्यांसारख्या दैवतांसाठी’ याजक नेमले होते असं जे सांगितलंय त्यावरून दिसून येतं, की इजिप्तच्या लोकांप्रमाणेच इस्राएली लोकांनीसुद्धा एक प्रकारे बकऱ्यांची उपासना करायला सुरुवात केली होती.—२इत ११:१५
पण ‘बकऱ्यांसारखी दैवतं’ नेमकी कशाला सूचित करतात हे आपल्याला नक्की माहीत नाही. लोक ज्या खोट्या दैवतांची उपासना करायचे ती दैवतं बकऱ्यांसारखी दिसायची हे सांगण्यासाठी कदाचित हा शब्द वापरण्यात आला असावा. किंवा मग, सगळ्याच मूर्ती किती घृणास्पद आणि किळसवाण्या आहेत हे दाखवण्यासाठी हा शब्द वापरला असावा. जसं “मूर्ती” यासाठी मूळ भाषेत “विष्ठा” असा शब्द वापरला असला तरी त्या मूर्ती खरोखर त्यापासून बनवल्या होत्या असं नाही, तर त्या किती किळसवाण्या आहेत हे दाखवण्यासाठी हा शब्द वापरला आहे. त्याचप्रमाणे ही दैवतं किती घृणास्पद होती हे दाखवण्यासाठी ‘बकऱ्यांसारखी’ असा शब्द वापरण्यात आलाय.—लेवी २६:३०; अनु २९:१७.
२४-३० एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ इतिहास १३-१६
“नेहमी यहोवावर अवलंबून राहा”
तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?
१२ तरुण असताना आसा राजा नम्र आणि धाडसी होता. उदाहरणार्थ, आपल्या वडिलांनंतर तो राजा बनला तेव्हा त्याने देशातून सगळ्या मूर्ती काढून टाकायला सुरुवात केली. त्यासोबतच “त्याने यहूदाच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या देवाची, यहोवाची उपासना करायला आणि त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र पाळायला सांगितलं.” (२ इति. १४:१-७) एकदा इथियोपियाचा जेरह दहा लाख सैनिक घेऊन यहूदावर हल्ला करायला आला तेव्हा आसाने यहोवाकडे मदत मागितली. त्याने अशी प्रार्थना केली: “हे यहोवा! तू कोणालाही मदत करू शकतोस, मग ते शक्तिशाली असोत किंवा कमजोर असोत. हे आमच्या देवा यहोवा! आम्हाला मदत कर, कारण आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवलाय.” आसाच्या या सुंदर शब्दांवरून दिसून येतं, की आपल्याला आणि आपल्या लोकांना वाचवण्याची शक्ती यहोवाकडे आहे यावर त्याला पूर्ण भरवसा होता. आणि म्हणूनच यहोवानेही “इथोपियाच्या सैन्याचा पराभव केला.”—२ इति. १४:८-१२.
तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?
१३ दहा लाख सैनिकांचा सामना करणं काही सोपं नव्हतं. पण यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आसा त्यांच्यावर विजय मिळवू शकला. पण नंतर इस्राएलचा दुष्ट राजा बाशा यहूदावर हल्ला करायला आला तेव्हा मात्र आसाने यहोवावर भरवसा ठेवला नाही. उलट, त्याने सीरियाच्या राजाकडून मदत मागितली. त्याच्या या चुकीच्या निर्णयामुळे त्याला वाईट परिणाम भोगावे लागले. यहोवाने हनानी संदेष्ट्याद्वारे आसा राजाला असा संदेश पाठवला: “तू तुझा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी सीरियाच्या राजावर भरवसा ठेवलास, म्हणून सीरियाचा राजा तुझ्या हातून निसटून गेला.” आणि तेव्हापासून बाशा राजासोबत आसाचं सतत युद्ध होत राहिलं. (२ इति. १६:७, ९; १ राजे १५:३२) या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता?
तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?
१४ नम्र राहा आणि नेहमी यहोवावर भरवसा ठेवा. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा हेच दिसून आलं, की यहोवावर तुमचा पूर्ण भरवसा आहे. आणि यहोवालाही तुमच्या या निर्णयामुळे आनंद झाला. पण पुढेही यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं. आयुष्यात मोठमोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा तुम्ही नक्कीच यहोवावर भरवसा ठेवत असाल. पण इतर निर्णयांबद्दल काय? जसं की, मनोरंजनाची किंवा नोकरीची निवड करताना, किंवा जीवनात कोणती ध्येयं ठेवायची हे ठरवताना. या गोष्टींच्या बाबतीतही निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी बायबलची तत्त्वं विचारात घ्या आणि त्यांप्रमाणे काम करा. (नीति. ३:५, ६) असं केल्यामुळे यहोवाला आनंद होईल आणि मंडळीतले भाऊबहीणही तुमचा आदर करतील.—१ तीमथ्य ४:१२ वाचा.
आध्यात्मिक रत्नं शोधा
“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा
७ आपणही यहोवाला पूर्ण मनाने समर्पित आहोत की नाही, याचं आपल्यापैकी प्रत्येकाने परीक्षण केलं पाहिजे. यासाठी आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘अगदी कठीण परिस्थितीतही मी यहोवाला आज्ञाधारक राहील का? त्याची मंडळी शुद्ध ठेवण्याचा माझा निर्धार पक्का आहे का?’ आसाला आपल्या आजीला राजमातेच्या पदावरून काढण्यासाठी किती धैर्य दाखवण्याची गरज पडली असेल याचा विचार करा. कदाचित तुमच्यासमोरही अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला धैर्य दाखवण्याची गरज पडेल. एक उदाहरण घ्या. समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने किंवा जवळच्या एखाद्या मित्राने पाप केलं आहे आणि त्याबद्दल पश्चात्ताप न दाखल्यामुळे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारे संगती न करण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल का? तुमचं ‘हृदय’ तुम्हाला काय करण्यास प्रेरित करेल?